Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अंदमानी सहल

न
नरेंद्र गोळे
Fri, 03/20/2015 - 15:26
💬 46
अंदमान द्विपसमूह भारताचे अविभाज्य अंग आहे. ही आपल्याकरता खरेच आनंदाची गोष्ट आहे. हिंदी महासागरास मिळालेले, हिंदी हे नामाभिधानही कदाचित, ह्याच आपल्या अस्तित्वाचे द्योतक असावे. मात्र, महासागरातील त्याच्या स्थानामुळे, अंदमान आणि निकोबार राज्यात, वर्षाचे बहुतांशी दिवस हवामान ढगाळ, वादळी आणि पावसाळी राहते. धूसर राहते. तापमान जरी मुंबईसारखेच असले तरी, हवामानातील महासमुद्री बेभरवसा, तिथे पुरेपूर भरून राहिलेला आहे. वर्षातले काही दिवसच तिथे वातावरण समेवर येते. निरभ्र वातावरण, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि स्थिरपद, स्वस्थ समुद्र; स्वर्गसदृश हवामान प्रदान करतो. हेच दिवस तिथे पर्यटनास अत्यंत योग्य असतात. अशा दिवसात ज्यांनी तिथे पर्यटन केले, ते त्याची अविस्मरणीय गोडी, विसरूच शकत नाहीत. म्हणूनच अंदमानात पर्यटनास जातांना हवामान पक्षकर असायला हवे ह्यात तिळमात्र संशय नाही. एरव्ही, पर्यटनाचे अनेक दिवस खराब हवामानामुळे गमवावे लागलेले पर्यटक तिथे काही कमी नाहीत!

संदर्भः http://www.andaman.climatemps.com/ वरील तक्ता स्वतःहूनच सारी हवामान परिस्थिती स्पष्ट करतो.

ओले दिवस पर्यटनास योग्य समजायचे नसतील, तर फेब्रुवारी अखेर व मार्च महिन्याची सुरूवात हाच मुहूर्त सर्वोत्तम समजायला हवा. ह्याच दिवसात नितळ, ऊबदार, सूर्यप्रकाश आणि कमालीची दृश्यमानताही साथ देत असते. आम्हालाही ह्याच सुवर्णदिवसांत अंदमानात जाण्याची संधी मिळाली हे आमचे सुदैव!

बोरिवलीच्या प्रथमेश टूर्सतर्फेच्या ६ रात्री आणि ७ दिवसांच्या; २५ फेब्रुवारी २०१५ रोजी मुंबईत सुरू होऊन, ३ मार्च २०१५ रोजी मुंबईतच संपणार्‍या सहलीकरता, आम्ही नावे नोंदवली. सकाळी पावणे सहाच्या विमानाने निघून, चेन्नईमार्गे सकाळी साडेदहा वाजता आम्ही पोर्ट ब्लेअरला पोहोचलो. एन.के.इंटरनॅशनल ह्या फिनिक्स धक्क्यानजीकच्या हॉटेलात उतरलो. फिनिक्स धक्क्यावरूनच हॅवलॉक बेटाकरता बोटी सुटतात. नॉर्थ बे आणि रॉस बेटांकरता मात्र अबर्दिन धक्क्यावरून बोटी सुटतात. सुग्रास जेवण झाल्यानंतर दुपारी कॉर्बिन कोव्ह बीचला गेलो. तर संध्याकाळी सेल्युलर जेलमधल्या लाईट अँड साऊंड च्या १८०० च्या शोला. हा शो हिंदीत असतो. ह्यानंतरचा १९३० वाजताचा शो इंग्रजीत असतो. ह्याचे दर माणशी तिकीट ५० रुपये आहे.

कॉर्बिन कोव्ह बीच, बेटाच्या महासागराकडील दिशेला आहे. तिथे आम्ही शहाळ्याचे पाणी प्यायले. शंखशिंपली गोळा केली. फोटो काढले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माणशी ३०० रुपये दराने चौघे जण स्पीडबोटीतून चक्कर मारून आलो.

कॉर्बिन कोव्ह बीच वरून, खुल्या महासागरातील भूशिरावरच्या बेटाकडे आम्ही स्पीडबोटीने निघालो खरे, मात्र नावाड्याने आमची वेव्ह रायडर नावाची बोट, समुद्री लाटांवर अशी काही चढवली की, आपटाआपटीने आमची हाडे खिळखिळी झाली. कधी टोपी उडून गेली, तर कधी कॅमेरा हातातून निसटला! असे वाटत होते की बोट खालच्या दगडांवर आदळते आहे. फुटते की काय, असेही वाटून गेले. थोडे हळू चालव सांगायला तोल सावरायच्या आत, आम्ही बेटानजीक पोहोचलोही होतो. खुल्या सागरात असल्याने, बेटावर उतरायला मात्र मनाई आहे!



संध्याकाळ फारच लवकर होते. पाच वाजताच उजेड कमी होऊ लागलेला होता. साडेपाचच्या सुमारास आम्ही सेल्युलर जेलसमोर जाऊन पोहोचलो. काही फोटो काढले आणि लाईट अँड साऊंड शोला जाऊन बसलो. सात पंखी सेल्युलर जेलच्या मध्य मनोर्‍यानजीक असलेल्या वृक्षराजाच्या साक्षीने कथा गुंफली जाते. अवघड ठरणार्‍या राजकीय कैद्यांना विजनवासात ठेवण्यासाठी, अशा प्रकारच्या तुरूंगाची योजना करणार्‍या ब्रिटिशांच्या बुद्धिने मन स्तिमित होते. जगावर हुकूमत गाजवत असतांना देखील लोकशाहीने, कायद्याच्या राज्याने, प्रशासन चालवितो आहोत असे दाखविण्याच्या त्यांच्या अट्टाहासाखेरीज; ह्या सव्यापसव्याचे काय समर्थन असू शकते. एरव्ही जगातील जेत्यांनी जीतांना नाहीसे करणे; ह्या ’बळी तो कानपिळी’ थाटाच्या पाशवी प्रथेपासून, काळ्यापाण्याची शिक्षा तयार करण्याच्या, मानवी क्रूर प्रथेपर्यंत ते येते ना. शो लक्षात राहील असा, किंवा खूप प्रेरणादायी असा वाटला नाही. मात्र, त्या ठिकाणाच्या प्रखर क्रांतिकारकांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या भूमीने, देशाकरता जगण्याची दुर्दम्य जिज्ञासा मनात पुन्हा उजागर केली.

दुसरा दिवस पोर्ट ब्लेअर शहरदर्शनाचा होता. सकाळच्या सत्रात आम्ही सेल्युलर जेल सविस्तर पाहिला. नंतर चॅथम आरायंत्रही विस्ताराने बघितले. दुपारच्या सत्रात १. पुरातत्त्व संग्रहालय (आंथ्रापॉलॉजिकल म्युझियम), २. मात्स्यिकी संग्रहालय (फिशरीज म्युझियम), ३. नौदलाचे समुद्री संग्रहालय -समुद्रिका- (नेव्हल मरीन म्युझियम), आणि ४. कुटिरोद्योग निर्मित वस्तूंचा विक्रयहाट -सागरिका- (कॉटेज इंडस्ट्रीज एंपोरियम); ह्या चार गोष्टी बघितल्या.



२६-०२-१९६६ रोजी मुंबई येथे वीर सावरकरांना देवाज्ञा झाली. त्यानंतर बरोब्बर ४९ वर्षांनी आम्ही पोर्ट ब्लेअर मधील त्यांच्या कोठडीत पोहोचलो होतो. ज्वलंत राष्ट्राभिमानाखातर काळ्या पाण्याची शिक्षा भोगणार्‍या दिवंगत नेत्यास आम्ही सुमनांजली वाहिली. त्यांच्या "माझे मृत्यूपत्र" ह्या कवितेचे अखेरचे कडवे सामुदायिकरीत्या म्हटले.




की घेतले व्रत न हे अम्हि अंधतेने । लब्धप्रकाश इतिहास निसर्गमाने ॥
जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे । बुद्ध्याच वाण धरले करी हे सतीचे ॥ - स्वातंत्र्यवीर सावरकर

शहिदांनी ज्याकरता प्राणार्पण केले, सावरकरांसारख्या राष्ट्रवीरांनी ज्याकरता अपार कष्ट सोसले, त्या राष्ट्राकरता, अर्थपूर्ण जीवन जगण्याचे आमचे दायित्व पुन्हा एकदा उजागर झाले! त्या कर्तव्यास आम्ही सदैव लक्षात ठेवू.



केवळ अंदमानातच आढळून येणारा पडौक वृक्ष, हा ह्या राज्याचा राज्यवृक्ष आहे. तो सुमारे १२० फूट उंच वाढतो. पानगळीचा पर्णसंभार बाळगतो. अशा वृक्षांचे उंचच-उंच जंगल तर नजरेचे पारणेच फेडते. तो अत्यंत भारदस्त दिसतो आणि उत्तम लाकडी वस्तुंकरताचे दर्जेदार लाकूड पुरवतो. पडौक लाकूड हे सागवानी लाकडापेक्षा जास्त सुदृढ असते.

ह्या पडौकवनांतील वृक्षांचा वापर, बांधकामांकरता आणि बैठकीच्या सामानांकरता लागणार्‍या लाकडाच्या गरजा भागवण्याकरता, करता यावा, म्हणून १८८३ मध्ये ब्रिटिश सरकारने इथे एका आरा यंत्राची स्थापना केली होती. दुर्दैवाने दुसर्‍या महायुद्धात थेट ह्या ठिकाणी स्फोटके पडल्यामुळे यंत्राचे अपरिमित नुकसान झाले. मात्र पूर्व पाकिस्तान, लंका आणि बर्मामधून ब्रिटिशांनी इथे पुनरुत्थानाकरता आणलेल्या लोकांच्या लाकडाबाबतच्या अतिरिक्त गरजा भागविण्याकरता ह्या यंत्राची पुनर्स्थापना करण्यात आली.

बिनीच्या अंदमानी पडौक वृक्षाची कटाई केवळ ह्या सरकारी आरा यंत्रावरच केली जाते. हे आरायंत्र चॅथम बेटावर आहे. हे बेट पोर्ट ब्लेअर शहराच्या उत्तरेला आहे. पोर्ट ब्लेअरशी ते केवळ चॅथम पुलानेच जोडलेले आहे. दुपारच्या जेवणापूर्वी आम्ही ह्या आरायंत्राला भेट दिली.



पहिल्या चित्रात प्रवेशद्वार आणि वन-उप-संरक्षकांचे कार्यालय दिसत आहे. खालच्या ओळीत आरायंत्रावर, तसेच मानवी कौशल्याने साधलेल्या लाकडी वस्तू दिसत आहेत.




पहिल्या चित्रात उभ्या दिसणार्‍या दोन बांबूंपैकी एकाचा काप मधल्या चित्रात दिसत आहे. मग दिसते आहे ती लाकडातून साकारलेली विश्वकर्म्याची मूर्ती.



त्यानंतरच्या चित्रात दिसते आहे आरायंत्राचे प्रारूप. खालील पहिल्या चित्रात आरा यंत्राकरता, दातेरी आरीचा पट्टा उचलून नेला जात असलेला दिसत आहे. दुसर्‍या चित्रात कापले जाणारे पडौक वृक्षाचे लांबलचक खोड दिसते आहे.



त्या कामगाराच्या डाव्या हाताकडील खोडाच्या टोकास आरीचे पाते खोडात उभे घुसलेले स्पष्ट दिसत आहे. उजव्या बाजूस रुळांवरून सरकत पुढे जाणार्‍या खोडातून कापली गेलेली फळीही, त्या कामगाराच्या उजव्या बाजूस सुटी झालेली दिसते आहे.



तिसर्‍या दिवशी पोर्ट ब्लेअरपासून फिनिक्स धक्क्यावरून, कोस्टल क्रूझ बोटीने हॅवलॉक बेटावर गेलो. देशात सर्वोत्तम म्हणून, पर्यटन खात्याने गौरवलेल्या राधानगरी बीचवर गेलो. पुन्हा समुद्रस्नान केले आणि हॅवलॉक बेटावरच हॉटेल हॉलिडे इन्नमध्ये राहिलो. राधानगरी बीचवर, पैसे देऊन का होईना पण, कपडे बदलण्याची आणि प्रसाधनाची चांगली सोय आहे. हॅवलॉक बेटावरले आमचे वास्तव्य सगळ्यात आनंददायक होते. हॉटेलच्या परंपरागत कल्पनेलाच छेद देणारी सगळी व्यवस्था होती तिथे. खूप मज्जा आली. सर्व अत्याधुनिक सोयीसवलतींसह सुसज्ज पण झावळ्यांच्या झोपड्या वाटाव्यात अशा खोल्या.



हॉटेल हॉलिडे इन्न, हॅवलॉक

वेताच्या काड्यांना वाकवत वाकवत तयार केलेली मंचके, खुर्च्या, स्तंभ, छत्र्या इत्यादींमुळे जास्तच प्रसन्नतेचे वातावरण निर्माण होत होते. अंदमानातील वृक्षराजींत वेळूची बेटे आणि वेताच्या झुडुपांचा समावेश नक्कीच असणार! जागोजाग फळलेल्या नारळी सर्वदिस नारळांचा वर्षाव करत होत्या. सर्वत्र, इथे तिथे सुके नारळ आणि शहाळी पडलेली दिसत होती.



वेताच्या वस्तूंची रेलचेल

चौथ्या दिवशी सकाळी ८ वाजताच हॉटेल सोडून द्यायचे होते. म्हणून सगळे सामान गोळा करून स्वागतकक्षात रचून ठेवले. नास्ता केला आणि मग आम्ही निघालो एलिफंट बीच बघायला. इथे पहिल्यांदा आमच्यापैकी एका मुलीने (मुलगी कसली, लग्न झाले आहे आता तिचे!) सी-वॉक केले. आणि आम्ही सगळ्यांनी स्नॉर्केलिंगचा भरकस प्रयत्न केला. दोन जणांना स्नॉर्केलिंग करण्यात यश आले. इतरांनी त्याचा आनंद लुटला.



अंदमानी मासा!



अंदमानी समुद्रातून मासा वेचून आणतांना मी.

गळ्यापर्यंतच्या पाण्यात, नाकावर मुखवटा लावून नाकात पाणी शिरण्यापासून बचाव करायचा. डोळ्यांवर समुद्री गॉगल लावून, डोळ्यात पाणी शिरण्यापासून बचाव करायचा. तोंडात एका नळीचे कवळीच्या आकाराचे एक टोक धरून, दुसरे टोक पाण्याबाहेर तरंगवायचे. ह्या नळीतूनच तोंडाने श्वासोच्छवास करायचा. पाण्याच्या पृष्ठभागावर तरते राहून, आणि पाण्यात डोके खुपसून तळ न्याहाळायचा. अशी ही स्नॉर्केलिंगची संकल्पना असल्याचे मला कळले. मात्र ’मुख से साँस’ घेण्याचे मात्र, मला किंवा इतर बहुसंख्यांकांना जमू शकले नाही. पोहोणे येत असलेल्या एक दोघांनाच काय ते साधले. तळ अगदी स्वच्छपणे दिसू शकत असलेल्या -नितळ- पाण्यात डुंबण्याचे सुख मात्र सगळ्यांनाच खूप साधले. प्रसन्न वाटले. सुनामीमुळे पडलेल्या झाडांचे भग्नावशेष ह्या किनार्‍यावर विखुरलेले आहेत. त्यांच्या सोबतीने अनेकांची प्रकाशचित्र सत्रे झाली. इथे मात्र कपडे बदलण्याची आणि प्रसाधनाची कुठलीच सोय त्या दिवशी उपलब्ध झाली नाही. कारण असे सांगितले गेले की त्या व्यवस्थेची किल्ली जवळ बाळगणारी व्यक्तीच आज कामावर हजर नव्हती. असो.

पाचव्या दिवशी वंडूरमार्गे जॉली बॉय बेटावर जायचे होते. वंडूर बंदरावरच महात्मा गांधी राष्ट्रीय समुद्री उद्यानाचे प्रवेशद्वार आहे. ह्या बेटावर प्लास्टिकमुक्त वातावरण सांभाळले जाते. म्हणून बाटलीबंद पाणी नेण्यासही मनाई आहे. दर दोन माणसांगणिक, २०० रुपये अनामत भरून दोन लिटरची एक ओतीव प्लास्टिकची वॉटर बॅग दिली जाते. आपल्या बाटल्यांतील पाणी त्यांत ओतून घेऊन त्या बॅगाच बेटावर नेऊ दिल्या जातात. बाटलीबंद पाण्याच्या बाटल्या वंडूरलाच सोडून द्याव्या लागतात. इथे होणारी प्लॅस्टिकच्या पिशव्यांकरताची तपासणी एवढी इत्थंभूत असते की, सगळ्यांनाच आपापल्या सामांनांतून असंख्य प्लॅस्टिकच्या पिशव्या आढळून आल्याने टाकून द्याव्या लागल्या. अंदमानात विशेषतः पाण्यात डुंबायचे असल्याने प्रत्येक वस्तू प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून घेण्याच्या मोहापायी अक्षरशः हैराण व्हावे लागले. प्लॅस्टिकच्या पिशव्या टाकून द्याव्या लागल्या. आतील सामान उघडे पडले. स्त्रियांना तर हा फटका फारच अनावर झाला. अशा रीतीने आमचा प्लॅस्टिकविरहित प्रवास प्रत्येकी आठ-दहा माणसे नेणार्‍या छोट्या होड्यांतून जॉली बॉय बेटाकडे सुरू झाला. बेट सुरेखच होते. दृष्ट लागण्यासारखे. अंदमानात आल्यानंतर इथे आम्ही प्रथमच, काचेच्या तळाच्या नावांतून समुद्रतळ बघितला. त्याकरता प्रत्येकी ३०० रुपये घेऊन, एका बोटीतून आठ आठ जणांना नेऊन, तीन निरनिराळ्या ठिकाणी सागरतळ दाखवण्यात आला. कॅमेर्‍यांत बंदिस्त केला.



अंदमानी सागरतळातील जीवसृष्टी आणि ज्या काचेच्या तळाच्या होडीतून ती दिसली, ती होडी.

जॉली बॉय बेटावर आम्ही पॅक लंच नेलेले होते. किनार्‍यावरील तिवरांच्या जंगलात, तिवरांच्या झाडांच्या जमिनीनसमांतर फांद्यांवर, तर कुठे विशेष तयार केलेल्या बाकड्यांवर आणि कुटिरांत आम्ही स्वेच्छा-सहभोजनाचा लाभ घेतला. सहाव्या दिवशी नॉर्थ बे बेटावर समुद्रसंचार (सी-वॉक), मग ब्रिटिश प्रशासनाचे अंदमानातील मुख्यालय राहिलेल्या रॉस बेटावर विहारफेरी आणि पोर्ट ब्लेअरला परत, असे नियोजन होते. हा सगळा प्रवास आम्ही अबर्दीन धक्यावरून एम.व्ही.जया नावाच्या पन्नास आसनी बोटीतून केला.

नॉर्थ बे आयलँडच्या किनार्‍याजवळच सी-लिंक कंपनीचे सी-वॉकर हे जहाज उभे आहे. पोर्ट ब्लेअर वरून समुद्र-संचार करू इच्छिणार्‍या पर्यटकांना ह्या जहाजावर आणतात. ह्याकरता समुद्र संचाराकरताचे रु.३,२००/- चे तिकीट वेगळ्याने घ्यावे लागते. स्कूबा डायव्हिंगकरता रु.३,५००/- चे तिकीट पडते. मात्र, ह्यात प्रत्येक स्कूबा डायव्हरसोबत एक स्वतंत्र पाणबुडा सोबत दिला जात असतो. स्कूबा डायव्हिंगकरता पोहोणे यावे लागते. पोर्ट ब्लेअर वरून येतांना, एका छोट्या स्वयंचलित होडीतून, जहाजालगत उभ्या असलेल्या दुसर्‍या होडीत आणि तिथून ह्या जहाजात आपण प्रवेश करतो.



इथेच कपडे बदलवण्याकरता चेंजिंग रूम, आपले व्यक्तिगत सामान ठेवण्याकरता लॉकर इत्यादी पुरवले जाईल असेही तिकीट देतांना सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र इथे चेंजिंग रूमच्या नावाखाली एक झापड असलेला आडोसा, आणि लॉकरच्या नावाखाली झाकणे असलेले अपुरे कप्पे एका रॅकमध्ये उपलब्ध आहेत. मात्र त्याला कडीकुलूप करावे अशी कोणतीही सोय नाही. समुद्र संचाराच्या कल्पनेने भारावलेले पर्यटक ह्याच तुटपुंज्या सेवांचा आनंद सुखाने घेत असतात. प्रशासकीय अधिकारी सुखासिन ठेवले जात असणार, त्यामुळे त्यांचीही फारशी अडचण होत नाही. तरीही, समुद्र-संचार कंपनीचे सर्व कर्मचारी आणि त्यांचा प्रत्यक्ष व्यवहार प्रामाणिक, सचोटीचा आणि विश्वास निर्माण करणारा आहे, ह्यात मुळीच संशय नाही.

जहाजाच्या मागच्या बाजूला, साधारण जहाजाच्याच आकाराच्या गोलाकार समुद्राला, तरत्या गोलकांच्या आधारे, तळापर्यंत लोंबणारे जाळे लावून बंदिस्त केलेले आहे. जहाजावरून एक लोखंडी शिडी तळापर्यंत उतरवलेली आहे. तिच्यावरून समुद्राकडे पाठ करून, नेसत्या कपड्यांनिशी आपण दोन चार पायर्‍या उतरून तळाकडे निघालो, म्हणजे गळ्यापर्यंत पाण्यात शिरल्यावर, ३२ किलो वजनाचे हवेशीर, म्हणजे पाठीमागच्या बाजूने दाबित हवेची नळी जोडलेली असते असे, शिरस्त्राण आपल्या डोक्यावर चढवले जाते. जहाजावर एक मोठ्ठा हवादाबक (काँप्रेसर) असून त्यातून दाबित हवा आणणार्‍या सुमारे एक सेंटिमीटर व्यासाच्या लांबलचक (पन्नास, शंभर मीटर लांबीच्या असाव्यात) नळ्या शिरस्त्राणास जोडलेल्या असतात. अगदी चष्मा घालूनही हे शिरस्त्राण चढवले जाते. कारण शिरस्त्राणाच्या आतील भाग कोरडाच राहत असतो, शिवाय चष्मा घातल्याने आपण नेहमीसारखेच स्वच्छ पाहूही शकत असतो. शिरस्त्राणाचे आकारमान असे असते की, त्याचे पाण्यातील वजन केवळ ७ किलोच भरते. मात्र, ह्या ७ किलोच्या अतिरिक्त वजनामुळेही आपण सागरतळाकडे लोटले जाऊ लागतो. अशावेळी, सोबत करत असलेला पाणबुडा आपल्याला शिडी सोडायची खूण करतो आणि ती सोडताच आपण त्याचा हात धरून झपाट्याने सागरतळाशी पोहोचतो. इथे सागरतळ साधारणपणे ५ मीटर म्हणजे सुमारे १५ फूट खोल असतो. अर्थात हवेची नळी कायमच हवादाबकाला जोडलेली राहून आपल्याला दाबित हवेचा पुरवठा करत राहते. शिरस्त्राणाच्या आतील हवेच्या दाबाने बाहेरचे पाणी शिरस्त्राणामध्ये शिरू शकत नाही. आपण बाहेरच्यासारखाच सुखाने श्वासोच्छवास करत राहतो.



समुद्रसंचार करणार्‍या आठदहा संचारकर्त्यांमागे तीन पाणबुडे सोबत असतात. आमचा गट आठ जणांचा होता. आमच्याच सोबत पर्यटन करणारे पाच जण आणि नवरा, बायको व त्यांचा सुमारे दहा वर्षांचा एक मुलगा असे इतर तिघे बंगाली भाषक, ह्यांचा हा गट होता. तळाशी पोहोचल्यावर संचार कर्त्यांची हातात हात देऊन एक माळ तयार केली जाते. त्या माळेच्या एका टोकास एक, तर दुसर्‍या टोकास दुसरा पाणबुडा हाती धरून मार्गदर्शन करत असतो. काय करायचे आहे ते खुणेनी समजावून सांगण्याचे त्यांचे कसब मला फारच अपूर्व भासले. आवडले. तिसरा पाणबुडा जलगच्च प्रकाशचित्रकाने (वॉटरटाईट कॅमेर्‍याने) संचारकर्त्यांचे फोटो काढत असतो. आपण बाहेर येऊन कपडे बदलेपर्यंत, अशा प्रत्येकी १२ फोटोंची एक सी.डी.ही तयार करून आपल्या हाती देत असतात.

आत शिरण्यापूर्वी आम्हाला आठ जणांना एकत्र करून जहाजावरील एका ज्येष्ठ खलाशाने एक पाच मिनिटांचे व्याख्यान दिले. पाण्यात न विरघळणार्‍या शाईचा वापर करून, आठही जणांच्या उजव्या हाताच्या तळव्यामागे ए-८ असे इंग्रजीत लिहूनही ठेवण्यात आले. पाणबुड्यांना आमची ओळख पटावी म्हणून. आपण सुंदर आहे असे दाखविण्यासाठी करतो ती हस्तमुद्रा; ’मला जमते आहे. मी स्वस्थ आहे. आता समुद्रसंचार करू या’ असे सोबतच्या पाणबुड्यांना सांगण्याकरता वापरावी असे सांगण्यात आले. तसेच उजव्या हाताचा अंगठा वरच्या दिशेने दाखवल्यास; ’मला ताबडतोब बाहेर काढा. अस्वस्थ वाटते आहे.’ असा अर्थ सोबतच्या पाणबुड्यांना कळेल आणि ते तुम्हाला बाहेर तत्काळ काढतील. असेही सांगण्यात आले. मात्र ह्याव्यतिरिक्त इतर कुठल्याही हावभावांना आणि खुणांना समुद्रसंचारासंदर्भात काहीही अर्थ नाही, असे बजावून सांगण्यात आले.



खरे तर मी तासाभरापासून नंबर लागण्याची वाट पाहत होतो. लघवीची भावनाही होत होती. मात्र जहाजावर स्वच्छतागृहच नसल्याने, तशी सोय नव्हती. समुद्रात उतरल्यावर सहज विसर्जनाचा विचारही उद्भवला होताच. मात्र प्रत्यक्षात पाण्यात, समुद्रतळाशी पोहोचल्यावर आजूबाजूच्या वाढत्या दाबाच्या प्रभावाने ती भावनाही क्षीण होऊन, नामशेष झाली.

आता आमच्यासोबतच्या एका महिलेस, “फ्लोट होत आहेत” ह्या कारणास्तव बाहेर काढण्यात आले. त्यांचे म्हणणे असे होते की, ’मला चांगले जमते आहे’ ह्या अर्थाने त्यांनी उजव्या हाताचा अंगठा वर करून दाखवला. मात्र आधीच सांगितल्याप्रमाणे ही खूण चुकीची ठरल्याने त्यांना बाहेर काढले गेले. तरीही त्यांचे पूर्ण पैसे, सी-लिंकने संध्याकाळपर्यंत परत केलेले होते. इथे हे नमूद करावे लागेल की, सागरतळाशी अशा शिरस्त्राणासह वावरत असतांना, आपले पाण्यातले वजन कमी भरत असल्याने, चालण्याकरता हलकेच पाऊल उचलले तरी, उडी मारल्यासारखे शरीर वर उसळत असते. अशा परिस्थितीत जमिनीवर पावले रोवून ठेवणे, आणि ताठ, सरळ उभे राहणे अत्यंत जरूर ठरते. कारण ह्या उसळीचा आपल्याला अंदाज यायला जरासा वेळच लागतो. शिवाय आपण खाली वाकलो तर शिरस्त्राणात पाणी शिरून आपल्याला बुडण्याचा धोका संभवतो. एका पाणबुड्यास तीन-चार संचारकर्त्यांवर लक्ष ठेवायचे असल्याने आणि त्याचेवर त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असल्याने, अशा प्रकारे अस्थिर होणार्‍या व्यक्तीस बाहेर काढणे त्यांना क्रमप्राप्तच ठरत असणार.

पहिल्या संचारकर्त्यास हाताने धरून तळाशी गेलेला पाणबुडा खालीच थांबला. दुसर्‍या पाणबुड्याने मग एक एक करून इतर संचारकर्त्यांना खाली आणले. त्यांच्या हातात आधीच खाली उतरलेल्या संचारकर्त्याचा हात सुपूर्त करून तो इतरांना आणायला वर जात असे. तोपर्यंत तळाशी आलेले संचारकर्ते परस्परांचे हात हातात घेऊन समोरच्या दिशेने वाट चालण्याकरता सज्ज होऊन राहत. त्यांच्या माळेच्या एका टोकास पहिल्या पाणबुड्याने घट्ट धरून ठेवलेले होतेच. आता, डोक्यावर शिरस्त्राण, त्यास पाठीमागे जोडलेली हवेची नळी अशा एक एक करून आठही संचारकर्त्यांना दोन पाणबुड्यांच्या संचाने तळापर्यंत आणून सोडले होते. सगळ्यांची तोंडे समोरच्या बाजूला आणि पाठी जहाजाकडे होत्या. त्याच दिशेने सगळ्यांच्या हवेच्या नळ्याही जहाजावरील हवादाबकापर्यंत गेलेल्या होत्या. माळेच्या दोन्हीही टोकांना पाणबुडे होते. अशी मालिका मग एका विहीरसदृश खळग्याच्या कडेवरील पांढर्‍याशुभ्र बारीक वाळूच्या पाऊलवाटेवरून मार्ग चालू लागली.



खळग्यात एके ठिकाणी एक मोठासा खडक उभा होता. त्यावर गुलाबी रंगांची सजीव पोवळी लगडलेली होती. झुडूपांप्रमाणे डोलत होती. मग एका पाणबुड्याने आम्हा एकेकाला सुटे करून आमचा हात त्या पोवळ्यास लावून दिला. सगळ्यात अखेरच्या चित्रात तळाशी मध्यभागी असलेले तपकिरी पोवळे, आम्ही हात लावताच गर्द निळे, जांभळे दिसू लागले. लाजाळूसारखे मिटलेही. हाच प्रयोग मग आम्ही सुट्यासुट्याने आणि एकत्रितपणेही केला. दरम्यान तिसरा पाणबुडा खडकाच्या दुसर्‍या बाजूस जाऊन, जलगच्च प्रकाशचित्रकाने आमचे फोटो काढत होता. आजूबाजूला रंगीबेरंगी मासे स्वैर संचार करत होते. त्यांना हात लाऊन पाहण्याचे आमचे प्रयत्न मात्र असफल होत असत. एक म्हणजे ते अत्यंत चपळ असत. दुसरे म्हणजे पाण्यात खोल असल्याने आमच्या हालचाली अतिशय मंद होत. आणि तिसरे म्हणजे शिरस्त्राणाच्या काचेतून खोलीचा अदमास योग्यप्रकारे येतच नव्हता.

आता आम्हाला हा समुद्र संचार आवडू लागला होता. पण हे सगळे होतपर्यंत आम्हाला वेळेचे भानच राहिलेले नव्हते. सुमारे अर्धा तास तरी गेला असावा. मग जसे खाली आणले होते, तसेच एकेकाला वर नेण्याची प्रक्रिया सुरू झाली. एक पाणबुडा मालिकेचे एक टोक धरून तळाशी थांबला. दुसरा एकेकास शिडीपर्यंत नेऊन, शिडीवरून वरपर्यंत नेई. शिरस्त्राण पृष्ठभागाशी पोहोचताच जहाजावरील कर्मचारी ते काढून बाजूला करी, त्याची नळी काढून टाकी आणि ते बाजूला ठेवून देई. अवजड सामान गाडीत चढवून घ्यावे तसे ते दृश्य दिसे. बाहेर येणारा विजयी वीराच्या आविर्भावात असे. अद्भूत दर्शनाचा आनंद त्याच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहत असे. तर आत उतरण्यास तयार असलेले लोक, आपल्या असंख्य प्रश्नांची उत्तरे त्यांना विचारत असतांना दिसत असत. अशा प्रकारे आमचा हा अद्भुतातला प्रवास सुखरूप पार पडला!

नॉर्थ बे बेटावरून पोर्ट ब्लेअरला परततांना रॉस बेटावर जेवण करायचे होते. जया बोटीतून आम्ही मार्ग आक्रमू लागलो. रॉस बेट, पोर्ट ब्लेअर शहरातून सारखेच दिसत राहते. सुरेख दिसते.



तिथे पोहोचल्यावर वरील पाटी वाचून मात्र धसकाच बसतो. अर्थात तिथे आलेल्या पर्यटकांच्या संख्येच्या तुलनेत, हे दंड वसूल करण्याकरता नेमलेले लोक, दहा टाक्केही नसल्याने किंवा पर्यटकांना उगाच त्रस्त करायचे नाही ह्या धोरणामुळे असेल, पण वरीलप्रमाणे दंडवसूली अजिबातच होत नसावी असे दिसले. बेट मात्र स्वच्छ सांभाळलेले दिसून येते. महासागरी नैसर्गिक सौंदर्याचे कोंदण तर त्याला लाभलेलेच आहे. त्यामुळे ते आवडतेही.



बेटावर अरुंधती राव नावाची एक खासगी मार्गदर्शक आहे. ती माफक दरात, शुल्क घेऊन, पर्यटकांचे प्रबोधन करत असते. मात्र तिची खासियत ही आहे की ती, खार, हरणे, ससे, मोर इत्यादिकांना त्यांच्या नावाने हाका मारते. ते लोक येतात. ती मग सोबत आणलेले ब्रेड त्यांना खायला देते. हे हरीण बदमाश आहे. लहान मुलांना मारेल. सांभाळा. ते हरीण आंधळे आहे. काही करणार नाही. अशा माहित्याही देत असते. प्रवासी तिच्या व्याख्यानांवर खूश असतात. त्या प्राण्यांसोबत आपापली प्रकाशचित्रे काढून घेत असतात. तेही सुखाने प्रकाशचित्रे काढू देत असतात. अशा रीतीने रॉस बेटाची संस्मरणीय सफर, तासाभरात सुखाने संपन्न होते.



अरुंधती रावने ओढणीत बांधून घेतलेला जखमी ससा आणि तिने बोलावल्यावर धाऊन आलेली हरणे.

एम.व्ही.जया ह्या बोटीतून मग आमचा अंदमानातील अखेरचा समुद्रप्रवास, पोर्ट ब्लेअरच्या दिशेने सुरू झाला. संपूच नये असे वाटत असतांनाच संपलाही.



परतीचा प्रवास दुसरे दिवशी विमानाने चेन्नईकडे उड्डाण भरून सुरू झाला. प्रवासाला निघाल्यावर विमानातून भारतभूमीची प्रकाशचित्रे काढावी अशी इच्छा झाली खरी. पण कॅमेरा बंदिस्त करून चेक-इन लगेजमध्ये ठेवलेला होता आणि मोबाईल बंद केलेला होता. परतीच्या प्रवासात मात्र आठवणीने मोबाईल फ्लाईट मोडवर टाकून, विमानातून असंख्य प्रकाशचित्रे काढली. खाली दिसणार्‍या दृशांचा, ज्ञात भौगोलिक ठिकाणांशी संबंध जोडायचे प्रयत्न मात्र यशस्वी झाले नव्हते. घरी आल्यावर जेव्हा असे प्रयत्न वेगळ्याने केले तेव्हा, कृष्णानदीवरले येरलवाडी आणि शिरसवाडी धरण मात्र विमानातून काढलेल्या फोटोत, त्यांच्या आकारांवरून आणि परस्पर तुलनेतील त्यांच्या स्थानांवरून स्पष्ट ओळखू येत आहे.



Yeralwadi Dam on Krishna River on Google Map. And WP_20150303_138.jpg, 03 March 2015, 14:41:02, From GoAir’s G8-304 Chennai-Mumbai Flight-30F.

त्यानंतर संपूच नये असा वाटणारा अंदमानाचा प्रवास लवकरच पूर्णत्वास आला. मुंबई विमानतळावर त्याची सांगता झाली.

http://nvgole.blogspot.in/2015/03/blog-post.html#links ह्या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.


प्रतिक्रिया द्या
32024 वाचन

💬 प्रतिसाद (46)
श
श्रीरंग_जोशी Fri, 03/20/2015 - 15:42 नवीन
अंदमान बेटांच्या सहलीचे एवढे तपशीलवार वर्णन प्रथमच वाचण्यास मिळाले. फोटोही आकर्षक दिसत आहेत. काही शब्द जसे संचारकर्ते जरा बोजड वाटले.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 03/20/2015 - 20:08 नवीन
अंदमान बेटांच्या सहलीचे एवढे तपशीलवार वर्णन प्रथमच वाचण्यास मिळाले. फोटोही आकर्षक दिसत आहेत. +१००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
ए
एस Sat, 03/21/2015 - 01:49 नवीन
आता कुठे अंदमान-निकोबार बेटे जरा जवळ आल्यासारखी वाटताहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
प
पॉइंट ब्लँक Mon, 03/23/2015 - 12:43 नवीन
+१, फोटोवर तारिख जरा जास्तच बटबटीत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
न
नरेंद्र गोळे Mon, 07/09/2018 - 12:59 नवीन
इथल्या माय मराठीचे वैभव आहे ते! बाहेरच्यांना लंकेत सोन्याच्या विटा वाटल्या तरी चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
ब
बाबा पाटील Fri, 03/20/2015 - 15:50 नवीन
पण नशिब तिथल्या बेटांच्या नावाचेही काही मराठी भाषांतर नाही सुचले.
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 03/21/2015 - 01:51 नवीन
'शहीद - स्वराज्य' हे देखील चाललं असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील
आ
आदूबाळ Fri, 03/20/2015 - 16:10 नवीन
हाय हाय! खरं सांगतो लय हेवा वाटला तुमचा. अंदमानला जायचं दोन वेळा ठरवलं होतं. एकदा अभ्यासामुळे/परीक्षेमुळे रद्द करावं लागलं आणि एकदा पैशाच्या अभावामुळे. अंदमान, मालदीवज, फिजी आणि बाली हे पर्यटनयादीत अनेक वर्षं धूळ खात पडून आहे. प्रवासवर्णन आवडलं हेवेसांनल.
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 03/20/2015 - 16:21 नवीन
अंदमान सफरीचा वृत्तांत मस्तच झालाय. चित्रेही आवडली.
  • Log in or register to post comments
ट
टिनटिन Fri, 03/20/2015 - 18:51 नवीन
हे जरुरी नाही. हॅवलॉकला तर स्कुबासाठी मला नम्बरवाला मुखवटापण मिळाला होता. (-३)
  • Log in or register to post comments
स
स्रुजा Fri, 03/20/2015 - 18:59 नवीन
छान सफर. मला पण जायचंय अंदमान ला. छान अगदी तपशीलवार लिहिलंय. वा. खू. साठवायला हवी. दोन भागात पण चाललं असतं हे :)
  • Log in or register to post comments
ज
जुइ Fri, 03/20/2015 - 23:21 नवीन
अनेक वर्षापुर्वी जेव्हा अंदमानची सफर केली होती तेव्हा सेल्युलर जेलचा म्युझीक आणि लाईट शो दोन वेळा जाउण पाहिल्याचे आठवते.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 03/21/2015 - 04:19 नवीन
सुंदर प्रवासवर्णन. फोटोही खूप आवडले.
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Sat, 03/21/2015 - 06:50 नवीन
गोळे साहेब, अगदी सुरेख व तपशिलवार वर्णन. अंदमानला जाताना प्रत ब्रोबर नेली पाहिजे:)
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 03/21/2015 - 07:48 नवीन
पॅडॉक लाकूड हे अत्यंत घट्ट आणि वजनदार असते आणि अंदमानला ते मुरण्यासाठी एक वर्ष समुद्राच्या पाण्यात ठेवले जाते असे ऐकले आहे. मी तेथून आणलेले लाकडाच्या काही वस्तू पनवेलला सासर्यांच्या घरात ठेवलेल्या आहेत (कोपर्यातील उभा शो पीस वगैरे) २६/७ च्या पावसात त्यांच्या घरात पाणी शिरल्याने ते पार भिजून गेले. प्लायवूडच्या त्यांच्या वस्तू भिजून पार वाकड्या तिकड्या झाल्या परंतु हे अंदमानचे फर्निचर आजही जसेच्या तसे (पॉलीशसकट) आहे. अंदमानवर एक लेखमाला अर्धवट ( पूर्वेच्या समुद्रात) मुरण्यासाठी ठेवली आहे(जाहिरात) . परंतु त्यात समुद्राच्या बाजूने अंदमान हा भाग येईल. आपले लेखन सर्वसामान्य पर्यटकांना उत्तम माहिती चा स्त्रोत आहे. बाकी अंदमानच्या आसपास समुद्र अत्यंत सुंदर निळा किंवा हिरवा ( जागेप्रमाणे) आणि स्वच्छ आहे. जमलं तर अंदमानला एक महिना कुटुंबासमवेत राहून पूर्ण उत्तर ते दक्षिण पाहायचा विचार आहे.
  • Log in or register to post comments
न
नरेंद्र गोळे Sun, 03/22/2015 - 07:45 नवीन
श्रीरंग जोशी, इस्पिक एक्का, स्वॅप्स,बाबा पाटील, आदूबाळ, रेवती, टिनटिन, स्रुजा, जुइ, वल्ली, सर्वसाक्षी आणि सुबोध खरे, सगळ्यांना प्रतिसादांखातरः मनःपूर्वक धन्यवाद! टिनटिन, स्कूबा डायव्हिंगकरता पोहोणे यावेच लागते असे नाही. ही माहिती नवीन आहे. तुम्ही गेला होतात तेव्हा तुम्हाला पोहोणे येत होते का?
  • Log in or register to post comments
ट
टिनटिन Mon, 03/23/2015 - 11:54 नवीन
@ नरेंद्र गोळे - मला पोहोणे येत होते पण माझ्या मित्राला येत नाहि, तरी त्यानेही स्कूबा डायव्हिंग केले. स्कूबासूट मध्ये air pressure साठी एक बटन असते. ते वापरुन पाण्याखाली जाता येते. हे सगळे instructor सोबत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेंद्र गोळे
न
नरेंद्र गोळे Tue, 03/31/2015 - 13:06 नवीन
मला पोहोणे येत नाही. पण आता स्कूबा डायव्हिंगला घाबरायची गरज नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टिनटिन
न
नरेंद्र गोळे Sun, 03/22/2015 - 07:47 नवीन
अंदमानवर एक लेखमाला अर्धवट ( पूर्वेच्या समुद्रात) मुरण्यासाठी ठेवली आहे(जाहिरात) . परंतु त्यात समुद्राच्या बाजूने अंदमान हा भाग येईल. >>>> येऊ द्या. प्रतीक्षेत आहे! आपले लेखन सर्वसामान्य पर्यटकांना उत्तम माहिती चा स्त्रोत आहे.>>>> धन्यवाद! जमलं तर अंदमानला एक महिना कुटुंबासमवेत राहून पूर्ण उत्तर ते दक्षिण पाहायचा विचार आहे. >>>>> मलाही कळवा मला संधी मिळाली तर मलाही आवडेल.
  • Log in or register to post comments
ज
जयन्त बा शिम्पि Sun, 03/22/2015 - 20:18 नवीन
सुंदर माहीती व छान फोटो आम्हाला आमच्या २००७ मधिल सहलीची आठवण झाली आभार
  • Log in or register to post comments
ह
हाडक्या Sun, 03/22/2015 - 22:57 नवीन
साहेब वर्णन तर मस्तच. आणि फोटो पण छान आहेत.. :) फक्त एक अगदी अवांतर :
कृष्णानदीवरले येरलवाडी आणि शिरसवाडी धरण मात्र विमानातून काढलेल्या फोटोत, त्यांच्या आकारांवरून आणि परस्पर तुलनेतील त्यांच्या स्थानांवरून स्पष्ट ओळखू येत आहे.
येरळवाडी (येरलवाडी नव्हे) हे धरण येरळा नदीवर आहे. आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या पण दुष्काळी भागातल्या वाळल्या अंगाच्या पण काटक अशा नद्यांपैकी ही एक आहे. कृष्णा, कोयना अथवा गोदावरीसारखे भाग्य नाही हिच्या नशीबात पण तरीही वाळवंटातली जीवनदायिनी अशी नदी आहे (उन्हाळ्यात लोकं हिच्या पात्रात विहिरी काढून पाणी मिळवतात आणि कडक उन्हाळे काढतात). असो. :)
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Mon, 03/23/2015 - 00:45 नवीन
तपशिलवार वर्णन आवडले. मराठी शब्दांचा इतका अट्टाहास काही कळला नाही, जसे की जलगच्च कॅमेरा...
  • Log in or register to post comments
न
नरेंद्र गोळे Mon, 03/23/2015 - 03:09 नवीन
जयंत, हाडक्या आणि स्पंदना; सगळ्यांना प्रतिसादांखातर मनःपूर्वक धन्यवाद! येरळवाडी (येरलवाडी नव्हे) हे धरण येरळा नदीवर आहे. आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या पण दुष्काळी भागातल्या वाळल्या अंगाच्या पण काटक अशा नद्यांपैकी ही एक आहे. कृष्णा, कोयना अथवा गोदावरीसारखे भाग्य नाही हिच्या नशीबात पण तरीही वाळवंटातली जीवनदायिनी अशी नदी आहे (उन्हाळ्यात लोकं हिच्या पात्रात विहिरी काढून पाणी मिळवतात आणि कडक उन्हाळे काढतात). >>>>>>>>> अतिशय मोलाच्या माहितीची भर घातलीत. लोकांची जीवनदायिनी असलेल्या येरळा नदीने, आकाशातूनही लक्षवेधी ठरावे हा मात्र आगळाच योगायोग आहे! मराठी शब्दांचा इतका अट्टाहास काही कळला नाही, जसे की जलगच्च कॅमेरा...>>>>> हं! पण कदाचित त्यामुळेच आपणही जलगच्च शब्द वापरलात ही आनंदाची गोष्ट आहे. प्रकाशचित्रकाला (कॅमेर्‍याला)मात्र अजूनही ते सौभाग्य मिळालेले दिसत नाही. असो. भविष्यात तेही घडून येईल, असा विश्वास आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Mon, 03/23/2015 - 03:46 नवीन
जलगच्च हे वॉटरटाइटचे शब्दशः भाषांतर वाटते. त्याऐवजी वॉटरप्रूफ या अर्थाचा सुटसुटीत मराठी शब्द बनवता आल्यास उत्तम. गूगल ट्रान्सलेटरने वॉटरप्रूफसाठी जलरोधक हा शब्द सुचवला आहे. तसेच वॉटरटाइटसाठी मराठी शब्द सुचवला नाही. पण हिंदी मात्र सुचवला (जलाभेद्य).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेंद्र गोळे
न
नरेंद्र गोळे Mon, 03/23/2015 - 04:30 नवीन
वॉटरटाइटसाठी मराठी शब्द सुचवला नाही. पण हिंदी मात्र सुचवला (जलाभेद्य).>>>>>> जलाभेद्य शब्द मराठीकरताही अत्यंत चपखलपणे मूळ अर्थ अभिव्यक्त करतो. मी तो स्वीकारला आहे. त्याकरता आपणास मनःपूर्वक धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
म
मितान Mon, 03/23/2015 - 03:38 नवीन
सविस्तर लिहिलेले प्रवासवर्णन आवडले. अंदमानला जाण्याची इच्छा फोटो बघून अधिक प्रबळ झाली !
  • Log in or register to post comments
न
नरेंद्र गोळे Mon, 03/23/2015 - 04:32 नवीन
अंदमानला जाण्याची इच्छा फोटो बघून अधिक प्रबळ झाली ! >>>> लेखाचे सार्थक झाले म्हणायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान
म
मॅक Mon, 03/23/2015 - 08:05 नवीन
अंदमान बद्दल इतक सविस्तर वर्णन(सचित्र) प्रथमच वाचायला मिळाले..... त्या ठिकाणाबद्दल कुतूहल आहे.... बघूया कधी योग येतोय.......
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 03/23/2015 - 08:16 नवीन
एक नंबर लेख. लय आवडला, अंदमानास जायची इच्छा जागृत झाली.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Mon, 03/23/2015 - 13:08 नवीन
गोळेसाहेब आपणाला माणशी साधारण किती खर्च आला सांगु शकाल काय? बाकी लेख उत्तमच, फोटोही मस्त आलेत.
  • Log in or register to post comments
न
नरेंद्र गोळे Tue, 03/24/2015 - 01:32 नवीन
माणशी साधारण ५५,००० खर्च आला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे
न
नाखु Tue, 03/31/2015 - 13:23 नवीन
हवाई मार्गे असल्याने आहे काय कारण पुण्यातील एक यात्रा कंपनी (जाहीरातीत तेच एकमेव प्रतिनिधी आहेत लक्षद्वीप व अंदमानचे असा ठळक उल्लेख आहे)बोटीनेही आयोजीत करतात त्याबद्दल काही माहीती आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेंद्र गोळे
न
नरेंद्र गोळे Wed, 07/08/2015 - 13:20 नवीन
कोलकाता आणि चेन्नईवरून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
न
नरेंद्र गोळे Tue, 03/24/2015 - 01:31 नवीन
मॅक, बॅटमन आणि राजेंद्र मेहेंदळे सगळ्यांना प्रतिसादांखातर मन:पूर्वक धन्यवाद!
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 03/31/2015 - 14:56 नवीन
अप्रतिम प्रवास वर्णन आणि फोटो सुद्धा. अंदमान ची ट्रीप कधी होईल तेंव्हा तुमच्या या लेखाचा संधर्भ नक्की घेता यावा म्हणुन वाचणखूण साठवलेली आहे
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 04/01/2015 - 07:20 नवीन
प्रवास वर्णन आवडले... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मेरा कुछ सामान..
  • Log in or register to post comments
न
नरेंद्र गोळे Sun, 05/10/2015 - 09:08 नवीन
धन्यवाद, मदनबाणा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
र
रवीराज Tue, 05/12/2015 - 04:17 नवीन
अगदी विस्तृत आणि सचित्र वर्णन आवडले.
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 05/12/2015 - 04:35 नवीन
खूप छान तपशीलवार वर्णन आणि फोटो!
  • Log in or register to post comments
न
नरेंद्र गोळे Wed, 07/08/2015 - 13:18 नवीन
गणेशा, रवीराज आणि पैसाताई प्रतिसादांखातर धन्यवाद!
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Wed, 07/08/2015 - 18:33 नवीन
फारच छान वर्णन. तुमच्या अंदमानी सहलिचे वर्णन वाचून अंदमान माझ्या मस्ट विज़िट यादीत गेला आहे. बघू कधी जमेल ते.
  • Log in or register to post comments
न
नरेंद्र गोळे Wed, 12/16/2015 - 15:45 नवीन
अंदमान अवश्य पाहा. आपल्या भरतभूमीचे अपार लावण्य तिथे पाहायला मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति
श
श्वेता२४ Wed, 07/11/2018 - 08:47 नवीन
तपशीलवार वर्णन असल्यामुळे जेव्हा जाईन तेव्हा सहलीचे नियोजन तुमचा लेख वाचूनच करेन . फोटोसुद्धा खूप छान
  • Log in or register to post comments
I
II श्रीमंत पेशवे II गुरुवार, 07/12/2018 - 06:33 नवीन
छान वर्णन.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Tue, 02/19/2019 - 09:12 नवीन
अंदमानबद्दल माहिती गोळा करायला सुरुवात करावी म्हणुन गूगलवर मिसळपाव अंदमान म्हणुन शोधायला सुरुवात केली आणि हा लेख पहिलाच सापडला. फोटोही सुंदरच. ३ वर्षे झाली असल्याने तपशीलात आणि खर्चात काही फरक पडले असतील, पण लेख माहितीपुर्ण आणि वाचनीय आहे. एकच भागात संपविल्याने जरा धावते वर्णन वाटले. पण एकुण अनुभव सुंदर वाटतोय. यावर्षी निवडणुकांमुळे परीक्षाही लवकरच होणारेत, त्यामुळे जमवावे म्हणतो.
  • Log in or register to post comments
ख
खंडेराव Tue, 02/19/2019 - 09:43 नवीन
लेख आवडला..भरपूर माहिती मिळाली. सी walk विषयी इतक्या विस्तृतपणे पहिल्यांदाच वाचायला मिळाले मराठीत. गोव्या मध्येही बॅट बेटाजवळ हि सेवा उपलब्ध आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा