Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ब्रिटिश राज आणि नुकसानभरपाई

म
मंदार कात्रे
Fri, 07/24/2015 - 12:56
🗣 90 प्रतिसाद
http://www.bbc.com/news/world-asia-india-33618621?ocid=fbindia नुकतेच माजी परदेशमंत्री शशी थरूर यांनी ब्रिटन मध्ये आयोजित एका कार्यक्रमात केलेल्या भाषणात ब्रिटन कडून त्यांच्या सत्ताकालात भारतीय जनतेच्या झालेल्या अपरिमित नुकसानीबद्दल ब्रिटन ने भारताची माफी मागून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली . त्याबद्दल संपूर्ण देशात थरूरजी यांचे कौतुक होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही थरूर यांच्या धाडसाचे कौतुक केले आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर आजतागायत कोणी हा मुद्दा उचलून धरला होता का? इथे तर अशी परिस्थिति आहे की ब्रिटीशांनीच भारताचे कल्याण केले ,विकास घडवला , रेल्वे /पोस्ट /तार आणि इतर आधुनिक तंत्रज्ञान आणून पुराणकथात रमणार्या भारतीय /हिंदू समाजाचा उद्धार (?) केला अशी मते बाळगणारे आणि व्यक्त करणारे लोकही आज भारतात सापडतात , त्यांना सणसणीत चपराक हाणत शशी थरूर यांनी ब्रिटीशांनी भारताला किती व कसे लुटले? भारतीय सैनिकांचा वापर करून पहिले व दुसरे महायुद्ध जिंकताना भारताच्या हाती मात्र धुपाटणेच कसे आले ?बंगाल मध्ये 1943 साली पाडलेल्या भीषण दुष्काळाच्या वेळी ब्रिटिश सरकारने केलेले अक्षम्य दुर्लक्ष, जालियानवाला बागेत क्रौर्या ची परिसीमा गाठणारे अमानुष हत्याकांड याचा समग्र ऊहापोह थरूर यांनी केला . ब्रिटिश येण्यापूर्वी जगाच्या व्यापारातील भारताचा हिस्सा 24% होता ,परंतु 1947 साली तो हिस्सा फक्त 4% राहिला होता. देशी उद्योगधंद्याना पद्धतशीरपणे मारून टाकायचे, भारतीय कच्चा माल स्वस्त दरात विकत घेवून ब्रिटनमध्ये त्यावर प्रक्रिया करून पुन्हा चढया दराने भारतात आणि जगात विकायचा ,असा अव्यापारेषू व्यापार ब्रिटीशांनी केला . या आणि अशा अनेक "गुन्ह्यांसाठी" ब्रिटन जबाबदार असून त्याची जबाबदारी ब्रिटनला टाळता येणार नाही ! त्याचबरोबर भारतातून “चोरलेला” कोहिनूर हिरा त्वरित भारतास परत करावा आणि ब्रिटिश सत्ताकालात भारतीय जनतेच्या झालेल्या अपरिमित नुकसानीबद्दल ब्रिटन ने भारताची माफी मागून नुकसानभरपाई देण्याची ,अशी रास्त मागणीही केली . परखड मत व्यक्त करून खर्या इतिहासाची जाणीव ब्रिटीशांना ,जगाला आणि भारतीयांनादेखील करून दिल्याबद्दल शशी थरूर यांचे (ते कोंग्रेसवासी असूनही ) माझ्याकडून जाहीर आभार व अभिनंदन !

प्रतिक्रिया द्या
25571 वाचन

💬 प्रतिसाद (90)
D
dadadarekar Wed, 07/29/2015 - 07:34 नवीन
इंग्रजानी देश लुटला ते इथल्याच राज्यकर्त्यांच्या परवानगीने. इंग्रजांच्याकडुन सैन्यचे संरक्षण्विकत घेतले. त्याबदल्यात कर गोळा करायचेअधिकार दिले. काही राजानी इंग्रजांकडुन कर्जे घेतली व त्यामोबदल्यात इंग्रजांना अनिर्बंध व्यापाराचे परवाने दिले. इंग्रजानी त्याच वापर केला. उदा. झाशी. कोहिनूर हिरा शीखानी इंग्रजाना भेट दिला होता. ...... देशाची माफी कुणी मागय्ला हवी ? इंग्राजानी की संसथानिकानी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विद्यार्थी
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 07/29/2015 - 09:30 नवीन
म्हणजे एखादा मूर्ख / कमजोर असला तर इतरांना त्याला लुटण्याची पूर्ण नैतीक परवानगी असते का ? जर हे सत्य असले तर "आम्ही जगात सुधारणा आणि लोकशाही पसरवली" हे कोणत्या तोंडाने बोलले जाते ? आणि त्याचे "अतीबुद्धिवान" समर्थन शहाणपणाचे मानावे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 07/29/2015 - 09:42 नवीन
अजून... नेहमी विसरले जाणारे वास्तव... १. वसाहतींतल्या सुधारणा (रस्ते, रेल्वे, पोस्ट, इ) ह्या त्यावेळेच्या वसाहतवादी शासनाला आणि त्यांच्या व्यापाराला हव्या होत्या तश्याप्रकारे आणि त्याच जागी केल्या गेल्या... त्यांचा मूळ देशवासियांच्या प्रगतीशी काडीचा संबंध नव्हता. मात्र, वसाहतींतून बर्‍यावाईट मार्गांनी जमा केलेला पैसाच त्या सुधारणा करण्यात खर्ची पडला होता. २. एकूण एक वसाहतींत वसाहतवादी सत्तांची गच्छंती झाल्यावरच लोकशाही आली, त्याअगोदर नाही. किंबहुना अनेक वसाहतींत आपल्याला धार्जिणी, उघड अथवा लोकशाहीच्या बुरख्याखालील, एकाधिकारशाही राहील याची पुरेपूर तजविज करून मगच वसाहतवादी सत्ता (नाईलाजाने) दूर झालेल्या आहेत. वरचे उघड वास्तव दिसायला डोळ्यावरचा वसाहतवादी गुलामगिरीचा चष्मा काढणे जरूर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
D
dadadarekar Wed, 07/29/2015 - 10:14 नवीन
एतद्देशीय राजेत्कर्तव्यपरांगमुख झाले. त्यांनीदेखील माफी / दंड सोसायला हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ह
होबासराव Wed, 07/29/2015 - 08:56 नवीन
तुम्हि परत आत्मघातकी वाटेवर चालु लागलायत... आणखि आयडी असतीलच म्हणा तुमच्याकडे. टॉलरन्स (सहिष्णुता) कळते का तुम्हाला ? ति आमच्याकडे आहे म्हणुन तुम्हि इथे आहात. एव्हढया चांगल्या देशात चांगले जीवन जगताय, मिपा सारख्या संस्थळाचा चांगल्या लिखाणाकरता (ते तुम्हाला शक्य नाही) निदान वाचण्याकरता उपयोग करा. नाहि तर तुमचे भाउबंद आहेतच कि तिकडे बघा कोणाच्या मदतीने ईस्लामाबादेत केश-कर्तनालय उघडता आले तर. ह्या हजामती तिकडे करा.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 07/29/2015 - 09:03 नवीन
मी हे भाषण ऐकले आहे, आणि ते अतिशय आवडले ! :) त्यांचे इंग्रजी भाषेवरील उत्तम प्रभुत्व नीट ऐकण्यासाठी डाउनलोड मारुन ठेवला आहे. यावरची एक बातमी... मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Infosys, Wipro & TCS lose over 1,00,000 people in last four quarters as automation kicks in
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Wed, 07/29/2015 - 09:15 नवीन
कीथ वाझ म्हणाले की ब्रिटन ने कोहिनूर भारताला परत करावा (आगामी मोदी भेटीच्या वेळी) बाकी कसली माफ़ी अन कसले काय आज भारत इंग्लॅण्ड मधे सर्वाधिक फॉरेन इन्वेस्टमेंट करणारा देश आहे (ह्याचा वो परेशान करते रहे हम काम करते रहे सोबत काही संबंध नाही) आपल्या नवआत्मविश्वास प्राप्त कंपनी अन सरकार ने उद्या त्यांची लंगोटी ओढून आणायची ही शक्यता आहे तेव्हा माफ़ी मागा न मागा पण भारत इज अ इकनोमिक एंड मिलिट्री पॉवर टु रेकन विथ हा संदेश इंग्लॅण्ड ला गेला असेल काय???
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Wed, 07/29/2015 - 10:01 नवीन
माफी नको जाणीव असू द्या जशी प्रत्येक जर्मन नागरिकांना त्यांच्या बालवयात ज्यू छळ छावण्यांच्या मध्ये नेले जाते व हिटलर ने काय केले ते सांगितले जाते तसे इंग्रजी मुलांना त्यांच्या पूर्वजांनी वसाहतवाद म्हणून काय केले हे सुद्धा सांगितले पाहिजे आणि आता इंग्रजांच्या कडून पैसे नकोत मात्र एकेकाळी जसे भारतीयांनी इंग्रजंना रोजगार पुरावरला आपल्या देशात विसा न मागता येऊ दिले अगदी तसे नाही पण सध्या भारतीय स्थलांतरित लोकांच्या विरुद्ध जसा जुलमी कायदा आणला आहे तो रद्द करावा रोमेनिया व बल्गेरिया सारख्या देशातून जर लोक मुक्तपणे इंग्लंड मध्ये येऊ शकतात तर निदान योग्य भारतीय पाकिस्तानी बांगलादेशी व्यक्तींना सुद्धा इंग्लड मध्ये प्रवेश सुलभ करावा , हे योग्यतेचे निकष काही वर्षांच्या पूर्वी इंग्लंड सरकार ने निश्चित केले होते , व डेविड केमेरून च्या हुज्रूर पक्षाच्या सरकारने ते क्रमाक्रमाने अधिक कठीण व भारतीयांसाठी इंग्लड मध्ये प्रवेश दुर्लभ करून ठेवला आहे. अवांतर अण्वस्त्र सज्ज व अंतराळ मोहीम राबविणाऱ्या भारताला ब्रिटन ने दरवर्षी आर्थिक मदत का करावी ह्या अर्थी तेथे मोठा वाद विवाद चर्चा सत्रे जाहली. जेव्हा भारतात ह्या संबंधी चर्चा झाली तेव्हा तत्कालीन भारत सरकारचे प्रतिनिधी थरूर ह्यांनी बिनतोड युक्तिवाद करून त्यांची तोंड बंद केली.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Wed, 07/29/2015 - 12:22 नवीन
मी राष्ट्रवादाचा समर्थक असलो तरी याविषयीची माझी मते थोडी वेगळी आहेत. काही मुद्दे--- ब्रिटिशांनी भारतीयांना नुकसानभरपाई दिली पाहिजे म्हणजे नक्की कोणाला? वेगळ्या शब्दात भारतीय म्हणजे नक्की कोण? भारतीय ही ओळख आपण आज वापरतो. पण २०० वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांची तीच ओळख होती का? म्हणजे आज आपली भारतीय ही ओळख आहे ती निर्माण करण्यात ironically त्याच ब्रिटिश राजचा वाटा आहे. भारतात ब्रिटिश आले त्यावेळी आणि मुख्य म्हणजे नुसता व्यापार सोडून ते राजकारणातही लुडबूड करू लागले तेव्हाही हे परकीय आहेत ही भावना त्यावेळी होती का? की परस्पर रस्सीखेच करायच्या विविध राजे-रजवाड्यांच्या काळात तत्कालीन राजकारणात वर्चस्वाच्या त्या खेळात इतर खेळाडूंसारखेच ते पण एक खेळाडू होते अशा स्वरूपाचेच त्यांच्याकडेही बघितले जात होते? आणि ब्रिटिश किंवा अन्य कुणीही परके आहेत हे म्हणायला आपण कोण आणि आपले कोण ही व्याख्या पक्की पाहिजे. ती तशी होती का हा प्रश्न आहे. नानासाहेब पेशव्यांनी आंग्र्यांचे आरमार बुडवायला ब्रिटिशांची मदत घेतली होती. पुढे टिपू सुलतानविरूध्द ब्रिटिशांच्या बाजूने मराठेही होतेच.टिपू सुलतानाने जे हिंदूंवर अत्याचार केले त्याविरोधात मराठ्यांनी शत्रूच्या शत्रूच्या बाजूला जायचे म्हणून इंग्रजांना मदत केली. म्हणजे टिपू आणि इंग्रज यात नक्की कोण आपला आणि कोण परका? हे ठरवायचे कोणत्या आधारावर? की दोघेही मराठ्यांप्रमाणेच राजकारणातील खेळाडू आणि तत्कालीन राजकारण/धर्मकारणाप्रमाणे जे सोयीचे वाटले त्याप्रमाणे मराठ्यांनी आपली पावले उचलली? पुढे १८१८ मधील कोरेगाव-भीमाच्या लढाईत ब्रिटिशांच्या बाजूने पेशव्यांच्या सैन्याविरूध्द दलित सैनिक लढले. आजही पुणे-नगर रस्त्यावर त्या लढाईत मारल्या गेलेल्यांच्या स्मरणार्थ एक स्मृतीस्तंभ आहे. त्या सैनिकांच्या बाजूने विचार केला तर ते पेशव्यांच्या विरोधात लढले यात त्यांचे काय चुकले? त्यांच्या दृष्टीने पेशव्यांचे राज्य आपले वाटायचा संबंधच नव्हता. आणि ब्रिटिश जर का त्यापासून सुटका करून देत असतील तर त्यांना मदत का करू नये? म्हणजे पेशवे आणि ब्रिटिश यांच्यात परके कोण? की दोघेही परके आणि आपल्या हितसंबंधांच्या सोयीप्रमाणे त्या सैनिकांनी त्यांना योग्य वाटेल ते केले? १८५७ विषयी लिहावे तितके थोडे आहे. ज्या राणी लक्ष्मीबाईचा इतका उदो-उदो केला जातो त्याच राणीने नक्की काय केले होते हे बिपीन चंद्रांच्या India’s Struggle for Independence या पुस्तकात काय लिहिले आहे ते बघू-- "The most outstanding leader of the Revolt was Rani Lakshmibai, who assumed the leadership of the sepoys at Jhansi. Lord Dalhousie, the Governor-General, had refused to allow her adopted son to succeed to the throne after her husband died and had annexed the state by the application of the Doctrine of Lapse. The Rani had tried everything to reverse the decision. She even offered to keep Jhansi ‘safe’ for the British if they would grant her wishes." म्हणजे समजा लॉर्ड डलहौसीने झाशीच्या राणीने केलेली मागणी मान्य केली असती तर राणी ब्रिटिशांविरोधात लढली असतीच असे म्हणता येईल का? राणीने "मेरी झांसी नही दुंगी" असे म्हटले होते तर "मेरा भारत नही दुंगी" असे म्हटले नव्हते. अर्थात त्याबद्दल तिला दोषही देण्यात अर्थ नाही.कारण तत्कालीन राजकारणात प्रत्येकाचे इमान आपल्या राज्यापुरते असेल आणि "आपण भारतीय" अशी काही संकल्पनाच नसेल तर त्या काळात रूढ असलेल्या संकल्पनेप्रमाणे तिने केले. जगदीशपूरच्या कुंवरसिंगाची पण गोष्ट थोडीशी अशीच. ब्रिटिशांनी कुंवरसिंगाची जमीन हडप केली म्हणून तो ब्रिटिशांविरूध्द उठला. ज्याला बंडवाल्यांनी आपला नेता मानले त्या बहादूरशाह झफरविषयी बिपीन चंद्रा लिहितात---"When the sepoys arrived from Meerut, Bahadur Shah seems to have been taken by surprise and promptly conveyed the news to the Lt.Governor at Agra." पंजाबात शीखांनी अगदी एकदिलाने ब्रिटिशांना मदत केली. कारण अगदी साधे होते. शीख आणि मुघल यांच्यात पिढ्यानपिढ्यांचे वैर होते.आणि मुघल बादशहा (कितीही नामधारी असेना) हा बंडवाल्यांमध्ये म्हणजे शीखांना त्याच्याविरोधात ब्रिटिशांच्या बाजूने उभे रहायचे कारणच होते. गुरू तेगबहादूरांच्या दोन मुलांचा शिरच्छेद औरंगजेबाने कसा केला होता त्याच्या कहाण्या आठवत याच बहादूरशहाच्या दोन मुलांचा शिरच्छेद शीख सैनिकांनी केला. हे सगळे रामायण लिहायचे कारण म्हणजे ब्रिटिश भारतात आले त्यावेळी कोण आपला आणि कोण परका या व्याख्याच मुळात पक्क्या नव्हत्या.म्हणजे ब्रिटिशांना परके म्हणायचे ते नक्की कोणत्या आधारावर? पुढे १८५७ नंतर राणीचा जाहिरनामा आला आणि ईस्ट इंडिया कंपनीचे अस्तित्व संपून भारत ब्रिटिश सरकारच्या अंमलाखाली आला. त्यानंतर संथाळांचे बंड, वासुदेव बळवंत फडके इत्यादी स्थानिक पातळीवर उठाव झाले.पण ब्रिटिशांविरूध्द देशव्यापी चळवळ उभी राहायला कित्येक दशके गेली. ती चळवळ उभी राहिली १९१० च्या दशकाच्या शेवटी.दरम्यानच्या काळात लाल-बाल-पाल सारख्या पुढार्‍यांनी आपण सगळे भारतीय आहोत आणि मुळात आपण पारतंत्र्यात आहोत ही भावना दृढमूल केली. या सगळ्यासाठी इतकी वर्षे जावी लागली. आता माझा प्रश्न: ब्रिटिशांनी आपल्या पूर्वजांवर अत्याचार केले हे मान्य. पण त्यावेळी ते पूर्वज स्वतःला भारतीय असे म्हणवतच नसतील तर आपण (२०१५ मधील भारतीय) हे २०० वर्षांपूर्वीच्या "हिंदी महासागर आणि हिमालय यामधील भूभागात राहणार्‍या" लोकांचे राजकीय उत्तराधिकारी कसे काय ठरतो? आणि आपण त्यांच्यावर केलेल्या अत्याचारांविरूध्द सध्याच्या ब्रिटिशांकडून (ते तेव्हाच्या ब्रिटीशांचे राजकीय उत्तराधिकारी नक्कीच आहेत) नुकसान भरपाई कशी मागू शकतो? आणि मग त्याच न्यायाने ब्रिटिशांनीही त्या भूभागात राहणार्‍या लोकांना एक राजकीय आणि राष्ट्रीय ओळख दिली म्हणून आम्हाला तुम्ही पैसे द्या असे मागितले तर त्यांचे काय चुकले? याविषयी जरा जाज्वल्य अभिमान वगैरे बाजूला ठेऊन विचार करा (यापूर्वी केला नसल्यास) ही विनंती. चर्चा अधिक रंगल्यास अजून लिहिनच. (पूर्वाश्रमीचा क्लिंटन) गॅरी ट्रुमन
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Wed, 07/29/2015 - 12:35 नवीन
सर्वप्रथम तुमच्या पुनरागमनानिमित्त मनापासून हार्दिक स्वागत. तुमची उणीव गेल्या काही चर्चांमधे जाणवत होती खरीच. काही मुद्दे पटलेत. सविस्तर प्रतिसाद नंतर देइन...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
D
dadadarekar Wed, 07/29/2015 - 13:24 नवीन
सहमत,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
उ
उगा काहितरीच Wed, 07/29/2015 - 14:55 नवीन
हे असे विचार वाचायला भेटतात त्यामुळेच मिपा आवडते ! असा विचार कधी केलाच नव्हता .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 07/29/2015 - 15:20 नवीन
बारश्याच्या शुभेच्छा ! :) खरा मुदा असा आहे... ब्रिटिशांनी आपल्या पूर्वजांवर अत्याचार आणि त्यांच्या भूभागाची लूट केली हे सर्वमान्य सत्य आहे. त्यावेळचे पिडित लोक स्वतःला काहीही म्हणवत असले तरी आज (२०१५ मधील) भारतीय (यात पाकिसानी, बांगलादेशी आणि म्यानमारी, इत्यादींचीही भर घालता येईल) म्हणवणार्‍या त्यांच्या वारसांना त्यांची २०० वर्षे जुलूमी लूट करणांर्‍या ब्रिटीशांच्या वारसांकडून भरपाई मागण्याचा हक्क आहे. वर देश याऐवजी भूभाग म्हटले आहे याचे कारण हे आहे की पिडीत देशांच्या आजच्या राजकीय सीमा पण वसाहदवादी राष्ट्रांनीच आखलेल्या आहेत; हे विसरून चालणार नाही. वरचा नैसर्गिक न्याय मानला नाहीतर आंतरराष्ट्रिय न्यायदानात फार मोठी तृटी राहील : माणसावर अन्याय करून त्याला जीवे मारले की गुन्ह्यातून मुक्तता होईल; आणि देशाच्या राजकिय सीमा बदलून पिडित देशात केलेल्या गुन्ह्यांतून मुक्तता होईल... थोडक्यात गुन्ह्याचे स्वरूप योग्य तेवढे तीव्र करणे हा गुन्ह्यातून मुक्त होण्याचा मार्ग होईल. वरच्या विधानामागची कारणे अशी आहेत... १. शेकडो वर्षे चाललेल्या वसाहतवादात स्वतःच भरपाई मागण्यासाठी कुठल्याच वसाहतीतला कोणीच पीडीत आज जिवंत असणे कठीण आहे. तेव्हा केवळ पिडीताच्या जीवनकालातच भरपाई देण्याचे ठरवले तर कोणत्याही दीर्घकाळ चालणार्‍या (आणि म्हणूनच जास्त घृणास्पद असू शकणार्‍या) गुन्ह्यातल्या बहुसंख्य पिडितांना अथवा त्यांच्या वारसांना (भरपाईच्या रुपाने किंचीत का होईना पण) न्याय मिळणे दुरापास्त होईल. म्हणूनच अश्या गुन्ह्यात, गुन्हेगार जिवंत नसल्यास त्याचे दाईत्व गुन्हेगार नसलेल्या वारसावर जाते. फक्त तो स्वतः गुन्हेगार नसल्याने त्याला शारिरीक शिक्षा न करता त्याची जबाबदारी भरपाई देण्याइतकीच मर्यादीत ठेवली जाते. २. शेकडो वर्षे चाललेल्या वसाहतवादात केलेल्या प्रत्यक्ष अत्याचारांमध्ये आणि जुलूमी व असमान कायद्यांच्या मदतीने केलेल्या लूटीचा वसाहतवादी राष्ट्रांच्या आजच्या समृद्धीमध्ये सिंहाचा वाटा आहे, हे सर्वमान्य आहे. त्या समृद्धीचा उपभोग वसाहतवाद्यांचे आजचे वारस घेत आहेत. म्हणजेच, त्यांच्या आजच्या सुब्बत्तेमागे पूर्ववसाहतींच्या भूभागावर आज रहात असलेल्या पिडितांच्या आजच्या अनावस्थेचा बर्‍याच प्रमाणात हात आहे. त्यामुळे पिडित राष्ट्रांना भरपाई देणे ही त्यांची केवळ नैतीक नव्हे तर अधिभौतीक जबाबदारी आहे. पूर्व वसाहत्वादी राष्ट्रे ही वस्तूस्थिती (वसाहदवादी दिवसांतल्याप्रमाणे) स्वार्थी चतुर भाषा वापरून टळण्याचा आटोकाट प्रयत्न करतात, आणि त्यांच्या सद्याच्या जागतीक सामरिक आणि राजकिय वर्चस्वामुळे बर्‍याच अंशी सफल होतात. जेथे त्यांना हे टाळणे अशक्य झाले आहे तेथे त्यांनी नाईलाजाने का होईना भरपाई दिलेली आहे, उदा. न्युझिलंड (मावरी लोक), हैती, लिबिया, इ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Wed, 07/29/2015 - 15:54 नवीन
ब्रिटिशांनी आपल्या पूर्वजांवर अत्याचार आणि त्यांच्या भूभागाची लूट केली हे सर्वमान्य सत्य आहे. त्यावेळचे पिडित लोक स्वतःला काहीही म्हणवत असले तरी आज (२०१५ मधील) भारतीय (यात पाकिसानी, बांगलादेशी आणि म्यानमारी, इत्यादींचीही भर घालता येईल) म्हणवणार्‍या त्यांच्या वारसांना त्यांची २०० वर्षे जुलूमी लूट करणांर्‍या ब्रिटीशांच्या वारसांकडून भरपाई मागण्याचा हक्क आहे.
मुद्दा असा आहे की आज भारतीय म्हणून नुकसान भरपाई मागायची मागणी होत आहे. म्हणजे ही मागणी राजकीय आहे. ज्यांच्या पूर्वजांवर ब्रिटिशांनी अत्याचार केले त्यांच्या वंशजांनी ब्रिटिश सरकारकडून वैयक्तिक पातळीवर नुकसान भरपाई मागितली तर त्यात काहीच गैर नाही.पण जेव्हा आपण म्हणतो की "भारताला" नुकसान भरपाई दिली पाहिजे तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की तत्कालीन "भारतीयांवर" ब्रिटिशांनी अत्याचार केले. माझा मुद्दा हा की त्यावेळी ते पूर्वज स्वतःला भारतीय म्हणवतच नव्हते.तेव्हा आपण या मागणीला राजकीय स्वरूप देऊ शकत नाही. वैयक्तिक पातळीवर नुकसान भरपाई जरूर मागा. पण अर्थातच अशी नुकसान भरपाई मागायची ठरवली तर कुठे थांबायचे हा प्रश्नच आहे. म्ह़णजे मग त्यात भारतातले दलित, अमेरिकेतले कृष्णवर्णीय, ऑस्ट्रेलियातले अ‍ॅबओरिजिनल्स, इराणमधले पारशी (त्या बिचार्‍यांचा तर इराणमधून निर्वंशच झाला आणि जे काही पारशी आहेत ते भारतात आहेत), बांगलादेशात शिरकाण झालेले, १९४७ मध्ये शिरकाण झालेले हिंदू इत्यादी इत्यादी. दुसरे म्हणजे ब्रिटिशांमुळे ज्यांच्या पूर्वजांचे नुकसान झाले त्यांचे वंशज आज नुकसान भरपाई मागत असतील तर ब्रिटिशांमुळे ज्यांचे चांगले झाले ते त्यांना उलटे पैसे देणार आहेत का? इंग्रज राज्याचा अगदी दैवी देणगी म्हणून बहुमान करणारे लोक त्यावेळी होते. त्यात आघाडीच्या समाजसुधारकांचाही भाग होता.त्याचे कारण काय असावे? ब्रिटिश अधिकारावर येण्यापूर्वी जो प्रचंड बुजबुजाट होता त्यातून सावरून एक स्थिर प्रशासन, कायद्याचे राज्य, इतर जगाशी सामान्य लोकांची झालेली ओळख इत्यादी ब्रिटिश राज्याचे फायदे त्या धुरीणांना कळले होते. त्याचा आज आपल्याला अजिबात फायदा झालेला नाही का? आता त्याबद्दल आपण ब्रिटिशांना उलटे पैसे देणार आहोत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 07/29/2015 - 17:38 नवीन
पण अर्थातच अशी नुकसान भरपाई मागायची ठरवली तर कुठे थांबायचे हा प्रश्नच आहे. म्ह़णजे मग त्यात भारतातले दलित, अमेरिकेतले कृष्णवर्णीय, ऑस्ट्रेलियातले अ‍ॅबओरिजिनल्स, इराणमधले पारशी (त्या बिचार्‍यांचा तर इराणमधून निर्वंशच झाला आणि जे काही पारशी आहेत ते भारतात आहेत), बांगलादेशात शिरकाण झालेले, १९४७ मध्ये शिरकाण झालेले हिंदू इत्यादी इत्यादी. या सगळ्यांनी कधी ना कधी, या ना त्या प्रकाराने भरपाई (जी केवळ पैश्यांपुरती मर्यादीत नसते) मागितली आहेच. तो त्यांचा हक्क आहेच आणि तो मानवतेचा प्रभाव जनमानसावर असेपर्यंत अबाधित राहील. ती भरपाई मिळाली की नाही किंवा मिळेल की नाही हे वेळोवेळीच्या राजकिय-सामरिक वर्चस्वाच्या परिस्थितीवर अबलंबून राहीले आहे व राहील... केवळ नैसर्गिक न्यायावर नाही, तो बर्‍याचदा राकटपणे अथवा धूर्तपणे तुडवला जातो हे सार्वकालीक सत्य आहे. किंबहुना निती, न्याय या संकल्पनांचीही राजकिय-सामरिक वर्चस्वाच्या परिस्थितीनुसार जेत्यांनी आपल्या सोईप्रमाणे वेळोवेळी मोडतोड केलेली आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे गुलामीची प्रथा बंद करण्याचा कायदा ब्रिटनमध्ये आस्तित्वात आला तेव्हा इंग्लंडच्या सरकारने अनेक ब्रिटिश कंपन्यांना / लॉर्ड गृहांना (हाउसेस) नुकसान झाले म्हणून भरपाई (कॉम्पेन्सेशन्स) दिलेली आहेत ! अश्या लोकांनी वसाहतवादाच्या जुलुमाची आणि लूटीची भरपाई करायची गरज नाही हे म्हणणे म्हणजे "द मोस्ट क्रुएल जो़क ऑफ द मिल्लेनियम आहे" असे म्हणणेही आहे त्यांना झुकते माप देणेच आहे !!! तुमच्या बाकीच्या मुद्द्यांची उत्तरे वरच्या प्रतिसादातच आहेत, त्यामुळे पुनरुक्ती टाळतो. (अवांतर : तुमचे अनेक राजकिय विषयांवर अत्यंत समतोल विचार असलेले लेख आवडीने वाचले आहेत. त्यामुळे आताचे विचार (उपरोधीक / डेव्हिल्स अ‍ॅड्व्होकेट म्हणून नसल्यास) आश्चर्यकारक वाटले. पण याचा अर्थ प्रत्येकाला आपापले मत असायला हरकत आहे असे अजिबात नाही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 07/29/2015 - 17:42 नवीन
माझ्या मते कमीत कमी भरपाई म्हणजे... आता ब्रिटिश साम्राज्याने जगावर किती उपकार केले हे (बर्‍याच जणांच्या मते चुकीचे) जसे ब्रिटिश शाळांतल्या नविन पिढ्यांना शिकवले जाते त्याबरोबर ब्रिटिश साम्राज्याने जगातल्या अनेक इतर समाजांवर किती अत्याचार केले, त्यांची कशी लूटमार केली हे सत्यही शिकवले जावे. मग कदाचित त्या पिढीला ब्रिटिश साम्राज्याबद्दल समतोल विचार करता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ह
हुप्प्या Wed, 07/29/2015 - 16:54 नवीन
१८५८ साली राणीच्या जाहीरनामा प्रकाशित करुन ब्रिटनने अधिकृतरित्या भारत आपल्या ताब्यात घेतला. त्या जाहिरनाम्याचे नाव गव्हर्न्मेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट. अर्थात तेव्हाही इंडिया म्हणजे भारत ह्या नावाचे काहीतरी अभिप्रेत होतेच. त्या जाहीरनाम्यातही भारताच्या वेगवेगळ्या तुकड्यांचे उल्लेख करण्याइतके त्या देशाला ब्रिटन विभाजित समजत नव्हते. तेव्हा राष्ट्र ही कल्पना तेव्हा निर्माण होऊ लागली होती. पुरेशी भौगोलिक आणि सांस्कृतिक कारणे आधीच अस्तित्त्वात होती ज्यामुळे काही प्रमाणात तरी एकसंधता होती. आज जे सार्वभौम एकसंध राष्ट्र आहे ते तेव्हा नक्कीच नव्हते पण काही प्रमाणात ही निर्मिती ही ब्रिटिश लोकांच्या वागणुकीमुळे घडली आहे. तेव्हा आपण राष्ट्र म्हणून एकसंध नव्हतो, प्रबळ नव्हतो. आज आहोत. तेव्हा ब्रिटिश ताकदवान होते. श्वेतवर्णीय श्रेष्ठ आहेत असे मानले जाणारा काळ होता त्याचा त्यांनी फायदा घेतला. आज तसे नाही. ब्रिटिशांनी अत्याचार करताना असा विचार केला का की उद्या समजा भारत ताकदवान झाला तर आपल्याला त्याची फळे भोगावी लागतील? मग आपणच असा विचार का करायचा की १५० वर्षापूर्वी आपण दुबळे होतो म्हणून आज भक्कम झाल्यावरही दुबळे असल्यासारखेच वागायचे? ब्रिटिश लोक ह्या मागण्यांना कितपत दाद देणार आहेत ह्याबद्दल मी साशंक आहेच. पण ह्या निमित्ताने त्यानी म्हणजे ब्रिटिश सरकारने माफी मागितली तरी चालेल. ब्रिटिश राज्य असताना भारत आज आहे तसा नसला तरी ब्रिटन १५० वर्षापासून आहे तसेच आहे. निदान हा मुद्दा तरी विचार करण्याजोगा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ह
होबासराव Wed, 07/29/2015 - 15:44 नवीन
दोघांचेही प्रतिसाद वाचनिय आणि अभ्यासपुर्ण आहेत वादच नाहि, पण मलातरी इए काकांचा प्रतिसाद आणि मुद्दे पटले.
  • Log in or register to post comments
ज
जडभरत Wed, 07/29/2015 - 16:43 नवीन
हं मला पण डाॅ. सुहास म्हात्रेंचा मुद्दा आवडला. ब्रिटिशांनी जालियनवाला बागेत घेतलेली भूमिका अत्यंत संताप आणणारी होती. त्याबद्दल कोण त्यांना माफ करू शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
ग
गॅरी ट्रुमन Wed, 07/29/2015 - 17:20 नवीन
अहो चर्चा भटकवू नका हो. प्रश्न नुकसान भरपाई मागण्याचा आहे.़जालियनवाला बाग प्रकरणी इंग्रजांना माफ करा असे कोण म्हणत आहे? सांगाल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जडभरत
प
प्यारे१ Wed, 07/29/2015 - 17:58 नवीन
हा फक्त दीड (अंकी १ १/२) ओळीचा प्रतिसाद क्लिंटन यांचा असूच शकत नाही एवढं बोलून मी माझे .... शब्द संपवतो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 07/29/2015 - 19:20 नवीन
जालियनवाला बाग प्रकरणी इंग्रजांना माफ करा असे कोण म्हणत आहे? सांगाल का? कोणतीही गोष्ट माफ न करण्यासारखी आहे म्हणजेच तिच्यामुळे अ़क्षम्य अन्याय झालेला आहे हे सिद्ध होत नाही का ? अश्याच अक्षम्य गोष्टीचे परिमार्जन करण्याचे साधन म्हणून भरपाई या संकल्पनेचा जन्म झाला आहे. Reperation = the action of making amends for a wrong one has done, by providing payment or other assistance to those who have been wronged. =============== जालियनवाला बाग हे एक प्रकरण झाले. त्यापासून बंगालच्या दुष्काळात लाखो लोकांना भुकेने मरायला ठेवून भारतातले धान्य युरोपियनांसाठी राखीव साठा ठेवणे इथपर्यंत आणि त्यामधल्या आणि त्या सीमांच्या बाहेरच्या परिघातले अनेक अत्याचार ब्रिटिशांनी भारतिय उपखंडातल्या लोकांवर केले आहेत. बंगालच्या दुष्काळात लोक लाखांनी मरत आहेत असे स्वतःच्या अधिकार्‍यांचे अहवाल वाचून तत्कालिन ब्रिटिश पंतप्रधान चर्चिलचे जगप्रसिद्ध वचन होते : "गांधी अजून मेले नाहीत काय ?" (येथील गांधीचा आदरार्थी उल्लेख माझ्यातर्फे आहे.) ... वसाहतवादाच्या काळातले बहुतेक सगळे अन्याय हे नजरचुकीने झालेले नसून वंशवरिष्ठतेच्या गुर्मीतून आणि सामरिक वर्चस्वाच्या बळावर झालेले आहेत हे तर पूर्ववसाहतवादी राष्ट्रेही नाकारत नाहीत. अश्या अक्षम्य गुन्ह्यांकरिता मानवी हक्कांचे जागतिक पुरस्कर्ते म्हणवून घेणार्‍या (पूर्ववसाहतवादी) राष्ट्रांनी भरपाई नाकारण्यामागे सारासारविवेक नसून इतर अनेक कारणे आहेत. त्यातली काही महत्वाची अशी आहेत... १. संभाव्य अर्थिक भरपाईपासून बचाव; २. भूतकालात केलेल्या अश्लाघ्य कृत्यांची जागतिक स्तरावर उजळणी होऊन होणारी बदनामी; ३. सद्य सरकारने वरील दोन गोष्टी होऊ दिल्या म्हणून स्वतःच्या देशातल्या जनतेचा होणारा प्रक्षोभ; ४. वरचा इतिहास उघडपणे स्विकारल्यामुळे इतर जागतिक प्रकरणांमध्ये जागतिक स्तरावर कमी झालेली/होणारी पत; इत्यादी. बाकी सगळी उघडपणे सांगितली जाणारी कारणे केवळ कातडी बचावण्यासाठी केलेले धुर्त शाब्दिक खेळ आहेत ! याला इंग्लिशमधल्या "हॉगवॉश" या शब्दाइतका उत्तम दुसरा इंग्लिश आणि मराठी शब्द मला माहित नाही. वाईट इतकेच की या "हॉगवॉश" ला अनेक विचारी माणसेही बळी पडतात आणि इतिहास विसरतात की "अशी अनेक धुर्त वचने (किंवा डिसइन्फॉर्मेशन किंवा हॉगवॉश) वसाहती निर्माण करण्यासाठी आणि त्या वसाहतींचे अनेक शतके जुलुमाने शोषण करण्यात महत्वाचे शस्त्र म्ह्णून कामी आणली गेली होती".
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 07/29/2015 - 19:27 नवीन
३. सद्य सरकारने वरील दोन गोष्टी होऊ दिल्या म्हणून स्वतःच्या देशातल्या जनतेचा होणारा प्रक्षोभ आणि त्यामुळे निवडणुकीत कमी होणारी मते;
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ए
एस Wed, 07/29/2015 - 19:46 नवीन
नेमके प्रतिसाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ग
गॅरी ट्रुमन Wed, 07/29/2015 - 20:14 नवीन
तुम्ही माझा एक महत्वाचा मुद्दा विसरत आहात. वैयक्तिक भरपाई द्यायला आणि मागणी करायलाही काहीच चूक नाही. पण तशी मागणी आपण राजकीय दृष्ट्या करू शकत नाही कारण त्यावेळी भारतीय म्हणून अशी ओळख आपल्या पूर्वजांची नव्हती. त्यावेळी जुलमी राजे होतेच. समजा अशा जुलमी राजाने कत्तली केल्या असतील आणि लोकांना लुटले असेल तर त्याची भरपाई कोणाकडून घेणार? जसा हा राजा जुलमी तसे इंग्रजही जुलमी. की पोस्ट फॅक्टो जजमेम्ट वापरून आपले पूर्वज जसे भारतीय तसा हा राजाही भारतीय? आज अंबानींसारखे अनेक भारतीय जनतेला लुबाडत आहेत. त्यांनी जमा केलेली माया नंतरच्या १० पिढ्यांनाही पुरेल. मग अचानक जागे होऊन दहा पिढ्यांनंतर अंबानींच्या वंशजांना धरून भरपाई मागणार? असो. याविषयावरील प्रतिसाद आता थांबवत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
श
शशिकांत ओक Wed, 07/29/2015 - 19:57 नवीन
थरूर जाणीव करून देत होते की अन्याय झाला आहे. म्हणून आजच्या ब्रिटिश लोकांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली नाही. अशा मागण्या आता मान्य करून नसत्या प्रश्नांची निर्मिती होईल. व मानवी संहार घडून नव्या सूडाचा मार्ग प्रशस्त होईल. असे मला वाटले. काही गोष्टींचा क्षमा करून निपटारा केला गेला तर तो उदारपणे मान्य करण्यात मानवी मूल्यांची बूज राखली जाईल.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 07/29/2015 - 20:18 नवीन
असे का बरे होईल ?! १. सुधारणेचा मार्ग "चूक झाली हे कबूल करणे आणि त्याबद्दल शरम वाटणे" या पहिल्या पायरीपासून होतो असे म्हणतात. २. जर चूकच कबूल नाही तर मग सुधारणा कश्यात करायची ? किंवा सुधारणा करायची काय गरज आहे ? ३. समोरच्याला क्षमा करण्यासाठी प्रथम त्याने चूक झाली आहे हे कबूल करायला पाहिजे, नाहीतर क्षमा कोणाला आणि कशाबद्दल करायची ? ४. जर केलेली कृती चूक आहे हे कबूल नाही तर तीच (चूक नसलेली = बरोबर असलेली) कृती परत परत करायला हरकत नसावी, नाही का ?! या जगातला वाईटपणा "येथे वाईट माणसे आहेत" यापेक्षा जास्त "इथली चांगली माणसे वाईटपणा पाहून गप्प बसणे पसंत करतात" यामुळे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक
र
रमेश आठवले गुरुवार, 07/30/2015 - 19:47 नवीन
थरूर आपल्या भाषणाच्या सुरवातीस असे म्हणतात की ब्रिटीशांचे भारतात आगमन होण्यापूर्वी भारताची अर्थ परिस्थिती जागतिक अर्थ परिस्थितीचा २३% भाग होईल इतकी चांगली होती. म्हणजे आपण असे मानू की १७५० साली जागतिक अर्थ परिस्थिती १००० कोटीची असेल तर त्यातील भारताचा वाटा २३० कोटी होता. थरूर पुढे असे ध्वनित करतात कि पुढील दोनशे वर्षात सत्तेवर असताना ब्रिटीशांनी पद्धतशीर प्रमाणे प्रयत्न करून भारताची अर्थ स्थिती केवळ ४% वर आणली. पण त्याच काळात इतर देशात आणि विशेषत:युरोप मध्ये औद्योगिक क्रांती झाल्याने त्याची उत्पादन क्षमता वाढली आणि त्यांची अर्थ स्थिती खूपच सुधारली-या गोष्टीचा विचार थरूर करत नाहीत असे वाटते. समजा की इतर देशात प्रगती झाल्याने जागतिक अर्थ स्थिती २०० वर्षांनी ५७५० कोटी इतकी झाली पण भारताची अर्थ स्थिती २३० कोटीच राहिली- तरी सुद्धा भारताची जागतिक व्यवस्थेतील टक्केवारी ४% च होइल. मला ब्रिटीशांनी भारताची आर्थिक प्रगती रोकांयचा प्रयत्न केला नाही असे म्हणायचे नाही. पण जगातील इतर घडामोडीचा परिणाम लक्षात न घेता अशा प्द्ध्तीतेने टक्केवारी मांडल्याने थरूर याना त्यांचा मुद्दा पटविण्यास मदत होत असली तरी त्यांचे विधान अतिरंजित होते आहे असे दिसते .
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 07/30/2015 - 22:37 नवीन
पण त्याच काळात इतर देशात आणि विशेषत:युरोप मध्ये औद्योगिक क्रांती झाल्याने त्याची उत्पादन क्षमता वाढली आणि त्यांची अर्थ स्थिती खूपच सुधारली- त्याच भाषणात तुमच्या या प्रश्नाचे उत्तर आहे... इंग्रजांनी भारतातील कच्चा माल कवडीमोल भावाने आपल्या कंपनीच्या माध्यमात इंलंडमध्ये निर्यात केला आणि तयार माल अनेक पटींनी जास्त किंमतीने हक्काची बाजारपेठ म्हणून वापरून इथे विकला. त्यासाठी स्थानिक उद्योगधंदे अनेक जुलुमी कारवायांनी बंद पाडले. मलमलीच्या विणकरांची नखे, बोटे आणि मग हात तोडल्याचे वाचले असेलच, हे एक अत्याचारी उदाहरण आहे. इतर अनेक आहेत. थोडक्यात औद्योगीक क्रांतीतल्या मालाला जर जुलुमाने कब्ज्यात असलेली बाजारपेठ मिळाली नसती तर ती इतकी यशस्वी झाली नसती. शिवाय युरोपियन भारतात येण्याअगोदर जागतीक अर्थकारणात असलेला २३ टक्के सहभाग हेच सिद्ध करत नाही का की भारतियांनी स्वतःच्या बळावर जागतिक अर्थकारणात आपले स्थान निर्माण केले होते ? युरोपमध्ये औद्योगिक क्रांती होत असताना भारतिय आहेत तिथेच बसून राहिले असते काय ? त्यांनीही प्रगती चालू ठेवली असतीच नाही का ? आताही नाही का प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे पाश्चिमात्य देशांचे अनेक अडथळे असूनही जागतीक अर्थकारणात भारत आपले स्थान मिळवून आहे ? इथे बनवली नसती तरी पाश्चिमात्यांकडून औद्योगिक उपकरणे विकत घेऊन पौर्वात्य देशांनी आपला विकास चालू ठेवला असता. वसाहतवादाच्या अगोदरच्या आणि सुरुवातीच्या काळात बंदूका, तोफा, इ माल पाश्च्यात्य इथे विकतच होते. त्याकाळात पाश्च्यात्य सत्तांनी बर्‍यावाईट क्लृप्त्या वापरून जमीन आणि व्यापारावर वर्चस्व मिळविले तेथेच जुलुमी असमतोल सुरु झाला. खुल्या व्यापारी व्यवस्थेची चर्चा करताना, ब्रिटीश भारतात येण्यापूर्वी भारत आणि ब्रिटन भारत यांचा तौलनिक व्यापारी दर्जा काय होता हे पाहण्यासाठी, काही महत्वाची तथ्य उधृत करतो... १. ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीच्या राणीच्या खलित्याने झालेल्या पहिल्या व्यापारी भारत मोहिमेतील जहाजे इतर काही गोष्टींसह खास ब्रिटिश ब्रॉडशीट (कापड) भारतात घेऊन आली होती. त्या कापडाची जाडी आणि भरड वीण पाहून त्यातला एक यार्डही भारतात विकला गेला नाही. कारण त्यावेळेस भारतात त्याच्या अनेक पटींनी उत्तम कापड बनत होते. अर्थातच ती मोहीम पूर्णतः अयशस्वी झाली. २. भारतातून मसाल्यांचे पदार्थ आणि चीनमधून चहा यांच्या निर्यातीचा पूर्व-पश्चिम व्यापारात मोठा भाग होता. युरोपियन सत्तांनी सर्वप्रथम सागरी मार्गांवर प्रभुत्व मिळवून या दोन गोष्टींचे व्यापार आपल्या अंकित केले. यासाठी त्यांना अरबी दर्यावर्द्यांचेही शिरकान करावे लागले. या सागरी चकमकी चांचेगिरीपेक्षा काही वेगळ्या नव्हत्या. असो. सद्या इतकेच पुरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले
र
रमेश आठवले Fri, 07/31/2015 - 00:53 नवीन
आपल्याला माझा मुद्दा समजलेला नाही. सध्या एवढेच पुरे .
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 07/31/2015 - 08:39 नवीन
आपल्याला माझा मुद्दा समजलेला नाही.
बरेच दिवसानी मिपावर कोणी तरी अत्मसत्य उगारलेले पाहुन आनंद जाहला =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले
क
कपिलमुनी Fri, 07/31/2015 - 11:57 नवीन
आपल्याला माझा मुद्दा समजलेला नाही.
एका व्यक्तीचा मुद्दा दुसऱ्यास समजून सहमती झाली आहे हेच दुर्मिळ आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले
प
प्रसाद गोडबोले Fri, 07/31/2015 - 12:12 नवीन
एका व्यक्तीचा मुद्दा दुसऱ्यास समजून सहमती झाली आहे हेच दुर्मिळ आहे
>> हा मुद्दा मात्र १००% समजला . संपुर्ण सहती नोंदवत आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ट
टवाळ कार्टा Fri, 07/31/2015 - 12:19 नवीन
आजच दादाद रेकर बिन्शर्त श्रीगुरु जी यांच्याशी सहमत झालेले याची देही याची डोळा बघितले :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
श
श्रीगुरुजी Fri, 07/31/2015 - 15:23 नवीन
ह ह पु वा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 07/31/2015 - 12:48 नवीन
"युरोपात औद्योगिक क्रांती होत असण्याच्या प्रक्रियेकडे भारतिय उपखंडातले लोक हातावर हात ठेवून गप्प बसून बघत राहिले असते, त्यामुळे आपोआप युरोप आशिया खंडापेक्षा जास्त श्रीमंत झाला असता." हाच एक महत्वाचा मुद्दा तुमच्या प्रतिसादातून ध्वनित होत आहे आणि मी ते कसे बरोबर नाही हे तात्कालीक सत्यांच्या आधारे सांगितले आहे. आता... तुमचा व माझा दोन्ही प्रतिसाद परत वाचल्यास उलगडा होईल असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले
र
रमेश आठवले Fri, 07/31/2015 - 17:08 नवीन
भारत सोडा पण चीन सारख्या आणि पारतंत्र लादले नसलेल्या पूर्वेतील इतर देशातही त्या दोनशे वर्षात युरोप मध्ये झाली तशी औद्योगिक क्रांती झाली नसल्याने, त्यांची जागतिक आर्थिक व्यवस्थेतली टक्केवारी त्या काळात खाली घसरली आणि तुलनेने युरोपातील देशांची वाढली. भारतात ही घसरण ब्रिटीशांच्या कारवायांमुळे अधिक झाली असेल, पण ती २३% वरून ४% वर यायला केवळ ब्रिटन एकटे जबाबदार आहे असे नाही. तर इतर काही युरोपातील देशात त्याच काळात प्रवेगाने वाढलेल्या उत्पादनामुळे जागतिक अर्थ व्यवस्थेत मधील त्यां देशांचा वाटा वाढत गेला हे ही आहे. .
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 07/31/2015 - 19:21 नवीन
कृपया, १. चीनचा संपूर्ण इतिहास नाही तरी कमीत कमी ब्रिटनची चीनबरोबरची अफू युद्धे आणि ब्रिटिश लोकांनी चीनमधून चहाच्या रोपांची चोरी करून चहाच्या व्यापारावर कसा कब्जा केला हे वाचा... शांघाईतली कन्सेशन्स आणि हाँग काँग ब्रिटिशांच्या ताब्यात कसे आले ते वाचा... केवळ एकट्या चहाच्या व्यापाराचा सामरीक ताकदीने आणि चोरीने (दोन्हीही जुलुमानेच) ताबा घेतल्याने जागतिक व्यापारातील चीनचे स्थान किती खाली गेले आणि ब्रिटनचे (विशेषतः ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीचे, जी व्यापारी फायद्याच्या बळाबर अनेकदा ब्रिटिश सरकारवर हावी झाली होती) स्थान किती वर गेले हे समजेल. २. फ्रेंचांनी इंडोचायनात काय केले ते वाचा... ३. डचांनी इंडोनेशियात काय केले ते वाचा... मग इतर कोणला इथे काही लिहीण्याची गरज भासणार नाही. केवळ वरवरच्या व्यक्तीगत अंदाजांवर नाही तर विश्वासू तथ्यांवर सिद्ध झालेल्या इतिहासावर चर्चा करायची असेल असेल तर पुढे चालू ठेऊ... अन्यथा राम राम !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले
र
रमेश आठवले Fri, 07/31/2015 - 21:29 नवीन
पास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
व
वगिश Fri, 07/31/2015 - 20:03 नवीन
भरपाई तर मग आपल्याला मुघल व त्यापूर्वीचे सर्व सम्राट यांच्याकडूनही घ्यायला हवी. सर्व राज्यकर्ते हे आपली पोतडी भरणारच मग तुम्ही त्याला लुट,व्यापार,भ्रष्टाचार इत्यादी काहीही नावे द्या. मुघालान्पुर्वी भारत(?) हा अतिशय पुण्यवान व निस्वार्थी राज्यकर्त्यांनी भरलेला असा देश होता असा जर कुणाचा समज असेल तर मला वाटते तो चुकीचा आहे. आर्थिक लुट,शोषण ह्या गोष्टी कोणत्याही प्रकारच्या सामाजिक व्यवस्थेत आधीपासून होत्या आणि पुढेही सुरूच राहतील .
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा