Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

यादवकालीन शिल्पसमृद्ध मंदिर: पिंपरी दुमाला

प
प्रचेतस
Wed, 06/17/2015 - 16:27
💬 69
असंच कधीतरी, कुठूनतरी पुणे-नगर रस्त्यावर रांजणगावच्या आसपास पिंपरी दुमाला येथे एक शिल्पसमृद्ध यादवकालीन मंदिर आहे ह्याची माहिती मिळाली होती. नक्की ठिकाण कुठे ते माहित नव्हते. मग काय निघालो शोधत आम्ही. पेरणे फाटा ओलांडल्यावर दोन तीन ठिकाणी विचारतच जावे लागले. एका ठिकाणी डावीकडचा रस्ता पिंपरी दुमाला येथे जातो अशी माहिती मिळाली. तिथून घुसलो. चांगला डांबरी रस्ता थोड्याच वेळात कच्च्या खडबडीत रस्त्यात रूपांतरीत झाला. मग अतिशय लहानलहान वाड्या लागू लागल्या. ठिकठिकाणी विचारत खराब रस्त्याने एकदाचे पिंपरी दुमाला येथे जाऊन पोहोचलो. गाव तसं लहान. मंदिर गावात शिरल्याशिरल्यानंतर थोडं पुढं आहे. सोमेश्चर मंदिर हे आजचं नाव. पूर्वीचं काय ते नक्की माहित नाही. मूळात मूळचं मंदिर शिवाचंच होतं की काय अशी शंका मंदिर नीट पाहिल्यावर मनात उभी राहते. गावकर्‍यांनी मंदिराला छानसं कुंपण घातलंय. मंदिर नीटनेटकं ठेवलंय. पण मूळच्या मंदिरावर रंगरंगोटीचे दुर्दैवी अविष्कार ह्या मंदिराच्याही वाट्याला आलेत. पूर्वी हे भूमिज शैलीत बांधलेले मंदिर असावे. आज शिखराचा भाग आधुनिक आहे. तर मंदिराच्या अंगाचा भाग १००/२०० वर्षांपूर्वी भग्नावस्थेतून जीर्णोद्धारीत केलेला आहे. सभामंडपाचा भाग जीर्णोद्धारीत दिसत असून गाभार्‍याच्या बाह्य भाग हा मूळाच्याच शैलीत दिसतो. ह्या जीर्णोद्धारात मूळाच्या अनेक मूर्तींची जागा बदललेली येथे स्पष्टपणे दिसते. इतकेच नव्हे तर आवारात असलेले वीरगळही भिंतींमध्ये आधाराचे दगड म्हणून लावल्याचे येथे आढळते. मंदिराच्याच शेजारी खोलवर बांधून काढलेली एक अतिशय देखणी पुष्करिणी आहे. पिंपरी दुमाला सोमेश्वर मंदिर a मंदिराच्या पुढ्यात नंदीमंडप आहे तर आवारात एका बाजूला यज्ञवराह आणि मत्स्याची मूर्ती आहे. यज्ञवराह म्हणाजे विष्णूचा तिसरा अवतार-वराहवतार. हा जेव्हा वराहाच्या पूर्ण रूपात दाखवला जातो तेव्हा तो यज्ञवराह म्हणवला जातो तर जेव्हा शिर वराहाचे आणि धड विष्णूचे अशी मूर्ती असेल तेव्हा तो नरवराह म्हणू ओळखला जातो. यज्ञवराहाच्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या अंगावर विष्णूच्या लहानलहान असंख्य मूर्ती कोरलेल्या असतात तर सुळ्यांवर पृथ्वी धारण केलेली असते आणि पायातळी नाग असतो जे पाताळाचे प्रतिक मानले जाते. पुणे जिल्ह्यात तीन ठिकाणी यज्ञवराहाच्या मूर्ती आहेत- लोणी भापकर, पिंपरी दुमाला आणि चाकणचे चक्रेश्वर मंदिर. इथली यज्ञवराहाची मूर्ती अत्यंत भग्न झालेली आहे. त्याच्याच बाजूला मत्स्याची मूर्ती आहे. सुरुवातीला ही मूर्ती पाहून ही कासवाची असावी असे वाटून माझी गफलत झाली होती. पण नीट पाहता हीचे तोंड मत्स्याशी जास्त मिळतेजुळते आहे. हा विष्णूचा पहिला अवतार मत्स्यावतार. यज्ञवराह a मत्स्यावतार a मत्स्य आणि वराह a मंदिराच्या पुढ्यातला नंदीमंडप a चला तर आता मंदिराच्या बाह्यांगाचा एक फेरफटका मारूयात. पण तत्पूर्वी मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी लावून ठेवलेली एक विष्णूमूर्ती बघूयात. ही इथली सर्वात देखणी मूर्ती. कित्येक शतकांच्या उनपावसाच्या मार्‍याने आज ही बर्‍यापैकी झिजली आहे. समभंग मुद्रेत ही मूर्ती असून शंख, चक्र, गदा ही आयुधे स्पष्ट दिसत आहेत तर पायापाशी गरुड विष्णूला प्रणाम करीत आहे. बाजूला इतर काही अनुयायी दिसत आहेत. नक्षीदार प्रभावळीत मस्तकाच्या वर गणेशमूर्ती कोरलेली असून डावी उजवीकडे बहुधा ब्रह्मा आणि महेश आहेत. ही मूर्ती सोडून मंदिराच्या आवारात इतरही असंख्य भग्न विष्णूमूर्ती आहेत. विष्णूमूर्ती a चला तर आता मंदिराच्या बाह्यांगाचा एक फेरफटका मारूयात. मंदिरांच्या बाह्यभागावर सुरसुंदरी, वादक, ऋषी, भैरव, चामुंडा, विष्णू, गणेश, महावीर तसेच काही वैशिष्ट्यपूर्ण मूर्तीही येथे आहेत. इथल्या मूर्ती तशा देखण्या नाहीत. बहुधा १३/१४ व्या शतकात यादव राजवट संपता संपता हे मंदिर बांधले गेले असावे. साहजिकच मूळच्या शैलीतली वैशिट्ये कायम राहूनही देखणेपणाचा मात्र येथे लोप झालेला दिसतो. बाह्यभिंतींवरील सुरसुंदरी. a सुरसुंदरींच्या मध्ये मधेच वीरगळ चिणलेले दिसतात. a येथे काही मैथुनशिल्पे सुद्धा आहेत. a इथल्या एका भिंतीवर खूप आगळीवेगळी शिल्पे आहेत. कावड घेतलेला पुरुष, मोठे वृषण असलेला पुरुष, बाळाला जन्म देत असलेली स्त्री. आगळीवेगळी शिल्पपट्टीका a बाळाला जन्म देणार्‍या स्त्रीची प्रतिमा मी लोणी भापकर येथील मंदिरावर पण पाहिलेली आहे. अशा शिल्पांचा उद्देश काय असेल ते कळात नाहीत पण बहुधा सृजनाचे प्रतिक म्हणून अशी शिल्पे कोरली जात असावी. पिंपरी दुमाला येथील जन्मदात्र्या आईची प्रतिमा a भिंतीत चिणलेले वीरगळ येथे ठायी ठायी दिसत राहतात. इथल्या वीरगळाअंचे वैशिष्ट्य म्हणाजे हे वीरगळ त्रिस्तरीय आहेत. सहसा वीरगळ ४ स्तरांचे असतात. सर्वात वरचा थर शिवपिंड व नमस्कार करणारा वीर, दुसरा थर वीराला अप्सरा कैलासास घेऊन जाताना. तिसरा लढाईचा थर तर चौथा धारातीर्थी पडलेला वीर. येथे मात्र अप्सरांच्या थराचा अभाव दिसतो. a a शिल्पपट्टीकेच्या शेजारीच ऋषी, जैन साधक अशा काही प्रतिमा आहेत. a सभामंडपाचा भाग संपवऊन आपण आता गर्भगृहाच्या बाह्यभागाशी येतो. येथे मंदिराचा मूळाचा भाग कायम राहिलेला दिसतो. इथल्या भिंतीवर जागोजागी विविध मूर्ती आहेत. इथल्या कोष्ठांमध्ये तसेच त्यांछ्या आजूबाजूला देखील मूर्ती कोरलेल्या दिसतात. तप करणारा ऋषी a ऋषी, गोमटेश्वर, अनुयायी आणि गणेश a इथल्या देवकोष्ठात भैरवाची मूर्टी देखील आहे. हाती कपाल आणि खट्वांग, डमरू आणि त्रिशूळ, गळ्यात नरमुंड आणि संपूर्ण नग्न अशी ही भैरवाची प्रतिमा भैरव a भैरवाच्याच जोडीला येथे नंदीवर बसलेल्या शिवाची मूर्ती देखील आहे. शिव a मंदिराचा पार्श्वभाग a इथल्या भिंतींवर मातृशक्तीचे प्रतिक असलेल्या काही मूर्ती आहेत.( मातृका नव्हेत) पैकी एकीच्या एका हाती आंब्याचा घोस तर दुसरे हाती बीजापूरक धारण केलेले दिसते. तिच्याच बाजूला दर्पणसुंदरी आहे. तर दोघींच्या मध्ये एका सुंदरीने हाती नाग पकडलेला आहे. बीजापूरक धारण केलेली स्त्री आणि दर्पणसुंदरी a त्याच्याच जवळपास विषकन्येची एक मूर्ती आहे. विषकन्येसोबतच असितांग भैरव आणि सुरसुंदरी आहेत. a विषकन्या जवळून a सुरसुंदॠ अभिसारिका प्रियकराला भेटायला नटूनथटून चालली आहे तर तिला एक मर्कट त्रास देते आहे. ती त्या मर्कटला एक थप्पड देते आहे. तिच्याच शेजारी डावीकडे एक घंटानाद करणारी पुरुषमूर्ती आहे. सुरसुंदरी अभिसारिका a चामुंडेची एक अतिशय देखणी मूर्ती येथे आहे. अस्थिपंजर शरीर, खोबणीतून बाहेर आलेले डोळे, विचकलेल्या दाढा, लांबट स्तन, गळ्यात विंचू आणि नरमुंडमाला, हाती डमरू अआणि त्रिशुळावर नरमुंड आणि पायातळी प्रेत ही चामुंडेची वैशिष्ट्ये येथेही आहेत. ही चामुंडा ओठांमध्ये बोट ठेऊन शीळ घालत आहे. चामुंडा a चामुंडेच्या शेजारी वेताळगण आणि सुरसुंदरी पुत्रवल्लभा आहे. पुत्रवल्लभा म्हणजे कडेवर लहान बाळ घेतलेली स्त्री. सुरसुंदरी पुत्रवल्लभा a ह्या मूर्तीशेजारीच नटराज शिव आहे. a मंदिराचे बाह्यांग a एके ठिकाणी भिंतीत कठोर तप करणारा ऋषी आणि नागप्रतिमा आहे. a परत येथे जैन साधक किंवा महावीर आणि नागप्रतिमा दिसते. a सुरसुंदरी आणि वादक a मंदिरांच्या बाह्यांगाचा फेरफटका मारून आपण मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश करतो. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस प्रतिहारी तसेच सेवक कोरलेले आहेत. सभामंडप नक्षीदार स्तंभांवर कोरलेला असून स्तंभांच्या जंघ्यांवर विविध प्रकारची शिल्पे, किर्तीमुखे आणि नक्षी इत्यादी कोरलेली आहेत. प्रवेशद्वारावरील प्रतिहारी a सभामंडप a स्तंभांवरील काही शिल्पे -वाली आणि सुग्रीव a तीन पुरुष आणि चार पाय असलेले आभासी शिल्प a वादक a पुन्हा एकदा चामुंडा a गर्भगृहाचे दारावर देखील प्रतिहारी कोरलेले असून मंदिरातील सर्वात देखणे स्तंभ तेथेच आहे. गर्भगृहाचे प्रवेशद्वार a सोमेश्वर महादेव a गाभार्‍यातून बाहेर पडून पुष्करिणीपाशी गेलो. अतिशय देखणी पुष्कर्णी आहे ही. पूर्णपणे बांधीव. खोलवर उतरत गेलेली. a येथून अगदी जवळच दुसरे एक लहानसे मंदिर आणि तेथेच एक भव्य पुष्करिणी आहे. ती मात्र आवर्जून पाहालायच हवी. रामेश्वराचे ते मंदिर. रामेश्वर मंदिर a रामेश्वर पाहिल्यावर तिथून निघालो तर रांजणगाव ७ किमी अशी पाटी दिसली. अतिशय चांगला रस्ता. ह्या रस्त्याने रांजणगावच गणपती, मंदिराचे आवारातील सतीशिळा आणि वीरगळ पाहून घरी परतलो. काही टिपलेले क्षण a a a a a

प्रतिक्रिया द्या
20353 वाचन

💬 प्रतिसाद (69)
ब
बॅटमॅन गुरुवार, 06/18/2015 - 15:36 नवीन
अच्छा, धन्यवाद 'प्र'ल्ली आणि कंजूस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
क
कंजूस गुरुवार, 06/18/2015 - 15:24 नवीन
जुन्नर -पुरफाटा-चावंडफाटा-घाटघर-{ नाणेघाट करता} अंजनावळे बस जाते.पुरफाट्यापासून एक किमी आहे कुकडेश्वर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
स्वच्छंदी_मनोज गुरुवार, 06/18/2015 - 16:09 नवीन
आणी हे मंदीर नुकतेच ASI ने पुर्नबांधीत केले आहे. पुर्वी ह्या मंदीराचे दगड इतस्तः पडले होते आता मंदीर सुरेख आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
स
स्वच्छंदी_मनोज गुरुवार, 06/18/2015 - 16:19 नवीन
शंका - खिरेश्वर चा नागेश्वर त्याही पेक्षा जुना असू शकेल काय? कारण ह्याच्या मंदीरात छताला असलेले कोरीव नक्षीदार दगड अत्यंत सुंदर आहेत आणी अजुन कुठे असे आहे काय? जश्या नक्षीदार टाईल्स असाव्यात तसे मोजून मापून हे चौकोनी दगड छताला बसवले आहेत. आणी ह्याच्या जवळच असलेल्या लेण्या (त्यासुद्धा आत बांधत गेलेल्या) हे बघून ही शंका घ्यायला वाव आहे काय? प्रश्ण - जसे यादवकालीन शिव मंदीरे आहेत तशीच शिलाहारकालीन शिव मंदीरे ठाणे जिल्हात बांधली गेलीत, बहुदा १२ असावीत जशी की अंबरनाथ, कौपीनेश्वर, आटगांव, लोनाड. ह्या मंदीराची माहीती आहे काय तुझ्याकडे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस गुरुवार, 06/18/2015 - 16:55 नवीन
नागेश्वर साधारण कुकडेश्वराच्या समकालीन आहे. ही दोन्ही मंदिरे उत्तर कोकणचा शिलाहार राजा झंझ ह्याने बांधलेली मानली जातात. ठाण्यात शिलाहारांनी अनेक मंदिरे बांधली आहेत पण ती वेगळ्या राजांनी. अंबरनाथचे शिवालय मुन्मुणी याने बांधले तर कौपिनेश्वर, आटगांव बहुधा अपरादित्याने बांधलेली आहेत. पण झंझाने बांधलेली १२ शिवालये ही घाटमाथ्यावर होती. आजमितीस २/३ वगळता इतर सर्वच नाहिशी झालीत. शिलाहार राजा अपरादित्याच्या पन्हाळे ताम्रपटात झंझाने केलेल्या मंदिरनिर्मितीचा पुढिलप्रमाणे उल्लेख आहे. श्री झंझराजो दिवसकर इव ध्वस्तनि: शेष दोषः शंभर्यो द्वादशोपि व्यरचयद चिरा त्कीं तनानी स्वनाम्ना सोपानानी ह्याने बांधलेली काही मंदिरे पुढीलप्रमाणे त्र्यंबकेश्वर (सध्याचे नाही) , त्रिंगलवाडी, बेलगाव, टाकेद, रतनवाडीचा अमृतेश्वर, हरिश्चंद्रगडावरील हरिश्चंद्रेश्वर, पूरचा कुकडेश्वर, खिरेश्वरचा नागेश्वर, भोरगिरी. बाकीची नेमकी कुठे आहेत ते आता आठवत नाहीत. शिवाय वरील यादित उल्लेख केलेली मंदिरे हीच झंझाने बांधलेली आहेत याचीही शाश्वती देता येणार नाही कारण अमृतेश्वर, कुकडेश्वर, नागेश्वर ही मंदिरे सोडली तर इतर मंदिरे आज अस्तित्वात नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वच्छंदी_मनोज
स
स्वच्छंदी_मनोज Fri, 06/19/2015 - 20:31 नवीन
जबरी माहीती..अनेक धन्यवाद ह्या माहीती बद्दल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
झ
झकासराव गुरुवार, 06/18/2015 - 13:11 नवीन
भारी आहे लेख. :)
  • Log in or register to post comments
प
पाटील हो गुरुवार, 06/18/2015 - 13:30 नवीन
फोटो भारी , सवडीने वाचण्यात येईल .
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 06/18/2015 - 13:36 नवीन
लेख आवडला, नवी माहिती समजली. फोटोही आवडले. स्वाती
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 06/18/2015 - 14:22 नवीन
लास्टच्या फोटोत धन्या एकदम ड्याशींग दिस्तोय नै...एक्दम बॉडीबिल्डींगची पोज आहे :) Image removed.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Fri, 06/19/2015 - 16:56 नवीन
खूप छान फोटो आणि माहीती. रामेश्वर मंदीर आणि त्यासमोर पुष्करीणी (बांधलेली वीहीर) हे ठरलेलेच असते का? असे विचारण्याचे कारण माझ्या आजोळी आणि माझ्या गावी, दोन्ही ठीकाणी रामेश्वराचे देउळ आहे आणि दोन्ही देवळांसमोर चित्रातल्याप्रमाणे बांधलेल्या वीहीरी आहेत. शेजारच्या गावातही असेच आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 06/19/2015 - 19:43 नवीन
केवळ रामेश्वरच असं नाही पण बहुतेक सर्वच प्राचीन मंदिरांत पुष्करिणी असतेच असते. जेथे पुष्करिणी दिसत नाही तेथे हमखास नदी असते मंदिरातील देवतेच्या अभिषेकाच्या दृष्टीने ही पाण्याची सोय केलेली आढळते आणि मंदिरांचे कुठले ना कुठले द्वार त्या पाण्याच्या दिशेने असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
य
योगेश आलेकरी Fri, 12/04/2015 - 04:54 नवीन
चंडिका व चामुंडा मधील फरक कृपया स्पष्ट कराल का ?? भुल्श्वरला चंडिका आहे की चामुंडा की विषकन्या.. ????
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 12/04/2015 - 05:08 नवीन
चंड म्हणजे क्रुद्ध. चंडिका हे दुर्गेचे क्रोधित रूप आहे. तर चामुंडा ही मातृकांपैकी एक आहे. दोघीही शाक्त परंपरेतल्याच. चंडीकेची लक्षणे सामान्यतळ दुर्गेप्रमाणेच असतात तर चामुंडा ही सापळ्यासारखी, भयप्रद, पोटात विंचू, हाती कपाल आणि प्रेतवाहन असणारी. भुलेश्वरला चंडिका नाही, मात्र महिषासुरमर्दिनी आहे, चामुंडा आणि विषकन्या ह्या सुद्धा आहेत. विषकन्या मात्र देवी नसून नायिका आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगेश आलेकरी
ए
एक सामान्य मानव Fri, 12/04/2015 - 06:55 नवीन
ह्यातिल काही प्रतिमा बेलूर व हळेबिडू येथे अगदी अशाच आहेत. उदा. सुन्दरी व मर्कट, भैरव, चामुंडा ह्या तर स्पष्ट आठवतात. इतक्या दुरवरील मंदीरात हे साम्य कसे?
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 12/04/2015 - 07:54 नवीन
मूर्तींमध्ये साम्य तसे कमी. कारण शैली वेगळी असते. होयसळ शैली खूप सालंकृत आहे. मात्र भारतभर लक्षणे तीच आढळतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक सामान्य मानव
द
दमामि Fri, 12/04/2015 - 07:26 नवीन
सुरेख लेख! मंदिरांकडे असे कधी पाहिले नव्हते.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Sat, 12/05/2015 - 10:44 नवीन
अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण लेख.
  • Log in or register to post comments
ब
बिन्नी Sat, 12/05/2015 - 13:19 नवीन
उत्तम लेख. फोटो ही आवडले.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा