मराठमोळे पॉकेट सँडविच
Primary tabs
नाव जरी विदेशी असलं तरी साहित्य आणि कृती एकदम देशी. या विदेशी पदार्थाला भारतीय मसाल्यांची जोड देवून जास्त रुचकर बनवण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त दिसायला विदेशी. तर झाल असं की मला पिटा पॉकेट सँडविच खूप आवडतं. पण तो पिटा ब्रेड आमच्याकडे मिळत नाही. मग विचार केला टम्म फुगणारी, पापुत्रा सोडणारी आपली भाकरी आणि पिटात काय फरक आहे. हिवाळ्यात पौष्टिक म्हणून ज्वारी-बाजरी खायची पद्धत आमच्याकडे आहे. कोवळा ताजा पालक आणि ग्रीन लेट्युस मध्ये चवीत फारसा फरक मला जाणवत नाही.
आणि हे आहे भाकरी पॉकेट सँडविच………चला हव तर भरलेली भाकरी म्हणा. आपली शेतकरी मंडळी भाकरीवर झुणका, कांदा घेऊन हातावरच खातात की. हे थोडस वेगळ आपण भाकरीच्या आत भरुया. खायला आणखी सोप्पं.

(पिटा पॉकेट सँडविच हा मध्य-पूर्व आशिया मधील पदार्थ आहे. भाकरीप्रमाणे दिसणारा गोल फुगलेला आणि आतून पोकळ असणारा ब्रेड म्हणजे पिटा ब्रेड. त्याचे दोन भाग करून त्यात हर्ब्स घातलेले दही, ताहिनी पेस्ट म्हणजे तिळाची पेस्ट लावतात. त्यात लेट्युस सारखी सलाडाची पाने, कांदा इत्यादी पसरवतात. सुक्या काबुली चण्यापासून भजी सदृश्य 'फलाफेल' त्यावर ठेवले कि झाले पिटा पॉकेट सँडविच)
वाढणी- ४
साहित्य:
हिरव्या हरभऱ्याचे वडे /फलाफेल -
- हिरवा ओला हरभरा- १ कप (हिरव्या हरभऱ्याऐवजी मटार, ओले तूर वापरले तरी चालतील. मी सगळ्याचे वडे करून पाहिलेत. चवीत अगदी थोडासा फरक जाणवतो. पण सगळेच रुचकर लागतात.)
- कांदा, बारीक चिरून- २ टेबलस्पून
- कोथिंबीर- १/४ कप
- आले- १/२ इंचाचा तुकडा
- लसुण- ३ ते ४ पाकळ्या
- जीरे- १/२ टीस्पून
- मिरची- १
- मिरची पूड/लाल तिखट- १/४ टीस्पून
- हिंग- चिमुटभर
- मीठ- चवीनुसार
- बेसन- १ ते १ १/२ टेबलस्पून
- तांदूळ पीठ- १ टीस्पून
- तेल- जरुरीनुसार
चटणी-
- दही- १/४ कप
- शेंगदाणे, भाजून सोललेले - २ टेबलस्पून
- तीळ, भाजलेले- १/२ टीस्पून
- लसुण- २ पाकळ्या
- मिरची पूड- १/२ टीस्पून
- मीठ- चवीनुसार
- ज्वारी~बाजरी जाडसर भाकरी - २
- पालकाची कोवळी ताजी पाने- १६
- काकडी- १
- कांदा- १
- टोमॅटो- १
- वडे शालो फ्राय करायचे असतील तर बेसन थोडेसे भाजून घ्यावे म्हणजे बेसन कच्चट लागत नाही.
- वडे करताना बेसन ऐवजी भाजणी वापरली तरी चालेल.
इतर-
कृती:
हिरव्या हरभऱ्याचे वडे /फलाफेल -
हिरवा हरभरा ब्लांच करून घ्या.
हिरवा हरभरा, जीरे, कोथिंबीर, आले, लसुण, मिरची एकत्र पाणी न वापरता मिक्सर मध्ये भरडसर वाटून घ्यावे. (कोथिंबीर, आले, लसुण, मिरची हे बारीक चिरून घ्यावे म्हणजे व्यवस्थीत वाटले जाते.)
एका वाडग्यात वरील वाटण, मीठ, हिंग, मिरची पूड, कांदा व भाजणी एकत्र करावे.
सर्व एकत्र मळून त्याचे आवळ्याएवढे गोळे करावे. थोडे चपटे करून दोन्ही बाजुंनी तेलावर खरपूस भाजून (शालो फ्राय) घ्यावेत. (तळले तर जास्त रुचकर लागतात.)

चटणी-
शेंगदाणे आणि तीळ आधी मिक्सरला फिरवून बारीक करून घ्यावेत. त्यातच दही, मीठ, मिरची पूड टाकून वाटून चटणी करावी.
वाढण्यासाठी रचना-
पालक धुवुन पुसून घ्या. काकडी, कांदा, टोमॅटोच्या चकत्या करून घ्या.
भाकरी भाजून झाली कि लगेच तिचे दोन तुकडे करून पापुत्रा सोडवून ठेवा.
त्या अर्ध्या भाकरीला आतुन चटणी लावा, त्यावर पालकाची ३-४ पाने पसरा. त्यावर काकडी-टोमॅटोच्या चकत्या पसरा. त्यावर हरभऱ्याचे ३ वडे ठेवून त्यावर कांद्याच्या चकत्या ठेवा आणि थोडीशी चटणी शिंपडा.
पटकन खाऊन टाका. नाहीतर नंतर मऊ पडेल.
टीप:
मस्तच... लवकरच बनवून पाहतो.
एकच नंबर पाकॄ!! मलाही पिटाब्रेड मध्ये फलाफल वगैरे टाकुन जे काही सॅण्डविच करुन देतात ते फार आवडले होते. आता तुझी रेसेपी वाचुन हे घरीही करता येईल असे वाटतेय!
अरे वा खमंग अन जिव्हारस सुनामी कारक पाककृती आहे ही
+++१११
मस्तच आहे पाकृ.करुन फोटो पाठवेन :)
नक्की पाठव हं
हा प्रकार रुचकर असणार यात शंका नाही.
पौष्टीक पाककृती.
Mastach....ekadum paushtik pakru.
छान पाकृ व फोटो. पदार्थाला भारतीय रूप दिलेले आवडले.
दुष्ट आहात ! सौदीत चापलेल्या फिलाफिलच्या अनेक प्रकारांची आठवण करून दिलीत :)
पण ब्रेडला जीभेने जरी स्वीकारले असले तरी पोट मात्र स्वीकारायला नकार देते.
वांग्याचे भरीत, वांग्याचे तळलेले काप,कांदा भजी, बटाटेवडा आणि लसणाची किंवा दाण्याची चटणी घालून भरलेली, भाकरी हा पण प्रकार मनापासून आवडतो.
असो,
फिलाफिल घालून केलेली भरलेली भाकरी नक्कीच खावून बघीन.
प्रतिसादाबद्दल सर्वांना मनापासुन धन्यवाद
मस्तय करून पाहतो
मराठमोळी पाकृ !
फोटो वरतून काढायला हवा होता म्हणजे सँडविचचं रुपडं नीट दिसलं असतं :)
वरुन फक्त भाकरिच दिसत होती. ;)
करून पहाते एकदा.
मस्त! कल्पना छान आहे!
रुचकर अन पौष्टिक! फोटो पण लै भारी आलेत!
मस्त आणि पौष्टिक पाकृ.मस्तच!
मध्य पूर्वेच्या पाकृचे हे मराठीकरण आवडले.