समाप्त...
---------------------समाप्त-----------------------
दोघं नव्वीत गेलेत. ती त्याच्याच शाळेत जाते.
तो सायकलवर- ती चालत.
तिचे वडील साखर कारखान्याच्या गव्हानीत जीव धोक्यात घालून कोयत्याने ऊसाच्या मोळया तोडायचं काम करतात. दिवसाला 50 रुपये.
---म्हणून ती शाळेत चालत जाते.
त्याचे वडील त्याच कारखान्यात अकाउंट ऑफिसमधे बऱ्याच पगारावर आहेत.
---म्हणून तो शाळेत सायकलवर जाऊ शकतो.
ही पूर्ण गोष्ट -म्हटलं तर खुप टिपिकल आहे.
म्हटलं तर घायाळी.
तिला
तो
कमाल आवडतो.
पण तिचा चेहरा खुप तेलकट आहे. काळ्या रंगावरचा तेलकट चेहरा खुप विचित्र दिसतो. चिपचिपा. केस रिबिनीत कितीही नीट बांधले तरी कुरळे असल्याने विस्कटलेले दिसतात. एकच गणवेश. तो ती रोज धुऊन-धुऊन घालत असते. (वर्गातल्या दुसऱ्या मुलींचे इस्त्रीच्या घड्यांचे गणवेश पाहुन तिला आत काटा टोचल्यासारखं होतं.) वर्गातही ती तीन-तीन विषयात नापास असते. छडया खायला पुढं केलेला हात कधी मागे घेत नाही. ना डोळ्यात कधी पाणी,पश्चाताप असतो.
तिला तो आवडतो.
हे त्याला अजिबात माहिती नाही.
तो वर्गात हुशार आहे.
तिच्या नावाचा, रंगाचा, ढ पणाचा, विचित्र दिसण्याचा, चिपचिप्या चेहरयाचा उपयोग-- मुलांमधे फ़क्त कोणालातरी हेटाळणी करत चिडवण्यासाठी होतो. म्हणजे समजा गण्याला चिडवायचं असेन तर पोरं म्हणतील, गण्या बघ सुषमा तुझ्याकडच बघतीय लका! किती मरतीय तुझ्यावर ती. दिकी लका लाईन तिला, त्या काळीनं तरी दुसरं कुणाकडं बघायचं. असं म्हणून मग उरली पोरं खदाखदा हसतील. अन गण्या ते तिच्या नावाने चिडवुण घेतल्याचं शेण हिस्क्याने अंगावरनं ढकलुन त्या हसण्यात मिसळून जाईल.
'त्याच्याकडं' लाजुन- कुणाला न दिसता चोरून डोळ्याच्या कोपरयातनं बघताना तिचे डोळे खुप आशावलेले दिसायचे. त्याचं नाव निघालं तरी ही एकट्यात टिपिकल गोरीमोरी व्हायची. पण (काही मूलं-मुली खरंच इतकी सुंदर, हुशार असतात की बाकीची मूलं-मुली मनातल्या मनात स्वतःलाच त्यांच्यासमोर नाकारुन घेतात. ) हितं हेच भान तिलाही होतं. पण तरीही ती खुप आशाळभुत होती. तिच्या वाट्याला चांदण्या नाहीत, त्यांच्या कडेचा अंधार मात्र मुबलक आहे- हे तिच्या ढ मनालाही माहीत होतं . खऱ्या प्रेमासोबतच तिच्या डोळ्यात वय-सुलभ निरागस वासनेची तिरीपही उठायची. पण त्याला नककी वासनाच् म्हणता येईल का? हे कोणालाच नीट सांगता आलं नसतं. तिलाही नाही. इतर मूली सुंदर/म्हणजे/ गोरया हुशार --पूजाला 'तो' च्या नावाने चिड़वायच्या -तेव्हा तिला पूजाचा राग कधीच यायचा नाही. फ़क्त ह्रदय पिळवटुन जाईल इतका तिच्या पसरट डोळ्यात पूजा बद्दलचा हेवा साठलेला असायचा. एवढं असूनही तिला कधी तिच्या गरीबीचा, त्या चिपचिप्या तेलकट चेहरयाचा, गुंता झाल्या कुरळया केसांचा, किंवा आपल्या ढ असण्याचा राग यायचा नाही. ते सगळंच तिनं स्वीकारलं होतं.
'स्वीकारण्यात' खुप मोठी ताकद असते.
(शेवटी शेवटी शाळा संपताना- त्याला
तिच्या पाहण्याचा फिक्कट अर्थ,अंदाज लागला होता. आपण तिला प्रमाणाबाहेर आवडतो. आपण तिचे होणार नाही- हे माहीत असून आपण तिला आवडतो. ती सतत आपल्याकडे पाहत असते हे त्याला जाणवलं होतं. पण दोन मिनीट उद्याचा विचार करून तो तिथंच वर्गाच्या व्हरांडयात तिला तिच्या विचारासकट मनातल्या मनात झटकुन टाकून निघुन गेला होता. )
नंतर दहावी झाली, सगळे जिकडे-तिकडे गेले. याचा नंबर मुंबईला इंजीनियरंगला लागला. मग कंपनीत पुष्कळश्या पगाराचा जॉब. मग लग्न होऊन भारतीय सुंदर (म्हणजे गोरी) बायको मिळवून हा सुखी झाला.
ती इकडे दहावीत दोनदा नापास झाली. वडलांनी 50-100 पाहुण्यात (गावाकडे लावतात तसं) हातभर मंडपात तिचं वीस हजार हुंडा दिऊन 17 व्या वर्षी लग्न लाऊन दिलं. 18 व्या वर्षीच तिला पहिली मुलगी झाली. हाल-हाल व्हायचे त्या गरीबीत तिचे. म्हशी-शेळीची झाडलोट करण्यात दिवस जायचे. ती आता त्याला संपूर्ण विसरून गेली होती. त्याला मात्र तिचं हे काहीच माहीत नव्हतं. माहीत असन्याचं कारणही नव्हतं.
मात्र कधी रस्त्यावर चालताना कोणी तेलकट चेहरयाची मुलगी दिसली की तो दुर्मीळ कासावीस होऊन जायचा. आपल्याला आपली काहीच चुक नसतानाही नेमकं का अपराधी वाटायचं हेही त्याला समजायचं नाही.
तिला पुढच्या दोन्ही बाळातपणात मुलीच झाल्या. यावरून नवरया-सासुकडून खुप मारहाण व्हायची. एकदा दोनदा वडलांनीच तिला त्या नरकात 'गाव काय म्हणल' या तकलादु आर्ग्युमेंटवर सासरी नेऊन सोडलेलं. तिला सगळं आधार तुटल्यासारखं झालं.
---------------------------------------------------------
तो परवा बायको सहित कार घेऊन मुंबईवरुन गावाकडे सुट्टीला गेलेला. बरयाच दिवसातून.
तिथं तिसऱ्या दिवशी गावच्या घराच्या मोठ्या सुंदर बेडरूम मधे रात्री उशिरा तो घरी आला. 11 च्या आसपास.
सगळे झोपले होते. सीमा अजुन याची वाट पाहत जागीच होती. त्याचे डोळे फिक्कट लाल झालेले.
सगळे झोपले होते. बाहेर गुडुप अंधार. डोळे गडद लाल झालेले. सीमा आज खुप मूड मधे होती. त्याची आवडती ब्लॅक ब्रा तिने अंगात सजवलेली. आधीच गोरी -त्यात पावडर सेंट लावून आशेने वाट पाहत बसली होती. बाहेर गडद अंधार. सगळे आपापलल्या खोलीत शांत झोपी गेलेले. याचे डोळे गडद लाल झालेले. बेडरूममधे येऊन एका असहय तंद्रीत त्याने सीमाला घट्ट जवळ ओढलं. पावडरच्या चेहरया वरुन सावकाश हात फिरवला. ती लाजत त्याला टेकुन उभी राहिली.
त्याने तोंडावरुन दाबून हात फिरवला.
ती सावकाश ओरडली- "पावडर पुसेन ना माझी राजा". तिच्याकडे त्याचं लक्ष नव्हतं.
त्याने अजुन जोरात हात फिरवला. पावडर पुसली. तिला दुखलं. अजुन जोरात. सलग. आता वेड्यासारखं तो तिच्या चेहरयावरचा पावडरचा शेवटचा कणनकण पुसून टाकत होता. त्याच्या लाल डोळ्यात रंगहीन पाणी साचलेलं. सीमा अवाक होती. हा असा का करतोय. बेसिनचा नळ चालु करून पाण्याने तो तिचा नॅचरल गोरा रंग सुद्धा खरडायचा प्रयत्न करत होता. चेहरा रडवेला न करताही तो आतून आक्रोशत होता.
शेजारच्या तेलाच्या बाटलीतनं ओंजळभर तेल घेऊन तो सीमाच्या -आता थोड्याश्या काळ्या पडलेल्या- तोंडावर चोळायला लागला. सगळा चेहरा तेलकट चिपचिपा करून गेला. शेवटी थकुन बेडवर पडला. तिचं पूर्ण तोंड तेलाने माखलेलं. त्याने शेवटी तशाच -स्तब्ध -आतून फुटल्या चेहरयाने तिला जवळ ओढलं. घट्ट. तिचा श्वास कोंडेल एवढी घट्ट मिठी मारून तिचा तो तेलकट चेहरा छातीजवळ ओढून तो तसाच मनात हमसत रात्री झोपी गेला.
रात्रभर "सीमा-सुषमाच्या" काळ्या तेलकट चेहरया वरचा तो तेलाचा वास त्याच्या बेडरूमभर घुमत होता...............
हे सगळं घडलं. रात्री 11 च्या आसपास.
---एक तास आधी रोडवर कित्येक वर्षानी भेटलेल्या त्याच्या गावातल्या मित्रासोबतचा त्याचा संवाद...
सुरुवातीची सगळी फॉर्मेलिटी झाल्यावर जुन्यापैकी शाळेतलं कोण कुठं असतं असा विषय चाललेला.
बोलत-बोलत केतन त्याला म्हटला अरे ती सुषमा आठवते का?? आपण काळी म्हणून चिड़वायचो ती?? अरे तिने गेल्या माहिन्यात पेटवून घेतलं. 97 टक्के भाजलेली. जागेवर कोळसा झाली. सासरी माहेरी दोन्हीकडे तिला खुप त्रास वगैरे........
पुढचं ऐकायला तो थांबला नाही.
--------
तिथुनच तो 11 वाजता गावच्या आपल्या सुंदर मोठ्या बेडरूम मधे सीमा कड़े आलेला.........
---समाप्त---
----------------------------------------------------
सुष्माला 3 मूली आहेत.....
.............रंगाने आईवर गेलेल्या...
💬 प्रतिसाद
(51)
श
शि बि आय
Tue, 09/01/2015 - 13:36
नवीन
लिखाण सुंदरच पण वास्तव मात्र चटका लावणारे... !
अजूनही साधी मैत्री करण्यासाठी रंग, जात आणि आर्थिक परिस्थितीचे निकष लावले जातात हे त्रिवार सत्य आहे हे परत अधोरेखित झाले.
आमच्या शाळेतही अशीच सुषमा होती… आजही कधीतरी ती रस्त्यावर येता- जाता दिसते. घरच्या काही परिस्थितीमुळे लग्न न करू शकलेली….
१२ वी झाल्यामुळे जेमतेम नोकरी आणि आजारी असेलेली आई यांना सांभाळत जगत आहे.
शाळेतील एक शिक्षिका तिची फी भरत होत्या हे आम्हाला नंतर समजले.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2