फाशी आणि प्रसिद्धी माध्यमांचा विपर्यास - एक विश्लेषण
खालील लेख माध्यमे माहिती कशी वापरू शकतात या संदर्भात आहे, जरी त्याचे आत्ताचे कारण आणि संदर्भ याकूबची फाशी असली तरी. आधी याकूबवरील चर्चेत प्रतिसाद म्हणून देणार होतो पण विश्लेषण असल्याने येथे वेगळा काथ्याकूट टाकत आहे. त्यामुळे चर्चा करताना केवळ याकूब सोडून विस्तॄत मुद्दयावर चर्चा होऊदेत अशी विनंती.
मी उठसूठ फाशीच्या शिक्षेच्या बाजूने नाही. मात्र भारतीय घटनेत सांगितलेल्या "रेअरेस्ट ऑफ दी रेअर" म्हणून दिल्या जाणारी शिक्षा गरज पडल्यास असली पाहीजे अशा मताचा नक्की आहे. २००० सालापासून ते ३० जुलै २०१५ पर्यंत भारतात ४ जणांना फाशी दिली गेली आहे. त्यातील एक मुंबई हल्ल्यातला कसाब आणि दुसरा संसद हल्ल्यातील अफझल गुरू हे राष्ट्रविघातक / दहशतवादी कारवायात पकडले गेलेले आणि आरोप सिद्ध झालेले गुन्हेगार होते. तिसरा अर्थातच याकूब. चौथा होता तो प. बंगाल मधील धनंजोय चॅटर्जी ज्याने १९९० साली १४ वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग करून खून केला. त्याला २००४ साली फाशी झाली.
बाकी आता सुप्रिम कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यावर, दयेचा अर्ज निकालात काढण्यास आणि पुढे अंमलबजावणी करण्यास खूप वेळ घेतला तर शिक्षा जन्मठेपेवर आणण्याचे बंधन घातले आहे. त्यामुळे ज्या दिवशी पहाटे सुप्रिम कोर्टाने याकूबच्या शिक्षा अंमलबजावणीवर अंतिम मोहर उठवली, त्याच दिवशी राजीव हत्येसंदर्भात सरकारचा फाशीची शिक्षा रहावी हा अर्ज फेटाळून, उशीर केल्यामुळे ती जन्मठेपेत रुपांतरीत केली गेली. कुठेतरी अशी शक्यता असेल की याच भितीमुळे टाडा कोर्टाने तात्काळ पाऊले उचलून याकूबच्या फाशीच्या अंमलबजावणीचा निर्णय जाहीर केला आणि आता अंमलात आणला.
आता प्रसिद्धी माध्यमांच्या संदर्भात - जो गदारोळ उठला त्याचे विश्लेषण...
या गदारोळाचे मूळ आहे ते माजी रॉ प्रमुख स्व. बी रामन यांचा रिडीफ.कॉम मधे प्रकाशीत झालेला लेख... त्यात त्यांचे म्हणणे त्यांच्याच शब्दात, "There is not an iota of doubt about the involvement of Yakub and other members of the family in the conspiracy and their cooperation with the ISI till July 1994. In normal circumstances, Yakub would have deserved the death penalty if one only took into consideration his conduct and role before July 1994."आता वरील विधानाचा (आणि नंतरच्या त्यांच्या लेखातील समारोपाच्या विधानाचा) अर्थ समजून घेण्याआधी काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेणे गरजेचे आहे.
- रामन यांनी हा लेख २००७ मधे लिहून रिडीफच्या शीला भट्टना दिला. पण नंतर सांगितले की असा लेख त्यांच्या नावाने प्रसिद्ध झाल्यास या खटल्यातील इतर गुन्हेगार-आरोपींना कोर्ट सोडून देऊ शकेल. त्यामुळे तो प्रकाशीत करू नका. त्यातील मुद्दे मांडले तरी हरकत नाही. तसे भट्ट यांनी २००७ साली त्यांच्या लेखात मांडले.
- नंतर २०१३ साली रामन यांचे निधन झाले.
- टाडा कोर्टाने वर सांगितल्याप्रमाणे फाशीच्या अंमलबजावणीची तारीख जाहीर केल्यावर रिडीफने रामन यांच्या भावाकडून परवानगी घेऊन तो लेख प्रकाशीत केला. आणि सगळा गदारोळ सुरू झाला.
आता लेखा संदर्भात लिहीण्याआधी काही प्रश्न पडले ते:
- असेच जर उद्या अजून कुठल्या संदर्भात सामना ने केले अथवा ऑर्गनायजर ने केले - म्हणजे जी व्यक्ती हयात नाही त्या व्यक्तीच्या नावाचा authenticच पण वादग्रस्त लेख छापला तर तो मान्य केला जाईल का?
- दुसरा महत्वाचा भाग असा की रामन यांनी त्यात जे काही लिहीले आहे त्याला कुठलाही संदर्भ नाही. "मी" केले, "मी" मुख्य होतो वगैरे असेच म्हणलेले आहे. त्यामुळे पुरावा नसताना, शिवाय ती व्यक्ती हयात नसताना जे काही लेखात लिहीले आहे ते १००% खरे मानता येईल का?
वरील प्रश्न पडले तरी, तो लेख जसाच्या तसा छापला आहे, रामन यांनीच लिहीला आहे आणि त्यात जे काही आहे ते पूर्ण सत्यच आहे असे समजूनच काही प्रश्न पडतातः
- रामन यांनी या लेखात म्हणले आहे की नेपाळच्या पोलीसांनी याकूबचा संशय आला म्हणून तो परत पाकीस्तानात जाण्याआधी पकडले आणि नंतर भारतीय अधिकार्यांच्या स्वाधीन केले. ("Before he could board the flight to Karachi, he was picked up by the Nepal police on suspicion, identified and rapidly moved to India.") यालाच ते इतरत्र याकूबला इन्फॉर्मली पकडले असे म्हणतात.
- या ऑपरेशनचे सूत्रधार स्वत: रामन होते असे देखील ते म्हणतात. ("The entire operation was coordinated by me."). पण त्यात असे कुठे देखील म्हणत नाहीत की त्यावेळेस त्याच्याबरोबर काही वाटाघाटी झाल्या आणि त्याला शब्द दिला गेला. मात्र पुढे असे म्हणतात की याकूबने नंतर सहकार्य केले. का केले? - अधिकार्यांनी दिलेल्या शब्दामुळे का मिळत असलेल्या "इन्फॉर्मल पोलीसी कृतींमुळे" याबद्दल काहीच लिहीत नाहीत. तो अर्थ ज्याचा त्याने काढावा.... (एखादा अतिरेकी, जो मुंबईच्या शेअर मार्केट सकट बारा ठिकाणी बाँब उडवण्यास जबाबदार आहे, त्याच्याशी कुठलाही पोलीस केवळ चहापाणी घेत गप्पा मारत माहीती काढेल/काढू शकेल असे वाटत नाही.)
- नंतर रामन म्हणतात की याकूबच्या सहकार्यामुळे त्याचे टायगर मेमन सोडून इतर कुटूंबिय दुबई मार्गे भारतात परतले. पण त्यासंदर्भात ते कसे आले ते त्यांना माहीत नाही कारण ते या ऑपरेशन मधे सहभागी नव्हते. ("The Dubai part of the operation was coordinated by a senior officer of the IB, who was then on deputation to the ministry of external affairs. Neither the R&AW nor I had any role in the Dubai part of the operation.")
- पुढे ते वर म्हणल्याप्रमाणे हे देखील म्हणतात की तो नि:संशय गुन्हेगार आहे. एरवी त्याला त्याच्या जुलै १९९४ च्या आधीच्या वर्तणुकीसाठी (म्हणजे १२ मार्च १९९३ नंतर देखील) फाशीच द्यायला हवी. पण जुलै १९९४ नंतरच्या त्याने केलेल्या सहकार्यामुळे त्याला शिक्षा करताना विचार करायला हवा. ("Yakub would have deserved the death penalty if one only took into consideration his conduct and role before July 1994.") पण त्याने असे नक्की काय केले हे मात्र रामन यांच्या लेखात कुठेच दिसत नाही.
आता त्यांच्या या लेखाचा त्यांनी सांगितल्याप्रमाणे वापर करत शीला भट्ट यांनी २००७ साली काय लिहीले आहे ते बघूयात
- "While there is conclusive evidence of the Memons' involvement in this act of terrorism at the instigation of Pakistan's ISI, the fact that Yakub repented his involvement and cooperated with the Indian security agencies should not have been overlooked." - यातील "repented" हा शब्द पहा... रामन यांनी कुठेही त्याला पश्चाताप झाला होता असे लिहीलेले नाही. आता याकूबला झाला होता का नव्हता हा वेगळा मुद्दा आहे. पण पत्रकार दिलेली माहीती वापरताना स्वतःचे शब्द घालून वेगळेच वजन कसे देतात हे या निमित्ताने समजते.
- "Had Yakub not agreed to surrender, the CBI could not have tried any of the Memons." - जर रामन त्यांच्या लेखात म्हणतात की याकूबला नेपाळ पोलीसांनी पाकीस्तानला जाण्याआधी संशयामुळे पकडले तर त्याने स्वतःस भारतीय अधिकार्यांच्या ताब्यात स्वाधीन केले (surrender) केले हे कसे काय?
- "The defendant didn't bring to the notice of the court the cooperation extended by him in persuading other members of his family to escape the ISI's clutches and face trial in India. He probably thought he would get jail for some years and be able to lead a life as a free Indian citizen after serving his jail term." - याला काही अर्थ आहे का? हे चालले असताना जेठमलानी - भूषण काय झोपा काढत होते का खलीस्तान्यांची उरलीसुरली खरकटी काढत बसले होते? जर त्याने सहकार्य दिले होते तर त्याने ते कोर्टात सांगितले का नाही? बरं त्यावेळेस यंत्रणेवर विश्वास वाटला म्हणून असेल पण ते २००७ साली... मग दिवंगत रामन यांचा त्यांनी छापू नका असे सांगितलेला तो लेख फाशीच्या आधी पाच दिवस प्रकाशीत होई पर्यंत म्हणजे आठ वर्षे गप्प का बसले होते सगळेजण?
- बॉम्बस्फोटांचा कट अंमलात येण्यापूर्वी निनावीपणे पोलिसांना कळवणे.
- हे ही न जमल्यास बॉम्बस्फोट घडल्यावर न्यायालयात स्वतःहून शरण जाणे (येथे त्याचा पोलिस यंत्रणे वर विश्वास नसणे) अध्याहृत आहे.
- तो मुंबईचा रहिवासी असल्याने बॉम्बस्फोटांनंतरही मुंबईतच राहिला असता तरी न्यायालयात स्वतःचे निर्दोषत्व सिद्ध करण्यास आणखी एक मुद्दा मिळाला असता.
त्याने केव्हाही पोलिसांना सहकार्य केले असते तर टायगर मेमन वा दाऊद इब्राहिम यांनी त्याला जीवंत सोडले नसते.