श्री. मोदी, धनतेरसची फेसबुक रोषणाई आणि कॉपीराईट चर्चा
प्रताधिकार नियमांची स्थिती आणि आंतरजालाच्या बाबतीतील आंतरराष्ट्रीय ज्युरीस्डीक्शन असा एक धागालेख मी दोन एक महिन्यांपुर्वी लिहिला होता. ज्या छायाचित्राचा व्यापारी उपयोग झालेला नाही अशा छायाचित्रांच्या बाबतीत भारताततरी न्यायालयात सोडून द्या सर्वसाधारण चर्चेतही फारसे वाद येत नाहीत. भारतात एक वाद चर्चेच्या उंबरठ्यावर प्रथमच फिरुन येतो आहे असे दिसते.
मागच्याच दिवाळीत सोशल मिडीयाच्या प्रेमात असलेले भारताचे नवे आणि सद्य पंतप्रधान श्रीमान मोदी साहेबांच्या फेसबुक खात्यावर (तथाकथित) कॉपीराईटेड छायाचित्र वापरले गेल्याची वंदता झाली पण छायाचित्रकार स्वतःला मोदी साहेबांचा पंखा म्हणवतो तेव्हा हे चहाच्या पेल्यातले वादळ समजून बातमी कडे लक्ष देणे सोडून दिले होते. पण संबंधीत आमेरीकन छायाचित्रकाराला प्रोबोनो म्हणजे किमान खर्चात विधी सल्ला देणार्या सल्लागारांचे साहाय्य उपलब्ध झाले असावे त्यामुळे छायाचित्रकाराच्या वतीने संबंधीत विधी सल्लागारांनी भारतीय पंतप्रधान कार्यालयास नोटीस दिल्याची दैनिक डि एन ए ची बातमी आहे.
काय आहे किस्सा ? गेल्या ऑक्टोबर (२०१४) मध्ये दिवाळीमधील धनत्रयोदशी (धनतेरस) च्या शुभेच्छा माननीय पंतप्रधानांनी त्यांच्या फेसबुक पानावरून दिल्या या शुभेच्छा देताना फेसबुक पानावर एक दिव्यांची रोषणाई असलेले छायाचित्र जोडले. या शुभेच्छा आणि छायाचित्राला आपसूकच मोठ्या प्रमाणावर लाईक्स मिळाल्या अर्थात वर म्हटल्या प्रमाणे छायाचित्राच्या निवडीत काही घोळ झाला असावा. बिमल नेपाल या नेपाळी वंशाच्या आमेरीककास्थीत व्यावसायिक छायाचित्रकारानेही ते छायाचित्र आपण स्वतः (त्याच्या स्वतःच्या मुलीच्या साहाय्याने ) काढले असून ते त्याच्या छायाचित्रातून घेतले गेल्याचा दावा केला. आपण मोदींचे फॅन आहोत मोदींंनी छायाचित्र वापरण्यास हरकत नाही पण माझ्या कॉपीराईट अधिकारांचे काय असा काहीसा मुद्दा ऑनलाईन उपस्थित केला त्यास माध्यमातून थोडीफार प्रसिद्धीही मिळाली. बिमल नेपाल यांच्या तेव्हाच्या एकुण भूमिकेवरून मुद्दा विस्मरणात जाईल असे वाटले होते पण मुद्दा अजून तरी धूकधूक धरून आहे असे दिसते.
भारताच्या पंतप्रधान कार्यालयाची भूमिका अशी की पंतप्रधान कार्यालयाने एक एजन्सी नेमली ती एजन्सी हे सर्व (छायाचित्र पुरवण्याचे काम बघते) आणि हे छायाचित्र आंतरजालावर बर्यापैकी वापरात आहे असे काही स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान कार्यालयास छायाचित्र पुरवणार्या एजन्सीची बाजू अशी की त्यांनी छायाचित्र फ्री डाऊनलोड उपलब्ध करणार्या संकेतस्थळावरून मिळवले होते आणि संबंधीत संस्थळाच्या नितीस अनुसरून वापरण्यास मुक्त असणे अभिप्रेत होते.
बिमल नेपाल हे छायाचित्र प्रताधिकाराचे दावाकर्ते आमेरीकेत स्थायिक आहेत, भारत सरकारचे पंतप्रधान कार्यालय भारतात आहे जे (कदाचित/बहुधा कराराने) एका एजन्सीच्या पुरवठ्यावर अवलंबून होते. ती एजन्सी ज्या (फ्री ?) वेबसाईट वरून छायाचित्र मुक्त स्वरूपात घेतले असल्याचे म्हणते ती वेबसाईट बहुधा स्पेन मध्ये असावी.
भारताचे पंतप्रधान कार्यालय आणि प्रताधिकार मालक यांच्यात बहुधा तडजोड होऊन जावी पण तो पर्यंत, मी आधीच्या धाग्यात नमुद केल्या प्रमाणे प्रताधिकार नियम आणि आंतरजालाच्या बाबतीतील आंतरराष्ट्रीय ज्युरीस्डीक्शन बाबीतील मुद्यांवर चर्चा करता येऊ शकते.
# कायदे कुठले लागू होतील आमेरीकेचे, भारतातील का स्पेनचे ? आणि का ?
# पंतप्रधान कार्यालय आणि संबंधीत एजन्सीत लेखी करार अस्तीत्वात होता का ? त्या करारातील अटी आणि जोखिमीची जबाबदारी कुणावर आहे पंतप्रधान कार्यालयावर का एजन्सीवर ?
# आमेरीकन कायद्यांचा दाखला दिल्यास फेअर युज तत्व लागू होते का ?
# भारतीय कायदे लागू होत असतील तर पंतप्रधान कार्यालय छायाचित्र प्रताधिकारीत असल्याची आम्हास कल्पना नव्हती म्हणून आम्हास अनभिज्ञतेचा फायदा मिळावा असे म्हणू शकेल का ?
# पंतप्रधान कार्यालयास छायाचित्र पुरवणारी एजन्सीही सुद्धा स्पेन मधील संस्थळाकडे बोट दाखवून दोष आपला नसल्याचे म्हणू शकेल का?
# स्पेन मधील संकेतस्थळावर छायाचित्र केव्हा आणि कुणी अपलोड केले असावे कोणत्या देशातून अपलोड केले असावे या वरही बरेच काही अवलंबून आहे परंतू स्पॅनीश वेबसाईट वर या संबंधाने पुरेशी माहिती आढळत नाही असे दिसते. वेबसाईट वर छायाचित्र केव्हा चढवले गेले याचा पुरावा परस्पर तयार करणे तांत्रिक दृष्ट्या शक्य असते का संस्थळ मालक आणि विकसक आणि सर्वर मालकांचा पुरवा गोळा करण्यात सहभाग आवश्यक ठरेल ?
#केस कोर्टात जाण्याची शक्यता कमी वाटते तरीही भारतीय कायद्यान्वये छायाचित्राचे प्रताधिकार धारकास श्रेय देणे, छायाचित्राचा अनधिकृत वापर थांबवण्याचे निर्देश देणे आणि आर्थीक नुकसान झाले असल्यास नुकसान भरपाईचा आदेश देणे या क्रिया दिवाणी कायद्याने होऊ शकतात या केस मध्ये छायाचित्र कमर्शीयल माध्यमात/उद्देशासाठी वापरले गेले छायाचिरकाराचे आर्थीक नुक्सान झाले असे समजले जाईल का ? तसे समजले गेल्यास आर्थीक नुकसान किती झाल्याचे कसे मोजले जाऊ शकेल ?
पंतप्रधान कार्यालयाकडून होणार्या उत्पन्ना पेक्षा बिमल नेपाल या छायाचित्रकारास प्रसिद्धी मिळूनच त्याचा मोठा फायदा होण्याची शक्यता असू शकते. पण इतरही लोक प्रसिद्धी करता एखादी गोष्ट करू शकतात इथे तर मुद्दा नेपाल यांच्या बाजूने असेल आणि त्याचा त्यांनी प्रसिद्धीसाठी उपयोग करून घेतल्याने खूप काही बिघडणारे नाही. बहुधा केस कोर्टाची पायरी चढणार नाही पण केसने कोर्टाची पायरी चढलीच तर काय काय शक्यता असू शकतात असे तुम्हाला वाटते ?
संदर्भ आणि अधिक वाचन :
१) http://lighthouseinsights.in/narendra-modi-bimal-nepal-copyright-issue.html/
२) http://www.appszoom.com/android_themes/wallpapers/diwali-wallpapers_iwwdv.html -स्पॅनिश वेबसाईटवर प्रकाशित तथाकथीत छायाचित्र ज्याचा दावा पंतप्रधान कार्यालयाच्या एजन्सीने केला असावा.
* हि केवळ विधीतत्व मिमांसा विषयक सर्वसाधारण चर्चा आहे कोणताही व्यावसायीक सल्ला नव्हे. सर्व धागालेख धागा लेखक आणि प्रतिसाद लेखकांना विधीतत्व मिमांसेच्या अनुषंगाने सर्वसाधारण आणि विधी विषयक उत्तरदायकत्वास नकार लागू होत आहे.
* चर्चा संदर्भास उपलब्ध वृत्तांवर आधारीत आहे चुकभूल देणे घेणे.
* चर्चेस राजकीय वळण अथवा आवांतर वळण देण्याचे टाळण्यासाठी विनंती आणि आभार
💬 प्रतिसाद
(11)
श
श्रीरंग_जोशी
Mon, 06/15/2015 - 23:07
नवीन
माहितगार यांच्या प्रश्नांची उत्तरे तर माझ्याकडे नाहीत. त्यामुळे या अवांतर प्रतिसादासाठी क्षमस्व.
बिमल नेपाल हे एक नावाजलेले फोटोग्राफर आहेत. नॅशनल जिओग्राफिक मासिकामध्ये त्यांचे फोटोज प्रकाशित होतात.
धाग्यात उल्लेख केलेल्या बातमीमुळेच मला त्यांच्याबाबत ठाऊक झाले होते. खालील फोटो त्यांच्या फेसबुक प्रोफाइलवरून साभार. हा फोटो भारताच्या पंतप्रधानांच्या फेसबुक पेजवर दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी वापरला गेला.
सदर फोटो त्यांच्याच फेसबुक प्रोफाइलवरून प्रकाशित केला आहे, जे पब्लिक आहे. ज्या क्षणी हा फोटो किंवा त्यांचे प्रोफाइल पब्लिक राहणार नाही त्या क्षणापासून हा फोटो आपल्याला दिसणार नाही. तसाच अनुभव या दोन्ही गोष्टी डिलिट केल्यासही होईलच.
कुठल्याही विनाशुल्क फोटो / चित्रे डाउनलोड करू देणार्या वेबसाइटवरील फोटो प्रताधिकार मुक्त आहे की नाही हे शोधणे फारच क्लिष्ट असू शकते. वरच्या फोटोचा युआरएल वापरून गुगलची रिवर्स इमेज सर्च सुविधा वापरता येते. याद्वारे हाच किंवा या फोटोशी साम्य असणारा फोटो सर्च रिझल्टमध्ये मिळतो.
वरच्या फोटोचा युआरएल वापरून रिवर्स इमेज सर्च केले असता मिळालेले रिझल्ट्स.
रिझल्ट्समधून मिळालेल्या फोटोजपैकी एका फोटोचे रिवर्स इमेज सर्च केले तरी बिमल नेपाल यांच्या वेबसाइट अथवा फेसबुक प्रोफाइलचा उल्लेख रिझल्ट्समध्ये मिळाला नाही.
मी ही बातमी सर्वप्रथम वाचली तेव्हा रिवर्स इमेज सर्च मध्ये बिमल नेपाल यांच्या वेबसाइटचाही उल्लेख रिझल्ट्समध्ये होता. नंतर हा फोटो इतका प्रसिद्ध झाला की रिवर्स इमेज सर्च या फोटोच्या जालावर सर्वप्रथम जिथे प्रकाशित झाला ते शोधणे खूपच अवघड आहे.
पण असे असले तरी आपण सर्वांनीच जालावर फुकट उपलब्ध असलेले काहीही प्रताधिकार मुक्त असेल असे गृहित धरून चालू नये.
या प्रकरणात पुढे काय घडामोडी घडतात याबाबत औत्सुक्य राहील.
संबंधीत बातमी:
Copyright row: US based photographer Bimal Nepal sends notice to PM Modi's office claiming damages
या प्रकरणामुळे प्रताधिकार व बौद्धिक संपदेच्या अधिकारांबाबत जनजागृती होईल अशी आशा आहे.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Tue, 06/16/2015 - 14:51
नवीन
कॉपीराईट कायदे वरकरणी तरी समजण्यास सहज सोपे आहेत. पण 'डेव्हील इज इन डिटेल्स' म्हणतात तसे गुंतागुंतही एवढीच आहे. श्रीरंग जोशींनी दिलेल्या दुव्यावर बिमल नेपाल यांची फेसबुक टाईम लाईन पाहिली. व्यावसायिक छायाचित्रकार म्हटल्यानंतर भूमिकेत त्यांच्या प्रताधिकार विषयक भुमिकेत अधिक सुस्पष्टता असावयास हवे होती असे वाटते. ११ जुनची त्यांच्या टाइमलाइन वरची त्यांची पोस्ट मोदीजींंनी वापरलेल्या छायाचित्रा संबंधाने वकीलांच्या प्रेस स्टेटमेंट बद्दल आहे. म्हणजे प्रकरण पुढे नेण्या बाबत आणि विशेषत्वाने स्वतःच्या प्रताधिकारांबाबत ते गंभीर असावयास हवेत. पण त्यांची ९ जूनची एक पोस्ट दिसते आहे त्यात ते म्हणतात "This is a daily update of BIMAL NEPAL PHOTOGRAPHY © 2015 Bimal Nepal, www.BimalNepal.com - all rights reserved. Please don't use this image on websites, blogs or other any kind of media without my explicit permission. However, please feel free to 'SHARE' on Facebook and enjoy with friends and family. यातील पहिल वाक्य परवानगी शिवाय छायाचित्रे वापरू नका म्हणते हे ठिकच पण दुसर्या वाक्यात However, please feel free to 'SHARE' on Facebook and enjoy with friends and family. म्हणतात. म्हणजे मोदींनी ते विवादीत छायाचित्र बिमल नेपाल यांच्या डेली अपडेट मध्ये आल असत आणि फेसबुकवरच्या कुटूंबीय आणि मित्रांसोबत शेअर केल असत तर चालू शकल असत पण ते मोदींनी त्यांच्या स्वतःच्या पानावर चाहत्यांना शुभेच्छा देण्यासाठी वापरल तर चालणार नाही ? त्यांच्या भूमिकेतील विरोधाभास आपल्याला पटो अथवा ना पटो, आमेरीकन प्रताधिकार कायद्याचे माहित नाही पण भारतीय कायद्यांनुसार बहुधा अधी भूमिका भारतीय कायद्यांच्या कक्षेला धरून असेल असे वाटते. पण तरीही त्यांची स्वतःचीच भूमिका एकुण काठावरची आहे असे मला वाटते.
आमेरीकन प्रताधिकार कायदा काय म्हणतो माहित नाही पण बिमल नेपालांना त्यांची छायाचित्रे फेसबुकच्या बाहेर शेअर करून नको असावीत आता श्रीरंग जोशींनी मात्र छायाचित्र मिसळपाव वर शेअर केले. श्रीरंग जोशी म्हणतात "सदर फोटो त्यांच्याच फेसबुक प्रोफाइलवरून प्रकाशित केला आहे, जे पब्लिक आहे" बहुधा प्राईम मिनीस्टर ऑफीसने मांडलेल्या सुरवातीच्या भूमिकां पैकी एक भूमिका अशा स्वरूपाचीच असावी. श्रीरंग जोशींचे छायाचित्र शेअर करणे इतर फेअर युजच्या अथवा फेअर डीलच्या तत्वात कितपत बसू शकेल हा वेगळा मुद्दा झाला पण एखादी गोष्ट पब्लिकली व्हिजीबल आहे म्हणून मी ती वापरू शकतो हे मला कायद्याच्या दृष्टीकोणातून व्यक्तीशः पटलेले नाही.
कॉपीराईट विषयक विचार करण्याची सगळ्यात सोपी पद्धत मजकुर किंवा छायाचित्रास व्यक्तीच्या मालमत्तेचा दर्जा आहे समजून विचार करावा. समजा बिमल नेपालांनी त्यांची कार पब्लिक प्लेस मध्ये म्हणजे फेसबुकचेच ऑफीस असलेल्या रस्त्यावर आणून उभी केली आणि त्या कारला केवळ फेसबुकचे ऑफीस असलेल्या रस्त्यावर तुमचे कुटूंब आणि मित्रांसोबत बघण्याचा आनंद घ्या म्हटले तर ती कार तुम्ही पब्लिक प्लेसला दिसली म्हणून इतरत्र जाऊन तुमच्या मित्रांना जाऊन दाखवणार का ? आमेरीकन प्रताधिकार कायद्यान्वये श्रीरंग जोशींचे उपरोक्त पद्धतीने छायाचित्र शेअर करणे फेअरयुज असेलही (त्यांनी आमेरीकन कायद्यांच्या भूमिकेतून यावर प्रकाश टाकल्यास बरे पडेल) श्रीरंग जोशीं आमेरीकेत वास्तव्यास असतील तर त्यांना अमेरीकन कायदे लागतात असा दावा कदाचित ते करू शकतील विरुद्ध बाजूने मिसळपावचा अॅक्सेस मुख्यत्वे भारतीय क्षेत्रात मोडतो म्हणून भारतीय कायदा लागेल असेही कुणी म्हणेल.
भारतीय प्रताधिकार कायदा आमेरीकन कायद्यांच्या तुलनेत कमी लवचिक समजला जातो. भारतीय कायद्यातील फेअर डीलींग तरतुदीत बसवायचे झाल्यास श्रीरंग जोशींनी छायाचित्र वापरताना त्याचे समिक्षण करावे, त्यावर टिका करावी किंवा त्याच्या बद्दल बातमी द्यावी. त्यांनी छायाचित्रातील कंटेंट म्हणजे दिवे रोषणाई इत्यादी बद्दल समिक्षण अथवा टिका केलेली नाही. त्यांचा उपरोक्त छायाचित्र वापर बातमी सदृष्य आहे का ? भारतीय कायद्यांचे न्यायालयीन निर्णयांचे माझे आता पावेतो जे वाचन झाले आहे असा दावा अगदी काठावर (वॉकींग ऑन थीन आईस) प्रकारात मोडणारा असू शकेल आणि न्यायालयातून मिळू शकणारे स्पष्टीकरण केस टू केस वेगळे असू शकते त्यामुळे अशी एखादी केस न्यायालयात जाऊन न्यायालयीन निर्णय प्राप्त होत नाहीत तो पर्यंत नेमके काही सांगता येत नाही.
एकुण कायतर बिमल नेपालांचे स्वतःचे वागणे काठावर, प्राईम मिनीस्टर ऑफीस काठावर , त्यांची एजन्सी काठावर (कारण त्यांची एजन्सी पैसे देऊन सुविधा देते आहे तर कॉपीराईट बद्दल सुस्पष्ट क्लॅरिटी असलेले एखादे छायाचित्र वापरावयास हवे होते) श्रीरंग जोशी वर म्हणतात हे छायाचित्र पब्लिकली व्हिजीबल आहे तो पर्यंतच मिपावर दिसेल म्हणजे त्यांचा उपरोक्त वापर काठावर आणि माझ्या सारखे जिलेब्या टाकणारे प्रतिसाद देणारेही आपापले विचार काठावर बसूनच मांडतो आहोत म्हणजे सध्याची सिच्यूएशन म्हणजे सगळेच काठावर ?
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Tue, 06/16/2015 - 17:08
नवीन
बिमल नेपाल यांचे वर प्रकाशित केलेले छायाचित्र त्यांच्याच फेसबुकपेजवरील चित्राचा दुवा वापरून केले आहे. जी Physical copy आहे ती त्यांच्या फेसबुकवरच आहे. तिची कॉपी मिपाच्या सर्वरवर नाही तसेच माझ्या कुठल्याही ऑनलाइन स्टोरेजमध्ये नाही.
त्यांनी ते तिथून डिलिट केले किंवा पब्लिक अॅक्सेस काढून केवळ स्वतःच्या फेसबुक फ्रेन्ड्सला दिसेल अशा परमिशन्स दिल्या तर ते किंवा त्यांचे फेसबुक फ्रेन्ड्स मिपावर आल्यास दिसेल पण इतरांना दिसणार नाही.
आता असा वापरही प्रताधिकार कायद्याचा भंग ठरेल काय ते मात्र माहित नाही.
अशा वापरामुळे बिमल नेपाल यांचे व्यावसायिक नुकसान झाले असा दावा त्यांच्या वकिलांनी कुठल्याही न्यायालयात केला तर तो टिकणे अवघड वाटत आहे. कारण चित्र पब्लिकली शेअर त्यांनी स्वतःच केले आहे. हे चित्र त्यांच्या फेसबुकवरून साभार असे मी मिपावर स्पष्ट लिहिले आहे. म्हणजे इतर कुणी ते स्वतः काढले आहे आहे असा दावा कुणीच केलेला नाही.
मिपावरील प्रताधिकार कायद्याच्या जाणकारांच्या प्रतिक्षेत.
बादवे बिमल नेपाल जेव्हा फेसबुकवरून शेअर करायला हरकत नाही असे म्हणतात तेव्हा ते कुणी (फेसबुकची सुविधा वापरून) शेअर केले) तर ते त्यांना ट्रॅक करता येईल असा त्यांचा कयास असावा.
पण चित्राचा दुवा वापरून फेसबुकवर शेअर केले तर चित्र ज्याच्या प्रोफाइलवरून घेतले आहे तो ट्रॅक करू शकणार नाही.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Tue, 06/16/2015 - 20:38
नवीन
मराठी संस्थळांचा उपयोग करणार्यांसाठी किमान चार एक तरी चांगल्या कॉपीराईट अभ्यासकांची गरज आहे असे वाटते.
आमेरीकन कायद्यांबद्दल खरेच माहित नाही. आमेरीकतला कायदा भारतीय कायद्यापेक्षा अधिक उदार आणि लवचीक आहे असे वाचण्यात आहे, तर भारतीय प्रताधिकार कायदा मी जेवढ्या वेळा वाचला त्या प्रत्येक वेळे नंतर मला तो खूप कंझर्वेटीव्ह वाटला आहे. बिमल नेपालांच्या केस मध्ये स्पॅनिश वेबसाईटवरील प्रताधिकार मुक्ती प्रकरण किती वास्तव अथवा पोकळ आहे हे सिद्ध होण्यावरही बरेच काही अवलंबून आहे. समजा आमेरीकन कायदा लागू पडत नसेल स्पॅनिश वेबसाईटवरील छायाचित्र मुक्ततेचा दावा पोकळ असेल तर प्रथम दर्शनीतरी भारतीय कायद्याच्या कक्षेत बसवणे अशक्य शब्द वापरणार नाही पण अवघड वाटते.
भारतीय प्रताधिकार कायदा जवळपास व्हर्बॅटीम लागू होतो असे म्हणता येईल. प्रताधिकार मालकाला त्याचा प्रताधिकार आहे; फेअर डील तरतुद लागू होत नाही आणि पुर्वानुमती घेतलेली नाही हे प्रथमतः सिद्ध करावे लागेल एवढे झाले की, कलम ५१ म्हणते 51. When copyright infringed Copyright in a work shall be deemed to be infringed-(a) when any person, without a licence granted by the owner of the copyright or the Registrar of Copyrights under this Act or in contravention of the conditions of a licence so granted or of any condition imposed by a competent authority under this Act-(i) does anything, the exclusive right to do which is by this Act conferred upon the owner of the copyright; or....
यात does anything याचा अर्थ अनुमती न घेता केलेली कोणतीही कृती infringement ठरत असावी असे माझे प्राथमिक मत आहे.
अर्थात ज्या गोष्टींचा कायद्यात उल्लेख नाही त्यांना संरक्षण मिळणे हि तेवढेच कठीण जात असावे. जसे एसएमएस ने बॉल बॉल कॉमेंटरी करण्याने प्रताधिकार भंग होतो का नाही या विषयावरची एक केस सर्वोच्च न्यायालया कडे प्रलंबित असावी असे मागील वाचनावरून आठवते. (चुभूदेघे)
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Tue, 06/16/2015 - 20:56
नवीन
छायाचित्रांच्या प्रताधिकाराबाबतीत अमेरिकन कायद्यांबद्दल सामान्य वाचकांना समजेल अशी माहिती देणारे दोन दुवे वाचतोय. बिमल नेपाल यांच्या फोटोबाबतची बातमी प्रथम वाचली होती तेव्हाही काही रोचक दुवे मिळाले होते. ते मी नोंदवून ठेवले नसल्याने नव्याने शोधत आहे.
- Photography and Copyright Law
- Understanding Photographic Copyright
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 06/17/2015 - 06:37
नवीन
पहिला दुवा वाचला माहितीपूर्ण आहेच.
चर्चा चालू आहेच तर विकिस्रोत या विकिपीडियाच्या बंधूप्रकल्पातही जगभरातल्या मूळ कायद्यांच्या प्रती आणि केसस्टडीज Portal:Copyright law उपलब्ध असू शकतात. विकिस्रोत प्रकल्पातील माहिती अंमळ जुनी आणि आउटडेटेड असू शकते, पण सहसा एवढी जुनी असते की संदर्भ देताना कॉपीराईटचे प्रश्न कमी उद्भवतात.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 06/17/2015 - 11:41
नवीन
अनुषंगिक अवांतर
ब्रिटन मधील दोन वृत्तमाध्यमे संडे टाइम्स आणि गार्डीअन यांनी त्यांच्यावर टिका करणार्या ब्लॉग/व्लॉग वर कॉपीराइट संदर्भाने आक्षेप घेतले आहेत.
*या लेखात संडे टाइम्सच्या अॅटीट्यूड बद्दल गार्डीयनच्या मंचावरून टिका दिसते आहे.
* या ब्लॉग मध्ये गार्डीयनच्या अॅटीट्ञूड बद्दल टिका दिसते आहे.
रोचक आहे.
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
Tue, 06/16/2015 - 10:17
नवीन
प्रतिसाद आवडला
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Tue, 06/16/2015 - 10:47
नवीन
+१
हेच म्हणतो...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- में गोरी चिट्टी छमिया... ;)
- Log in or register to post comments
प
पैसा
Wed, 06/17/2015 - 08:19
नवीन
चांगली आणि महत्त्वपूर्ण चर्चा.
- Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ
Wed, 06/17/2015 - 10:34
नवीन
तरीही, पंतप्रधान कार्यालयासारखे (तगडे) गिर्हाईक असलेल्या प्रसिद्धी संस्थेने मुळातच इथून तिथून फुकट (प्रताधिकारमुक्त असो की नसो) आर्टवर्क गोळा करून त्याचा वापर करावा हे लज्जास्पद आहे. जरा बर्या अॅड एजन्सीज, जिल्हा स्तरावरील वृत्तपत्रेही स्वतःची मॉडेल्स इ. वापरून फोटो काढवून घेतात की!
या फुकट आर्टवर्कवाल्या टेंप्लेटचे पैसे किती घेण्यात आले, ही माहिती रोचक ठरेल.
- Log in or register to post comments