Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शब्दकोश

स — सुचिकांत, गुरुवार, 02/11/2016 - 18:33
मराठीसाठीचा एक सुंदर उपक्रम. शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल..... शब्दकोश प्रकल्प, इ. नववी :- _______________________ अक्षरनंदन शाळेतल्या इ. नववीच्या मुलांचा (मुली आणि मुलगे यांना सयुक्तपणे उद्देशून) ‘शब्दकोश प्रकल्प’ घेतला. वर्गातल्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेपेक्षा अशा प्रकल्प /उपक्रमातून खरं शिक्षण होत असतं; हे जितकं खरं तितकंच शिक्षकालाही आपलं ज्ञान/आपलं अध्यापन/आपली अध्यापनाची दिशा तपासण्याची संधी यांतून मिळत असते. उपक्रमांतून मुलं जितकी जास्त अभिव्यक्त होत असतात तितकी परीक्षातंत्रातून क्वचितच! विशेषत: भाषाविषयक प्रकल्पातून तर मुलांबरोबर शिक्षकालाही मोठ्ठं होण्याची संधी मिळत असते. या शब्दकोश प्रकल्पातूनही मुलं भाषेकडे /शब्दकोशाकडे कशी पाहतात, शब्दकोश कसा आणि कुठल्या पातळीवर समजून घेऊ शकतात; शब्द, शब्दकोशातले वेगवेगळे अर्थ, शब्दाचे घटक याचा अन्वयार्थ ते कसा लावतात, हे समजून घेणं हा माझ्यासाठी विलक्षण अनुभव होता. तो अनुभव मांडण्यासाठीच हा लेखप्रपंच. शब्दकोश प्रकल्पाचा उद्देश : • शब्दकोश हाताळण्याची, पाहण्याची सवय व्हावी. • शब्द आणि त्याचा अर्थ एवढ्यावरच न थांबता शब्दकोशातील इतर घटकांचीही ओळख व्हावी. वेगवेगळे शब्द चाळताना, शोधताना मराठीतील शब्दभंडार मुलांच्या दृष्टीस पडावे. त्यांचा शब्दसंग्रह वाढावा. • मराठीची चौदाखडी परत एकदा गिरवावी, ती पक्की व्हावी. • दोघांनी मिळून प्रकल्प करायचा असल्याने शब्दांबद्दल (शब्दांची निवड, अर्थ, संदर्भ इ.) त्यांच्यात जोरदार चर्चा व्हावी. • शब्दकोशाची शिस्त, आवाका याची कल्पना यावी. त्याची जाणीव व्हावी. पार्श्वभूमी : इ. नववीच्या अभ्यासक्रमात सतराव्या शतकातील रामचंद्रपंत अमात्य यांचा ‘प्रधान’नावाचा पाठ आहे. या पाठातील एका परिच्छेदात (सुमारे १५०-२०० शब्द) प्रधानाची निवड कशी करावी, त्याच्या अंगी कोणते गुण असावेत, याविषयीचे विवेचन आहे. प्रकल्प करण्यासाठी या एकाच परिच्छेदाची निवड आम्ही निश्चित केली. या परिच्छेदातील अवघड/तुमच्या पसंतीचे ४० ते ५० शब्द निवडून त्यांचा शब्दकोश बनवायचाय, हे मुलांना सांगितलं. सुरुवातीला मुलांना हा प्रकल्प अगदीच सोपा वाटला. इकडे (शब्दकोशात) बघून तिकडे उतरवायचे... इतका सोपा... शब्दकोश प्रकल्पाचे टप्पे : • निवडलेला परिच्छेद, त्यातील शब्द, त्यांचा अर्थ याबद्दल मुलांशी सविस्तर बोलणं केलं. (हा परिच्छेद शिकण्यासाठी/समजून घेण्यासाठी आम्हाला ४ तासिका लागल्या.) • पाठाची प्रस्तावना झाल्यावर त्या परिच्छेदाबद्दल मुलांशी बोलणं केलं. परिच्छेदाच्या सुरुवातीलाच प्रधानाचे १२-१५ गुण एका ओळीत सांगितले आहेत. (उदा. कृतकर्मे, कार्याकार्यविचक्षण, नियोजितकार्यधुरंधर, स्फुटवक्ते, दैवतैकनिष्ठ इ.) त्या शब्दांचा अर्थ मुलांना शब्दकोशातून शोधून यायला सांगितलं. (शब्दकोश हाताळण्याचा गृहपाठ दिला.) काही शब्दांचे अर्थ शब्दकोशात मुलांना मिळाले नाहीत. पण त्यानिमित्ताने शब्दकोशाची मांडणी मुलांच्या नजरेखालून गेली. • नंतरच्या तासाला शब्दकोशात काय काय असतं, शब्दकोशाचे किती भाग असतात याबद्दल चर्चा केली. बर्‍याच गोष्टी पुढे आल्या. सुरुवातीला संक्षिप्त रूपं, शेवटी परिशिष्ट अशी शब्दकोशाची मांडणी, शब्दांचे घटक इ. बद्दल मुलांचं निरीक्षण चांगलं होतं. • मुलांच्या निरीक्षणानुसार शब्दकोश प्रकल्पात प्रस्तावना, शब्दार्थ आणि परिशिष्ट असे तीन भाग करायचे ठरले. शब्दार्थ लिहिताना शब्दाची जात, लिंग, मूळ भाषा, वेगवेगळे अर्थ, परिच्छेदातील त्या शब्दाचा संदर्भाने योग्य अर्थ इ. घटक अनिवार्य केले. शब्दाचा समानार्थी, विरुधार्थी शब्द, वाक्यात उपयोग इ. घटक ऐच्छिक ठेवले. • अ‍ॅ आणि ऑ या स्वरांबद्दलही या निमित्तानं बोलणं केलं. • शब्दकोशाची मांडणी, पानाचा लेआऊट याबद्दलही बोलणं केलं. एका पानावर ४-६ शब्दच घ्यायचे ठरले. • शब्द अकारविल्ह्यांप्रमाणे लावणे, हे तर क्रमप्राप्तच होतं. • दोघांच्या गटानी मिळून प्रकल्प करायचा होता. • मुलांना ४-५ शब्दकोश शाळेत उपलब्ध करून दिले. शाळेच्या वेळापत्रकातील २ तासिका (६-८ दिवसांच्या अंतराने) प्रकल्पासाठी मुलांना दिल्या. उर्वरित काम घरी करायचे होते. • शब्दकोश करतानाच्या ‘कार्ड पद्धती’विषयीही बोलणे केले. पाठकोर्‍या कागदांचा यासाठी कसा उपयोग करता येईल हेही सांगितले. • प्रकल्पासाठी १०-१५ दिवसांची मुदत होती. साधारण कामाचे टप्पे काय/कसे असावेत याबद्दलही चर्चा झाली. (जसे – शब्द निवडून ते नक्की करणे, शब्दाच्या घटकांचा क्रम निश्चित करणे, शब्दांच्या शब्दचिठ्ठ्या (कार्ड) करणे, शब्दकोशातून अर्थ, इतर घटक याची नोंद क्रमवार चिठ्ठ्यांवर करणे, अकारविल्ह्यांप्रमाणे चिठ्ठ्या लावून घेणे, प्रत्यक्ष शब्दकोश तयार करणे इ.) प्रत्यक्ष शब्दकोश प्रकल्पाबद्दलची काही निरीक्षणे : १. मुखपृष्ठ : • मुलांनी स्वत:च्या नावाचा लेखक म्हणून उल्लेख न करता संपादक म्हणून उल्लेख केला होता. • मुखपृष्ठं आकर्षक, समजून-उमजून केली होती. • ‘ २१ व्या शतकातील सर्वांत गाजलेला मोरे-नातू शब्दकोश’, ‘आम्हाला आवडलेल्या शब्दांचा कोश’ इ. उल्लेख मुखपृष्ठावर होते. २. प्रस्तावना : १६ व्या शतकातील भाषा, त्याबद्दलची मतं, शब्दकोश म्हणजे काय, प्रकल्प करताना आलेल्या अडचणी इ. बद्दल मुलांनी मोकळेपणानी मतं मांडली होती. त्यातली ही काही बोलकी, नमुन्यादाखलची मुलांची मतं... • भाषेबद्दलची मुलांची मतं : - सतराव्या शतकातील भाषेला मुलांनी ‘जुनी’ भाषा असं संबोधलं आहे. - ...ही भाषा अवघड नाही पण वेगळी आहे. - ...काही शब्द कालबाह्य झाले आहेत तर काहींचा काळानुसार अर्थ बदलला आहे. - ...या भाषेतलं एक वाक्य कळेल तर शपथ, सगळेच बाउन्सर... - ... अर्थच काय पण शब्दांचे उच्चारही नीट जमत नव्हते. आपलं मराठी चांगलं या अभिमानाला पोचे पडत होते. • शब्दकोशाबद्दलची मुलांची मतं : शब्दकोश कशासाठी, त्याची गरज काय याबद्दलची मतं काहींनी विचार करून व्यवस्थित मांडली आहेत. - ... शब्दांना मर्यादा नसतात, शब्द हे बांधीलही नसतात, पण यातल्याच काही शब्दांना बांधून जिथे एकत्रित ठेवले जाते त्याला शब्दकोश म्हणतात. - ...शब्दकोश म्हणजे गतकालीन व विद्यमान व्यक्तींच्या विचारांची तिजोरी होय. - ...शब्दकोश आणि व्याकरण हे भाषेचे दोन डोळे आहेत.. - ... शब्दकोश म्हणजे साठा.. शरीरातील पंचकोश आणि शब्दकोश याकडेही मुलांच्या एका गटाने लक्ष वेधले आहे. • मुलांच्या काही इतर नोंदी : - बाराखडीच्या ऐवजी मराठीत आता चौदाखडी आहे, हे लक्षात घेऊन अनेकांनी मांडणी केली होती. - मराठी वर्णमाला पाठ नसल्याने प्रकल्पात मोठा अडसर निर्माण झाल्याची कबुली अनेकांनी दिली होती. - शब्द सापडत नसताना होणारी तळमळ आणि सापडल्यावर मिळणारी शांती याचा अनुभव अतुलनीय होता असे मत काहींनी नोंदवले आहे. - संधिविग्रह करून शब्द-अर्थ शोधावे लागत असल्याने खूप वेळ लागत होता. वाटलं होतं तेवढं हे काम सोपं नसल्याची कबुलीही काहींनी दिली. - ५-७ पानांचा शब्दकोश करायला/लिहायला २ तास तर १००० शब्दांचा शब्दकोश करायला किती वेळ लागत असेल? असाही विचार मुलं करताना दिसली. ३. शब्द : शब्द हा कोणत्याही शब्दकोशातला महत्त्वाचा भाग. शब्द आणि त्याच्या इतर घटकांच्या नोंदी (शब्दाची मूळ भाषा, शब्दाची जात, लिंग, अर्थ, संदर्भाने योग्य अर्थ इ.) मुलांनी व्यवस्थित केल्या आहेत. त्याविषयी थोडेसे.... - शब्द कोणत्या भाषेतून आले, त्याची मांडणी व्यवस्थित. - शब्दाची जातही बर्‍यापैकी बरोबर लिहिली आहे. - मात्र काही जणांनी विशेषणांच्या बाबतीत लिंगविचार लिहिताना गोंधळ केला आहे. उदा : उद्योगसील – वि. पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आहिंसक – वि. पुल्लिंगी, स्त्रीलिंगी थोर – वि. पुल्लिंगी पापभीरू – वि. पुल्लिंगी (शब्दांच्या जाती मुलं साधारण पाचवीपासून शिकतात. नववीत यावरच्या प्रश्नांची काठिण्य पातळी वाढवण्यासाठी वाक्यातल्या/परिच्छेदातल्या प्रत्येक शब्दाची जात लिही, असेही प्रश्न मुलांना दिले. पण काही अपवाद वगळता विशेषणांचा लिंगविचार हा विशेष्यांच्या बाबतीत करावा लागतो, हे मुलांपर्यंत पोचवायचे राहूनच गेले आहे, हे लक्षात आले. ) - प्रधान पाठ समजून घेऊन पाठाच्या संदर्भात शब्दाचा काय अर्थ जाणवला तो लिहायचा होता. वेगवेगळ्या प्रकल्पातून अर्थाचा किंचितसा फरक जाणवत होता. प्रत्येक मुलाचे वेगळे व्यक्तिमत्त्व असते, त्याप्रमाणे त्याने पाठ कसा समजून घेतलाय ते त्याने लावलेल्या अर्थावरून कळले. उदा : स्फुटवक्ता – मितभाषी, योग्य तेवढे बोलणारा, आपले बोलणे थोडक्यात पण स्पष्टपणे मांडणारा विविध भाषा जाणून संवाद साधणारा कमी शब्दांत आपले म्हणणे पटवून देणारा कार्याकार्यविचक्षण – कार्य आणि अकार्य जाणणारा प्रत्येक काम बारकाईने करणारा कामाचा उपयोग, उद्दिष्ट जाणणारा चतुर माणूस स्वामीसेवकभाव – राजाप्रती असणारी सेवकाची चित्तवृत्ती राजाप्रती असणारे सेवकाचे मन/अंत:करण धनी/ मालक यांचे सेवन करण्याचे भान असणारा राजाशी एकनिष्ठ राहण्याची वृत्ती मालकाची निष्ठेने सेवा करणारा मालकाने नोकरावर केलेली भक्ती नियोजितकार्यधुरंधर - दिलेले काम पार पाडणारा नेमून दिलेले काम कुशलतेने पार पाडणारा कामाचे नियोजन करणारा - काही गटांनी शब्दाचा समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द लिहिण्याचाही प्रयत्न केला आहे. चोरी करणे – विरुद्धार्थी – परत करणे (मुलांच्या निरागसपणाचे यापेक्षा बोलके उदाहरण कोणते असू शकेल? ) - वाक्यात उपयोग - मुलांनी केलेले वाक्यात उपयोग वाचताना मजा आली. त्यांनी केलेले वाक्यात उपयोग आजच्या त्यांच्या दैनंदिन भाषेशी प्रामाणिक होते. काळानुसार बदलते संदर्भ, संकल्पना त्यांच्या वाक्यातून प्रतीत होत होत्या. प्रत्येक शब्दाचा, शब्दाच्या प्रत्येक अर्थाचा वेगळा असाही काही गटांनी वाक्यात उपयोग केला आहे. उदा : कंटक – (सं. पु.) काटा, अडकाटा (वि.) काटक, सोशिक ‘तो आपल्या मार्गातला कंटक आहे प्रिये!’ हुद्दा – (अर. पु.) अधिकार, ताशा ‘हे प्रेम, प्रसिद्धी, स्टारडम तुमच्या हुद्द्याला आहे, तुमच्यासाठी नाही!’ दंड – (ना. पु.) काठी, सोटा – आखाड्यातील पैलवान सहजपणे दंड फिरवत. खांद्यापासून कोपरापर्यंतचा भाग – आजकाल बायकांनी दंडात वाकी घालायची पद्धत उरलीच नाही. शिक्षा म्हणून घेतलेला पैसा – रिक्षावाल्याने सिग्नल तोडल्याने पोलिसाने त्याच्याकडून दंड घेतला. मार/शिक्षा – नियम तोडल्याने त्याला चांगलाच दंड मिळाला. शिवणीचा एक प्रकार - न्याय – (ना. पु.) यथार्थता, वाजवीपणा, नीती प्रत्येकवेळी केलेला न्यायनिवाडा हा नि:क्षपाती असला तरच त्याला न्याय म्हणण्यात अर्थ आहे. ईर्ष्या – (ना. स्त्री.) चुरस, हेवा, मत्सर ईर्ष्या अंगी बाळगल्याने माणसाला द्वेष, यातनेशिवाय काय साध्य होते? ४. परिशिष्ट : परिच्छेदाच्या भाषिक वैशिष्ट्यांबद्दल वर्गात मुलांशी बोलणं केलं होतं. त्यानुसार मुलांनी लिहिलेली वैशिष्ट्ये : - विशेषणांचा मोठ्या प्रमाणावर वापर आढळतो. - खूपच लांबलचक वाक्ये आहेत. - भाषेवर संस्कृत भाषेचा पगडा जाणवतो. - एकेका शब्दांतून व्यापक संकल्पना स्पष्ट होतात. - अनेक शब्दांना प्रत्यय/उपसर्ग लागले आहेत. - अनेक शब्दांच्या संधी आहेत. इ. - काही गटांनी प्रत्येक अक्षरापासून किती शब्द या शब्दकोशात आले आहेत त्याचीही नोंद केली आहे. - प्रत्येक अक्षर वर्णमालेत कितवे आहे त्याचीही नोंद काहींनी केली आहे. मुलांच्या प्रत्यक्ष शब्दकोशाबद्दलची काही निरीक्षणे मी इथे नोंदवली आहेत. २० प्रकल्पांपैकी ३ गटांचे प्रकल्प संगणकावर मुद्रित केले होते. या प्रकल्पात सर्वच मुलांचा सहभाग उत्तम होता किंवा सर्वच प्रकल्प उत्तम होते असं अर्थातच नाही. काही उणिवा, त्रुटी या शब्दकोश प्रकल्पात आहेतच. त्या त्रुटी इथे सविस्तर मांडणे औचित्याचे होणार नाही. पण ढोबळमानाने जाणवलेल्या काही त्रुटी पुढीलप्रमाणे – • शब्दकोश हा शुद्धलेखनाच्या दृष्टीने प्रमाण असतो. त्यामुळे प्रकल्पातील नोंदीही अचूक, अधिक जाणीवपूर्वक करायला हव्या होत्या. • अक्षरवळण, नीटनेटकेपणा याकडेही काही जणांनी गंभीरपणे लक्ष दिले पाहिजे असे वाटले. • काही जणांनी शब्द आणि त्याचा अर्थ एवढ्याच मर्यादित नोंदी केल्या आहेत. बाकीचे घटक नोंदवलेले नाहीत. • सातत्याचा अभावही काही प्रकल्पात दिसतो. (उदा: शब्दाच्या घटकांचा क्रम काही वेळा बदललेला आहे. समानार्थी, विरुद्धार्थी शब्द काही प्रकल्पांत सर्व शब्दांसाठी आलेले नाहीत. इ. ) हा ‘प्रधान’ पाठ, त्यातले शब्द, वाक्यरचना इ. मुलांना परिचित नाही. त्यामुळे पाठ कळण्याच्या दृष्टीने मुलांना खूपच अवघड जातो. अनाकलनीय असे शब्दच शब्द मुलांवर येऊन नुसते आदळतात. कुठल्याही शब्दाशी जेव्हा या ना त्या निमित्ताने तुम्ही संपर्कात येत राहाता; तेव्हाच तो शब्द तुमच्या परिचयचा होतो. मगच तो शब्द तुम्ही प्रत्यक्षात वापरण्याची शक्यता वाढत असते. शब्दकोश प्रकल्प हे असेच एक निमित्त आहे असे मला वाटते. शिवाय लेखाच्या सुरुवातीला प्रकल्पाची जी उद्दिष्टे मांडली ती बव्हंशी सफल झाली असे म्हणायला हरकत नाही. जयश्री काटीकर (सहयोगी शिक्षिका – अक्षरनंदन शाळा, सेनपती बापट मार्ग, पुणे) बी-५/१६, सनसिटी, सिंहगड रस्ता, आनंदनगर, पुणे ५१ jayakatikar@gmail.com

प्रतिक्रिया द्या
3123 वाचन

💬 प्रतिसाद (1)
य
यशोधरा गुरुवार, 02/11/2016 - 20:04 नवीन
प्रकल्पाची ओळख आवडली. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा