Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कर्सिव का टचपॅड ?

प
पगला गजोधर
Tue, 02/03/2015 - 13:36
🗣 60 प्रतिसाद
फिनलंडमधील पुढील शैक्षणिक वर्षापासून, कर्सिव हस्तलिपी (cursive handwriting) हा शैक्षणिक घटक, बाद होणार असून, त्याजागी शाळांना (किबोर्ड/टचपॅड वर ) टेक-टायपिंग चा पर्याय देण्यात येणार आहे. हा बदल अमेरिकेतील काही राज्यांनी त्यांच्या शैक्षणिक 'मध्यवर्ती मूल्यात'(core-values) मधे केलेल्या बदलामागोमाग फिनलंडमध्येसुद्धा येवू घातला आहे. शैक्षणिक मंडळाने सुचवलेला हा बदल, अधिकृतपणे २०१५ च्या शरदऋतूपासून कदाचित अमलात येईल असा अंदाज आहे. 'उत्कृष्ठ टायपिंग हे राष्ट्रीय उत्पादकता कौशल्यांचा ऐक महत्वाचा घटक आहे', असा, काही शैक्षणिक मंडळांच्या सदस्यांचा विश्वास आहे. अमेरिकेमध्ये सप्टेंबर २०१३ मधे असा बदल पहिल्यांदा सुचवण्यात आलेला, आणि मग ४३ राज्यांनी (२०१४ च्या आकडेवारीनुसार) सुरुवात केलेली आहे. काहींनी याला विरोध, तर काहींनी पाठींबा दिला. काहींच्यामते 'हाताने लिहिणे महत्वाचे, त्यासाठी कर्सिवमधेच लिहिले पाहिजे हा अट्टाहास नको'. काही भाषातज्ञाच्या मते, किमान 'कागदाच्या ऐका चिटोर्यावर तुम्ही पेन्सिल/पेनाने खरडलेला मजकूर, वाचणार्याला समजायला हवा' , यामध्ये 'वाचणार्याला समजणे' हे महत्वाचे, तुम्ही ते कर्सीलिपीत लिहिता कि साध्या, हे नाही. लेखन करताना किती सुवाच्य, सुंदर, विशिष्ठ स्टाइलने लिहिता हे महत्वाचे नसून, किती स्वयंचलित सहजतेने (Automaticity) लिहू शकता याला आहे, कारण यामध्ये, लिहिण्याच्या पद्धतीपेक्षा, योग्य मेसेज लिहिण्यासाठी मेंदूची जास्त क्षमता वापरता येईल, (अक्षरी रचनेपेक्षा, संवादातील स्पष्टतेवर मेंदूची जास्त क्षमता वापरता येईल), आणि टेक-टायपिंगमुळे हे सहज साध्य करता येवू शकेल. शिवाय टेक-टायपिंग हे कर्सिव हस्तलिपीच्या तुलनेत, खूपच कमी वेळात मुलांना शिकवता येईल, आणि वय ८ वर्षापर्यंतची मुले कर्सिवलिहिण्यापेक्षा टेक-टायपिंग लवकर आत्मसात करतात. सध्याच्या युगातील उदयोन्मुख विचारानुसार शैक्षणिक संस्थांचा भर हा पुस्तकी अभ्यासक्रमाबाहेरील कौशल्यांवर (जस की सहयोग (collaboration ), धैर्य (grit), चिकाटी, संगीत, सृजनशीलता, समस्या-निराकरण) सुद्धा बराच अवलंबून आहे, आणि यामध्ये तंत्रज्ञानाची कास धरायला हवी. 'शालेयजीवनात शिकण्यासारख्या एवढ्या गोष्टी आजूबाजूला असताना, विद्यार्थ्यांच्या जीवनातील बराचसा मूल्यवान कालावधी, पानांच्या थप्प्याच्या थप्या, वह्यांची चळतच्या चळत, गिरगटवण्यात का वाया जावा', हे अनाकलनीय आहे. शेवटी संशोधनाअंती हेच सिद्ध झालंय की, मुलांना एखाद्या गोष्टीत गम्मत वाटत असेल, आवड असेल तरच ती गोष्ठ, ते उत्कृष्ठपणे शिकतात. आता हे सर्वस्वी तुमच्या निरीक्षणावर अवलंबून आहे की, तुम्हाला मुले टचपॅड हाताळताना जास्ती आनंदी दिसतात, का कर्सिव लिहिताना !

प्रतिक्रिया द्या
12582 वाचन

💬 प्रतिसाद (60)
आ
आदूबाळ Tue, 02/03/2015 - 13:52 नवीन
अतिशय स्वागतार्ह निर्णय! हाताने लिहिणे ही काही काळाने कला म्हणून उरेल. त्यावर "टॅबच्या युगात आता हाताने लिहायला विसरलोय" वगैरे वॉट्सॅपी गळेही काढले जातील.
  • Log in or register to post comments
ग
गजानन५९ Tue, 02/03/2015 - 14:08 नवीन
<<<<<हाताने लिहिणे ही काही काळाने कला म्हणून उरेल. त्यावर "टॅबच्या युगात आता हाताने लिहायला विसरलोय" वगैरे वॉट्सॅपी गळेही काढले जातील.>>>> बरर्र मग ?
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 02/03/2015 - 14:17 नवीन
काय बोलावं हे कळेनासं झालय. जेंव्हा माझ्या मुलाला कर्सिव्ह लेखन सुरु झालं तेंव्हा लगेच बंद केलं गेलं व शाळेकडून आयप्याडस दिली गेली. पालक आनंदले. आम्ही विरोध करायचा केलेला प्रयत्न हा प्रयत्नच राहिला. तोपर्यंत माझ्या मुलाचे अक्षर व लेखनातला नेटकेपणा हा गुण होता पण त्या मेल्या आयप्याडने हस्ताक्क्षराचा व नेटकेपणाचा विषय निकालात काढला. स्पेलिंग चुका आपोआप दुरुस्त होऊ लागल्या, खाडाखोड दिसेनाशी झाली, क्याल्क्यूलेटरने गणिते पटापट होऊन मुलगा त्याच यंत्रावर कुठले तरी शोज पाहू लागला. नंतर हाताने करण्याच्या प्रोजेक्टला कसेतरी पूर्ण करणे एवढेच उरले. त्याच्या आकृत्यांमधील सुबकपणा निघून गेल्यावरही जेंव्हा शिक्क्षिकाबाईंनी पूर्ण गुण दिले त्यावेळी त्यांना भेटून अस्वछ कामाचे सगळे गुण दिल्याचे लक्षात आणून दिले. त्यावर टेक्निकली तो बरोबर आहे व आम्ही या कामाला स्वच्छ म्हणतो असा मलाच धक्का दिला. मुलगा कार्सिव्ह लिहिताना आनंदी दिसायचा पण आयप्याडमुळे जास्त आनंदी दिसतोय हे पालकांना खटकू शकते ...........मला खटकते. आता दुसर्या शाळेत आयप्याड अजिबात वापरू देत नाहीत आणि याचे हस्ताक्षर किंचितच सुधारले आहे. लहानपणी त्याच्या हस्ताक्षरावर व आकृती काढण्यातील नीटनेटकेपणावर माझ्या वडिलांनी मेहनत घेतली होती. त्याचे पुरेसे फळ मिळाले नसल्याचे मला वाटते. मुले हे असले टायपिंगचे लेखन लवकर आत्मसात न करायला काय झालं? असतं काय त्यात? कमी केलेले कष्ट कोणाला नकोयत? अक्षर हा विषय आता बोलायचाच नाही, त्याने मने दुखावून डोळ्यात महापूर यायचे. फक्त एवढेच झालेय की आम्ही काही बोललो नाही की मुद्दाम अक्षर बरे काढायचे व कागद आम्हाला दिसेलसा ठेवत असे. कौतुक कोणाला नको असते? ;) आणि कमी वेळात भाराभार गोष्टी शिकवण्यापेक्षा चांगल्या गोष्टी जास्तवेळ शिकवा ना! असो, आता काही ए बी सी डीचे वय नाही त्याचे, पण जेंव्हा होते त्यावेळचे आठवले. असले वेगळाले शोध लागणे, पूर्वीचे निकालात निघणे हे चालू राहते. आपले मूल ज्या लाटेत सापडेल तसे होत जाते. मुलाच्या मित्राच्या शाळेत यावर्षी पारंपारिक गणित हा प्रकार बंद करून सिंगापूर म्याथ पद्धती सुरु केलीये. नेहमीच्या पद्धतीत व सिंगापुरी पद्धतीत काय फरक आहे हे मला माहित नाही पण तो मित्र रशियन म्याथच्या वर्गाला जात असे. आता त्याची आई म्हणते की नुसते उत्तर बरोबर आल्याने गुण मिळत नाहीत तर सिंगापुरी पद्धतीला महत्व आहे. मग त्यांनी त्याला त्या गणिताच्या क्लासला घातले. काही वर्षांनी ते रशियन पद्धत सुरु करणार नाहीत कशावरून?
  • Log in or register to post comments
अ
असंका Tue, 02/03/2015 - 14:28 नवीन
काळाबरोबर चालायला काहीच हरकत नाही. सुंदर हस्ताक्षर हे कला म्हणून कधीही जोपासता येइल. त्याला वयाची काहीच अट नसावी. बोरू जसा आपण मागे सोडला, तसाच पेनही मागे सोडायला लागेल....
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 02/03/2015 - 14:41 नवीन
हस्ताक्षर हे लहानपणी चांगले शिकता येईल असे मला वाटते. माझ्या लहानपणी किबोर्डस नव्हते तरी नंतर ते वापरता आले पण आता हस्ताक्षर चांगले होण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतील. शिवाय नुसते हस्ताक्षर हा एकच मुद्दा नसतो. त्याबरोबर अनेक गोष्टी साध्य होत असतात. व्यवस्थितपणाची सवय लागणे हेही महत्वाचे. एखादी गोष्ट कशीही करून संपवून टाकताना आपले मन आपल्याला ती व्यवस्थितपणे करण्यास बजावते. बोरु मागे सोडला तरी त्याच्याशी समानता दाखवणारे शाईचे पेन वापरून ज्यांचे अक्षर सुधारले असे अनेक आहेत. वळणदार अक्षर आणि स्पष्ट विचारशक्ती, व्होक्याब्युलरी यांचा परस्पर संबंध दर्शवणारे लेखन एकदा वाचले होते. अर्थात ते एकच मत असावे असे नाही पण चांगल्या गोष्टी काळाच्या ओघात मागे पडल्या तरी दुसर्‍या कोणत्या दर्जाच्या गोष्टी ती जागा भरून काढतात हेही बघणे महत्वाचे ठरावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
स
सूड Tue, 02/03/2015 - 15:36 नवीन
>>व्यवस्थितपणाची सवय लागणे हेही महत्वाचे. एखादी गोष्ट कशीही करून संपवून टाकताना आपले मन आपल्याला ती व्यवस्थितपणे करण्यास बजावते. बोरु मागे सोडला तरी त्याच्याशी समानता दाखवणारे शाईचे पेन वापरून ज्यांचे अक्षर सुधारले असे अनेक आहेत.
+१.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
अ
असंका Tue, 02/03/2015 - 17:11 नवीन
(नुसते शाई पेन नाही, त्याला कट निब असल्याशिवाय आपण अगदी योग्य अशा पद्धतीने मराठी लिपी लिहूच शकणार नाही.) वरचा लेख वाचा तरी.... जेव्हा हाताने लिहायला पर्याय नव्हता तेव्हा सुंदर हस्ताक्षर ही महत्त्वाची गरज होती. पण आता असा पर्याय उपलब्ध आहे. वर हा पर्याय वापरल्याने, मेंदू अधिक कार्यक्षमतेने मजकूरावर काम करू शकतो हेही दाखवून दिलेले आहे. कुठलीही कला शिकायला वय हा कधीच अडथळा नसतो- अपवाद बहुधा असे खेळ जिथे लहान वयातच स्पर्धा होणं शक्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
व
वगिश Tue, 02/03/2015 - 18:31 नवीन
व्यवस्थितपणा हा संगनकीय लिखानात ही महत्वाचा आहे. डॉक्यूमेंटेशन कला हा अनेक क्षेत्रातील महत्वाचा घटक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
प
पगला गजोधर Wed, 02/04/2015 - 07:45 नवीन
एकदम बरोबर, टेक-टायपिंगमधे मजकूर अतिशय स्वच्छ आणि स्पष्ट दिसतो. त्यात, खाडाखोड टाळून, हवा तेव्हा आणि हवा तसा बदल करणे शक्य आहे. त्यामुळेच हस्त लिखाणापेक्षा मजकूर टाइप करण्याचे प्रमाण वाढतच जाणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वगिश
व
वेल्लाभट Wed, 02/04/2015 - 07:12 नवीन
पेन हे नपुसकलिंगी नाम असून 'ते पेन' असतं. तो पेन नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
अ
असंका Wed, 02/04/2015 - 07:28 नवीन
होय....पण मग त्याचं काय? चुकलंय का माझं कुठे लिहिताना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
व
वेल्लाभट Wed, 02/04/2015 - 07:40 नवीन
बोरू जसा आपण मागे सोडला, तसाच पेनही मागे सोडायला लागेल....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
श
श्रीरंग_जोशी Wed, 02/04/2015 - 16:34 नवीन
ते पेन असे काही ठिकाणच्या बोलीभाषेत म्हंटले जाते. तो पेन, ती पेन्सिल हे देखील बर्‍याच ठिकाणी बोलले जाते. कुठलेही एक 'चुकीचेच' असा आग्रह करणे बरोबर नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
व
वेल्लाभट गुरुवार, 02/05/2015 - 07:57 नवीन
'मला वाटतं' म्हणून हे बरोबर असं नाही म्हटलंय मी ! व्याकरण दृष्ट्या जे बरोबर आहे ते आहे; त्यात आग्रह कसला आला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
ब
बॅटमॅन गुरुवार, 02/05/2015 - 08:02 नवीन
निर्जीव गोष्टींना लिंगप्रत्यय लावण्याची मराठी भाषेची जी लकब आहे त्यात नियम असे नाहीत. त्यामुळे तो पेन, ती पेन आणि ते पेन हे सर्वच व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे. प्रमाण बोली आणि व्याकरणशुद्ध बोली हे दोन्ही एकच नव्हेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
न
नाखु गुरुवार, 02/05/2015 - 09:20 नवीन
"पेन" फूल चर्चा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 02/05/2015 - 14:34 नवीन
कोटिच्या कोटि उड्डाणे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
क
कंजूस Tue, 02/03/2015 - 15:20 नवीन
जे जे सोपं आणि उपयोगी ते सुंदर असते . रेवती यांचं बरोबर आहे.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Tue, 02/03/2015 - 15:23 नवीन
माणूस शेपटी वापरायची विसरला, अन येणाऱ्या पिढीतून शेपटी झाडून गेली, आजकाल माणूस लिहिणे विसरू लागलाय. त्याला लिहिण्यापेक्षा मोबाइल अथवा कम्प्युटरवर टायपिंग करणे सोपे आणि सवयीचे होत असल्याचा निष्कर्ष, अनेक लोकांची पाहणी करुन संशोधकांनी काढला आहे. लोक हाताने कमी लिखाण करतात त्यामुळेच कागद पेन्सिल आणि पेनच्या मागणीत लक्षणीय घट होत आहे. कागदावर लिहिण्यापेक्षा टायपिंग करणे लोकांना अंगवळणी पडले आहे. मजकूर अतिशय स्वच्छ आणि स्पष्ट दिसतो. त्यात हवा तेव्हा आणि हवा तसा बदल करणे शक्य आहे. त्यामुळेच लिखाणापेक्षा मजकूर टाइप करण्याचे प्रमाण वाढत आहे. एकमेकांना महत्त्वाचे निरोप देण्यासाठी मेसेजिंग, चॅटिंग अथवा मेलिंग करणे खूपच सोयीचे आणि व्यवहार्य होऊ लागल्यामुळे लिखाणापेक्षा, टाइप करुनच संदेशांची देवाणघेवाणचे प्रमाण वाढत आहे. हे प्रमाण भविष्यात आणखी वाढेल, असा दावा संशोधक करत आहेत. संशोधक सांगतात, त्यांच्या पाहणीनुसार, बहुसंख्य व्यक्ती ४१ दिवसांत एकदाच कागदावर लिखाण करतात. दर तीन पैकी एक व्यक्ती सहा महिन्यांत एकदाच कागदावर लिखाण करतात. चॅटिंग, इ-मेल, एसएमएस आणि एमएमएसच्या आजच्या युगात कागदावर पत्र लिहिणे दुर्मिळ झाले आहे.
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 02/03/2015 - 15:39 नवीन
कर्सिव्ह लिहा की आणि कसं, हस्ताक्षर सुवाच्य असणं महत्त्वाचं!! टाईप करायला केव्हाही शिकता येईल त्यात काय विशेष आहे. आणि हस्ताक्षर वळणदार व्हावं म्हणून वाया जाणार्‍या पानांच्या गठ्ठ्यांची कारणं दिली जात असतील तर हल्ली व्हाईटबोर्ड पाट्या मिळतात. त्यावर सराव करायला काहीच हरकत नसावी.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Tue, 02/03/2015 - 15:47 नवीन
(ह. घ्या. पीजे केला आहे.) वळणदार हस्ताक्षराने, काय नंबरप्लेटा रंगवायच्या का आता ? (रच्याकने त्यासुद्धा स्टीकर वापरून देतात आजकाल)
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 02/03/2015 - 15:49 नवीन
>>वळणदार हस्ताक्षराने, काय नंबरप्लेटा रंगवायच्या का आता ?
हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
स
संदीप डांगे Tue, 02/03/2015 - 17:10 नवीन
अक्षरी रचनेपेक्षा, संवादातील स्पष्टतेवर मेंदूची जास्त क्षमता वापरता येईल
मानवी मेंदूला संगणकाच्या मर्यादित मेमरीप्रमाणे समजणे व वागवणे हा प्रचंड मूर्खपणाचा कळस आहे. वाचणाऱ्याला समजले पाहिजे हा मुद्दा महत्वाचा असला तरी लिहिणाऱ्याने काय आणि कसे लिहिले पाहिजे हेसुद्धा महत्वाचे आहे. लेखन सोपे करण्याच्या संगणकीय पद्धती चांगल्याच आहेत, पण मुळात चांगले लिहायचे कसे याची जाण असल्याशिवाय हे सर्व व्यर्थ आहे. हस्ताक्षरात लिहिण्याच्या क्रियेला हमाली किंवा गरज नसलेलं काम समजणे म्हणजे व्यायामशाळेत जाउन वजनं उचलणे हे हमाली आहे असे म्हणण्यासारखे आहे. तंत्रज्ञान कितीही पुढे गेले तरी काही शारीरिक क्रियांचा मानसिक परिणाम आपण नाकारू शकत नाही. उद्या मनातले प्रत्यक्ष स्क्रीनवर उमटायला लागेल किंवा त्याच्याही पुढे जाउन याच्या मनातले सरळ त्याच्या मनात उमटायला लागेल तेंव्हाही हाताने लिहिण्याची कला जोपासणे महत्वाचे आहे. हाताने लिहिण्याने विचारांमध्ये सुसंगता, दिशा आणि स्पष्टता येते. आयपॅड वरील मशिनी लिखाणाची सवय अगदी सुरुवात पासून लागली तर हे फायदे हरवण्याची शक्यता आहे. आमचे जेजे चे आदरणीय सुलेखनकार आणि प्राध्यापक श्री क्षीरसागर सर यांनी एका व्याख्यानात भारतीय लिपी आणि त्यांचा बौद्धिक रित्या होणारा प्रभाव फार सुरेख सांगितला होता. हाताने लिहिण्याच्या क्रियेने लहान वयात मेंदूवर सकारात्मक परिणाम होतात. पण ते काम "काम" म्हणून न करता आनंद म्हणून केले तरच त्याचा फायदा होतो. आपल्या भारतीय लिपीच्या अभ्यासाचा आणि संगणकक्षेत्रात भारतीय मुलांनी केलेल्या उल्लेखनीय कामाचा त्यांनी सुरेख असा संबंध सांगितला. भारतीय लिपी अभ्यासल्याने लॉजिक मजबूत होते असे त्यांचे मत आहे. बऱ्याचदा पूर्वसुरींनी काही एक अभ्यास करून एखादे कर्म सांगितले असते, कालौघात त्याच्यामागचा शास्त्रीय विचार मागे पडतो आणि मग त्या कर्माला कालबाह्य म्हटले जाते. असाच काहीसा प्रकार हस्तलेखनाच्या बाबतीत होऊ लागला आहे. स्वत:च दुरुस्त होणारे शब्द, सुचवल्या जाणारे शब्द व इतर सोयी ह्या निव्वळ व्यावसायिक पातळीवर अतिशय उपयुक्त आहेत पण म्हणून शालेय जीवनापासून त्याचीच सवय करणे भविष्यासाठी घातक ठरू शकते. मी जेजे ला असताना कलाक्षेत्रात नुकताच संगणकीय वापर वाढला होता. प्रथमवर्षात अक्षरश: घाम फोडेल असा अभ्यासक्रम असतो. अगणित असाइनमेंट असायच्या ज्या हातानेच रंगवून काढायच्या असायच्या. त्यातली अक्षरे विविध फोन्ट प्रमाणे स्वतः गिरवावी लागत. आम्ही विद्यार्थी पार वैतागायचो. अरे हे तर संगणकावर आता उपलब्ध आहे ना मग आम्हाला कशाला हमाली करायला लावतात. जुनाट सरकारी पद्धतींना, अभ्यासक्रमाला तेंव्हा फार तळतळाट दिले. पण पुढे त्याचे महत्व कळले. रेखाटन डोक्याने करायचे असते संगणक एक माध्यम आहे. ते काम सोपे करते. पण काम कसे करायचे हे हाताने केल्याशिवाय मेंदूत उतरत नाही. मेंदूमध्ये एक विशिष्ट जडणघडण होते ती पेन्सिल, ब्रश घेऊन काम केल्याने. मेंदूच्या मुलभूत विकासासाठी प्रत्यक्ष हस्तकला प्रचंड आवश्यक आहे आणि याला काहीही पर्याय असूच शकत नाही.
  • Log in or register to post comments
अ
असंका Tue, 02/03/2015 - 17:15 नवीन
या न्यायाने निरक्षर माणसांच्या मेंदूचा मूलभुत विकास झालेलाच नसतो असा निष्कर्श अगदी सहज काढता येइल....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 02/03/2015 - 17:26 नवीन
असा निष्कर्ष काढत असाल तर मग काहीच शिकायची गरज उरत नाही. सगळे उपजतच असते म्हटले कि झाले. डॉक्टरांनी प्रत्यक्ष रुग्ण तपासून औषध देण्याऐवजी फक्त संगणकीय रिपोर्ट बघून उपचार करावेत. मेंदूच्या मुलभूत विकासासाठी प्रत्यक्ष हस्तकला प्रचंड आवश्यक आहे आणि याला काहीही पर्याय असूच शकत नाही. हा मुद्दा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
अ
असंका Tue, 02/03/2015 - 17:48 नवीन
आपल्या लक्षात नाही आलं...ते वरचं माझं मत नाही. जर आपलं म्हणणं योग्य असेल, तर त्याचे कसे अर्थ निघू शकतात हे सांगायचा प्रयत्न होता. ते वाक्य चूक आहे हे मला माहितच होतं. आपण जे लिहित आहात ते आपले मत आहे. त्याला काहीही आधार नाही. हे दाखवून देण्यासाठी मी निरक्षर माणसाचं उदाहरण दिलं होतं. जर आपण म्हणता ते सत्य असेल, तर निरक्षर माणसाच्या मेंदूचा मुलभूत विकास व्हायलाच नको. पण तसे काही आपल्या आसपास आढळून येत नाही. कसलीही अक्षर ओळख नसलेली पण अत्यंत तल्लख मेंदू असलेली अनेक माणसे या जगात होऊन गेलेली आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 02/03/2015 - 19:20 नवीन
तुम्ही अपवादाला नियम म्हणत आहात. हे तुमच्या लक्षात नाही आलं. माझं मत तुमच्या मताशी सुसंगत नाही म्हणून तेवढ्यासाठी त्याला काहीही आधार नाही असे तुम्ही म्हणत आहात. तेव्हा एकंदर शिक्षण पद्धतीबद्दल आपले विचार जाणून घ्यायला आवडेल. शिक्षित समाज आणि अशिक्षित समाज यांच्यामध्ये मुलभूत फरक असतोच. तो शिक्षण घेतल्यामुळेच येतो याबाबत आपले काही वेगळे मत नसावे. शिक्षणामुळे आमुलाग्र बदलेली माणसेही या जगात होऊन गेली आहेत. त्यांची संख्या निरक्षर हुशार माणसांपेक्षा हजारो पटीने जास्त आहे. माझे मत हे काही अभ्यासांती झालेले आहे त्यामुळे माझ्या मताला काहीही आधार नाही असे तुम्ही म्हणू शकत नाही. तुम्हाला मुद्दा समजला नसेल तर परत एकदा सांगतो: एखादी संकल्पना वापरणे यासाठी फारशी बुद्धी लागत नाही. बुद्धी लागते ती संकल्पना निर्माण करण्यात. मुलभूत माहिती नसेल तर नवीन संकल्पना निर्माण करता येणार नाहीत किंवा असलेल्या वापरता येणार नाही. मेंदूचा विकास हा त्या मुलभूत संकल्पना शिकून घेतल्याने होतो. तयार संकल्पना वापरल्याने नव्हे. उदा: आमच्या क्षेत्रात आजकाल एखादा संगणकाचा जलद अभ्यासक्रम करून स्वत:ला ग्राफिक डिझायनर म्हणवून घेणारे बरेच येत आहेत. जाहिरात किंवा चित्र कलेच्या मुलभूत संकल्पना आत्मसात असल्याशिवाय हे अर्धवट वीर पुढे जाऊच शकत नाहीत. ६ ते ७ वर्षे हस्तचित्र ते संगणकीय चित्र असा प्रवास केलेल्या विद्यार्थ्यांसमोर हे ६ महिने संगणकाचा कोर्स केलेले टिकूच शकत नाहीत. त्यांना भले संगणकाचे परिपूर्ण ज्ञान असेल पण आमच्या लेखी ते निरक्षरच कारण त्यांना कलेचे मुलभूत ज्ञान नसते. याउलट एखादा संगणक निरक्षर पण कलाप्रवीण खूप पुढे जाऊ शकतो. पण त्यासाठी डोक्यातले विचार हाताने रेखाटण्याची कला आली पाहिजे. ग्राफिक डिझाईन म्हणजे संगणक वापरून काढायचे चित्र अशी ज्यांची समजूत आहे त्यांनाच आयपॅड असल्यावर हस्तलेखनाची काय गरज असे वाटू शकते. बाकी तुम्ही काही वेगळ्याच अर्थाने काही निष्कर्ष काढत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे. तुमच्या आयडी वरून असे वाटते कि तुम्ही अकाउण्ट मध्ये असाल. तर तुम्हाला माझा एक प्रश्न आहे, आजकाल संगणक वापरून ताळेबंद ठेवता येतो म्हणून माझ्यासारख्या ताळेबंद-निरक्षराला माझी अफाट तल्लख बुद्धी वापरून तो वापरता येईल का? त्यासाठी अकाउण्टच्या काही मुलभूत गोष्टी शिकणे अजिबात आवश्यक नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
अ
असंका Wed, 02/04/2015 - 06:22 नवीन
साक्षर निरक्षर वाद आलाच कुठून? उदाहरण एवढे ताणायचे नसते..... अक्षर ओळख ही कल्पना आणि आपल्या मनातले विचार समोरच्यापर्यंत पोचवणे यासाठी आवश्यक असलेले लेखन एवढे मुलभूत ज्ञान पुरेसे आहे. लिखाण हे माध्यम आहे.ते कशा पद्धतीने साध्य केले जाते याने काय फरक पडतो? हाताने लिहा किंवा टाइप करा? एकदा अक्षर ओळख झाली की फक्त हाताने न लिहिता टाइप केले तर हे मुलभूत ज्ञान मुलभूत न रहाता वरवरचे होते का? केवळ हाताने पेन वापरून लिहू शकलो तरच आपल्याला मुल्भूत ज्ञान आहे असे म्हणता येइल का? जास्ती कष्ट घेणे म्हणजे मूलभुत ज्ञानाची हमी झाली का? (आपण आठ वर्षे वयापर्यंतच्या मुलांबद्द्ल बोलत आहोत...उच्चशिक्षणाबद्द्ल नाही. प्रत्येक प्रकारच्या उच्च शिक्षणासाठी लागणार्‍या मुल्भूत गोष्टी वेगवेगळ्या असतात. मला कधीही कुणीही हस्ताक्षराबद्द्ल अवाक्षर विचारले नाही. पण क्लास लावून शिकलेल्या टायपिंगचा मला आजही फायदा होतो.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
न
नया है वह Mon, 04/20/2015 - 13:10 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
प
पगला गजोधर Wed, 02/04/2015 - 07:55 नवीन
पण निरक्षर मानवजातीनेच हस्तलिखाणाचा शोध लावला नं ? म्हणजेच त्यांच्या (हस्तलिखाण आधीच्या)मेंदूचा मुलभूत विकास, झालेला नं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
श
श्रीरंग_जोशी Tue, 02/03/2015 - 17:16 नवीन
(हस्त) लेखनकौशल्य हे कमी महत्वाचे समजले जाऊ नये असे वाटते. बाकी काळाच्या महिम्यापुढे आपण फारसे काही करू शकत नसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
व
वगिश Tue, 02/03/2015 - 18:12 नवीन
कातळ, भुर्जपत्रेे,कागद अन आता संगणक. काही काळातच टचपॅड वर स्व-हस्ताक्षरात लिहिने ही नेहमीचे हाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
सुबोध खरे Wed, 02/04/2015 - 05:34 नवीन
@ डांगे साहेब "मेंदूच्या मुलभूत विकासासाठी प्रत्यक्ष हस्तकला प्रचंड आवश्यक आहे आणि याला काहीही पर्याय असूच शकत नाही." असहमत. जन्मजात हात नसलेल्या माणसाचा मेंदू अविकसित असतो याला कोणताही शास्त्राधार नाही. फारतर हाताचे स्नायुंची वाढ आणि विकास चांगला होण्यासाठी हाताने लिहिणे आवश्यक असेल. परंतु कोणतीही लिपी लिहू न शकणारा सोनार किंवा घड्याळजी याच्या स्नायूंचा विकासहि तितकाच उत्तम होतो. निरक्षर माणसेसुद्धा उत्तम चित्रकार असतात. किंबहुना एका शतकापूर्वी गावोगावी उत्सवात असे रंगकाम चित्रकला करणारे हे अशिक्षीतच असत. "हाताने लिहिण्याने विचारांमध्ये सुसंगता, दिशा आणि स्पष्टता येते".असे नसून आपण जो विचार करता आहात त्याच्यात सुसूत्रता येण्यासाठी आपण अगोदर काय लिहिले आहे त्याचा मेंदूला परत आढावा घेता ( visual feedback) आल्यामुळे तसे होते. हि क्रिया संगणकावर लिह्ल्यामुळेसुद्धा होत असतेच. ज्या माणसाची भाषिक मौखीक बुद्धिमत्ता चांगली असते त्याला एकटाकी असे उत्तम लिहिता येते कारण वरील म्हटल्याप्रमाणे visual feedback ची गरज त्याला भासत नाही. मुळात बुद्धिमत्तेचे ९ प्रकार सांगितले आहेत. आपण फक्त एकच आहे असे गृहीत धरतो. सर्वसामान्यपणे तार्किक आणि गणिती(logical-mathematical) बुद्धिमत्ता असलेल्याला बुद्धिमान समजले जात असे.( म्हणजे गणितात हुशार तोच मुलगा हुशार)परंतु जसे जसे संशोधन होत आहे तसे तसे बुद्धिमत्तेचे प्रकार समजून येत आहेत. आपण जर खालील दुव्यावर नजर टाकलीत तर आपल्याला तसे लक्षात येईल. http://en.wikipedia.org/wiki/Theory_of_multiple_intelligences उलट जगभरातील इतिहास हेच सांगत आला आहे कि इंटर/इंट्रा पर्सनल बुद्धिमत्ता असलेले लोक नेते/राजकारणी होऊन गणिती बुद्धिमत्तेच्या लोकांना आपले नोकर म्हणून वागवत आले आहेत. आपल्या सरांनी जे सांगितले आहे ते (visual spatial) दृष्टी आणि त्रिमित बुद्धिमत्तेच्या लोकांना आवश्यक असावे(असे मी म्हणतो आहे कारण मला त्यांनी नक्की काय म्हटले आहे ते माहित नाही/ कळले नसावे). हि बुद्धिमत्ता असलेल्या लोकांना ( उदा चित्रकार, शिल्पकार) नजरेत मावत नसलेल्या गोष्टी उत्तम रित्या दृष्टीक्षेपात येऊ शकतात आणि त्याची निर्मिती करता येते. उदा रस्त्यावर १२ क्ष १२ फुटाचे हनुमान किंवा शंकराचे चित्र काढणारा पासून वेरूळ च्या कैलास लेणी एका प्रचंड शिलाखण्डातून खोदून काढणारे शिल्पकार. मेंदूच्या विकासाला हाताने लिहिण्याची गरज आहे हे मान्य करणे कठीण आहे. अर्थात आपण याबद्दल अधिक काही माहिती दिलीत तर मी माझे मत बदलण्यास तयार आहे. ता. क. -- बुद्धिमत्तेचे प्रकार हा विषय अतिशय गहन असून मला तो थोडासा सुद्धा समजला आहे असा माझा दावा नाही. परंतु हा विषय अतिशय रसभरीत आहे आणि जितके वाचावे तितके आपल्या आजूबाजूच्या वातावरणा बद्दल आणि माणसांबद्दल समज येण्यास मदत होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
न
नया है वह Mon, 04/20/2015 - 13:14 नवीन
१००% सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
पैसा Tue, 02/03/2015 - 17:23 नवीन
मी शाळेत असताना आम्हाला कर्सिव्ह रायटिंग शिकवले होते. पण त्याने अक्षर बिघडते, त्यामुळे सरळ साधी लिपी वापरा असे शिक्षक लोक स्पष्ट सांगत. मला रनिंग लिपीमधे लिहिलेले अक्षर कधीच सुंदर वाटले नाही. मराठी मोडी आणि बालबोध अक्षरांमधे सौंदर्यात जो फरक दिसतो, तसाच इंग्रजीच्या साध्या आणि कर्सिव्ह लिप्यांमधे दिसतो. खरे तर रनिंग लिपीमधे जास्त फास्ट लिहिता येते ही गोष्टही कधी पटली नाही.
  • Log in or register to post comments
क
काकाकाकू Tue, 02/03/2015 - 18:10 नवीन
पुर्वी संगीत नाटके रात्र रात्र चालत असत....आता ३ तास चालली किंवा चालली तरी खुप.....सध्यातरी वेगाने कमी होत जाणारी झाडे पहाता....लिहिण्याऐवजी वेगवेगळी साधनेच वापरली जातील भविष्य़़काळात....कागद बनवण्यासाठी झाडेच उरणार नाहित.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 02/03/2015 - 19:26 नवीन
इथे हस्तलेखन आणि टंकनाची तुलना चालू आहे. पण जग "हँडरायटिंग टू टेक्स्ट / हँडरायटिंग रिकग्निशन" च्याही पुढच्या पायरीवर पोचत आहे. सद्या बोलणे अचूकपणे लेखनात परावर्तीत (स्पीच टू टेक्स्ट) करणारी उत्तम अ‍ॅप्स तयार झाली आहेत/होत आहेत. ती जास्त जास्त अचूक होऊ लागली आहेत आणि वापरात येऊ लागली आहेत. माझा स्वतःचा अनुभव असा आहे की काही सुचू लागले तर हाताने कागदावर लिहिणे (जे मी टंकनापेक्षा जास्त वेगाने करतो) बर्‍याचदा माझ्या मनात तयार होणार्‍या वाक्यांच्या वेगाशी बरोबरी राखू शकत नाही. मग मुद्दे विसरू नये अथवा विचारशृंखला तुटू नये म्हणून मी फक्त मुद्दे क्रमाने कागदावर खरडत जातो आणि लिखाणाचा एखादा तर्कसंगत तुकडा पुरा झाला की परत मागे येऊन वाक्यरचना करतो. माझ्यासारख्या लोकांसाठी "स्पीच टू टेक्स्ट" अ‍ॅप्स वरदान आहेत. बोलणे साठवून ठेऊन (डिक्टेशन) नंतर ते ऐकून टंकणे हे फक्त कार्यालयीन कामासाठी सेक्रेटरी असते तेव्हा ठीक आहे. कारण खाजगी कामाला टंकनिका परवडत नाही आणि स्वतः टंकावे तर माझ्या मंद टंकनगतीमुळे प्रचंड कंटाळवाणे वाटते ! त्यापेक्षा स्पीच टू टेक्स्ट अ‍ॅप वापरून नंतर त्यामधे जरूर त्या सुधारणा करणे कितीतरी जास्त सोपे आहे *. तंत्रज्ञान सतत नविन सुविधा निर्माण करतच राहणार आहे. त्यातील ज्या जुन्या सुविधांपेक्षा जास्त सोईच्या/आकर्षक वाटतील त्यांना लोक स्विकारत जातील आणि ज्या तशा वाटणार नाहीत त्या तंत्रदृष्ट्या कितीही पुढारलेल्या असल्या तरी दुर्लक्षीत राहतील. * : असे मराठी सपोर्ट करणारे अ‍ॅप मिपात अंतर्भूत झाले काय मजा येईल नाही का ?! :)
  • Log in or register to post comments
प
पिशी अबोली Tue, 02/03/2015 - 19:44 नवीन
मला शाळेत कर्सिव शिकवलं होतं. मला ते खूप सोयीचं पडतं पटापट काही लिहायला. पण बऱ्याच लोकांना कर्सिव वाचता येत नाही. त्यामुळे खूप प्रॉब्लेम्स होतात. बाकी या प्रश्नसंदर्भात कोणताही संशोधनात्मक अभ्यास मला माहीत नाही, त्यामुळे फारसं बोलता येणार नाही, पण मला व्यक्तिशः हाताने लिहिता येणं आवश्यक असावं असं वाटतं...
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Wed, 02/04/2015 - 07:42 नवीन
पण माझं मुळातच मराठी अक्षर असं यायचं की शिक्षकाला कर्सिवच वाटायचं. ळोळ !
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 02/04/2015 - 08:26 नवीन
अश्या अक्षराचे वर्णन आमचे शिक्षक, "याच्या वहीच्या पानावर कोंबडी चिखलानी भरलेल्या पायांनी नाचली" असे करायचे :) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
व
वेल्लाभट Wed, 02/04/2015 - 07:49 नवीन
चेंज इज इनेविटेबल. कशाला तुम्ही चेंज मानून स्वीकारता, यावर सगळं अवलंबून आहे फक्त.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Wed, 02/04/2015 - 07:54 नवीन
मोबाईल घ्यायला गेलो होतो. कीपॅड वाला हवा म्हटलं; क्वर्टी. आजकल वो सब नही चलता म्हणाला. मी म्हटलं मला तसाच हवाय. मुझे चलता है, और वही अच्छा लगता है. माझ्याबरोबर घ्यायला आलेली मंडळीही 'हं आजकाल टचस्क्रीनचाच जमाना आहे' म्हणून री ओढत होती. आता टचस्क्रीनच्च्च फोन असणार हा बदल त्यांनी, किंबहुना दुनियेनी स्वीकारला त्यामुळे तो इनेविटेबल झाला. जर तो स्वीकृत झाला नसता, क्वर्टीची मागणी कमी झाली नसती तर कदाचित आज बाजारात क्वर्टी कीपॅड लुप्त झालंय ते झालं नसतं. टीप - काळंबेरं ने काढलाय म्हणे क्वर्टी अँड्रॉईड फोन. जे दुर्मिळ ते महाग या नियमानुसार आता त्याची किंमत ३०००० इतकी प्रचंड आहे.
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 02/04/2015 - 08:05 नवीन
स्वस्तातला चालत असेल तर Karbonn A51Q आणि Karbonn A100 हे बघा. २५०० च्या आसपास मिळतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
व
वेल्लाभट Wed, 02/04/2015 - 11:44 नवीन
पण हे जे आहेत ते अगदीच म्हणजे..... फक्त कीपॅडच घेतोय असं वाटायचं. बाकी 'ढ' फोन आहेत ते. आय स्टिल मिस माय नोकिया ई ७१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
क
कैलासवासी सोन्याबापु Wed, 02/04/2015 - 08:14 नवीन
हे बरं आहे!!! मायला!! मी नर्सरी पासून कर्सिव शिकलो! पण कर्सिव मधे लिहिल्या मुळे माझा माइक्रोप्रोसेसर चा पेपर बैक ठेवला विद्यापीठान!!! मास्तर म्हणाला आइच्यान तू लेका ब्लॉक मधे लिवत जा! म्हणले बरे! विंटर ला यूनिवर्सिटी टॉप घेतलेला मी एकटा होतो! काय करणार!! आमच्या मास्तर न एक भारी पाठ पढावला!!! परिक्षकाचा ईगो डिस्टर्ब होइल असले कधीच पेपरात लिहू नकोस! तुला फ़क्त पास व्हायचे आहे! ज्ञानाचा बाजार जॉब मार्केट मधे मांड!! काय बोलणार!!!
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Wed, 02/04/2015 - 13:54 नवीन
हा हा.. हा धडा बारावीलाच शिकलो. आधी कर्सिव लिहायचो. मास्तराने सांगितलं पेपर तपासणार्‍याला ते वाचता येणार नाही. सुट्ट सुट्ट ल्हि. परिक्षेच्या ३ महिने आधी अनेक वर्षांची सवय मोडावी लागली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
व
वगिश Wed, 02/04/2015 - 16:38 नवीन
तुम्ही ELECTRONICS वाले का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 02/05/2015 - 18:44 नवीन
नाही हो मी कंप्यूटर साइंस (बीसीएस) चा (नावापुरता) आम्हाला इलेक्ट्रॉनिक्स सुद्धा असे, स्पेसिफिकली एक्स ८६ फॅमिली प्रोसेसर प्रोग्रामिंग वगैरे, शिवाय बारावी ला वोकेशनल इलेक्ट्रॉनिक्स!! इतकेच भांडवल ! इंजिनियर व्हायची लायकी नव्हती!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वगिश
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 02/04/2015 - 08:17 नवीन
मेंदूच्या मुलभूत विकासासाठी प्रत्यक्ष हस्तकला प्रचंड आवश्यक आहे आणि याला काहीही पर्याय असूच शकत नाही. हा मुद्दा आहे. या मुद्द्याला जीवशास्त्रिय पुरावा नाही. मानवाने वेद-उपनिषदे, इ लेखन करायला सुरुवात होण्याच्या आधी निर्माण केली आणि काही हजार वर्षे केवळ पाठांतर/मौखीक पद्धती वापरून भूर्जपत्रांवर लिहीण्याची प्रथा येईपर्यंत बर्‍याचश्या प्रमाणात सुव्यवस्थित ठेवली. शिकताना आपण वारंवार वापरलेल्या गोष्टी/पद्धती सहाजिकपणे नंतर आपल्या अंगवळणी पडतात, सोप्या वाटतात आणि त्यांच्याशी आपली जवळीक निर्माण होते. अश्या रितीने निर्माण झालेल्या पूर्वग्रहावर मात करून, केवळ नविन गोष्टींकडेच नाविन्याने/अलिप्तपणे पाहणे नाही तर परिचयाच्या गोष्टींकडेही तसेच पाहणे, हे आपले शिक्षण/प्रगती पुढे चालू राहण्यासाठी आवश्यक असते... यालाच "आऊट ऑफ बॉक्स" विचार करणे म्हणतात.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 02/04/2015 - 14:26 नवीन
हातानी लिहिलेलं दिर्घ काळ लक्षात रहातं असा स्वानुभव आहे. मला मराठी आणि इंग्रजीमधे अजुनही हातानी लिहायला जास्त आवडतं.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा