Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुडुचेरी: अरविंद, योग आणि समुद्र

म
मित्रहो
गुरुवार, 10/01/2015 - 13:30
💬 30
योगी अरविंद किंवा श्री अरबिंदो यांनी स्वतःविषयी म्हटले होते “मी आधी कवि आहे, नंतर क्रांतीकारी आणि मग योगी” (Spiritual Leader). आज जगाला त्यांची ओळख मात्र उलट आहे. आज पाँडिचेरी किंवा पुडुचेरी म्हटले की डोक्यात येतो तो अरविंदांचा आश्रम. शालेय इतिहासात वाचलेले क्रांतीकारी अरविंद घोष म्हणजेच योगी अरविंद हे कित्येकांना माहीती नसते. निदान मला तरी बरीच वर्षे हे माहीत नव्हते. अलीपूर बॉम्ब केसमधे इंग्रजांनी अरविंद घोष यांच्यावर खटला भरला. चित्तरंजन दास मग अरविंदांच्या मदतीस धावले आणि त्यांची आरोपातून मुक्तता केली. या काळात जेलमधे असताना त्यांना काही आध्यात्मिक अनुभव आले. त्यानंतर त्यांनी योग आणि आध्यात्माचे काम सुरु केले. परंतु इंग्रजांचा त्यांच्यावर विश्वास नव्हता त्यांनी अरविंदांच्या विरोधात कुरापती चालूच ठेवल्या. त्यांच्या एका लेखावरुन त्यांच्याविरुद्ध वॉरंट काढले. अरविंदांचा राजकारणापेक्षा योगाभ्यास आणि आध्यात्म या गोष्टींकडे कल वाढत होता. १९१० साली अरविंदांनी बंगाल सोडले आणि पॉंडिचेरी येथे आले त्यानंतर पाँडिचेरी हेच अरविंदांचे घर झाले. पाँडिचेरी येथे फ्रेंचांची सत्ता असल्याने तेथे इंग्रज फार काही करु शकनार नाही याची त्यांना कल्पना होती. त्यांनी पॉंडेचेरी येथील वास्तव्यात सावित्री हे महाकाव्य लिहीले. महाभारत आणि उपनिषदे यावरही त्यांनी बरीच पुस्तके लिहिली. १९४३ साली साहीत्याच्या नोबेल पारितोषिकासाठी त्यांचे मानांकन झाले होते तसेच १९५० साली शांततेच्या नोबेल पुरसकारासाठी पण त्यांचे नामांकन झाले होते. १९२६ साली द मदर (मीरा रिचर्ड) यांनी अरविंदाच्या विचाराचा प्रसार करण्यासाठी अरविंद सोसायटी आणि अरविंद आश्रमाची स्थापना केली. हाच तो पाँडिचेरीचा अरविंद आश्रम. आश्रमात अरविंदांची समाधी आणि एक पुस्तक विक्रीचे दुकान या खेरीज काही नाही. तशा काही राहायला खोल्य. आश्रमात शांतता महत्वाची असल्याने तीन वर्षाखालील मुलांना प्रवेश देत नाही. पाच सहा वर्षीची मुले मात्र ‘इथे बोलायचे का नाही’ हा बालसुलभ प्रश्न विचारीत असतात. आश्रमात प्रवेश करताना सतत शांत रहा अशी सूचना शातपणेच मिळत होती. आश्रमात एका वृक्षाखाली अरविंदाची समाधी आहे. आश्रमात आलेले लोक समाधीपुढे काही मिनिटे शांत बसतात. मी तर तिथल्या शांततेने गांगरुन गेलो. मी स्वतः ध्यान वगेरे फार काही करीत नाही, साधे प्राणायम केले तरीही मोजून दहा ते बारा श्वास शांत बसने यापलीकडे शांत बसने मला जमत नाही. इथे संपूर्ण वातावरणात नीरव शांतता असल्याने समाधीपुढे तीन मिनिटे शांत बसने हा माझ्यासाठी एक वेगळा अनुभव होता. इतकी शांतता याआधी कधीच अनुभवली नव्हती. आश्रम (अरविंद आश्रम) योगी अरविंद (वरील दोनही फोटो जालावरुन) द मदर ही अरविंदांच्या चरीत्रापेक्षा अरविंदांचा विचार लोकांपर्यंत पोहचायला हवा याबाबतीत आग्रही होती असे वाचले होते. अरविंदांच्या मानव विकासाच्या विचाराने प्रेरीत होउन डॉ. जी. वेंकटस्वामी यांनी अरविंद आय केअरची स्थापना केली. आता अरविंद आय केअरचा अभ्यास केल्याशिवाय एमबीएची डिग्री पूर्ण होत नाही. एमबीए मधली सर्वात इंटरेस्टींग केस स्टडी आहे. एक तर ती भारतीय कंपनीविषयी आहे आणि दुसरे म्हणजे ती केस स्टडी नेहमीच्याच नफा तोट्याच्या पुढे जाउन विद्यार्थ्याला काही वेगळे शिकवून जाते. अरविंद यांचा मानवीय एकात्मता आणि समानतेचा संदेश प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ऑरोविली ही वस्ती (Township) बसवण्यात आली. हा भाग तामीळनाडूमधे येतो आणि पुडुचेरी शहरापासून काहीसा लांब म्हणजे जवळ जवळ तीस ते पस्तीस किलोमीटर दूर आहे. एकंदरीत तीन ते चार तास लागतात तेंव्हा जाताना असाच प्लॅन करुन जावे. ऑरोविलीवर कुठल्या धर्माची किंवा पंथाची मालकी नाही. ऑरोविलीच्या मध्यभागी आहे मातृमंदीर. मातृमंदीरात जाण्याअगोदर मातृमंदीराविषयीचा विडीओ जरुर बघावा. त्या विडीयोत मदरचे एक वाक्य आहे ‘ऑरोविली हे पर्यटन स्थळ नाही’. तुमच्या आमच्या सारखे बरेच ऑरोविली येथील मातृमंदीर ही वास्तू बघायला जातात. असे असले तरी हे पर्यटन स्थळ नाही हे मनात ठेउनच या परीसरात फिरले पाहीजे. त्यामुळे रस्त्यात कुठे पाणी बॉटल विकनारा किंवा कोणी लिंबू पाणी विकनारा सापडत नाही. तसे काही नाही म्हणून आपली निराशाही होत नाही. एका मोठ्या वटवृक्षाच्या आसपास मातृमंदीर आहे. मातृमंदीराच्या पायथ्यापासून मातृ मंदीर व्ह्यू पॉइंट हा दीड ते दोन किलोमीटर चालत जायचा रस्ता आहे. मातृमंदीराच्या आत किंवा मातृमंदीराच्या व्ह्यू पॉइंटला मोफत पासेस घेउन जावे लागते. पासेस मिळण्याच्या वेळा आहेत ज्या कटाक्षाने पाळल्या जातात. वैश्विक एकात्मता वगेरे समजावी येवढी माझी बुद्धी नाही परंतु ती सोनेरी वास्तू बघून मात्र भारावून गेलो. घुमटाकार सोनेरी वास्तू फारच आकर्षक आहे. त्यातल्या पत्येक घुमटाला आणि दालनाला एक अर्थ आहे. त्याविषयीची सविस्तर माहीती जालावर उपलब्ध आहे. आजूबाजूचा परीसर पण खूप सुंदर आहे. पावसाळ्याचे दिवस होते त्यामुळे सर्वदूर हिरवेगार असल्याने परीसर अधिक सुंदर वाटत होता. सामान्यतः मातृमंदीराच्या आत कुणालाच प्रवेश देत नाही. तिथे ध्यान करण्याच्या विशिष्ट वेळा आहेत आणि त्याच वेळेला फक्त ध्यान करनाऱ्या लोकांनाच आत सोडले जाते. ज्यांना कुणाला मातृमंदीराच्या आत जाउन ध्यान करायचे असेल त्यांना आधीच कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो. ध्यानासाठी एक दिवस अगोदर बुकिंग करावे लागते. नियमितपणे ध्यानधारणा (मेडीटेशन) करनाऱ्यांसाठी या वास्तूच्या आत जाउन ध्यान करणे एक पर्वनीच असेल. परत येताना वटवृक्षाखाली आराम केला. वटवृक्षाचा आवार बराच मोठा होता. ऑरोविली (मातृमंदीर) ऑरोविली मातृमंदीर परीसर (मातृमंदीर परीसर) वटवृक्ष वटवृक्ष (हाच तो वटवृक्ष) चेन्नइवरुन इसीआरने (Eastern Coast Road) पाँडिचेरीकडे जातानाच जाणवायला लागले की पूर्व किनारपट्टीचा पट्टा हा पश्चिम किनारपट्टीसारखा सुंदर नाही. सह्याद्रीचे जितके आभार मानावे ते कमीच आहे. तरीही सतत सोबत असनारा समुद्र, चांगला रस्ता यामुळे चेन्नइ ते पाँडिचेरी हा एकशे साठ ते एकशे सत्तर किलोमीटरचा चार साडेचार तासाचा प्रवास नक्कीच सुखावह होता. पाँडिचेरीत रेल्वे स्टेशन आणि विमानतळ दोनही आहेत परंतु तामीळनाडू बाहेरील लोकांसाठी चेन्नइच सोयीचे पडते. पाँडिचेरी हा केंद्रशासीत प्रदेश स्वतःचे वेगळे आमदार आणि मुख्यमंत्री असनारा पण कुठे तामीळनाडू संपला आणि कुठे पाँडिचेरी सुरु झाले ते काही कळले नाही, सर्वदूर अम्माचेच कटआउटस दिसत होते. १९४७ साली इंग्रज सोडून गेले तरीही फ्रेंचांनी मात्र पाँडिचेरी सोडले नाही. भारत सरकारचे प्रयत्न आणि स्थानिक लोकांनी केलेला विरोध यामुळे १९५४ साली पाँडिचेरी भारतात विलीन करण्याचा करार झाला परंतु हा निर्णय प्रत्यक्षात यायला १९६२ साल उजाडावे लागले. १६ ऑगस्ट १९६२ रोजी पाँडिचेरी भारतात सामील झाला म्हणजे साऱ्या भारताचा स्वातंत्रदिवस १५ ऑगस्ट तर पाँडिचेरीचा १६ ऑगस्ट. तिथे दोनही दिवस मनवले जातात. पाँडेचेरी पाँडिचेरी स्वातंत्रदिवस फ्रेंचांची वस्ती आता व्हाइट टाउन आणि ऑरोव्हीली या भागात आहे. आमच्या ड्रायव्हरने सांगितल्याप्रमाणे ही लोक आत इथलीच झाली. कुणी फ्रेंच पुरुषाने तामील स्त्रीशी लग्न केले तर कुण्या तामील पुरुषाने फ्रेंच स्त्रीशी लग्न केले. व्हाइट टाउन मधली घरे ही फ्रेंच बनावटीने बनविलेली आहेत. याच भागात फ्रांस सरकारचे दूतावास आहे. अरविंद आश्रम, म्युझीयम, लायब्ररी हे सारे व्हाइट टाउनच्या आसपास आहेत. या भागात फिरत असताना एक प्रश्न आला ही तशी लहानच वस्ती मग या मूठभर फ्रेंच लोकांनी या भागावर कसे काय राज्य केले? कदाचित तसेच जसे मूठभर इंग्रजांनी साऱ्या भारतावर राज्य केले. दुसरा प्रश्न म्हणजे इंग्रजांनी फ्रेंचच नाही तर पोर्तुगीज, डच या वसाहती का सोडल्या? सारा भारत एकसंघ स्वतःच्या ताब्यात का घेतला नाही? या साऱ्या वसाहती समुद्र किनाऱ्याला लागून होत्या, व्यापारी दृष्टीने सोयीच्या होत्या परंतु इंग्रजांनी ताब्यात घेतल्या नाही कि घेउ शकले नाही कारण इंग्रजांनी प्रयत्न जरुर केले. व्हाइट टाउनची वसाहत पण अशीच समुद्रकिनाऱ्यावर आहे. व्हाइट टाउनच्या बाजूला जो समुद्री किनारा आहे त्याला रॉकी बीच असे म्हणतात. रॉकी बीच जिथन सुरु होतो तिथे एक महात्मा गांधीचा पुतळा आहे. हा पुतळा हीच ह्या बीचची ओळख आहे. हा भाग आपल्या मुंबईच्या मरीन ड्राइव्ह सारखाच. तिथला समुद्रकिनारा, लाइटस, रस्त्याच्या बाजूचा फुटपाथ हे सारे मरीन ड्राइव्ह सारखेच आहे. आम्ही दुपारी तीन साडेतीनला तिथे पोहचल्यामुळे उन्हानेच त्रस्त होतो. फ्रेंचवस्ती फ्रेंचवस्ती (व्हाइट टाउन फ्रेंचवस्ती) रॉकी बीच रॉकी बीच (रॉकी बीच बराचसा मरीन ड्राइव्ह सारखाच) पूर्व किनारपट्टीवरील काही बीचेसची लांबी खूप मोठी आहे. चेन्नइचा मरीना बीच हा तर जगातल्या दहा सर्वात लांब बीचमधे येतो. पाँडिचेरीच्या परीसरात पण बरेच बीचेस आहेत. पॅराडाइस बीचवर जायला बोटींग क्लब पासून बोट करुन जावे लागते. संध्याकाळच्या वेळेला आम्ही अशाच एका बीचवर खेळत असताना माझ्या डोक्यात सतत एकच चालले होते सूर्य का दिसत नाही. संध्याकाळच्या वेळेला समुद्रावर जाउन सूर्यास्त बघायची सवय नडत होती. मुलांनांही सन सेट बघायला जाउ असे सांगून घेउन आलो होतो. समुद्रावर खेळण्याच्या नादात मुले विसरली होती पण माझे आपले तेच चालले होते. अर्धा पाउण तासानंतर मागे वळून वर बघितल्यावर लक्षात आले आपण पूर्व किनारपट्टीवर आहो इथे सूर्य समुद्रात मावळत नाही तो समुद्रात उगवतो. तेंव्हाच निर्णय घेतला उद्या सकाळी उठून सूर्योदय बघायला यायचे. साडेपाचचा गजर लावून सहा वाजेपर्यंत मी समुद्रकिनाऱ्यावर पोहचलो. सकाळी सहा वाजता लाटांच्या मधुर संगीताच्या साथीने केलेला मॉर्निंग वॉक, दूर कुठेतरी मासेमारांच्या होड्या आणि समुद्राच्या पाण्यातून वर येनारा तांबडा गोल. मनोहारी दृष्य होते. काही क्षण फोटो वगेरे घ्यायला हवा हेही विसरुन गेलो. रोजच सकाळ इतकी सुंदर आणि मनोहर हवी असे वाटले. तेथेच एक स्थानिक मासेमार वाळूतले खेकडे पकडताना दिसला. तो त्या वाळूत भला मोठा खड्डा करुन खेकडे पकडत होता. त्याला तो सूर्योदय, त्या होड्या याचेशी काही देणेघेणे नव्हते. रोजच सकाळ जर अशी असती तर मी पण त्याच्या सारखाच माझ्या पोटाच्या उद्योगाला लागलो असतो. तेंव्हा जे आहे तेच सुंदर मानावे हेच खरे. सूर्यास्त (सूर्यास्त उलट बाजूला) बोटक्लब (बोटक्लब) सूर्योदय (सूर्योदय) गेली बारा वर्षे दक्षिणेतच राहत असल्याने आम्ही इडली दोसा आणि कर्ड राइस खायला चांगलेच सरावलोय त्यामुळे आम्हाला दक्षिणेत फिरताना खाण्याचा फार त्रास होत नाही. इथे अप्पम, इदीअप्पम आणि पुट्टुचाही स्वाद चाखायला मिळाला. तसे हे केरळी प्रकार पण पाँडेचेरीमधे मिळत होते. आता नावे आठवत नाही पण काही पाँडिचेरीच्या भाज्याही खाल्ल्या. मासे आणि खेकड्यांचे पण खास पाँडेचेरी प्रकार नक्कीच असतील पण आमचा शाकाहार आम्हाला नडला. फक्त एका गोष्टीची खंत राहीली भारतातल्या फ्रेंचांच्या वसाहतीत जाउनही फ्रेंच जेवण जेवण्याचा योग आला नाही. ऑरोविलीच्या पायथ्याशी असलेल्या हॉटेलात फ्रेंच जेवण मिळेल असे वाटले होते पण ते फक्त पोट भरण्यासाठीचे हॉटेल होते. तिथे आपले नेहमीचेच पिझ्झा, रोटी, राइस प्लेट या प्रकारातले जेवण होते. फ्रेंच जेवण न मिळाल्याची खंत मग आम्ही रात्री हॉटेलवर फ्रेंच रेड वाइन पिउन घालविली. अरविंद, त्यांचे आध्यात्म, त्यांचे तत्व, त्यांचा Integrated Yoga या साऱ्यांवर कुणाचा विश्वास असेल कुणाचा नसेल. काही टिकाही करीत असतील. मदरच्या म्हणण्याप्रमाणे अरविंदांचा विचार जगातल्या कानाकोपऱ्यात पोहचेल किंवा नाही पोहचनार परंतु अरविंदांच्या वास्तव्यामुळे पाँडिचेरीला मिळालेली ओळख मात्र कधीच पुसनार नाही. मित्रहो https://mitraho.wordpress.com/

प्रतिक्रिया द्या
11361 वाचन

💬 प्रतिसाद (30)
प
प्रसाद प्रसाद गुरुवार, 10/01/2015 - 14:07 नवीन
छान लेख.....
  • Log in or register to post comments
र
राही गुरुवार, 10/01/2015 - 14:10 नवीन
पाँडिचेरी सुंदर, आखीव रेखीव आहे. स्वच्छही आहे पण थोडी रुक्ष आहे. सगळाच पूर्व किनारा रुक्ष वाटतो. जसजसे दक्षिणेकडे जावे तसतशी खुरटी झुडुपे दिसू लागतात. कुठे ती पश्चिम किनार्‍यावर डोलणारी भातपिके, खळाळते जलप्रवाह, हिरवी राने आणि कुठे हा रुक्ष रेताड मॅन्ग्रोवी प्रदेश. लेख आवडला.
  • Log in or register to post comments
म
मित्रहो गुरुवार, 10/01/2015 - 14:57 नवीन
भातपिके आहेत, खळखळता जलप्रवाह पण आहे तरी पण रुक्ष आहे. पश्चिम किनाऱ्यावर एका बाजूला समुद्रकिनारा तर दुसरीकडे सह्याद्रीच्या हिरव्यागार रांगा आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 10/01/2015 - 15:04 नवीन
सह्याद्रीच्या ?!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मित्रहो
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 10/01/2015 - 14:26 नवीन
सुंदर ओळख ! फोटोत दिसणारी स्वच्छता आणि टापटीप खूप आवडली !
  • Log in or register to post comments
म
मित्रहो गुरुवार, 10/01/2015 - 14:59 नवीन
संपूर्ण पाँडिचेरी खूप स्वच्छ आहे असे म्हणणे धाडसाचे होइल. फ्रेंचवस्तीचा भाग आणि ऑरोविलीचा भाग मात्र स्वच्छ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
सूड गुरुवार, 10/01/2015 - 14:59 नवीन
सुंदर लेख!!
  • Log in or register to post comments
त
ताल लय गुरुवार, 10/01/2015 - 19:51 नवीन
वाह, जुन्या आठवणीना उजाळा मिळाला मी ते डोम (मातृ मंदिर) बनत असताना गेलो होतो । जोरदार स्थान आहे ।
  • Log in or register to post comments
प
पद्मावति गुरुवार, 10/01/2015 - 20:41 नवीन
सुंदर लेख. फोटोही आणि वर्णन दोन्हीही फार छान आहे. योगी अरविंद क्रांतीकारी अरविंद घोष होते हे मला माहीत नव्हतं. नवीन माहिती कळली, धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 10/01/2015 - 21:01 नवीन
ऑफबीट भटकंती. आवडली.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ गुरुवार, 10/01/2015 - 21:17 नवीन
मस्त लेख. योगी अरविंद हेच क्रांतिवीर अरविंद घोष. त्यांनी नंतरच्या काळात स्वत:ला खूप च बदललं होतं. रोज आठ तास चालणं, आठ तास लिखाण असा काही वेगळा दिनक्रम होता. त्यांचं एक महाकाव्य (बहुतेक सावित्री) आहे. 15 ऑगस्ट ही बहुतेक जन्म तारीख. 1950 साली मृत्यु झाल्यानंतर योगाभ्यास भरपूर असल्यानं कदाचित पण त्यांचं पार्थिव तीन दिवस कुठल्याही बाह्योपचाराशिवाय विघटनाची सुरुवात किंवा दुर्गंधी न येता व्यवस्थित टिकलं होतं असं वाचलेलं आठवत आहे.
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Fri, 10/02/2015 - 08:15 नवीन
१५ ऑगस्ट १८७२ स्वातंत्र लढ्यात उडी घ्यायच्या आधी अरबिंदो हे सयाजीराव गायकवाड यांच्या सेवेत होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
च
चलत मुसाफिर Sun, 10/04/2015 - 12:02 नवीन
अरविंदो घोष हे बडोदा महाविद्यालयाचे (आता सयाजी विश्वविद्यालय) प्रिन्सिपल होते (मला वाटतं पहिलेच).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मित्रहो
म
मधुरा देशपांडे Fri, 10/02/2015 - 14:05 नवीन
वर्णन आणि फोटो आवडले.
  • Log in or register to post comments
श
श्रीनिवास टिळक Fri, 10/02/2015 - 15:29 नवीन
श्री. अरविंद घोष यांची कवी म्हणून ओळख आपल्याला जास्त नाही हे खरे. 'बाजी प्रभू' या शीर्षकाचे एक दीर्घकाव्य त्यांनी (इंग्रजीत) लिहिले त्यावरून त्यांना देशभक्त कवी असे काही म्हणतात. या काव्याची तोंडओळख पुढील दुव्यावरून होऊ शकेल http://bharatendu.com/2011/05/08/baji-prabhu-aurobindo/ …
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 10/03/2015 - 05:24 नवीन
लेखन आणि फोटो आवडले.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Once Again - 2011 :- Hang Massive
  • Log in or register to post comments
अ
अजया Sat, 10/03/2015 - 06:18 नवीन
'योगी' अरविंद पूर्वायुष्यातील क्रांतिकारक हा केवढा मोठा ट्विस्ट असेल त्यांच्या आयुष्यातला. लेख आवडला.पुडुचेरी बघायचंच आहे.
  • Log in or register to post comments
ज
जयन्त बा शिम्पि Sat, 10/03/2015 - 13:39 नवीन
लेखकाच्या मताशी सहमत. १९८३ साली त्या आश्रमाला भेट देता आली नव्हती याची फार फार रुख रुख वाटत होती. त्याबाबत आमची टूर आयोजित करणार्‍या मित्राला मी त्यावेळी खुप बोलुन घेतले होते , पण २०१४ च्या मे महिन्यात तेथे जाण्याचा योग आला , तेंव्हा फार निराशा झाली. त्या समाधीपुढे बसून काहीही साध्य होत नाही. पुन्हा कधीही जाण्याची इच्छा होणार नाही. इतरांना जाण्यापासून पराव्रुत्त करीन. तिरुपती बालाजी मंदिराबाबत असाच भ्रम निरास झाला होता
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Sat, 10/03/2015 - 16:56 नवीन
आश्रमाला भेट दिल्यानंतर निदान मला तरी अरविंदांविषयी जाणून घ्यायची जिज्ञासा झाली. तसे समाधीसमोर बसने सक्तीचे नाही. ध्सानसाधना, योग या गोष्टी काही इन्स्टंट कॉफी सारख्या दोन मिनिटात येत नाही. माझ्या माहीतीप्रमाणे काही वर्षे ध्सानसाधना केल्याशिवाय मातृमंदीराच्या आत ध्यान करता येत नाही. मी तरी म्हणेल फार अपेक्षा न ठेवता आश्रमाला जरुर भेट द्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयन्त बा शिम्पि
क
कपिलमुनी Tue, 10/06/2015 - 13:42 नवीन
समाधीपुढे बसून काहीही साध्य होत नाही
कुठल्याच ठिकाणी बसून काहीही साध्य होणार नाही , कारण तिथे स्थानमहात्म उपयोगी नाही. जे काही हवे आहे ते बाहेर मिळत नाही स्वतःमधे शोधावे लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयन्त बा शिम्पि
प
प्रदीप Sun, 10/04/2015 - 12:19 नवीन
अतिशय निरलसपणे लिहीलेला लेख व त्यावरील प्रतिसाद बरीच चांगली माहिती देऊन गेले. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ए
एस Mon, 10/05/2015 - 19:45 नवीन
लेख आवडला.
  • Log in or register to post comments
ब
ब़जरबट्टू Tue, 10/06/2015 - 12:37 नवीन
छान ओळख झाली.. धन्यवाद.. आतापर्यंत पाँडिचेरी येथे सर्वात स्वस्त दारू मिळते एव्हढेच ऐकले होते.. :)
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Tue, 10/06/2015 - 13:38 नवीन
आतापर्यंत पाँडिचेरी येथे सर्वात स्वस्त दारू मिळते एव्हढेच ऐकले होते
बरोबर आहे. केंद्रशासित प्रदेश आहे तो. भरपूर दुकाने आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब़जरबट्टू
स
सानिकास्वप्निल Tue, 10/06/2015 - 12:44 नवीन
पुडुचेरी बघायची इच्छा फार आहे. लेख आवडला.
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 10/06/2015 - 15:40 नवीन
खूप सुरेख लिहिलंय. फोटोही आवडले. पश्चिम किनारा सुंदर खरा, पण आता कुठेही संउद्रावर जायचे म्हणजे जत्रेत गेल्यासारखे वाटते. इथे अजिबात नीरव शांतता बघून खूप छान वाटले.
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Tue, 10/06/2015 - 17:36 नवीन
फक्त आश्रमात इतरत्र जत्राच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ज
जव्हेरगंज Tue, 10/06/2015 - 18:03 नवीन
धन्यवाद मित्रहो!
  • Log in or register to post comments
म
मित्रहो गुरुवार, 10/08/2015 - 06:40 नवीन
सुंदर प्रतिसादांबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि आभार. सुरवातीला मी हा लेख मी चेन्नईला उतरलो, टॅक्सी पकडली, रस्त्यात इडली खाल्ली या प्रकारे लिहिला. मला ते फारसे आवडले नाही. म्हणून मग अरविंद, ऑरोविली अशा क्रमाने लिहिला. यात मी केलेला प्रवास क्रमाक्रमाने येत नसल्याने आवडेल की नाही ही शंका होती. सांभाळून घेतल्याबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
स
सुजल गुरुवार, 10/08/2015 - 23:27 नवीन
लेख आवडला
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा