निमोना
Primary tabs
काल चतुर्थीचा उपास सोडण्यासाठी निमोना, पुर्या आणि सुधारस असा बेत होता. त्यातल्या निमोनाची पाकृ देतेय खाली. ही पाकृ कांदा-लसूण विरहित आहे त्यामुळे उपास सोडायला चालली. Smile
मला ही माझ्या एका उ.प्रदेशीय मैत्रिणीने दिली. अफलातून होते. आणि थंडीच्या दिवसातच ही करतात कारण मटार सुरेख आलेला असतो.ती याला व्रत का खाना म्हणते. Smile
तर चला- करूया निमोना.
साहित्यः- एक किलो मटार चे दाणे धुवून, एक तमाल पत्र,प्रत्येकी फक्त २ लवंगा, वेलदोडे,मिरी दाणे, १ हिरवी मिरची, पाव इंच आल्याचा तुकडा, जिरे, हिंग,धनेजिरे पूड पाव चमचा, साजूक तूप (अति महत्त्वाचे, तेल नको)
क्रुती: अत्यंत सोप्पी. मटार दाणे, आलं, मिरची मिक्सर मधून पेस्ट करून घ्या.
जरा जास्त तूप गरम करून त्यात जिरे, हिंग घाला. यात हळद नसते. मग सगळे खडे मसाले घाला. मटार पेस्ट त्यात परतून घ्या.धनेजिरे पूड, पाणी घाला आणि चवीपुरतं मीठ. ही भाजी पळीवाढी असते. खूप घट्ट किंवा पातळ नाही. आणि ही भाजी अगदी आयत्यावेळी करायची. थंड झाली की मजा नाही.
पुर्या आणि गरमागरम निमोना वाढा.आणि घरातल्यांचे तृप्त चेहरे पाहून खुश व्हा.
वि.सू: यात फार मसाले, तिखट काहीच नाहीये. तर्री वगैरे काहीच नाही. मटार आणि मसाले यांची अगदी मंद सुवासिक चव हीच या भाजीची खासियत आहे. उगीच खूप साहित्य घातलं तर ती चांगली न होता उग्र होते.
काही लोक यात कांदा, लसूण, बटाटा, टोमॅटो सगळं टाकतात, गरम मसाले वगैरे पण.आणि तेलात करतात. मग त्या भाजीला मटार पेस्ट घातलेला आलू-मटर म्हणतात. ;)अशी खरच करून पहा. आणि गरमच खा. साजूक तुपाची चव केवळ स्वर्गीय असते.
आता माझ्या मैत्रिणीने सांगितलेलं वर्णन सांगते ज्यामुळे ही भाजी करण्याच्या प्रेमात पडले मी...
अतिथंडीची पहाट बनारस मधली, चक्क ब्राम्हमुहूर्त. पहाटेचे ३.३०-४ ची वेळ. सगळीकडे प्रचंड धुकं. बोलायला तोंड उघडलं की वाफच दिसणार. सगळे लोक भल्या पहाटे सुस्नात होऊन काशी विश्वेश्वराचं दर्शन घेउन, पूजा करून बाहेर आलेत ती ही वेळ. मंदिराच्या रस्त्यावर दुतर्फा पूजासाहित्य, पुजारी, भक्तगण यांची लगबग आणि थंडीचा एक पहाटेचा मस्त वास. त्यातच फुलं, पूजासाहित्य यांचा एक दरवळ आणि ज्यांच दर्शन झालंय, त्या लोकांसाठी प्रसादासाठी उघडलेली दुकाने. यात काय असतं हो? तर मोट्ठ्या कढयांमधून रटरटणारा साजूक तुपातला निमोना आणि पुर्या. द्रोण भरून वाफाळणारा निमोना आणि पुर्या असं या वातावरणात जसं लागतं ते केवळ अवर्णनीय.
म्हणूनच शंभू महादेवांनी काशी ही माझी नगरी हे जाहीर केलं बहुतेक Wink
डिसक्लेमर- मी अजून काशीला गेलेली नाही.ज गेले असतील ते अजून काही सांगू शकतील.
भारी ! चविष्ट प्रकार ! लिहिण्याची शैलीही चवदार ! :)
एवढ्या रेशिप्या वाचून आता काशीच गाठावी म्हणते ;)
भारीच वाटतेय आणि खूपच सोप्पी पण आहे..
मस्तच वाटतोय प्रकार, करुन बघणार त्या घुटं चा नंबर लागला की. हे नावही मजेशीर आणि तुझी लिहण्याची शैली तर भारीच!
अगदीच निराळी पाकृ आहे. फोटू डकवल्यास भगवान शिवशंकर आपल्याला पावतील असे धागाकर्तीस वाटते का? ;)
हल्ली फोटोशिवाय पाककृत्या टाकण्याचा ट्रेंड सेट होतोय का मिपावर? तसं असेल तर उद्या आम्ही फोटोशिवाय पाककृत्या टाकल्या तर फोटो फोटो म्हणून ओरडा करु नये. अशा लोकांना या फोटोविरहित धाग्यांच्या लिंका देऊन हे धागे आले तेव्हा ही मंडळी कुठे होतीत असे विचारण्यात येईल.
मी ढ आहे याबाबतीत. म्हणून.
आता परत टाकली ना कुठली पाकृ, तर नक्की टाकेन फोटो.
मस्त! भन्नाट लिहितेस अगदी :)
निमोना!!
ऐकुनच मस्त वाटतयं. बनारसच वर्णनही अगदी मस्तच!!
सवितासारखीच...नं १. पण मटार पेस्ट आणि साजुक तुप ये कॉम्बो कुछ हजम नहिं हो रहा है....असो शेवटि पसंद अपनी अपनी.
करून पहा ना
मिपा सुपर शेफ ना तू?????
मत बदलेल तुझं.
नाहीतर शेवटी तू म्हणतोस तसं शेवटि पसंद अपनी अपनी आहेच. :(
वाह वाह ! काय मस्त वर्णन ! बनारस ला जायची इच्छा झाली तुझं वर्णन वाचून यात च सगळं आलं .
बाकी पदार्थ करून बघणार च :)
एक अनवट पा.क्रु. दिल्या बद्दल....
करुन पाहिला. फार आवडला हा प्रकार. एक छोटासा बदल केला. एक चमचाभर शोप पण घातली मटार दाणे मिक्सर मधुन काढताना. बाकी तु लिहिलंस तसंच.

हा फोटो.
कॉलिंग सूड........
बघ रे हा फोटू
काय ट्रेंड बिंड नाही सेट झालेला विदाउट फोटो रेसिप्यांचा ;)
मस्त वाटतोय हा प्रकार ,पहिल्यांदाच ऐकला ..फोटो बघून जरा नीट कळला कसा दिसायला हवा ..
सवि रेसीपीसाठी आणि मधुरा फोटोसाठी धन्यवाद ग ...
मस्त मस्त मस्त !
मी केला.. मी केला.. :)
फोडणी नेहमीप्रमाणे जाळल्यामुळे फोटो-बिटो नाही काड्।अले. पण मस्स्स्त लागला.. एकदम आवडेश.. मटार आणि तुपाची फोडणी दोन्ही आवडतात. दोघांचं काँबो मस्त...
सुरेख वाटतोय ! करायला हवा.
मस्तच वाटतोय प्रकार, करुन बघणार
मधुरा, फोटू छान आलाय.
पण लसूण न घालता मटार खायची कल्पना अमंळ पचली नै. म्हणून नेटवर शोधले तर कांदा/लसूण्/टोमॅटो घातलेली निमोनाची पाकृ मिळाली. नक्की करून बघेन.
मी लिहिलंय की गं यात की लोक सगळं काही घालून् बनवतात निमोना.
तू कर गं पाहिजे तसा. हा मला येणारा/आवडणारा.
हाकानाका.
जाताजाता:- माझी एक रशियन मैत्रीण आहे. तिचं म्हणणं की तुम्ही भारतीय लोक कित्ती मसाले घालता? त्या मूळ पदार्थाची चव राहिल असं पहा की. छान लागतं. तर तशी ही रेसिपी. मटार चीच चव लागते यात.
आता अजून अवांतरः आमची रेसिपी बघ म्हणून तिने मला कोबीचं सूप दिलं प्यायला. (लोक तरी कसा कसा सूड उगवतात बघ). वरतून म्हणाली- येतो की नाही फक्त कोबीचा स्वाद? मी नि:शब्द ;)
मस्त पाककृती... नवीन आहे आणि सध्या मटारची बाजारात रेलचेल आहे तर करून बघायला पाहिजे.
आता पुढची पाककृती मटारची खीर का?
टाका ना मटारच्या खिरीची पाकृ.
पहिलीच पाककृती गोड गोड नको.....
निमोना हा प्रकार एकदा करुन पहायला हवा, पाकृचे वर्णन मस्त!
स्वाती