जे न देखे रवी...

मी!

Primary tabs

ना शोधितो किनारा
ना धुंडितो निवारा
मी धुंद वादळाशी
अविराम झुंजणारा

चुंबावया नभाला
झेपावतात लाटा
उद्दाम कालियाचे
शिर मीच ठेचणारा

दर्या अथांग माझी
टाकी गिळून नाव
तेजाळ रत्नगुंफा
तिमिरात शोधणारा

आयाळ पिंजणारा
झोंबे पिसाट वारा
दुर्दम्य निश्चयाचे
मी शीड रोवणारा

धावून ये घनांची
रणधुंद मत्त सेना
मी नेत्र शंकराचा
अंगार ओकणारा

आभाळ फाडुनी ये
बिजली कडाडणारी
नी निग्रही ध्रुवाशी
रणनाळ जोडणारा

--अशोक गोडबोले, पनवेल.

प्रमोद देव

खूपच सुंदर रचना!

आयाळ पिंजणारा
झोंबे पिसाट वारा
दुर्दम्य निश्चयाचे
मी शीड रोवणारा

ह्या ओळी विशेष आवडल्या.

विसोबा खेचर

चुंबावया नभाला
झेपावतात लाटा
उद्दाम कालियाचे
शिर मीच ठेचणारा

दर्या अथांग माझी
टाकी गिळून नाव
तेजाळ रत्नगुंफा
तिमिरात शोधणारा

तशी संपूर्ण कविताच लय भारी आहे परंतु वरील दोन कडवी विशेष आवडली!

तात्या.