Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भुलेश्वर मंदिरातील पौराणिक शिल्पपट

प
प्रचेतस
गुरुवार, 01/22/2015 - 18:02
💬 54
मिपावर ह्याआधी यवतच्या यादवकालीन भुलेश्वर मंदिरावर असंख्य लेख तसेच छायाचित्रे येऊन गेलीत. पण इथल्या पौराणिक शिल्पपटांचे फारसे वर्णन आल्याचे मात्र अजिबात दिसले नाही. त्यामुळे ह्या लेखाद्वारे मी मंदिराचे इतर वर्णन न देता येथील काही पौराणिक शिल्पपट उलगडून दाखवण्याचा मात्र अल्पसा प्रयत्न करतोय. रामायण, महाभारतातील प्रसंगांच्या शिल्पपटांबरोबरच येथील काही आगळीवेगळी शिल्पेही आपण विचारात घेऊयात. भुलेश्वर मंदिरात रामायण आणि महाभारताचे प्रत्येकी तीन शिल्पपट आहेत. ह्या शिल्पपटांची मूळची जागा म्हणजे नंदीमंडप आणि सभामंडपातील दर्शनी भाग आणि त्याच्या काटकोनात डाव्या उजव्या बाजूंना. पैकी डाव्या बाजूला रामायण तर उजवे बाजूस महाभारत शिल्पपट आहेत. पैकी महाभारताचे तीन शिल्पपट संपूर्ण आहेत मात्र सध्याच्या जागेवर रामायणाचा एकच पट चांगल्या स्थितीत अस्तित्वात असून इतर दोन पट सध्याच्या जागेवर नाहीत. पैकी त्या उरलेल्या दोन पटांचे काही तुकडे (fragments) मात्र आपल्याला मंदिरातच इतरत्र चुकीच्या जागी जोडलेल्या स्थितीत पाहण्यास मिळतात जे शोधण्यास खूपच जिकिरीचे आहे. चला तर एकेक शिल्पपट पाहूयात. रामायणपटापासून सुरुवात करुयात. इस्लामी वावटळीत मंदिराची झालेली नासधूस आणि नंतर पेशव्यांचे गुरु ब्रह्मेन्द्रस्वामी यांनी केलेला मंदिराचा जीर्णोद्धार यात हे रामायणाच्या शिल्पपटांचे तुकडे चुकीच्या जागी बसवले गेले. रामायणपटाचा पहिला तुकडा आपल्याला दिसतो तो मंदिराच्या बाहेर. पायर्‍यांनजीकच्या उजवे बाजूच्या भिंतीत. ह्याच भिंतीत शैव द्वारपालांच्या प्रतिमा सुद्धा बसवलेल्या आहेत. दोन धनुर्धारी पुरुष आणि पाठीमागे एक भग्न स्त्री प्रतिमा असा हा प्रसंग. बहुधा राम लक्ष्मण आणि सीता. हा रामायणातला प्रसंग आहे याबद्दल मला यत्किंचितही शंका नाही मात्र हा प्रसंग नेमका कुठला हे ओळखणे अवघड आहे. बहुधा राम, लक्ष्मण आणि सीता वनवासाला निघाल्याचा हा प्रसंग असावा. १. राम, लक्ष्मण आणि सीता a यानंतर आपल्याला दुसरा शिल्पपट थेट मंदिराच्या सभामंडपातच दिसतो. नंदीमंडप आणि सभामंडप यामधील डाव्या बाजूने काटकोनात वळताच उजव्या हाताला हा रामायणाचा अखंड शिल्पपट आहे. हा पट बराच विस्तृत असून पाच भागात कोरलेला आहे. मध्यभागी राम लक्ष्मण आणि त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूंना प्रत्येकी २/२ प्रसंग कोरलेले अशी याची रचना. अगदी अशाच पद्धतीचा महाभारतातील एक शिल्पपट याच्या बरोबर विरुद्ध बाजूस आपणास दिसतो तो आपण पुढे पाहूच. २. रामायण अखंड शिल्पपट a आता यातील एक एक प्रसंग आपण विस्ताराने पाहूयात. मध्यभागी जे दोन धनुर्धारी दिसत आहेत ते बहुधा राम-लक्ष्मण असावेत. माझ्या मते हा प्रसंग सीतास्वयंवराच्या आधीचा असावा. कारण राम लक्ष्मण हे दोघेही दागदागिने तसेच राजवस्त्रांमध्ये येथे आहेत. विश्वामित्रांसोबर त्राटिका वध तदनंतर मिथिला नगरीच्या प्रवासापर्यंतचा हा प्रसंग असावा. नक्की कुठला ते मात्र सांगता येत नाही. उजवे बाजूच्या खालच्या पटात अग्नी हा दशरथाला पायसदान देत असल्याचा प्रसंग कोरलेला आहे. तर त्याच्या शेजारी उजवीकडे एक स्त्री आपल्या सेविकांसह शिवलिंगाची पूजा करताना दाखवली आहे. ही बहुधा कौसल्या असावी जी अपत्यप्राप्तीसाठी प्रार्थना करत आहे किंवा हा संपूर्ण वेगळाच प्रसंग असून ती स्त्री ही सीता असावी जी सुयोग्य पतीसाठी प्रार्थना करत आहे. दुसरी शक्यताच मला अधिक योग्य वाटते. याच्या वरच्या शिल्पपटात रामाकडून धनुर्भंग होतो आहे आणि सीता ही वरमाला घेऊन स्वयंवरासाठी सज्ज असल्याचे दाखवले आहे. उजवीकडे जनक हा सिंहासनावर बसलेला असून रामाच्या डाव्या बाजूला मृगाजीनात दाढीवाला विश्वामित्र व लक्ष्मण अगदी स्पष्ट दिसतात. त्यांच्याच शेजारी सांडणीस्वार सीतास्वयंवराची दवंडी पिटत असताना दाखवले आहेत. ३. रामायण शिल्पपट (उजवी बाजू -पायसदान (खालचा पट) व सीतास्वयंवर (वरचा पट) ) a मध्यभागातील राम-लक्ष्मणांच्या डावीकडे असेच दोन शिल्पपट आपणास दिसतात. यातील दोन्ही प्रसंग नक्की कुठले हे ओळखू येत नाहीत पण बहुधा हे प्रसंग रावणवधानंतर राम सीतेसह अयोध्येला परत येतात तेव्हाचे असावेत. कारण हे दोघेही आसनस्थ असून सेवक उभे आहेत तर वानरांनाही उच्चासन दिलेले असून ते हात जोडून नम्र भावाने बसलेले दिसतात. ४. रामायण शिल्पपट (डावी बाजू) a यानंतरचे येथील सलग असलेले दोन शिल्पपट मात्र गायब आहेत. पैकी त्यातील एक भाग जो पायर्‍यांपाशी असलेल्या भिंतीत आहे तो आपण यापूर्वीचा पाहिला आहे. यातीलच दुसरा एक शिल्पपट येथेच नंदीमंडपाच्या उजवीकडील भिंतीत छताच्या खालच्या बाजूला आणि छताला जोडून असा लावलेला असल्याचा आपणास दिसतो. तर अजून एक भाग भाग याच्या बरोबर समोरील बाजूस छताच्या खालीच असा दिसतो. हे दोन्ही पट पूर्णपणे अंधारी आणि चुकीच्या जागेत लावलेले असल्याने शोधणे तसे जिकीरीचेच आहे. काही मिपाकरांनी आमच्या सोबत ह्या दोन्ही पटांचे दर्शन घेतलेले आहे. त्यातीलच एक नंदीमंडपाशेजारील भिंतीत असलेला पट म्हणाजे मारीचवध. पटाच्या उजव्या बाजूस सुवर्णमृगाचे रूप ल्यालेल्या मारीचाचा वध राम करत आहे. मृगाच्या धडातून राक्षसदेहधारी मारिच प्रकट होत असून मृगशीर खाली पडलेले आहे. मरताना रामाच्या आवाजात 'लक्ष्मणा धाव' असा आर्त टाहो फोडल्यामुळे भयशंकित झालेल्या सीतेने लक्ष्मणाला रामाचा परामर्श घेण्यासाठी पाठवलेले आहे आणि ही संधी साधून ऋषीवेषातील कमंडलूधारी रावण रामकुटीसमोर सीतेला भि़क्षा मागण्यासाठी पुढे आला असून सीता त्याला भिक्षा देण्याच्या अगदी बेतात आहे. ५. मारिचवध a ह्याच्या समोरील पट मात्र मी भुलेश्वरच्या असंख्य वार्‍या करूनही अजूनही संपूर्णपणे बघू शकलो नाही किंवा ओळखू शकलो नाही. ह्या पटात वृक्ष्, त्यावर वानरे, पक्षी आदी दाखवलेले असून काह्ली वनांमध्ये प्राणी दाखवलेले आहेत. माझ्या अंदाजाप्रमाणे मात्र ह्यात सुग्रीवाच्या किष्किंधानगरीतला किंवा रावणाच्या अशोकवनापैकी एखादा प्रसंग असू शकेल. ६. हाच तो अगम्य शिल्पपट a इथे रामायणातील शिल्पपट पूर्ण होतात. यातील एकच अखंड असून इतर दोघांचे काही अंशच सध्या इतस्ततः पाहता येतात. आता वळूयात महाभारतातील शिल्पपटांकडे. महाभारतातील शिल्पपट मात्र संपूर्ण आणि सलगपणे आजही बर्‍यापैकी चांगल्या अवस्थेत आहेत. पैकी एक अखंड पट हा द्रौपदी स्वयंवराचा असून हा सभापर्वातील आहे तर इतर दोन पट हे भारतीय युद्धातील भीष्मपर्व, द्रोणपर्व आणि शल्यपर्व ह्या पर्वांमधील आहेत. रामायण पटाच्या विरुद्ध बाजूला म्हणजे मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूपासून हे पट सुरु होतात. आधी आपण द्रौपदी स्वयंवर शिल्पपट पाहूयात. ह्यातही रामायणातील अखंड पटाप्रमाणेच पाच प्रसंग कोरलेले असून मध्यभागी अर्जुनहस्ते मत्स्यभंग असून दोन्ही बाजूला खालीवर असे दोन दोन पट कोरलेले आहेत. ७. द्रौपदीस्वयंवर संपूर्ण शिल्पपट a यातील आता उजवीकडचे दोन पट आता आपण पाहूयात. यातील सर्वात उजवीकडे द्रुपद राजा हा सिंहासनावर बसलेला असून खालच्या बाजूला द्रौपदीची शिवपूजा दाखवलेली आहे. द्रुपदाच्या डाव्याकडे शंख चक्र गदा, पद्मधारी श्रीकृष्ण द्रुपदाशी बोलताना दाखवलेला आहे. भुलेश्वर मंदिरातील हे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे जे की येथील शिल्पांमध्ये श्रीकृष्णाला त्याच्या विष्णूरुपी दैवी स्वरुपात दाखवते. कृष्णाच्या डावीकडे तीन पांडव आहेत. युधिष्ठिर, नकुल आणि सहदेव, ज्यांची वेषभूषा मृगाजिने धारण केल्यामुळे ऋषींसारखी आहेत. नुकतेच ते वारणावतातील लाक्षागृहातून सुटून आल्याने ते ओळख लपवण्यासाठी मृगाजिने धारण करुन द्रौपदी स्वयंवर पाहण्यासाठी आलेले आहेत. अर्जुन मात्र मत्स्यभंग पण पूर्ण करण्यासाठी सज्ज असल्यामुळे तसेच भीम हा त्याच्या संरक्षणासाठी गेल्यामुळे ह्यात तीनच पांडव दाखवलेले आहेत. पांडवांच्या बाजूला द्रौपदी हाती वरमाला घेऊन सज्ज असून तिच्या शेजारी बंधू खङगधारी दृष्टद्द्युम्न आहे. ८. द्रौपदीस्वयंवर पट (उजवीकडील बाजू) a यानंतर मधल्या पटात अर्जुन खालच्या पाण्यात बघून वरच्या बाजूस चक्राकार फिरत असलेल्या मत्स्याचा नेत्र भंग करण्यासाठी प्रत्यंचेला बाण जोडून सज्ज आहे. अर्जुनाचा मृगाजीनधारी वेष स्पष्ट दिसतोय. ९. अर्जुनकृत मत्स्यभंग (मधली बाजू) a डाव्या बाजूच्या शिल्पपटामध्ये द्रौपदीस्वयंवरानंतर अर्जुन हा द्रौपदीला घेऊन कुंतीकडे आलेला असून भिक्षा आणलीय असे म्हणून द्रौपदीची ओळख कुंतीला करून देत आहेत. तर त्याच्या बाजूला डावीकडे व्यास मुनी हे द्रौपदीचा पाच पतींशी विवाह कसा समर्थनीय आहे हे कुंतीला पटवून देत आहेत असे वाटते. ह्याच्याच खालच्या बाजूला कृष्ण आणि कुंतीसह इतर पांडवांची भेट दाखवलेली आहे. १०. द्रौपदीस्वयंवर (डावी बाजू) a याच्या शेजारचा एक पट मात्र द्रोणपर्वातील आहे जो आपण नंतर पाहू. सुरुवातीला आधी आपण भीष्मपर्वातील पट पाहू ज्यात भीष्मवधाचा प्रसंग कोरलेला आहे. हा पट नंदीमंडपाच्या समोर असलेल्या सभामंडपाच्या उजव्या बाजूने सुरु होतो. हा शिल्पपट सुरु होतो अर्जुन भीष्म यांच्या युद्धापासून. ह्या शिल्पपटांछ्या रथींच्या प्रतिमा भंग झाल्यात पण त्यांच्या ध्वजांवरुन ते योद्धे अगदी सहजी ओळखू येतात. ह्या पटात अर्जुन भीष्माशी शरयुद्ध खेळत आहे. सारथी कृष्ण चततुर्भुज विष्णूरूपात असून अर्जुनाच्या ध्वजावर वानर आहे. तर त्याच्या समोर भीष्म तालध्वजासह रथावर आरूढ आहे. ११. अर्जुन -भीष्म युद्ध a ह्याच्या पुढचा पट आहे तो भीष्म वधाचा. कितीही प्रयत्न करूनही भीष्म अवध्य असल्याचे बघून रात्री कौरवशिबिरात जाऊन पांडव भीष्मालाच त्याच्या वधाचा उपाय विचारतात तेव्हा भीष्म पूर्वी स्त्री असलेल्या शिखंडीशी मि युद्ध करणार नाही असे म्हणून अप्रत्यक्षपणे शिखंडीच्या आडून युद्ध करण्याचे पांडवांना सुचवतात. ह्या पटात डावीकडे तालध्वजासहित भीष्म असून उजवीकडे कपीध्वजधारी अर्जुन आहे अर्जुनाच्या पुढ्यात शिखंडी त्याच्या मेषध्वजासह भीष्मावर शरवर्षाव करताना दिसत आहे. सध्या जरी भग्न असले तरी मूळतून अतिशय सुंदर असे हे शिल्प आहे. १२. भीष्मवध a यांनंतर ह्याच्या उजवीकडचा जो शिल्पपट आहे तो आहे भीष्म शरशय्येचा. भीष्म हा शरशय्येवर पडलेला असून त्याच्या आजूबाजूला कौरव पांडव हे शोक व्यक्त करत बसलेले आहेत. अर्जुन मात्र उभा असून तो भीष्माला तहान लागली म्हणून भूमीत बाण मारून पाणी काढण्याच्या अविर्भावात आहे. १३. भीष्म शरशय्या a यानंतरचा शिल्पपट आहे द्रोणपर्वातील. जो भीष्मपर्व आणि द्रौपदी स्वयंवर यामधील भागात आहे. १४. द्रोणपर्व (संपूर्ण शिल्पपट) a यातील पहिल्या प्रसंगात एक द्रोणाचार्य आहेत हे निश्चित जे त्यांच्या सुवर्णमय कमंडलू च्या ध्वजावरुन समजून येते. त्याच्याशी युद्ध करणारा पांडवयौद्धा बहुधा खङगधारी दृष्टदद्युम्न किंवा मेष ध्वजधारी शिखंडी असावा. १५. द्रोण व पांचालवीराचे युद्ध a ह्यानंतर कपीध्वज अर्जुन एका कौरवाबरोबर युद्ध करताना दाखवलेला असून कौरवयोद्ध्या त्याच्या ध्वजासहित भग्न असल्याने ओळखू येत नाही. ह्याच्या पुढचे शिल्प मात्र अतिशय रोचक आहे. द्रोणपर्वात अर्जुनाची खबरबात घ्यायला जाताना एकटा भीम कौरवांच्या महाप्रचंड सैन्यात घुसतो तो एकेका हत्तीलाच आपल्या बाहूंच्या साहाय्याने उचलून फेकतच. एकेक करुन हत्ती भीमावर चालून येत आहेत आणि भीम त्यांना भिरकावून देत देत मार्गक्रमण करत चालला आहे. भीमाच्या भग्न झालेल्या हाताची बोटे हत्तीच्या पायाभोवती घट्ट आवळलेली दिसून येतात. १६. अर्जुन- कौरववीर युद्ध a १७. भीम-गजयुद्ध a ह्याच्या बाजूलाच पट आहे तो शल्यपर्वातला. ह्यात एक पांडवयोद्धा दाखवला असून तो मी ओळखू शकलो नाही. त्याच्या ध्वजावर मनुष्याचे शिर आहे. असा ध्वजचिन्ह असलेला कुठलाही योद्धा मला माहितीत नाही. द्रौपदेयांच्या ध्वजांवर चंद्र, सूर्य, यम आणि अश्विनीकुमारांच्या प्रतिमा होत्या असा महाभारतात उल्लेख आहे पण तो ह्या आकृतीशी जुळत नाही. शल्याचा वध युधिष्ठिराकडून होतो मात्र युधिष्ठिराच्या ध्वजावर नंद आणि उपनंद अशा नावाचे दोन मृदंग आहेत जे ह्या शिल्पाशी जुळत नाहीत. मात्र विरोधातला कौरववीर शल्य मात्र त्याच्या नांगरधारी ध्वजामुळे अगदी सहज ओळखू येतोय. १८. शल्ययुद्ध a इथे भुलेश्वर मंदिरातील पौराणिक शिल्पपट संपतात. ह्याव्यतिरिक्त भुलेश्वर मंदिरातील काही आगळीवेगळी शिल्पे आहेत. यापैकी येथील छतांवर असलेली मातृकांची शिल्पे सर्वपरिचित असल्याने मी येथे त्याची पुनरुक्ती टाळत आहे. मात्र मंदिराच्या मागच्या डाव्या बाजूचे भिंतीवर चामुंडेचे एक भग्नावस्थेतील अप्रतिम शिल्प आहे. प्रेतवाहिनी चामुंडा अस्थिपंजर देहासह उभ्या स्थितीत असून तिचा चेहरा भयानक आहे. ओठांतून दाढा बाहेर आल्या असून तिच्या पोटात विंचू आहे जो तिच्या राक्षसी भुकेचे प्रतिक आहे. पायांतळी प्रेत आहे. इथल्या माझ्या सर्वाधिक आवडीच्या शिल्पांपैकी हे एक. १९. चामुंडा a ह्या शिवाय भुलेश्वर मंदिरातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणाजे इथे इतके स्तंभ असूनही फक्त स्तंभाच्या मधल्या चौकटीवर शिल्प आहे. इतर सर्व स्तंभचौकटी ह्या शिल्पविरहीत आहेत. ह्या चौकटीवर नर्तिक नृत्य करत असून दोन्ही बाजूंना वादक वादन करत आहेत. २०. स्तंभचौकटीवरील एकमेव शिल्प a भुलेश्वर मंदिरातील अजून रोचक शिल्प म्हणजे एक आभासी शिल्प. ह्यात तीन पुरुष असून ते एकमेकांना जोडलेले आहेत. आणि पाय मात्र चारच आहेत. म्हणाजे प्रत्यक्षात एकाच वेळी दोन पुरुष उभे असून ते पाय एकमेकांना जोडले असल्याने तिघा जणांचा आभास निर्माण करीत आहेत. हे अतिशय भग्न शिल्प असले तरी अशा प्रकारच्या शिल्पांचा पूर्वपरिचय असल्याने हे शिल्प ओळखू येतेय. चांगल्या अवस्थेत असताना हे शिल्प अतिशय देखणॅ असणार यात काहीच शंका नाही. अशीच शिल्पे मी पेडगावच्या लक्ष्मीनारायण मंदिरात आणि पिंपरी दुमाला येथील सोमेश्चर येथील यादवकालीन मंदिरांत पाहिली आहेत. २१. आभास निर्माण करणारे शिल्प a तुलनेकरीता अनुक्रमे ह्या पेडगाव आणि ह्या पिंपरी दुमाला येथील ह्या प्रतिमा बघा २२. a २३. a आणि जाता जाता माझ्या सर्वाधिक लाडक्या हिच्याशिवाय भुलेश्वर वारी कशी काय पूर्ण होईल. २४. हीच ती जगप्रसिद्ध दर्पणसुंदरी a

प्रतिक्रिया द्या
52773 वाचन

💬 प्रतिसाद (54)
भ
भानिम Wed, 12/02/2015 - 11:52 नवीन
लेख आवडला. आता जाऊन पाहणे आले. अॅडेड टू बकेट लिस्ट!
  • Log in or register to post comments
ग
गौरी लेले Wed, 12/02/2015 - 14:27 नवीन
अप्रतिम फोटो प्रचेतस अण्णा ! काय ती माहीती काय तो व्यासंग . वाह मज्जा आली :)
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 02/25/2021 - 09:07 नवीन
वाह, नितांत सुंदर माहिती आणि अप्रतिंम प्रचि ! जाधवगड या लेखामुळे हा धागा आठवला

प्रचेतस +१

  • Log in or register to post comments
B
Bhakti Sat, 02/27/2021 - 12:44 नवीन
सुंदर धागा!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा