Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कोकणकडा चढाई- सह्याद्रीने प्रसवलेलं रौद्रभीषण सौंदर्य

स
सतीश कुडतरकर
Mon, 02/02/2015 - 12:24
💬 74
कोकणकडा चढाई- सह्याद्रीने प्रसवलेलं रौद्रभीषण सौंदर्य
From Kokankada 2006
पच्छिम घाटाचा विस्तार महाराष्ट्राच्या उत्तरेपासून थेट केरळ पर्यंत पसरलेला. त्यात कर्नाटक आणि केरळ मधील भाग हिरवाईने नटलेला, याउलट महाराष्ट्रातला सह्याद्री मात्र खडकाळ रांगडेपणाच काळकभिन्न सौंदर्य मिरवतोय. आपल्या इतिहासाशी जवळीक साधणाऱ्या सह्यकड्याने हजारो वर्ष उन-पावसाच्या अभिषेकात कितीतरी प्रसववेदना सहन करून अनघड सुळके आणि उंचच उंच कातळ भिंतींची रचना केली आहे. सह्याद्रीतील अशाच डोंगररांगेपैकी एक माळशेज घाट परिसर आणि दुर्गवेड्यांचा सखा हरिश्चंद्रगड. हरिश्चंद्रगडावर सह्याद्रीचा मालक देवाधिदेव शंभूमहादेवाच दर्शन घेतल्यावर पाय आपोआप कोकणकड्याच्या दिशेने वळतात. कोकणकड्यावर लोटांगण घालून याची रौद्रता डोळ्यात साठवण्यासाठी तर झुंबड उडते. त्याची खोल भीषणता पाहून त्यातीलच काही जणांच्या मुठीची घट्ट पकड सोबतच्या संवंगड्यांच्या मनगटावर आवळली जाते. इथून दरी इतकी खोल आणि भयाण असूनही आपल्या डोळ्यात मात्र त्याच फक्त सौंदर्यच भरत. याची संपूर्ण छबी डोळ्यात साठवण्यासाठी माळशेज घाटाच्या पायथ्याखालील तळ कोकणातलं बेलपाडा गाव गाठायचं आणि रोहिदासच्या शिखरापासून ते नळीच्या वाटेपर्यंत दीड ते दोन किलोमीटरचा विस्तार असलेल्या संपूर्ण कोकणकड्याला आपल्या डोळ्यात साठवायचं.
From Kokankada 2006
प्रस्तरारोहकांच्या कितीतरी पिढ्या याच्यावर चढाई करण्याच स्वप्न बाळगून असतात, पण यशस्वी झालेल्यांपेक्षा अयशस्वी मोहिमांचीच संख्या जास्त आहे. अयशस्वी झालात तरी हरकत नाही, कारण यावर चढाई करण्याचा प्रयत्नसुद्धा प्रशंसेस प्राप्त आहे. कोकणकड्यावर विजय मिळवायचा असेल तर तुम्हाला हवी कणखर सवंगड्यांची साथ आणि अनुभवी संघ. महाराष्ट्रात १९८३ साली प्रथमच कृत्रिम चढाईच तंत्र (खिळे-बोल्ट) गिर्यारोहकांना अवगत झाल आणि ठाणे येथील चारूहास जोशी यांच्या गिरीविहार संस्थेने प्रथमच कृत्रिम चढाईच तंत्र वापरून जीवधनची वानरलिंगी सर केली. त्यानंतर असंख्य सुळक्यांच्या वाटा खुल्या होत गेल्या. पण कोकणकडा अजूनही आव्हानच ठरलेला. १९८५ मध्ये आयआयटी- मुंबईच्या गिर्यारोहकांनी वसंत लिमयेच्या नेतृत्वाखाली प्रथमच कोकणकडा सर केला. त्यांनी सुरुवात तर मध्यावरून केली होती पण पुढे डावीकडे सरकत ते मध्यावरून खूप दूरवरून कोकणकड्याच्या माथ्यावर पोहोचले, त्याला Left Route म्हणून ओळखले जाते. अद्यापही कोकणकड्याची मध्यवर्ती चढाई अभेद्यच होती. पण तत्कालीन मर्यादित उपलब्ध साहित्याच्या साहाय्याने यावर चढाई करण्याचा नुसता प्रयत्नसुद्धा कौतुकास पात्र आहे. पण हार मानेल तो माणूस कसला, १९८७ मध्ये मिलिंद पाठक यांच्या नेतृत्वाखाली 'समिट हायकर्स' आणि 'पुणे व्हेंचर्स' (टेल्को) या मुंबई-पुण्याच्या दोन संस्थांनी मिळून याच्या मध्यावरून कोकणकड्यावर विजय मिळवला आणि खऱ्या अर्थाने कोकणकडा पादाक्रांत झाला. “किरण, तुमच्यासारखी क्लाईम्बिंग टीम नसल्याने कड्यावरचा २-२ रुफ (दगडी छत) असलेला भाग मला सोडून द्यावा लागला” अशी खंत मिलिंद पाठक यांनी किरण अडफडकरांकडे एका भेटी दरम्यान व्यक्त केली होती. यावरून कोकणकड्याची भव्यता आणि अवघडपणा लक्षात यावा. मर्यादित साहित्य आणि प्रवासाची मर्यादित साधनं, यामुळे त्यांना जवळपास साडेतीन महिन्यांचा काळ लागला. यानंतर याच मार्गावरून उपलब्ध खिळ्यांच्या सहाय्याने कोकणकडा सर करण्यासाठी प्रस्तारारोह्कांची रीघ लागली. पण त्यात अयशस्वी प्रस्तारारोह्कांचीच संख्या जास्त होती. त्यानंतरही कोकणकड्यावर खूप दुर्दैवी घटना घडत होत्या. एका संस्थेने आयोजित केलेल्या कोकणकडा रॅपलिंग दरम्यान एक मुलगी गंभीररीत्या जखमी झाली होती. २००४ साली चढाईचा प्रयत्न करताना मार्गातील जीर्ण व कमकुवत झालेले खिळे तुटल्यामुळे कल्याणमधील एका संस्थेला दोर आणि मौल्यवान सामान कड्यावरच सोडून यशस्वी माघार घेण्यास भाग पडलं होत. एका वर्षी मोठा शिलाखंड कड्यापासून विलग होऊन खाली कोसळून मार्ग आणखी खडतर बनला होता. एव्हढ्या मोठ्या संख्येने मोहिमा अयशस्वी झाल्याने आम्हालाही याचे कुतूहल होतेच. २००६ साली गिरीविराजच्या मोहिमेच्या पूर्वतयारी दरम्यान जून-२००६ मध्ये याचा मागोवा घेण्याच काम आम्ही केल आणि एव्हढ्या मोठ्या संख्येने मोहिमा का अयशस्वी झाल्या त्याची कारण सुद्धा कळली. कोकणकड्याच्या प्रत्यक्ष भिंतीची मध्यवर्ती उंची १८०० फुट आहे. सुरुवातीला ३०० फुटी मध्यम कातळ चढाई करावी लागते. त्यापुढे ५०० फुट तिरकस रेषेतील सोपी चढाई आणि त्यापुढे मात्र भयानक परिस्थिती आहे. कोकणकडा कशाशी खातात त्याची प्रचीती इथून यावयास लागते. ३५० फुटांची चढाई अवघड प्रकारातली, इथपर्यंत म्हणजे ११५० फुट उंचीवर पोहोचल्यावर डावीकडे सरकणारी आडव्या रेषेतली लांबलचक अर्ध वर्तुळाकर परंतु अतिशय अरुंद लेज आहे, थोडस दुर्लक्षही जिवावर बेतेल. या लेजवरचा सुमारे ६५० फुट कडा हा या मार्गातला मुख्य अडसर. इथून मात्र याची भयानकता आणखी वाढते. तुमच्या शरीराचे हाल व्हायला इथूनच सुरुवात होते. त्यातही सुरूवातीच ३०० फुट अंतर पट्टीच्या प्रस्तरारोहकाला घाम फोडत. इथपर्यंत तो कसाबसा पोहोचेलही पण इथून वरची ३५० फुटी चढाई महाभयंकर. कारण इथून वरचा कडा ओव्हरहॅन्गच्या रूपाने सुमारे १४० ते १६० अंशाच्या कोनात असा काही बाहेर पडतो कि फक्त पाहतानाही भल्याभल्यांची तारांबळ उडावी. आजवरच्या बहुतेक मोहिमा इथूनच अयशस्वी झाल्या आहेत. या शेवटच्या टप्प्यातील मध्यभागात एकुलती एक ससाण्याची लेज आहे, पण इथेही स्वतःला दोर बांधून सर्व व्यवहार करावे लागतात. त्यामुळे इथे बेसकॅंप स्थापित करता येत नाही आणि सर्व व्यवहार माथ्यावरूनच नियंत्रित करावे लागतात. खाली पहाव तर आपण चढून आलेला रॉकपॅच दिसतच नाही आणि तिरकस ओव्हरहॅन्गमुळे वरचाही थांगपत्ता लागत नाही. सुमारे १४-१५ वर्षे सर्व साहसी प्रस्तरारोहक याच मार्गाचा अवलंब करून कोकणकड्यावर झेंडा रोवत होते. आता अखंड कडाच कोसळून खाली पडल्यामुळे, मार्ग आणखी खडतर बनला होता, जवळ जवळ बंदच झाला होता. कोकणकडा परत गिर्यारोहकांची परीक्षा पाहत होता. एकतर जुन्या खिळ्यांच्या जागी नवीन खिळे ठोकणे अथवा नवीन मार्ग शोधणे असे दोनच पर्याय उपलब्ध होते. त्या दृष्टीने मुंबई-पुण्याच्या विविध संस्थांनी प्रयत्नसुद्धा केले पण सारे विफल झाले. नेमक्या अशाच वेळेस गिरीविराज हायकर्सचा (डोंबिवली) पुनर्जन्म झाला होता. जुने सगळे साथीदार निवृत्त झाल्याने जवळपास १० वर्षांचा काळ अज्ञातवासात गेला. २००२ साली संस्थेला परत उर्जितावस्था प्राप्त झाली. किरण अडफडकरांनी आशिष पालांडे, राहुल शिंदे, दिवाकर भाटवडेकर, प्रदीप म्हात्रे, योगेश सदरे आदीं तरुण मंडळींची सक्षम टीम बांधून वजीर, तावली, भैरवगड, बाण, नानाचा अंगठा आदींवर नवीनच मार्गाने चढाई करून भरपूर अनुभव नवीन टीमच्या पाठीशी गोळा केला आणि कोकणकड्याला हात घालण्याचा निर्णय घेण्यात आला, तोही कोणताही गाजावाजा न करता. त्यासाठी दर शनिवार-रविवार तळोजा येथील पांडवकड्याला भेट देऊन १९८८ साली आम्हीच सर केलेल्या मार्गावर रुफ बोल्टिंग, लॅडर शिफ्टिंगचा कसून सराव करून घेतला. कारण कोकणकड्यावर चढाईसाठी आम्ही सर्वात अवघड मार्ग निवडला होता आणि दोन ठिकाणी १८० अंशाच्या कोनातील दोन दगडी छतांचा समावेश होता.
From Kokankada 2006
संस्थेची आर्थिक परिस्थिती तोळामासाच असल्याने सर्व प्रथम पैशांची जमवाजमव करावी लागणार होती. त्यावेळी ठाण्याचे चारुहास जोशी मदतीसाठी आले आणि त्यांच्या 'हिल्स अॅगण्ड ट्रेल्स' या कंपनीच्या वतीने छायाचित्रण आणि चलतचित्रणासाठी आर्थिक खर्चाचा काही भार उचलला. उर्वरित खर्चाची जबाबदारी संस्थेच्याच सभासदांनी विभागून घेतली. २५ ऑक्टोबर, २००६ - हरिश्चंद्रगडाचा पायथा - खिरेश्वर जवळपास वीस दिवसांचा शिधा, तंबू, स्वतः तयार केलेले २०० एक्स्पान्शन बोल्ट, दोर, इतर चढाई करण्यासाठीचे सामान घेऊन उत्साहाने भरलेली सगळी मंडळी सामानासोबत गडाच्या पायथ्याशी गोळा झाली. सामान खूपच असल्याने गावातील मंडळींकडे मदतीसाठी 'अर्थपूर्ण' विचारणा केली पण ते अवजड सामान पाहून त्यांनी काढता पाय घेतला. शेवटी आम्हीच सामान पाठीवरून वाहुन न्यायचा निश्चय केला. तोलार खिंडीतून हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी साधारण ४-५ तास लागतात, पण आम्हाला त्या दिवशी मात्र तब्बल ९ तास लागले, यावरून आमच्याकडे असलेल्या सामानाची प्रचीती आली असेल. गडावरील शंभू महादेवच दर्शन घेऊन थेट कोकणकड्याच्या धुंद वातावरणात प्रवेश केला. आता आमच मुख्यालय इथेच असणार होत, अर्थात कॅम्प नं.१. योग्य जागा पाहून साफसफाई करून तंबू ठोकून दिले.
From Kokankada 2006
२७ ऑक्टोबर, २००६ (पहिला दिवस): सकाळी लवकर उठून किरण आणि मंडळी नळीच्या वाटेने कोकणकड्याच्या पायथ्याशी पोहोचले. आज त्यांना इथे कॅम्प नं. २ ची स्थापना करायची होती. कोकणकड्याच्या पायथ्याला जाणारा शॉर्टकट शोधण्याच्या नादात सुर्य कधी डोगरापल्याड गेला ते कळलंच नाही. रात्रीचे अंधारात धडपडण्यापेक्षा नळीच्या वाटेतच उघड्यावर मुक्काम करावा लागला. २८ ऑक्टोबर, २००६ (दुसरा दिवस) आज कसेही करून चढाईचा मुहूर्त साधायचा होता. रात्री उघड्यावरच झोपलेलो असल्याने लवकरच जाग आली. पहिल्याच दिवशी वेळापत्रक बिघडण्याची चिन्ह दिसत होती, त्यामुळे धावतपळत तडक कोकणकड्याचा पायथा गाठला. कॅंप नं. २ ची स्थापना करून चढाईसाठी सज्ज होण्यास तरीही दुपारचे बारा वाजलेच. शेवटी आज एवढ्या वर्षांपासून हृदयाशी जपून ठेवलेला क्षण प्रत्यक्षात साकार होणार होता. अपघातविरहीत यशासाठी सह्याद्रीचा धावा केला आणि सुरुवातीला चढाईचा मार्ग सोपा असल्याने नव-प्रशिक्षित मनीष पिंपळे आणि राहुल शिंदेने या महात्वाकांक्षी मोहिमेचा श्रीगणेशा केला. आज प्रत्यक्ष चढाईसाठी वेळ कमी मिळाला. तरीही मिळालेल्या वेळात या दोघांनी सुरुवातीची ३०० फुटी साधारण चढाई पूर्ण करून दोर तिथेच बांधला आणि पुन्हा पायथ्याला कॅंप नं.२ वर परत आले.
From Kokankada 2006
From Kokankada 2006
२९ ऑक्टोबर, २००६ (तिसरा दिवस) तिसऱ्या दिवशी दिवाकर भाटवडेकर आणि प्रकाश म्हात्रे यांनी काल चढाई थांबवलेल्या ठिकाणी पोहोचून जवळपास ८५० फुट चढाई दिवसभरात केली. यातील सुरुवातीची ५०० फुट चढाई तिरकस रेषेत सोपी होती आणि त्याच्यावरील ३५० फुट चढाई थोडीशी अवघड स्वरूपातील होती. आता आम्ही ११५० फुटी रुंद लेजवर पोहोचलो होतो. खरतर आजच इथे कॅंप नं.३ ची स्थापना करायची होती पण संध्याकाळ झाल्याने परत ११५० फुट खाली पायथ्याला जाण्यास भाग पडले. चढाईचा पहिला टप्पा संपला होता पण कोकणकड्याची खरी लढाई यानंतरच सुरु होणार होती. आता पर्यंतच्या बहुतेक मोहिमा अयशस्वी का झाल्यात त्याची प्रचीती इथूनच येणार होती.
From Kokankada 2006
From Kokankada 2006
३० ऑक्टोबर, २००६ (चवथा दिवस): या पुढच्या मोहिमेसाठी पायथ्याला असलेल्या कॅंप नं.२ ची आवश्यकता नसल्याने त्याचा गाशा गुंडाळून प्रकाश आणि मंगेश सदरे नळीच्या वाटेने कोकणकड्यावर परत कॅंप नं.१ वर निघून गेले. तर किरण, दिवाकर, मनीष आणि राहुल काल बांधून ठेवलेल्या दोराच्या साहाय्याने ११५० फुटी लेजवर पोहोचले. त्याच वेळेस पुढच्या मोहिमेची रूपरेषा ठरवण्यासाठी आशिष पालांडे आणि योगेश सदरे यांनी कोकणकड्याच्या माथ्यावरून रॅपलिंग करत ११५० फुटी लेजवर खाली असलेल्या टीमला येऊन सामील झाले. आता पुढच्या चढाईचे नियोजन याच ११५० फुटी लेज वरून होणार होते. तंबूसाठीची जागा हेरून पुन्हा सगळे जण आशिष आणि योगेशने माथ्यावरून आणलेल्या दोरावर झुमारिंग (सुमारे ६५० फुट) करत कोकण कड्याच्या माथ्यावर म्हणजेच कॅंप नं.१ वर आले.
From Kokankada 2006
From Kokankada 2006
From Kokankada 2006
३१ ऑक्टोबर, २००६ (पाचवा दिवस): अर्धी लढाई जिंकलेली असल्यामुळे उत्साहाच्या भरात पाच जणांची टीम काल बांधून ठेवलेल्या दोराच्या साहाय्याने कोकणकड्याच्या माथ्यावरून रॅपलिंग करत ११५० फुटी लेजवर पोहोचली. या ऐसपैस लेजवर तंबू ठोकण्यासाठी आम्ही कालच जागा हेरून ठेवली होती, त्या जागेवर रात्रीच्या निवासाकरिता २ तंबू ठोकून कॅंप ३ ची स्थापना करण्यात आली. आता कृत्रिम चढाई (अर्थात खिळ्यांच्या मदतीने) सुरु होणार होती आणि आमच्या सहनशक्तीची परीक्षा घेणार होती. दरम्यान जेवणपाणी आणि सामान पुरवठ्यासाठी किरणने एक वेगळा नायलॉनचा दोर (६५० फुट) माथ्यापासून या ११५० फुटी लेजपर्यंत बांधून सप्लाई लाईन फॉर्म केली. आज प्रदीप म्हात्रेने पायथ्यापासून १२०० फुट उंचीवर मुक्त चढाईचा सुंदर नमुना पेश करत जवळपास २०० फुटांची उंची गाठली. कॅंप ३ अर्थात ११५० फुटी लेजवरच मुक्काम असल्याने किरणने बांधलेल्या दोरावरूनच कॅंप १ वरून टीमसाठी जेवणपाणी पुरविण्यात आल.
From Kokankada 2006
०१ नोव्हेंबर, २००६ (सहावा दिवस) आशिष आणि योगेशने, काल प्रदीपने चढाई थांबवलेल्या ठिकाणापासून आरंभ केला. आता मात्र कोकणकडा आपले रंग दाखवायला लागला. दुर्दैवाने त्यांच्या मार्गात अत्यंत ठिसूळ खडक लागल्याने मारलेला खिळा (बोल्ट) केवळ हातानेच हलत होता. तरीही त्यांनी थोडा धोका पत्करून या हलणाऱ्या खिळ्यांच्या सहाय्याने चढाई चालू ठेवली पण अचानक आलेल्या संकटाने भांबावून चढाईचा वेग खूपच मंदावला.
From Kokankada 2006
०२ नोव्हेंबर, २००६ (सातवा दिवस): आज प्रदीप आणि अविन्द्र म्हात्रे त्या ठिसूळ कड्याला भिडले पण त्यांचे सुद्धा ठिसूळ खडकामुळे कालच्यासारखेच हाल झाले. परिस्थिती खूपच कठीण होती. आता मात्र आमचीही इतर मोहिमांसारखीच गत होते कि काय याची शंका यायला लागली. नाईलाजाने प्रदीप आणि अविन्द्र ११५० फुटी लेजवर (कॅंप नं.३) परत आले. २ मौल्यवान दिवस वाया गेले होते, अगदीच आणिबाणीचा प्रसंग उभा ठाकला होता. वॉकीटोकीच्या साहाय्याने आलेल्या प्रसंगाची चर्चा करून किरणने कॅंप १ वरून खाली ११५० फुटी लेजवर (कॅंप ३) वर उतरण्याचा निर्णय घेतला.
From Kokankada 2006
०३ नोव्हेंबर, २००६ (आठवा दिवस): आता अनुभवच कामी येणार होता आणि कॅम्पवर किरण एव्हढा प्रस्तरारोहणाचा अनुभव कोणाच्याच गाठीशी नव्हता. किरणने प्रदीपला सोबत घेतलं आणि त्या ठिसूळ कड्याला सामोरा गेला. प्रदीप साहस एकवटून अर्धवट मारलेल्या खिळ्यावर लटकून किरणला बिले देत होता. ठोकलेल्या खिळ्यावर भरोसा ठेवण्यासारखा नव्हताच, कुठल्याही क्षणी ते बाहेर येउन खाली पडण्याचीच भीती अधिक होती. ठोकलेला खिळा भसकन भिंतीच्या आत जात होता. शेवटी किरणने नवीनच युक्ती वापरली. भिंतीमध्ये छिंद्र करण्यासाठी जो पंच वापरतात, तो पंचच त्या ठिसूळ खडकात पूर्ण ठोकायचा आणि प्रदीपला सावध रहायला सांगून त्या हलत असलेल्या पंचच्या आधाराने वर सरकायचा. असे करत करत त्याने एव्हढ्या वर्षांच्या अनुभवातून कमवलेल्या शिदोरीवर दिवसभरात त्या ठिसूळ कड्यावर मात करत पालीची लेज गाठली (पालीच्या आकाराचा खडक). मग तिथेच दोर बांधून तो परत खाली ११५० फुटी लेज वर रात्रीच्या मुक्कामासाठी उतरला. ठिसूळ पॅचवर मात केल्यामुळे रात्री कॅम्पवर उत्साहाचे वातावरण होते.
From Kokankada 2006
पण त्या उत्साहावर विरजण घालण्यासाठी परतीच्या पावसाने आपली हजेरी लावली. संपूर्ण कॅंप पाण्याने भिजून गेला, त्यामुळे रात्र लेजवर असलेल्या एका कपारीत काढावी लागली. पुढे आठवडभर वेळी अवेळी पाऊस हजेरी लावून आमच्या सहनशक्तीचा अंत पाहत होता, त्यातच पावसामुळे वरून घरंगळत खाली पडण्याऱ्या दगडांमुळे, अपघात टाळण्यासाठी सारखी कपारीकडे धाव घ्यावी लागत होती. ०४ नोव्हेंबर, २००६ (नववा दिवस): ४ दिवसांमध्ये ११५० फुटी लेजच्या वर खिळ्यांच्या साहाय्याने साधारण ३०० फुट चढाई केली होती. आता खरी परीक्षा सुरु होणार होती कारण १४०-१६० अंशाच्या कोनातला मुख्य ओव्हरहेंग सुरु होत होता ज्यात दोन रुफचा (दगडी छत) समावेश होता. इथूनच खूप मोहिमा अयशस्वी होऊन माघारी गेल्या आहेत. आज योगेश आणि आशिषने १५ बोल्टच्या साहाय्याने ओव्हरहेंगपर्यंत मजल मारली.
From Kokankada 2006
From Kokankada 2006
०५ नोव्हेंबर, २००६ (दहावा दिवस): प्रदीप व दिवाकरने १६० अंशाच्या कोनात बाहेर पडलेल्या ओव्हरहेंगवर बोल्टिंगचा श्रीगणेशा केला. ओव्हरहेंगवर बोल्टिंग करणे सगळ्यात कठीण काम. ओव्हरहेंगवर बोल्टिंग करताना शरीर मागे फेकले जात असल्याने संपूर्ण शरीरावर अतिरिक्त भार पडतो आणि खिळा ठोकण्याचा वेगही मंदावतो.
From Kokankada 2006
०६ नोव्हेंबर, २००६ (अकरावा दिवस): आशिषने एकट्यानेच ओव्हरहेंगवर दिवसभरात ११ बोल्ट ठोकले.
From Kokankada 2006
०७ नोव्हेंबर, २००६ (बारावा दिवस): योगेशने एकट्यानेच ओव्हरहेंगवर दिवसभरात १० बोल्ट ठोकले.
From Kokankada 2006
०८ नोव्हेंबर, २००६ (तेरावा दिवस): आता मार्गात पहिलं दगडी छत लागल. दगडी छत हा ओव्हरहेंगपेक्षाहि भयानक प्रकार. इथे डोक्यावर १८० अंशाच्या कोनात खिळा ठोकावा लागतो. वेदनेमुळे आपल्याला मान आहे हेच आपण विसरून जातो. जवळपास झोपूनच खिळे मारावे लागतात. पण वेदनेने शरीर गलितगात्र होऊन सुद्धा किरणने दिवसभरात छताला लटकून ९ बोल्टच्या सहाय्याने त्या ३५ फुट रुंदी असलेल्या छताचा फडशा पाडला.
From Kokankada 2006
०९ नोव्हेंबर, २००६ (चौदावा दिवस): प्रदीपने आज एकट्यानेच बोल्टिंग करत तब्बल १२ खिळे ठोकून तो सुद्धा शर्यतीत असल्याच दाखवून दिल.
From Kokankada 2006
From Kokankada 2006
प्रत्येक जण आता इतका तयार झाला होता कि रोज ११५० फुटी लेज वरून सुमारे ३००-४०० फुट झुमारिंग केल्यानंतर (तेही ओव्हरहेंगमुळे भिंतीपासून दीडेकशे फुट बाहेर हवेत लटकून) इच्छितस्थळी पोहोचल्यावर एकट्यानेच पंचिंग करून १०-१२ खिळे ठोकत होता. ते गरजेचही होत. तिथे वारंवार चढाईपटू बदलून वेळ वाया गेला असता. त्यात झुमारिंगला दीड दोन तास लागत होते. त्यामुळे एकट्यालाच संपूर्ण दिवस निभावून न्यावा लागत होता. १० नोव्हेंबर, २००६ (पंधरावा दिवस): आज किरणने चढाईला सुरुवात केली. त्याला मदतनीस म्हणून दिवाकर आणि त्याखाली दूरवर पालीच्या लेजवर प्रकाश होता. दरम्यान एक अजब प्रकार त्यांना अनुभवास आला. ओव्हरहेंगवर शेवटच्या टप्प्यात बोल्टिंग करताना अचानक प्रचंड गडगडाट होऊन धुरळ्याचे लोट जमा झाले. आसपासच काहीच दिसेनास झाल. या प्रकाराने किरण आणि दिवाकर गांगरूनच गेले. धुरळा विरताच, प्रकाश ज्या लेजवर होता त्या ठीकाणी थोड खाली एक मोठा खडक निखळून पडल्याच लक्षात आल. सुदैवाने प्रकाश सहीसलामत होता पण या पडझडीत एक भलामोठा धोंडा नेमका आमच्या अतिरीक्त दोरावर पडला आणि त्याचे दोन तुकडे झाले. झाल्याप्रकारातून सावरत एकंदर नऊ खिळे आणि एक पाचर यांच्या मदतीने किरणने दिवसभरात चढाईचा अर्धा टप्पा म्हणजेच ससाण्याची लेज गाठली. जेमतेम दीड-दोन फुट रुंद असलेल्या लेजवर असंख्य दगड तुटून पडले होते. दगड इकडे तिकडे हलवून किरण आणि दिवाकरने दोन माणसांना झोपता येईल इतकी जागा तयार करून तिथे एक खिळा ठोकून त्याला दोर बांधला आणि परत खाली ११५० फुटी लेजवर परतले. दुसऱ्या दिवसापासून ११५० फुटी लेजला राम राम करायचा होता. खरतर आजच हि लेज सोडणार होतो, पण वाइंडअप अर्थात आवराआवर करण्यात वेळ गेला आणि अंधार पडल्याने सगळी काम दुसऱ्या दिवसावर ढकलण्यात आली.
From Kokankada 2006
११ नोव्हेंबर, २००६ (सोळावा दिवस): आज कॅंप ३ चा अर्थात ११५० फुटी लेजवरचा गाशा गुंडाळून आम्ही माथ्यावर असलेल्या कॅंप १ वर दाखल झालो. तसेच ससाण्याच्या लेजवर असलेल्या दोराचे एक टोक माथ्यावर नेऊन तिथे असलेल्या कारवीच्या झुडुपात ते टोक बांधल. यानंतरची मोहीमेच नियोजन माथ्यावरूनच करणार होतो. दुपारी योगेश आणि आशिष टायरोलीन (व्हॅली क्रॉसिंग) पद्धतीने कारवीत बांधलेल्या दोराच्या साहाय्याने ससाण्याच्या लेजवरील कॅंप ४ वर उतरले. आज वेळ खूपच कमी मिळाल्याने फक्त २० फुट चढाई होऊ शकली. आज त्यांचा मुक्काम या दीड फुट रुंद लेजवरच असल्याने संध्याकाळी दोराच्या साहाय्याने त्यांना जेवण व पाणी पुरवण्यात आले.
From Kokankada 2006
१२ नोव्हेंबर, २००६ (सतरावा दिवस): फक्त दीड फुट रुंद लेजवर अंग अवघडून संपूर्ण रात्र काढावी लागल्याने झोप आलीच नाही. योगेशने सकाळीच चढाईला सुरुवात केली आणि दिवसभरात अथक परिश्रमाने तब्बल १८ खिळे ठोकून नवीन विक्रम केला. दुसऱ्या दिवशी किरण, दिवाकर आणि प्रदीप कॅंप ४ (ससाण्याची लेज) वर जाणार होते, त्यामुळे वेळ वाचवण्यासाठी संध्याकाळी प्रथम आशिषला दोराच्या सहाय्याने वरून बिले देऊन माथ्यावर खेचून घेतलं. पण या सर्व उपद्द्व्यापात रात्रीचे ८ वाजले. त्यामुळे नाईलाजाने योगेशला सलग दुसरा दिवस एकट्यालाच ससाण्याच्या लेजवर मुक्काम करावा लागणार होता. मानसिकता, सुरक्षितता, संपर्क अशा सर्वच दृष्टीने ते चुकीच होत पण नाईलाज होता. मनावर धोंडा ठेऊन ती रात्र आम्ही सर्वांनी अक्षरशः चिंतेत काढली. उजाडताच वॉकीटोकीवरून योगेशशी संपर्क करून तो सुरक्षित असल्याच कळल्यावर जीव भांड्यात पडला.
From Kokankada 2006
From Kokankada 2006
१३ नोव्हेंबर, २००६ (अठरावा दिवस): सकाळी योगेश परत माथ्यावरच्या कॅंप १ वर येताच, प्रदीप, दिवाकर आणि किरण ससाण्याच्या लेज वर (कॅंप ४) पोहोचले. प्रदीपने चढाई सुरु केली, किरण सेकंड मेन आणि दिवाकर लेजवर. दुपारी दोनच्या सुमारास योगेशचा संदेश मिळाला 'आग्यामाशांच भलमोठ मोहोळ खालच्या (दरीच्या) बाजूला गेल आहे, तुम्हाला दिसलं का?' त्यांना काहीच कल्पना नव्हती. साडेतीनच्या सुमारास किरण दिवाकरशी बोलत असताना खाली दरीत काळ्याकभिन्न आग्यामाशांच भलमोठ मोहोळ त्यांच्याच दिशेने येत होत. किरणने, दिवाकर आणि प्रदीपला लागलीच सावध केल आणि कोणतीही हालचाल न करण्याची सूचना केली. माशा डसल्या तर त्यांच्या बचावासाठी कोणतच साधन नव्हत. डोळे मिटून, शिडीवर लटकत त्याची प्रतीक्षा करत असतानाच ते भलमोठ मोहोळ चक्क त्यांच्या शरीरावरून जाताना जाणवत होत. त्या माशांचे स्पर्श शहारून टाकणारे होते. क्षणार्धात ते मोहोळ, काळे काळे ठिपके वर वर जात नाहीसे झाले. त्यांची जवळपास बंद पडलेली हृदय परत धडधडायला लागली. एव्हढा बाका प्रसंग घडून सुद्धा प्रदीपने जबरदस्तपणे १६ खिळे ठोकलेच. परत संध्याकाळी वर येताना एक अपघात होता होता वाचला. नेहमीप्रमाणे प्रदीपने संध्याकाळी चढाई थांबवली आणि माथ्यावर कॅंप नं. १ वर जाण्यास तयार झाला. माथ्यावरून जो दोर खाली सोडण्यात आला होता तो चढाईच्या रेषेत नव्हता. त्याचा मध्य चढाईपटूच्या डाव्या हाताला १०० फुट दूरवर होता. त्यामुळे चढाईपटूला त्या दोराच्या रेषेत येण्यासाठी एकतर स्विंग घ्यावा लागला असता, अथवा कोणीतरी त्याचा स्विंग नियंत्रीत करण जरुरी होत. सेकंड मेंन नियंत्रकाच काम करायचा. पण दुर्दैवाने किरणच्या हातून त्या दोराचे नियंत्रण सुटल्यामुळे प्रदीपला १०० फुटांचा जोरदार स्विंग आला आणि प्रदीप हवेत हेलखावे खाऊ लागला. त्या दोरावर परत नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात किरणचा हातसुद्धा चांगलाच भाजून निघाला. सुदैवाने कोणताही अपघात न होता प्रदीप सुखरूपपणे कॅंपवर पोहोचला.
From Kokankada 2006
१४ नोव्हेंबर, २००६ (एकोणिसावा दिवस): चढाई पूर्णपणे आटोक्यात आली होती. आता शेवटच एक दगडी छत उरल होत. प्रस्तरारोहणातील सर्वात कठीण प्रकार. योगेश आणि आशिषने कामगिरी फत्ते करण्याचा विडा उचलला. ईथेच गिरीविराज हायकर्सच्या नावाची एक स्मरणिका ठोकण्यात आली. दुपारी तीन वाजेपर्यंत योगेशने १५ खिळे ठोकून त्या छताचा निकाल लावला.
From Kokankada 2006
From Kokankada 2006
त्याला आता माथा एकदम आवाक्यात आला होता. आता आणखी थोडासा जोर लावून योगेश माथ्यावर पोहोचू शकत होता. जीवनात एकदाच मिळणारी संधी. कोकणकड्यावर पाय ठेवून इतिहासात आपलं नाव अजरामर करू शकत होता. पण गिरीविराजच्या सर्व तरुण मंडळीने हा मान सह्याद्रीचा शिलेदार किरण अडफडकरांना द्यायचा हे आधीच निश्चित केले होते. म्हणून योगेशने चढाई थांबवून पुढची सूत्रे किरणच्या हाती दिली. किरणने सलग चार खिळे ठोकून शेवटची शिडी सोडली, ३५ फुटांची मुक्त चढाई करत मातीची ढेकळ आणि गवत यातून सावधपणे हालचाली करत संध्याकाळी सव्वा सहा वाजता कोकणकड्याच्या माथ्यावर पाऊल ठेवलं.
From Kokankada 2006
From Kokankada 2006
आयुष्यभराच स्वप्न साकार झाल होत. कोकणकड्याच्या सर्वात अवघड आणि अभेद्य मार्गावर १७० expansion bolt च्या सहाय्याने गिरीविराज हायकर्सच नाव कोरल गेल होत. अवांतर: एव्हढी मोठी मोहीम यशस्वी करण्यासाठी तेव्हढीच मजबूत बेसकॅंप टीम हवी. संस्थेचे संस्थापक सदस्य सुभाष पांडीयन, कै. संजय रेडकर आणि संदीप रहाटवळ यांनी इतरांच्या मदतीने ते आव्हान लीलया पार केले. अथक शारीरिक त्रासामुळे मोहीम अर्धवट राहण्याचीच चिन्हे दिसत होती, अशा वेळेस संजय नेहमीच धाऊन आला आणि चढाईपटूना मानसिक बळ देण्याच काम सुद्धा समर्थपणे पेललं. प्रवीण घुडे, अमृता राजे, योगेश आंब्रे, जेम्स, राजेश, हर्षद यांचेही बहुमोलाचे सहकार्य लाभले. दुखः एकाच गोष्टीच आहे कि प्रायोजक मिळून सुद्धा या मोहिमेचे योग्य प्रकारे चलतचित्रण करू शकलो नाही. तत्कालीन उपलब्ध व्हिडीओ कॅमेऱ्याने (कॅसेटवाला) याचे चलतचित्रण केले आहे, पण दुर्दैव असे कि ज्याला हे काम सोपवले होते त्याने पहिल्या दिवशी हजेरी लावल्यानंतर तो जो घरी गेला तो थेट मोहिमेच्या शेवटच्या दिवशी परत हजर झाला त्यामुळे चलतचित्रणाची जबाबदारी सर्व नवशिक्यानीच पार पाडली. या मोहिमेचे एक अनोखे वैशिष्ट्य म्हणजे खूपस साहित्य स्वतःच तयार करण्यात आले होते, अगदी बोल्ट आणि कॅराबिनर्ससुद्धा. आपला नम्र गिरीविराज हायकर्स - डोंबिवली
From Kokankada 2006

प्रतिक्रिया द्या
29611 वाचन

💬 प्रतिसाद (74)
च
चेतन Mon, 02/02/2015 - 12:32 नवीन
थरारक. परत एकदा वाचुन प्रतिक्रिया द्यावी लागणार
  • Log in or register to post comments
अ
अजया Mon, 02/02/2015 - 12:54 नवीन
वाचलं होतं आधीही.तेव्हा मनात जोडलेले हात.आता इथे _/\_
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Mon, 02/02/2015 - 13:24 नवीन
हेच म्हणतो. पुर्नवाचनाचा आनंद घेतल्या गेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
व
वेल्लाभट Mon, 02/02/2015 - 13:13 नवीन
आवंढे गिळत लेख आणि फोटोंना सामोरा गेलो. तुम्ही तर डायरेक्ट कोकण कड्याशी दोन हात केलेत. साष्टांग ! जबरदस्त साहस आणि धैर्य कमालीचं कौशल्य सॉलिड आत्मविश्वास आणि एकंदरितच..... नाद खुळा ! रॅपलिंगची इच्छा आहे को.कड्यावरून. या वर्षी जमवेन म्हणतो..... पण हे म्हणजे लईच भारी तिजाय्ला.
  • Log in or register to post comments
स
सतीश कुडतरकर Tue, 02/03/2015 - 06:27 नवीन
ते सौंदर्य डोळ्यात साठवण्यासाठी एकदा रॅपलिंगचा थरार अनुभवाच, अहाहा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
ब
बॅटमॅन Mon, 02/02/2015 - 13:25 नवीन
अरे काये हे?????????? फोटो बघून हातभर फाटली १८० डिग्रीमध्ये. माणसं आहात का कोण राव तुम्ही. सगळ्यांना एक साष्टांग नमस्कार फक्त. बाकी काही बोलायची औकात नाही.
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Mon, 02/02/2015 - 19:59 नवीन
शब्दशः हेच बोलतो !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
म
मी-सौरभ Wed, 02/04/2015 - 14:37 नवीन
+१२३४५६७८९
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास झेले
S
sagarpdy Mon, 03/09/2015 - 07:16 नवीन
+१२३४५६७८९ABCDEF
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ
स
सूड Mon, 02/02/2015 - 13:37 नवीन
थरारक अनुभव!!
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 02/02/2015 - 14:11 नवीन
जबर्‍याच. आधी वाचलेले होतंच.
  • Log in or register to post comments
स
स्वच्छंदी_मनोज Mon, 02/02/2015 - 14:20 नवीन
सतीश, आधीही वाचलं होतं आणी प्रत्यक्ष भेटीतही प्रतीकिया दीली होती... भन्नाट, सुपर्ब.. काकांना तर साष्टांग दंडवतच...
  • Log in or register to post comments
क
केदार-मिसळपाव Mon, 02/02/2015 - 14:29 नवीन
तुमच्या मोहिमेवरच एखादा चित्रपट बनयला हवा (कोकणजादा).. तुमच्या साहसासमोर शब्द कमी पडतायेत. मस्त...
  • Log in or register to post comments
ए
एस Mon, 02/02/2015 - 15:15 नवीन
अतिशय घाईत असूनही मुद्दाम लॉगइन करून प्रतिक्रिया देण्यापुरता वेळ काढावा असे फार थोडे लेख असतात. आपलाही तसाच. आधी मायबोलीवर वाचले होते आणि त्याआधीही बर्‍याच गिर्यारोहकांकडून या यशस्वी समिटबद्दल ऐकलेही होते, पण वा! क्या बात है! पुनःपुन्हा वाचले तरी कमीच! त्याचबरोबर किरण आडफडकरांनी रोहिदास शिखराकडून शोधून काढलेल्या नव्या मार्गाच्या शोधयात्रेबद्दलही लिहा. आणि एएमकेमधील मदनसाठीचा नवा रूट कसा ओपन केला तेही लिहा. या दोन लेखांच्या प्रतीक्षेत! आपला - सहडोंगरयात्री!
  • Log in or register to post comments
स
सतीश कुडतरकर Sat, 02/07/2015 - 07:35 नवीन
अशी कोणतीही वाट शोधलेली नाही. वाटा तिथेच आहेत हो, त्या काय शोधायच्या. अगदी सामान्य ट्रेकर्सलासुद्धा प्रस्तरारोहणाविषयी अल्पशी जरी माहिती आणि योग्य मार्गदर्शन लाभल तर तो कुठल्याही घळीत घुसला कि माथ्यावर आरामात पोहोचेल. तुम्हीही ते करू शकता. अशा कितीतरी घळीतून चढलो-उतरलेलो आहोत त्यात गौराविण्यासारख काहीच नाही. आणि AMK चा मदनचा नवीन रुट विषयी म्हणत असाल तर, किरण काका आणि मंडळी जीवनात फक्त एकदाच पावसाळ्यात तो फक्त ट्रेक करून आलेत. बस! मदन आणि अलंगच्या बेचक्यात असलेले सुळके आम्ही अद्यापही केले नाहीत. मागे अलंगच्या भिंतीवर चढाई करण्यासाठी आखणी केली होती, पण संपूर्ण भिंत तुळतुळीत असल्याने फक्त बोल्टिंगच करावे लागेल म्हणून बेत बारगळला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ए
एस Tue, 02/10/2015 - 12:35 नवीन
ठीक आहे. या दोन मार्गांच्या शोधयात्रेबद्दल उत्सुकता होती म्हणून विचारले. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतीश कुडतरकर
ग
गणेशा Mon, 02/02/2015 - 15:26 नवीन
अप्रतिम .. पुन्हा हळु हळु वाचतो.. फोटो पाहुनच खुप अवघड प्रकरण आहे हे लक्षात आले. आयुष्यात मला हे जमनार नाही
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 02/02/2015 - 15:27 नवीन
जबर्‍या!
  • Log in or register to post comments
त
तर्री Mon, 02/02/2015 - 16:16 नवीन
थक्क , रोमांचकारी आणि भयकंपित !
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Mon, 02/02/2015 - 17:05 नवीन
माऊली, दंडवत घ्या.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 02/02/2015 - 17:06 नवीन
को कण कडाच.. केलात हो अगदी! __/\__
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी Mon, 02/02/2015 - 17:12 नवीन
ग्रेट......
  • Log in or register to post comments
व
विलासराव Mon, 02/02/2015 - 17:39 नवीन
जबरदस्त साहस. आवड्ले.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 02/02/2015 - 19:03 नवीन
तुमच्या साहसाला _/\_....!!! जबरदस्त. डोळ्यांचं पारणं फिटतय फोटो पाहुन.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 02/02/2015 - 19:08 नवीन
थरारक !!! आमच्याकडे याला "टोटल येडेका बाजार" म्हणतात ! मुजरा घ्या मुजरा _/\_
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Mon, 02/02/2015 - 19:56 नवीन
अंगावर काटा आला वाचता वाचता. नुसता वाचून आणि बघून घाम फुटला इकडे… प्रत्यक्ष कोकणकडा बघितलाय त्यामुळे तुमचे हे शौर्य अतिप्रचंड आहे असेच म्हणतो. साष्टांग नमस्कार आणि त्रिवार मुजरा. तुम लोगा नार्मल नै बावा, येडे है येडे.
  • Log in or register to post comments
ल
लॉरी टांगटूंगकर Mon, 02/02/2015 - 20:03 नवीन
महान!!!!!!!! _/\_
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 02/02/2015 - 20:33 नवीन
थरारक...
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Mon, 02/02/2015 - 21:31 नवीन
अ फा ट....! साष्टांग नमस्कार.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Mon, 02/02/2015 - 21:31 नवीन
अ फा ट....! साष्टांग नमस्कार.
  • Log in or register to post comments
स
सतीश कुडतरकर Tue, 02/03/2015 - 05:59 नवीन
पहिल्याच प्रयत्नात मिपाकारांचा एव्हढा भरभरून प्रतिसाद पाहून मन आनंदून गेलंय. सर्वांचे मनःपूर्वक आभार!
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Tue, 02/03/2015 - 06:53 नवीन
खरं तर मी अजुन हा किल्लाच बघितलेला नाहिये. भावाने ४ वेळा वरती कॅम्प बांधुन वस्तीला राहिलाय त्यामुळे त्याच्या तोंडुन ऐकुन आहे फक्त. पण आता नुसते फोटो बघुनच अंगावर काटा आला आणि हाताला घाम फुटला. आईशपथ कायच्या काय धाडस केलेत हो. जिथुन वर जाणं वार्‍याला आणि खाली येणं फक्त पाण्याला माहिती आहे तिथे तुम्ही हे आत्मघातकी धाडस केलेत. तुम्ही खरे मावळे. मुजरा साहेब. त्रिवार मुजरा तुमच्या सर्व सदस्यांना. दोन प्रश्न ही मोहिम आखायची म्हणजे आधी सरकार दरबारी काही नोंदणी वगैरे करावी लागते काय? तुम्ही केलेल्या साहसाची गिनिज बुक किंवा लिम्का बुक मध्ये नोंदणी केली की नाही?
  • Log in or register to post comments
स
सतीश कुडतरकर Tue, 02/03/2015 - 07:01 नवीन
प्रस्तरारोहण याविषयी गिनिज बुक किंवा लिम्का बुक मध्ये वेगळी अशी category नाही. कारण प्रत्येक पर्वत, प्रत्येक कातळभिंत तुमच्यासमोर वेगवेगळे आव्हान उभे करते. अस म्हणतात कि आपली गुणवत्ता वाढवायची असेल तर स्पर्धा स्वतःशी करा, इतरांशी नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
व
विशाल कुलकर्णी Tue, 02/03/2015 - 07:10 नवीन
ग्रेट.. मुजरा स्वीकारा देवा _/\_
  • Log in or register to post comments
र
रोहन अजय संसारे Tue, 02/03/2015 - 08:16 नवीन
जबरदस्त - थरारक - अफाट - साहस - .........................................
  • Log in or register to post comments
ब
बाबा पाटील Tue, 02/03/2015 - 08:55 नवीन
तुम्हाला माणुस म्हणुच शकत नाही,अशक्य केवळ अशक्य.
  • Log in or register to post comments
व
वाह्यात कार्ट Tue, 02/03/2015 - 09:34 नवीन
नुसतं नळीच्या वाटेनी जायचं म्हणलं तरी जीव निघतो.. इकडे तर साक्षात कोकणकडाच अशक्यप्रायरित्या सर केलात तुम्ही. कुडतरकर गुरुजींना दंडवत _/\_
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 02/03/2015 - 09:59 नवीन
आज पुन्हा वाचुन काढला लेख .. भारावुन टाकणारे साहस.. अप्रतिम पुढील वाटचालीस शुभेच्छा
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 02/03/2015 - 11:43 नवीन
आयला वाचतानाच काटा आला अंगावर :( हॅटस ऑफ्फ
  • Log in or register to post comments
न
नितिन५८८ Tue, 02/03/2015 - 12:25 नवीन
भारावुन टाकणारे साहस.. अप्रतिम
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Tue, 02/03/2015 - 21:05 नवीन
प्रतिक्रिया द्यायलाच पाहिजे असा लेख. सगळ्या आवडलेला भाग म्हणजे इतिहासात नाव कोरलं जाण्याची पूर्ण शक्यता असूनही संघभावनेसाठी व्यक्तीने माघार घेऊन ठरलेल्या व्यक्तीला इतिहास लिहू देणं....क्या बात है! प्रस्तरारोहणारख्या प्रकारांपासून डोंगरभर लांब असलो तरी मला वाटतं तुमच्या मोहिमेचं यश ह्या संघभावनेतून आलं होतं. इस पे तो एकदम बढिया सिनेमा बनता है, बॉस!
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Fri, 02/06/2015 - 03:02 नवीन
प्रतिक्रिया द्यायलाच पाहिजे असा लेख. सगळ्यात आवडलेला भाग म्हणजे इतिहासात नाव कोरलं जाण्याची पूर्ण शक्यता असूनही संघभावनेसाठी व्यक्तीने माघार घेऊन ठरलेल्या व्यक्तीला इतिहास लिहू देणं....क्या बात है! प्रस्तरारोहणारख्या प्रकारांपासून डोंगरभर लांब असलो तरी मला वाटतं तुमच्या मोहिमेचं यश ह्या संघभावनेतून आलं होतं. +१. तुम्हा सर्वांच्या संघभावनेला सलाम! जवळजवळ दशक होत आलंय या यशस्वी पण अवघड चढाईनंतर, या मधल्या कालावधीत गिर्यारोहणाच्या तंत्रात आणि भारतातील विविध साहित्याच्या उत्पादनात किंवा उपलब्धतेत काय सुधारणा झाल्या आहेत तेही वाचायला आवडेल. ते गिर्यारोहण साहित्याच्या 'ग्लॉसरी' विषयी लिहिण्याचंही मनावर घ्या, म्हणजे माझ्यासारख्या (दुरूनच वंदन करणार्‍या :-) पण) याविषयी वाचन करू इच्छिणार्‍या मंडळींना काही उद्बोधक माहिती मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे
स
सतीश कुडतरकर Mon, 02/16/2015 - 06:51 नवीन
तुमची सूचना पुढील लिखाणात नक्कीच अमलात आणली जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी
प
पिवळा डांबिस Tue, 02/03/2015 - 21:33 नवीन
आणखी काय बोलणांच व्यर्थ आसां! काय माणसां, की वेतोबाची भुतां म्हणूची ही!!!! :)
  • Log in or register to post comments
स
सतीश कुडतरकर Wed, 02/04/2015 - 06:08 नवीन
बा म्हाराजा रवळनाथाची कृपा आसा हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस Sun, 02/08/2015 - 21:59 नवीन
अशीच कृपा रवांदे रे बाबा रवळनाथा! आमचेही हार्दिक शुभेच्छा आसंत! जियो....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतीश कुडतरकर
M
mbhosle Wed, 02/04/2015 - 06:26 नवीन
ग्रेट.
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 02/04/2015 - 06:30 नवीन
माणसं आहात की कोण! घरच्यांना सांगून गेला होतात का?? _/\_
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Wed, 02/04/2015 - 08:53 नवीन
आयला काल हा लेख कसा सुटला नजरेतुन ब्वा? कोकणकडा वरुन झोपुन पहिलाय..तिथेच फाटली होती राव...आणि हे कसं काय जमवलंत? सा ष्टांग दंडवत तुमच्या टीमल__/\__
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Wed, 02/04/2015 - 09:06 नवीन
मस्तं!!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा