Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ढॅ ण्टॅ ढॅ ण

श
श्रीगुरुजी
Tue, 12/30/2014 - 10:54
🗣 7 प्रतिसाद
श्रीरंग देशमुख (भरत जाधव) एक साधासुधा, वय वाढलेला पण अविवाहीत असलेला. आपण एखाद्या हीरोसारखी साहसी कृत्ये करून काहीतरी भन्नाट मोहीम यशस्वी केली आहे अशी सारखी स्वप्ने रंगविणारा. तो एका शिपिंग कंपनीत काम करतो. कंपनीचा एक कंटेनर एक दिवस अचानक नाहीसा होतो. कंपनीचा बॉस संतापून श्रीरंगला दोन दिवसात कंटेनर शोधायला सांगतो. दोन दिवसात कंटेनर नाही मिळाला तर पोलिसात तक्रार करून तुला तुरूंगात धाडीन अशीही धमकी बॉस देतो. घाबरलेला श्रीरंग रात्री घरी विचार करीत असताना अचानक देवयानी नावाची एक तरूणी त्याच्या घरात घाबर्‍याघुबर्‍या अवस्थेत शिरते. तिला बघून श्रीरंग दचकतो. कंटेनर नाहीसा होण्यामागे मोठे कारस्थान असून त्यामागे मोठी टोळी असल्याचे ती सांगते व त्याच्या घरात रात्री आश्रय मागते. गोव्यातला कोणीतरी डी कास्टो नामक माणूस यामागे असून त्याला कंटेनरची पूर्ण माहिती आहे हेसुद्धा ती त्याला सांगते. तिच्या आणि त्याच्या पाठलागावर दोघे जण असून ते आपल्या दोघांनाही मारणार आहेत अशी तिची माहिती असते. खात्री करून घेण्यासाठी ती श्रीरंगला खिडकीतून खाली उभे राहून त्याच्या घरावर लक्ष ठेवणार्‍या दोघांना बघायला सांगते. तिच्या सांगण्याप्रमाणे श्रीरंग खिडकीतून खाली बघतो तेव्हा दोघेजण खरोखरच त्याच्या घरावर लक्ष ठेवताना दिसतात. आपल्याला उद्या सकाळी तातडीने गोव्याला जाऊन डी कास्टोला भेटायला पाहिजे असे तिचे सांगणे असते. घाबरलेला श्रीरंग तिला रात्री घरात आश्रय देतो. परंतु रात्रीच अचानक पाठीत सुरा खुपसलेल्या अवस्थेत तिचा खून होतो व खुनाच्या आरोपावरून पोलिस श्रीरंगला पकडायला त्याच्या घरी येतात. श्रीरंग त्यांना चुकविण्यासाठी घरातून पळतो व गोव्याच्या मार्गावर लागतो. पोलिस त्याच्या पाठलागावरच असतात. गोव्यात पोहोचून डी कास्टोला भेटेपर्यंत बर्‍याच गंमतीजमती घडतात. त्या प्रत्यक्ष रंगमंचावरच बघणे योग्य. डी कास्टोला भेटल्यावर अजून बरीच रहस्ये श्रीरंगच्या लक्षात येतात व अजून काही खुनांचा आरोप त्याच्यावर येऊन त्याला सतत पळावे लागते. शेवटी हे रहस्य कसे उलगडते ते रंगमंचावरच बघण्यात मजा आहे. केदार शिंदे व भरत जाधव जोडगोळीचे हे नवीन विनोदी कम रहस्यपूर्ण नाटक त्यांच्या पूर्वीच्या नाटकांच्या तुलनेत फारसे आवडले नाही. रहस्यकथा या दृष्टीकोनातून पाहिले तर या नाटकातील रहस्यकथा ही एक अत्यंत सामान्य रहस्यकथा आहे. कलाकार व अभिनय या दृष्टीकोनातून पाहिले तर भरत जाधव वजा केला तर बाकी नाटकात फारसा दम नाही. या नाटकात भरत जाधव व्यतिरिक्त अजून ५ कलाकार आहेत. भरत जाधव वगळता इतरांनी प्रत्येकी ४-५ वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. भरत जाधवने मात्र नेहमीच्या सफाईदार शैलीत धमाल केली आहे. रेल्वेतून जाण्याच्या दृश्यात, रेल्वेतून उडी मारताना आणि नंतर कारमधून जाण्याच्या दृश्यात त्याने व दिग्दर्शकाने कमाल केली आहे. त्याने एकट्यानेच संपूर्ण नाटक तोलले आहे. या नाटकात काही दृश्यात मात्र भरत जाधवच्या शैलीत तोचतोचपणा आढळतो. मी पाहिलेले भरत जाधवचे हे चौथे नाटक. यापूर्वी 'बापाचा बाप' (याचेच नाव नंतर श्रीमंत दामोरदपंत असे झाले), 'सही रे सही' आणि 'मोरूची मावशी' ही तीन नाटके यापूर्वी पाहिली होती. 'सही रे सही' तर आतापर्यंत ३ वेळा पाहिले आहे. दोन घटका करमणूक हवी असेल तर हे नवीन नाटक बघायला हरकत नाही. परंतु 'सही रे सही' ची अपेक्षा ठेवून गेलात तर नक्कीच निराशा होईल.

प्रतिक्रिया द्या
11228 वाचन

💬 प्रतिसाद (7)
म
मुक्त विहारि Tue, 12/30/2014 - 10:59 नवीन
तसे पण बरेच दिवस सतत काम करून कंटाळलो आहे, एखादे हलके-फुलके नाटक बघणे अत्यावश्यक आहे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 12/30/2014 - 11:56 नवीन
वा... पहावयास हवे ! "पुन्हा एकदा सही रे सही' पाहुन इतका हसलो होतो की...मोकळेपणानी हसणे बराच काळ विसरलोच होतो याची जाणिव झाली होती... परत कधी वेळ मिळाला तर पुन्हा एकदा सही रे सही" पाहणारच ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- U.S. Bond Sentiment Is Worst Since Disastrous ’09 The U.S. Debt Continues To Climb
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Tue, 12/30/2014 - 12:42 नवीन
नाटकाची जाहिरात बघीतली होती. पण केवळ भरत जाधव आहे म्हणूनच बघायचे टाळले. भरत जाधव आणि रहस्यमय नाटक ये बात कुछ हजम नही हुई !
  • Log in or register to post comments
H
hitesh Sun, 01/04/2015 - 06:55 नवीन
छान
  • Log in or register to post comments
ग
ग्रेटथिंकर Sun, 01/04/2015 - 08:42 नवीन
छान परिक्षण. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Mon, 01/05/2015 - 09:34 नवीन
बघायचे आहे. पण एकंदर लेख बघता ही नाटकापेक्षा चित्रपटाची कथा म्हणुन जास्त योग्य वाटली असती का काय असे वाटले. चिंचवडात रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात प्रयोग लागेल तेव्हाच बघण्यात येईल.
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 01/05/2015 - 10:03 नवीन
चिंचवडात रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात प्रयोग लागेल तेव्हाच बघण्यात येईल. पुण्यात जायला यायला फार नाटकं (वेळ्)करावी लागतात हे खरयं !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा