Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

.बनलेही असते राधा, मज कृष्ण भेटला नाही ..

प — प्राची अश्विनी, Sat, 09/05/2015 - 17:57
चहु दिशांत पसरे कीर्ती, जग तुझिया पायावरती पण अवखळ गोकुळवासी, मज कृष्ण भेटला नाही ....... किती काळ उलटला राधे ,नित नवीन दिसशी तूही ....... जरी रूप बदलले त्याचे, तो कृष्ण वेगळा नाही तो परतून आला तरीही, माझा ना उरला काही दमले मी शोधून त्याला , मज कृष्ण भेटला नाही ....... उमगता मोल नात्याचे गेलेला परतून येई ....... समजून तयाला घे तू , तो कृष्ण वेगळा नाही सर्वस्व वाहिले त्याला , काही ना बाकी उरले मी स्वत:स हरवून बसले , मज कृष्ण भेटला नाही .........इतुके न कुणाला द्यावे, की भार तयाचा व्हावा ........ बघ तुझ्यात लपला आहे , तो कृष्ण वेगळा नाही या नात्यातील उपेक्षा मी मूक साहिली नाही बनलेही असते राधा, मज कृष्ण भेटला नाही ........ राधेची निर्मम प्रीती , गोपास बनविते कृष्ण ........ मिटल्या नयनांनी बघ तू , तो कृष्ण वेगळा नाही

प्रतिक्रिया द्या
50926 वाचन

💬 प्रतिसाद (91)
त
तिमा Tue, 09/08/2015 - 13:08 नवीन
मीरेची केस वेगळी आहे. तिला सिझोफ्रेनिया झाल्यामुळे कृष्ण आपला नवराच आहे असे वाटत होते. आयुष्यभर ती त्याच धुंदीत वावरत होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: gogglya
प
प्राची अश्विनी Tue, 09/08/2015 - 13:16 नवीन
सिझोफ्रेनिया.... हहपुवा.:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 09/09/2015 - 16:19 नवीन
ही गोष्ट खरीच आहे. मीरा एकतर्फी प्रेमात वेडीच झाली. एक उत्तरप्रदेशमधील आयजी डी.के. पांडा असेच म्हणावे लागतील. स्वतःला कृष्णाची दुसरी राधा समजत होते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
म
मांत्रिक गुरुवार, 09/10/2015 - 18:44 नवीन
मिरेला स्किझोफ्रेनिया? धन्य आहात! तुम्हाला मीरा कधी कळूच शकत नाही मग! आपापली कुवत समजण्याची! उगाच नाही सहस्रकात एकच अशी मीरा निर्माण होत! असो, तुमच्या मानसिकतेला शुभेच्छा!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 09/13/2015 - 07:44 नवीन
मीरा समजली नसेल हे मत मला मान्य आहे. सर्वच सर्वांना कळलं पाहिजे असं काही नाही. माझं काही वाचन नाही, मिरेला समजुन घेता आलं नाही. मिरा जेवढी कळली ती अशी.... मीरेला नेमका स्किझोफ्रेनिया होता का याचं मला निदान करता येणार नाही, तिचं वेड कोणतं होतं तेही मला सांगता येणार नाही, वाचनातही नाही. पण कोणत्या तरी एक वेडाचा प्रकार असावा असे नक्की वाटते. बालपणी आईला विचारलं की माझं लग्न कोणाशी होणार आहे, आई म्हणाली कृष्णाशी. झालं ! कृष्ण वेडाला इथूनच सुरुवात झाली. अध्यात्मिक वेड अंगात भिनलं ते भिनलंच. पुढे राजपुत्राशी लग्न झाल्यानंतर आणि त्याचं निधन झाल्यानंतर लोकांनी तिला सतीजावं यासाठी प्रयत्नही केले पण ती सती गेली नाही, ती म्हणाली माझा नवरा कृष्ण आहे. पुढे संसारात आलेल्या या विरक्तीने कृष्ण भक्तीत तन्मयतेने नाचत राहणे, गीत गात राहणे हे तिनं स्वीकारलं. मिरा एक राजघराण्यातली वधु असल्या कारणाने विवाहानंतर तिच्यावर विष प्रयोग केले गेले. कृष्ण भक्ती आणि प्रेमामुळे त्या विषाचा कोणताच परिणाम झाला नाही.(क्या बात है ) तिला गुरु म्हणुन संत रोहिदास हे लाभले. पुढे ती वृंदावन आणि द्वारकेत गेली. आणि एक दिवस द्वारकेच्या कृष्ण मंदिरात ती अंतर्धान पावली. इतकीच वेडी मिरा मला कळली. . '' हरी मेरे जीवन प्रान अधार। और आसरो नाहीं तुम बिन तीनूं लोक मंझार।। आप बिना मोहि कछु न सुहावै निरख्यौ सब संसार। मीरा कहै मैं दासि रावरी दीज्यो मती बिसार '' (पदं जालावरुन साभार) कृष्णप्रेमाच्या नादात मिरा वेडी झाली तिची सर्व पदं कृष्ण.. कृष्ण... कृष्ण.....प्रभु गिरधर... अशीच दिसतात. आता एक सुंदर मिरेचं आयुष्य अध्यात्मिकतेच्या वेडात बुडुन गेलं की तीचं आयुष्य तरुन गेलं हा ज्याच्या त्याच्या बघण्याचा प्रश्न आहे. मिरा काय आहे, ते जरुर लिहा एका नव्या धाग्यात. आम्ही येऊच तिथेही. ’बनलेही असते राधा, मज कृष्ण भेटला नाही’ या अतिशय सुंदर कवितेत कवयत्रिची क्षमा मागुन माझं अवांतर थांबवतो. जाता जाता : आकाशवाणीचं हे औरंगाबाद केंद्र आता ऐका ''साधी भोळी मिरा तुला कळली नाही, तुझी माझी प्रित कधी जुळली नाही” -दिलीप बिरुटे (वेडा गिरधर)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
अ
अभ्या.. Sun, 09/13/2015 - 07:48 नवीन
सर नमस्कार करतो हो. आता बघतो एकेकाला. . अभ्या (येडा आर्जुन्या)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
मांत्रिक Sun, 09/13/2015 - 07:54 नवीन
माफ करा डाॅ. साहेब! माझा प्रतिसाद तुम्हाला उद्देशून नव्हता. अपुर्या माहितीवर स्फोटक विधाने करणे हा नक्कीच तुमचा स्वभाव नव्हे. बरं, आत्तासुद्धा जो प्रतिसाद दिलात त्यातून तुमची अभ्यासू वृत्ती, सामंजस्य व परमत सहिष्णुता दिसून येते. हां, माझा प्रतिसाद नक्की कुणाला उद्देशून होता हे न लिहिल्याने निष्कारण गैरसमज झाले. त्यासाठी पुन्हा एकदा क्षमस्व!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
माहितगार Sun, 09/13/2015 - 08:34 नवीन
बिरुटेसर मी आक्षेप अध्यात्मिक अथवा हिंदूत्ववादी श्रद्धेतून घेत नाहीए. इंग्रजी विकिपीडियावर संत मिराबाईंच्या बद्दल जी अभ्यासकांची मते नोंदवली आहेत त्यानुसार सदर आख्यायिकांना सुस्पष्ट ऐतिहासिक आधार दिसत नाही. तसा आधार आपल्याकडे असल्यास संदर्भ नमुद करणे श्रेयस्कर ठरते किंवा कसे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 09/13/2015 - 13:24 नवीन
माझ्याकडे कोणताही संदर्भ नाही. (उगाच तुम्हाला कामाला लावायची सवय आहे. ह. घ्या). :) आता संत मिरेबद्दल काही माहितीपूर्ण दस्तऐवजे सापडला तर इथे हजर होईन नै तर हा विषय संपला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
त
तिमा Fri, 09/11/2015 - 13:24 नवीन
वाचताय ना बिरुटेसाहेब, स्किझोफ्रेनिया मीरेला नव्हे, आपल्यासारख्या विज्ञानवाल्यांनाच झालाय! मूरखको तुम राज दियत हो पंडित फिरत भिकारी करमकी गति न्यारी |
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
मांत्रिक Fri, 09/11/2015 - 13:39 नवीन
तुम्ही विज्ञानवाले म्हणजे तुम्हीच बरोब्बर! बाकी मीरा, ज्ञानेश्वर, तुकाराम, कबीर, रामकृष्ण परमहंस, नामदेव सर्व वेडे? आणि तुम्ही पंडित? ठीक आहे. घ्या तुम्हाला पदवी लावून! माझ्या दृष्टीने विषय बास! इतक्या चांगल्या धाग्याचा कात्रज नको. करमकी गति न्यारी विज्ञानवादी असून यातली कर्माची गती बरी चालली तुम्हाला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
म
माहितगार Fri, 09/11/2015 - 19:37 नवीन
मीरेची केस वेगळी आहे. तिला सिझोफ्रेनिया झाल्यामुळे कृष्ण आपला नवराच आहे असे वाटत होते. आयुष्यभर ती त्याच धुंदीत वावरत होती.
संत मीराबाई या माझ्या अभ्यासाच्या विषय नाहीत, जिथपर्यंत इंग्रजी विकिपीडियावरील संत मीराबाईंवरील लेख वाचला. संत मीराबाईंच्या आयुष्याबद्दलच्या बहुतांश दंतकथांना विशीष्ट ऐतिहासीक आधारांची जोड दिसत नाही. असंख्य शक्यतांपैकी एकच शक्यता घेऊन त्याला एकमेव सत्य म्हणून प्रदर्शीत करणे विज्ञानाच्या कोणत्या तत्वात बसते ? प्राचीन इतिहासातील भास होऊन स्वतःला अमूक तमूक समजणार्‍या अनेक केसेस आहेत त्या पैकी कुणालाही सिझोफ्रेनिया असूही शकतो आणि निव्वळ तत्कालीन अंधश्रद्ध समाजाचा विश्वास मिळवण्याकरता आखलेली डेलीबरेट स्ट्रॅटेजी असू शकते किंवा इतरही काही शक्यता असू शकतील. जिथ पर्यंत भारतीय भक्ती परंपरेचा संबंध आहे भक्त त्याच्या इश्वराशी कोणतेही नाते कल्पित करू शकतो. भारतीय अद्वैत सिद्धांत व्यक्ती आणि परमेश्वर यातील कोणत्याही नात्यातून व्यक्त होणार अद्वैत स्विकारतो. त्या शिवाय जगातील असंख्य कवि आणि लेखक असंख्य कल्पना करून लिहित असतात उपरोक्त कवियत्रीच नशीब की तिने मज कृष्ण भेटला नाही .. असे लिहिले नाही तर या कवियत्रीलाही आणि जमले तर जगातील सर्व कलावंतांना आपण कदाचीत सिझोफ्रेनिया रोग्यांच्या पंगतीला बसवण्यास कमी करणार नाही. बिरुटेसर कोणत्या अर्थाने लिहितात आपण कोणत्या अर्थाने लिहितो. हा.का.ना.का. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 09/13/2015 - 08:04 नवीन
झाड्लोट करी जनी । केर भरी चक्रपाणी पाटी घेऊनिया शिरी । नेऊनिया टाकी दुरी ऐसा भक्तासि भुलला । नीच कामे करु लागला जनी म्हणे विठोबाला । काय उतराई होऊ तुला. किंवा जनी डोईने गांजली । विठोबा धावली देव हाते बुचडा सोडी । उवा मारतसे तांतडी केश विंचरुनी मोकळे केले । जनी म्हणे निर्मळ झाले. भक्त भक्तीच्या पाय-या चढत आध्यात्मिक अशा उंचीला गेला की भक्त आणि परमेश्वर एक होतात आणि मग लौकिक पातळीवरचं जगणं अध्यात्मिक झालं की कृष्ण जात्यावर धान्य दळायला मदत करतो, केसातील उवा काढतो. भक्त आणि भगवंत एकरुप होतात, लौकिक जीवनाचा त्यांचा संबंध संपतो का ? असं म्हणायचं होतं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Sun, 09/13/2015 - 09:39 नवीन
प्रत्येक चांगल्या गोष्टीत, कृत्यात आणि व्यक्तीत इश्वर बघणे भारतीय संस्कृतीचा भाग आहे, एवढेच नव्हे असे करणार्‍याला भारतीय संस्कृती आणि भारतीय कथासुत्रे आदर्श मानतात. संतकाव्यातील सुवचनांना अभंगांचा अध्यात्मिक दर्शनांमधला अर्थ लावणे एक झाले. एखाद्या कविला अध्यात्मिक अर्थ अपेक्षीत असेल की नाही हेही निश्चित सांगता येत नाही. "बनलेही असते राधा, मज कृष्ण भेटला नाही .." याचा अध्यात्मिक अर्थ काढला जावा किंवा त्यांच्या अपेक्षेपलिकडे जाऊन काही अध्यात्मिक अर्थ निघू शकतो हे, प्राची अश्विनींना अपेक्षीतही नसेल. (आता मी पुढे जे लिहिणार आहे ते केवळ उदाहरण म्हणून प्राची अश्विनींनी माफ करावे) प्राची अश्विनी त्यांच्या जिवनात भावलेल्या एखाद्या खर्‍या खुर्‍या व्यक्ती बद्दलही कृष्ण म्हणून लिहीत असू शकतील, भारतीय काव्यालंकरांचे उपमा ते व्याजोक्ती काय काय अलंकार प्रकार आहेत तो आपल्या अभ्यासाचा विषय आहे. एकुण माझे म्हणणे की कल्पना करणे अलंकारीक रचना करणे व्यक्तीचा अधिकार आहे. लोकांनी वेडं म्हणाव एवढी पॅशन असणे हा सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. एखाद्या व्यक्तीने लिहिलेल्या काल्पनिक अलंकारांना श्रद्धावंतांनी शब्दप्रमाण म्हणून स्विकारल्यास ती काही वेळा अंधश्रद्धा होऊ शकते. त्याच व्यक्तीने लिहिलेल्या रचना काल्पनिकही असू शकतात हे लक्षात न घेता शब्दप्रमाण मानून त्यावरुन स्किझोफ्रेनियाची एकच शक्यता वर्तवणे विज्ञानास अनुसरून नाहीच त्या शिवाय अंधश्रद्धेच्याच नाण्याची दुसरी बाजू ठरते. माझा आक्षेप स्किझोफ्रेनीया ही अनेक शक्यतापैकी एक शक्यता असू शकते हे म्हणण्यास नाही माझा आक्षेप स्कीझोफ्रेनीया किंवा मानसिक रोगाचीच शक्यता आहे या पुरेसे आधार नसतानाच्या ठामपणाला आहे. सामाजिक सुधारणा होत असलेल्या १९३०च्या काळात माधव ज्युलीयनांना केवळ विद्यार्थीनीशी संभाषण केले या कारणावरून जाचास सामोरे जावे लागले. आपण आतापेक्षा बरीच शतके आधीच्या समाजातील स्त्रीयांच्या काव्य रचनेचा विचार करत आहोत. मला 'प्राची अश्विनीं'च नाव पुन्हा नमुद करून त्यांच्या उल्लेखातला खरा कृष्ण कोण हे सांगण्यास त्यांना भरीस पाडायच नाहीए (प्राची अश्विनीं ह. घ्या.) पण आजच्या काळातही काही शहरी सुधारणा झालेला सुशिक्षीत झालेला भाग सोडला तर खर्‍या नवर्‍या शिवाय इतरही कृष्ण कुणी असू शकतो हे मोकळ्या मनाने स्विकारण्यास आजही भारतीय समाज कितपत सक्षम आहे ? संत मीराबाईंना तर साक्षात सती प्रथेचा सामना करावयाचा होता. त्यांचा बालविवाह त्यांच्या मनाप्रमाने नसेल तर कृष्णाचे नाव घेऊन त्यांनी त्या विवाहाचे अस्तीत्व नाकारण्याचे धाडसही दाखवले असेल. आणि त्यांचे धाडस नाकारणार्‍या समाजाने त्यांना वेडेपणाचा शिक्का मारला असेल असे काही झाले असल्यास सामाजिक सुधारणा न झालेल्या समाजाने मारलेले शिक्के व्यक्तीरेखांवर जबरदस्तीने सुधारणा झालेल्या समाजानेही वागवत ठेवण्या बद्दल मला जराशी साशंकता आहे एवढेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 09/13/2015 - 13:19 नवीन
'प्रतिभा ही वेडाची बहीण असते' असं एका इटालियन मानसशास्त्रज्ञ लोंब्रोसोने म्हटलं आहे. (आता संदर्भ विचारु नका. थोडा फार तर विश्वास ठेवा) वेडाच्या झटक्यात किंवा अचानक स्फुर्ती होते म्हणजे एकाकी स्फुरण येतं आणि पुढे लिहिणं, बडबडणं सुरु होतं. हं आता तुलसीदासांनी आपल्या खांद्याचं दुखणं दुर व्हावं म्हणुन काही रचना केलेली आहे, हा अपवाद सोडा. (संदर्भ विचारु नका विश्वास ठेवा) काही तरी क्षणात वीज चमकुन जाते आणि लिहायला सुरुवात होते. संतांनी जे काव्यलेखन केलं ते ईश्वराची कृपेमुळे झालं अशी अनेक उदाहरणे आहेत. 'हा ग्रंथ नोहे, हे वैभव तिये कृपेचे' 'मज विश्वंभर बोलवितो. (संत ज्ञानेश्वर), आम्ही कोण म्हणुन काय पुसता आम्ही असू लाडके देवाचे' शारदेने कानमंत्र दिला म्हणुन केशवसुतांनी लिहिणे आणि परमेश्वराचा अनुग्रह झाला म्हणुन तुकारामांनी लिहिणे. माझी माय सरसोती हे सर्व माझ्याकडुन वदवून घेते असं बहिणाबाई चौधरी म्हणतात.(हा जो देवाचा झटका आहे, ते वेड आहे). ही जी संतमंडळी आणि लेखकाची भारावलेली अवस्था आहे ही प्रतिभा आहे. उत्कट भावनेचा अविष्कार आहे. आता या भावनिक अविष्करणाचा फ्लो जेव्हा अधिकच अधिक होतो तेव्हा त्याला शास्त्रीय काय नाव असेल मला माहिती नाही, पण ते वेड असतं आजाराची सुरुवात असावी असं वाटतं. काही लौकिक पातळीवर वावरत असतात तर काहींना आवरणे कठीण जातं. मला काही प्रतिभावंतांना वेडं ठरवायचं नाही. वर्डस्वर्थच्या भाषेत The spontaneous overflow of powerful feeling ही जी उत्कट अवस्था असते लिहिण्याची बडबडण्याची इच्छा जी स्फुर्ती असते. असं, अधिकच्या अवस्थेतील लेखन मला वाटतं मिरेचं असावं. संत मिराबाई या पंडित होत्या की नव्हत्या मला माहिती नाही. धार्मिक ग्रंथांचं त्यांनी पठण केलं असं वाचुन आहे. म्हणजे शास्त्र पारंगत छंद व्याकरण, इ.इ. चौसष्ट कला, पुरुषार्थावरील वाचन, धर्मग्रंथ असे जर त्यांचे वाचन असते तर त्यांची प्रतिभा केवळ 'गिरीधर'साठी राहीली नसती. लौकिक आणि अलौकिक अशा पातळीवरचं त्यांचं जगणं एक सामान्य माणसाप्रमाणे आणि सामान्य माणसाच्या कल्याणासाठी झालं असतं. मुळात मिरेचा गुंता असा वाढला की ती एक तर सुंदर होती. अध्यात्मिकतेची आवड म्हणुन राजपुत्राला ती आवडली असावी पण हिचं वेड कदाचित राजपुत्र जीवंत राहीला असता तर कसं राहीलं असतं ती राजवाड्यातच भ्रमिष्टासारखी 'गिरीधर गिरीधर' करत राहीली असती अशी एक शक्यता वाटते. कदाचित एक आदर्श संतही तेव्हा बनुन राहीली असती. कवीचा अनुभव व्यक्तिगत न राहता तो वैश्विक असला पाहिजे. केवळ स्वतःचे सुखदु:ख तो लेखनातून मांडत असेल तर त्याला एक संकुचितता येते, मिरा केवळ कृष्णमय झाली अर्थात ती प्रेमाचं प्रतिक म्हणायचं तर मला तसं काही म्हणायला अडचण नाही. गोराकुंभार चिखल तुडवता तुडवता इतका तल्लीन झाला की मुल पायाखाली आला तरी तुडवत राहीला, ही अशी वैराग्याची अवस्था, जनीला विठ्ठल दळण कांडन करतांना तो विठ्ठल सोबतच काम करत असल्याचा भास व्हावा, ही अवस्था, आणि मीरेला आपला नवरा कृष्ण वाटावा ही अवस्था मला एकसारख्याच वाटतात. अर्थात या सर्व आख्यायिकांना माझ्याकडे काही आधार नाही. आणि अशा मनोवस्थेला शास्त्रीय दृष्ट्या काय म्हणतात तेही मला माहिती नाही. चला आता प्राची अश्विनीकडे. (हलकेच घ्या हो) प्राची अश्विनी यांच्या जीवनात एक उणीव दिसत आहे. प्रेम करुनही काय रे हे, तु मला समजुन घेतलं नाही. इतक्या दिवसांनी आलास पण तो तु नाहीस. आणि तो म्हणतो काय हे, प्रेम तितकेच आहे तुला ते ओळखता येत नाही. मला राधा बनायचं होतं रे पण तुला कृष्ण होता आलं नाही. :) गोविंदाग्रज म्हणतात- प्रेम बोले, प्रेम डोले, प्रेमे जग हाले प्रेमाखातर जगी आजवर काय नाही झाले. बिचार्‍या मिरेच्या प्रेमावर अजून आता काथ्याकुट नको.....आपल्याला काही जमलं नाही, किमान थोरामोठ्यांच्या प्रेमाच्या गोष्टी देहभान हरपुन वाचत राहु. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
प
प्राची अश्विनी Mon, 09/14/2015 - 13:03 नवीन
बिरुटे सर तुम्ही एका ठिकाणी म्हणताय ,"कवीचा अनुभव व्यक्तिगत न राहता तो वैश्विक असला पाहिजे. " आणि नंतर म्हणता, "प्राची अश्विनी यांच्या जीवनात एक उणीव दिसत आहे. " या दोन विधानात तुम्हारा विरोधाभास नाही वाटत? पुढे "प्रेम करुनही काय रे हे, तु मला समजुन घेतलं नाही. इतक्या दिवसांनी आलास पण तो तु नाहीस. आणि तो म्हणतो काय हे, प्रेम तितकेच आहे तुला ते ओळखता येत नाही. मला राधा बनायचं होतं रे पण तुला कृष्ण होता आलं नाही. " हे मी म्हटलेले तुमच्या लक्षात आले तर या सर्व प्रश्नांना/ तक्रारींना दिलेली उत्तरे पण मी च लिहिली आहेत ना? असो. उद्या "कळीदार कपुरी पान" वाचताना कवी राजा बढे कलावंतिणीच्या समवेत बसले होते.... असं तुम्ही म्हणाल. :)( हलकेच घ्या हो.:))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
माहितगार Mon, 09/14/2015 - 20:47 नवीन
मला काही, प्रतिभावंतांना वेडं ठरवायचं नाही.
बिरुटेसर काही आपणास काही या शब्दानंतर कॉमा अभिप्रेत असावा. उपरोक्त वाक्य आणि खालील वाक्याचा तुमचा क्रम बदलला की अंशतः विसंगतीतर नाहीना अशी शंका येते आहे.
ही जी संतमंडळी आणि लेखकाची भारावलेली अवस्था आहे ही प्रतिभा आहे. उत्कट भावनेचा अविष्कार आहे. आता या भावनिक अविष्करणाचा फ्लो जेव्हा अधिकच अधिक होतो तेव्हा त्याला शास्त्रीय काय नाव असेल मला माहिती नाही, पण ते वेड असतं आजाराची सुरुवात असावी असं वाटतं. काही लौकिक पातळीवर वावरत असतात तर काहींना आवरणे कठीण जातं.
कलावंताच्या प्रेरणेचे अभिव्यक्ती एकतर देव-दत्त असावी --(कारण प्रतिभावंत आपल्या प्रतिभेच क्रेडीट त्याच्या परमेश्वरास देतो - या विषयावर मला अजून एक वाद वेगळ्या धाग्यावर करावयाचा आहे.) -- किंवा प्रतिभावंतास वेडाच्या आजाराची सुरवात झाली असावी. बिरुटेसर मानवी अभिव्यक्तीच्या प्रेरणेचे इतर कोणतेही स्रोत आपण शिल्लक ठेवलेले दिसत नाहीत ! :) बिरुटेसर या व्यक्त होणार्‍या कवि अथवा संतांच कवि अथवा लेखक असणे हा निव्वळ योगा योग नाही का ? अभिव्यक्ती हि केवळ लेखन आणि काव्य याच्यातूनच प्रकट होते असे आपणास म्हणावयाचे नसावे. गायक, चित्रकार, नृत्य अशा अनंत गोष्टीतून मानव अभिव्यक्त होत असतो. आपण मांडलेल्या तर्कास जरासे ताणले की हातात कुंचला घेतलेल्या प्रत्येक चित्रकारास अथवा गायनाचा सूर धरणार्‍या प्रत्येक गायकास, नृत्य करण्यास सुरवात करणार्‍या प्रत्येक नर्तकास वेडाच्या आजाराची सुरवात झाली आहे असे म्हणावे लागेल :) या अर्थाने कोणतेही काम आवडीने / मन लावून/ (भान हरपून)/ झोकून देऊन अथवा प्रामाणिकतेने करणार्‍या प्रत्येक व्यक्तीस वेडाच्या आजाराची सुरवात झाली असे म्हणावे लागेल ? आपल्या दृष्टीकोणात वेडाच्या आजाराची जी काही व्याख्या आहे त्याचे कौतुकच करावे लागेल, आपल्या दृष्टीकोणात वेडाच्या आजाराची व्याख्या काय आहे तरी काय आणि आपण ती कोठून मिळवलीत ? (आता संदर्भ विचारु नका. थोडा फार तर विश्वास ठेवा असे उत्तर देणार ?:) ) passionate या शब्दाची इंग्रजीतील गूगल बाबाने दिलेली व्याख्या 'having, showing, or caused by strong feelings or beliefs.' अशी येते आहे आपण मराठीत एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीच वेड आहे म्हणतो याचा अर्थ त्याला वेडाच्या आजाराची सुरवात आहे का ? अबकड व्यक्तीला हळक्षज्ञ गोष्टीच वेड आहे = अबकड व्यक्ती वेडा आहे अथवा अबकडला वेडाची सुरवात झाली आहे ? हा कोणता तर्क आहे ? अबकड व्यक्तीला हळक्षज्ञ गोष्टीच वेड आहे या मराठी वाक्याचा आत्ता पर्यंत मी स्वतः जो अर्थ घेतला तो हाच की, किमान पातळी वर अबकड व्यक्तीला हळक्षज्ञ गोष्ट आवडणारी आहे, विशेष प्रीय आहे , हळक्षज्ञ गोष्ट आवडण्याच्या बर्‍याच पायर्‍या त्याने पार केल्या आहेत आणि अपवादात्मक स्थितीत त्याला खरोखर वेड आहे. एखाद्या अपवादात्मक शक्यतेवरून सरसकट शिक्का मारणे यालाच तर आपवादावरून नियम सिद्ध करणे म्हणत नसावेत ? "....किमान थोरामोठ्यांच्या प्रेमाच्या गोष्टी देहभान हरपुन वाचत राहु. :) " देहभान हरपून वाचणे ही सुद्धा एक अभिव्यक्ती आहे का ? (मी कठोर टिकेचा समर्थक असल्यामुळे अत्याधिक खिस पाडणे वगैरे होते. माहितगार म्हणजे वेड्यासारखा खीस पाडतो :) तरीपण आपला लोभ कायम ठेवावा ही नम्र विनंती ) बाकी खाली नमूद केलेल्या ओळी आवडल्या गोविंदाग्रज म्हणतात- प्रेम बोले, प्रेम डोले, प्रेमे जग हाले प्रेमाखातर जगी आजवर काय नाही झाले. प्राची तैंना 'जो जे वांछील तो ते लाहो, कृष्ण प्राचीतैंच्या भेटीस येत राहो' हि शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स
सस्नेह Tue, 09/08/2015 - 17:53 नवीन
फारच सुंदर !
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Wed, 09/09/2015 - 01:19 नवीन
फार छान कविता आहे. कविता पहिल्या वाचनात आवडली. सुंदर शब्दरचना. स्वत: कवी, मांत्रिक , माहितगार यांच्या प्रतिसादातून कविता अधिक कळली.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 09/09/2015 - 05:22 नवीन
........ राधेची निर्मम प्रीती , गोपास बनविते कृष्ण
१) श्रद्धेच महात्म्य अचूक आले आहे, ज्या कुणात/कशात तुम्ही परमेशवर (कृष्ण) पहाल त्यात तुम्हाला परमेश्वर दिसेल. २) भक्ताच्या प्रितीमूळे/भक्तीमूळेच परमेश्वराच (कृष्णाच) अस्तीत्व आहे. (राधेची प्रिती नसती तर गोपाचा गोपच राहीला असता कृष्ण झाला नसता)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त अवधुत
अ
अनन्त अवधुत Sun, 09/13/2015 - 13:24 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
च
चाणक्य Wed, 09/09/2015 - 09:52 नवीन
ही वाचायची राहिली होती. फारच अप्रतिम झालीये. पुन्हा पुन्हा वाचावी अशी.
  • Log in or register to post comments
न
नया है वह Wed, 09/09/2015 - 15:25 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक गुरुवार, 09/10/2015 - 18:33 नवीन
तुमची कविता दखल सदरात गेली! याबद्दल खूप खूप अभिनंदन!!! जे अगदी अंतःकरणापासून आहे त्याची निश्चित दखल घेतली जाणारच!!! तो हातात बासरी घेतलेला कृष्णकन्हैया वाचकांच्या मनात जागवला तुमच्या कवितेने! म्हणून हे यश! असो! पुनश्च अभिनंदन!!!
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 09/11/2015 - 16:05 नवीन
जे अगदी अंतःकरणापासून आहे त्याची निश्चित दखल घेतली जाणारच!!!
धन्यवाद माहितीबद्दल. माहीत नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
अ
अजया Fri, 09/11/2015 - 18:45 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
प
प्यारे१ Fri, 09/11/2015 - 18:53 नवीन
गप की बे भाऱ्या. णवीण हाय ना मांत्रिक? मग्ग्ग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
म
मांत्रिक Fri, 09/11/2015 - 19:17 नवीन
यात चेष्टा करण्यासारखे काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
न
नया है वह Fri, 09/11/2015 - 14:24 नवीन
.
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Fri, 09/11/2015 - 14:36 नवीन
दोन तीन दा वाचली. शब्दांची गुंफण सुरेखच वाटली होती आधीही आणि आत्ताही. पण परत परत वाचल्यावर कवितेतला सुंदर अर्थही साधला. सुंदर जमली आहे कविता
  • Log in or register to post comments
श
शुचि Fri, 09/11/2015 - 16:46 नवीन
फार आवडली.
  • Log in or register to post comments
र
रातराणी Fri, 09/11/2015 - 20:24 नवीन
अप्रतिम! अर्थ खुलवून सांगितल्यामुळे तर अजूनच भावली!
  • Log in or register to post comments
त
तिमा Sat, 09/12/2015 - 06:27 नवीन
@प्राची अश्विनी, माझ्या इतर प्रतिसादात, तुमची कविता मला खूपच आवडली हे लिहायचे राहून गेले. तसेच मांत्रिक यांनी त्याबाबत केलेला अर्थाचा उलगडा तेवढाच आवडला. एक फारच चांगला घागा वाचायला मिळाला असे वाटते.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sat, 09/12/2015 - 06:59 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Sat, 09/12/2015 - 16:59 नवीन
जितक्या वेळा वाचली तितकी जास्त आवडली.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 09/13/2015 - 06:34 नवीन
सुंदर...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Manali Trance... ;) :- The Shaukeens
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Mon, 09/14/2015 - 05:33 नवीन
राधेचा सर्वप्रथम उल्लेख बाराव्या शतकातील कवी जयदेव याने आपल्या "गीतगोविंद" या काव्यात केला होता असे वाचले होते. त्याआधी लिहिलेल्या आणि कृष्णाचे अधिकृत चरित्र म्हणता येतील अशा श्रीमद भागवत, महाभारत आणि हरिवंश पुराण यात राधेचा उल्लेख नाही. किंबहूना श्रीकृष्ण भक्तीचा पुरस्कार करणारा "पुष्टीमार्ग" संप्रदायही याला दुजोरा देतो. या दुव्यावरील माहिती वाचनीय आहे.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Mon, 09/14/2015 - 13:07 नवीन
भागवतात राधा वाचललेली आठवते,कुणीतरी केलेले भागवताचे भाषांतर होते, पुन्हा बघून संदर्भ देईन.
  • Log in or register to post comments
श
शब्दवेडी Tue, 09/15/2015 - 08:10 नवीन
कविता खूप सुन्दर आहे.आणि त्यानन्तर झालेली चर्चा पण खूप अर्थपूर्ण आहे.मला छान माहिती मिळाली.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Tue, 09/22/2015 - 08:30 नवीन
धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दवेडी
र
राघव Fri, 01/15/2016 - 08:48 नवीन
कल्पना अत्त्युत्तम! मांडणीही खास. खूप आवडली कविता. धन्यवाद! :-)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा