मी हिंदू आहे म्हणजे नक्की काय आणि कोण आहे? आपल्या हिंदू धर्माचे मुख्य प्रतिनिधी नक्की कोण?
मी हिंदू आहे म्हणजे नक्की काय आणि कोण आहे? आपल्या हिंदू धर्माचे मुख्य प्रतिनिधी नक्की कोण?
इतर धर्मातील (उदा. बौद्ध, जैन, ख्रिस्ती, मुस्लीम, शीख, बहाई, पारशी) लोकांना त्यांच्या धर्माशी संबंधीत वरील प्रश्नाचे उत्तर देण्यात फार अडचण यायला नको. किंबहुना काही धर्मात थोडीफार तशी परिस्थिती असली तरी त्याचा येथे संबंध लावायला नको.
हिंदूंना मात्र लहानपणापासून याबाबतीत स्पष्ट मार्गदर्शन केले जात नाही. मी आतापर्यंत अनेकांना याबाबत विचारलेले आहे. त्यात १) काय फरक पडतो, २) मी द्वैतवाद वा अद्वैतवाद मानतो, ३) मी भगवद्गीता या ग्रंथाचा पूजक, ४) फार तर भगवद्गीतेबरोबर रामायण हाही माझा धर्मग्रंथ, ५) या भूमीत रुजलेला आणि वाढलेला सनातन धर्म, ६) हिंदू धर्माची व्याख्या करता येत नाही यातच त्याचे महानपण-वेगळेपण वगैरे आहे, ७) मी सर्वांना समान मानतो, ८) हिंदुत्व हा धर्म नसून ती एक जीवनशैली आहे अशी विविध उत्तरे मिळतात. अशा मोघम उत्तरांमुळे कोणाही जिज्ञासू व्यक्तीचे समाधान होणे शक्य नाही. उलट असे प्रश्न विचारून धार्मिक बाबतीतील तज्ज्ञ म्हणवणा-या सदर व्यक्ती त्यांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारले म्हणून नंतर फटकून वागतात किंवा भेटायचे टाळतात.
अशा परिस्थितीत येणा-या पिढ्यांना हिंदुत्वाबद्दल अनास्था वाटेल अशी परिस्थिती निर्माण होईल असे वाटत नाही का?
वरील मांडणीत जातीव्यवस्थेला (ज्याचे चातुर्वर्ण्य हे गोंडस नाव आजही वापरले जाते आणि क्वचित त्याचे समर्थनही केले जाते) कोठे स्थान आहे याचा सहसा कोणालाच पत्ता लागत नाही. सर्व शंकराचार्यांनी मिळून चातुर्वर्ण्य पद्धत मोडीत काढलेली आहे हे मात्र मधूनमधून ऐकू येते.
पुढचा प्रश्न: हिंदू धर्माचे प्रतिनिधी नक्की कोण?
शंकराचार्य म्हणावेत तर अतिशय कर्मठ अशी त्यांची प्रतिमा, सामान्य जनतेशी संपर्क शून्य, त्यातही अनेक पीठे आणि श्रेष्ठत्वावरून त्यांच्यामध्येच मधूनमधून होणारे वाद. हे प्रतिनिधी हिंदू समाजातील कोणत्या घटकांचे प्रतिनिधित्व करतात? त्यांच्यात दलित समाजाचे प्रतिनिधित्व करणारा एक जण तरी आहे का? की आरक्षण लागू नसल्यामुळे तेथेही फक्त उच्चवर्णीयांचे वर्चस्व आहे? आणि त्यामुळे समाजातील हे अनेक मोठे घटक या धर्मात सामावलेलेच नाही?
कोणाला प्रश्न पडेल निश्चितपणे कोण प्रतिनिधी आहे हे सामान्य हिंदू व्यक्तीला माहीत नसले तर काय फरक पडतो? तर फरक पडतो. हे आजवर कोणाच्या लक्षात आले नाही का? की विविध कारणांनी ‘जैसे थे’ परिस्थिती लादली गेली? जातीपातीमुळे संपूर्ण हिंदू समाज मुळात यांचे प्रतिनिधित्व नाकारतो हे कारण आहे का? धर्माचा इतक्या सहस्त्रकांचा डोलारा केवळ त्याच्या जडत्वामुळे (inertia) चालू आहे का अशी शंका यामुळे वाटते.
फरक का पडतो?
१) प्रतिनिधित्वाची भूमिका स्पष्ट नसल्यामुळे विविध बाबा-बुवा-महाराज यांचे फावते. प्रसंगी ते विविध अवतार अहेत म्हणून कमकुवत मनाच्या लोकांना आपल्या कच्छपी लावतात. हा प्रकार कल्पनेच्याही बाहेर बोकाळलेला आहे.
२) हिंदू धर्मात अनेक पंथ असल्यामुळे विस्कळीतपणा आणखी वाढतो. लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे. तर आम्हाला हिंदू धर्मातून वगळा ही या समाजातील काहींची मागणी मधूनमधून वृत्तपत्रात दिसते.
३) शीख, बौद्ध धर्मीय हेदेखील हिंदूधर्मीयच आहेत असे हिंदू त्या धर्मांच्या पोटच्या जिव्हाळ्यामुळे म्हणतात. परंतु या धर्मांची याबाबतची प्रत्यक्ष भूमिका वेगळी असते.
४) तेहेतीस कोटी देव ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे असे अनेकदा ऐकतो. कित्येकदा कृष्णाच्या राधा वा गोपींबरोबरच्या शृंगाराचे वर्णन तिखटमीठ लावून सांगितले जाते तर तसे काही नव्हतेच असेही म्हटले जाते. कोणतीच सुसुत्रता नसल्यामुळे धर्म बदनाम होतो, चुकीच्या संकल्पना बोकाळतात.
५) हिंदूह्रदयसम्राट अथवा हिंदू या शब्दाचा समावेश असलेली तत्सम बिरूदे लावून घेऊन काही स्वयंघोषित नेते लोकांचा मानसिक गोंधळ वाढवतात. त्यांचे वा त्याच्या संघटनेचे अनेकदा होत असलेले धर्मविरोधी, झुंडशाहीचे आणि गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन पाहून हाच तो हिंदू धर्म का असा काहींचा समज होतो आणि हिंदू धर्माची त्यामुळे बदनामी होते. त्यात काही राजकीय लोकदेखील सामील असल्यामुळे अर्थातच राजकीय कारणांसाठी त्याचा वापर केला जातो.
६) राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या प्रमुख संघटना हिंदूंच्या हिताचे रक्षण करण्याचा दावा करतात. परंतु ती काही धार्मिक संघटना नाही. त्यामुळे त्यांना मोठाच राजकीय विरोध होत असल्यामुळे धर्माच्या पातळीवर हिंदू समाज विभागला जातो. विभिन्न राजकीय विचारसारणी असण्यात काहीच गैर नाही, परंतु त्यामुळे एकाच धर्मातील लोकांचे धृवीकरण होणे योग्य नाही, किंबहुना धर्मासाठी ते धोक्याचे आहे.
७) भगव्या रंगाचा ध्वज वापरून काही राजकीय संघटना/पक्ष लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. भगव्या रंगाचे कपडे घातलेले काही जण वारंवार वादग्रस्त विधाने करतात, त्यामुळे देशातील धार्मिक तेढ वाढते आणि देशाची प्रगती खुंटते.हे लोक खरोखरच हिंदूंचे प्रतिनिधित्व करतात का हे त्यामुळे शोधणे आवश्यक आहे.
८) अगदी अलीकडेच चालू झालेल्या गुढी उभारण्याच्या पद्धतीला धार्मिक स्वरूप देऊन त्याचेही शास्त्र निर्माण करण्यात येते आणि त्यामुळे भोंदूपणा वाढतो. अशा कितीतरी गोष्टी दाखवता येतील.
९) हिंदू धर्मियांमध्येच एकमेकांचा जातीय आणि जातीच्या आधारावरील तुच्छतेने सतत केला जाणारा उल्लेख एके दिवशी कोणते रूद्र रूप धारण करेल याचा नेम नाही. याबाबतील कितीही कायदे केले तरी धार्मिक आणि सामाजिक पातळीवर लोकांची मानसिकता बदलेपर्यंत हा बदल होणे शक्यच नाही. हा धोका असताना दुसरीकडे मात्र धार्मिक पातळीवर याची जबाबदारी कोण घेणार हेच निश्चित करता येत नाही.
१०) कोणतीच सुसुत्रता नसलयामुळे आपापल्या जातीपुरत्या संघटना निर्माण केल्या जाऊन धर्म सोयिस्करपणे वा-यावर सोडला जातो. यात जातीय कट्टरपणा वाढीला लागतो हे वेगळे सांगायची गरज नाही.
११) मी वर उल्लेख केल्याप्रमाणे समाजातील विविध घटकांना या प्रतिनिधींमध्ये समाविष्ट केलेच गेलेले नसेल तर आगामी काळात धर्मालाच त्यापासून मोठा धोका निर्माण होऊ शकेल.
१२) कोणी हिंदू धर्मातील प्रथांना विरोध करायला गेले तर ते काय सांगतात – का सांगतात, याकडे लक्ष देण्याऐवजी त्यांना इतर धर्मातील विसंगती दाखवण्याची त्यांची हिंमत आहे का असे म्हणून त्यांच्या भुमिकेवर धर्मविरोधी असा ठप्पा मारण्यात येतो. धार्मिक पातळीवर या गोष्टींचा योग्य त्या प्रतिनिधीकडून या बाबतीत काही निर्णय घेता आले तर कितीतरी गोष्टी संघर्षाच्या थराला जाणारच नाहीत. यामुळे समाजातील सौहार्द्रता वाढेल हे सांगायची गरज नाही.
१३) धर्माच्या प्रतिनिधित्वाबाबत काहीत निश्चित नसल्यामुळे विविध जातींमधील विविध पातळीवरील राजकीय नेतेच या जातींचे प्रतिनिधित्व करत असल्याचे दाखवून त्यावर आपली राजकीय पोळी भाजून घेतात. अलीकडे जातींच्या आधारावर मागितली जाणारी आरछणे त्यांपैकीच एक. धर्माच्या प्रतिनिधित्वाची संकल्पना निश्चित झाली तर अशा संधीसाधूंना आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे सतत गढूळ होणा-या सामाजिक वातावणाला पायबंद बसेल.
१४) आज देशातील मोठी लोकसंख्या धार्मिक जाणीवेच्या बाबतीत खरे तर निद्रिस्त आहे. मग ते सुशिक्षित वा अशिक्षित असोत वा गरीब असो. कारण रोजच्या जीवनसंघर्षातून त्यांना या गोष्टींचा विचार करायला वेळ नाही. पण यातील काही टक्के लोक तरी या गोष्टींचा डोळसपणे विचार करू लागले तर मोठी कठीण परिस्थिती उद्भवेल.
आणखी शोधल्यास अशी अनेक कारणे आढळतील.
असे झाले तर धर्माचे प्रतिनिधी एक प्रकारचा माफिया निर्माण करतील अथवा आचार-विचार स्वातंत्र्यावर गदा येईल असा समज करून घेण्याचे कारण नाही, कारण देशाची घटना, कायदे यांना यापासून धोका पोहोचणारच नाही.
कोणाला या बाबी गांभिर्याने घेणे गरजेचे आहे असे वाटत असेल तर त्यांनी यात जरूर भाग घ्यावा. फक्त त्यात जातीय/धार्मिक आवेश नको. कारण त्यामुळे चांगली चर्चा होऊ शकणार नाही आणि त्याला भलतेच वळण लागेल. शिवाय ज्यांना यातली तळमळ दिसते त्यांनी त्यांच्या परीने विविध पातळींवर या विषय न्यायलादेखील माझी काहीच हरकत नाही.
मला याची निकड वाटते. कारण या घडीला मी हिंदू आहे म्हणजे नक्की कोण व काय आहे हे मला सांगता येत नाही. कारण या बाबतीतली स्पष्टताच नाही. मग मी मला हिंदू का म्हणवून घ्यावे? एकविसाव्या शतकात याबाबतीत मोघमपणा परवडणार नाही. कारण वर उल्लेख केलेले धर्माच्या व देशाच्या एकतेला, सामाजिक सौहार्द्रतेला याबाबतच्या अनिश्चिततेमुळे त्यामुळे निर्माण होऊ शकणारे धोके. होऊ शकणारे काय, ते तर आपण रोजच पाहत आहोत.
ही पोस्ट चकाट्या पिटणा-यांसाठी नाही. तशी सवय असणा-यांच्या कमेंट्ना उत्तर देण्याची तसदी घेतली जाणार नाही. गांभिर्याने चर्चा करण्याची इच्छा असलेल्यांचे स्वागत व आगाऊ धन्यवाद.
मी खरोखरच प्रथमच आलो आहे. तुम्हीदेखिल थोटेफार रॅगिंग केलेतच. ते मोदकही तसे करताहेत की काय असा मला संशय आहे.ओके, म्हणून माझ्या प्रतिसादांना उत्तरे देत नाही आहात का?