चिखलपायटे (Waders)
|| श्री गुरवे नम: ||
चिखलपायटे (Waders)
समुद्रकिनारा.. जिथे सागरा धरणी मिळते, तिथे ‘त्याची / तिची’ वाट पाहण्याची जागा. आम्ही मुंबईकर तसे भाग्यवानच - आम्हाला असा लांबलचक किनारा लाभला आहे. समुद्रामुळेच परमेश्वराचा प्रथमावतार आमच्यावर प्रसन्न आहे. मुंबईच्या पश्चिम बाजूला गिरगाव, वरळी, दादर, जुहू, वर्सोवा वगैरे सगळ्या प्रसिद्ध चौपाट्या आहेत. पूर्व किनार्यावर मात्र वाळूच्या चौपाट्या नाहीत, तर सगळा खाडीपरिसर आहे. समुद्र आणि समुद्रकिनारा फक्त या प्रथमावतारासाठीच नव्हे, तर इतरही जीवांसाठी एक आश्रयस्थान असतं. समुद्रकिनार्यावरचा खाडीपरिसर म्हणजे जीवविविधतेने संपन्न असा परिसर. इथे इतकी जीवविविधता असते की कितीही वेळा जा, प्रत्येक वेळी काहीतरी नवीन आश्चर्य तुमची वाट पाहत असतंच. मुंबईचा हा बराचसा पूर्व किनारा ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’च्या मालकीचा आहे. इथे जहाजांच्या गोद्या, प्रवासी वाहतुकीचे धक्के आणि माझगाव-शिवडी-वडाळा-माहुल (चेंबूर) या पट्ट्यात रिफायनरी, पेट्रोलियम कंपन्यांची गोदामं यासारखी अतिमहत्त्वाची ठिकाण असल्यामुळे हा सर्व परिसर संरक्षित आहे. इथे कोणत्याच बांधकामाला परवानगी नाही; इतकंच काय, अगदी आताआतापर्यंत इथल्या काही रस्त्यांवरून वाहतूकही प्रतिबंधित होती. तसंच, घाटकोपर ते मुलुंड मिठागर हा पट्टा गोदरेज ट्रस्टच्या खाजगी मालकीचा आहे. माणसाचा कोणताही हस्तक्षेप नसल्यामुळे साहजिकच माझगाव ते मुलुंड मिठागर हा सर्व खाडीपरिसर जीवविविधतेसाठी वरदानच ठरला आहे. खाडीपरिसरातल्या जीवविविधतेचं मुख्य कारण म्हणजे इथे (आणि फक्त इथेच) आढळणारा अद्वितीय, वैशिष्ट्यपूर्ण वनस्पतिवर्ग – खारफुटी / तिवर (Mangroves). खारफुटी म्हणजे वनस्पतीच्या उत्क्रांतीमधलं अनन्यसाधारण नवल आहे. उत्क्रांतीच्या ओघात ज्या काही वनस्पती अत्यंत जोमाने वाढत होत्या, त्यांनी तुलनेने कमकुवत वनस्पतींना समुद्राच्या दिशेने ढकलायला सुरुवात केली. कालांतराने या विस्थापित वनस्पतींना टिकून राहण्यासाठी, जगण्यासाठी एकच मार्ग उरला, तो म्हणजे समुद्राच्या, खाडीच्या खार्या पाण्याशी जुळवून घेणं. खार्या पाण्यात तगून राहण्यासाठी क्षारयुक्त पाणी शोषून घेऊन, विशिष्ट यंत्रणेद्वारे त्यातले क्षार वेगळे करून ते पानावाटे उत्सर्जित करण्याची एक अद्भुत अद्वितीय क्षमता त्यांच्या शरीरात हळूहळू विकसित झाली. म्हणूनच खारफुटीच्या पानांवर क्षाराचे (मिठाचे) स्फटिक चमकताना दिसतात, चाटून पाहिलं तर खारट चव लागते. या क्षमतेमुळेच, अत्यंत प्रतिकूल अशा खार्या पाण्यातही खारफुटीची जंगलं फोफावली आणि विविध जीवांना आश्रयस्थान मिळालं. दिवाळीनंतर थंडीच्या दिवसात तर अनेक जातींचे स्थलांतरित पक्षीही अक्षरशः हजारोंच्या संख्येने इथे येतात आणि चार-पाच महिने मुक्काम ठोकतात. अन्नाची विपुल उपलब्धता, आणि माणसाचा हस्तक्षेप नसलेला अनाघ्रात विशाल परिसर यामुळे लहान-मोठ्या असंख्य जीवांना आणि पक्ष्यांना इथे उत्तम अधिवास मिळाला आहे. खाडीपरिसरातल्या सर्व जीवाचं दैनंदिन जीवन अवलंबून असतं दिवसाकाठी दोनदा येणार्या भरती-ओहोटीवर. गोगली मृदुकाय प्राणी (Molluscs), नेरिससारखे प्राणी, खेकडावर्गीय (Crustacians) कवचवाले प्राणी, कृमी-जंत वगैरे अनेक लहान-मोठे प्राणी चिखलात राहतात. भरतीबरोबर किनार्यावर येणारे सूक्ष्म अन्नकण, वाहवटी खाण्यासाठी हे प्राणी खोल चिखलातून पृष्ठभागावर येतात आणि या प्राण्यांना खाण्यासाठी पक्षी चिखलात फिरत असतात. चिखलात अन्न शोधतात, म्हणून या पक्ष्यांना ‘चिखलपायटे’ (Waders) असं म्हणतात. शिवडीच्या खाडीपरिसरात थंडीच्या दिवसात आढळणार्या चिखलपायट्यांची आणि इतर काही जीवांची ही चलतचित्रओळख. निवटी (Mudskippers) – खाडीपरिसरात नेहमी आढळणारी माशांची एक आदिम (Primitive) प्रजाती. दोन्ही बाजूना दोन छोटे पाय असतात, त्यांच्या साहाय्याने चिखलात ‘चालू’ शकतात. पाठीवर एक पंखा असतो. तो फुलवून बहुधा प्रणयाराधन प्रदर्शन (courtship display) चाललंय.
सारंगी खेकडा (Fiddler crab). याच्या नराची एक नांगी खूप मोठी असते. ती हवेत फिरवताना सारंगी वाजवल्यासारखं दिसतं, म्हणून याला सारंगी खेकडा म्हणतात. नांगी हलवून नर प्रियतमेला आवतन देतात आणि इतर नरांना आपल्या मालकीच्या जागेबद्दल इशारा देतात.
https://youtu.be/Y-tzEZNrGoE हिरवा बगळा Little Green Heron Butorides striatus इथला स्थानिक पण जरा दुर्मीळ पक्षी. अतिशय बुजरा. आतापर्यंत मला चार-पाच वेळाच दिसला आहे.
काळा बगळा Western Reef Egret Egretta gularis हा इथला स्थानिक पक्षी. याची दोन रूपं (phases) असतात – काळा आणि पांढरा. चिखलात तुरुतुरु चालत एकटा चरतो आणि अन्न मिळवतो.
https://youtu.be/d06sfIH9Ccg शराटी / कुदळ / अवाक Oriental White Ibis Threskiornis melanocephalus इथला स्थानिक पक्षी. पांढराशुभ्र, काळी मान-डोकं आणि लांब बाकदार चोच चिखलात खोलवर खुपसून अन्न शोधतात. चार-पाच पक्षी एकत्र चरताना दिसतात.
https://youtu.be/mObBk76y0T4 ग्रीनशँक Common Greenshank Tringa nebularia पाय हिरव्या रंगाचे. चोच लांब, चोचीचं टोक वरच्या बाजूला किंचित वळलेलं. चिखलात एकेकटे चरतात.
https://youtu.be/svZOvRa3VcM केंटिश चिलखा Kentish Plover Charadrius alexandrinus अतिशय चंचल पक्षी. काहीशी आखूड चोच. चिखलात एकेकटे चरतात.
https://youtu.be/V9In_YrOWIg देशी तुतारी Common Sandpiper Actitis hypoleucos छोटुकला पक्षी. अतिशय चंचल. छोटीशी चोच. चिखलात तुरुतुरु धावत अन्न शोधते.
https://youtu.be/3QW1hps96Eg रोहित / अग्निपंख Flamingo Phoenicopterus spp. यांच्या दोन जाती इथे येतात – थोरला Greater Flamingo Phoenicopterus roseus आणि धाकला Lesser Flamingo Phoenicopterus minor. हल्ली धाकले रोहितच खूप जास्त दिसतात. इतर पाणथळी पक्ष्यांपेक्षा अन्न शोधण्याची यांची तर्हाच वेगळी.
https://youtu.be/moYPRfZKhGY
https://youtu.be/ekSAzj4o-6I रोहित पक्ष्यांविषयी ‘पाहुणे येती मुंबईला’ हा लेख जरूर वाचा. या वर्षी शिवडीला आश्चर्याचा एक धक्का बसला – शिवडीच्या किल्ल्यावरून विहंगम दृश्य (Bird’s Eye view) बघताना, इथे प्रथमच चित्रबलाक Painted Storks Mycteria leucocephala दिसले. यापूर्वी इथे कधीच दिसले नव्हते. एक राखी बगळाही Grey Heron Ardea cineria दिसतोय.
https://youtu.be/UtYCHKASEbg तर अशी ही चिखलयात्रा. प्रत्येक वेळी नव काहीतरी देणारी. इथलं निसर्गनवल पाहण्याची अनुभवण्याची एक सुवर्णसंधी आली आहे.
बी.एन.एच.एस.तर्फे फ्लेमिंगो महोत्सव शनिवार, दि. ५ मार्च २०१६, दुपारी १ ते संध्या. ६पर्यंत.
http://bnhs.org/bnhs/ बी.एन.एच.एस. ही संस्था दर वर्षी मुंबईकरांसाठी फ्लेमिंगो महोत्सव आयोजित करते. शिवडी रेल्वे स्थानकाच्या पूर्व बाजूपासून जेटीपर्यंत जायला-यायला विनामूल्य बस असते. पायी किंवा स्वत:च्या वाहनानेही जाता येईल. जेटीवर प्रवेश नि:शुल्क असतो. तिथे संस्थेचे तज्ज्ञ मार्गदर्शक आपल्याला माहिती देतात. दुर्बिणी, स्पॉटिंग स्कोप वगैरे लावलेले असतात. संस्थेची विविध उत्पादनही विकत घेता येतात, संस्थेचे सभासदही होता येतं. सर्वांनी सहकुटुंब, मित्रमंडळींसह जरूर या. पिण्याचं पाणी आणि दुर्बीण, कॅमेरा घेऊन या. मीही तिथे असेनच, तुम्ही येणार असाल तर शनिवारी दुपारी १२पूर्वी मला व्यनि करा किंवा ९८६९४२८५०३वर संपर्क साधा, म्हणजे आपली भेट होईल.
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
