उत्तर मराठेशाही बद्दल काही शंका... सनद, चौथाई वगैरे
मृत्युन्जयाच्या या प्रतिसादावरुन आमचा हा उपक्रमावरचा का कू आठवला. त्यावर अगदी नीट चर्चा देखील झाली होती पण काही तरी राहिल्यासारखे वाटत राहिलेच. म्हणून तोच इथे परत टाकतोय पण तिथले प्रतिसाद आधी वाचलेत तर चर्चेस अजून मदत होईल..
इतर अभिनिवेश सोडून चर्चा होईल अशी आशा.
======
मराठेशाहीचा शिवाजी ते संभाजी तसेच राजाराम इथवरचा इतिहास थोडाफार समजण्यास सोपा वाटला, कमीत कमी तो एका हेतूने प्रेरित असा वाटतो (जेवढा वाचला तो तरी). अगदी औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत 'मोघल सत्तेशी लढा' असे म्हणता येते.
परंतु मग शाहू राज्य करू लागल्यावर त्याच मोगलांकडे दक्षिणेच्या चौथाईसाठी सनदा मागण्याचे प्रयोजन काय ते मात्र कळत नाही. ज्यांच्याविरुद्ध २७ वर्षे लढा दिला त्यांच्या दारात त्यानंतर सदैव सनद, चौथाई वगैरे साठी मराठे (सातारकर (पेशव्यामार्फत), कोल्हापूरकरदेखील ) जाताना दिसतात.. हे कसे?
पहिल्या बाजीरावाची आणि निजामाची जवळ जवळ सर्व युद्धे या चौथाईच्यासाठी झालेली दिसतात. अगदी त्यानंतरही बहुतेकवेळा मराठे सर्व भारतात वर्चस्व गाजवत असताना देखील एक राज्यव्यवस्था म्हणून काहीही वैशिष्टये दिसत नाहीत. बंगालात तर कोलकात्याबाहेर 'maratha ditch' नावाची गोष्ट मराठा 'लुटारूंना' रोखण्यासाठी होती असे दिसते.
जर कोणतीही राज्यव्यवस्था म्हणून मराठेशाही उभी राहिली नसेल आणि (नामधारी मोगल सत्तेच्या परवानगीने) चौथाई, खंडणी आणि लूट अशा मार्गांनी तिचे बहुतांश अस्तित्व जाणवत असेल तर शिवाजींचे कार्य आणि दृष्टीकोन(vision) यांच्याशी नाळ तुटलेल्या व्यवस्थेस 'मराठा साम्राज्य' किंवा तत्सम उपाधी कितपत योग्य?
(मला चौथाई काय तेही नक्की माहीत नाही.. परंतु 'मराठ्यांचा इतिहास' (लेखक आठवत नाही) हे पुस्तक वाचताना उद्भवलेल्या या शंका इथे मांडतोय.. )
====
तिथले रोचनासारख्यांचे अभ्यासपूर्ण प्रतिसाद पाहिल्यावर अजूनही आपल्या मनात काय शंका राहिलीय असा प्रश्न पडलाय.असेच म्हणतो.