Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

देऊळ, लोकल ट्रेन, चित्रपटगृह आणि माणसं

व
वेल्लाभट
Tue, 12/01/2015 - 07:23
🗣 14 प्रतिसाद
तीन घटना. तीन बातम्या. आणि तीन प्रकारे वागलेली तिथली माणसं. याबाबत मी गेले तीन दिवस विचार करतोय. रत्नाकर मतकरींचं एक वाक्य आठवतं, 'माणूस वाईट नसतो; माणसं वाईट असतात.' याबद्दल विचार केला की त्यांचं म्हणणं किती खरं आहे ते जाणवतं. या घटना वृत्तवाहिन्यांनी, वृत्तपत्रांनी पुरेशा चघळल्यात त्यामुळे त्या सगळ्यांना माहित असतीलच. लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे तिथे उपस्थित असलेल्या जनसमुदायाचं वागणं, त्यांचा विचार. शनिशिंगणापूरला, जिथल्या देवळात स्त्रीयांना प्रवेश निषिद्ध आहे, तिथे एका मुलीने जाऊन तेलाचा अभिषेक केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. आणि तिथल्या ग्रामस्थांनी वगैरे निषेध बिशेध केला, काय तर म्हणे दुधाचा अभिषेक करून शुद्धिकरण वगैरेही केलं. एका वृत्तवाहिनीवर तिथल्या देवस्थानच्या अधिका-याला दोन प्रश्न केले गेले ज्यांची उत्तरं त्याच्याकडे नव्हती. प्रश्न एक - केला एका स्त्रीने प्रवेश, आणि केला अभिषेक. काय बिघडलं? का करू नये असं? (हा विषय मोठा आहे. माझा आत्ता तो मुद्दा नाही.) प्रश्न दोन - तिथे इतके लोक उपस्थित होते, त्यांनी यावर एका शब्दानेही आक्षेप घेतला नाही. सीसीटीव्ही मॉनिटर होत होता, देवस्थानचे ड्युटीवरचे अधिकारी तिथे होते, त्यांनीही काही म्हटलं नाही. का? आणि आता सगळं झाल्यावर हे फुटेज बाहेर आणून, निषेध वगैरे करून काय हशील? लोकल ट्रेनची घटना अतिशय दु:खद आहे. भावेश नखाते हा मुलगा डोंबिवलीहून मुंबई सीएसटी कडे जाणा-या ट्रेनमधे चढला, त्याला आत जाता आलं नाही, तो लटकत होता आणि काही वेळाने त्याची पकड सुटली व तो ट्रेनमधून खाली पडून मेला. या गोष्टीचा व्हिडियो; हो व्हिडियो, व्हॉट्सॅप, फेसबुक इत्यादी सर्व ठिकाणी फिरतोय. तिसरी घटना चित्रपटगृहाची. कुर्ला इथल्या पीव्हीआर चित्रपटगृहात एक कुटुंब चित्रपट बघायला आलं असता चित्रपटाच्या आधी राष्ट्रगीत लागलं तेंव्हा उभं राहिलं नाही. याचा उपस्थित इतर लोकांपैकी काहींना राग आला आणि त्यांनी विरोध केला, भांडण केलं आणि अखेर त्या कुटुंबाला चित्रपटगृहाच्या बाहेर जाण्यास भाग पाडलं. यावर सर्वांनी टाळ्या वाजवून झाल्या घटनेबद्दल सर्वांचं कौतुक केलं. याचाही व्हिडियो फिरतोय. पहिल्या घटनेत मुळात त्या मुलीची कृती योग्य/अयोग्य हाच प्रश्न असल्याने उपस्थित लोकं संभ्रमित अवस्थेत होती असं माझं मत आहे. एकीकडे कुठेतरी जे होतंय त्यात काहीच चूक असं नाही असं वाटणं, आणि दुसरीकडे हे असं चालत नाही या युगानुयुगे चालत आलेल्या नियमाचा(?) भंग होतोय असं वाटणं या दोन भावनांच्या मधे कुठेतरी ही जनता लटकत होती त्यामुळे त्यांच्याकडून काहीच कृती झाली नसावी. दे वर स्टन्ड. दुस-या घटनेत 'माणसांचा' राक्षसी चेहरा दिसतो. मी स्वतः अनेकदा बघितलं आहे की एखादी व्यक्ती धावत ट्रेन पकडायचा प्रयत्न करत असेल तर दारात उभी असलेली लोकं हात देऊन वर ओढून घेतात. इथे तसं न होता त्या माणसाचा जीव जाईपर्यंत वेळ गेली. वास्तविक थोडं थोडं सरकून सहज जागा करता आली असती, त्याचा हात धरता आला असता, चेन खेचता आली असती, काहीही करता आलं असतं. पण तसं कुणीही केलं नाही. केलं काय? तर शूटिंग. एखादा माणूस मरणार हे दिसतंय समोर, वाचवणं म्हटलं तर शक्य आहे, असं असताना ही व्यक्ती शूटिंग कसं करू शकते? याबद्दल बोलण्यासाठी सौम्य शब्द माझ्याकडे नाहीत. तेंव्हा असो. पण त्यावरून आठवलं, ती घटना जेंव्हा एक माणूस वाघाच्या चेंबरमधे पडला होता, आणि त्याला वाघ खातो, याचा व्हिडियो फिरला होता. अगदी हीच मानसिकता. मनोरंजन होत असल्यासारखं बघत राहणं. एक असाच व्हिडियो आला होता, ज्यात एका समुद्रकिना-यावर (भारतात नव्हे) डॉल्फिन्स अचानक लाटेसोबत किना-यावर येऊ लागले आणि त्यांना आत जाण्यास त्रास होत होता. तेंव्हा उपस्थित लोकांनी आपसुक, प्रतिक्षिप्त क्रीया असावी त्याप्रमाणे एक एक करून डॉल्फिन्स ना पुन्हा पाण्यात नेऊन सोडलं. एकाने केल्यावर सर्वांनी तसंच केलं. याचाही व्हिडियो काढणारा माणूस होताच पण किमान समोर घडणारी गोष्ट सकारात्मक होती. तिस-या घटनेत मात्र कृती दिसते. तीही योग्य म्हणावी अशी. इथेही चित्रपटगृहात राष्ट्रगीत हवंच कशाला? इत्यादी युक्तिवाद करणारे आहेत. पण उपस्थित लोकांनी एक येऊन त्या कुटुंबाच्या कृत्याचा विरोध करत त्यांना बाहेर जायला भाग पाडलं. चांगलं हे की बहुतेक लोकं राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभी राहिली. त्याहून चांगलं की जे योग्य वाटलं त्याचा एकत्र येऊन पुरस्कार केला आणि अयोग्याचा एकत्रपणे विरोध केला. दोनही बाबी आशादायी आहेत. पुढे वृत्तपत्रांनी ते कुटुंब अमूक धर्माचं होतं याच गोष्टीला जास्त महत्व दिलं तो एक वेगळाच मुद्दा आहे. या तीनही परस्पर भिन्न घटना आहेत. पण माणसं, आणि त्यांचं चमत्कारिक वागणं ही एक सामायिक गोष्ट मला या तीनहीत दिसते. समाज म्हणून आपण इतके निष्क्रीय होऊ शकतो, शिक्षण घेऊनही चुकीच्या, जुन्या समजुतींना कवटाळून राहू शकतो, आणि क्वचित एखाद्या गोष्टीच्या विरोधात टोकाची पण एकत्रित प्रतिक्रियाही देऊ शकतो. ही प्रगतीच्या दृष्टीने फार चांगली लक्षणं नाहीत असं मनापासून वाटतं. बाकी पुढे चर्चेसाठी निमंत्रण देतोच आहे.
वर्गीकरण
बातम्या
समाजमन

प्रतिक्रिया द्या
4924 वाचन

💬 प्रतिसाद (14)
स
स्पा Tue, 12/01/2015 - 07:38 नवीन
बाकी पुढे चर्चेसाठी निमंत्रण देतोच आहे.
मीही सर्वांना पोपकोण खाण्याचे निमंत्रण देतो लगे हात
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 12/01/2015 - 07:47 नवीन
?
  • Log in or register to post comments
अ
अत्रे Tue, 12/01/2015 - 07:54 नवीन
तिसरी घटना - त्या टकलू माणसाला कोणालाही थापड मारायचा अधिकार कोणी दिला? माझ्या मते त्याच्यावर intimidation, assault असा गुन्हा दाखल करायला हवा.
  • Log in or register to post comments
अ
अत्रे Tue, 12/01/2015 - 08:02 नवीन
कायद्यानुसार उभे राहणे बंधनकारक नाही.. पहा http://qr.ae/RbyGzx
Legally no. You are only required to show respect. That is all that is asked of Indian citizens. You are not required to even sing. But yes, you are expected to respect. Which basically means that you are not supposed to do anything that shows your disrespect. That is all. This issue came up in a case before the Supreme Court in Bijoe Emmanuel & Ors vs State Of Kerala & Ors (Citation here - Bijoe Emmanuel & Ors vs State Of Kerala & Ors on 11 August, 1986) All the cases where people were arrested for not standing, if you read the facts carefully, you will see that they were also doing acts to show their disrespect. In some cases, they were found booing the National anthem or otherwise making gestures of disrespect. They were arrested for that. It is the habit of Indian newspapers and media in general to not write complete facts and show the Indian law enforcement agencies in bad light.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 12/01/2015 - 08:06 नवीन
उत्तम माहिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे
स
साधा मुलगा Tue, 12/01/2015 - 11:09 नवीन
हि तर धक्कादायकच होती, मी रोज लोकलने प्रवास करतो त्यामुळे ज्यास्तच जिव्हारी लागली. लोकांना त्या मुलाला सांभाळून घेता आले असते. मी सुद्धा कधी घाई गर्दीच्या वेळी उशीर झाल्यामुळे म्हणा,असा राम भरोसे प्रवास केला आहे, हे कबुल करतो पण हे फारच धोकादायक आहे, गर्दीच्या वेळी मी तर गाडी सोडूनच देतो असला जीवघेणा प्रवास करण्यापेक्षा. विडिओ काढणार्याचा काय उद्देश होता समजला नाही, खरे तर खिशात हात घालायला देखील जागा नसताना हा शुटींग कशासाठी होता?
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 12/01/2015 - 21:59 नवीन
साधा मुलगा, भावेशचा मृत्यू धक्कादायक आहे. मात्र तुम्ही म्हणता तसे लोकांनी सांभाळून घेणे जमले नसते. त्या चलच्चित्रात बघितल्याप्रमाणे बाकीचे लोकंही लटकूनच प्रवास करंत होते. कोणी सांभाळून घ्यायचं ठरवलं असतं तर एकाऐवजी दोन जीव गेले असते. शिवाय अजून एक गोष्ट म्हणजे भावेशने दोन्ही हातांनी मिळेल तो भाग घट्ट पकडून ठेवला होता. मधल्या उभ्या दांड्यावर त्याच्या डाव्या हाताची पकड अगदी मजबूत बसलेली दिसते आहे. ती त्याने कशाला सोडली हे गूढच आहे. बहुतेक ती चुकून सुटली असावी. उजव्या हाताने त्याने मागील हँडल पकडायचा प्रयत्न चालवला असावा. मात्र तो सफल झाल्याखेरीज डावा हात सोडायला नको होता. तसेच त्याच्या चेहऱ्यावरून तो संकटात आहे असं वाटंत नाही. हा फाजील आत्मविश्वासाचा बळी दिसतो आहे. तरीही अर्थात समस्येचं गांभीर्य कमी होत नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साधा मुलगा
स
साधा मुलगा Wed, 12/02/2015 - 06:26 नवीन
माझ्या अनुभवाने सांगतो दारातल्या माणसाचा जरा जरी तोल जात असेल तर लोक सावध करतात, अर्थात त्यावेळी खूप गर्दी असल्याने लोकांना दुसर्याकडे लक्ष देत आले नसेल आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे एकापेक्षा अधिक लोकांचा अपघात होण्याची शक्यता होतीच.त्याने दांड्याला पकडलेला हात का सोडला हे देखील गूढ आहेच. खरेतर अश्या अवस्थेत त्याने दोन्ही हात घट्टपणे पकडायला हवे होते आणि पुढील स्टेशन आल्यानंतर जितके जाता येईल तितके आत जाणे. या सर्व गर्दीवर उपाय म्हणजे लवकर निघून , ठाणे लोकल, दोम्बिविली लोकल , कल्याण लोकल मध्ये आरामात बसून जाणे, उशीर होऊन फास्ट गाडी पकडायची वेळ आली तर तर आतमध्ये शिरता येईल अश्याच गाड्यामधून प्रवास करणे.रेल्वे गाड्यांची संख्या आणि वारंवारता एका मर्यादेपर्यंत वाढवू शकते त्याला आपण काही करू शकत नाही. लोकांकडूनही शिस्त आणि संयमाची अपेक्षा आहे. मेट्रोप्रमाणे इथेही सुरक्षा रक्षक नेमून रांगेने आत चढायची शिस्त लोकांना लावली पाहिजे अशी वेळ आली आहे. आपण आपली काळजी घेऊन सुरक्षित प्रवास करणे हेच आपल्या हातात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ट
टवाळ कार्टा Wed, 12/02/2015 - 08:14 नवीन
लवकर निघून , ठाणे लोकल, दोम्बिविली लोकल , कल्याण लोकल मध्ये आरामात बसून जाणे
हल्ली सकाळी १०:३० नंतरच हे करता येउ शकते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साधा मुलगा
स
साधा मुलगा Fri, 12/04/2015 - 12:46 नवीन
मिळते हो सकाळी लवकर उठून गाडी यायच्या उभे राहावे लागते आणि सुमडीत आत शिरावे लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
प्रसाद१९७१ Wed, 12/02/2015 - 06:30 नवीन
या सर्व गर्दीवर उपाय म्हणजे लवकर निघून , ठाणे लोकल, दोम्बिविली लोकल , कल्याण लोकल मध्ये आरामात बसून जाणे,
ह्या पेक्षा मुंबई सोडुन दुसर्‍या छोट्या शहरात ( पुणे सोडुन ) कमी पैसे मिळत असतील तर तिथे स्थानांतर का करत नाहीत. एकुण नोकरी करणार्‍या लोकांपैकी ५-१० टक्के लोकांना हे शक्य असावे नक्कीच.
  • Log in or register to post comments
स
साधा मुलगा Wed, 12/02/2015 - 07:11 नवीन
ते झालच हो साहेब, पण आमच्यासारख्या जन्मजात मुंबई/ठाणेकराला गाडी परवडत नसल्याने दुसरा पर्याय नाही हो. मुंबई बाहेरच्या लोकांना मुम्बैची सोलिड क्रेझ असते , त्यामुळे सगळे मुंबईला यायला बघतात, खरे पहिले तर छोट्या शहरात सर्व सुविधा आणि प्रगतीच्या संधी असतील तर मुंबईत यायची गरज नाही, जाऊदे यावर एक स्वतंत्र धागा निघू शकतो, उगाच विषयांतर नको.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Wed, 12/02/2015 - 07:29 नवीन
+१ सहमत. बाहेरची गर्दी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साधा मुलगा
व
वेल्लाभट Wed, 12/02/2015 - 07:30 नवीन
लोकसत्तात आज जो अग्रलेख आला आहे, त्याबद्दल माझं मत, पत्राद्वारे. ▼ Wednesday, December 2, 2015 Re: बिनडोकांची राष्ट्रभक्ती लोकसत्ता अग्रलेख http://www.loksatta.com/aghralekh-news/national-anthem-in-multiplex-1165590/ त्याबद्दल माझे विचार, पत्ररूपात. नमस्कार महोदय, लोकसत्ताच्या २-१२-२०१५ रोजीच्या अंकातील आपला अग्रलेख, 'बिनडोकांची राष्ट्रभक्ती' वाचला. त्याबद्दल माझे विचार थोडे वेगळे आहेत. ते आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा पत्रप्रपंच. दिवसागणिक घडणा-या असंख्य अशा गोष्टी असतात की ज्यात बघ्याची भूमिका घेणारे १० असतील तर एखादाच असतो जो झाला प्रसंग निस्तरायचा प्रामाणिक प्रयत्न करू पाहतो. बाकी बहुतांश लोक 'मला काय फरक पडतो?' मानसिकतेच्या प्रभावाखाली असतात. सिनेमागृहातल्या घटनेत दोन गोष्टी आशादायी आहेत. एक म्हणजे अर्थातच तिथे उपस्थित असलेले ते' ४-५ जण वगळता सर्वजण राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे राहिले, आणि बहुतांश जण नेहमीच राहतात. दुसरी गोष्ट म्हणजे समोर घडणारी एखादी घटना चूक वाटल्यावर तिच्या विरोधात एकत्रितपणे आवाज उठवला गेला. देशातील वाढता बेदरकारपणा रोखायचा असेल तर माझ्या मते अशी एकी वेळोवेळी दिसायला हवी. कायद्याच्या मुद्द्याकडे येतो. कायद्याने राष्ट्रगीताला उभं राहणं बंधनकारक नाही. तुम्ही देशभक्तीची सक्ती करू शकत नाही. पण त्या नात्याने तुम्ही सहिष्णुतेचीही सक्ती करू शकत नाही. तुम्हीच म्हटलेल्या मुद्द्यांनुसार, सिनेमागृहात फोन न घेणे, मोठ्याने न बोलणे, इत्यादी गोष्टीही कायद्याने निषिद्ध नाहीत. परंतु एखादी व्यक्ती मोठ्याने फोन वर बोलत असेल तर तिला दटावणारे दहा लोक असतातच. तसाच प्रकार इथे झाला. कायद्यावर बोट ठेवणे हा सदर घटनेच्या भावनिक चौकटीला दिलेला छेद आहे. कायद्यात निषिद्ध नसलेल्या अशा असंख्य गोष्टी आहेत ज्या आपण रीत म्हणून, पद्धत म्हणून, सगळे करतात वा करत नाहीत म्हणून पाळतो. सिनेमागृहात सिनेमाच्या आधी राष्ट्रगीत ऐकवण्याची प्रथा गेली अनेक वर्ष चालू आहे. झाल्या प्रसंगासारखे प्रसंग आधीही नक्कीच झाले असतील. पण कसं आहे की सद्ध्याच्या काळात मुद्द्यांना मोठं रूप देऊन देशाची असहिष्णू म्हणून प्रसिद्धी करण्याचाही ट्रेंड आला आहे, ट्रेंड; जसा ध्वनिचित्रफीत काढण्याचा आला आहे तसाच. पुढे जाऊन मी असं म्हणेन की असाच एकत्रित विरोध जर कचरा टाकणे, थुंकणे, उगाच हॉर्न वाजवणे, आणि तुम्ही दिलेल्या राष्ट्रसेवेच्या प्रत्येक उदाहरणाबाबत झाला, तर प्रगतिपथावर देशाची गती वाढेल, समाजाला आपोआप शिस्त येईल, नियम मोडण्याची वृत्ती कमी होईल आणि सर्वांचंच कल्याण होईल. तेंव्हा राष्ट्रगीत सिनेमागृहात का? आणि उभं रहायचा नियम नाही वगैरे मुद्द्यांपेक्षा खरं तर याच दरम्यान झालेल्या लोकल अपघातात लोकांनी एकत्रित होऊन लोकलमधे लटकणा-या त्या मुलाला वाचवायचा प्रयत्न का नाही केला हा प्रश्न जास्त त्रास देणारा असायला हवा. आमिर खान असो, शाहरुख खान असो, किंवा सिनेमागृहातलं राष्ट्रगीत प्रकरण असो; देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने, देशभक्तीच्या भावनेतून होणारं हे सामाजिक एकीकरण हे चांगलं लक्षण आहे. कदाचित थोडं अतिरेकी वाटेलही ते अनेकांना, पण प्रत्येक रूढ गोष्ट ही कधीकाळी अतिरेकी ठरवलेली असते. तेंव्हा ही सार्वजनिक देशभक्ती पुढे जाऊन एका सकारात्मक ऊर्जेचं रूप घेईल, अशी मी आशा करतो. अपूर्व ओक
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा