WhatsApp आणि फालतू ढकलसंदेश
सध्या WhatsApp मुळे कैक जुन्या मित्र नातेवाईकांशी संपर्कात राहणे अतिशय सोपे झालेले आहे. पण ह्याचबरोबर तेथे प्रचंड ढकलनिरोप येत असतात जे बरेचदा मला अस्वस्थ करतात. बरं ते कोणाकडून येतात तर रूढार्थाने सुशिक्षीत लोकांकडून. जरा सारासार विचार केला तर या संदेशाताला फोलपणा उघड होतो पण जराही सारासार न विचार करता दे दणादण संदेश forward केले जातात.
अशाच काही संदेशांचा पर्दाफार्श करण्यासाठी हा धागा.
सुरुवात मीच करतो.
काही दिवसांपूर्वी मला आलेला हा संदेश.
लेख मोठा आहे.पण सर्वांनी वाचावेच असे काही..... अवश्य वाचाच !!! गोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली? (ले० श्री. मिलिंद शेटे, पूर्वप्रसिद्धी : सांस्कृतिक वार्तापत्र) गोहत्या बंदी हा लढा कोण्या हिन्दू साधूचा, rssचा, नाही. 'स्वदेशी आंदोलन' हे अत्यंत तर्कशुद्ध यशस्वी आंदोलन देशभर नेणाऱ्या कै.ड़ॉ राजिव दीक्षित यांचा हा यशस्वी न्यायालयीन लढा आहे. (एक मुसलमान कसाई महंमद कुरेशी ह्याच्या विरुद्ध डॉ. राजीव दीक्षित ह्यांनी गोहत्येच्या विरोधात सर्वौच्च न्यायालयातील जिंकलेल्या दाव्याची ही माहिती तुम्हाला उद्बोधक वाटेल. – प्रा० मनोहर राईलकर) आपल्या देशाच्या शेतीच्या दृष्टीनं, जमिनीचा कस सुधारण्याकरता, राष्ट्रीय इंधनाची बचत करण्याकरता, प्रदूषण कमी करण्याकरता, स्वस्त औषधांकरता, अशा विविध कामाकरता गोवधबंदी आवश्यक आहे. त्या मागणीचा हिंदु किंवा मुसलमान धर्मांशी काडीचाही संबंध नाही. पण, हिंदूंच्या गटाकडून आलेली मागणी म्हणजे ती जातीय तरी असणार, नाही तर अंधश्रद्धेवर आधारित असणार, नाही तर तिच्या मागं काही तरी छुपा राजकीय कार्यक्रम असणार, अशी आवई उठवायची. आणि उलटसुलट वेडीवाकडी चर्चा घडवून गोंधळ उत्पन्न करायचा अशी प्रथा गेली काही वर्षं आपल्या राजकारण्यांनी पाडली आहे. कोणाचं वाक्य आहे, मला आठवत नाही. पण, बहुधा नेपोलियनचं असावं. If you can’t convince, confuse. लोकांना पटवून देता येत नसेल तर त्यांच्या मनात विचारांचा गोंधळ उडवून द्या. मला त्यातल्या राजकारणाशी काडीचंही कर्तव्य नाही. पण, डॉ. राजीव दीक्षित यांच्यासारख्या एका अभियंत्यांनी तो कसा आणि कोणत्या आधारांवर लढवून अंती जिंकला, हे आपल्याला माहीत झालं तर बरीच अज्ञात किंवा दडवून ठेवलेली वस्तुस्थिती तुम्हालाही कळेल असं मात्र, निश्चितपणं वाटलं. हा लेख प्रथम गाय और गाँवच्या नोव्हेंबर २००३ च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. कै.श्री. राजीव दीक्षित इलेक्ट्रॉनिक्स, दूरसंचार (Telecommunication), आणि उपग्रहसंचार (Satellite communication), अशा तीन विषयांतील अभियंता होते. यू-ट्यूबवर त्यांची विविध भाषणं ऐकता येतील. त्यांनी प्रस्तुत दावा कसा जिंकला हे समजून घेणं बोधप्रद ठरेल. काही प्राथमिक माहिती: ज्यांना गाय कापण्याचा परवाना आहे, असे भारतात ३,६०० कत्तलखाने आहेत. त्यापलीकडे आणखी ३६,००० कत्तलखाने अवैधरीत्या चालवले जात असतात. (हे आकडे जुने आहे. यांत आता बरीच वाढ झाली आहे.) ह्या सर्वांतून प्रतिवर्षी सरासरीने अडीच कोटी गाईंची कत्तल केली जाते. ते सहन न झाल्याने दीक्षित व त्यांच्या समविचारी सहकाऱ्यांनी १९९८मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. वर्धा येथील अखिल भारतीय गोसेवक संघ व अहिंसा आर्मी ट्रस्ट ह्या संस्थांनी हा दावा दाखल केला होता. नंतर त्यात गुजरात सरकारही सहभागी झाले. १-२ न्यायाधीशांसमोर चालवण्याइतका प्रस्तुत प्रश्न किरकोळ अथवा सामान्य नसल्यामुळे तो खंडपीठासमोर चालवावा असा दीक्षितांचा आग्रह होता. त्याला तीनचार वर्षे न्यायालयाने मान्यता दिली नव्हती. आणि नंतर मान्यता दिली. आणि सरन्यायाधीश आर. सी. लाहोटी ह्यांच्या अध्यक्षतेखाली सात न्यायाधीशांचे घटनापीठ(कॉन्स्टिट्यूशनल) बनवण्यात आले. कसायांच्या बाजूने दावा लढवण्याकरता लक्षावधींचं शुल्क घेणारे नामवंत अधिवक्ते उभे होते., सोली सोराबजी २० लक्ष, कपिल सिब्बल २२ लक्ष, महेश जेठमलानी (राम जेठमलानींचे पुत्र) ३२ ते ३४ लक्ष. हे कसायांच्या बाजूने उभे होते. राजीव दीक्षितांच्या बाजूने दावा लढवण्याकरता एकही मोठा अधिवक्ता नव्हता. कारण त्यांचे शुल्क देण्याइतका पैसा त्यांच्याकडे नव्हता. दीक्षितांनी न्यायाधीशांना विचारले, “आमच्याकडे कोणीही अधिवक्ता नाही, आम्ही काय करावे ते सांगावे.” न्यायाधीशांनी विचारले, “आम्ही आपल्याला अधिवक्ता पुरवला तर?” दीक्षित म्हणाले, “मोठेच उपकार होतील.” त्याप्रमाणे न्यायालयाने मान्यता दिली आणि दाव्याला सुरुवात झाली. गाय कापण्याबद्दल कसायांनी जे प्रतिपादन केले ते सर्व विचार पूर्वी शरद पवारांनीही मांडले होते. ते काही विद्याविभूषितांद्वारे आणि पं. नेहरूंद्वारेही सांगण्यात आले होते. कसायांचे दावे (१) गाय जेव्हा म्हातारी होते, तेव्हा तिला जिवंत ठेवण्यात काही लाभ नसतो. तिला कापून विकणे हे सर्वांत उत्तम. त्यातून आम्ही भारताची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्याला सहकार्यच करतो. कारण. आम्ही गोमांस निर्यात करतो. (२) भारतात चाऱ्याची कमतरता आहे. त्यामुळे त्यांना मारून विकणे हेच सर्वांत लाभदायक होय. (३) भारतात लोकांना राहायला जागा नाही. तर गायींना कुठे ठेवणार? (४) गायींमुळं परकीय चलनही मिळते. (५) कसायांनी केलेला सर्वांत भयानक दावा असा होता, “गायीची हत्या करावी, असे आमच्या इस्लाम धर्मात सांगितले आहे.” दीक्षितांनी शांतपणे, धैर्याने व अत्यंत तर्कशुद्ध रीतीने त्यांचे दावे कसे खोडून काढले, ते जाणून घ्यावे. आपण आर्थिक दृष्टीनं विचार करीत आहोत. तेव्हा शक्य असल्यास मधून मधून काही टिपणं केली तर तुम्हाला नेमकी कल्पना येईल. त्यांचा पहिला दावा होता गायीचे मांस विकल्यावर पैसे मिळतात. दीक्षितांनी सर्व आकडेवारी 7न्यायालयापुढं ठेवली. एका सुदृढ गायीचे वजन तीनसाडेतीन क्विंटल असते. पण, ती कापल्यावर केवळ ७० किलोच मांस मिळते. एक किलो गोमांस जेव्हा निर्यात होते, तेव्हा रु. ५० मिळतात. म्हणजे रु. ३,५००. रक्त २५ लीटर, त्याचे १,५०० ते २,००० आणि हाडांचे १,००० ते १,२०० रुपये मिळतात.म्हणजे गाय मारून तिचे मांस, रक्त आणि हाडे विकून हत्या करणाऱ्या कसायाला अधिकतम केवळ ७,००० रुपयेच मिळतील. (आणि हे आकडे सुदृढ गायींच्या संबंधातले आहेत. म्हाताऱ्या गायींपासून इतकं उत्पन्न मिळत नाही.) पण, तिला जिवंत ठेवलं तर किती रुपये मिळतील? आता त्याची आकडेवारी पाहा…. एक गाय दिवसाला १० किलो शेण व ३ लीटर गोमूत्र देते. १ किलो शेणापासून ३३ किलो खत होते. त्याला सेंद्रिय खत म्हणतात. न्यायाधीशांना आश्चर्याने विचारले, “हे कसे शक्य आहे?” त्यावर दीक्षित म्हणाले, “आम्हाला वेळ द्या आणि जागा द्या. आम्ही हे सिद्ध करून दाखवतो.” न्यायालयाने अनुमती दिल्यावर दीक्षितांनी आपलं म्हणणं सिद्ध करून दाखवलं. ते न्यायाधीशांना म्हणाले, “आता आय.आर.सी. च्या संशोधकांना पाचारण करून शेणाचं परीक्षण करून घ्या.” जेव्हा शेण संशोधनाकरता पाठवले, तेव्हा संशोधकांनी सांगितले, “ह्यात १८ प्रकारची पोषक सूक्ष्मतत्त्वे (micronutrients) आहेत. त्या सर्वांचीच सर्व शेतजमिनींना अत्यंत आवश्यकता असते. उदा. मँगनीज, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, आयर्न, कोबाल्ट, सिलिकॉन, इत्यादी.” ह्याउलट रासायनिक खतांत केवळ तीनच पोषक तत्त्वे असू शकतात. याचा अर्थ शेणखत रासायनिक खताच्या सहापट शक्तिशाली आहे. न्यायालयाने ते मान्य केले. दीक्षित म्हणाले, “माझे वडील आणि दोघे भाऊ शेतकरी आहेत. १५ वर्षांपासून आम्ही गायीच्या शेणापासून खत करून शेती करतो. १ किलो शेणापासून ३३ किलो खत बनते. रोजच्या १० किलो शेणापासून ३३० किलो. (म्हणजे महिन्याचे १ टन) आणि ६ रुपये किलोप्रमाणे १८०० ते १९०० रुपयांचे खत प्रतिदिन मिळेल. म्हणजे वर्षाचे रु. ७०,०००च्या वर झाले. गायीचे आयुष्य २० वर्षांचे मानले तर एक गाय आयुष्यात एक कोटी ४० लक्षांच्यावर उत्पन्न देते. विशेष म्हणजे ती मृत्यूपर्यंत, अगदी शेवटच्या दिवसापर्यंत शेण देत राहते.” सहस्रो वर्षांपूर्वी आपल्या शास्त्रांत लिहून ठेवले आहे की गायीच्या शेणात लक्ष्मी आहे. आधुनिक शिक्षण घेतलेल्या मेकॉलेच्या मानसपुत्रांनी ह्या गोष्टीची टवाळी केली. त्यांना धर्म, संस्कृती, सभ्यता सर्व थोतांड वाटते. पण गायीच्या शेणात लक्ष्मी असते, हे तर वरच्या आकडेमोडीनं सिद्धच झाले आहे. त्याच्या उपयोगानं धान्य निर्माण होते. संपूर्ण भारताचे पोट त्यातून भरते. आता गोमूत्राचा विचार करू. दिवसाला दोन ते तीन लीटर गोमूत्र मिळते. गोमूत्रापासून ४८ प्रकारच्या रोगांवर औषध बनते. एक लीटर गोमूत्र औषध रूपात विकले तर त्याची किंमत रु. ५०० होते. भारतीय बाजारपेठेत, आंतरराष्ट्रीय बाजारात ह्यापेक्षा अधिक भाव मिळतो. अमेरिका भारतातून गोमूत्र आयात करते आणि त्यापासून मधुमेहावर औषध बनवते. अमेरिकेत गोमूत्राची तीन पेटंटे आहेत. अमेरिकन बाजारपेठेच्या हिशेबाने आकडेमोड केली तर त्याचा दर लीटरला डॉ. १२००, ते १३०० आहे. याचा अर्थ एका गायीपासून प्रतिवर्षी ११,००.००० (११ लक्ष) रुपये मिळतात. म्हणजे २० वर्षांच्या आयुष्यात २,२०,००,००० (दोन कोटी वीस लक्ष रुपये) झाले. पुन्हा गायीच्या शेणापासून मिथेन गॅस बनतो. आपल्या घरगुती सिलिंडरांत तोच असतो. आणि जशी एलपीजीवर चारचाकी गाडी चालू शकते, तशी ह्या गॅसवरही चालू शकते. न्यायाधीशांचा त्यावर विश्वास बसला नाही. तेव्हा दीक्षित म्हणाले, “आपल्या गाडीला आम्ही शेणापासून बनवलेल्या मिथेनचा सिलिंडर बसवून देतो. आपण गाडी चालवूनच पाहा ना.” त्यांनी मान्यता दिली. आणि तीन महिने गाडी चालवली. आणि म्हणाले, एक्सलंट. कारण, त्यांना प्रतिकिलोमीटर केवळ ५० ते ६० पैसे इतकाच खर्च पडला. आणि डिझेलला प्रति किलोमीटर ४ रुपये खर्च (म्हणजे सातपट) येतो. आणखी, मिथेनवर चालणाऱ्या गाडीचा धूर नाही, वातावरणात शिसे पसरत नाही, आवाजही कमी होतो. ह्या सगळ्याच बाबी न्यायाधीशमहाराजांच्या लक्षात आल्या. मग दीक्षित म्हणाले, “प्रतिदिन १० किलो शेणापासून २० वर्षांत किती गॅस मिळेल?” भारतात १७ कोटी गाई आहेत. त्यांचे शेण एकत्र केले तर देशाची १लाख ३२ सहस्र कोटींची बचत होईल. आणि थेंबभरसुद्धा, डिझेल किंवा पेट्रोल आयात केल्याविना देशाची संपूर्ण वाहतूक होऊ शकेल. तीही सातव्या हिश्श्यानं स्वस्त. अरब देशांसमोर हात पसरायची आवश्यकताच राहणार नाही, की अमेरिकी डॉलर देऊन पेट्रोल विकत घ्यावं लागणार नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाचं मूल्य वाढेल.धर्म आणि श्रद्धा बाबतचा मुद्दा बाजूला ठेवू. सर्वात पहिले ही कोर्टकेस खरी होती की नाही. कोणाच्याही नावावर काहीही खपवायचे. पण खरी होती असे मानून चालू.
- ह्या म्हाताऱ्या गायींना खायला देणे व इतर देखभालीच्या खर्चाचे काय?
- हाच पैसा तरण्या गायीना पोसण्यासाठी वापरला तर त्याही शेण आणि गोमुत्र पैदा करतीलच की. शेणाबरोबरच बाकीचेही फायदे देत असतील (दूध वगैरे) तर त्यांना पोसणे जास्ती फायद्याचे नाही का?
- जर एवढा पैसा फक्त शेणखतातून मिळत असेल तर मग शेतकरी इतके गरीब लोक कसे? शेतकरी नुसते शेण विकूनच आरामात बसून खातील की. आत्महत्या कशाला करतील?
- कोणतीही पेट्रोल वर चालणारी गाडी मिथेन वर चालवणे सहज शक्य नाही. त्यासाठी जे conversion kit लागेल त्याचा खर्च ह्यात धरलेला नाही. तसेच मिथेन refilling stations कुठे आहेत? तेथपर्यंत हा मिथेन gas नेणार कसा. त्याला लागणारे infrastructure उभारण्यासाठीच्या खर्चाचे काय? त्यामुळे देशाची पेट्रोल डिझेल ची गरज संपेल वगैरे हास्यास्पद दावे आहेत.
- म्हाताऱ्या गायीला पोसणे आणि शेण आणि गोमुत्रापासून उत्पन्न मिळवणे
- दुभत्या गायीला पोसणे आणि शेण गोमुत्राबरोबरच दूधही मिळवणे
तुम्ही कोणता स्वीकाराल? दुभती गाय ठेवणे अधिक फायद्याचे नाही का? पाळीव प्राणी माया लावतात वगैरे अगदी खरी गोष्ट आहे आणि वर रेवती आज्जीने म्हटल्याप्रमाणे आमच्याकडे २ भू भू आहेत त्यामुळे तो मुद्दा १००% मान्य. पण गाय पाळीव प्राणी category मध्ये मोडत नाही तर तिला उपयुक्त पशू म्हणून पाळतात असे मला वाटते. असो बाकी चर्चा खवत करू :).