Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्राइम टाईम आणि व्यक्तिस्वातंत्र्य

आ
आकाश खोत
गुरुवार, 04/09/2015 - 16:21
🗣 83 प्रतिसाद
महाराष्ट्र सरकारने मराठी चित्रपटांना पाठबळ देण्यासाठी एक स्तुत्य असा निर्णय घेतला. राज्यातील मल्टीप्लेक्स चालकांना संध्याकाळी ६-९ अशा मोक्याच्या वेळी मल्टीप्लेक्स मधील एका स्क्रीनमध्ये मराठी चित्रपट दाखवणे बंधनकारक केले आहे. हे न पाळणाऱ्या चित्रपटगृहावर कारवाई करण्यात येईल. हा निर्णय जाहीर करताच त्याला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. मराठी कलाकार आणि मराठी रसिक नक्कीच या निर्णयाबद्दल शासनाचे अभिनंदन करतील. परंतु हिंदी चित्रपटसृष्टीतील काहीजणांना हे पचलेले दिसत नाही. महेश भट, शोभा डे अशा कुठल्याही विषयावर बडबड करणाऱ्या स्वयंघोषित विचारवंतांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. अशा मंडळीत आता ऋषी कपूरसुद्धा सामील झालेले दिसतात. सरकारचे प्रत्येक निर्णय स्तुत्य नसतात. सरकारने घेतलेला गोहत्याबंदीचा निर्णय मला पटलेला नाही. त्या विषयावर बोलायला नको. तो एक स्वतंत्र विषय आहे. पण मुद्दा हा कि मला सरकारचे सगळेच निर्णय पटतात असे नाही. त्या त्या निर्णयामागची कारणे समजून घेतली पाहिजेत आणि मग मत बनवले आणि मांडले पाहिजेत. ह्या मंडळींनी हा आमच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर, व्यवसायस्वातंत्र्यावर हल्ला आहे, यामुळे हिंदी चित्रपटांचे नुकसान होईल, हि हुकुमशाही आहे, जो चांगला चित्रपट आहे तो आपोआप टिकतो अशी मल्लीनाथी केली आहे. अर्थात या मंडळींना असे वाटणारच. मराठी चित्रपटांना डावलून त्यांच्या चित्रपटांना जी जागा मिळत होती, ती आता यामुळे जाईल आणि नुकसान होईल हीच यांची खंत असावी. शोभा डे या मुळच्या मराठी असणाऱ्या उच्चभ्रू महिलेने तर " आता मल्टीप्लेक्स मध्ये पॉपकोर्न बंद करून दही मिसळ आणि वडापाव मिळणार. मराठी चित्रपटांबरोबर तेच शोभेल " अशी सरकारवर टीका करण्याच्या नादात मराठी खाद्यपदार्थांची खिल्ली उडवली आहे. सध्याची वस्तुस्थिती काय आहे? तुम्ही मराठी चित्रपट पाहत असाल, तर आठवा कि मराठी चित्रपटांच्या वेळा कशा असतात? सकाळी ११ वाजता, दुपारी साडे तीन वाजता, पाच वाजता. दिवसातून तीन चारच खेळ आणि तेही अशा अडचणीच्या वेळी. अशा वेळी कोण चित्रपट पाहू शकतो? फक्त विद्यार्थी, गृहिणी, निवृत्त लोक. जे लोक दिवसभर कामावर जातात, आणि ज्यांना चित्रपट पाहण्याची इच्छा आहे, त्यांना काय पर्याय आहे? एकेका मल्टीप्लेक्स मध्ये ३-४ स्क्रीन असूनसुद्धा ते हिंदी चित्रपटांना प्राधान्य देतात. हिंदी चित्रपट जास्त गल्ला कमावतील हे रास्त गणित. आणि याला काही अंशी मराठी प्रेक्षक आणि कलाकारसुद्धा जबाबदार आहेत. किती तरी वर्षे मराठी चित्रपट एकसुरी, कंटाळवाणे आणि फाजील विनोदी होते. त्या तोचतोचपणाला कंटाळून मराठी प्रेक्षकांनी चित्रपटांकडे पाठ फिरवली. पण आपल्या डोळ्यांसमोर हि परिस्थिती बदलतेय. चांगले चित्रपट येतायत, त्यांना चांगला प्रतिसादसुद्धा मिळतोय. गेल्या २-३ वर्षात मी जे जे मराठी चित्रपट, चित्रपटगृहात जाऊन पाहिले, तेव्हा प्रत्येक वेळी चांगली गर्दी जमलेली होती. सध्या हिंदीत भारतात १०० करोड कमावणाऱ्या चित्रपटांचे कौतुक होते. भारतात एवढी राज्ये असताना १०० कोटींच्या गल्ल्याचे असे कौतुक होते. दुनियादारी, टीपी, लय भारी, या चित्रपटांनी फक्त महाराष्ट्र या एकाच राज्यातून ३०+ कोटींचा गल्ला जमवला. पण तरीही मराठी चित्रपट दाखवण्याबद्दल चित्रपटगृहाचे चालक अनास्था दाखवतात. पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी ५-६ (तेही जास्त सांगतोय) खेळ असणाऱ्या चित्रपटाची पहिल्याच सोमवारी २-३ खेळ अशी अवस्था होऊन जाते. आणि बऱ्याचदा पहिल्यादिवशी सुद्धा असेच विचित्र वेळी खेळ लावलेले असतात. आणि त्याला प्रेक्षक आले नाहीत कि धंदा होत नाही अशी ओरड करून खेळ कमी करून टाकतात. हे विचारवंत चांगला चित्रपट आपोआप चालतो, survival of the fittest अशी टीका करत आहेत. हिंदीत चांगला चित्रपट न चालल्याची कमी उदाहरणे आहेत का? प्रश्न फक्त चांगला चित्रपट लोकांपर्यंत पोचण्याचा नाही, त्याला तेवढी संधी देण्याचा आहे. जर संधीच दिली नाही आणि चांगला चित्रपट जास्त लोकांपर्यंत पोचू शकला नाही, म्हणजे तो चित्रपट चांगलाच नव्हता असे आपण म्हणणार? राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये गेली काही वर्षे मराठी चित्रपट सातत्याने बाजी मारत आहेत. पण यातले अनेक चित्रपट कधी लागून गेले हेच माहित नसते. कितीतरी चित्रपट पुरस्कारानंतर पुन्हा प्रदर्शित होतात. आणि आता राष्ट्रीय पातळीवर गुणवत्ता सिद्ध केलेली असूनसुद्धा त्यांना पुरेसे आणि चांगल्या वेळचे खेळ मिळत नाहीत. चांगला चित्रपट बनविण्यासाठी कलाकारांनी आणखी काय करावे? आणि तो प्रेक्षकांपर्यंत पोहचावा, त्यांना तो सहज बघता यावा याची काळजी घेतली गेली नाही तर चित्रपटांची प्रगती कशी होणार? आणि हि स्थिती आजची नाही. मी दादा कोंडकेंचे आत्मचरित्र वाचले. दादा कोंडकेंना आपला "सोंगाड्या" हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी चित्रपटगृहाच्या मालकांकडे खेटे मारावे लागले होते, विनवण्या कराव्या लागल्या होत्या. तरीही कोणी तयार झाले नाही. शेवटी बाळासाहेब ठाकरे यांनी मध्ये पडून जेव्हा त्यांना धमकावले, तेव्हा कुठे तो चित्रपट प्रदर्शित झाला, आणि त्या चित्रपटाने आणि दादा कोंडकेंच्या पुढच्या अनेक चित्रपटांनी इतिहास घडवला. पण त्यांना संधीच न मिळती तर? एखाद्या चित्रपटाला संधी देऊन तो वाईट निघाला अथवा प्रेक्षकांना आकर्षित करू शकला नाही, तर ती त्या चित्रपटातली कमतरता आहे. पण त्याला संधीच मिळत नसेल तर हि व्यवस्थेतली कमतरता आहे. मागे एकदा एका मल्टीप्लेक्सने ऐनवेळी एका मराठी चित्रपटाचा खेळ रद्द केला. तिथे तिकिटे काढून चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या मराठी रसिकांनी चालकांशी भांडण करून त्यांना खेळ दाखवण्यास भाग पाडले. दक्षिणेतल्या प्रत्येक राज्यात तिथल्या स्थानिक भाषेतल्या चित्रपटांची सद्दी असते. तिथे हिंदी चित्रपट स्थानिक चित्रपटांच्या तुलनेत कमी धंदा करतात. इथे कोणी आक्षेप घेत नाही. कारण तिथे त्या प्रेक्षकांचीच तशी मागणी असते. हिंदी चित्रपट कमी चालावेत हि माझी किंवा कोणाचीही इच्छा नाही. महाराष्ट्रात आणि भारतात सर्व प्रकारच्या, सर्व भाषेतल्या कला बहराव्यात. पण त्याच बरोबर मराठी चित्रपटसुद्धा बळकट व्हावेत. महाराष्ट्रात शासनाने या दिशेने हस्तक्षेप केलेला आहे. काही दिवसात प्रेक्षकांनी याला चांगला प्रतिसाद देऊन हा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध करावे. आणि चांगल्या संख्येत आणि चांगल्या वेळी मराठी चित्रपट दाखवणे चालकाला शासकीय बंधनाने नव्हे तर प्रेक्षकांच्या मागणीमुळे भाग पडावे.

प्रतिक्रिया द्या
21430 वाचन

💬 प्रतिसाद (83)
ख
खटपट्या Tue, 04/14/2015 - 01:41 नवीन
प्रतिसाद वाचला नाहीये. पण नुसत्या टंकनक्षमतेला _/\_ दंडवत !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
आ
आनन्दिता Tue, 04/14/2015 - 02:07 नवीन
+१ टंकनक्षमतेला दंडवत =)) पण मी प्रतिसाद पुर्ण वाचलाय आणि मला तो अतिशय आवडला. खुप मुद्देसुद विष्लेषण. थोडीशी असहमती कंगणाबद्दल. तिला बिचारीला पण छोट्या शहरातुन आलीये म्हणुन, इंग्रजी निट बोलता येत नाही म्हणुन बरंच हिणवण्यात आलंय. फॅशन चित्रपटाचा प्रियांका ला जितका फायदा झाला तितका हिला मिळाला नाही. त्यानंतरही तिला छोटे ब्यानर चे चित्रपट स्विकारावे लागले. इतकच नाही तर तेलुगु मध्ये पण काम करावं लागलं. तनु वेड्स मन्नु, क्वीन सारखे चित्रपट अगदी लो बजेट होते, फक्त ते हीट झाले आणि कंगणाला दोन्हीवेळा लॉटरी लागली. या धाग्यावर कंगणाचा विषय आवांतर आहे. त्यामुळे सद्ध्या इतकच. बाकीच नंतर कधीतरी तर क्लिंटन जी तुम्ही कन्विन्स झाला आहात की संदीप भौ ना अजुन बोलुद्या?? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 04/14/2015 - 06:10 नवीन
आवडती हिर्वीण आहे ती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता
क
क्लिंटन Tue, 04/14/2015 - 06:40 नवीन
धन्यवाद संदीप.
तेव्हा त्या भाईच्या पैश्यावर चाप लावणे वैगेरे प्रॅक्टीकल नसणारे उपाय तुम्ही सुचवले पण तेच मराठी चित्रपटाच्या मागे उभे राहायचे लॉजिकल आणि पुर्ण प्रॅक्टीकल विचार आपणास पटत नाहीत हे काही मला उमजले नाही.
मी सरकारच्या दृष्टीकोनातून लिहित आहे कारण हा निर्णय सरकारने घेतला आहे.तेव्हा अंडरवल्डला चाप लावणे यात प्रॅक्टिकल नसण्यासारखे काय आहे? किंबहुना ते तर सरकारचे कर्तव्यच आहे. बाकी तुम्ही इतर काही मुद्दे मांडले आहेत त्यावर काहीसे आधारीत एक उदाहरण देतो. प्रत्येक शहरात शाळा-कॉलेजातील विद्यार्थ्यांसाठी क्लासेस असतातच. आता समजा कुठली मोठी कंपनी या उद्योगात उतरली आणि भरपूर पैशाच्या जोरावर त्यांनी प्रत्येक शहरात आपल्या शाखा उघडल्या तर या लहान क्लासवाल्यांपुढे आव्हान उभे राहणार हे नक्कीच. अशावेळी या क्लासवाल्यांनी काय करायला हवे? माझ्यामते--- आपण नक्की कोणत्या विद्यार्थ्यांना टारगेट करणार आहोत हे ठरवावे (हुषार/मध्यम, भरपूर फी भरू शकणारे-- म्हणजे प्रत्येक वर्गात कमी विद्यार्थी चालतील आणि विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देता येईल, फार फी भरू न शकणारे--म्हणजे एका वर्गात जास्त विद्यार्थी घ्यावे लागतील इत्यादी). तसेच या विद्यार्थ्यांना नक्की काय हवे असते--- (पीपीटी दाखवून हे विद्यार्थी आकर्षित होतात की त्यांना प्रेझेंटेशन कसेही असले तरी चांगले शिकविलेले हवे असते इत्यादी) हे बघावे आणि आपण या विद्यार्थ्यांना त्यांना पाहिजे असती अशी कुठची युनिक गोष्ट देतो आणि कशी (जी ही कंपनीवाले देऊ शकणार नाहीत) ती समजून घेऊन त्यावर कॅपिटलाईझ करून आपला व्यवसाय पुढे न्यावा. प्रत्येक व्यावसायिकाकडे अशी कुठलीतरी युनिक गोष्ट असतेच. पण ती गोष्ट भावेल अशा विद्यार्थ्यांना टारगेट न केल्यास त्याचा फार उपयोग होणार नाही. आता कंपनीवाले गुंडगिरी करून या क्लासेसवाल्यांवर दमदाटी करत असतील तर तो कायद्याचा प्रश्न झाला आणि त्यावर चाप लावायलाच हवा. आता या उदाहरणात क्लासऐवजी चित्रपट व्यवसाय घेतला तर तो व्यवसाय वेगळा असल्यामुळे काही प्रमाणात आयाम बदलतील.पण तरीही आपण नक्की कोणाला टारगेट करणार आहोत, त्यांना काय हवे असते, त्यांना हवी असलेली कोणती गोष्ट आपण देऊ शकतो आणि कशी इत्यादी विश्लेषण बदलणार नाही. यातही हिंदी चित्रपटवाले गुंडगिरी करत असतील तर त्यांना चाप सरकारने लावायलाच हवा. शेवटी सरकारचे काम सर्वांना लेव्हल प्लेईंग फिल्ड उपलब्ध करून देणे.चित्रपट उद्योगात हे का होत नाही यामागे हिंदी चित्रपटांमध्ये प्रचंड प्रमाणावर असलेला अंडरवल्डचा पैसा हे एक नक्कीच मोठे कारण आहे.कारण पैसा आणि मसल पॉवर या जोरावर डिस्ट्रीब्युटर दादागिरी करणार.हे कारण नाकारणे म्हणजे खोलीतील हत्तीचे अस्तित्व नाकारण्यासारखे आहे (denying the existence of elephant in room). आणि या अंडरवल्डवर चाप लावणे हे सरकारचे कर्तव्य आहे.त्यांना ते करता येत नसेल तर आपली अकार्यक्षमता लपवायला बघा आम्ही मराठी चित्रपटांना कशी मदत करत आहोत हे चित्र उभे करणे कितपत समर्थनीय आहे? तेव्हा भाईला चाप लावणे यात प्रॅक्टिकल नसण्यासारखे काय आहे हे समजले नाही.
माझ्यामते प्रत्येक व्यवसायाच्या काही समस्या असतात.
बरोबर आहे ना. आव्हाने कुठे नसतात? आणि आव्हानांना घाबरणारा माणूस कधीच यशस्वी होऊ शकणार नाही--नोकरीतही तेव्हा व्यवसायात तर अजिबातच नाही.आणि या आव्हानांवर मात करून आपला मार्ग काढणारे लोकच पुढे जातात बाकीचे नाही.
तुम्हीच उदाहरण दिले म्हणून तेच उदाहरण देतो. विडीओ-कॅसेट गेल्या, सीडी-डीवीडी आल्या, टेपरेकॉर्डर गेले वॉक्मन आले, तेही गेले, आयपॉड आला, तोही जाऊन आयफोन आले. पण हे सर्व विकणारे बदलले नाहीत ना विकत घेणारे. ह्या विकण्याच्या धंद्यात जे पुर्वापार होते तेच आहेत अजुनही.
तुम्ही त्याच लोकांची उदाहरणे देत आहात ज्यांनी बदलता काळ लक्षात घेऊन अशा आव्हानांमुळे आपल्या व्यवसायाचे स्वरूप बदलले.पण जे हे करण्यात अयशस्वी होतात ते मागे पडतात.फोनमध्ये कॅमेरे आल्यापासून कोडॅकसारखी एकेकाळची अग्रेसर कंपनीही आता अडचणीत सापडली आहे. ५-६ वर्षांपूर्वीपर्यंत आघाडीची आणि फिनलंडचे वैभव असलेल्या नोकिया कंपनीचे काय झाले हे आपण बघतच आहोत. तेव्हा माझा मुद्दा तोच आहे.आव्हाने सगळीकडे असतात.त्यांच्यावर मात करणारे यशस्वी होतात आणि जे लोक असे करू शकत नाहीत ते यशस्वी होत नाहीत. यावेळी सरकारचे काम इतकेच की सर्वांना लेव्हल प्लेईंग फिल्ड उपलब्ध करून देणे आणि त्यातून जे यशस्वी व्हायचे ते होतीलच. पण हे लेव्हल प्लेईंग फिल्ड उपलब्ध करण्यात महत्वाची भूमिका बजावू शकेल अशा उपायाला तुम्ही impractical म्हणत आहात. आणि चित्रपटवाल्यांनी आपण फार मोठी संस्कृती जपत आहोत वगैरे आव आणू नये.तो त्यांचा व्यवसाय आहे.आणि इतर व्यवसायांप्रमाणे त्यालाही ट्रिट करायला हवे.माझेच उदाहरण द्यायचे तर मी पण विकांताला एका क्लासमध्ये शिकवायला जातो.माझ्या शिकविण्याचा फायदा होऊन निदान काही विद्यार्थ्यांचा तरी फायदा झालाच असेल.तरीही मी हे शिकवायला जाऊन फार मोठी समाजसेवा करत आहे असे मला तरी अजिबात वाटत नाही.त्यासाठी मला पैसे मिळतात.आणि ज्या क्षणी मला पैसे मिळणे बंद होईल किंवा कष्टाच्या तुलनेत पैसे कमी मिळतात असे वाटेल त्यावेळी मी ते बंद करेन. माझा हा पेशा झाला तसा चित्रपटवाल्यांचाही तो व्यवसाय आहे. आपण फार मोठी संस्कृती वगैरे जपतो अशा गमजा त्यांनी मारू नयेत. मराठी संस्कृती अगदी चक्रधरांपासून चालत आहे आणि चित्रपट गेल्या काही वर्षातली गोष्ट आहे. तेव्हा हे चित्रपट संस्कृती वगैरे अजिबात जपत नसतात.
आपल्या घरी पहाटे 'चल उठ रे मुकंदा' च्या ऐवजी 'आय अम सेक्सी अँड आय नो इट' हे गाणं लागलं तर जी दुखावते ती अस्मिता.
इथे आपल्यात नक्कीच मतभेद आहेत. एक तर मी हे चल उठ रे मुकुंदा हे गाणे ऐकलेले नाही तरीही वरकरणी ही भूपाळी वाटत आहे. भूपाळ्याबिपाळ्या ऐकायला लागणारा आध्यात्मिक आणि काव्यात्मक (आणि आणखी कसला) बेंट माझ्याकडे नाही.तरीही आय ऍम सेक्सीपेक्षा मुकुंदा उठ हे गाणे नक्कीच मला भावेल यात शंका नाही. यातून अस्मिता दुखावली जाईल हे ठिक आहे. पण चल उठ रे मुकुंदा ऐवजी दादा कोंडकेची द्वैअर्थी कमरेखालची गाणी लावली तरी माझी अस्मिता दुखावली जाईलच. अशा (माझ्या दृष्टीने) तद्दन फालतू गाण्यांऐवजी किशोर कुमार, मन्ना डे च काय तर अगदी गुलाम अलींची ’दिल मे एक लहर उठी है अभी’ ही गझलही मला अधिक भावते.तेव्हा माझी अस्मिता भावनांशी निगडीत आहे भाषेशी तितक्या प्रमाणात नाही. जर एकच भावना मराठी आणि उर्दू या दोन भाषांमध्ये असेल तर मराठी भाषा मला अधिक परिचयाची म्हणून मला मराठी गाणे अधिक भावेल हे नक्कीच.पण दादा कोंडकेचे ’आंधळा मारतो डोळा’ पेक्षा किशोरदाचे ’जीवन से भरी तेरी आखे’ किंवा येसुदासचे ’तुझे देखकर जगवालेपर’ किंवा मुकेशचे ’मेने तेरे लिए सात रंगके सपने’ ही गाणी नक्कीच जास्त भावतात. भाषेच्या नावावर अशीच पेटवापेटवी करून राजकारणी मतांची झोळी भरत असतात.त्यात आपल्यासारख्या शिकल्यासवरलेल्यांनीही सामील व्हायचे की नाही हे ठरवायला हवे. बाकी माझ्या सुदैवाने दादा कोंडकेची गाणी मी त्या मानाने बरीच उशीरा ऐकली.ही गाणी ऐकल्यावर माझी पहिली प्रतिक्रिया होती की असली सुमार दर्जाची गाणी लागली तर थेटरातून मी सिनेमा अर्धवट सोडून निघून जाईन.आणि हो मी जर का चित्रपटगृहाचा मालक असतो तर दादा कोंडकेचा चित्रपट दाखवावा असे मलाही वाटले नसते. मला असे वाटण्यामागे भाषेचा काडीमात्र संबंध नाही.पण असले कमरेखालचे विनोद दाखवावे असे मला तरी वाटणार नाही.आणि हो ज्या मालकांनी केवळ मराठी म्हणून सोंगाड्याला विरोध केला ते पण चुकीचेच.
पुस्तक प्रकाशन कुणीही करू शकतो त्यास नामांकित प्रकाशन-गृहाचे उंबरठे झिजवावे लागत नाहीत.
चुकीची माहिती आहे एवढेच सांगतो.माझ्या जवळच्या नात्यातील व्यक्तीने दोन पुस्तके लिहिली आहेत.संबंधित व्यक्तीचे क्षेत्रात नाव चांगले असल्यामुळे पुस्तके छापायला फार त्रास झाला नाही.पण तीच व्यक्ती प्रकाशकांसाठी प्रूफरिडिंग आणि इतरही कामे करत असल्यामुळे अनेक प्रकाशकांशी त्यांची ओळख आहे.नव्या लेखकांना पुस्तके छापून आणायला किती त्रास होतो हे मला त्यांच्याकडून कळले आहे.
तुम्ही कंगना राणावतचे जे उदाहरण दिले ते माझ्यामते चुकीचे आहे. ते व्यवसायातले असले तरी बादरायण संबंध जोडला आहे. क्विनसाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला २०१४ साठी पण ती २००६ पासून बड्या बॅनर्ससोबतच काम करत आहे. ती काय म्हणेल माझ्यावर अन्याय झाला.
अहो मध्यंतरी स्वत: कंगनाच म्हणाली होती की क्विनपूर्वी तिला बॉलीवूडमध्ये फारसे महत्व मिळत नव्हते. असो. मला मांडायचे सगळे मुद्दे मांडून झाले आहेत तेव्हा सध्यापुरता पूर्णविराम (एक intellectual आणि उच्चभ्रू) क्लिंटन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
क
काळा पहाड Tue, 04/14/2015 - 06:49 नवीन
बाकी माझ्या सुदैवाने दादा कोंडकेची गाणी मी त्या मानाने बरीच उशीरा ऐकली.ही गाणी ऐकल्यावर माझी पहिली प्रतिक्रिया होती की असली सुमार दर्जाची गाणी लागली तर थेटरातून मी सिनेमा अर्धवट सोडून निघून जाईन.
दादा कोंडकेंची गाणी सुमार दर्जाची? 'माळ्याच्या मळ्यामंदी' सुमार दर्जाचं? 'अंजनीच्या सुता' सुमार दर्जाचं? जगदंब जगदंब.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
स
संदीप डांगे Tue, 04/14/2015 - 09:07 नवीन
आपल्या दोघांचेही बरेच मुद्दे आपापल्या ठिकाणी बरोबर आहेत. तरी काही गोष्टी वादाच्या आहेत जसे की भाईचा पैसा. भाईच्या पैशाच्या व्यवहारावर चाप लावणे अशक्य आहे. (डॉन को पकडना मुश्किलही नही, नामुमकीन है). हे सगळे व्यवहार हस्तकांमार्फत होतात. तेही फोनवरून. प्रत्यक्ष डॉनकडे पैसा जात नाही. बिल्डरांकडून फिल्मवाल्यांकडे 'आदेशावरून' जातो. दाखवण्यापुरते नावालाच निर्माते असतात. बरीच गुंतागुंत आहे. दाऊद कुणी शहरी गुंड नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेली प्रचंड मोठी कंपनी आहे. मी काही त्याचे कौतुक करत नाही, सत्य सांगत आहे. त्याचे व्यावसायिक संबंध आंतरराष्ट्रीय माफियांशी आहेत. हे सगळे लोक बर्‍याच उद्योगांवर अप्रत्यक्ष बराच होल्ड ठेवून आहेत. ती एक समांतर व्यवस्था आहे. मोठमोठ्या सरकारांना यांना चाप लावणे शक्य झाले नाही. महाराष्ट्र सरकारची तर गोष्टच सोडा. या लोकांमधे काही बिनसते तेव्हा सरकारचा, न्यायव्यवस्थेचा वापर करून एखाद्याला पद्धतशीर संपवतात. 'भरतभाई शाह' हे त्याचे उत्तम उदाहरण. उठ्सुठ प्रत्येकवेळी पिस्तुल काढून ढीश्क्यांव करणारे डॉन फक्त सिनेमात असतात. असो. त्यामुळे भाईच्या पैशावर हिंदीवाले माज करतात असं नाहीये. कारण सगळंच बॉलीवूड भाईच्या पैशावर चालत नाही. काही विशिष्टच बॅनर्स आहेत जिथे हा पैसा गुंतवला जातो. भाईच्या पैशाचा आणि बॉलीवूडी माजाचा काही-एक संबंध नाहीये. बॉलीवूडी माज आणि मराठीची गळचेपी याचा सरळ संबंध आहे. आता सरकार जे दिसतं, पकडता येतं त्यालाच चाप लावणार. माझ्या अल्पबुद्धी व खर्‍या माहितीवर आधारित हे माझे मत आहे. समांतरः अंडरवर्ल्डवर येणार्‍या हिंदी चित्रपटांकडे बारकाईने पाहिल्यास हे चित्रपट सायकॉलॉजिकल कंडीशनींग करणारे आढळतील. उदा. डॉन, वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई, कंपनी, shootout at lokhandwala इत्यादी चित्रपटांतून दाऊद 'आपण कसे अजिंक्य आहोत, आपल्याला आडवा जाणार्‍यास आपण कसे आडवे करतो' हेच प्रसारीत करत असतो. त्याच्या कृत्यांना महान ठरवतो. त्याच्या लाखो पंटरांसाठी ते एक मेंटल कंडीशनींग असते. सोबतच सामान्य पब्लिकच्या मनात त्याची लार्जर दॅन लाईफ प्रतिमा बनवण्याचा प्रयत्न होतो. हे एक-प्रकारचे सायकॉलॉजिकल युद्ध आहे. ज्याला आपलेच नागरिक खिशातले पैसे घालून हसत हसत बळी जातात. त्यामुळे भाईचा पैसा लागलेला प्रत्येक चित्रपट टोरंटवर मिळवूनच पहा. त्याचे पैसे आपण आधीच भरलेले आहेत. आपण आपल्या पद्धतीनेही युद्ध खेळू शकतोच की. आता हे ओळखायचे कसे तर पाकिस्तानी कलाकार ज्या चित्रपटात असतील तो शंभर टक्के भाईचा. बाकी काही मुस्लिम कलाकार भाईचे लाडके आणि चाटू आहेत म्हणूनच कायम टॉपवर असतात. या चाटूगीरीत काही बिगर-मुस्लिम अस्सल मराठी सुद्धा आहेत. मराठीत एक नावाजलेला निर्माता-दिग्दर्शक जो सल्लूच्या टीन्पाट सिनेमात टीन्पाट रोल्समधे असतो. त्या निर्माता-दिग्दर्शकाने भाईचा पैसा मराठीत आणायला सुरुवात केली आहे. पण आतातरी भाईच्या पैशाचं तो एकटंच चॅनेल आहे मराठीत. या सर्व गोष्टींचा पुरावा मागू नये. कारण आपल्याला ठावूक असेलच. (मुस्लिमांचे नाव घेतले म्हणून कुणाच्या भावना दुखावल्या असतील झंडू बाम लावा आणि गप पडून र्‍हावा. बरं वाटंल.) बाकी अस्मिता, व्यवसायिक स्पर्धा वैगेरे मुद्द्यांवर प्रत्येकाच्या वेगळ्या विचारांचा, आवडी-निवडीचा आदर आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
काळा पहाड Tue, 04/14/2015 - 11:30 नवीन
मराठीत एक नावाजलेला निर्माता-दिग्दर्शक
महेश मांजरेकर का हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 04/14/2015 - 11:51 नवीन
आम्ही आता युधिष्ठीराच्या भुमिकेत आहोत असं समजा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
क
क्लिंटन Tue, 04/14/2015 - 11:51 नवीन
ठिक आहे ना भाईच्या पैशावर १००% नियंत्रण शक्य नसले आणि प्रत्यक्ष भाईला हात लावणे सोपे नसले तरी इथल्या एजंटांवर अगदी काहीच कारवाई करता येणार नाही? बिल्डरकडून पैसे जातात हे बरोबर आहे मग हे माहित असेल तर त्या बिल्डरांना चाबकाने फटकावून रस्त्यावर भीक मागायला भाग पाडले जात नाही अशी परिस्थिती कशामुळे? मला माहित नाही पण असा आरोप आहे की त्यातला वाटा दुसरीकडेही जातो. तसे नसेल तर अगदी एकाही बिल्डराला फटकावलेले आपण अजून बघितलेले नाही अशी परिस्थिती आली नसती. हजार योजनांची प्रगती एका रात्रीत होणार नाही हे ठिक आहे पण सुरवात तरी होत आहे का हा प्रश्न आहे. याच कारणामुळे मला या फिल्मवाल्यांविषयी अजिबात सहानुभूती नाही. यांना टॉरंट वापरून शह द्यायला आवडले असते पण मुळात चित्रपटांची आवड नसल्यामुळे चित्रपट डाऊनलोड करून बघायची इच्छाच होत नाही. तरीही चित्रपट न बघूनही नुसते डाऊनलोड करून त्यांना त्रास होत असेल तर अगदी आजच चित्रपट डाऊनलोड करायला लावतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 04/14/2015 - 12:27 नवीन
बिल्डराला फटकावलेले आपण अजून बघितलेले नाही. बघणारही नाही. ही व्यवस्था वरकरणी दिसते तितकी सरळ नाही. १९७० पासून गुंडांचा पैसा रितसर फिल्मलाईनमधे यायला सुरुवात झाली. हाजी मस्तानने ही प्रथा सुरु केली. ८०च्या दशकात तीला दाऊदने ऑर्गनाईज्ड स्वरूप दिले. १९९२च्या दंगलीपासून परिस्थिती फार वेगळ्या स्तरावरुन हाताळली जात आहे. पानवाल्याकडे जाऊन हफ्ता मागितला इतके सोपे स्वरूप राहिले नाही. बिल्डरांकडून कायदेशीररित्या फिल्मलाईनमधे पैसा ओतला जात असेल तर कुणाला कुठे पकडणार? डी-कंपनी अगदी कायदेशीररित्या हे व्यवसाय चालवत आहे. म्हणून म्हटले की बरीच गुंतागुंत आहेत. सहज तर अजिबात नाही. चित्रपटांची आवड नसल्यामुळे चित्रपट डाऊनलोड करून बघायची इच्छाच होत नाही. तरीही चित्रपट न बघूनही नुसते डाऊनलोड करून त्यांना त्रास होत असेल तर अगदी आजच चित्रपट डाऊनलोड करायला लावतो :) आवड नसेल तर नकाच बघू आणि डाऊनलोड करून बँडविड्थपण नका घालवू. पण कधी वाटलं तर थिएटरमधे जाऊन बघण्यापेक्षा टोरंट बरे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
काळा पहाड Tue, 04/14/2015 - 06:41 नवीन
बापरे इतकं लिहायचं म्हणजे कमालच. मुद्दे ही मुद्देसूद आणि पटणारे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
क
कपिलमुनी Tue, 04/14/2015 - 11:42 नवीन
मल्टीप्लेक्स वाल्यांनी सर्व शासकीय सवलतीचा त्याग करावा . जादाच्या टॅक्सचे पैसे भरावे आणि धंदा करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Tue, 04/14/2015 - 11:52 नवीन
अगदी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 04/10/2015 - 13:45 नवीन
मराठी चित्रपटांच्या वेळा कशा असतात सकाळी ११ वाजता, दुपारी साडे तीन वाजता, पाच वाजता. दिवसातून तीन चारच खेळ आणि तेही अशा अडचणीच्या वेळी. मराठी चित्रपटाच्या वेळा अडचणीच्या असतात याच्याशी १००% सहमत. चित्रपटगृहामधे इतर चित्रपटांप्रमाणे मराठी चित्रपटालाही प्राइम टाईम मधे जागा मिळालीच पाहिजे. बाकी, चित्रपटगृहचालक जर मराठी चित्रपट प्राईम टाईम मधे दाखवणार नसतील तर त्यांच्यावर अशी वेळ येणे गरजेचीच होती. महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन. -दिलीप बिरुटे (मराठी चित्रपटप्रेमी)
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 04/10/2015 - 15:45 नवीन
प्राईम टाईममध्ये मग वडापावचा दर ४० रुपये, मिसळ-पाव १०० रुपये,साबुदाणा खिचडी ७५ रुपये.मल्टिप्लेक्सवाले असे दर लावतील मग वर म्हणतील की मराठी लोक चित्रपट पहायला येतच नाहीत. बहुदा सेनेचे लोक 'वडापाव्,मिसळपाव आम्ही सुचवलेल्या लोकांकडूनच घ्यावेत' असा घोशा लावणार मल्टिप्लेक्सवाल्यांच्या मागे असा ह्यांचा कयास.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 04/10/2015 - 16:00 नवीन
खायचचं नाही मग तिथे. आधी बाहेरचे खाद्यपदार्थ आत आणु नयेत ही बंदी काढुन टाकायला पाहिजे. १५०-२०० रुपये घेउन ३० रुपयाचे सुद्धा पॉपकॉर्न मिळत नाहीत. बाकी पैश्याला पसाभर मिळणार्‍या लाह्यांचे पॉपकॉर्न झाल्यावर पाच रुपयाला मुठभर झालं हेचं खरं. (असा मी असामी-पु.ल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
क
क्लिंटन Fri, 04/10/2015 - 18:45 नवीन
खायचचं नाही मग तिथे.
बहुसंख्य व्यावसायिकांमध्ये एक समान धागा असतो. एकतर आपल्याशिवाय इतरांचे पान हलत नाही हे त्यांना समजले तर ते ग्राहकांना वेठीला धरतात. झी टिव्ही, सोनी टिव्ही वगैरे नवीन असताना त्यांनी सुरवातीला ग्राहकांकडून दर महिन्याचे पैसे घेतले नव्हते.पण ३-४ वर्षात लोकांना या चॅनेलची सवय झाली हे लक्षात येताच दर महिन्याचे शुल्क आकारायला सुरवात केली.प्रेक्षक पैसे न भरून सांगतात कोणाला? जर बर्‍याचशा प्रेक्षकांचे चित्रपटगृहाशिवाय काहीही बिघडत नाही अशी परिस्थिती उभी राहिली तर हे मल्टीप्लेक्सवाले सरळ येतील.मग हवे तर दर कमी करतील, बाहेरचे पदार्थ आणू देतील आणि इतरही अनेक गोष्टी होऊ शकतील. फक्त आपण त्यांच्यावर अवलंबून नाही हे चित्र आपण दाखविणार आहोत का हा प्रश्न आहे. आणि तसे आपण करू शकलो नाही तर मात्र ते असे पिळतीलच.या गोष्टीला अपवाद असलेले उद्योग त्यामानाने फारच थोडे असतील. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ध
धमाल मुलगा Fri, 04/10/2015 - 22:09 नवीन
जोवर मल्टीप्लेक्समध्ये जाऊन सिनेमे पाहणं, आणि तिथे अवास्तव किंमती सहन करुन चरणं ह्या गोष्टी मराठी माणसाला कवतिकाच्या वाटत राहतील तोवर मल्टीप्लेक्सवाल्यांचा हा माज उतरणे नाही. शिवाय, पध्दतशीरपणे एकपडदा चित्रपटगृहे अगदी प्ल्यान करुन बंद पाडून विशेष पर्यायही उपलब्ध ठेवले नाहीयेत. तस्मात... वर्षभर घरीच सिनेमे पहा अन ह्या मल्टीप्लेक्सवाल्यांना जाणीव करुन द्या इतकंच शक्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
व
विनोद१८ Fri, 04/10/2015 - 19:38 नवीन
किती ग्रेट आहे ग तुझे 'हे'....!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
ज
जेपी Fri, 04/10/2015 - 17:26 नवीन
आजकाल चित्रपट महिन्या दोन महिन्यात टिवीवर येतात .. कायकु इत्ता खर्चा करनेका ???
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Fri, 04/10/2015 - 20:07 नवीन
अरे ये लोग टीवी को बी राईट्स बेचताय. मै क्या बोलता, सब लोग टोरेंट से डाऊन लोड करो ना, वो आमीरखान भी भीक मांगेगा और वो मल्टिप्लेक्स वाले बी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
स
संदीप डांगे Mon, 04/13/2015 - 13:23 नवीन
'आठवडी' बाजारात कुणा विक्रेत्याला 'दिवसा येथे बसू नकोस तू, पाहिजे तर रात्री १२ ते सकाळी ६ पर्यंत अक्खं मैदान वापरू शकतो, जा मज्जा कर' असे सांगीतले तर त्याला जेवढा आनंद होईल तितकाच आनंद ही सक्ती होईपर्यंत मराठी चित्रकर्त्यांना होत होता. ज्या मुद्द्यांवरून सरकारला हा निर्णय घेऊन दांडगाई दाखवायला लागली ते मुद्दे इथे चर्चेत आलेले नाही आहेत अजून. साधारण प्रेक्षकाच्या भुमिकेतून या निर्णयाकडे पाहिल्यास सरकारची हडेलहप्पी वैगेरे दिसते. पण निर्माते, वितरक आणि प्रदर्शक यांच्या भुमिकेतून पाहिल्यास पडद्यामागे खूप गोष्टी होतात त्या सामान्य प्रेक्षकांपर्यंत पोचत नाहीत. चित्रपटात फक्त खानत्रयींपैकी कुणीही असू देत तो चित्रपट घ्यायला आणि लावायला वितरक आणि प्रदर्शकांच्या उड्या पडतात. भले त्या दरम्यान कितीही चालणारा मराठी चित्रपट असला तरी तो काढून हा लावायला हे लोक कमी करत नाहीत. त्यात त्यांना फक्त धंदाच दिसतो. मराठी निर्मात्यांना (आताच्या हमखास गर्दीखेचक चित्रपटवाल्यासुद्धा) ह्याचा बराच फटका बसला आहे. मराठी निर्माते स्वत:च्या खर्चाने चित्रगृह बांधून त्यात आपलेच चित्र दाखवू शकत नाहीत. वितरक-प्रदर्शक याच व्यवस्थेतून त्यांना जावे लागते. सुटका नाही. एका टिकीटामागे निर्मात्यास ३०-४० टक्के कमिशन मिळते. पण चित्रपट योग्य वेळेत म्हणजे प्रेक्षक उपलब्ध असतील त्यावेळेत नसेल तर त्याच्या संभाव्य धंद्याचे नुकसान होते. पुढचा चित्रपट काढायला पैसा आणि हिंमत उरत नाही. चित्रपट उद्योगाचा धंदा फार विचित्र आहे. बर्‍याच लोकांना वाटते की चांगला चित्रपट असेल तर लोक पाहायला जातात आणि तो हीट होतो. असे करणारे ५-१० टक्के असतील. असे असते तर हा उद्योग केव्हाच बंद पडला असता. खरे चित्र असे आहे की हा पण आठवडी बाजार आहे. बहुसंख्य लोकांना चित्रपट पाहावासा वाटतो. ते नियमितपणे चित्रगृहात जाऊन दर सप्ताहांत एकतरी चित्रपट पाहतच असतात. तो कसाही असला तरी त्यांच्या वेळेला तो तिथे असणे गरजेचे असते. कितीही टुकार चित्रपट असेल तरी या तीन दिवसाचा गल्ला ३०-४० टक्के तरी असतोच असतो. त्यात नामांकीत निर्माण-गृहांचे असतील तर ७०-८० टक्के निश्चित. कारण ते मोठया प्रमाणावर प्रेक्षक खेचुन आणेल अशी प्रसिद्धी करतात. नामांकित तारे-तारका असतील तर १०० टक्के निश्चित. यासाठी प्रत्येक चित्रपटाने किती धंदा केला याचे आकडे जालावर मिळतात ते तपासून बघता येइल. आजकाल ३६० डीग्री मार्केंटींग मुळे कोणताही चित्रपट त्याचा खर्च वसूल करतोच करतो. गेल्या दहा वर्षात चित्रपटांच्या अ, ब, क वैगेरे दर्जांची जी भेसळ झाली आहे त्यामागे हेच अर्थकारण आहे. नामांकीत तारा + टुकार कथा-दिग्दर्शन, जबराट कथा-दिग्दर्शन + सामान्य कलाकार, नामांकीत तारा + जबराट कथा-दिग्दर्शन अशा धाटणीचेच चित्रपट वेगवेगळ्या नामांकित निर्माणगृहांकडून सतत येत असतात. बाजारात जसा चिप्स-वेफर्सचा सुकाळ असतो तसा. कारण पब्लिकला कुठल्याही वेळी पटकन बघता येइल म्हणून असे चित्रपट तयार ठेवावे लागतात. १०० चित्रपटामागे एखादा चांगला येतो पण आधीच्या ९९ पैकी ७० ने तरी खर्च वसूल केलेला असतोच. मागणीनुसार पुरवठा हा नियम चित्रसृष्टीत चालत नाही. इथे फक्त पुरवठा करत राहायचे, कशाला मागणी येइल काही सांगता येत नाही. तरी सगळा माल खपतोच खपतो. त्याच बरोबर ह्या सिनेमांमधून वेगवेगळ्या उत्पादनांची, स्थळांची, संस्कृतीची, तारे-तारकांची, त्यांनी करार केलेल्या उत्पादनांची भरगच्च मार्केटींग होत असते. याचसाठी हे चित्रपट आणि अभिनेते सतत प्रेक्षकांसमोर राहणे उद्योगासाठी परम-आवश्यक आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या उपलब्ध वेळेमधे जो कोणी चित्रपट दाखवेल त्याचाच सर्वप्रकारे धंदा होतो हे शाश्वत सत्य आहे. तो मराठी आहे, हिंदी आहे, टुकार आहे, चांगला आहे याच्याशी काही कर्तव्य नाही. वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे आमिरने त्याचा चित्रपट सकाळी फक्त आठच्याच शोला लावून हीट करून दाखवावा. बडे निर्माते, वितरक आणि प्रदर्शक यांच्या अशा धंदेवाईकपणामुळे (जो साहजिक आहे असे अनेकांचे मत आहे) मराठी चित्रपटास चित्रगृह उपलब्ध होत नाही. बर्‍याचदा एखाद्या चित्रगृहा-मालकाकडे काही कारणाने (धंद्याच्या दृष्टीने) योग्य चित्रपट नसेल तेव्हा मराठी चित्रपटास तो होकार देतो. ऐनवेळेला त्याच्या हातात 'तो' चित्रपट पडला तर गुपचुप मराठी सिनेमाची वेळ सकाळी ८ वाजता होऊन जाते. दुसरा कुठला मोठा हिंदी चित्रपट नसल्याने 'मोक्याच्या-वेळेला' लागू शकलेला मराठी चित्रपट १२५ रुपये देऊन सगळ्यात आरामदायी आसनांवर बसून बघितला आहे. पुढच्या वेळेला त्याच चित्रगृहात बडा हिंदी चित्रपट लागला असता त्याच आसनांची किंमत होती ३५० रुपये. हा धंदा आहे त्यामुळे इथे असेच चालणार त्याला पर्याय नाही. पण... असेच राहणार असेल तर हिंदी चित्रउद्योगाचा कित्ता हुबेहुब गिरवायच्या मागे असलेल्या होतकरू आणि मोठ्या संख्येत असलेल्या मराठी चित्रकर्त्यांनी काय करायचे? त्यांना चित्रगृह प्रेक्षकांच्या सोयीच्या वेळात उपलब्ध होणे प्रचंड आवश्यक आहे. मुळात हा निर्णय बहु-पडदा-चित्रगृहांना लागू असूनही जणू काही पाचपैकी पाचही, तीनपैकी तीनही पडद्यांवर मराठीच चित्रपट दाखवण्याची हुकुमशाही असल्यासारखा बघितला जात आहे. मल्टी-प्लेक्स च्या मल्टी या शब्दाकडे लक्ष न देता वडापाव, हिंदी-कन्नड, सरकारची हुकुमशाही अशा संबंध नसलेल्या विषयांकडे लक्ष वेधल्या जात आहे. असे किती मराठी चित्रपट येतात दर आठवड्याला? तीनपैकी एक, पाचपैकी एक पडदा मराठीस देऊनही पुरेसा धंदा करायला मिळेलच की. पण तेही गणित एवढे सोपे नाही. एक इंग्रजी, एक तारांकीत महागडा हिंदी, एक बर्‍यापैकी इंटेलेक्चुअल हिंदी, एक-दोन कुमार-तरूणांसाठी उथळ हिंदी या पॅकेजमधे मराठीला जागाच उरत नाही. तरीही पाच हजार ते सात हजार ठिकाणी एकाच वेळी चित्रपट दा़खवण्याची क्षमता असलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीने दिडशे-दोनशे प्रती कशा-बशा काढू शकणार्‍या मराठीला आमचा धंदा खातात म्हणून विरोध करणे म्हणजे जरा अतीच... एकदा हे नियमितपणे मराठी चित्रपट दाखवायला लागले की त्याचा 'डोमिनो परिणाम' होऊन जास्त प्रेक्षक, जास्त पैसा, जास्त चांगले चित्रपट, अजून जास्त प्रेक्षक, अजून जास्त पैसा, त्यातूनच जास्त आणि दर्जेदार चित्रपट असे चक्रवाढ प्रगती होईल. एकेदिवशी दक्षिण राज्यांतल्या चित्र-उद्योगासारखी मराठीही मोठी होईल. हेच हिंदीवाल्यांच्या पचनी पडत नाही आहे. ४-६ करोड संभाव्य प्रेक्षक-संख्या असलेलं हक्काचं राज्य हातातून कोण जाऊ देईल? मग राज्यघटनेने सर्वांना दिलेल्या समान-संधीच्या उपलब्धीचे काय? त्याहीपुढे जाऊन मी असे विचारू इच्छीतो की जास्त आणि दर्जेदार चित्रपट मिळण्याच्या संभाव्य संधीपासून प्रेक्षकांना दूर ठेवणारे हे कुठले फ्री मार्केट? असो. माझे मत मी मांडले. यावर केवळ धंद्याच्या दृष्टीने विचार केल्या जावा. मराठी अस्मिता, अभिव्यक्ती-स्वातंत्र्याची गळचेपी, अन्याय-सहन-करणार-नाही छाप विचार काहीही उपयोगाचे नाहीत. परतेकास्नी धंदा कराया चानस गावला पाय्जेल का नाय? कारण 'धंदा'च सगळ्यात मोठा असतो भाऊ. शोभा असो वा आमिर हेही त्यांच्या-त्यांच्या धंद्याच्याच पोटतिडकीतून बोलतायत.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Fri, 04/10/2015 - 23:11 नवीन
विचार करण्याजोगे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
असंका Sat, 04/11/2015 - 05:54 नवीन
इतके मुलभूत विश्लेषण जर आपण करू शकत असताल, तर एक वेगळा धागाच काढायचा नाहीत का? धन्यवाद या इनसाइटबद्दल..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sun, 04/12/2015 - 08:49 नवीन
वेगळा धागा काढण्याचा विचार आला होता पण म्हटलं एकाच विषयावरची सगळी चर्चा एकाच धाग्यावर राहीली तर बरं असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
आ
आनंदी गोपाळ Sun, 04/12/2015 - 08:19 नवीन
मग या आपण केलेल्या संपूर्ण चर्चेचे फलित काय?
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sun, 04/12/2015 - 08:31 नवीन
तीनपैकी कुठल्या शोला आपली फिल्म लावायची याबद्दल निर्माते थेटर-मालकांना सूचना करू शकतात. प्राईम-टाईमची डेफिनिशन बदलण्यामागे मराठी निर्मातेच आहेत. टार्गेट-ऑडीयन्सनुसार आपली फिल्म केव्हा लावली तर जास्त प्रेक्षक येतील यावर त्या विशिष्ट चित्रपटासाठीचा प्राईम-टाईम ठरणार. यापुढे थेटरवाले मराठी सिनेमाची ससेहोलपट करू शकणार नाहीत हीच खूप समाधानकारक बाब आहे. संपूर्ण चर्चेचं फलित हेच की काही गोष्टी सामान्य प्रेक्षकांना माहीत नसतात. चर्चेतून त्या पुढे आल्या. मराठी राज्यात मराठीला प्राधान्य असावं या मागणीत काय गैर आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
म
माझीही शॅम्पेन Sun, 04/12/2015 - 08:38 नवीन
सरकार चा अतिशय योग्य निर्णय त्या बद्दल त्याचं अभीनंदन , मराठी माणसाची फंद-फितुरी आणि कोते पणा संपेल तो खरच मराठी संस्कृतीसाठी खरा सुदिन
  • Log in or register to post comments
प
प्रदीप साळुंखे Sun, 04/12/2015 - 12:08 नवीन
आपल्याच राज्यात आपल्यावर ही वेळ येणे म्हणजे आपले पूर्वज. वेळीच बाहेरच्यांना हाकालले असते तर? परदेशात भारतीयांवर का हल्ले होतात कळले काय?
  • Log in or register to post comments
ह
होबासराव Mon, 04/13/2015 - 10:38 नवीन
ही बया स्वतः जन्माने मराठि असुन मराठि माणसाचा इतका का तिरस्कार करत असावि ? मला एका मित्राने हि खालिल लिंक दिली.... २००८ सालि सुध्दा हि बया असच काहि बरळली होति.. http://www.manogat.com/node/14710
  • Log in or register to post comments
क
किणकिनाट Mon, 04/13/2015 - 17:59 नवीन
या म्हणतात "मी कधी सिनेमा पहावा याची जबरदस्ती मा. मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर करू नये" यांना कोणितरी सांगा ना की ही जबरदस्ती तुमच्यावर नाही बाई. मल्टिप्लेक्सनी प्राइम टाईममधे मराठी चित्रपट दाखवावे अशी सरकारची जबरदस्ती आहे. वरील चर्चा पाहता आणि माझे वैयक्तिक मतही असेच आहे की हे योग्य आहे. तुम्ही बघूच नका ना मराठी चित्रपट. आणि ते वडा पाव. मिसळपाव वगैरे अगदीच अडाणपणा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
ह
होबासराव Mon, 04/13/2015 - 12:36 नवीन
विश्लेषण आवड्ले.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Mon, 04/13/2015 - 19:03 नवीन
आमच्या शहरात सध्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू आहे. काल आम्ही एक हजाराची नोट हा चित्रपट पाहिला. हॉल पूर्णपणे भरला असला तरी प्रेक्षकांमध्ये बोटावर मोजण्याइतके भारतीय लोक होते. चित्रपटानंतर निर्माता व दिग्दर्शक श्रीहरी साठे यांना प्रश्न विचारण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली. चित्रपटाची कथा, पात्रे, प्रसंग, निर्मितीचे अनुभव यावर प्रश्न विचारून झाल्यावर एका अमेरिकन प्रेक्षकाने प्रश्न विचारला की भारतात प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा होता. त्यावर श्रीहरी यांनी उत्तर दिले की, "गेल्या वर्षी आम्ही १०० स्क्रीन्सवर १ आठवड्यासाठीच हा चित्रपट प्रदर्शित करू शकलो. बॉलीवूडच्या प्रभावामुळे यापेक्षा अधिक वेळ आम्हाला मिळू शकला नाही. एक आठवड्यातही प्रेक्षकांचा प्रतिसाद खूप चांगला होता". श्रीहरी २००१ सालापासून अमेरिकेत राहतात. त्यांनी सांगितलेला अनुभव या चर्चेच्या विषयाशी संबंधीत असल्याने इथे टंकण्याचा हा प्रपंच.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा