Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

'राहून गेलेलं काही...'

ए — एस, Mon, 06/29/2015 - 10:55
'राहून गेलेलं काही...' 'वेडीच्च आहेस तू कशाला केलंस बरं माझ्यासारख्या सडाफटिंगाशी लग्न? आणि तू हसून म्हणावं तुम्ही हुशार आहात ना, म्हणून. हे तुझं वेडेपण समजून घेणं राहूनच गेलं किनार्‍यावरल्या रेतीत तुझा हात हातात घेऊन पहिल्यांदाच चाललो होतो असे हरवलो होतो की कळलंच नव्हतं कधी तुझ्या पायातलं जोडवं पळवलं होतं लाटांनी ते परत आणण्याच्या बहाण्यानं पुन्हा फिरलो होतो दोघं तसं परत एकदातरी फिरायचं राहूनच गेलं तसंही गजराबिजरा आणायची मला कुठली असायला आठवण आणि राहू द्या, फुलं झाडावरच चांगली दिसतात हे तुझं नेहमीचं समजूतदार वागणं पण तुझ्या लांबसडक वेणीतही ती तितकीच छान दिसतात हे तुला म्हणायचं राहूनच गेलं आणि तो बघ, तो सोनचाफा कसा तरारलाय तुझ्याच हातचा आहे त्याची अद्याप न आलेली फुलं तुझ्या ओंजळीत ओतायचं अन् त्यांचा वास तू छातीत भरून घेणं पहायचं राहूनच गेलं आणि मला खात्री आहे, तू विसरली असशील एकदा चिडून हात उगारलेला तुझ्यावर माझ्या अवाढव्य पुरुषी अहंकारातून. आता वाटतं, एवढाही काही जोरात नव्हता तो तू मला काढलेला चिमटा नंतर पाठ वळवून गप्प झालेल्या तुझ्या गालांवरचे दोन थेंब प्रेमानं पुसायचं राहूनच गेलं कधीच बोललो नाही तुला मी की तुझी काळजी वाटते मला म्हणून पण तू तरी कधी तसं म्हणालीस शब्दांनी नाही पण मौनांनी आणि दुर्लक्षानेच बोलायचो एकमेकांशी त्या मौनांची भाषांतरे डोळ्यांनीच व्हायची आपोआप तुझ्या डोळ्यांत पाहून ते मौन एकदातरी सोडायचं राहूनच गेलं नाही? फार दर्दबिर्दभरं नाहीये आपलं 'मॅरिड लाईफ' का काय म्हणतात ते तसं रोमँटिकतरी कुठेय म्हणा अ‍ॅरेंज मॅरेज असल्यावर कुठले आलेत त्यात तसे रोमहर्षित क्षण पण पहायला आलेलो तेव्हाच तुझ्या प्रेमात पडलो होतो मग आपलं 'लव्ह मॅरेज' कसं नाही बरं? हा प्रश्न विचारायचं राहूनच गेलं अजून एक विचारायचं राहून गेलं तू पण पडली होतीस ना माझ्या प्रेमात? तेव्हा? अन् पाऊस आला की - ह्याही कवितेत हा आलाच बघ. - असा कसा आला, तुम्हांला तर अजिब्बात नाही ना आवडत तो? असा तुझा ठेवणीतला टोमणा मला न चुकता मारणं मला आवडत नाही भिजायला म्हणून तूही कोरडं राहणं पागोळ्यांच्या धारांकडे मुग्धपणे तुझं ते बघत बसणं मला कागदाची नाव बनवायला तू दरवर्षी शिकवतेस तेही विसरून जातो मी नित्यनियमाने. पण त्या होडीत बसून तुझं मन कुठल्या प्रवासाला जातं निघून ते शोधायचं राहूनच गेलं देत आलेत लोक त्याच त्या उपमा स्त्री-पुरुषाच्या नात्याला पुरुष म्हणे वटवृक्ष अन् स्त्री म्हणजे वेल. कुणीतरी त्यांना सांगायला पाहिजे वटवृक्ष त्याला लपेटलेल्या त्या वेलीच्याच आधाराने तर आहे उभा शिकतोय हळूहळू तोही तिच्याकडून लवचिकपणा नाहीतर केव्हाच कोसळला असता त्याचा डौलदार भव्यपणा कालच्याही वादळात तिचं खंबीर राहणं तो स्तब्ध होऊन पहातच राहिला होता याची कबुली देणं राहूनच गेलं माझं डोकं दुखायला लागलं की कशी नको म्हणलं तरी हट्टानं देतेस दाबून दुखतात तुझेही पाय तसे - तुला काय वाटलं, मला समजणार नाही? मी देऊ का दाबून म्हटलं तर मात्र नको. एकदातरी तुला न जुमानता हळुवारपणे तुझ्या पायांना मलम लावायचं राहूनच गेलं आणि अजून काय बरं राहून गेलंय? हे आठवायलाही तुझीच मदत लागणार आहे मला नेहमीप्रमाणेच. तोपर्यंत एकदा घालतेस का जरा ही कविता तुझ्या नजरेखालून? पण नको. मला माहितीये तू काय म्हणशील ते 'हे असं लिहायलाच पाहिजे का?' अन् शांतपणे मला कागद परत देत, लागशील आपल्या कामाला. सये, लिहायला हवंच होतं ना हे एकदातरी नाहीतर हेही राहूनच गेलं असतं...' - एस.

प्रतिक्रिया द्या
9897 वाचन

💬 प्रतिसाद (65)
व
विशाल कुलकर्णी Mon, 06/29/2015 - 11:04 नवीन
मस्त...
  • Log in or register to post comments
म
मधुरा देशपांडे Mon, 06/29/2015 - 11:08 नवीन
सुंदर!!
  • Log in or register to post comments
प
पथिक Mon, 06/29/2015 - 11:12 नवीन
वा ! अतिशय सुंदर ! कर दिया ना इमोशनल ! :D
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Mon, 06/29/2015 - 11:17 नवीन
पण पहायला आलेलो तेव्हाच तुझ्या प्रेमात पडलो होतो मग आपलं 'लव्ह मॅरेज' कसं नाही बरं?
हे फारच मस्तं.....
  • Log in or register to post comments
स
सावत्या Mon, 06/29/2015 - 11:32 नवीन
अप्रतिम!!! "लिहायला हवंच होतं ना हे एकदातरी नाहीतर हेही राहूनच गेलं असतं...'" Image removed.
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Mon, 06/29/2015 - 11:39 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 06/29/2015 - 11:50 नवीन
चलो देर आये लेकीन दुरुस्त आये. खरतर काही काही गोष्टी राहून देण्यातच मोठी गंम्मत असते. सगळे जर योजनाबध्द आणि परिपूर्ण असेल तर समोरच्या व्यक्तीला ते कंटाळवाणे होउ शकते. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 06/29/2015 - 12:00 नवीन
व्वाहव्वा!
  • Log in or register to post comments
न
नाव आडनाव Mon, 06/29/2015 - 12:12 नवीन
मस्त. कविता आवडली :)
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 06/29/2015 - 12:37 नवीन
अतिशय तरल, तलम, सुरेख लिहिलंय!
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Mon, 06/29/2015 - 12:44 नवीन
वाह! अतिशय आवडली !
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 06/29/2015 - 13:01 नवीन
_/\_ :)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 06/29/2015 - 13:21 नवीन
क्या बात है...! अप्रतिम.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 06/29/2015 - 13:29 नवीन
वाहवा ! सुंदर !!
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Mon, 06/29/2015 - 13:37 नवीन
मस्त जमलीये कविता.
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 06/29/2015 - 13:48 नवीन
साक्षात दंडवत ....... रा.गे.लेला नाखुस
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 06/29/2015 - 14:31 नवीन
खूपच आवडली कविता. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सटक Mon, 06/29/2015 - 15:00 नवीन
क्या बात है! एकटाकी आहे का?
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Mon, 06/29/2015 - 15:57 नवीन
अतिशय सुंदर कविता.
  • Log in or register to post comments
ए
एस Mon, 06/29/2015 - 16:51 नवीन
धन्यवाद! पैजारबुवा, ते गाणं आहे ना प्रसिद्ध - 'गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा...' तसंच काहीसं असतं हे. सटक, परवा रात्री लिहून काढली. तशीच इथे पोस्ट केलीयं.
  • Log in or register to post comments
स
सटक Mon, 06/29/2015 - 17:56 नवीन
सुंदर!! अशी कविता ती ही एकटाकी!! व्वा!! जियो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
र
रातराणी Tue, 06/30/2015 - 07:15 नवीन
वा!टू गुड!
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Tue, 06/30/2015 - 08:13 नवीन
सहज सुंदर! मनाची तरलता अगदी छान उमटली आहे!
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Tue, 06/30/2015 - 17:22 नवीन
Classss!!!!!!!!
  • Log in or register to post comments
व
वॉल्टर व्हाईट Tue, 06/30/2015 - 22:12 नवीन
कविता वाचनीय आहे, पुन्हा पुन्हा वाचायला आवडेल. जशी कविता लिहिली तसेच कवितेतल्या बाकी गोष्टींना किंवा आख्या कवितेलाच बकेट लिस्ट मानुन एकेक पुर्ण करा.
  • Log in or register to post comments
स
स्रुजा Wed, 07/01/2015 - 00:29 नवीन
वाह, वाह ! नवर्‍याकडुन अशा अनेक म्हणलं तर सांगायच्या राहुन गेलेल्या पण तरीही मला कळलेल्या गोष्टी आठवल्या. मला त्यातल्या काही कळल्या आहेत हे पण कविता वाचतानाच जाणवलं :)
  • Log in or register to post comments
ए
एस Wed, 07/01/2015 - 02:50 नवीन
धन्यवाद वॉल्टर आणि स्रुजा! स्वतःच्या हृदयाचे ठोके स्टेथोस्कोप लावून स्वतः ऐकावेसे वाटावेत असे क्षण फार दुर्मिळ असतात. मग तसा माहौल, तो समाँ जमून आला की ते ठोके कागदावर उतरतात ते कधी कुंचल्यातून नाहीतर लेखणीतून. ते जसे येतात तसेच झरझर उतरतात आणि तयार होते एक तरल, सूचक चित्रण. त्यातल्या न भरलेल्या, न रंगवलेल्या अपूर्ण जागा ह्या जास्त महत्त्वाच्या, बोलक्या असतात. आणि एकदा ते रंग, ती शाई वाळली आणि स्टेथोस्कोप काढून व्यवहारी जगाचा सदरा चढवला की मग त्या अभिव्यक्तीला तिथेच, तसेच सोडून देणेच इष्ट असते. पाहूया. परत तशी ती रात्र फिरून आली तर अजून भरेन रंग किंवा अजून एखादे रेखाटन. आणि हो, बकेट लिष्टात नेमके काय काय आयटम भरायचे राहून गेलेत हे आठवायला बायकोला शरण गेल्याशिवाय गत्यंतर नाही. मग त्यासाठी ती बकेटलिष्ट हिला आधी दाखवायला लागेल. मग ती शांतपणे आधी एक करुणार्द्र आणि मग एक तुच्छ असा कटाक्ष टाकेन अन् म्हणेल, "काल वाणसामानाची लिष्ट करायला बसला होता ना, ती आधी पूर्ण करा. मग बघू या यादीचं." :-D
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Wed, 07/01/2015 - 03:05 नवीन
खूपच आवडले.... :)
  • Log in or register to post comments
न
नेत्रेश गुरुवार, 07/02/2015 - 00:24 नवीन
आवडली!
  • Log in or register to post comments
न
नेत्रेश गुरुवार, 07/02/2015 - 00:24 नवीन
आवडली!
  • Log in or register to post comments
स
सस्नेह गुरुवार, 07/02/2015 - 02:59 नवीन
हळव्या तरल भावना पोचल्या. रच्याकने रोखठोक अन रांगड्या मराठीतल्या शब्दातून अशा अभिव्यक्ती दुर्मिळ ! तो मिका एक तसलाच +)
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत गुरुवार, 07/02/2015 - 03:45 नवीन
कविता आवडली
  • Log in or register to post comments
ख
खेडूत गुरुवार, 07/02/2015 - 05:22 नवीन
वाह!
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ गुरुवार, 07/02/2015 - 05:52 नवीन
Swaps भौ कविता भारीए! तिकडे डॉक्टर गद्यात् आणि तुम्ही पद्यात् वाचकांच्या काळजाला हात घालू रहायले ना भौ.
  • Log in or register to post comments
ए
एस गुरुवार, 07/02/2015 - 14:09 नवीन
काय नाय वो, त्ये काळीज चाचपडून र्‍हायलो सोताचं उगीच जरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
अ
अमितसांगली गुरुवार, 07/02/2015 - 06:06 नवीन
खुप आवडली....
  • Log in or register to post comments
क
क्रेझी गुरुवार, 07/02/2015 - 08:48 नवीन
फारच सुंदर आहे कविता :) ... शब्दांमधे व्यक्त करणं तेंव्हाच जमू शकतं जेंव्हा मन इतकं संवेदनशीलरित्या सगळं टिपून घेतं...
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर गुरुवार, 07/02/2015 - 09:00 नवीन
पण त्या होडीत बसून तुझं मन कुठल्या प्रवासाला जातं निघून वॉव क्या बात! मस्त आवडलं.
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 07/02/2015 - 14:38 नवीन
अतिशय सुंदर!! वाचनखूण साठवून ठेवलीये.
  • Log in or register to post comments
स
सव्यसाची गुरुवार, 07/02/2015 - 17:34 नवीन
खूपच आवडली. :)
  • Log in or register to post comments
अ
अरवीन्द नरहर जोशि. गुरुवार, 07/02/2015 - 17:41 नवीन
फारच सुंदर आणि सत्य आहे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 07/03/2015 - 09:01 नवीन
केवळ अप्रतिम ! :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- حلا الترك و مشاعل بنيتي الحبوبة
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Fri, 07/03/2015 - 09:15 नवीन
खूप तरल आणि हळूवार...
  • Log in or register to post comments
भ
भुमी Fri, 07/03/2015 - 10:05 नवीन
..निव्वळ अप्रतिम... खुप सुंदर कविता...
  • Log in or register to post comments
र
रेवती Sat, 09/03/2016 - 05:34 नवीन
सुरेख कविता.
  • Log in or register to post comments
झ
झेन Sat, 09/03/2016 - 06:12 नवीन
एकदम वरिजनल कविता. डायरेक्ट ह्र्द्यापासून अन् ते जिच्यावर लिहिली तिला न दाखवण अजूनच रोम्यांटिक. जिओ एस भावू जिओ.
  • Log in or register to post comments
न
नंदन Sat, 09/03/2016 - 06:12 नवीन
कविता आवडली. बोरकरांच्या एका कवितेतल्या या दोन ओळींची किंचित आठवण झाली:
सांगावे तू दु:ख आगळे, माझ्यासाठी गिळले कैसे आणि आंधळ्या भलेपणी मी, तुला केधवा छळिले कैसे
  • Log in or register to post comments
र
रातराणी Sat, 09/03/2016 - 07:04 नवीन
कितीही वेळा वाचली तरी तेवढीच टोचनारी जीवघेणी कविता.
  • Log in or register to post comments
अ
अमरप्रेम Sat, 09/03/2016 - 07:20 नवीन
वटवृक्ष त्याला लपेटलेल्या त्या वेलीच्याच आधाराने तर आहे उभा
छोट्या छोट्या गोष्टींनी जीवनात मोठा आधार दिलेला असतो. खूपच सुंदर !!!
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Sat, 09/03/2016 - 07:30 नवीन
अप्रतिम कविता
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा