Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गीत गाता चल (पण नक्की का..?)

च
चलत मुसाफिर
Mon, 12/28/2015 - 17:33
🗣 64 प्रतिसाद
भारतीय सिनेमाची पायाभरणी झाली, तेव्हापासून आजतागायत गाणी हा प्रत्येक चित्रपटाचा अविभाज्य भाग होऊन राहिलेला आहे. इतकेच नव्हे तर चित्रपटांची अख्खी बांधणी ही गाण्यांचे बिंदू पकडून अवतीभवती केली जाते. (इथे फक्त हिंदी सिनेमा नव्हे तर सर्वभाषिक भारतीय व्यावसायिक चित्रपट अभिप्रेत आहेत). हे भारतीय उपखंडाबाहेर कोणत्याच सिनेमा उद्योगात आढळत नाही. युरोपीय किंवा हॉलिवूड सिनेमात संगीताचा वापर केलेल्या चित्रपटाला 'म्युझिकल' असा वेगळा शब्द वापरतात. भारतीय सिनेमाला ही संकल्पना लागू होऊ शकत नाही. असे का, हे कोडे मला अनेक वर्षांपासून छळत आलेले आहे. प्रत्येक सिनेमात गाणी असायलाच हवी या धारणेमागे काही मानसशास्त्रीय किंवा समाजशास्त्रीय कारण आहे असा माझा ठाम समज झालेला आहे. पण अजून ते कारण मला उमगलेले मात्र नाही. जी कारणे सामान्यपणे पुढे केली जातात ती मला कधीच पूर्णपणे पटलेली नाहीत. पैकी काही अशी: * मुंबईत जन्मलेल्या सिनेमाला मराठी, गुजराती व पारशी संगीत नाटकांशी स्पर्धा करण्यासाठी गाणी दाखवणे भाग होते. (ती स्पर्धा सिनेमाने केव्हाच नाटकाला धूळ चारून जिंकली. आता तर नाटकच आमूलाग्र बदलले.) * प्रेक्षकांना लहानपणापासून अंगाई, भजने, ओव्या, कवाल्या, लोकगीते ऐकण्याची सवय होती (नामंजूर. ती सवय जगात सगळ्यांना तेवढीच असते. भारतीयही काही रोज नेमाने बागेत जाऊन गात नाहीत) * गाण्यांमुळे दोन घटका करमणूक होते (चूक. लोक गाणी सुरू झाली की विड्या ओढायला बाहेर जातात) * सिनेमाची प्रसिद्धी होते. (मग बाकीच्या देशांत फिल्मी गाणी का नाहीत?) ***** सिनेमातील गाण्यांचे काही विशेष गुणधर्म आहेत (प्रत्येकी सन्माननीय अपवाद अर्थातच आहेत). * पंचाण्णव टक्के गाणी ही मोजक्या मूठभर प्रसंगांवर बेतलेली असतात. खोखोच्या भोज्याप्रमाणे प्रत्येक चित्रपटाला हे सर करत पुढे जायचे असते. त्यात नावीन्य कधीच नसते. उदा. आई बाजारात भाजी घेतानाचे गाणे, ड्रायव्हर आपली गाडी ओव्हरहॉल करतानाचे गाणे, पशुवैद्य म्हशीला तपासतानाचे गाणे किंवा पोलीस पंचनामा लिहितानाचे गाणे वगैरे कधीही चित्रपटात असू शकत नाहीत (ही पात्रे मात्र असू शकतात). * कोणती पात्रे गाणी म्हणू शकतात आणि कोणती नाही हे ठरलेले असते आणि त्यात फार बदल होत नाही. * गाण्यांच्या सुरावटी, संगीतरचना, वाद्यवृंद, आवाज यात प्रयोग होत असतात. पण शब्दरचनेत आणि कल्पनाशक्तीत फार फरक करता येत नाही. * बहुतेक गाणी ही generic (मराठी प्रतिशब्द?) असतात आणि त्यांना चित्रपटापेक्षा स्वतंत्र असे आपले अस्तित्व असते. चित्रपटांतील पात्रे ती गाणी एकमेकांना उद्देशून म्हणत असली, तरी गाण्यांच्या ओळीत त्यांची नावे कधीच गुंफलेली नसतात. * शेकडा नव्व्याण्णव गाणी ही प्रशिक्षित गायकांच्या आवाजात मुद्रित होतात. * मुळात पात्रांनी गाणी म्हणणे हेच अवास्तव असल्यामुळे की काय, गीत चित्रीकरणात वास्तवाला पूर्णपणे तिलांजली देऊन नर्तकांचे समूह, भपकेदार नेपथ्य, सफाईदार पदन्यासावली, अशक्य कोटीतील कपडेलत्ते, चित्रणस्थळे इत्यादिचा सढळ हस्ते वापर केला जातो. * गाणे संपताच चित्रपट मख्खपणे मूळपदावर येतो आणि पुढे चालू लागतो. म्हणजे काय की, "ए, आपण ते मेक्सिकोच्या समुद्रावर नाचत होतो ना, तेव्हा मला एकदम गुहागरच्या आईआजी आठवल्या. भेटल्या नाहीत किती दिवसात", किंवा "अगं, परवा मला लोकलमध्ये तो नायर दिसला. अगं, तो तुझ्यामागे निळं बनियन घालून नाचत होता तोच" असे प्रसंग कधीही चित्रपटात नसतात. (इथे विनोद अभिप्रेत नाही). मूळ चित्रपटापासून संपूर्ण फारकत घेतलेली असते. **** या मुद्द्याचा कुणी विशेष अभ्यास केलेला आहे काय? यावरून भारतीय समाज, मानसिकता, जडणघडण यावर काही खास प्रकाश पडतो काय?
वर्गीकरण
चित्रपट
समाज
मानसशास्त्र

प्रतिक्रिया द्या
25702 वाचन

💬 प्रतिसाद (64)
च
चौथा कोनाडा Sat, 04/11/2020 - 09:57 नवीन
नायक-नायिका स्वतः गात नाचत नाहीत, नाचणार्‍यांच्या फौजा नाहीत, युरोप स्विझरलंड सारखी डोळे दिपवणारे स्थळदर्शन नाही, पण .. साधं-सुधं गाणं, पार्श्भुमीवर वाजणारं, प्रेम भावना व्यक्त करणारं, ....
  • Log in or register to post comments
स
सूक्ष्मजीव Sat, 04/11/2020 - 14:08 नवीन
भारतीय संगीतातील वैविध्य आणि जनमानसावरील त्याचा प्रभाव या दोन बाबी ध्यानात घेणे खूप आवश्यक आहे. कीर्तन, तमाशे, सोंगी भजने, इत्यादी सर्व कलाप्रकारांमध्ये संगीताला खूप महत्व आहे, ही बाब सिनेमात सुद्धा सारखी आहे. आज आपल्याला अनेक चित्रपटांच्या नाव व कथेपेक्षा पेक्षा त्यांची गाणी आठवणीत आहेत यातच सर्व आले असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Sun, 04/12/2020 - 16:30 नवीन
चित्रपट सपशेल विसरला जातो आणि गाणी मात्र मुळाबरहुकूम याद रहातात यात काहीतरी गफलत आहे असे नाही वाटत तुम्हाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूक्ष्मजीव
च
चांदणे संदीप Sat, 04/11/2020 - 15:31 नवीन
इशारा : हे गाणं अतिशय रक्तरंजित आहे. D-Day चित्रपटातलं हे गाण आहे. सुंदर किंवा पुन्हा पुन्हा बघण्यासारखे आजिबातच नाही पण हे गाणं ज्या पद्धतीने चित्रीत केलं आहे ते जबरदस्त आहे. संवादांऐवजी आणि फ्लॅशबॅक वगैरेंऐवजी गाण्यातून घडलेला प्रसंग कथेतील नायकाला आणि प्रेक्षकांना सांगितल्यानेच ते अतिशय परिणामकारक झालेलं आहे. असं उदाहरण विरळच. या गाण्यानंतर मी थिएटरमध्ये उभा राहून टाळ्या वाजवल्या होत्या. सं - दी - प
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 04/13/2020 - 10:00 नवीन
बघून काटा आला अंगावर !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
अ
अभ्या.. Mon, 04/13/2020 - 10:10 नवीन
हे गाणं बघणं झेपलं नव्हतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
ह
हुप्प्या Sun, 04/12/2020 - 22:47 नवीन
हिंदी म्हणवले जाणारे सिनेमे वास्तविक हिन्दी वा उर्दू भाषेतले असतात. भारताच्या अनेक भागात ही भाषा तितकीशी चांगली कळत नसावी (स्वानुभव!). महाराष्ट्र, गुजराथ, बंगाल, ओरिसा आणि दक्षिणेतील राज्ये जिथे हिंदी सिनेमे बघितले जातात तिथे पल्लेदार, उच्चभ्रू भाषेतले संवाद तितकेसे समजत नाहीत. उलट संगीत हे भाषेच्या मर्यादा ओलांडून अंतःकरणाला भिडते. विशेषतः जेव्हा संगीताचे सुवर्णयुग होते तेव्हा अत्यंत प्रतिभाशाली संगीतकार, गीतकार, गायक आणि वादक हे संगीत निर्मिती करत होते. गाण्याच्या गेयतेमुळे जरी भाषा १००% कळली नाही तरी गाणी सर्वदूर लोकप्रिय झाली आणि त्यामुळे ते पुण्य सिनेमाच्याच पदरात पडले असेल. अगदी लग्न वा अन्य समारंभात अगदी बिगर हिंदी भाषिक लोक आवडीने हिंदी सिनेमातली गाणी वाजवतात, गातात आणि ऐकतात, त्यावर नाचतात. अशा प्रकारे उत्तम संगीत असलेले सिनेमे उत्तम धंदा करत आहेत असे लक्षात आल्यावर निर्माते हा घटक सिनेमात नेहमीच समाविष्ट करू लागले आणि ह्या उद्योगाला चालना मिळाली आणि ते संगीत अधिकधिक समृद्ध झाले. बाकी भागात जसे इराण, जपान, कोरिया जिथे उत्तम सिनेमे बनतात तिथे भाषेचे इतके वैविध्य नाही. अगदी हिंदी भाषिक लोक पाहिले तरी वेगवेगळ्या राज्यात स्थानिक पातळीवर हिंदी सिनेमापेक्षा वेगळी भाषा वा बोली बोलली जाते. जसे राजस्थानी, भोजपुरी, हरियाणवी इ. संगीत हा ह्या भाषिक अडथळ्यांना ओलांडून जोडणारा दुवा आहे असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Mon, 04/13/2020 - 04:33 नवीन
मराठी, तामिळ किंवा बंगाली चित्रपट केवळ त्या विशिष्ट भाषिक समूहातच पाहिले जातात. भाषा न समजण्याचा प्रश्नच येत नाही. मग तिथे गाणी टाकायचे काय कारण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
ह
हुप्प्या Mon, 04/13/2020 - 18:59 नवीन
प्रादेशिक भाषांत गाणी का? संगीत नाटकांची परंपरा. सुरवातीला सिनेमाला संगीत नाटकांशी स्पर्धा करावी लागत होती म्हणून त्यात गाणी असणे अपरिहार्य होते. नंतर हिंदी सिनेमांचे अनुकरण म्हणून गाण्याची परंपरा चालू राहिली असेल. प्रत्येक स्थानिक भाषेत काही तरी पारंपारिक संगीत आहेच. भांगडा, तमाशा, गरबा, दांडिया इ. हे सगळे सिनेमात आणून जास्त प्रेक्षक यावेत आणि जास्त पैसे मिळावेत हा उद्देश असेल. काही गोष्टी अशा असतात की एकदा का पुरेशी प्रेरणा मिळाली की मग ती पद्धत सुरु होते आणि आपल्या इनरशियामुळे चालूच रहाते. एकदा संगीत बनवायची यंत्रणा सिनेमा उद्योगाचा भाग बनली की मग नव्या सिनेमांना आपल्या सिनेमाला संगीत असलेच पाहिजे असे वाटू लागते. इतके कलाकार उपलब्ध आहेत तर का नाही चार पाच गाणी घालायची असा निर्माताही विचार करत असेल. कदाचित नजीकच्या काळात कुठल्या प्रतिभावान दिग्दर्शकाने कमी वेळेचे, गाणी नसलेले सिनेमे बनवले आणि ते खूप लोकप्रिय झाले तर ही पद्धत बदलू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चलत मुसाफिर
क
कानडाऊ योगेशु Mon, 04/13/2020 - 20:17 नवीन
भारतीय चित्रपटाला संगीत नाटकाची परंपरा आहेच. मग प्रशन असा पडतो कि संगीत नाटकातही नाट्यपदे का होती? त्याचा विचार करता असे दिसते कि भारतात निर्माण झालेले सगळे पुराणकथा संबंधित साहित्य,धर्मग्रंथे वगैरे पद्यात्मक शैलीत आहेत. महाभारत रामायण ही तर सर्वश्रेष्ठ महाकाव्ये आहेत. हा प्रकार इतर धर्मासंबंधित साहित्यात नसावा. त्यामुळे एकदा पद्यात्मक शैली वा काव्य आले कि अशा साहित्याच्या सादरीकरणात तत्संबंधी गायन वगैरे प्रकार ही आपोआपच आले असणार त्यामुळे संगीत हा अश्या सादरीकरणाचा अविभाज्य भाग झाला असावा. आणि एकुणच चित्रपटासारख्या आधुनिक माध्यमाला जिथे मार्केटींगची अतोनात गरज आहे तिथे चपखल बसला. भारतीय माणुस उत्सवप्रिय असल्याने ह्यावेळी वाजवल्या जाणार्या गाण्यांनी चित्रपटांची आपसूकच प्रसिद्धी होते. दुसरा उपप्रश्न निर्माण होतो कि भारतीय पुरातन साहित्यात इतक्या पद्यमय रचना होण्याचे कारण काय असावे. तर त्याचे उत्तर अशा रचना पाठ करायचा सोप्या जात असाव्यात असे असावे.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Tue, 04/14/2020 - 08:19 नवीन
अगदी पर्फे़ट मांडलंय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु
च
चलत मुसाफिर Tue, 04/14/2020 - 11:14 नवीन
मुळात व्यावसायिक नाटक हा कलाप्रकार भारताच्या काही मोजक्या भागातच आढळतो. भारतीय चित्रपट उद्योगाचा पाया ज्या मुंबईत रचला गेला तिथे व्यावसायिक रंगभूमी सशक्त होती व अजूनही आहे, हे मान्य. परंतु जिथे आता नाटकानेच संगीताचा त्याग केला आहे, तिथे चित्रपट मात्र ही उधारीची शैली अजून का रेटत आहेत? दुसरे म्हणजे संगीत रंगभूमी जिथे अजिबात अस्तित्वात नव्हती अशा प्रांतांतील प्रेक्षकवर्गातूनही सिनेमात पाचसहा गाणी हवीच अशी अपेक्षा कशी काय निर्माण झाली असेल? याचा उलगडा करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु
क
कानडाऊ योगेशु Tue, 04/14/2020 - 15:25 नवीन
ह्याचे मूळ आपल्या भारतीयांच्या मनोवृत्तीत असावे. प्रत्येक प्रसंगात काहीतरी सेलिब्रेशन (संपन्न करणे ह्या अर्थाने) हवे असते आपल्याला. ते गीत संगीताच्या माध्यमातुन बाहेर पडते.अगदी बारश्यापासुन ते पार अंत्ययात्रेपर्यंत च्या प्रसंगात ह्या प्रकाराची रेलचेल आढळते. जेव्हा नाटक चित्रपट नव्हते तेव्हाही मंगळागौरी,हादगे, भोंडले,गरबा,पिहु ,बैसाखी,पोंगल्,ओणम वगैरे जिऑग्राफिकली दूर असलेल्या प्रदेशातले उत्सव गीत संगीताचा वापर करुनच साजरे केले जात होतेच कि. इन फॅक्ट महाराष्ट्रातच पूजेत म्हटल्या जात असलेल्या आरत्या सुध्दा हेच सिध्द करतात. असा प्रकार पाश्च्यात्य देशात नसावा. ख्रिसमस मध्ये म्हणण्यात येणार्या केऱोल चा अपवाद. पण हा एक आखीव रेखीव प्रकार असतो. पण आपल्या कडे एखाद्या लग्नात कोणेही स्वरचित मंगलाष्टके उच्च स्वरात गाऊन आपापली गायन कलेची हौस भागवु शकतो. मुद्द्याचे सांगायचे म्हणजे चित्रपट नाटक जरी आधी गीत विरहीत असले असते तरी कालांतराने त्यांचा शिरकाव झालाच असता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चलत मुसाफिर
ह
हुप्प्या Tue, 04/14/2020 - 17:44 नवीन
एक उत्सुकता म्हणून भारतातील कुठल्या भागात व्यावसायिक नाटक हा प्रकार नाही? आणि व्यावसायिकच का? विविध सण सोहळे जत्रांच्या निमित्ताने पारंपारिक नाटके, गाणी, नाच हे सगळ्या भागात होतेच. (निदान मला तरी असे वाटते.) त्यातील काही सिनेमात ऐकू आले तर आश्चर्य काय? आणि संगीत नाटकांमुळे सिनेमात गाणी आली ह्याचा अर्थ असा नाही की ज्याक्षणी नाटकातील गाणी गायब होतील त्यानंतर लगेचच सिनेमातीलही व्हावीत. हा वैज्ञानिक परिणाम नव्हे. सिनेमातील संगीत हा एक मोठ्या उलाढालीचा व्यवसाय आहे. पुरवठा आणि मागणी मोठी आहे. हल्लीची गाणी १-२ महिनेच चालतात ही गोष्ट वेगळी पण तरी जवळपास सगळ्या सिनेमात ती असतात. त्यामुळे संगीतकार, गायक, वादक, रेकॉर्डींग कलाकार, मिक्सिंग, एडिटिंग आणि शिवाय वितरण, प्रसिद्धी वगैरे करणारे हे सगळे क्षणार्धात कसे थांबेल? पूर्वी जेव्हा एका इमारतीत एकच थेटर असायचे तेव्हाची गोष्ट आहे. सिगरेट, विडी वगैरे ओढणार्‍या लोकांकरता गाणी हा एक हमखास ब्रेक असे. निवांतपणे, गर्दी वगैरे टाळून हे कार्यक्रम करण्याकरता गाणी ही एक चांगली संधी होती! आता बहुधा थेटरात वा आवारात धूम्रपान बंदी आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चलत मुसाफिर
  • «
  • ‹
  • 1
  • 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा