शिवजयंती तारखेनुसार कि तिथीनुसार…
महाराजांच्या जन्मतिथीबाबतचा वाद जुनाच आहे. महाराजांचा जन्म १६३० कि १६२७.मात्र तो इतिहासाच्या अभ्यासाचा मुद्द आहे. या विषयी येथे चर्चा करण्याचे कारणनाही. महाराजांचा जन्म इंग्रजी तारखेप्रमाणे १६३० साली झाला हे आता सिद्धही झाले आहे
आणि मान्यही!
भारत इतिहास संशोधक मंडळाच्या शिवचरित्र प्रदीप या पुस्तकात फार विस्ताराने हि चर्चा करण्यात आली आहे .येथे आम्ही एक वेगळा मुद्दा चर्चेस घेत आहोत.वास्तविक यावर चर्चा करण्याचेही कारण नव्हते. तरीही ती करणे भाग पडत आहे.महाराजांची जयंती, त्यांच्या आयुष्यातील सर्वच घटना आपण अभिमानाने साजर्या करतो.
त्यांच्या राज्याभिषेकाचा सोहळा आजही रायगडावर अभिमानाने साजरा केला जातो.महाराजांच्या पुण्यतिथीला या पुण्यश्लोक
राजाच स्मरण करताना महाराष्ट्राच्या डोळ्याच्या कडा ओलावतात.
या घटना तिथीप्रमाणे साजर्या कराव्यात कि तारखेप्रमाणे हा प्रमुख वाद आहे. वाद टाळू इच्छिणारी मंडळी म्हणतील का हा मुद्दा
घ्या? महाराजांविषयी अभिमान आहे तर त्यांचं आयुष्यातील घटना दोन्ही दिवशीसाजरे करा… मात्र आम्ही येथे वैचारिक पातळीवर मुद्दे मांडीत आहोत हे लक्षात घ्यावे. दोन्ही दिवशी घटना साजर्या करा, हे या प्रश्नावरील उत्तर नव्हे. किंबहुना सर्व महाराष्ट्राचे या बाबतीत एकमत होऊन ह्याप्रश्नावर तोडगा निघावयास हवा. शिवकालीन घटना तारखेप्रमाणे साजर्या करणे हि चूक नसून शिवकालीन घटनांच्या बाबतीत इंग्रजी तारीख वापरणे (घटना साजर्या करण्यासाठी) हीच मुळात चूक आहे, असे आम्हास वाटते. आपल्या संस्कृतीने कालगणनेसाठी स्वतःची पद्धती शोधून काढली आहे जी फार शास्त्रीय
आहे. प्राचीन काळापासून अनेक संस्कृतींनी आप-आपल्या कालगणना पद्धती शोधून काढल्या आणि वापरल्या. मात्र या
संस्कृतींवर, देशांवर जेंव्हा काही संकटे आली अक्रमने झाली बर्याच ठिकाणी पराभूत संस्कृतीच्या परंपरा नामशेष झाल्या आणि
आक्रमकांच्या परंपरा लादल्या गेल्या. काही वर्षांनी त्या परंपरा त्या संस्कृतीत मातीत रुजल्या आणि आज त्या विनासायास चालू
आहेत. जखमांचे घाव विरले आणि नवीन पिढ्यांनी या संस्कृती आपल्या म्हणून स्वीकारल्या. जगभरात अनेक ठिकाणी असे
झाले आहे.
आपल्या संस्कृतीचे अभिमानास्पद वैशिष्ट्य असे कि आपल्याकडे तब्बल नऊ शतके आक्रमण होऊनही,आपल्या स्वतःच्या संस्कृती परंपरा लयास गेल्या नाहीत. हे जगाच्या इतिहासात
अपवादानेच घडले असावे किंवा नसावे. आपल्या इतिहासातील पराभूत कालखंडाचाही हा महत्वाचा भाग आहे, आणि त्यामुळे त्याबद्दल आपल्या मनात आदर असला पाहिजे. शिवपूर्व काळात मराठी (मोडी लिपीतील) पत्रामध्ये फारसी कालगणना
वापरलेली दिसते. मात्र शिवकालातील पत्रांमध्ये सुरुवातीचे काही अपवाद वगळता मराठी तिथी आणि संवत्सर वापरले आहे किंवा
दोन्हीचा वापर केलेला दिसतो. याचा अर्थ मराठी तिथी अधिकाधिक वापरावी हा शिवकालातील प्रघात आहे असे दिसते शिव्रज्याभिशेकानंतर राज्याभिषेक शक सुरु झाले हे तर आपण सर्व जाणतोच.दुसरीकडे महाराजांनी जाणीवपूर्वक एक गोष्ट केली हे आपल्या ध्यानात येईल .आक्रमणाअगोदर भारतीय परंपरेत ज्या
महत्वाच्या गोष्टी होत्या जैसे, राज्याभिषेक(महाराजांच्या अगोदर शेवटचा राज्याभिषेक ३०० वर्ष अगोदर झाला होता) ,राज्यकर्त्यांची नाणी पाडणे, राज्याभिषेक शक सुरु करणे, ह्या गोष्टी महाराजांनी सुरु
केल्या. तसेच फारसी शब्दांचे मराठी प्रतिशब्द तयार करवून घेतले आणि त्याचा एक शब्द कोश बनवला, रूढ केला. याचे कारण हि सर्व
पारतंत्र्याची प्रतीके होती. शारीरिक पारतंत्राबरोबरच प्रतीकात्मक पारतंत्र्यहि महाराजांनी खोडून काढले. अशा राजाची जयंती आपण पारतंत्र्याच्या प्रतिकांनी म्हणजे इंग्रजी कालगणनेनुसार
साजरी करणे चूक नाही का? महाराजांच्याचविचारांना आपण हरताळ फासत नाही का? इंग्रजी कालगणना आज आंतरराष्ट्रीय
पातळीवर मान्य आहे आणि दैनंदिन व शासकीय,आर्थिक आणि व्यावहारिक वापरतआहे हे मान्यच! मात्र सध्याच्या काळासाठी
आपण मान्य केलेले हे गृहीतक आहे. आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये एकसूत्रता यावी यासाठी आपण इंग्रजी कालगणना मान्य केली आहे, आणि वापरत आहे. शिवकालीन घटनांच्या सोहळ्यासाठी इंग्रजी तारीख वापरण्याचे काहीच कारण नाही! आपल्या संस्कृतीप्रमाणे
आणि संस्कृती बाबतीत साजर्या करावयाच्या घटना या संस्कृतीप्रमाणेच साजर्या झाल्या पाहिजेत न कि,आंतरराष्ट्रीय पद्धतीप्रमाणे!
किंबहुना ज्या घटना मुळातच तिथीप्रमाणे नमूद आहेत, त्यासाठी इंग्रजी प्रतिदिनशोधून काढण्याचा अट्टाहास सांगितलाय कुणी?
तिथीचे इंग्रजी रूपांतरण करण्यामध्ये एक फार मोठी तांत्रिक अडचण आणि तांत्रिक चूक उद्भवण्याची शक्यता सुद्धा आहे मात्र त्याचा
इथे उल्लेख करणे आम्हास सयुक्तिक वाटत नाही कारण, मुळात इंग्रजी कालगणना अमान्य आहे. आता एक महत्वाची गोष्ट जी आम्हास समजून येईल ती हि कि आम्ही आमचे सर्व पारंपारिक उत्सव तिथीप्रमाणेच साजरे करतो, अगदी आमचे नववर्ष सुद्धा!
आमच्या मते, त्यामुळे शिवकालीन उत्सवांच्या बाबतीत आम्हास तिथी कि इंग्रजी तारीख हा प्रश्न पडण्याचे कारणच नाही आणि सार्वत्रिक एकमताने तिथीप्रमाणेच ते साजरे केले पाहिजेत. महाराजांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटना:
जन्म: फाल्गुन वद्य(कृष्ण) तृतीया शके १५५१-
यावर्षी ८ मार्च २०१५
राज्याभिषेक:- ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १५९५
यावर्षी ३१ मे २०१५ (शिवराज्याभिषेक शक ३४२
प्रारंभ)
पुण्यतिथी: चैत्र पौर्णिमा, हनुमानजयंती
शके १६०१, यावर्षी ४ एप्रिल २०१५
सर्वांनीच या मताशी लगेचच सहमत व्हावे असे नाही. विशेषतः पूर्वापार तारखेप्रमाणे शिवकालीन उत्सव साजरे करणारे हे म्हणू शकतील कि आम्ही आमची प्रथा का बदलावी? मात्र आम्ही वर दिलेले स्पष्टीकरण म्हणजे त्यांची (तारखेप्रमाणे साजरे करण्यारांची) चूक
दाखवून देण्यासाठी नाही तर, तिथीप्रमाणे शिवकालीन घटना साजर्या करणे हेच आपल्या संस्कृतीला आणि महाराजांच्या प्रयत्नांना
धरून असल्याचे पटवून देण्याचा प्रांजळ प्रयत्न आहे.
मात्र सर्वात महत्वाचे म्हणजे, या घटना साजर्या झाल्या पाहिजेत. आपण सुदैवी आहोत कि आपण अशा मातीत जन्मलो ज्या
मातीत हा सूर्यपराक्रमी राजा जन्मला, बाजी, तानाजी सारखे वीर योद्धे जन्मले आणि स्वराज्याचा प्रत्येक पाइक जन्माला आला. त्यांचे गुणगान गावे तितके थोडेच आहे. कारण या इतिहासाच्या
विचारांमध्येच आपल्या उज्वल भविष्याचा राजमार्ग आहे.
।।प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर छत्रपति शिवाजी महाराज।।
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जय देव जय देव, जय शिवराया !