'राहून गेलेलं काही...'
'राहून गेलेलं काही...'
'वेडीच्च आहेस तू
कशाला केलंस बरं
माझ्यासारख्या सडाफटिंगाशी लग्न?
आणि तू हसून म्हणावं
तुम्ही हुशार आहात ना, म्हणून.
हे तुझं वेडेपण समजून घेणं राहूनच गेलं
किनार्यावरल्या रेतीत
तुझा हात हातात घेऊन
पहिल्यांदाच चाललो होतो
असे हरवलो होतो की
कळलंच नव्हतं कधी
तुझ्या पायातलं जोडवं पळवलं होतं लाटांनी
ते परत आणण्याच्या बहाण्यानं
पुन्हा फिरलो होतो दोघं
तसं परत एकदातरी फिरायचं राहूनच गेलं
तसंही गजराबिजरा आणायची
मला कुठली असायला आठवण
आणि राहू द्या, फुलं झाडावरच चांगली दिसतात
हे तुझं नेहमीचं समजूतदार वागणं
पण तुझ्या लांबसडक वेणीतही ती तितकीच छान दिसतात
हे तुला म्हणायचं राहूनच गेलं
आणि तो बघ,
तो सोनचाफा कसा तरारलाय
तुझ्याच हातचा आहे
त्याची अद्याप न आलेली फुलं
तुझ्या ओंजळीत ओतायचं
अन् त्यांचा वास तू छातीत भरून घेणं
पहायचं राहूनच गेलं
आणि मला खात्री आहे,
तू विसरली असशील
एकदा चिडून हात उगारलेला तुझ्यावर
माझ्या अवाढव्य पुरुषी अहंकारातून.
आता वाटतं, एवढाही काही जोरात नव्हता तो
तू मला काढलेला चिमटा
नंतर पाठ वळवून गप्प झालेल्या तुझ्या
गालांवरचे दोन थेंब
प्रेमानं पुसायचं राहूनच गेलं
कधीच बोललो नाही तुला मी
की तुझी काळजी वाटते मला म्हणून
पण तू तरी कधी तसं म्हणालीस
शब्दांनी नाही
पण मौनांनी आणि दुर्लक्षानेच बोलायचो एकमेकांशी
त्या मौनांची भाषांतरे
डोळ्यांनीच व्हायची आपोआप
तुझ्या डोळ्यांत पाहून
ते मौन एकदातरी सोडायचं
राहूनच गेलं नाही?
फार दर्दबिर्दभरं नाहीये आपलं
'मॅरिड लाईफ' का काय म्हणतात ते
तसं रोमँटिकतरी कुठेय म्हणा
अॅरेंज मॅरेज असल्यावर
कुठले आलेत त्यात तसे रोमहर्षित क्षण
पण पहायला आलेलो तेव्हाच तुझ्या प्रेमात पडलो होतो
मग आपलं 'लव्ह मॅरेज' कसं नाही बरं?
हा प्रश्न विचारायचं राहूनच गेलं
अजून एक विचारायचं राहून गेलं
तू पण पडली होतीस ना माझ्या प्रेमात?
तेव्हा?
अन् पाऊस आला की
- ह्याही कवितेत हा आलाच बघ.
- असा कसा आला, तुम्हांला तर अजिब्बात नाही ना आवडत तो?
असा तुझा ठेवणीतला टोमणा मला न चुकता मारणं
मला आवडत नाही भिजायला म्हणून
तूही कोरडं राहणं
पागोळ्यांच्या धारांकडे मुग्धपणे तुझं ते बघत बसणं
मला कागदाची नाव बनवायला तू दरवर्षी शिकवतेस
तेही विसरून जातो मी नित्यनियमाने.
पण त्या होडीत बसून
तुझं मन कुठल्या प्रवासाला जातं निघून
ते शोधायचं राहूनच गेलं
देत आलेत लोक त्याच त्या उपमा
स्त्री-पुरुषाच्या नात्याला
पुरुष म्हणे वटवृक्ष
अन् स्त्री म्हणजे वेल.
कुणीतरी त्यांना सांगायला पाहिजे
वटवृक्ष त्याला लपेटलेल्या त्या वेलीच्याच आधाराने तर आहे उभा
शिकतोय हळूहळू तोही तिच्याकडून लवचिकपणा
नाहीतर केव्हाच कोसळला असता
त्याचा डौलदार भव्यपणा
कालच्याही वादळात
तिचं खंबीर राहणं
तो स्तब्ध होऊन पहातच राहिला होता
याची कबुली देणं राहूनच गेलं
माझं डोकं दुखायला लागलं की
कशी नको म्हणलं तरी हट्टानं देतेस दाबून
दुखतात तुझेही पाय तसे
- तुला काय वाटलं, मला समजणार नाही?
मी देऊ का दाबून म्हटलं तर मात्र नको.
एकदातरी तुला न जुमानता
हळुवारपणे तुझ्या पायांना
मलम लावायचं राहूनच गेलं
आणि अजून काय बरं राहून गेलंय?
हे आठवायलाही
तुझीच मदत लागणार आहे मला
नेहमीप्रमाणेच.
तोपर्यंत एकदा घालतेस का जरा ही कविता तुझ्या नजरेखालून?
पण नको.
मला माहितीये तू काय म्हणशील ते
'हे असं लिहायलाच पाहिजे का?'
अन् शांतपणे मला कागद परत देत,
लागशील आपल्या कामाला.
सये,
लिहायला हवंच होतं ना हे एकदातरी
नाहीतर हेही राहूनच गेलं असतं...'
- एस.
💬 प्रतिसाद
(65)
न
नीलमोहर
Sat, 09/03/2016 - 08:28
नवीन
प्रेमावर विश्वास नसलेल्या माणसाचीही प्रेमात पडायची इच्छा होईल इतके सुंदर लिहिलेय,
'वटवृक्ष त्याला लपेटलेल्या त्या वेलीच्याच आधाराने तर आहे उभा
शिकतोय हळूहळू तोही तिच्याकडून लवचिकपणा'
- हे तर खासच..
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Sat, 09/03/2016 - 08:32
नवीन
अब्बा!!! इने तो सब्बीच कामा कर लेते यारों!! क्या बात हैगी उस्ताद! मान गये तुमकू
_________/\_____________
- Log in or register to post comments
म
महासंग्राम
Sat, 09/03/2016 - 11:36
नवीन
देवा कैच्या कै भारी झालीये कविता
'वटवृक्ष त्याला लपेटलेल्या त्या वेलीच्याच आधाराने तर आहे उभा
शिकतोय हळूहळू तोही तिच्याकडून लवचिकपणा
हे अगदी जबरदस्त.
- Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया
Sat, 09/03/2016 - 13:18
नवीन
सुंदर !!
- Log in or register to post comments
ख
खेडूत
Sat, 09/03/2016 - 13:47
नवीन
अतिशय सुंदर कविता एस!
(त्यावेळी कशी मिसली काय माहीत.)
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
Sat, 09/03/2016 - 15:01
नवीन
वाहवा!!!
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Sat, 09/03/2016 - 15:09
नवीन
मस्तच हो एसमास्टर.
आवडली कविता
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 09/03/2016 - 16:18
नवीन
आणि तितकीच आवडली. थँक्स.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
पद्मावति
Sun, 09/04/2016 - 20:26
नवीन
+१
- Log in or register to post comments
र
रुपी
Sat, 09/03/2016 - 19:47
नवीन
इतकं सुंदर असूनही
हे वाचायचं राहूनच गेलं..
फारच छान :)
- Log in or register to post comments
म
मुक्त
Sat, 09/03/2016 - 19:56
नवीन
कविता आवडली.
वेलीच्या आधाराने वड उभा आहे हे काही समजले नाही.
- Log in or register to post comments
म
मुक्त
Sat, 09/03/2016 - 19:56
नवीन
कविता आवडली.
वेलीच्या आधाराने वड उभा आहे हे काही समजले नाही.
- Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Sun, 09/04/2016 - 08:20
नवीन
एसभौ, हे वाचलं नव्ह्त.. फारच सुंदर..
- Log in or register to post comments
ए
एस
Sun, 09/04/2016 - 18:51
नवीन
सर्व वाचक व प्रतिसादकांचा आभारी आहे. खफवरही कविता आवडल्याचे कळवणाऱ्यांनाही धन्यवाद! :-)
- Log in or register to post comments
अ
अलका सुहास जोशी
Sun, 09/04/2016 - 20:43
नवीन
बेेहतरीन!
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2