
बौद्ध, जैन, हिन्दू लेणी व वस्ती स्थाने
अनेकदा विविध ऐतिहासिक स्थळांना भेटी देताना जाणवते की त्यातील काही भाग हिन्दू तर काही जैन, बौद्ध वा अन्य धर्मियाच्या भरभराटीच्या काळात बांधले गेले होते.
त्यामुळे त्यांच्या स्थापत्यकलेची छाप त्या त्या भागातील त्या वास्तूंवर जाणवते. वेरूळच्या कैलास लेण्यात असे प्रकर्षाने जाणवते.
लेणी किंवा असे स्थापत्य कलेचे काम सामान्यतः राजाश्रय किंवा धनिक लोकांच्या प्रेरणेतून होत असावे. असे वाटते की धर्मातील शिकवणी जनमानसावर खोलवर रुजवण्यास, बुद्ध, महावीर आदि तीर्थंकरांच्या विचारांचा, तत्वज्ञानाचा प्रसार व अंगिकार व्हावा आणि ज्यांनी हे स्वीकारले आहे त्यांच्या राहण्याची व पांतस्थांना विश्रामाची सोय आपसूक व्हावी अशा अपेक्षेने ह्या वास्तू निर्माण केल्या गेल्या असाव्यात. मोठ्या संख्येने अनुयायांना ध्यान-धारणा व अन्य धार्मिक अनुष्ठाने करायला सोय असावी या किंवा अशा विविध उद्देशांनी सराया, चैत्य, विहारांची रचना केली गेली असावी. सरपण, शिधा, पिण्याच्या व वापराच्या पाण्याची, भोजन बनवायची, प्रातर्विधीची व्यवस्था काय व कशी होती? दगडात कलाकृती करताना जखमी वा आजारी पडलेल्यांची कशी काय सोय केली जात असे?
भारतात बुद्धांचे विचारधन अनेक शतके मागे पडले इतके की त्या धर्माचे अनुयायी डॉ आंबेडकरांच्या ‘नव बौद्ध धम्म’ संकल्पनेशी जोवर जुळले गेले नाहीत तोवर हा धर्म श्री लंका ब्रह्मदेश, चीन, जपान, आणि अतिपूर्वेतील आशियायी देशातच विविध नावाने व काहीसा फेरफार करून फुलला बहरला. जैन पंथांचे अनुयायी मोठ्या प्रमाणात समुद्रसीमा न ओलांडण्याच्या अटीमुळे कदाचित विदेशात गेले नाहीत. तरीही त्यांचे अनेक पंथ-उपपंथ पायी चालायच्या बंधनामुळे बस्त्या व मठ स्थापून राहाताना दिसतात.
कधी कधी प्रश्न पडतो की भारतात बुद्ध, जैन अनुयायांची चलती केंव्हा व कुठवर होती? नंतर असे काय झाले की त्या विचारांचे प्रभावलय कमी होत नष्टप्राय झाले...? हजारोंच्या संख्येने बुद्धांचे, महावीरांचे अनुयायी अशा गूहावजा जागेत राहत असत. अशांची निर्घृण कत्तल झाली असावी? इतके विहार-चैत्य, कोरीवलेणी ज्या काळात तयार झाली त्या काळात त्यावेळच्या राजघराण्यांनी बौद्ध वा जैन धर्म स्वीकारला होता काय? सम्राट अशोकाचे नाव इतिहासाच्या पानांमुळे लक्षात राहते. त्याने आपल्या राज्याचा तो राजधर्म मानला असे आपणास वाचायला मिळते. भारतातील अन्य विशेषतः महाराष्ट्रात अजंठा, वेरूळ घारापुरी आणि किती तरी ठिकाणी डोंगर-दगडात खोदून स्थापत्य केलेले आहे त्यांना राजाश्रय कोणाचा होता? त्या राजघराण्यांची, माहिती व इतिहास कळायला, वाचायला आवडेल.
ती परंपरा का व कशी खंडित झाली असावी? मुस्लिम राजसत्तांचे आघात असे एक कारण असले तरी अनेकदा आपापसातील वैर व वैचारिक कलह ही यात सहभागी असतील. या सर्वाचा आढावा इथल्या तज्ज्ञांनी घ्यावा व आमच्या ज्ञानात भर टाकावी ही विनंती.
प्रतिक्रिया
शशिकांतकाका प्रश्नांचा आवाका
कदाचित वल्ली यांच्या समावेत
नक्कीच !!
थोडी फार चर्चा आजच्या
मीही याबद्दल थोडक्यात
हजारोंच्या संख्येने ..., ...
आजच्या काळातील चष्मा
:)