Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

घनदाट अरण्यातून सड्यावर

प
प्रचेतस
Sun, 11/23/2014 - 05:40
💬 53
कंजूस काकांनी लिहिलेल्या येऊर भटकंती-संजय गांधी उद्यानह्या धाग्यामुळे एप्रिल मध्ये केलेल्या आंबा घाटाच्या भ्रमंतीची आठवण आली. पुण्यावरून दुपारी मी व माझा एक मित्र असे दोघेच निघालो ते संध्याकाळी ६ च्या सुमारास आंबा गावात पोहोचलो. कराड - कोकरूड - मलकापूर - आंबा असा हा प्रवासाचा टप्पा. आंबा हे घाटमाथ्यावरचे गाव तर साखरपा हे पायथ्याला, अर्थात कोकणात. आंबा गावात राहण्याच्या सोयी बर्‍याच आहेत त्यापैकीच एका ठिकाणाची निवड करून तिथे मुक्काम टाकला. ते होते गुप्ते यांचे हॉर्नबिल जंगल रिसोर्ट. दुसर्‍या दिवशी लवकरच उठून त्यांचा एक उत्तम माहितगार वाटाड्या घेऊन सड्यावरच्या भ्रमंतीसाठी निघालो. सडा म्हणजे ज्वालामुखीजन्य दगडांपासून बनलेले खडकाळ पठार. गाडी घेऊन विशाळगडाच्या फाट्यावर वळलो. आंबा गावातून विशाळगड साधारण ३० किमी तर पावनखिंड २५ किमी. तर सड्याचा डोंगराचा फाटा १३/१५ किमी. हा सड्याचा डोंगर तिथल्या परिसरातला सर्वोच्च पॉइन्ट. आंबा गाव सोडताच २/३ किमीवरच जंगलाचा भाग चालू होतो. सह्याद्रीतील सदाहरित पट्ट्याचा हा भाग नेहमीच गर्द आणि घनदाट वनराईने नटलेला. थोडं पुढं जाऊन गाडी रस्त्याच्या लावली. इथून एक पायवाट सड्याच्या डोंगरावर जाते. ह्या पायवाटेवरून ६/७ किमी चालले की आलाच सड्याच्या डोंगराचा माथा. महाराष्ट्रातलं एक सर्वोत्तम जंगल इथल्या भागात आहे. चांदोली विभाग. इतकं घनदाट जंगल तर जावळीच्या खोर्‍यातही मी पाहिलेलं नाही. रस्त्यानजीकच गाडी लावून जंगलात घुसलो. सुरुवातीला रूंद असलेली पायवाट थोड्याच वेळात अरुंद होत जाऊन चढणीला लागते. पायवाट सुरु होताना a गच्च रानाची सुरुवात a हळूहळू रान अधिकाधिक घनदाट होत गेलं. पाऊलवाटा बुजायला लागल्या. इथे पायवाटांवर सर्वच ठिकाणी पानांचा प्रचंड सडा पसरलेला आहे त्यामुळे वाट अजिबात ध्यानात येत नाही. अर्थात काही काही ठिकाणी दिशादर्शनासाठी झुडपांना लाल रंगातल्या रिबीनी बांधलेल्या आहेत पण तरीही येथे माहितगाराशिवाय कदापिही जाऊ नये. आता वाट चढाला लागली होती. हुप्प्यांचे किच किच आवाज येत होते, बुलबुलांची किलबिल तर सदैव चालू होती. मधूनच एखादा तांबट किटिर्र..कुर्र अशी साद घालत होता. अचानक डोक्यावरील झाडीतून एक तुरेवाला सर्पगरुड उडत गेला. निसर्गाची किमया बघत बघत एका पाणवठ्यावर पोहोचलो. खडकाच्या कपारीतून स्त्रवणारा एक लहानसा जीवंत झरा. शेजारच्या माती दगडांवर इथे असंख्य प्राणी, पक्षी येऊन गेल्याच्या खुणा. थोडेसे पाणी पिऊन पुढच्या वाटेला लागलो. घनदाट अरण्य a a आता पदराची वाट संपून छातीवरील वाट सुरु झाली होती. मध्येच एका ठिकाणी बिबट्याची विष्ठा दिसली. काळसर आणि केस अडकलेली. त्यामुळे ही बिबट्याची हे सहजच ओळखू येते. इथल्या रानात पूर्वी पट्टेदार वाघ खूप होते पण आता केवळ बिबटेच. जवळपास दीड तासाने जंगलातून बाहेर आलो. आता इथे खडकांचे लहानमोठे गोटे लहानशा पठारावर पसरलेले दिसायला लागले. एव्हाना आम्ही बर्‍याच उंचीवर आलो होतो. सड्याची सुरुवात झाली. अचानक डाव्या बाजूला एक उग्र कुबट असा वास पसरला. ह्याच वासाचा अनुभव मी राजमाचीलाही एका भल्या सकाळी घेतलेला होता. हा वास होता बिबट्याचा. वासावरून हा प्राणी सहज ओळखता येतो. जंगलात बिबट्या आमचा पाठलाग करत होता. हा प्राणी लाजाळू. तुमच्या अगदी जवळ असूनही तुम्हाला कधीच दिसणार नाही. सहसा हल्ला करणार नाही. शिवाय आम्ही तिघे असल्याने तो हल्ला करेल अशी दुरुनही शक्यता नव्हती. थोड्याच वेळात हा वास नाहीसा झाला. वाट परत एका लहानशा जंगलपट्ट्यात घुसली आणि पाचेक मिनिटात बाहेर आली ती एका विस्तीर्ण सड्यावर. सड्याची सुरुवात a सडा a सडा a सड्यावरून चालत जात जात कड्याच्या टोकाशी गेलो. तिथेच सड्याचे दगड बुरुजांसारखे रचून उंचवटा तयार केला आहे आणि त्यावर भगवा ध्वज रोवलेला आहे. संपूर्ण सड्यावर गव्यांची विष्ठा अतिशय प्रचंड प्रमाणावर पसरलेली आहे. शिवाय त्यांचे खुरांचे ठसे सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत. इथल्या जंगलात गवे भरपूर. रात्री शिरलात तर अगदी सहज दिसावेत. इथल्या सड्यावर रात्री ते मुक्कामासाठी येत असणार. जागा सुरक्षित. सड्यावरील बुरुजांचे बांधकाम. a सड्याच्या टोकाला तुटलेला कातळ आहे. डेड एन्ड. इथून विशाळगड आणि तिथे जाणारा रस्ता दिसतो. आम्ही जिथून आलो ती जागाही येथून दिसते. आमची गाडी उभी आहे ती जागा. झूम इन. a इथल्याच उजवीकडच्या पायवाटेने दाट जंगलात घुसलो होतो. a a सड्याच्या टोकावरचे विभाजीत झालेले कातळ a सड्यावरून दिसणार्‍या सह्याद्रीच्या रांगा a सह्याद्रीच्या रांगा a विशाळगड a विशाळगडावरील मलिक रेहानचा दर्गा a अंजनाची फळे a फुलपाखराचे विभ्रम a a सड्यावर आधी चोहोंकडचा निसर्ग बघून अर्धा तास एका जागी शांत पणे बसून राहिलो. आता येथून परतायची वेळ झाली होती. निघालो. आलो त्याच आणि एकमेव वाटेने छातीवरील चढण उतरून पदरातल्या दाट झाडीत शिरलो व तासाभरात रस्त्यावर आलो. जिथे गाडी होती तिथे. आता संध्याकाळी जायचे होते ते पावनखिंडीत.

प्रतिक्रिया द्या
32978 वाचन

💬 प्रतिसाद (53)
प
पैसा Mon, 12/01/2014 - 18:56 नवीन
नेहमीप्रमाणेच क्लास!!!
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Mon, 06/25/2018 - 00:54 नवीन
फोटो पाहुन मन खुष झाले :) पावसाळ्यात पावसाचा जरा जोर ओसरल्यानंतर इथे जायला काय मजा येईल !
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 06/25/2018 - 03:32 नवीन
प्रतिक्षेतला नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा