Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिळू जाउनि इंग्रजी सागराला

व
वेल्लाभट
Tue, 11/24/2015 - 07:00
🗣 65 प्रतिसाद
मराठी शाळाही धरत आहेत इंग्रजीची कास. लोकसत्ता मधे अशा आशयाची बातमी आहे. माझ्याच शाळेची ती बातमी आहे. हे सांगताना खंत वाटते. मी स्वत: सरस्वती सेकंडरी स्कूल चा एक माजी विद्यार्थी असून हे मी नेहमी अभिमानाने सांगतो. माझे संपूर्ण शिक्षण सरस्वती सेकंडरी स्कूल मधून, मराठी माध्यमातून झाले आहे. आणि सरस्वती ही शाळा महाराष्ट्रातील अग्रेसर मराठी शाळांपैकी एक आहे ही बाब नेहमीच सुखावते. परंतु इंग्रजी माध्यम सुरू करण्याचा शाळेचा निर्णय दु:खद आहे. आज असंही मराठी लोकांवर, मराठी भाषेवर जे वैचारिक आक्रमण सुरू आहे ते चिंताजनक आहे. असं असताना मराठी शाळांनी स्वत:हूनच इंग्रजीची कास धरणं हे म्हणजे माघार घेण्यासारखं आहे. मराठी शाळा इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांइतक्याच किंबहुना त्यांच्याहून जास्त चांगल्या असू शकतात, असा खरा तर शाळेचा पवित्रा हवा होता, पण तो तसा नाही. आज अवघी जनता ‘ट्रेंड’ च्या मागे धावणारी झालेली आहे. डोळ्यावर झापडं बांधून फक्त सगळे करतात ते आपण करावं अशा प्रकारची एक विचारहीन संस्कृती आकार घेते आहे. त्यामुळे ‘कुणी ठरवलं इंग्रजी माध्यम इतर भाषिक माध्यमाहून श्रेष्ठ?’, ‘मराठीमधून शिक्षण म्हणजे मुलांचं भवितव्य अंधारात, आणि इंग्रजी ही भविष्याची गुरुकिल्ली असं कसं?’ हे आणि असे प्रश्न फार कमी लोकांना पडतात, आणि ज्यांना पडतात तेही त्या प्रश्नांची गळचेपी करून पुन्हा प्रवाहात सामील होतात. माझ्या अगदी निकटच्या व्यक्तीला जेंव्हा 'मी माझ्या मुलाला/मुलीला बेस्ट एज्युकेशन देणार. टॉपच्या कॉन्व्हेंट मधे नाव नोंदवलंय' असं म्हणताना ऐकतो तेंव्हा काय म्हणावं कळत नाही. बरं या व्यक्ती स्वतः मराठी माध्यमातून शिकलेल्या असतात हे विशेष खटकणारं असतं. 'युनेस्को' या एका जागतिक मान्यतेच्या संस्थेने या विषयावर एक पत्रिका प्रकाशित केलेली आहे. या पत्रिकेत असं म्हटलेलं आहे की मातृभाषेतून घेतलेलं शिक्षण हे मुलाच्या एकंदरीत वाढीसाठी, आकलनक्षमतेच्या विकासासाठी चांगलं असतं. युनेस्कोने मल्टिलिंग्वल म्हणजे बहुभाषिक राष्ट्रांना मातृभाषेतील शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलं आहे. गूगल वर ‘युनेस्को मदरटंग एज्युकेशन’ हे शब्द टाकून शोध घेतला असता हा आणि असे अनेक मजकूर तुम्हाला वाचता येऊ शकतात. सरस्वतीच नव्हे, इतर कुठल्याही शाळेत आपल्या पाल्याला टाकू बघणार्‍या प्रत्येक पालकाला मी सांगेन की तुम्ही या पत्रिका जरूर वाचा. समजून घ्या. आणि मगच तुमचा निर्णय घ्या. कारण हे म्हणणं कुणा सामाजिक संस्थेचं किंवा व्यक्तीचं नसून युनेस्कोचं आहे. इंग्रजी माध्यमाविरोधात काहीही बोललं की अनेकांना असं वाटतं की इंग्रजीला असलेला हा विरोध आहे. विरोध इंग्रजी भाषेला नसून इंग्रजी माध्यमाला आहे. इंग्रजी भाषा ही प्रत्येकाला आलीच पाहिजे आणि नुसती आली पाहिजे नाही तर त्यात प्राविण्य मिळवलं पाहिजे. परंतु त्यासाठी वेगळे प्रयत्न करायला हवेत, इंग्रजी माध्यमाची गरज नाही. लहानपणापासून नियमितपणे इंग्रजीत संभाषण करायची सवय लावली, सराव केला, तर मुलांना इंग्रजी बोलण्याचा न्यूनगंड कधीच भेडसावत नाही. इंग्रजी पुस्तकं, इंग्रजी कविता, गाणी यांच्याशीही योग्य वेळी त्यांचा परिचय करून दिला, तर ते फायद्याचं ठरतं. 'मी नाटकं वगरे बघत नाही. त्यात खूप हाय लेव्हल मराठी असतं' हे वाक्य जेंव्हा एखाद्या मराठी व्यक्तीकडून ऐकायला मिळतं तेंव्हा मात्र कीव करावीशी वाटते, त्यांची आणि त्यांच्या पालकांची. हीच गत इतर भाषांचीही आहे. ही एकट्या मराठीची समस्या नाही, ही भारतातल्या प्रत्येक प्रादेशिक भाषेची समस्या आहे. दुर्दैव हे की आपण इंग्रजीप्रेमात इतके आंधळे झालो आहोत की आपल्याला याच्या परिणामांची पर्वाच नाही. आपल्या मुलाला इंग्रजीत प्रेझेन्टेशन देता आलं पाहिजे, मग त्याला पु लं देशपांडे कोण, शांता शेळके कोण हे माहित नसेल तरी हरकत नाही, असा आजकालचा विचार आहे. सरस्वती शाळेत झालेल्या भावी पालकांच्या बैठकीत मी उपस्थित होतो. तिथे शाळेतर्फे एका व्यक्तीने असं मत मांडलं की हा मराठीचा वृथा अभिमान आहे आणि तो अयोग्य आहे. शिवाय मराठीतून शिकलेली मुलं ही पुढे जाऊन स्पर्धात्मक जगात मागे पडतात. यावर मी इतकंच म्हणू शकतो आणि जे मी तिथे त्या व्यक्तीशीही बोललो, की वृथा अभिमान इंग्रजीचा असू शकतो; मराठीचा, मातृभाषेचा अभिमान वृथा कसा, हे मला कळत नाही. शिवाय मी आणि माझ्यासारखे तमाम मराठी माध्यमातून शिकलेले विद्यार्थी आज आयुष्यात आपापल्या जागी यशस्वी आहेत. ते कुठेही मागे पडलेले नाहीत आणि या विचाराचं जर एखादी शाळा प्रतिनिधित्व करत असेल तर तो त्या शाळेच्या लेखी पराभव आहे. मराठी शाळेतल्या पालकांना आज मुलांना इंग्रजी शाळेत घालावंसं वाटतं, तिथली फी त्यांना परवडते, यातून हे सिद्ध होतं की ते स्पर्धात्मक युगात यथायोग्य टिकलेले आहेत. ते मागे फक्त एकाच बाबतीत पडले की त्यांना स्वतःच्या मातृभाषेतून झालेल्या शिक्षणाचा विसर पडला आणि ते कमीपणाचं वाटू लागलं. तरीही, सरस्वती शाळा, तिथले शिक्षक, आणि शाळेचा इतिहास हे सगळं फार उच्च दर्जाचं आहे. त्यामुळे माध्यम कुठलं हा प्रश्न क्षणभर बाजूला ठेवून एक गोष्ट विश्वासाने सांगेन की सरस्वती सेकंडरी स्कूल, नौपाडा, ठाणे ही शाळा इतर शाळांपेक्षा नेहमीच उजवी ठरलेली आहे, आणि पुढेही ठरेल. तेंव्हा मुलाच्या/मुलीच्या भविष्याकरिता सरस्वतीच्या पर्यायाचा जरूर विचार करा. ब्लॉग दुवा हा: www.apurvaoka.com/2015/11/english-marathi-medium-school.html
वर्गीकरण
सामाजिक
भाषा शिक्षण
शिक्षण
महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था

प्रतिक्रिया द्या
10353 वाचन

💬 प्रतिसाद (65)
व
वेल्लाभट Tue, 11/24/2015 - 11:08 नवीन
हल्ली बाहेरच्या जगात वावरतांनाही ठिकठिकाणी इंग्रजी वापरावेच लागते.
का? आणि हे आपल्याइथेच होतं की इतर इंग्रजेतर भाषिक देशातही होतं?
इंग्रजी आता जागतिक भाषा आहे
हे आपण जितक्या ठामपणे सांगतो, मानतो, आपल्या मुलांची शिक्षणपद्धतीही बदलतो, तितक्या ठामपणे इतर इंग्रजेतर भाषिक देश म्हणतात का?
आणि ती शिकण्यासाठी इंग्रजी माध्यामतील शिक्षणही तसेच गरजेचे आहे,
माध्यम बदलायला हवंच का? त्या भाषेचे शिक्षण घेऊनही पुरेसं असतं असं नाही वाटत का?
त्यात कमीपणा वाटण्यासारखे काही नसावे.
त्यात कमीपणा नाही वाटत; कमीपणा मातृभाषेतून शिकण्यात वाटतो. असो. पुन्हा तीच चर्चा मलाही करायची नाही. पण जसं तुम्हाला गिगाबायटी प्रतिसादकांचं कौतुक वाटतं, तशीच मला 'बाहेरच्या जगात (हे जग तुमच्या घराच्या उंबरठ्यापासून सुरू होतं) इंग्रजी बोलावच लागतं' असं म्हणणा-यांची फार मजा वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
प
पिलीयन रायडर Tue, 11/24/2015 - 11:17 नवीन
मुलाला इंग्रजीत प्रेझेन्टेशन देता आलं पाहिजे, मग त्याला पु लं देशपांडे कोण, शांता शेळके कोण हे माहित नसेल तरी हरकत नाही हे वाक्य नक्की कोणत्या प्रतिसादात आलंय ते माहित नाहीये पण हा सुर नेहमीच लागतो. ह्यावर एक प्रश्न आहे की मराठी माध्यमात शिकणार्‍यांना खरंच मराठी साहित्या बाबत ज्ञान असते का? मी किमान माझ्या वर्गातली अर्धी मुलं उभी करु शकते ज्यांना मराठी साहित्य, व्याकरण ह्याबद्दल काहिही माहिती नाही. बोलताना सुद्धा "मी आली.. मी गेली" ... साधी गोष्ट आहे हो.. माझा इंग्रजी शाळेत जाणारा ३.५ वर्षाचा मुलगा उत्तम मराठी बोलतो आणि कालच "दिल की तपिश" गुणगुणत होता. (तो "सायलेंट हो जा वरना मै व्हॉयलेंट हो जाऊंगा" सुद्धा ऐकवतो..) कोण शिकवतं हे? घरात आपण कसे बोलतो, काय बोलतो ह्यावर खुप काही अवलंबुन आहे. सगळंच कसं शाळेच्या माध्यमावर अवलंबुन असेल? छे बुवा... परत माझी पण गाडी त्याच लायनीवर आली.. खरंय नीमो.. पुन्हा पुन्हा काय तेच बोलायचं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
स
संदीप डांगे Tue, 11/24/2015 - 11:22 नवीन
मोठ्मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी आयोजीत मुलाखतीत इंग्रजीतून उत्तरे देतांना ततपप होणारे मराठी माध्यमातील विद्यार्थी नंतर आपल्या पालकांच्याच नावाने ओरडतात इंग्रजी माध्यमात का शिकवले नाही म्हणून.
याबद्दल काही विदा? पुरावा? कारण आत्ता २०१० ते २०१५ ह्या काळात जे विद्यार्थी मुलाखती देत असतील त्यांचे प्राथमिक शिक्षण अंदाजे १९९० ते १९९५ यादरम्यान सुरू झाले असावे, तेव्हा इंग्रजी शाळांचे स्तोम अजिबात नव्हते. तेव्हा कॉन्वेंट तुरळक होत्या. इंग्रजीचेही स्तोम माजले नव्हते. इंग्रजीचे स्तोम माजायला साधारण १९९५ सालानंतर सुरुवात झाली. ९१ च्या नीतीबदलानंतर ग्लोबलायझेशनची लाट आली. वायटूकेमुळे मुलं भराभर परदेशात गेली, परदेशातून आयटीचे बूम भारतात आले त्यांना सर्वप्रांतीय, सर्वभाषिक कामगारांना एकत्र काम करणे सोयीचे जावे म्हणून इंग्रजी संवादकौशल्य उत्तम असलेल्यांना निवडले जाऊ लागले. ह्यासर्व कारणामुळे इंग्रजी आवश्यक असा समज सर्वत्र पसरला. २००० सालानंतर मराठी शाळेत मुलांना टाकणारे झपाट्याने कमी झालेत. इंग्लिश स्पीकींगचे बूमही २००० सालानंतर प्रचंड फोफावले. 'आम्हाला इंग्रजी शाळेत का टाकले नाही' हा प्रश्न विचारू शकणारी पीढी आधीच नोकर्‍यांमधे आहे, भविष्यात जी विचारू शकेल ती इंग्रजी शाळेत आहे. त्यामुळे पालकांच्या नावाने ओरडणारे विद्यार्थी नक्की कोठे आहेत याचे कुतूहल आहे. माझे निरिक्षण असे आहे अशी भीती आताच्या बहुसंख्य (पिरातैंना वगळून) पालकांच्याच मनात आहे म्हणून ह्या भीतीलाच ते इंग्रजी शाळेत टाकण्यासाठीचे कारण, ढाल म्हणून वापरतात. तसंच प्रत्यक्ष अनुभवानुसार माझ्या अकोल्यातल्या (मुंबईच्या तुलनेने मागास) शाळेतले साठ टक्के वर्गबंधू मोठ्मोठ्या कंपन्यांमधे चांगल्या पदांवर कार्यरत आहेत. त्यांचे सर्वांचे इंग्रजी यथातथाच होते. त्यामुळे, खरंच कोण पालकांना ओरडतंय हा प्रश्न पडलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
प
प्रसाद१९७१ Tue, 11/24/2015 - 10:49 नवीन
भाषेला ताकद द्या पैश्याची आणि कर्तृत्वाची, म्हणजे अमराठी लोक पण शिकू लागतील मराठी. पेठकर काकांच्या हॉटेल मधले नोकर १० वाक्य तरी मराठी शिकतीलच ना. असे आरक्षण देऊन पुढे जाता येत नाही.
  • Log in or register to post comments
S
sagarpdy Tue, 11/24/2015 - 11:57 नवीन
हे असेच सुरु राहिले तर अजून ५० वर्षांनी मिपा वर इंग्रजीत गोंधळ घालावा लागेल!
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 11/24/2015 - 12:00 नवीन
माताय, आपण कशासाठी आहोत? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy
म
माहितगार Tue, 11/24/2015 - 12:09 नवीन
=)) खरय काळाचा महिमा न सांगता येणारा असतो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 11/24/2015 - 15:24 नवीन
जेव्हा एखाद्या भाषेच्या वापराने भौतिक प्रगती (आर्थिक फायदा, सामाजिक पत, एकंदरीत उंचावलेला जीवनाचा स्तर, इ) होते ती भाषा लोक जबरदस्ती न करताही, किंबहुना विनातक्रार कष्ट करूनही, स्विकारतात हे जागतिक व सार्वकालीक सत्य आहे. हे शक्य न झाल्यास, जबरदस्तीने अथवा नुसत्या कळकळीने आजवर कोणतीही भाषा वाढलेली नाही. बाकी भाषिक अस्मिता वगैरे शब्द नुसते (बर्‍याचदा राजकारण करण्यासाठीच) बोलायला कामी येतात... भाषेच्या उत्कर्षाला त्यांचा फारसा उपयोग होत नाही, असाच इतिहास आहे.
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 11/24/2015 - 18:11 नवीन
गोव्यात रस्त्यावर शाली विकणार्‍या आणि मासे विकणार्‍या बाया पण कामचलाऊ इंग्लिस बोलतात. देसी लोकांकडेच नव्हे तर फारेनर लोकांकडे. एखाद्या भाषेत बोलणे हा कम्युनिकेशनची आवश्यकता आणि सवय याचा भाग आहे. तुम्ही कोणत्या माध्यमात शिकलात आणि काय शिकलात, का शाळेत गेलाच नाहीत यावर खरे तर काहीच अवलंबून नसते. हां, आम्ही दहावीपर्यंत मराठी माध्यमात शिकलेली पोरे अकरावीला कॉन्व्हेंटशिक्षित इंग्रजी माध्यमाच्या पोरांबरोबर एकत्र आलो, तेव्हा मास्तर लोक त्या कान्व्हेंटवाल्यांच्या ग्रामरवरून त्यांचा सतत उद्धार करायचे हे आठवते आहे. सुरुवातीचे शिक्षण मातृभाषेत घेतले नसेल तर त्या पोरांना कोणतीच भाषा चांगली नीट अशी येत नाही असे मला तेव्हापासून वाटते. विशेषतः दुसर्‍या भाषांच्याबाबत पाहिले तर घरात मराठी बोलत असताना हिंदी किंवा संस्कृत मराठी माध्यमात समजून घेणे सोपे जाईल, तेवढे इंग्लिश माध्यमात समजणार नाही. एवढे बोलून मी खाली बसते. जयहिंद. (अवांतरः सरस्वती सेकंडरीवाल्यांनी मराठीच्या तुकड्या कमी करून इंग्रजी सुरू केल्यात का? तर जरूर ओरड करायला हरकत नाही. पण त्या जास्तीच्या सुरू केल्या असतील तर तो केवळ व्यापारी निर्णय समजून दुर्लक्ष करावे.)
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 11/24/2015 - 18:26 नवीन
मराठी शाळा चालू ठेवून इंग्रजी सुरू होते आहे. पण त्याचे खरे परिणाम तेंव्हा कळतील जेंव्हा सुमारे ६०००० प्रतिवर्ष फी भरलेल्या सीबीएसई वाल्यांना प्रत्येक बाबतीत प्राधान्य दिलं जाईल, आणि मराठी माध्यमातील मुलांना मागे ठेवलं जाईल. ही केवळ माझी भीती आहे. असं होईल असं मी म्हणत नाही; न होवो. पण जर झालं तर मात्र मराठी माध्यमातील पालकांसाठी, मुलांसाठी ते वाईट ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
P
pacificready Tue, 11/24/2015 - 19:06 नवीन
ओक काका, तुमचा यूनेस्को बाबतचा मुद्दा आधी मातृभाषेत ज्ञान आत्मसात करावं, तसं करण्यासाठी मातृभाषेत मिळालेलं ज्ञान लवकर आत्मसात होतं असा आहे ना? यामागचं कारण आपल्याला त्या भाषेतल्या संज्ञा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येतात, त्या संज्ञा समजून घेण्यापूर्वी आधी शब्द समजावून घ्या नंतर त्याला visualise करा मग ते समजेल असं काही मातृभाषेत शब्द उच्चारल्याबरोबर करावं लागत नाही (कारण आपल्या स्मृतिपटलावर तो दिसतो) असं काही आहे ना? बाकी भाषा हे व्यक्त होण्याचं एक माध्यम असल्यानं एका मर्यादेपर्यन्त महत्त्व आहेच नि त्याची मर्यादा ओळखण्याचं महत्वही समजून घेतलं गेलं पाहिजे.
  • Log in or register to post comments
म
मोगा Wed, 11/25/2015 - 02:46 नवीन
मूळ्ज्ञान जर इंग्रजीतच शिकावे लागेल. लिव्हर , स्प्लीन हे मूळ इंग्रजी भाशीतच शिकावे लागेल. त्याचे मुद्दाम यकृत , प्लीहा करुन त्याच इंग्रजी पुस्तकाचे मराठी रुपांतर करुन ती मराठी बोजड करुन विकास कस होईल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: pacificready
र
रेवती Tue, 11/24/2015 - 19:36 नवीन
शाळेनं मराठी माध्यमच ठेवावं की इंग्रजी माध्यम सुरु करावं हा व्यावसायिक निर्णय आहे म्हणून त्यात पडायचे नाही पण इंग्रजी संभाषणाबाबत एका पालकांनी त्यांच्या मुलीबाबत केलेला प्रयोग हे एक उदाहरण माझ्याच वर्गात होते. ती मराठी शाळेत आमच्याबरोबर शिकायची. आम्हा बर्याच मुलींना जसे इतके टक्के आणि तितके मार्क यांच्यासाठी घरून दबाव असायचा, तसा तिला नव्हता कारण अठवड्यातून एकदा असे लहानपणापासूनच ती इंग्रजी वाचन, संभाषण वर्गाला तज्ञांकडे जात असे. (त्यावेळी एका तासात इंग्रजी, फाडफाड इंग्रजी असे प्रकार उपलब्ध होते पण तिकडे जात नसे.) त्यामुळे यत्ता दहावीपर्यंत मराठी व इंग्रजी अशा दोन्ही विषयात तिने चांगलीच मजल मारली होती. असे असताना मराठी माध्यमात शिकल्याचा फायदा व इंग्रजी असे दोन्ही साधले. इंग्रजी वक्तृत्वस्पर्धा, जी वर्षातून एकदा असायची त्यास तिला आमच्या शाळेतर्फे दरवर्षी पाठवले जायचे. बाकी कोणत्याही, म्हणजे नाचणे, गाणे, मैदानी स्पर्धा, मराठी वक्तॄत्व यामध्ये ती फारशी नसायची व ताणाखाली दबलेलीही नसायची.
  • Log in or register to post comments
अ
असंका Wed, 11/25/2015 - 04:27 नवीन
वा वा वेल्लाभट अगदी सुरेख लेख!! माझ्या मराठी शाळांची अवस्था बघवत नाही आता. एका चुकीच्या भावनेला बळी पडून आपली मातृभाषा आपल्या लोकांकडून दुर्लक्षित होताना बघणं फारच त्रासदायक होतंय.
  • Log in or register to post comments
इ
इडली डोसा Wed, 11/25/2015 - 05:22 नवीन
मुलं कुठल्या माध्यमात शिकतात या पेक्षा पालकांनी मातृभाषा किंवा कोणत्याही इतर भाषेत मुलांनी प्राविण्य मिळवण्यासाठी पुरेसे प्रयत्न करायला हवेत. मा़झ्या माहितीतली एक मुलगी फलटण सारख्या निमशहरी ठिकाणी मराठी माध्यमात शिकुनही उत्तम इंग्रजी बोलते कारण तिच्या आई- बाबांनी तिच्या इंग्रजी संभाषणवर मेहनत घेतली होती. तसेच माझी एक घनिश्ठ मैत्रीण कॉन्व्हेंट मध्ये शिकुन सुद्धा असंख्य मराठी पुस्तके वाचते. मराठी गाणी ऐकते ( हृदयनाथांनी संगीतबद्ध केलेली अगदी कवी ग्रेस यांची पण) आणि त्यांचे रसग्रहणही करते. तिचाच भाऊ अगदी स्वतःची सही पण सगळीकडे मराठीतच करतो. यात कुठे ते कॉन्व्हेंटमधे शिकले त्याचा काही अडसर आलेला मला तरी दिसलेला नाही. जर मराठी मध्यमात शिकल्यानेच मराठीचे प्रेम वाढेल असे म्हणणे असेल तर मला तरी वाटते त्यात काही तथ्य वाटत नाही. वर पिराने म्हटल्या प्रमाणे मराठी मध्यमात शिकुनही मराठी वाचन - लेखन संभाषण यात दयनीय अवस्था असलेले खुप लोक दिसतात. माझी मुलगी आता ३ वर्षांची होईल आणि 'ट्विंकल- ट्विंकल लिटिल स्टार' जेवढ्या आवडीने म्हणते तेव्ह्ड्याच आवडीने 'मामाच्या गावाला जाऊ या' पण म्हणते. कोणलाही आपल्या भाषेचा प्रसार करायचा असेल तर त्यासाठी आपल्याकडुन काय प्रयत्न करता येतील हेच या ग्लोबलायझेशनच्या जमान्यात बघितले पाहिजे. मुविंच्या
शाळेचा उपयोग फक्त समवयस्क मित्र-मैत्रीणीं बरोबर खेळण्यापुरता.
या प्रतिसादाशी १००% सहमत.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा