सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन
==================================================================
सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन... ०२ : औकानाची बुध्दमूर्ती...
०३ : अनुराधापुरा - प्राचीन श्रीलंकेची पहिली मोठी राजधानी... ०४ : मिहिन्ताले - श्रीलंकेतील बौद्धधर्माचे प्रारंभस्थान...
०५ : पोलोन्नारुवा - प्राचीन श्रीलंकेची दुसरी मोठी राजधानी... ०६ : गल विहारा व तिवांका प्रतिमागृह...
०७ : कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान... ०८ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (१)...
०९ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (२)... १० : दांबुलाचे गुंफामंदिर व सुवर्णमंदिर...
११ : कँडी - श्रीलंकेची वसाहतकालापूर्वीची शेवटची राजधानी... १२ : महावेली, हत्ती अनाथालय आणि चहा फॅक्टरी...
१३ : नुवारा एलिया उर्फ लिट्ल इंग्लंड... १४ : सीतामंदिर, रावणगुहा आणि यालापर्यंत प्रवास...
१५ : याला राष्ट्रीय उद्यान... १६ : कातारागामा बहुधर्मिय मंदिरसंकुल...
१७ : कातारागामा - गालंमार्गे - कोलंबो... १८ : कोलंबो... (समाप्त)
==================================================================
डॉ सुहास म्हात्रे यांचे मिपावरचे इतर लेखन...
==================================================================पार्श्वभूमी
सौदी अरेबियात असताना अशीच एक ईदची सुट्टी. पाच दिवस मुख्य सुट्टी आणि तिच्या पुढचे मागचे आठवडी सुट्टीचे चार दिवस असे मिळून नऊ दिवस मोकळे होते. या सुट्टीत काय करायचे हे मात्र नक्की होत नव्हते. कामाच्या जागच्या आणि वैयक्तिक कारणांनी सगळे बेत फिसकटत गेले आणि हा हा म्हणता सुट्टी पाच दिवसांवर येऊन ठेपली. मग इतक्या कमी वेळेत "व्हिसा न लागणार्या ठिकाणालाच भेट देणे शक्य आहे" हे नक्की झाले. करायच्या सफरींच्या यादीत श्रीलंका होतीच. अर्थातच तिचे नाव सर्वात वर आले. आंतरजालावर शोध करून, जालसंदेश व फोन वापरून सहलीचा हवा तो आराखडा तीन दिवसांत मान्य करून घेतला. विमानाचे तिकीट काढले. सुट्टी सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर श्रीलंकेवर स्वारी करण्याची सर्व तयारी पूर्ण झालीसुध्दा ! श्रीलंका म्हटले म्हणजे कोणाही भारतीयाच्या मनात सर्वप्रथम रावणाची लंका येते ! पण बहुतेक तिथेच श्रीलंकेची ओळख सुरू होते आणि संपतेही ! भारतात इतकी माहीत असलेली आणि तिच्याबाबतीत इतके अज्ञान असलेली क्वचितच दुसरी जागा असेल. तमिळ एलमच्या लढ्याच्या बातम्या, भारतीय तमिळ मच्छीमारांना बंदी केल्याच्या बातम्या, क्वचित प्रसंगी श्रीलंकन चहा आणि अर्थातच क्रिकेट यापलीकडे नेहमीच्या बातम्यांत श्रीलंका क्वचितच येते. असे असले तरी भारताच्या दक्षिणेला खेटून असलेल्या या बेटाबाबत नेहमीच एक कुतूहल मनात होतं. कर्मधर्म संयोगाने या विषववृत्तीय प्रदेशातल्या हिरव्यागार झाडीने समृद्ध पाचूच्या बेटाला भेट देण्याचा योग अचानक जमून आला. चला तर मग निघूया श्रीलंका म्हणजेच सिंहलव्दिपाच्या सफरीला !*********************************
श्रीलंकेचा त्रोटक इतिहास
श्रीलंकेत सापडलेल्या आदिमानवाच्या अवशेषांचे वय १२५,००० (काहींच्या मते ५००,०००) वर्षे मागे जाते, तर आधुनिक मानवांच्या अवशेषांचे (बालांगोदा मानव, Balangoda Man) वय ३७,००० वर्षे मागे जाते. हा मानव शेती करत असे आणि तो शिकारीसाठी कुत्र्यांचा वापर करत असे पुरावे आहेत. जेम्स एमर्सन टेनेटच्या एका सिद्धान्ताप्रमाणे श्रीलंकेच्या तार्शिश (आताचे गाले) नावाच्या बंदरातून प्राचीन इझ्रेलचा राजा सॉलोमन हस्तिदंत, मोर, मोरपिसे आणि इतर किंमती वस्तू आयात करत असे. श्रीलंका आणि भारत शेजारी असल्याचे त्यांचे संबंध प्राचीन काळापासून आहेत. साहजिकच त्यांचे उल्लेख दोन्ही देशांतील अनेक कथा, कविता, पुराणे व दंतकथांत आहेत. पाली भाषेत लिहिलेल्या महावंश या ग्रंथाप्रमाणे श्रीलंकेचे मूलवासी यक्ष व नाग या नावांनी ओळखले जात होते. भारतातील आताच्या बंगालमधील रार प्रदेशातून विजय (सिंह) नावाचा एक राजपुत्र इ स पूर्व ५४३ मध्ये तेथे आठ जहाजांतून ७०० जणांना घेऊन पोहोचला आणि तेथे आपले राज्य (इ स पूर्व ५४३ ते ५०५) स्थापन करून त्याने श्रीलंकेत सिंहला राजांची परंपरा सुरू केली. तेथील तांब्याच्या रंगाची नारळाची झाडे पाहून त्याने या बेटाला (आणि आपल्या राज्याला) थांबापन्नी (Thambapanni, ताम्रपर्णी) असे नाव दिले. साधारणपणे १८९ श्रीलंकन राजांची ही वंशपरंपरा इ स १८१५ मध्ये तेथे ब्रिटिश अंमल सुरू झाल्यावर खंडीत झाली. इ स पूर्व सहाव्या शतकात सुरू झालेला सिंहला राजवंशाची राज्यरेखा, मधून मधून तमीळ एलाराने (राजवंश) व चोल वंशाच्या राजांनी खंडीत केली. सम्राट अशोकाचा मुलगा अरहन्त महिंदा (महिंद्र) याने श्रीलंकेत बौद्ध धर्म आणला. त्यामुळे, प्रथम हिंदू असणारी ही राज्ये इ स पूर्व तिसर्या शतकापासून बौद्ध प्रभावाखाली आली. या राजवंशांची माहिती दीपवंश, महावंश, कुलवंश, लंकावतारासुत्र आणि राजवालिया अश्या अनेक ग्रंथांत लिखित स्वरूपात आहे. विजयसिंह आणि त्याच्या पूर्वीपासून भारतात हे बेट लंका या नावाने ओळखले जात होते. प्राचीन ग्रीक नकाश्यांत त्याचा उल्लेख ताप्रोबना (Ταπροβανᾶ, Taprobanā) असा आढळतो. अरब प्रवासी त्याचा उल्लेख सरंदीब (इंग्लिश serendipity या शब्दाचा उगम या शब्दामध्ये आहे) असा करत. इ स १५०५ मध्ये पोर्तुगीजांचे भारतीय उपखंडात आगमन झाल्यावर त्यांनी या बेटाला सायलाव (Ceilão) असे नाव दिले. याच नावाच्या आधारावर इंग्रजांनी या बेटाला सिलोन (Ceylon) असे म्हणायला सुरुवात केली. १९४८ साली स्वतंत्र झाल्यावरही सिलोन हेच नाव चालू राहिले. नंतर १९७२ साली ते "Free, Sovereign and Independent Republic of Sri Lanka" असे व नंतर १९७८ साली "Democratic Socialist Republic of Sri Lanka" असे बदलले गेले. तिथपासून हा देश श्रीलंका या संक्षिप्त नावाने ओळखला जातो. ६५,६१० चौरस किमी क्षेत्रफळाच्या या बेटरुपी देशात आठ युनेस्को मान्यताप्राप्त जागतिक वारसा स्थळे (UNESCO World Heritage Sites); वनस्पती आणि प्राण्यांनी समृद्ध असलेली १५ राष्ट्रीय उद्याने; ५००,००० एकरांवर पसरलेल्या गर्द हिरव्या चहाच्या बागा; २५० एकराच्या वनस्पतिशास्त्राला वाहिलेल्या बागा (botanical gardens); ३५० धबधबे आणि २५,००० तलाव आहेत. हे बेट विषववृत्तीय प्रदेशात वसलेले आहे. अर्थातच तेथे वर्षभर पर्जन्यवृष्टी होते. त्यामुळे ऐतिहासिक महत्त्वाबरोबरच हा देश त्याच्या निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. बेट असलेल्या या देशाला असलेला १,५८५ किमी लांब समुद्रकिनाराही परदेशी पर्यटकांना आकर्षक वाटतो. इतक्या लहान जागेत इतके वैविद्ध्य इतर फार थोड्या ठिकाणी पाहायला मिळते. श्रीलंकेच्या जादुई सौंदर्यामुळे ती भारतीय महासागरातला मोती (Pearl of the Indian Ocean) या नावानेही ओळखली जाते. श्रीलंकेची इतकी तोंडओळख पुरे. फिरताना वाटेतल्या प्रत्येक ठिकाणावर तिथल्या इतिहासाची आणि वैशिष्ट्याची ओळख करून घेत सहलीचा आनंद वाढवत पुढे पुढे जाऊया.*********************************
संपूर्ण प्रवासाचा आराखडा
पहिला दिवस : दम्माम --> बंदरानायके आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोलंबो --> औकानाचे बुध्दमंदिर --> अनुराधापुरा --> मिहिन्ताले --> पोलोन्नारुवा (वस्ती). दुसरा दिवस : पोलोन्नारुवा --> गल विहारा --> कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान --> पोलोन्नारुवा (वस्ती). तिसरा दिवस : पोलोन्नारुवा --> सिगिरिया --> माताले येथील मसाल्यांच्या झाडांची बाग --> कँडी (भगवान बुध्दांचा दात असलेले मंदिर, सांस्कृतिक कार्यक्रम) (वस्ती). चवथा दिवस : कँडी --> पिन्नावाला येथील हत्तींचे अनाथालय --> मध्य श्रीलंकेच्या पहाडांतल्या चहाच्या बागांच्या रमणीय प्रदेशातून प्रवास --> नुवारा एलिया (Little England) (वस्ती). पाचवा दिवस : नुवारा एलिया --> एल्ला गॅप --> याला राष्ट्रीय उद्यान --> याला (वस्ती). सहावा दिवस : याला --> कातारागामा मंदिरसंकुल --> श्रीलंकेच्या निसर्गरम्य दक्षिण व दक्षिण-पूर्व किनार्याने गाले मार्गे प्रवास --> कोलंबो (वस्ती). सातवा दिवस : पहाटे पहाटे परतीचा प्रवास सुरू; कोलंबो --> दम्माम. .
सिंहलव्दीपाची सहल : संपूर्ण प्रवासाचा आराखडा (मूळ नकाशा जालावरून साभार)
*********************************
आगमन
कोलंबोच्या बंदरानायके आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहाटे सुमारे चार वाजता आमचे विमान उतरले. आप्रवास सोपस्कार आटपून बाहेर पडलो. थोडेफार शोधल्यावर आमचा मार्गदर्शक-कम-ड्रायव्हर हातात नावाची पाटी घेऊन उभा दिसला. नमस्कार-चमत्कार होऊन गाडी औकानाच्या दिशेने धावू लागली आणि "चला, गडबडीने ठरवलेल्या सहलीला सुरुवात झाली", असे जाणवून मन प्रफुल्लित झाले. मार्गदर्शकाने वाटेत एका निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या रेस्तराँपाशी गाडी थांबवली आणि न्याहारी करून घ्या असे सांगितले. भल्या सकाळी त्या रेस्तराँचे मीच पहिले गिर्हाईक होतो असे दिसले. पण जागा एकदम मस्त होती... वस्तीबाहेर, एका मोठ्या निरव तळ्याकाठी, एक जुन्या शैलीतली इमारत आणि आजूबाजूच्या भरगच्च झाडीने भरलेल्या प्रशस्त परिसरात काही झावळ्यांनी शाकारलेल्या बसायच्या जागा. तळ्यापलीकडच्या एका टेकडीवर पद्मासन घालून बसलेल्या भल्या मोठ्या बुद्धमूर्तीने त्या सकाळच्या धूसर शांत वातावरणाला धीरगंभीर पावित्र्याने भारून टाकले होते. श्रीलंकेच्या या पहिल्या दर्शनाने मन जिंकून घेतले. तिथे काढलेली काही प्रकाशचित्रे त्या रेस्तराँच्या सुंदर परिसराची थोडी कल्पना देऊ शकतील...
कोलंबो-औकाना रस्त्यावरचे रेस्तराँ ०१
कोलंबो-औकाना रस्त्यावरचे रेस्तराँ ०२
कोलंबो-औकाना रस्त्यावरचे रेस्तराँ ०३
कोलंबो-औकाना रस्त्यावरचे रेस्तराँ ०४
औकानाच्या रस्त्यावर भेटलेले सिंहली मावळे ०१
औकानाच्या रस्त्यावर भेटलेले सिंहली मावळे ०२
पाचूच्या बेटातून प्रवास (कोलंबो-औकाना रस्ता) ०१
पाचूच्या बेटातून प्रवास (कोलंबो-औकाना रस्ता) ०२
- सिंहलव्दीपाची सहल : ०२ : औकानाची बुध्दमूर्ती
- सिंहलव्दीपाची सहल : ०३ : अनुराधापुरा - प्राचीन श्रीलंकेची पहिली मोठी राजधानी
- सिंहलव्दीपाची सहल : ०४ : मिहिन्ताले - श्रीलंकेतील बौद्धधर्माचे प्रारंभस्थान
- सिंहलव्दीपाची सहल : ०५ : पोलोन्नारुवा - प्राचीन श्रीलंकेची दुसरी मोठी राजधानी
- सिंहलव्दीपाची सहल : ०६ : गल विहारा व तिवांका प्रतिमागृह
- सिंहलव्दीपाची सहल : ०७ : कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान
- सिंहलव्दीपाची सहल : ०८ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (१)
- सिंहलव्दीपाची सहल : ०९ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (२)
- सिंहलव्दीपाची सहल : १० : दांबुलाचे गुंफामंदिर व सुवर्णमंदिर
- सिंहलव्दीपाची सहल : ११ : कँडी - श्रीलंकेची वसाहतकालापूर्वीची शेवटची राजधानी
- सिंहलव्दीपाची सहल : १२ : महावेली, हत्ती अनाथालय आणि चहा फॅक्टरी
- सिंहलव्दीपाची सहल : १३ : नुवारा एलिया उर्फ लिट्ल इंग्लंड
- सिंहलव्दीपाची सहल : १४ : सीतामंदिर, रावणगुहा आणि यालापर्यंत प्रवास
- सिंहलव्दीपाची सहल : १५ : याला राष्ट्रीय उद्यान...
- सिंहलव्दीपाची सहल : १६ : कातारागामा बहुधर्मिय मंदिरसंकुल
- सिंहलव्दीपाची सहल : १७ : कातारागामा - गालंमार्गे - कोलंबो...
- सिंहलव्दीपाची सहल : १८ : कोलंबो (समाप्त)
आणि रावणाचे एखादे देउळहि!आहे !मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Is the bubble bursting for India's online start-ups?उपहारगृहाला कौलं घातलियेत म्हणून कोकणातील घरांची आठवण आली.अगदी ! ती जागा पाहून कोकणाचीच आठवण आली होती. पण लिहिताना राहून गेले :(