कार्यक्रमाचे आयोजन: मदत पाहिजे
नमस्कार मंडळी,
माझ्यावर तीन-चार तासाचा 'एक तज्ञ वक्त्याचे व्याख्यान + उत्पादन-प्रसिद्धी कार्यक्रम' आयोजित व सूत्रसंचालित करण्याची जबाबदारी आली आहे. मला व्यासपिठीय कार्यक्रमांची श्रोता म्हणून जुजबी माहिती असली तरी योग्य रुपरेषा, कार्यक्रमाच्या पूर्वतयारीपासून प्रत्यक्ष कार्यक्रमाची घटना-संगती कशी असावी याबद्दल एक आयोजक-सूत्रसंचालक ह्या नात्याने शून्य माहिती व अनुभव आहे. या संदर्भात मला अनुभवी मिपाकरांची मदत अपेक्षित आहे. नेहमीप्रमाणे आपण मदत कराल अशी अपेक्षा आहे.
१. कार्यक्रमाची आखणी कशी करावी?
२. कार्यक्रमासाठी लागणार्या वस्तू कोणत्या?
(आत्ता माझ्या यादीत समई, तेल, वात, गणपतीची मूर्ती, फुले, शाल्+श्रीफळ, स्मृतिचिन्हे, नोंदवह्या, पेन्स, पिण्याच्या पाण्याची बॉटल्स, ध्वनिक्षेपक यंत्रणा, प्रोजेक्टर+स्क्रिन, लॅपटॉप, फीडबॅक फॉर्म्स, कार्यक्रम-पत्रिका, उत्पादनसंबंधी पत्रके, बॅनर्स, जेवणाची व्यवस्था, इत्यादी आहे. अजून काही?)
३. श्रोते स्थानापन्न झाल्यापासून ते आभारप्रदर्शनापर्यंत कार्यक्रम कसा असतो? म्हणजे आधी व्यासपिठावर संबंधितांना निमंत्रित करावे, नंतर दिप-प्रज्वलन करावे, नंतर सत्कार करावा, कार्यक्रमाच्या आयोजनाचा उद्देश नक्की कधी सांगावा, नक्की क्रोनोलॉजी काय असली पाहिजे?
४. अजून काही नेहमी उद्भवणार्या समस्या व त्यावरिल उपाय?
सध्या इतकेच प्रश्न आठवत आहेत. ह्याबद्दल अगदी सविस्तर अशी माहिती मिळाली तर आभारी राहिन. काडीचीही कसर राहू नये असे नियोजन करावे असा एक धागा आत्ताच कुणीतरी काढला होता. त्याप्रकारचे नियोजन कसे करावे याबद्दल जाणकारांना विनम्र विनंती की योग्य मार्गदर्शन करावे.
मदतीसाठी आगावू धन्यवाद!
- कार्यक्रमपत्रिका -
सुत्रसंचलन : नमस्कार, आज आपण मिसळपाव डॉट कॉमच्या वर्धानपन दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी जमलेले आहोत. आजच्या आपल्या या कार्यक्रमाला. प्रसिद्ध कवी अमुक धमुक म्हणुन लाभलेले आहेत (परिचयही थोडक्यात सांगितला तरी चालतं ) त्यांच्याबरोबर हेही अमुक धमुक लाभलेले आहेत. आणि अध्यक्ष म्हणुन आमच्या संस्थेचे अमुक धमुक हेही लाभलेले आहेत. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी दीपप्रज्वलन करावं. अमुक धमुकच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा.
[दीपप्रजवलन चालू असलं की तिकडे ब्याकग्राउंडला सनई बिनई वाजली पाहिजे. नसेल चालु तर आपण रनींग कॉमेट्री करत राहावे. आज मान्यवरांनी आमच्या संस्थेला भेट दिली आम्ही कसे पावन झालो वगैरे इत्यादी. पाहुणे जागेवर बसेपर्यंत. एकदा जागेवर बसले की....]
स्वागत : आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत.
१) मुख्य पाहुण्यांचं स्वागतं संस्थेच्या मुख्य माणसाच्या हाताने.
२) अनुक्रमे उतरत्या क्रमाने पाहुण्यांचे स्वागत. आपापल्या जवळच्या माणसांकडून करुन घ्यायचं.
स्वागत संपलं की.
प्रास्ताविक : कार्यक्रमाचा उद्देश सांगणारा आपला जो मुख्य माणुस आहे त्याचं प्रास्ताविक.
प्रास्ताविक संपलं की आत्ताच आमच्या अमुक धमुक यांनी आपणासमोर या कार्यक्रमाचा उद्देश सांगितलाच आहे या नंतर या कार्यक्रमाला लाभलेले
प्रमुख पाहुण्यांचं मनोगत : (वक्ते किती आहेत ते पाहुन. कमी प्रतीच्या वक्त्याकडून अगोदर बोलवून घ्यायचं आणि मग एकेक करत प्रमुख पाहुणे.
अध्यक्षीय समारोप : आपल्या कार्यक्रमाचा जो अध्यक्ष आहे. (संस्थेचा प्रमुख किंवा अन्य कोणी) आपल्या सर्वांच्या बहुमुल्य मार्गदर्शनानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करावा ही विनंती. समारोप झाला की या नंतर मी अमुक धमुक यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचे आभार मानावेत. आभार मानन्यापूर्वी आपण सर्वांना विनंती की कार्यक्रम संपल्यानंतर वरच्या चार नंबर हॉल मधे अल्पोपहाराचा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी उपस्थितांनी त्याचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद.
आभार प्रदर्शन : मा. श्री यांना विनंती की त्यांनी या कार्यक्रमास उपस्थितांचे आभार मानावेत. [अतिशय रटाळ प्रकार]
(आभार प्रदर्शन झाल्यानंतर लोक उठायला लागतात. आभार असे म्हटले की लोक उठलेलेच असतात)
सुत्रसंचलन करणार्याने पुन्हा एकदा लेक्चर स्टँडसमोर येऊन पुरुषांनी डाव्या बाजूने जिना चढावा, स्त्रीयांनी उजव्या बाजूंनी जिना चढावा, अशा सुचना दिल्या तरी चालतात. सुत्रसंचलन करणार्याने फार बोर करु नये. सुत्रसंचालकाची भूमिका कार्यक्रम पुढे घेऊन जाण्याची आहे हे त्याने विसरु नये. सुत्रसंचालक स्मार्ट असला आणि दिसला पाहिजे. खुप मोठा आवाज नको, खुप हळुही नको. एका शांत लयीत बोलणं असलं पाहिजे. (प्रसंगानुसार बोलण्याचं भान सुत्रसंचालकाकडे असलं पाहिजे, सारखं माईकला खटपट करणे टाळावं, हातवारे टाळावेत, सारखं माना इकडे तिकडे करणे टाळावेत, चुक होऊन नये म्हणुन मोबाईलवर अथवा कागदावर व्यवस्थीत कार्यक्रमपत्रिकेप्रमाणे कार्यक्रम पुढे घेऊन जावा. हार तुरे देणारी मुलं मुलींना कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी सुचना देऊन ठेवावी. त्यांनी कधी यायचं वगैरे)
अजून काही आठवलं जे सांगायचं विसरलो तर पुन्हा पुरवणी प्रतिसाद जोडतो.
-दिलीप बिरुटे