पाककृती

शेवग्याचे सार

Primary tabs

शेवग्याच्या शेंगाना डांबेही म्हणतात. शेवग्याच्या पानांची, फुलांचीही भाजी करतात. शेवग्याच्या शेंगा पिठलं, आमटी यात वापरतात पण आज मी तुम्हाला खास थंडीत करण्यासारख्या साराची कृती सांगतेय.
shevga
फोटो आंतर्जालावरून साभार

साहित्यः १० शेवग्याच्या शेंगा, अर्ध्या ओल्या नारळाचे खोबरे, एक चमचा आमचुर, मीठ, साखर, दोन चमचे तूप, जीरे, हिंग चिमुटभर, ओल्या मिरच्या दोन तीन, कढीलिंबाची ७/८ पाने.

कृती: शेंगांचे बोटभर लांबीचे तुकडे करून त्यात थोडे पाणी घालून शिजवून घ्यावेत. गार झाल्यावर चमच्याने त्यातील गर, बीया काढून घ्याव्या. शेवग्याच्या बिया टणक असतील तर त्या घेऊ नयेत. काढलेल्या गरात शिजवताना घातलेले पाणी आणि एक चमचा आमचूर घालून मिक्सरला फिरवून घ्यावे. ओल्या खोबय्रात एक वाटीभर पाणी घालून दूध काढून घ्यावे, दोन तीन वेळा खोबरे पाणी घालून फिरवून सर्व दूध गाळून शेवग्याच्या गरात मिसळावे. त्यात कढीलिंबाची पाने घालावीत. कढीइतपत पातळ करावे, लागल्यास थोडे पाणी घालावे. चवीनुसार मीठ, साखर घालावे. तूपाची हिंग, जीरे आणि मिरच्या तुकडे घालून फोडणी करावी आणि साराला द्यावी. हे सार उकळले तरीही फुटत नाही. शेवग्याचा वास आवडणाय्राना नक्की आवडेल. थंडीत गरमागरम प्यायला मस्त वाटते.
साधारणपणे एक वाटी गरासाठी अर्ध्या नारळाचे दूध लागते. आवडत असल्यास वरून कोथिंबीर घालावी.
shevga

दिपक.कुवेत

तोंपासु दिसतेय. गर काढून सार करायची आयडीया मस्त आहे. जरुर करीन. आमचूर एवजी कोकम चालेल का? फक्त वाट्णार नाही नाहितर रंगच बदलेल.

मी हेच करणार होते. बरं झालं सांगितलेत ते. रंगाचे डोक्यातच आलं नव्हतं.

अनन्न्या

मला त्याबद्दल फारशी माहिती नाहीय, माहेरून भरपूर आंबोशी मिळत असल्याने लागत नाही.कोकमने रंग बदलेल.

स्रुजा

हो अनारदाणा मिळतो ना.. खुप सुरेख दिसतंय सार. नक्की नक्की करणार, आज आठवणीने शेंगा पण आणल्या त्यासाठी :)

आदूबाळ

करणार!

फक्त शेवग्याच्या शेंगा ओरपून खायचे राहाडे करायची मजा रेडिमेड गर असलेल्या सारात मिळणार नाही. त्यामुळे काहीतरी आयडिया करायला हवी.

गवि

पहिल्यांदाच पाहिली ही पाककृती. खूपच छान वाटतेय. करुन पहायलाच पाहिजे.

गवि

करुन पाहिलं. फार म्हणजे फार टेस्टी प्रकार आहे. गर काढणं वेळखाऊ पडलं. पण शेवटी बनलेलं सार, वर्थ आॅल एफर्ट.

अनेकोत्तम धन्यवाद.

अनन्न्या

करून पाहिल्याबद्दल आणि आठवणीने सांगितल्याबद्दल!

गर काढण्याची आयडीया :- छोटे तुकडे करण्यापेक्षा मोठे तुकडे करा (साधारणतः एका शेंगेचे दोन) आणी कुकर मधे शिजवा .आणी मग चमचाने काढा . सोपं जाईल. हाकानाका !

पाकृ मस्त दिसतेय.फोटोतला साराचा वाडगा तोंडाला लावून पिऊन टाकावासा वाटतो आहे.
स्वाती

यशोधरा

मस्त पाकृ आहे. शेवग्याच्या जराशा टणक उकडलेल्या बिया नुसत्या खायला पण छान वाटतात.

एस

हटके हय ये! मस्तच!

वेगळीच स्लsssर्प पाकृ ! शेवगा आवडता आहे. तेव्हा, प्रयोग करून पाहण्याजोगा आहे ;) :)

रेवती

अगदी वेगळी पाकृ. फार आवडली. आमच्याकडे या ताज्या शेंगा मिळत नसल्याने वाट पाहणे आले.

पद्मावति

किती छान प्रकार आहे हा. शेवग्याचे सार नवीनच ऐकते आहे. मस्तं आहे.

अनन्न्या

धन्यवाद!!!!
घरच्या वस्तू फुकट जाऊ नयेत पण चवदार पदार्थ झाला पाहिजे यातून केलेला प्रयोग!
खरच खूप मस्त लागते.

शेवग्याची भाजी अथवा वरण हेच दोन प्रकार माहित होते. चवदार असणारच !

अनन्या ताई, आज करून पाहिली ही पाककृती अतिशय अप्रतिम चव होती . धन्यवाद !

त्रिवेणी

मस्त ग एकदम. मागे मी आणि मितान ने कोकणतून आम्बोशी आणले होते.ते कशात वापरू.एकदा डालीत वापरले होते पण कुणास ठावुक काय चुकले?
या साराचा थोडा वेगळा प्रकार कमलिनी कुटीर ला खाल्ला होता.

अनन्न्या

किंवा ती चांगली वाळवून आमचूर पावडर करून ठेव. ती चटणीतही वापरता येते. आंबिशी थोडावेळ भिजवून वापरता येईल आंबे डाळ करता येईल. आमचूर कांदे पोह्यातही आंबटपणासाठी छान लागते.

अनन्न्या

अगं, आंबे काढताना काहीवेळा आंबे पडतात. हे आंबे पिकण्यासाठी ठेवता येत नाहीत.म्हणून त्याच्या फोडी करून उन्हात वाळवतात.अशा फोडींचे पीठ म्हणजे आमचूर

स्रुजा

ओह्ह... आमचूर चा हा कार्यकारण भाव माहिती नव्हता. एकुणात कोकणातले लोकं काही वाया घालवत नाहीत हे खरं.

मोगा

छान.

तीन लोकाना पाउण लिटर तरी लागेल. किती मटेरियल लागेल?

अनन्न्या

मला वाटतय पुरेल. काही शेंगांना गर कमी असतो.

शेंगा आहेत घरात. कमी प्रमाणात करुन बघते आधी.

तुझ्या पाकृ नेहमीच साध्याशाच पण अगदी वेगळ्याच असतात!

सस्नेह

फाकडू पाकृ ! शेवगा + नारळाचं दूध म्हणजे चव स्वर्गीयच असणार !

प्रचेतस

जाम भारी लागत असेल हे सार. करायला पाहिजे.

चतुरंग

जबराट दिसतंय सार! जेव्हा शेंगा मिळतील तेव्हा लगोलग करुन बघायलाच हवं. :)
आमटी, पिठले यातला शेवगा प्रचंड आवडतो पण इथे ताज्या शेंगा मिळत नाहीत त्यामुळे वाट बघावी लागणार! :(
(शेंगा वरपून खाण्यात जामच मज्जा येते! लहानपणी मी ताटाच्या भोवती खल्लेल्या शेंगांच्या चोयट्यांचा ढीग लावायचो आणि आई चिडायची! :) )

स्वाती२

मस्त पाकृ! इथे फ्रोजन शेंगा मिळतात त्याचे असे सार करुन बघायचा मोह होतोय.

वर्णन फारच चविष्ट आहे. नक्कीच लवकरच करून पाहण्यात (आणि चाखण्यात) येईल.

पिशी अबोली

करून पाहणार नक्कीच.
नारळाच्या दुधाऐवजी ताक घेतले तर अशीच कढी बनू शकेल का?

अनन्न्या

शेवग्याच्या उग्रपणाला कमी करण्यासाठी नारळाचे दूध योग्य होते.

पिशी अबोली

केली गं केली..खूपच अप्रतिम चव झाली होती..मजा आली..

गवि

खरंच मस्त लागतं. ही ओरिजिनल नवीन आयडिया असल्याने आणखीच कौतुक वाटतं.

अनन्न्या

ही रेसिपी विष्णू मनोहरना सांगितली होती, एका स्पर्धेला ते जज होते तेव्हा!

सविता००१

खरच अप्रतिम झालं होतं सार.
आवडलंच. भन्नाट. तूफान..

बॅटमॅन

रेशिपी तर एकच नंबर....

आंध्रा साईडला शेवग्याच्या पानांची चटणी/भाजी करतात असे तेलुगु मित्रांकडून ऐकले त्याची आठवण झाली. हे प्रकर्ण लैच जबराट दिसतेय!!!!

सूड

शेवग्याच्या पानांची भाजी आमच्या घरी होत असे. तेव्हा सोसायटीच्या कंपाऊंडमध्येच एक शेवग्याचं झाड होतं.

असं काही तरी साधं सोपं आलं पाहिजे करायला.
पाहतो ट्राय करुन कितपत जमतं कै माहिती.

आवडलं. मस्त. भारी. खास. लै भारी. म्हण्जे लैच आवडलं.

-दिलीप बिरुटे

जेपी

आज हे सार करुन पाहिले...फक्त कर्नाटकी टिव्स्ट दिला.
१) शेवगा उकदुन त्याचा गर काढुन घेतला..
२)फोडणीत तेल जिरे-मोहरी.कडीपत्ता,हिंग याची फोडणी केली.
३)यात शेवग्याचा गर, चिंचेचा कोळ( अर्धा वाटी) चविपुरता गुळ आणी वरुन ओले नारळ खिसुन टाकले.
1

हे सार वरणाला पर्याय ठरल्यामुळे याला आमच्या किचनच्या टॉप टेन रेसिपीत जागा मिळाली.;)
1

प्रियाजी

अनन्या, तु वर दिलेले सार (ओरिजीनल) करून पाहिले. फक्त उन्हाळा असल्याने थंड करून प्यायले. फारच सुन्दर! फोटो मात्र राहिला.