उपासाचा पौष्टीक केक
Primary tabs
उद्या महाशिवरात्रीचा उपास असेल. आणि रोजचे तेच तेच खाऊन कंटाळला असाल ना? आता आलाच कोणाचा वाढदिवस उपासाच्या दिवशी तर केकशिवाय साजरा नाही करावा लागणार!
साहित्यः
शिंगाड्याचे पीठ २०० ग्रॅम.
साजूक तूप १०० मिली.
पिठी साखर १०० ग्रॅम
खजूर २० बिया
बेकिंग पावडर एक टीस्पून
खायचा सोडा अर्धा टीस्पून
अर्धा टीस्पून वेलची पावडर
नेसकॉफी चार पाकिटे १ रू. वाली
दीड वाटी दूध
साधी साखर तीन टीस्पून
बदाम सजावटीसाठी

कृती:
अर्धी वाटी दूध गरम करावे. खजूराच्या बिया काढून या दुधात भिजत घालावे. शिंगाड्याचे पीठ, कॉफी पावडर, बेकिंग पावडर, सोडा. वेलची पावडर एकत्र करून तीन वेळा चाळून घ्यावे. खजूर दुधासकट मिक्सरला फिरवून बारीक करून घ्यावा. ओव्हन १८० डिग्रीवर पाच मिनिटे प्रिहीट करून घ्यावा. तूप, पिठी साखर, वाटलेला खजूर एकत्र परातीत घेऊन फेसावे. चाळलेले पीठ फेसलेल्या तुपात मिसळून फेसावे. लागेल तसे दूध मिसळावे. मला वाटीभर लागले. त्यार मिश्रणात साधी साखर घालून नीट मिसळावी. यामुळे साखर असलेल्या ठिकाणी साखर विरघळून छान जाळी पडते. सजावटीसाठी बदामाचे काप घालावे. केकच्या भांड्याला तुपाचा हात लावून त्यात मिश्रण ओतावे.
१८० डिग्रीवर पस्तीस मिनिटे ठेवावे. झाकण काढून सुरी घालून मिश्रण चिकटत नाही ना ते पहावे.

दहा मिनिटे गार करून जाळीवर केक काढावा. गार झाल्यावर तुकडे करून डब्यात भरावा. आता उपास करायला हरकत नाही!

मस्त रेसेपी पण ताई फोटो दिसत नाही आहेत.
अजूनही नाही दिसत का?
नाही दिसत
केकसाठी उपवास करावा म्हणते.एक नं.केक.
दिसले फोटू. आवडले. उपासाचा केक असतो हे माहित नव्हते.
मस्त रेसिपी.
फोटो दिसू लागल्याबद्दल!
आणि प्रतिसादांसाठीही!
छान दिसतोय केक!
मस्तच! नेसकॉफी चव छान लागत असेल.
+१००
अनन्न्या,
एक नं केक. आता भरपूर उपास करायला हरकत नाही माझी :))
उपवासाचा केक एकदम भन्नाट आहे.
आजच करुन बघतो, के़क :-)
केकसाठी उपवास करावा बहुतेक!!
किती नाविन्यपूर्ण प्रकार. आवडली पाकृ.
केक मस्त दिसतो आहे. शिंगाड्याचा पिठाचा केक करता येईल असं वाटलंही नव्हतं.
बेकिंग पावडर आणि खायचा सोडा उपासाला चालतो का? :-)
बाकी प्रत्येक घरातले नियम वेगळे, त्यामुळे चालत असेल तरच करा. ( मी कोणताही उपास करत नाही.) खरच चालत नसेल तर इथे नक्की सांगा.
अगदी नावीन्यपूर्ण पाककृती!
केक आणि तोही उपासाचा??? धन्य धन्य धन्य.....रच्याकाने आता शिंगाड्याचे पीठ आणने आले...