कर्सिव का टचपॅड ?
फिनलंडमधील पुढील शैक्षणिक वर्षापासून, कर्सिव हस्तलिपी (cursive handwriting) हा शैक्षणिक घटक, बाद होणार असून, त्याजागी शाळांना (किबोर्ड/टचपॅड वर ) टेक-टायपिंग चा पर्याय देण्यात येणार आहे. हा बदल अमेरिकेतील काही राज्यांनी त्यांच्या शैक्षणिक 'मध्यवर्ती मूल्यात'(core-values) मधे केलेल्या बदलामागोमाग फिनलंडमध्येसुद्धा येवू घातला आहे. शैक्षणिक मंडळाने सुचवलेला हा बदल, अधिकृतपणे २०१५ च्या शरदऋतूपासून कदाचित अमलात येईल असा अंदाज आहे. 'उत्कृष्ठ टायपिंग हे राष्ट्रीय उत्पादकता कौशल्यांचा ऐक महत्वाचा घटक आहे', असा, काही शैक्षणिक मंडळांच्या सदस्यांचा विश्वास आहे. अमेरिकेमध्ये सप्टेंबर २०१३ मधे असा बदल पहिल्यांदा सुचवण्यात आलेला, आणि मग ४३ राज्यांनी (२०१४ च्या आकडेवारीनुसार) सुरुवात केलेली आहे. काहींनी याला विरोध, तर काहींनी पाठींबा दिला. काहींच्यामते 'हाताने लिहिणे महत्वाचे, त्यासाठी कर्सिवमधेच लिहिले पाहिजे हा अट्टाहास नको'. काही भाषातज्ञाच्या मते, किमान 'कागदाच्या ऐका चिटोर्यावर तुम्ही पेन्सिल/पेनाने खरडलेला मजकूर, वाचणार्याला समजायला हवा' , यामध्ये 'वाचणार्याला समजणे' हे महत्वाचे, तुम्ही ते कर्सीलिपीत लिहिता कि साध्या, हे नाही. लेखन करताना किती सुवाच्य, सुंदर, विशिष्ठ स्टाइलने लिहिता हे महत्वाचे नसून, किती स्वयंचलित सहजतेने (Automaticity) लिहू शकता याला आहे, कारण यामध्ये, लिहिण्याच्या पद्धतीपेक्षा, योग्य मेसेज लिहिण्यासाठी मेंदूची जास्त क्षमता वापरता येईल, (अक्षरी रचनेपेक्षा, संवादातील स्पष्टतेवर मेंदूची जास्त क्षमता वापरता येईल), आणि टेक-टायपिंगमुळे हे सहज साध्य करता येवू शकेल. शिवाय टेक-टायपिंग हे कर्सिव हस्तलिपीच्या तुलनेत, खूपच कमी वेळात मुलांना शिकवता येईल, आणि वय ८ वर्षापर्यंतची मुले कर्सिवलिहिण्यापेक्षा टेक-टायपिंग लवकर आत्मसात करतात. सध्याच्या युगातील उदयोन्मुख विचारानुसार शैक्षणिक संस्थांचा भर हा पुस्तकी अभ्यासक्रमाबाहेरील कौशल्यांवर (जस की सहयोग (collaboration ), धैर्य (grit), चिकाटी, संगीत, सृजनशीलता, समस्या-निराकरण) सुद्धा बराच अवलंबून आहे, आणि यामध्ये तंत्रज्ञानाची कास धरायला हवी. 'शालेयजीवनात शिकण्यासारख्या एवढ्या गोष्टी आजूबाजूला असताना, विद्यार्थ्यांच्या जीवनातील बराचसा मूल्यवान कालावधी, पानांच्या थप्प्याच्या थप्या, वह्यांची चळतच्या चळत, गिरगटवण्यात का वाया जावा', हे अनाकलनीय आहे. शेवटी संशोधनाअंती हेच सिद्ध झालंय की, मुलांना एखाद्या गोष्टीत गम्मत वाटत असेल, आवड असेल तरच ती गोष्ठ, ते उत्कृष्ठपणे शिकतात.
आता हे सर्वस्वी तुमच्या निरीक्षणावर अवलंबून आहे की, तुम्हाला मुले टचपॅड हाताळताना जास्ती आनंदी दिसतात, का कर्सिव लिहिताना !
मेंदूच्या मुलभूत विकासासाठी प्रत्यक्ष हस्तकला प्रचंड आवश्यक आहे आणि याला काहीही पर्याय असूच शकत नाही. हा मुद्दा आहे.या मुद्द्याला जीवशास्त्रिय पुरावा नाही. मानवाने वेद-उपनिषदे, इ लेखन करायला सुरुवात होण्याच्या आधी निर्माण केली आणि काही हजार वर्षे केवळ पाठांतर/मौखीक पद्धती वापरून भूर्जपत्रांवर लिहीण्याची प्रथा येईपर्यंत बर्याचश्या प्रमाणात सुव्यवस्थित ठेवली. शिकताना आपण वारंवार वापरलेल्या गोष्टी/पद्धती सहाजिकपणे नंतर आपल्या अंगवळणी पडतात, सोप्या वाटतात आणि त्यांच्याशी आपली जवळीक निर्माण होते. अश्या रितीने निर्माण झालेल्या पूर्वग्रहावर मात करून, केवळ नविन गोष्टींकडेच नाविन्याने/अलिप्तपणे पाहणे नाही तर परिचयाच्या गोष्टींकडेही तसेच पाहणे, हे आपले शिक्षण/प्रगती पुढे चालू राहण्यासाठी आवश्यक असते... यालाच "आऊट ऑफ बॉक्स" विचार करणे म्हणतात.