"समुद्र" - अथांग नात्याचे नेटके सादरीकरण
भास्कर आणि नंदिनी हे विवाहीत जोडपं एका समुद्रकिनार्यावरील रीसॉर्टवर ट्रीपसाठी आलंय. दोघांच्या लग्नाला १० वर्षे उलटून गेली आहेत. एक मुलगा आहे, परंतु भास्करच्या आग्रहामुळे त्याला शिक्षणासाठी बोर्डींग मध्ये ठेवलंय.
भास्कर एक छोटी फॅक्टरी चालवितो. सांपत्तिक स्थिती चांगली आहे. नंदिनी गृहिणी आहे. मुलगा जवळ नसल्याने तिला एकटेपण डाचतंय. भास्कर टिपिकल कारखानदार वृत्तीचा. स्वतःची फॅक्टरी मनापासून चालविणे, व्यवसाय आणि उत्पादन वाढविणे यातच त्याचा बराचसा वेळ जातो. वृत्तीने फारसा रसिक नाही.
नंदिनी त्याच्या उलट. घरी रिकामी बसलेली. पण तिला लोकात मिसळायला आवडतं. जुनी मंदीरे, त्यांचा अभ्यास हा तिचा आवडता विषय. या विषयाची आवड असलेल्यांचा तिने एक ग्रुप जॉइन केलाय. तो ग्रुप अधूनमधून जुन्या मंदिरांना भेट देऊन तिथला अभ्यास करून आपली हौस भागवितो. तिला वाचनाची, पुस्तकांची देखील आवड आहे. अशा "बौद्धिक" विषयांवर तिला भास्कर बरोबर चर्चा करता येत नाही कारण तो सदैव कामात गढलेला आणि या विषयात फारसे गम्य नसलेला.
ते ट्रिपला बदल म्हणून आलेत. परंतु भास्करच्या मनात काहीतरी वेगळंच खदखदतंय. नंदिनीची तिच्या ग्रुपमधल्या गणेश राजोपाध्ये नावाच्या एका व्यक्तीशी जवळीक होत आहे असा त्याचा संशय बळावतोय. गणेशने एकदा तिचे हात धरलेले देखील त्याने पाहिले होते. त्या दोघात नक्की काय होतं या विचाराने तो अस्वस्थ आहे.
रीसॉर्टसमोर अथांग समुद्र पसरलेला आहे. त्याच्या सान्निध्यात त्याची खदखद उफाळून बाहेर येऊ पाहते. आमच्यात तसे काहीही नव्हते असे नंदिनी त्याला समजावू पहाते. गणेशची आता मद्रासला बदली झाली असून तो आता इथे नाही हेही ती सांगते. माझे मन त्याला समजत होते, त्याला जुनी मंदिरे या विषयाबद्दल सखोल माहिती होती, त्याच्याशी चर्चा करायला मला आवडायचे असे ती त्याला सांगते.
परंतु त्या दोघात फक्त "इतकेच" होते याबद्दल भास्कर साशंक असतो. तिला एकटे रहायला आवडते. आपण तिच्याशी "बौद्धिक" चर्चा करू शकत नसल्याने तिला आपल्याबरोबर रहायला फारसे आवडत नाही असे त्याचे मत होऊ लागले असते.
दोघात याच विषयावर सातत्याने बोलणे होत असताना ती अचानक गौप्यस्फोट करते. आपले गणेशशी काही वेळा "संबंध" आले होते याची ती कबुली देते.
हे ऐकल्यावर भास्करला धक्का बसतो. त्यांचे संबंध इतके पुढे गेले होते या कबुलीने तो अंतर्बाह्य हादरतो. आपल्यात शारीरिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या किंवा इतर कोणत्याही दृष्टीने कोणतीही कमतरता नसताना, नवरा व बाप म्हणून आपण सर्व कर्तव्ये व्यवस्थित पार पाडत असताना तिला गणेशचा मोह पडला या कबुलीने तो दु:खी होतो आणि संताप व अपमानाच्या भावनेने काही काळ हिंस्त्रही होतो.
नंदिनी मात्र झाल्या प्रकाराबद्दल अजिबात अपराधी वाटत नसते. जे झाले ते त्या ओघात होऊन गेले. भास्करमध्ये कोणत्याही दृष्टीने कोणतीही कमतरता नव्हती, तरीसुद्धा गणेशबरोबर आपला संबंध आला हे तिला अगदी सहज होऊन जाणारी गोष्ट वाटते. गणेशबद्दल आपल्याला कोणतेही शारीरीक आकर्षण असे नव्हते, तो आपल्याशी आपल्या आवडत्या विषयाबद्दल जे बोलायचा ते अगदी आपल्या मनातलेच असायचे, त्याच्याशी बोलून आपली बौद्धिक भूक भागत होती व त्याचे बोलणे आपल्याला आवडायचे व त्यातूनच त्याच्याशी आपला संबंध आला आणि हे अगदी न ठरविता सहज घडून गेले व त्यामुळे आपल्याला त्याबद्दल अपराधी वाटत नाही हे ती पुन्हा पुन्हा भास्करला सांगत रहाते. आपला नवरा म्हणून भास्कर आपल्याला अतिशय आवडतो, त्याच्यात काहीही कमी नाही पण तरीसुद्धा आपले गणेशशी संबंध आले हे अगदी स्वाभाविक घडावे तसेच घडले असे ती सांगत रहाते.
अंतर्बाह्य हादरलेल्या भास्करला आता पुढे काय करावे हेच कळत नाही. मी काहीच चूक केली नाही पण मग मला शिक्षा का करून घ्यायची, नंदिनीला शिक्षा द्यायची तर ती कशी द्यायची, मुळात तिला आपण अपराधी आहोत असे वाटतच नसल्याने शिक्षा देऊन तरी काय फायदा, तिच्यापासून वेगळे व्हावे का अजून काय करावे या प्रश्नांची उत्तरे तो शोधत रहातो.
विचार करत करत तो रात्रभर किनार्यावर बसून रहातो. समुद्राचा अथांगपणा, पृष्ठभागावरची खळबळ परंतु अंतरंगातील शांतता, असंख्य गोष्टी स्वत:च्या उदरात सामावून घेऊन सुद्धा स्वतःचे वेगळेपण हरवू न दिलेला समुद्र भास्करला वेगळाच विचार देऊन जातो.
मिलिंद बोकील हे मराठीतले एक ताकदवान कादंबरीकार आहेत. त्यांच्या "शाळा" या गाजलेल्या पुस्तकावर निघालेल्या चित्रपटानंतर "समुद्र" या दीर्घकथेवर आधारीत "समुद्र" हे नाटक खूप छान जमलेले आहे. चिन्मय मांडलेकरने स्वतःच या दीर्घकथेचे नाट्यरूपांतर केले आहे. नाट्यसंहिता अतिशय ताकदीने लिहिलेली आहे. या नाटकात दोनच पात्रे आहेत - भास्कर (चिन्मय मांडलेकर) आणि नंदिनी (स्पृहा जोशी). दोघांनी अतिशय उत्कृष्ट काम केले आहे. चिन्मय मात्र काही वेळा संवादफेकीत काहीसा लाऊड वाटतो. बरेचसे संवाद आठवून आठवून बोलल्यासारखा वाटतो. काहीवेळा ओव्हरअॅक्टिंगही वाटते. स्पृहा जोशीने मात्र संपूर्ण नाटकात उत्कृष्ट काम केले आहे. परंतु एकंदरीत दोघांनीही आपापल्या भूमिकेला पूर्ण न्याय देऊन एक उत्कृष्ट नाटक दिले आहे. नाटकाचे संगीत मात्र संहितेशी विसंगत व कर्कश्य वाटते.
हे नाटक खूपच छान जमलेले आहे. सर्वांनी एकदातरी नक्की बघावे.
सूचना - नाटक १२ वर्षांखालील मुलामुलींना बघायला परवानगी नाही. नाटकाच्या पूर्वार्धात काही बोल्ड प्रसंग आहेत. १२ वर्षांवरील मुलांबरोबर सुद्धा ते प्रसंग बघणे योग्य वाटणार नाही. केवळ पतिपत्नींनीच बघण्याचे हे नाटक आहे.
💬 प्रतिसाद
(58)
प
पद्मावति
Mon, 10/12/2015 - 22:17
नवीन
उत्तम परीक्षण.
बघावंसं वाटतंय हे नाटक. स्प्रुहा जोशी छान अभिनय करते आणि दिसतेही सुंदर.
- Log in or register to post comments
र
रेवती
Mon, 10/12/2015 - 22:44
नवीन
नाटकाची ओळख आवडली. बघण्याची सोय नसल्याने नाटक बघता येणार नाही.
- Log in or register to post comments
र
रातराणी
Mon, 10/12/2015 - 23:23
नवीन
परीक्षण आवडले.
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Mon, 10/12/2015 - 23:58
नवीन
मला वाटतं या नाटकाची समिक्षा मी कुठेतरी पाहिली / वाचली होती. आपण करुन दिलेली ओळख देखील आवडली !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जय अंबे जगदंबे... :- || कुलस्वामिनी अंबाबाई ||
- Log in or register to post comments
न
नेत्रेश
Tue, 10/13/2015 - 01:49
नवीन
http://www.misalpav.com/node/31208
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 10/13/2015 - 11:05
नवीन
हे आधीचे परीक्षण पूर्वी वाचल्याचं आठवतंय. तेव्हाच ठरवलं होतं की हे नाटक बघायचंच. शेवटी २ दिवसांपूर्वी योग आला.
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
गुरुवार, 10/15/2015 - 11:48
नवीन
मला वाटलं की मला देजावू होतंय.
- Log in or register to post comments
द
द-बाहुबली
Tue, 10/13/2015 - 10:50
नवीन
अथांग नेत्याचे नेटके सादरीकरण वाचुन धागा उघडला होता.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 10/13/2015 - 10:53
नवीन
अवांतर प्रतिसादः
गुड वन!
आत्ममग्नता वाढत चालली असावी असं खेदानं नमूद करावंसं वाटतं.
- Log in or register to post comments
ज
जे.पी.मॉर्गन
Tue, 10/13/2015 - 11:00
नवीन
अतुल कुलकर्णी आणि केतकी थत्ते करायचे ते नाटक हेच का? बर्याच वर्षांपूर्वी सुदर्शन रंगमंचला तिकिटं न मिळाल्याचं आठवतंय!
परीक्षण आवडलंच!
जे.पी.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 10/13/2015 - 11:06
नवीन
हेच ते नाटक का ते माहित नाही. परंतु हे नाटक सुदर्शन च्या परंपरेला साजेसं आहे हे नक्की.
- Log in or register to post comments
फ
फुलथ्रॉटल जिनियस
Tue, 10/13/2015 - 13:20
नवीन
हो, हेच ते नाटक .पुर्वी त्यात हे दोघे काम करायचे आता चिन्मय आणि स्पृहा करतात.
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Tue, 10/13/2015 - 14:16
नवीन
ते नाटक परेश मोकाशी यांनी लिहिलेले होते.
तेही सुरेखच होते. त्यातही फक्त दोनच कलाकार होते अतुल आणि केतकी. अतुल त्यात एका सी बी आय ऑफिसर असतो. गुढ रीतीने गायब झालेल्या शास्त्रज्ञाची आणि इतर ६ जणांच्या गुढ मृत्युची चौकशी करायला आलेला असतो.
ते केवळ ७० मिनिटांचे आणि मध्यंतर नसलेले नाटक होते.
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
य
याॅर्कर
Tue, 10/13/2015 - 11:20
नवीन
अवांतर -
पण त्या भास्करने बायकोच्या आवडीनिवडीनुसार बौद्धिक चर्चेत रूची घ्यावयाची होती.ही त्याची चूक
आणि काय ही त्याची बायको! नकळत स्वाभाविक संबंध आला म्हणजे? आणि वरून त्याबद्दल अपराधी वाटत नाही म्हणे.घोर कलियुग रे बाबा
(अर्थात नाटकामध्ये)
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Tue, 10/13/2015 - 11:52
नवीन
स्त्री करते ते नकळत संबंध...पुरुष करतो ते फायदा घेणे...असा साधा सरळ सोपा हिशोब असतो
- Log in or register to post comments
स
सच्चिदानंद
Tue, 10/13/2015 - 17:26
नवीन
या संदर्भात, अँटी-समुद्र चर्चा कशी असेल ते पहायला आवडेल. म्हणजे असं की नवरा सांगतोय की "नकळत स्वाभाविक संबंध आला", जसे की,
तर बायकोची काय प्रतिक्रिया, भुमिका असेल ?
(बादवे: "मी अल्बर्ट एलिस" ची आठवण येतेय इथे)
- Log in or register to post comments
क
कोमल
Tue, 10/13/2015 - 12:07
नवीन
परिक्षण आवडले. बघायला जाणार.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Tue, 10/13/2015 - 13:10
नवीन
मला मुळात "हे अगदी न ठरविता सहज घडून गेले" म्हणजे काय हेच कळत नाही... त्यामुळे तिला अपराधी न वाटणंच मला पटत नाही...
नाटक बघणार नाहीच बहुदा..
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 10/13/2015 - 14:47
नवीन
का बरं अपराधी वाटावं? उलट झालं ते नवर्यासमोर कबूल केलंय तिने, लपूनछपून केलेलं नाही. खरं बोलायला गट्स लागतात, त्या तिच्यात आहेत.
- Log in or register to post comments
स
सच्चिदानंद
Tue, 10/13/2015 - 17:20
नवीन
ह्म्म.. हे खूप गोंधळात टाकणारं आहे. म्हणजे असं की तिच्या लेखी ती गोष्ट गप्पा मारण्याइतकी सहज होती का ? मग संध्याकाळी घरी येऊन "आज पाव-भाजी खाल्ली" सांगितल्याप्रमाणे "आज मस्त सेक्स केलं" असं सागितलं का तिने त्याला ? त्याने उलट प्रश्न केल्यावरच सांगितलं ना ? हे गिल्ट फील तिच्या मनात कुठे तरी होतं का मग?
समजा तसा अपराधी भाव नव्हता आणि तिला हे त्याला सांगण्याइतकीही महत्वाची गोष्ट वाटत नाही, असे समजू. या बाबतीत "ते दोघेही एकाच पानावर आहेत का" हे तिने कधी खातरजमा करुन घेतलेय का? की शाकाहारी नवर्याने मांसाहारी बायको (अथवा उलट) सहज स्वीकारण्याइतके सहज हे स्वीकारले जावे (ते ही सहज नस्तंय तसं) असे तिनेच ठरवले स्वतः?
ही गोष्ट त्य दोघांची खाजगी ठरते म्हणजे त्यासंदर्भात जे काही होईल त्यावर त्या दोघांचीही सहमती अपेक्षित आहे असे मानतो. त्या दोघांच्यात त्याबद्दल सहमती असेल तर इतरांना नैतिक/अनैतिक वगैरे थोपण्याचा हक्क पोचत नाही हे मान्य परंतु त्यांच्या नात्यासंदर्भात जिथे त्या दोघांचा थेट संबंध येतो तिथे सहमती अपेक्षित आहे. हे मान्य नसेल तर त्या नात्यातून वेगळे व्हायची हिमत आणि अशा स्वातंत्र्याबरोबर येणार्या जबाबदार्या पेलण्याची कुवत देखील हवी.
असो, नाटक पाहिले अथवा वाचलेले नाही. चर्चांवरुन अंदाज करुन आणि उपरोक्त मुद्द्यास हा प्रतिसाद आहे.
किमान वाचायला पाहिजे (पहायला मिळेल तेव्हा मिळेल) असं वाटतंय.
- Log in or register to post comments
य
याॅर्कर
Tue, 10/13/2015 - 18:30
नवीन
कबूल केलं म्हणे, आणि त्यासाठी गट्स लागतात म्हणे?
--→काय कामाचे असले गट्स?शरीर संबंध म्हणजे पोरखेळ आहे काय?स्वतःच्या बाबतीत असं घडलं तर?
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Tue, 10/13/2015 - 18:38
नवीन
खिक्क...आता आसूड ओढला जाणार
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Wed, 10/14/2015 - 06:50
नवीन
अहो आधी लपुन छपुनच झालं ना..? की घरी आल्या आल्या "आणि हो... मी आज गणेश सोबत सेक्स केलं बरं का.. अचानकच ठरलं.. आधीपासुन काहीच प्लान नव्हता.. पण मजा आली.. पुन्हा कधीतरी ट्राय करायला हवं.." असं काही बोलणं झालं? नाही म्हणजे तेवढ्या कॅज्युअली "त्यात काय एवढं?" असा नायिकेचा सुर वाटतोय मला तरी..
हिंदी पिक्चरमध्ये घडतं तसं "आणि मग भावनेच्या भरात सगळंच घडलं...." असं प्रत्यक्षात होतं नसावं असा माझा तरी समज आहे. शरीरसंबंध ही गोष्ट तितकीही सहज घडत नाही. भारतीय समाजात तरी बहुतांशी प्रेम, लग्न आणि मग संबंध अशी रचना आहे. ज्यांनी पारंपारिक लग्नसंस्थेवर विश्वास ठेवुन लग्न केली आहेत त्यांनी आपल्या जोडीदारासोबत प्रामाणिक रहाणे अपेक्षित आहेच. आणि समजा काही कारणाने नाही झालं तसं तर किमान त्याबद्दल तरी अपराधीभाव असायला हवा ना? की आपण एका माणसाचा विश्वासघात केला.
ज्यांनी मुळातच स्वतःला अशा कोणत्याही बंधनात ठेवले नाही त्यांची गोष्ट वेगळी. पण लग्न केल्यानंतर तुमच्यावर ते नातं निभावण्याची जबाबदारी असतेच. तुम्हाला लग्नसंस्थेतल्या सर्व गोष्टी पटतीलच असं नाही म्हणत मी, पण जे तुम्हाला पटत नाही ते तुम्ही तुमच्या जोडीदारालाही स्पष्टपणे सांगायला पाहिजे. त्यामुळे एखाद्याला लग्ना बाहेरही संबंध ठेवावं वाटणं मी समजु शकते, पण जोडीदाराला अंधारात ठेवुन असे संबंध ठेवणं चुकच आहे. तिचा नवरा हा तिच्या आवडीच्या गोष्टींमध्ये रस घेत नाही हे तिच्या वागण्याचे समर्थन असु शकत नाही. त्याच्याही काही तक्रारी असतीलच. पण इथे चर्चा करुन मार्ग काढता येईल अशी परिस्थिती आहे.
मला तरी ती गट्स आहेत आणि म्हणुन बिनधास्त सांगत आहे असं अजिबात वाटत नाही. उलट नवरा विचारतो त्यानंतर सांगते आणि "त्यात काय एवढं?" असा पवित्रा घेऊन परिणामांना सामोरं जायलाही नकार देत आहे असं मला वाटतं.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 10/14/2015 - 06:54
नवीन
तुम्ही चक्क एका स्त्रीला चूक म्हणताय???? पुर्वीचं मिपा राहीले नाही आता =))
- Log in or register to post comments
द
द-बाहुबली
Fri, 10/16/2015 - 16:56
नवीन
< फास्टर फेणे मोड ऑन > टॉ़क्क...! </ फास्टर फेणे मोड ऑफ >
- Log in or register to post comments
स
सूड
Wed, 10/14/2015 - 11:48
नवीन
सहज घडलेलं कुठं लिहीलंय. मंदिरांच्या भेटी, त्यावरचा अभ्यास याबाबतीत त्यांच्या भेटी होत असतात की!! त्यादरम्यान दोघांच्याही मनात आकर्षण निर्माण होऊ शकतं.
डोळ्यांना ढळढळीत दिसत असताना लोक कबूल होत नाहीत हो, विचारल्यावर का होईना कबूली दिली हेही नसे थोडके. ती सरळ त्याच्यावर खापर फोडू शकत होती, नसते संशय घेतोय म्हणू शकत होती. पण झालं ते तिने स्पष्ट कबूल केलं.
हे मला जाणवलं नाही.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Wed, 10/14/2015 - 12:08
नवीन
-आकर्षण निर्माण होऊ शकतच. संबंध सुद्धा येऊ शकतो. पण कारण काहिही असलं तरी हे घडणं चुक आहे आणि त्याबद्दल अपराधीभाव हवाच. तुम्ही म्हणता तसं अनेकदा चर्चा होऊन वगैरे आकर्षण निर्माण झाले न मग हे घडले असे मान्य केले तरी त्याबद्दल नवर्याला अंधारात ठेवणे हे चुक आहे. शिवाय जर तिला हे चुक आहे असं वाटत नव्हतंच तर नवर्याला स्वतःहुन का सांगितले नाही?
-लोक कबुल होत नाहीत, मी किमान कबुल तरी केलं ह्याला गट्स म्हणतात असं मला वाटत नाही.
-अपराधीभाव नसणे.. मुळात काही चुकलय हेच मान्य न करणं म्हणजे परिणामांना सामोर जायला नकार देणं.. असं मला वाटतं.
- Log in or register to post comments
स
सूड
Wed, 10/14/2015 - 12:25
नवीन
पण कारण काहिही असलं तरी हे घडणं चुक आहे आणि त्याबद्दल अपराधीभाव हवाच. तुम्ही म्हणता तसं अनेकदा चर्चा होऊन वगैरे आकर्षण निर्माण झाले न मग हे घडले असे मान्य केले तरी त्याबद्दल नवर्याला अंधारात ठेवणे हे चुक आहे. शिवाय जर तिला हे चुक आहे असं वाटत नव्हतंच तर नवर्याला स्वतःहुन का सांगितले नाही?
तुमच्या दृष्टीने जे चूक आहे ते तिच्या दृष्टीने असलंच पाहिजे असं नाही. अपराधीभाव आपल्याला वाटतो म्हणून दुसर्याला पण वाटला'च' पाहिजे हे म्हणणं मला तरी चूक वाटतं. नवर्याला सांगितलं नाही त्याची बरीच कारणं असू शकतात. त्यातलं एक तर लेखातच आलं आहे, त्याला वेळ नसायचा.
तुम्हाला ते अयोग्य वाटतं म्हणून तुमच्या मताचा जितका आदर आहे, तितकाच तिला योग्य वाटतं या तिच्या मताचाही. आपल्याला अयोग्य वाटतं तेच दुसर्याला वाटायला हवं हे मला पटत नाही.
- Log in or register to post comments
स
सच्चिदानंद
Wed, 10/14/2015 - 12:49
नवीन
पिरा तै, जे आम्ही लिहिलंय तेच परत खाली लिहून आमचा प्रतिसाद ओव्हरराईड केलात कि वो तुम्ही (हे काय बरं नव्हं! ;) ). असो..
तरीही तुमच्याशी अंशतः सहमत पण "अपराधीपणाबाबत" आमचा हा मुद्दा आहे,
सूड भौ.. इथे आपल्याशी मतभेद आहेत असं वाटतं..
हे मान्य परंतु वरचे बेसिक प्रिन्सिपल गृहित धरुनच.
अन्यथा नवर्याला पानाच्या पिचकार्या हॉलचे फ्लोर डिजाईन म्हणून रोज रंगवायची कल्पना योग्य वाटत असेल तर बायकोने (जी त्याच घरात राहते) या "मताचा आदर" जरुर करावा परंतु नवरा खरंच फ्लोरवर सर्वत्र थुंकायचे ठरवत असेल तर तो त्या दोघांचा निर्णय हवा. कारण तेव्हा ती व्यक्तिगत बाब न राहता "दोघांची खाजगी बाब" ठरते.
उदाहरण रँडम आहे पण आशा आहे की मुद्द्याचा भावार्थ स्पष्ट होत असावा.
- Log in or register to post comments
स
सूड
Wed, 10/14/2015 - 13:10
नवीन
मला नक्की काय म्हणायचंय ते समजण्यासाठी प्रतिसाद पुन्हा एकदा वाचला तरी चालेल, तूर्तास तुम्ही 'मताचा आदर' वर घुटमळत असलेने शुभेच्छा!!
इत्यलम्!!
- Log in or register to post comments
स
सच्चिदानंद
Fri, 10/16/2015 - 17:15
नवीन
आम्हाला प्रतिसाद न वाचता आपलेच घोडे दामटायची सवय नाहीय. प्रतिसाद वाचूनच लिहिलेलं आहे.
हे तुमचं मत. तुम्ही आमचा पहिला प्रतिसाद वाचलाही नाहीत असंच दिसतंय तुमच्या या मतावरुन.
असो, तुम्हालाही शुभेच्छा..!
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 10/14/2015 - 12:51
नवीन
प्रचंड सहमत
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Wed, 10/14/2015 - 12:54
नवीन
ओके.. हे मान्य आहे की तो "च" चुकीच्या ठिकाणी पडलाय. तिच्या मताचा आदर आहे पण मला ते चुक वाटत इतकच. का ते वर लिहीलं आहेच.
बाकी सच्चि काकांना आवडणार नाही मी त्यांचा मुददा ओव्हरराईड केलेलं.. ;)
त्यामुळे बाकी मुद्दे काकां प्रमाणेच!
- Log in or register to post comments
स
सच्चिदानंद
Wed, 10/14/2015 - 12:57
नवीन
(अगदी आमच्या मनातलं ओळखून प्रतिसाद दिल्याप्रमाणे आलेला प्रतिसाद!)
परंतु पुन्हा एकदा आमचा कष्टपूर्वक टायपलेला प्रतिसाद ओव्हरराईड केल्याबद्दल पिरातैचा णिशेढ..!! :)
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Wed, 10/14/2015 - 13:00
नवीन
दादा, मी प्रतिसादच नको का देऊ? तसं तर तसं..
ओ सुड भाऊ.. आम्ही दोघं सेमच विचार करत असल्याने सच्चि काका जे म्हणतील त्याला मी इथुन पुढे "मम" म्हणत आहे असे समजावे..
खुश?
- Log in or register to post comments
फ
फुलथ्रॉटल जिनियस
Tue, 10/13/2015 - 13:17
नवीन
अलिबाबा आणी चाळीशीतले चोर, आणि आता हे समुद्र,गुरुजी तुम्ही फक्त स्त्री पुरुष संबंध ,विवाहबाह्य संबंध या अशा विषयावरचीच नाटकं पाहता का हो?
एनिवे, तुम्ही परीक्षण छान लिहीता.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 10/13/2015 - 16:31
नवीन
धन्यवाद!
मी अनेक विषयांवरची नाटके पाहतो. गेल्या वर्षभरात मोरूची मावशी, यू टर्न, त्या तिघांची गोष्ट, अ फेअर डील, गोष्ट तशी गंमतीची, वाडा चिरेबंदी इ. नाटके पाहिली.
'मोरूची मावशी'त फक्त भरत जाधव आणि भरत जाधवच आहे. इतर कलाकार साधारण होते. भरत जाधवमुळे नाटक आवडले. नाटकातील जुने संदर्भ आता हास्यास्पद वाटतात (उदा. ३० रूपयात १० जणांचे जेवण आणणे आणि त्या ३० रूपयांसाठी नोकराने हातातली अंगठी विकणे). नाटक या काळात सादर करताना संदर्भ काळानुसार बदलायला हवे होते.
'गोष्ट तशी गंमतीची' अजिबात आवडले नाही. कथेत फारसा जीव नव्हता. मंगेश कदम आणि शशांक केतकर अत्यंत कृत्रिम अभिनय करीत होते आणि अनेक वेळा ओव्हरअॅक्टिंग करीत होते. नाटक एकंदरीत कंटाळावाणे होते.
'अ फेअर डील' हे केवळ डॉ. विवेक बेळे हे नाव वाचून गेलो. परंतु पदरात निराशा पडली. हे अत्यंत संथ, कंटाळवाणे आणि फसलेले नाटक आहे. कथेत काही दम नाही. अजिबात आवडले नाही.
'वाडा चिरेबंदी' खूपच छान नाटक आहे. सशक्त कथा आहे. महेश एलकुंचवारांनी दमदार नाटक लिहिले आहे. परंतु भरत नाट्य मंदिरात हे नाटक बघण्याचा अनुभव सुखद नव्हता. यापुढे भरत नाट्य मंदीरात नाटक बघायचे नाही हा निश्चय केलेला आहे.
'यू टर्न' मध्यंतरानंतर बरेच कंटाळवाणे झाले. तसे नाटक बरे आहे पण बोअरिंग आहे.
'त्या तिघांची गोष्ट' हे डॉ. आनंद नाडकर्णींनी लिहिलेले खूपच छान नाटक आहे. कथा अतिशय दमदार आहे. नाटकाची भट्टी अतिशय व्यवस्थित जमून आली आहे. मानसशास्त्रज्ञाच्या नजरेतून आई, वडील व मुलगी यांचे भावविश्व व वेगवेगळे दृष्टीकोन समर्थपणे दाखविले आहेत.
परीक्षण लिहायचा कंटाळा आल्याने वरीलपैकी एकाही नाटकाचे परीक्षण लिहिले नव्हते.
- Log in or register to post comments
स
सच्चिदानंद
Tue, 10/13/2015 - 17:28
नवीन
नक्की काय झालं हो गुरुजी? हरकत नसेल तर सांगा इथे, म्हंजे इतरांना ही तसं ठरवता येईल.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 10/13/2015 - 20:08
नवीन
भरत नाट्य मंदीराचे वाईट अनुभव -
१) सदोष ध्वनीव्यवस्था. बराच वेळ संवाद नीट ऐकूच येत नव्हते. मागच्या रांगेतील लोकांनी आरडाओरडा केल्यावर आवाज वाढविला.
२) प्रेक्षागारातील निम्मे पंखे बंद होते व निम्मे फुल स्पीडवर सुरू होते. आमच्या डोक्यावर नेमका फुलस्पीडवाला पंखा आला होता व तो डोक्यापासून काही फूट अंतरावर असल्याने जोरदार वारा अंगावर येत होता. डोअरकीपरला सांगितल्यावर सुरवातीला त्याने दुर्लक्ष केले व नंतर सांगितले की पंख्याला रेग्युलेटर नसल्याने पंखा एकतर पूर्ण बंद होईल किंवा फुलस्पीडमध्ये चालेल. फुलस्पीडमध्ये चालणार्या पंख्याच्या आवाजाचा खूप व्यत्यय येत होता.
त्याव्यतिरिक्त नाटक २५ मिनिटे उशिरा सुरू होणे, मागील रांगेतील दोन म्हातार्या बायकांची अखंड बडबड या समस्या देखील होत्या.
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
Tue, 10/13/2015 - 15:14
नवीन
परीक्षण आवडले!
- Log in or register to post comments
न
नेत्रेश
Tue, 10/13/2015 - 17:54
नवीन
> आमच्यात तसे काहीही नव्हते असे नंदिनी त्याला समजावू पहाते.
'तसे' संबंध असताना 'काहीही नव्हते' असे नन्दीनी खोटे सांगते - म्हणजे आपण जे केले ते चुक आहे, भास्करला आवडणारे नाही याची तीला पुर्ण कल्पना आहे.
> गणेशची आता मद्रासला बदली झाली असून तो आता इथे नाही हेही ती सांगते.
म्हणजे गणेश जर अजुन इथे असता तर त्याच्याशी संबंध ठेवणे तीने चालु ठेवले असते का?
उद्या आणखी कोणाचे बोलणे आवडले तर नंदीनी त्याच्याशी सुद्धा संबंध ठेवेल का?
आणी असे संबंध भास्करने सहजपणे स्विकारावे असे तीला वाटते का?
या सर्व प्रश्णांची उत्तरे हे नाटक देत नाही, त्यामुळे मुळ आयडीच फ्लॉप झाल्यासारखी वाटते.
> गणेशबद्दल आपल्याला कोणतेही शारीरीक आकर्षण असे नव्हते, तो आपल्याशी आपल्या आवडत्या विषयाबद्दल जे बोलायचा ते अगदी आपल्या मनातलेच असायचे, त्याच्याशी बोलून आपली बौद्धिक भूक भागत होती व त्याचे बोलणे आपल्याला आवडायचे व त्यातूनच त्याच्याशी आपला संबंध आला आणि हे अगदी न ठरविता सहज घडून गेले व त्यामुळे आपल्याला त्याबद्दल अपराधी वाटत नाही हे ती पुन्हा पुन्हा भास्करला सांगत रहाते.
म्हणजे शाररीक आकर्षण नसताना कोणतीही अपराधाची भावना मनात न ठेवता परपुरुषा बरोबर ठेवलेले संबंध नवर्याने स्विकारावे असे तीचे म्हणने आहे का?
असे वर्तन करण्यात काहीही चुक नसल्यामुळे (नंदीनीच्या मते) ते कायम चालु ठेवण्यात तीला काही वावगे नाही असे तीला वाटते का?
आणी भास्करनेही त्याला वाटल्यास परस्त्रीशी असे संबंध ठेवावे (सहज पणे, शारारीक आकर्षण
न बाळगता, अपराधी न वाटुन घेता, वगैरे) असे तीचे मत आहे का?
- Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर
Tue, 10/13/2015 - 19:32
नवीन
प्रार्थमिकता आहे. इथे नायिका आधी नाही म्हणून नंतर थेट शारीरिक संबंधाची कबुली देते म्हणजे विषयात काहीही `अथांग' दिसले नाही. अशा विषयाचे `नेटके ' सादरीकरण काय म्हणजे नक्की काय असू शकेल?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 10/14/2015 - 19:36
नवीन
नेटके सादरीकरण म्हणजे कथा व्यवस्थित मांडली आहे. दोघांनीही आपापली भूमिका नीट समजून केली आहे. बायकोचे संबंध समजल्यानंतर भास्करचा आधी होणारा संताप आणि नंतरची तगमग चिन्मय मांडलेकरने व्यवस्थित सादर केली आहे. कथेत फारसे तत्वज्ञान सांगितलेले नाही. विषय वादग्रस्त असला तरी नाटकाची भट्टी व्यवस्थित जमली आहे.
मिलिंद बोकिलांच्याच 'शाळा' या सशक्त कादंबरीवरील चित्रपट बर्यापैकी फसला होता. त्या तुलनेत "समुद्र"चे नाट्य रूपांतर कादंबरीइतकेच सशक्त झाले आहे.
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
गुरुवार, 10/15/2015 - 13:31
नवीन
मुळ पुस्तकातील पात्रांची वयं आणि नाट्कातील पात्रांच्या वया मधे खुप फरक आहे असे वाट्ते.
- Log in or register to post comments
म
मित्रहो
Tue, 10/13/2015 - 20:23
नवीन
वाचल्याशिवाय लेखकाला नक्की काय व कसे सांगायचे ते कळनार नाही. वरवर बघता बौद्धिक जुळत म्हणून शरीर संबंध पटत नाही. कथा वाचल्यावरच नक्की काय ते कळेल. शेवटी समुद्र आहे त्याचा थांग असा सहजासहजी लागनार नाही.
- Log in or register to post comments
स
सौन्दर्य
Tue, 10/13/2015 - 20:38
नवीन
विचार करत करत तो रात्रभर किनार्यावर बसून रहातो. समुद्राचा अथांगपणा, पृष्ठभागावरची खळबळ परंतु अंतरंगातील शांतता, असंख्य गोष्टी स्वत:च्या उदरात सामावून घेऊन सुद्धा स्वतःचे वेगळेपण हरवू न दिलेला समुद्र भास्करला वेगळाच विचार देऊन जातो.
समुद्र शेवटी भास्करला कोणता वेगळाच विचार देऊन जातो ते उमगले नाही. की ते नाटकाचे सस्पेन्स आहे ?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 10/14/2015 - 14:51
नवीन
शेवट सांगितला तर नाटक बघण्यातील रस कमी होऊन मजा जाईल. म्हणून शेवट लिहिला नाही. तसेच नाटकाचा शेवट काही जणांना पटेल तर काही जणांना पटणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने नाटक बघून नंतरच आपले मत ठरवावे.
- Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१
Wed, 10/14/2015 - 10:07
नवीन
हे तर अतीच टाईप कास्टींग आहे. स्वताचे व्यवसाय करणारे काय रसिक नसतात?
का फक्त पैश्याचाच विचार करतात?
व्यवसाय यशस्वी करुन दाखवत असेल तर नक्कीच बर्यापैकी बुद्धीवान असणार, त्या बाईला त्याची बुद्धी का दिसू नये?
काहीतरीच.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 10/14/2015 - 14:30
नवीन
नाटकातल्या संवादातूनच हे स्पष्ट होते की भास्कर अत्यंत व्यस्त आहे व नंदिनीबरोबर बौद्धिक चर्चा करण्यामध्ये तो फारसा उत्सुक नाही व तिच्या आवडीच्या विषयांमध्ये त्याला फारसा रस नाही. तिचा एकाअर्थी बौद्धिक कोंडमारा होत आहे. त्यामुळेच ती बाहेर स्वत:चा एक ग्रुप तयार करते व आपली बौद्धिक भूक भागविण्याचा प्रयत्न करते.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Wed, 10/14/2015 - 14:34
नवीन
>>>> बौद्धिक भूक भागविण्याचा प्रयत्न करते
ब्वार्र
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »