डॉ. उदय निरगुडकर यांची 'मन की बाते'
अलीकडेच राजहंस प्रकाशनातर्फे आयोजित एका कार्यक्रमात डॉ. उदय निरगुडकर यांचे 'पत्रकारिता आणि व्यावसायिकता' या विषयावर भाषण झाले. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी 'मन की बात' सांगणार आहे, हे स्पष्ट केलं. त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर चर्चा व्हावी, म्हणून ते इथे देतेय.
१. वृत्तपत्रातल्या जाहिराती, पहिल्या पानावरच्या जाहिराती यावर आपण वाचक टीका करतो. डॉ. निरगुडकरांनी त्यामागची आर्थिक अडचण उलगडून सांगितली. अंक तयार करण्यासाठीचा खर्च आणि त्याची किंमत यातला फरक भरून काढण्यासाठी जाहिराती देणं भाग होतं. रुपयाची किंमत कमी झाली की आयात कराव्या लागणाऱ्या मालाचा खर्च वाढतो. जाहिराती पुन्हा मिळवणं, हेही एक आव्हान असतं. वृत्तपत्राचा वाचकवर्ग कोण आहे, हे लक्षात घेऊन जाहिराती मिळतात. (महागड्या गाड्यांच्या जाहिराती मराठी वृत्तपत्रांमध्ये दिसत नाहीत.)
असंच वृत्तवाहिन्यांच्या बाबत होतं. एखादी भूकंप, विमान अपघात यासारखी महत्वाची बातमी आली की दिवसभर तिच बातमी दाखवावी लागते. तिच्यात खंड पडला की प्रेक्षक दुसऱ्या वाहिनीकडे वळतात. त्यामुळे जाहिरातींवर गदा येते आणि त्या दिवसाचं उत्पन्न बुडतं
२. त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न - लोक वृत्तपत्र वाचतात, पण त्यातल्या विचारांशी सहमत होतात का ? पुढचा प्रश्न येतो - वृत्तपत्र किंवा वृत्तवाहिन्या नसल्या तर काही फरक पडेल का ? अलीकडे बातम्या नेटीझन्स देऊ लागले आहेत, त्यामुळे पुढे वृत्तपत्रांची गरज उरेल का ? करमणुकीच्या वाहिन्यांच्या तुलनेत वृत्तवाहिन्यांना कितपत महत्व असतं ?
३. वेगळा वाचक वर्ग निर्माण होतोय का ? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आजचा वाचक म्हणतो, कुठे, काय, कधी घडलं तेवढं फक्त सांगा. माहितीचे विश्लेषण आम्ही करतो. त्यामुळे वाचकांमधल्या बदललेल्या सवयींचा मागोवा घेण्याची गरज आज निर्माण झाली आहे, असंही त्यांनी नमूद केलं.
४. अजून एका आव्हानावर त्यांनी सविस्तर चर्चा केली. एकीकडे या क्षेत्रात काम करण्याच्या संधी उपलब्ध आहेत, तर दुसरीकडे चांगली लोकं मिळवणं कठीण झाले आहे. सर्व उमेदवारांचे अर्ज सारखेच दिसतात. भडक बातम्या देऊन पुढे कसं जाता येईल, याचा विचार चाललेला असतो. अशा परिस्थितीत वेगळं काहीतरी करणाऱ्यांची दखलही घेतली जात नाही. नाविन्यपूर्ण उपक्रम काही दिवसातच बंद पडतात.
५. या आव्हानांना तोंड देण्यासाठी काय उपाय करावे लागतील, यावर ते शेवटी बोलले. माहितीचे स्त्रोत अखंड टिकवून ठेवावे लागतील, बातम्यांमधली सत्यता टिकवून ठेवावी लागेल. एकच बातमी वृत्तपत्र, वृत्तवाहिनी, ट्वीटर इत्यादिंवर कशी जाईल, याचं भान असेल तोच टिकेल.
या व्यवसायापुढे आव्हानं मोठी आहेत आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग धूसर आहे. या क्षेत्राला अस्तित्वाचा प्रश्न सतावतोय, हे त्यांच्या भाषणातून जाणवलं. आर्थिक आघाडीवर तोंड देणं, स्पर्धेत टिकून राहणं, मोबाईल पत्रकारितेला तोंड देणं, पत्रकारितेतली मूल्य टिकवणं, दमनशाहीचा सामना करणं असे अनेक प्रश्न आहेत. पण त्यावर या क्षेत्राकडे ठोस उपाय नाहीत, हेदेखील त्यांनी सुचवलेल्या उपयांवरून वाटलं .
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हमरी अटरिया पे आजा रे सांवरिया देखा देखी तनिक हुई जाए... :- Dedh Ishqiya