Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रतिशब्द

आ
आकाश खोत
Fri, 03/13/2015 - 05:09
🗣 65 प्रतिसाद
"मंडेला ऑफिसला जायला खूप बोर होतं यार…" "यावेळेस दिवाळी कोणत्या डेटला येतेय?" "अक्खा विक मला ऑफिसमध्ये खूप उशीर झाला… इतका लोड आहे कामाचा. वर्क प्रेशर आहे. सगळेच टेन्शनमध्ये आहेत. " हि आपल्या रोजच्या बोलण्यातली अगदी साधीसुधी वाक्ये. ऑर डेली लाईफमधली युज्युअल सेंटेंसेस. ह्यात मराठी किती आणि इंग्लिश किती ते पहा. आपल्या कळत नकळत आपण आपल्याच भाषेतले साधे सोपे शब्द बाद करत चाललो आहोत. हे मराठीचं रडगाणं ऐकवायला मी सांगत नाहीये. पण एवढंच सांगायचा प्रयत्न आहे कि आपली भाषा एवढी अवघड आणि दरिद्री नाही कि आपण आपल्या हाताने (तोंडाने) तिचा नाश करावा. आज हे लिहावसं वाटलं कारण एक पुस्तक वाचता वाचता सावरकरांचा एक किस्सा वाचला. पुस्तक आहे प्रभाकर पेंढारकर यांचं "एका स्टुडीओचे आत्मवृत्त". या पुस्तकात मराठीतले मोठे दिग्दर्शक भालजी पेंढारकर (लेखकाचे वडील) यांनी कोल्हापुरात उभारलेल्या जयप्रभा स्टुडीओची कहाणी सांगितली आहे. त्याच्या सुरुवातीपासून घडलेल्या घडामोडी, तिथे बनलेले चित्रपट, किस्से, तिथली माणसं, तिथलं राजकारण अशा गोष्टींवर हे पुस्तक आहे. Savarkar त्यातला एक किस्सा असा. सावरकर हा स्टुडीओ पाहायला आले होते. पूर्ण स्टुडीओ बारकाईने पाहून झाल्यावर त्यांनी त्याचं कौतुक तर केलंच, पण तिथल्या विभागांच्या पाट्या "एडिटिंग डीपार्टमेंट", "रेकॉर्डींग डीपार्टमेंट" अशी इंग्लिशमध्ये का आहेत असं विचारलं. त्यावर तिथल्या लोकांनी चित्रपट हि गोष्टच मुळात बाहेरून आलेली आहे आणि त्यातल्या संकल्पना सगळ्या बाहेरच्या आहेत असं स्पष्टीकरण दिलं. सावरकरांनी ताबडतोब त्यांनी पाहिलेल्या सर्व विभागांना "मुद्रण विभाग", "चित्रण विभाग", "संकलन विभाग", "दिग्दर्शन विभाग" असे प्रतिशब्द सुचवले. यातले बरेच शब्द आज प्रचलित आहेत, आणि आपल्या रोजच्या बोलण्यात जरी नसले, तरी चित्रपटातली नामावली, वर्तमानपत्रातल्या बातम्या, भाषणे, अशा ठिकाणी तरी यांचा वापर होतो. सावरकरांचं मराठी भाषेतलं योगदान प्रचंड आहे. मुळात त्यांचे ऐतिहासिक, राजकीय विषयावर ग्रंथ, महाकाव्य पाहिले तर तीच कामगिरी खूप मोठी आहे. पण एवढ्यावर थांबतील ते सावरकर कसले? भाषा हि शेवटी संवादाचं मध्यम असते. आणि ज्याचं राज्य त्याची भाषा प्रभावी ठरते. भारतात काही शतके मुगलांचा सुलतानांचा अंमल होता. त्यामुळे हिंदी मराठी या भाषांमध्ये उर्दू फारसी या सत्ता गाजवणाऱ्या लोकांच्या भाषांचा शिरकाव झाला होता. शिवाजी महाराजांच्या काळातली मराठी पहिली तरी तो प्रभाव लक्षात येतो. पुढे इंग्रज आले तेव्हा इंग्लिश भाषेने आपली छाप आपल्या भाषांवर सोडली. पण यामुळे मुळात सुंदर असलेली, "अमृतातेही पैजा जिंके" अशी आपली मराठी काही अंशी भ्रष्ट झाली. सावरकर मोठे विद्वान आणि पंडित होते. त्यांची साहित्यातली आणि काव्यातली भाषासुद्धा (जयोस्तुते हे गीत आठवा) संस्कृतप्रचुर होती. सावरकरांनी मराठी शुद्ध करण्याचा विडा उचलून असे फारसी इंग्लिश शब्दांचे कितीतरी मराठी प्रतिशब्द सुचवले, वापरात आणले. मोठ्या माणसांच्या छोट्या गोष्टींचाही प्रभाव मोठा असतो. सावरकर यांना स्वातंत्र्यवीर म्हणून पहिल्यांदा संबोधलं ते एका जाहीर सभेत आचार्य अत्रे यांनी. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर असं नाव रूढ झालं. प्रल्हाद केशव अत्रे यांनासुद्धा आचार्य अत्रे म्हणून संबोधलं ते सावरकर यांनी. जशी हि सहज म्हणून वापरलेली संबोधने रूढ झाली. तसेच त्यांनी दिलेले प्रतिशब्द सुद्धा रूढ झाले. इतके कि ते त्यांनी योजलेले शब्द होते हे हि आपल्याला माहित नसतं. एका माणसाचं आपल्या मातृभाषेवर किती प्रेम असू शकतं ते पहा. त्यांचा आपली भाषा शुद्ध बोलण्यावर वापरण्यावर कटाक्ष तर होताच पण ती आणखी प्रवाही कशी करता येईल, आणखी संकल्पना मराठीत कशा आणता येतील, बोलता येतील यासाठी सुद्धा प्रयत्न होता. आज आपल्यावर आपल्याच लोकांचं राज्य आहे. तरी आपण इंग्लिशचेच गुलाम आहोत. इंग्लिश मिडीयम, इंग्लिश बोलणं, इंग्लिश वाचन यावर आपला इतका भर असतो. पण आपण हेच विसरतो कि आपण मराठी आहोत. आपण आपली भाषा कशी बोलतो, आपल्या भाषेतलं साहित्य आपल्याला माहित आहे का याची आपल्याला पर्वा नाही. दुसऱ्या भाषा शिकुन त्यात प्राविण्य मिळवण्याला कोणाचीही हरकत नाही. पण आपल्या भाषेला तिच्या सौंदर्याला विसरायला नको. इथे मराठीच्या राजकारणाचा विषय नाही. मराठीच्या नावावर आंदोलन आणि तोडफोड करणाऱ्या किती तरी "कार्यकर्त्यां"चं मराठी किती चांगलं असतं? असे आंदोलन करून "SUREKHA GENERAL STORES" हि पाटी "सुरेखा जनरल स्टोर्स" अशी लावता येते. पण हि मराठी पाटी आहे कि मराठी लिपीतली पाटी आहे? मी बोलताना आणि माझे मराठी लेख लिहताना जमेल तितके मराठी शब्द वापरायचा प्रयत्न करतो. पण ते शब्द काही मराठी लोकांनाच समजायला जड जातात. मग असं जड का बोलतो किंवा लिहितो अशा हावभावांना किंवा थेट प्रश्नांना सामोरं जावं लागतं. आज काल मला जाणवायला लागलंय कि बोलताना मलासुद्धा मराठी शब्द लवकर सुचत नाहीत. तुम्हाला वाटेल याचा एवढा बाऊ का करावा? नवीन काळेच्या एका लेखात या विषयावर लिहिलं होतं कि आपण ज्ञानेश्वरांच्या काळातली मराठी आज बोलतो का? भाषा हा प्रवाह असतो आणि तो काळानुसार बदलत राहतो. मराठी सुद्धा वाहत राहील आणि कोणत्या न कोणत्या स्वरुपात तिचं अस्तित्व टिकून राहील. पटण्यासारखं आहे. ज्ञानेश्वर किंवा शिवाजी महाराजांच्या काळातलीच काय आपण आपल्या वडलांच्या काळातली मराठीसुद्धा बोलत नाही. भाषा बदलते, ढंग बदलतो, पण शब्द बदलत नाहीत. ते वापरात राहतात किंवा वापरातून जातात. आई तेव्हासुद्धा आईच होती आणि उद्यासुद्धा आईच राहील. पण तिला आई म्हणणारे राहतील का? माहित नाही. शंभर टक्के शुद्ध मराठीचा वापर खूप अवघड आहे. पण आपण मराठीचं प्रमाण तरी कायम राखुयात. मराठीत नसलेल्या संकल्पना, नवे शोध, याबद्दल मराठीत लिहून मराठीला ज्ञानभाषा करण्याचा प्रयत्न अच्युत गोडबोले सारखे लेखक करत आहेत, त्यांना प्रतिसाद देऊयात. इंग्लिश भाषेत दरवर्षी नव्या शब्दांची भर पडते आहे. त्यात बाकीच्या भाषेतले शब्दसुद्धा स्वीकारले जातात. हि लवचिकताच त्यांची शक्ती आहे. आपणहि अशी लवचिकता दाखवूयात. आपण आजही नकळत अनेक इंग्लिश शब्द वापरतोच. जिथे पर्याय नाही तिथे इंग्लिश शब्द वापरायला काहीच हरकत नाही. पण जिथे सुंदर मराठी शब्द उपलब्ध आहेत, तिथे ते वापरले जावेत एवढीच अपेक्षा आहे. नव्या शब्दांचे सृजन करून भाषेला देणगी देण्याची प्रतिभा सावरकरांसारख्या मोजक्याच लोकांकडे असते. पण आहेत ते शब्द वापरण्याची काळजी आपण घेऊयात. आपणच मराठी शब्द सोडून दिले तर काही वर्षांनी बोलली जाणारी जी भाषा असेल, तिची बांधणी आणि व्याकरण मराठी असू शकेल पण शब्द मराठी असणार नाहीत. संवादाचं माध्यम एवढंच भाषेचं अस्तित्व नसतं. भाषेत त्या समाजाची सगळी संस्कृती, इतिहास सामावलेला असतो. आज काही आदिवासी भाषा लोप पावत आहेत. ती भाषा बोलणारे लोक दहा, काही ठिकाणी एक एवढेच लोक शिल्लक आहेत. आपल्या भाषेत कोणाशी न बोलता येण्याचं दुःख तेच सांगू शकतील. पण तेही त्यांच्या भाषेत नाही. आज आपल्याला हे समजणार नाही. हा म्हटलं तर महत्वाचा सोडलं तर बिनकामाचा विषय आहे. भावना पोचल्या ना बास…. म्हणून सोडून देता येईल. एवढंच सांगतो… नदी जेव्हा स्वतंत्रपणे वाहते तेव्हाच तिला वेगळं नाव आणि आपली ओळख असते. ती एकदा का मोठ्या नदीला किंवा समुद्राला जाऊन मिळाली, तर त्या पाण्यात तिचं अस्तित्व तर असतं पण वेगळी ओळख नसते.

प्रतिक्रिया द्या
11734 वाचन

💬 प्रतिसाद (65)
ए
एस Fri, 03/13/2015 - 09:36 नवीन
भाषा भ्रष्ट होत नसते कधीच. भाषा, संस्कृती ह्या गोष्टी प्रवाही आहेत हे ज्यांना समजत नाही ते मागे पडतात. मलातरी सर्व भाषा आवडतात, जगाव्याश्या वाटतात. मग ती इंग्रजी असो, मराठी असो किंवा सेंटिनलीज्. आणि भाषाशुद्धीबिद्धी ह्या आग्रहाशी मी सहमत नाही.
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Fri, 03/13/2015 - 10:25 नवीन
सहमत. शुद्ध अशुद्ध विचारत असत. भाषेत नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ख
खंडेराव Fri, 03/13/2015 - 10:58 नवीन
भाषा प्रवाही असेल तरच तिचा विकास होतो आणि ती तगते. प्रमाण भाषा अशी काही नसते. पुण्याची मराठी चांगली आणि विदर्भ/ मराठवाड्यातील चु़कीची असे म्हणणे निरर्थक आहे. माझा एक मित्र, जो तामिळनाडुतला मराठी होता तो असे बोलायचा ' वडलांचा काळ झाला तेव्हाची गोष्ट " हे काय फार दिवस चालणार नाही. भाषेत भर ही पडतच जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ग
गिरकी Mon, 03/16/2015 - 11:54 नवीन
अगदीच पटलंय … एखादा विचार व्यवस्थित व्यक्त करता येणं महत्त्वाचं. एखाद्या विशिष्ट शब्दासाठी मारामारी करत बसलं तर हळू हळू व्यक्त होणंच कमी होत जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
क
कलंत्री Fri, 03/13/2015 - 11:08 नवीन
मराठी भाषेला आज नाही तर उद्या चांगले दिवस आल्याशिवाय ( शिवाय हा फारसी शब्द) राहणार नाही, असे लेख वाचले की परत मराठी शब्द वापरण्याची प्रेरणा जागृत होत असते. आपण आपला प्रयत्न करीत राहणे हीच खरी उपासना आहे असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
स
सांगलीचा भडंग Fri, 03/13/2015 - 13:20 नवीन
मराठी बद्दल प्रेम जरूर आहे ( आणि वापर पण ) पण प्रतिशब्द शोधणे/ वापरणे म्हणजेच प्रेम आहे असा अर्थ होत नाही . आणि जबरदस्तीने प्रतिशब्द शोधणे तर जास्तच रटाळ काम आहे .जसे कि मोबाइल = भ्रमणध्वनी / भ्रमणसंच. काय हरकत आहे मोबाइल हा शब्द मराठी मध्ये घ्यायला . प्रतिशब्द सोपे असतील तर माझ्या सारखे सामान्य लोक वापरतीलच पण जर अवघड असतील तर अजिबात वापरणार नाहीत आणि मराठी मध्ये अजून एका इंग्लिश शब्दाची भर पडेल . मराठी प्रतिशब्द जबरदस्ती ने असले कि ती सरकारी मराठी असते . सर्वसामान्य लोक ती वापरत नाहीत . त्यामुळे तसल्या भाषेला सरकारी मराठी मरण नक्की आहे पण मराठी मरणार नाही. मराठी बुडणार / कोण मराठी बोलणार नाही पुढच्या १० वर्षात अशी वाक्य तर फारच मजेशीर असतात . १० कोटी लोक मराठी बोलतात . पेपर आहेत , चोवीस तास बातम्या देणारे चानेल आहेत , नाटके आहेत , सध्या मराठी पिक्चर न पण चांगले दिवस आले आहेत . मिसळपाव सारखी ठिकाणे तर मराठी जास्त ग्लोबल होत असल्याचेच पुरावे आहेत . आणि मुख्य म्हणजे मराठी घरात अजून मराठी मधेच संवाद होतो . कशाला उगाच मराठी बुडेल . बदल तर सर्व भाषा मध्ये होतात . ज्ञानेश्वरी काळा मधली मराठी , शिवाजी महाराजांच्या काळामधील मराठी , टिळकांच्या काळा मधील मराठी आणि आजची मराठी . इंग्लिश चे आक्रमण मराठी नाही तर सगळ्याच भाषा वर होत आहे सो जस्ट चिल ( काय करावे मराठी भाषांतर . थंड घ्या :-) )
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Fri, 03/13/2015 - 17:53 नवीन
गुज्जु लोकही भाषे बाबतीत खूप संकुचित असतात असं निरिक्षण आहे,.
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Fri, 03/13/2015 - 20:04 नवीन
लेख खूप पटला. मला वाटत, केवळ योग्य शब्दच नव्हे तर भाषेचा वापर देखिल शुद्ध असावा असे वाटते. उदाहरणार्थ: गेलेलो/आलेलो=गेलो होतो/आलो होतो. किंवा ती बोलली= ती म्हणाली. अलीकडे हा फरक कोणालाही लक्षात येत नाही; ही दुःखाची गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रियाजी Sun, 03/15/2015 - 12:19 नवीन
लेख खूपच आवडला. मी ही व्यवहारात जास्तीत जास्त मराठी शब्द वापरते. याबद्दल आमच्याही घरात चर्चा होते. सामान्यत: वेगवेगळ्या अनोळखी लोकांचे संशयास्पद दूरध्वनी जेव्हा येतात आणि ते हिन्दी मध्ये जेव्हा माहिती विचारतात तेव्हा मी नक्कीच मराठीत उत्तराची अपेक्षा करते आणि समोरील व्यक्ती वैतागून यन्त्र बन्द करते तेव्हा मजा वाटते.
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sun, 03/15/2015 - 13:47 नवीन
हाफ शेंच्युरी निमीत्त श्री. आकाश खोत आणी समस्त मिपाकरांचा सत्कार " दुमदुमले पाताळ उठला प्रतिशब्द| थरथरली धरणीधर मानिला खेद||" या ओळी गाऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक-जेपी आणी तमाम कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या Sun, 03/15/2015 - 16:42 नवीन
भाषेत रूढ झालेल्या परकीय शब्दांना प्रतिशब्द सुचवणे आणि ते समाजाच्या गळी उतरवणे हे येर्यागबाळ्याचे काम नव्हे. त्याकरता भाषेवर प्रभुत्त्व असावे लागते. प्रतिभा असावी लागते. ती असली तरी त्या व्यक्तीने सुचवलेले सगळेच शब्द यशस्वी होतील असे नाही. जसे चांगल्या कलाकाराचे सगळे सिनेमे, कादंबर्‍या, नाटके, गाणी यशस्वी होत नाहीत तसेच हेही आहे. नव्या शब्दांना प्रस्थापित वा अन्य पर्यायी शब्दांशी स्पर्धा करावी लागते. त्यात जे जिंकतील तेच भाषा स्वीकारेल. पण म्हणून नवे शब्द निर्माण करण्याची प्रक्रिया थांबवू नये. जिवंत भाषेत नवनवीन शब्द रोज प्रवेश करत असतात.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Sun, 03/15/2015 - 23:54 नवीन
लेखनाच्या आशयाशी सहमत. मराठी प्रतिशब्दांचा अतिरेकी आग्रह टाळून जिथेही शक्य असेल तिथे मराठी प्रतिशब्द वापरण्याचा प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. स्मार्टफोनसाठी चतुरभ्रमणध्वनी हा असाच एक प्रयत्न. यानिमित्ताने विदर्भात वापरले जाणारे काही मराठमोळे शब्द लिहितो
  • दालचिनी = कलमी
  • फ्लॉवर = फुलकोबी (तिची बहीण पानकोबी)
  • मटार = वाटाणे
  • टोमॅटो = टमाटे
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Mon, 03/16/2015 - 06:31 नवीन
मटारला मुंबईतही वाटाणे असेच म्हणतात हो. फारफार तर हीरवे वाटाणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी Mon, 03/16/2015 - 14:14 नवीन
जाणून आनंद झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
क
कपिलमुनी गुरुवार, 03/19/2015 - 13:35 नवीन
मराठी मधे लघुरूप हा प्रकार कमी आहे त्यामुळे शब्द बोजड वाटतात. कॉम्पक्ट डीस्क साठी सीडी या सारखी लघुरूपे मराठीमध्ये कमी आढळतात
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा