पाककृती

भरल्या मिरच्या.

Primary tabs

शाकाहारी जेवणाच्या थाळीत हवाच असा हा पदार्थ.अगदी कमी साहित्यात आणि वेळात होणारा,आणि म्हणूनच मला करायला,खायला आणि खिलवायला आवडणारा.फक्त या भावनगरी मिरच्या गावल्या की,झालं.बाकीचं साहित्य असतंच घरात.साध्या वरणभात किंवा आमतटीभातासोबत;भाजी असली,नसली;तरी या मिरच्या बहार आणतात.खरं नाही वाटत?करूनच पहा.

साहित्य:-

१. १०/१२ भावनगरी मिरच्या.
.

२. एका वाटी ओले खोबरे.
.

३. अर्धा चहाचा चमचा हळदपूड.
.

४. एक चहाचा चमचा भरून जिरे.
.

५. मीठ चवीनुसार.
.

६. एक पळी तेल.
.

कृती:-

१. मिरच्या धुवून पुसून त्यांना सुरीने एक चीर द्यावी.

२. ओले खोबरे ,हळदपूड,जिरे, मीठ शक्यतो पाणी न वापरता मिक्सरमधून वाटून घ्यावे.

३. हे वाटण मिरच्यांमध्ये दाबून भरावे.
.

४. पॅनमध्ये तेल घालून गरम झाल्यावर मिरच्या लावाव्यात.
.

५. आंच मंद करून एका बाजूने झाल्यावर परतून दुसऱ्या बाजूने होऊ द्याव्यात.जास्तीत जास्त ५ ते ७ मिनिटांत या छान खरपूस होतात.
.

रेवती

किती साधा सोपा पदार्थ आहे. मिरच्या अगदी ताज्या दिसतायत. फोटू आवडले.

मांत्रिक

वाळवलेल्या मिरच्या कशा करतात सांगू शकाल कृपया?

तर्राट जोकर

मंद आच ही एक मोठी शक्ती आहे--- ज्याला समजली त्याचा स्वयंपाक ग्रेट.....

एस

वा! ह्या मिरच्यांचे सारण अनेक पद्धतीने बनवतात. मी बेसनाचे व्हर्जन खाल्लेय. ओल्या खोबर्‍याचे सारण छानच असणार. सारणातही थोडेसे लाल तिखट, किंचित चिंचेचा कोळ व गूळ हे कॉम्बिनेशन मस्त लागते.

पियुशा

करायला अतिशय सोपी ! आम्ही तर कधी तेलात मिरच्या तळुन वरुन नुसत मिठ भुरभुरुन पण खातो.
मस्त प्रकार आहे
ब्यचलर्से लोक्स साठी अजुन एक ब्यचलर्से पाक्रु ;)

अहाहा!! मस्तं दिसतायेत मिरच्या.
आम्ही ह्यात वरच्या सारणासोबत थोडे डाळीचे पीठ घालून भरतो. आपल्या रोजच्या तिखटाच्या मिरच्यांमधे पण हे सारण भरुन छान लागतात, झणझणित.