Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काटा वजनाचा --५

स
सुबोध खरे
गुरुवार, 03/17/2016 - 17:07
💬 66 प्रतिसाद
काटा वजनाचा --४ मागच्या चार भागात आपण पाहिले कि वजन का वाढ्ते? adipostat म्हणजे काय आणि वजन थोडे कमी होऊन परत का वाढते? यात एक मूळ विचार मी अंतर्भूत करू इच्छितो कि कोणते अन्न आहे ज्याने वजन पटकन वाढते. आपल्याला २४ तास उर्जेची गरज भासत असते आणि हि उर्जा ग्लुकोज जाळून मिळवली जाते. आपल्या मेंदूला चोवीस तास ग्लुकोज चा पुरवठा लागतो मग तो जागा असो कि झोपेत. झोपेत मेंदूचे वेगवेगळे भाग वेगवेगळ्या वेळी कार्यरत होत असतात. हि ग्लुकोज तुम्हाला अन्नातून थेट मिळते किंवा इतर पिष्टमय पदार्थांचे( रवा मैदा आटा तांदूळ ज्वारी बाजरी बटाटा रताळे इ) विघटन करून अथवा चरबी पासून तयार करून मिळवता येते. तुम्ही खाल्लेल्या अन्नातील अतिरिक्त ग्लुकोज/ किंवा पिष्टमय पदार्थ हे यकृतात ग्लायकोजन या स्वरुपात साठवले जातात. ग्लायकोजन हे ग्लुकोज चे polymer आहे म्हणजे शेकडो ग्लुकॊज चे रेणू एकत्र बांधून त्याची साखळी केली जाते आणि हे घट्ट स्वरुपात थोड्या जागेत (tightly packed) साठवले जाते. आपल्या यकृतात साधारणपणे ५-६ तास पुरेल इतकी ग्लुकोज ग्लायकोजन या स्वरुपात साठवली जाते.म्हणजे तुम्ही काहीही खाल्ले नाहीत तर तुमच्या शरीरातील ग्लुकोज/ग्लायकोजन हे सहा तासांत संपून जाईल.आणी यामुळे आपल्याला या कालावधी नंतर "भूक" लागते. यानंतरहि आपण काही खाल्ले नाही तर आपल्या शरीरात चरबीचे रुपांतर ग्लुकोज मध्ये व्हायला सुरुवात होते आणि आपली चरबी कमी होऊ लागते. हीच प्रक्रिया जेंव्हा आपण व्यायाम करतो तेंव्हा जोरात व्हायला लागते. साखर, ग्लुकोज हे पदार्थ पटकन शरीरात शोषले जातात( म्हणूनच खेळाडूना त्वरित उर्जा मिळण्यासाठी ग्लुकोज दिली जाते). त्या मानाने स्टार्च किंवा इतर गुंतागुंतीचे पिष्टमय पदार्थ त्यांचे विघटन करायला वेळ लागत असल्याने हळूहळू शोषले जातात. त्याशिवाय त्यात असणारे तंतुमय पदार्थ (फायबर्स)किंवा चोथा या पदार्थांचे शोषण लांबवतात. यामुळेच केक बिस्किटे शीतपेये वेफर्स यासारखे प्रक्रिया करून त्यातील चोथा काढून टाकल्याने पदार्थ फार पटकन शोषले जातात आणि त्यामुळे लठ्ठ्पणाला आमंत्रण मिळते. हे "प्रक्रिया करून चोथा काढून टाकलेले" असे अन्न पदार्थ आहेत ज्याने वजन पटकन वाढते आपण खातो त्या अन्नात चरबी आणि पिष्टमय पदार्थ हे दोन घटक आहेत ज्यापासून मुख्यत्वे आपल्याला कॅलरिज मिळतात. परंतु या दोन्ही गोष्टी एकत्र खाल्ल्या तर त्यातील पिष्टमय पदार्थ हे उर्जा मिळवण्यासाठी "प्रथम" वापरले जातात आणि चरबी हि तुमच्या शरीरातील ग्लुकोज संपली कि मग वापरली जाते. म्हणजे काय होते? आपण उपाशी पोटी एक छान क्रीम असलेला केक खाल्ला कि त्यातील पिष्टमय पदार्थाचा वापर शरीराला कॅलरी मिळवण्यासाठी चालू होतो आणि त्यावर असलेली मलई( साय/क्रीम) किंवा चरबी युक्त पदार्थ हे सरळ आपल्या शरीराच्या चरबीच्या पेशींकडे जातात. जोवर केक मधील पिष्ट्मय पदार्थ पूर्ण वापरले जात नाहीत तोवर त्यातील चरबीचा वापर होणार नाही. पुढचे बरेच दिवस उपास घडेल या हिशेबाने ती चरबी आपल्या शरीरात साठवली जाते. हा तुमच्या शरीरातील गुणसूत्रे आणि जनुकानी शतकानुशतके अन्नाच्या दुर्भिक्ष्याने शिकलेला धडा आहे तो असा एक दोन पिढ्यात जाणार नाही. दुर्दैवाने असा उपास १९७० नंतर (हरित क्रांती) आपल्या देशात फारच कमी लोकांना घडतो. ( आणी ज्यांना घडतो उदा. आदिवासी. त्यांना लठ्ठपणा म्हणजे काय ते माहितीही नसते.). अशा दुर्भिक्षामुळे आपली संस्कृती काय झाली आहे कि तुमच्या घरी कोणी येणार असेल तर त्याला सुग्रास चमचमीत खाऊ घालणे. किंवा तुम्ही कुणाकडे जाणार असणार तर तेथे भेट म्हणून मिष्टान्न घेऊन जाणे. कोणत्याही साध्या किंवा ओल्या पार्टी मध्ये येणारे खाद्य पदार्थ काय असतात ते पहा- वेफर्स, तळलेले दाणे किंवा काजू, चीज येथपासून पनीर /चिकन टिक्का, मटण कबाब, luncheon meat. कोणत्याही लग्नाच्या जेवणात काय असते तेही पहा, पनीर बटर मसाला, चिकन माखनवाला,व्हेज तवा, चिकन हंडी याबरोबर बटर रोटी किंवा नान चार पाच फरसाण पदार्थ( कॉर्न कबाब, भजी,दाल वडा, चीज सामोसा) शेवटी दाल माखनी किंवा दाल तडका आणि जीरा फ्राईड राइस. सरते शेवटी तीन ते पाच मिष्टान्ने( रसमलाई, तुपातील गाजर हलवा, आइस क्रीम, शाही टुकडा,मलईयुक्त मालपुवा). यावर अजुन होणारा आग्रह इ.तर मी बोलतच नाही. यातील बहुसंख्य पदार्थ high Glyacemic index असलेले आहेत. म्हणजे काय? तुम्ही ते पदार्थ खाल्ले कि तुमच्या शरीरातील ग्लुकोज फार झपाट्याने वाढते. आता हि एकदम वाढलेली ग्लुकोज कमी करण्यासाठी तुमचे स्वादुपिंड इन्स्युलीन तयार करते ज्याने या ग्लुकोजचे रुपांतर ग्लायकोजन मध्ये होते आणि उरलेल्या ग्लुकोजचे रुपांतर लगेच चरबी मध्ये होते. असे "एक भरपेट" जेवण तुम्ही करत असलेल्या दहा दिवसांच्या(DIET) मिताहाराच्या इतके असते. म्हणूनच बरेच लोक महिनोन महिने "डाएट" करत असतात तरीही त्यांचे वजन काही कमी होत नाही. कारण मी दहा दिवस डाएट केला आता एक दिवस तरी मला "पोटभर खाऊ दे" असे ते स्वतःला( आणि इतरांना) सांगत असतात त्यातून तुम्ही लोक कसे ताट भरून घेततात ते पहा. रोटी, चिकन, पनीर, भाज्या फरसाण यांनी ताट पूर्ण भरून जाईल असे एकदाच घेतात (परत परत उठायला नको म्हणून) आणी मग तब्येतीत जेवत राहतात. त्यात मग कबाब, समोसा वगैरे आवडले तर ते अजून घेऊन यायचे आणि शेवटी परत एक डिश भरून गाजर हलवा, रसमलाई आईस्क्रीम वगैरेने पोट "भरून" घेतात. आता यावर सर्वसाधारण उत्तर हेच असते कि डॉक्तर, "म्हणजे आम्ही लग्नात जेवायचेच नाही का?" याचे उत्तर असे आहे. पहिल्यांदा आपले ताट छान पैकी सलाडने भरून घ्या त्यावर मीठ लिंबू चाट मसाला टाकून ते खाऊन घ्या. शिवाय बहुसंख्य लठ्ठ माणसांचे पोट "भरल्या"शिवाय समाधानच होत नाही. त्यामुळे एक पेला ताक पिऊन घ्या. या सर्व गोष्टीनी आपले पोट भरल्याची संवेदना होते. यानंतर आपल्याला कोणते पदार्थ "हवे" आहेत ते ठरवा. केवळ समोर आहेत म्हणून खाणे बरोबर नाही.केवळ समोर आहे म्हणून बटाट्याची भाजी किंवा अळवाचं फतफतं पानात घेण्याला काय अर्थ आहे? मग असे हवेत ते पदार्थ निवडूनच ताटात घ्यावेत आणि चवीने खावेत . केवळ पोट भरण्यासाठी मैद्याचे नान किंवा भात खाल्ला तर लगेचच तो आपल्या चरबीला भेटायला जाईल. स्वामी चिन्मयानंदानी सांगितलेला एक किस्सा मला इथे उद्धृत करावासा वाटतो.-- एक माणूस आपल्या मित्राच्या लग्नाला जातो. तेथे तो चाळीस गुलाब जाम खातो. आणि त्यामुळे त्याला कसंसंच व्हायला लागतं. यावर त्याचा दुसरा मित्र म्हणाला कि अरे तुला इतका त्रास होत आहे तर घशात दोन बोटे घालून तू उलटी का करून टाकत नाहीस त्याने तुला बरे वाटेल. यावर हे महाशय म्हणाले अरे जर "दोन बोटं" घालायला जागा असती तर अजून दोन गुलाब जाम नसते का खाल्ले? तात्पर्य -- पोट फुटेस्तोवर खाण्यात काय अर्थ आहे? जीवनात खाणे हा एकच आनंद नाही. उत्तम संगीत, उत्तम मित्र, उत्तम पुस्तके, उत्तम साथीदार असे अनेक आनंद असताना माणसे मात्र फक्त "खाण्यात" आनंद शोधात असल्याने ते "अंगावर" चढणारच. क्रमशः

Book traversal links for काटा वजनाचा --५

  • ‹ काटा वजनाचा --४
  • Up
  • काटा वजनाचा --६ ›

प्रतिक्रिया द्या
29989 वाचन

💬 प्रतिसाद (66)
र
रंगासेठ Tue, 03/22/2016 - 10:33 नवीन
रोखठोक प्रतिसाद आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
पैसा Mon, 03/21/2016 - 13:49 नवीन
अतिशय उत्तम आणि सर्वानाच आवश्यक धागा!
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Mon, 03/21/2016 - 15:03 नवीन
डॉक्टर साहेब्, मी तुम्हाला मागे विचारलेला विस्की/स्कॉच (किंवा तत्स्म हार्ड लिकर) चा वजनाशी संबंध विचारला होता. तो प्रश्न अनुत्तरित राहिला असे दिसते. जर आपण या बद्दल आधी कुठे लिहले असेल तर कृपया लिंक द्यावी.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 03/21/2016 - 15:59 नवीन
वर म्हटलेले आहेच ओल्या पार्टी मध्ये येणारे खाद्य पदार्थ काय असतात ते पहा- वेफर्स, तळलेले दाणे किंवा काजू, चीज येथपासून पनीर /चिकन टिक्का, मटण कबाब, luncheon meat. विस्की/स्कॉच (किंवा तत्स्म हार्ड लिकर) हे लोक कधीही नुसते घेत नाहीत. त्याबरोबर वर म्हटल्याप्रमाणे चमचमीत चाखण्याशिवाय खात नाहीत. प्रत्यक्ष दारूमुळे वजन फारसे वाढत नाही पण थोडीशी दारू प्यायल्यामुळे भूक लागते. ( प्रत्यक्ष अल्कोहोलने आणी शिवाय जठराच्या आतल्या आवरणाचा दाह झाल्याने आम्लता वाढून भूक लागल्या सारखे वाटते). आणी एकदा दारू चढली कि किती आणी काय खातो आहोत याकडे शरीर (आणी मेंदू) दुर्लक्ष करते. काळजी वार्यावर सोडली जाते. ( वाहन चालवतानाही हेच होते) आणी मग दाबून खाल्ले जाते.मुलकी जगात साधारण पणे पार्टी साडेसात आठ ला चालू होते आणी रात्री बारा एक पर्यंत चालते त्यानंतर/ तोपर्यंत सावकाश जेवण चालते मग किती खाल्ले आहे याचा धरबंध राहत नाही. लष्करातील कित्येक लोक आठवड्याला तीन ते चार वेळेस माफक प्रमाणात मद्य घेऊन त्याबरोबर माफक खाणे आणी नियमित व्यायाम असल्याने ,मद्याचा "आनंद घेताना" सुद्धा आपले वजन टिकवून असलेले सहजपणे दिसतात. लष्करात पार्टी सात ला सुरु होते. साडे नऊला शेवटचे "ड्रिंक" मिळते त्यानंतर "बार" बंद. दहा वाजल्यानंतर जेवण बंद आणी अकरा वाजता मेस/ क्लब बंद होतोच. मूळ मुद्दा -- दारूमुळे वजन वाढत नाही तर "बेताल" वागण्याने वजन वाढते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक Tue, 03/22/2016 - 07:35 नवीन
धन्यवाद डॉक्टर साहेब. अशा परिस्थितीत दारुसोबत योग्य चखणा कोणता याबाबत मार्गदर्शन कराल काय ?(कारण नुसती दारु पिणे फारसे योग्य ठरणार नाहि असेच मला वाटते) भाजलेले शेंगदाणे , भिजवलेली कडधान्ये (मोड आलेली वा मोड नसलेली) अगदी कमी तेलात परतून , योग्य होतील का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Tue, 03/22/2016 - 07:45 नवीन
साहेब, अशा चखण्याबरोबा दारू प्यायला किती लोक तयार होतील? मूळ मुद्दा तुम्ही चखणा अधिक जेवण मिळून किती खाता ते महत्त्वाचे ठरेल. चखण्यात उकडलेल्या भाज्या भाजलेले शेंगदाणे ई खायचे आणी मग बटर चिकन आणी पनीर माखनवाला बटर नान बरोबर खाणार असाल तर उपयोग काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक Tue, 03/22/2016 - 08:29 नवीन
तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे डॉक्टर साहेब. पार्टीमध्ये डाएटचे भान ठेवून खाणे कठीणच. पण घरीच बसून पिताना योग्य डाएट करता येईल, आणि पत्नीच्या मदतीने तो अमलात आणताही येईल म्हणून विचारत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ध
धनंजय माने Mon, 03/21/2016 - 17:40 नवीन
लेख आवडला. फक्त पोट कमी करण्याचे काही उपाय असतील तर सांगेल का कोणी?
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 03/21/2016 - 18:07 नवीन
कमी खा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने
ट
टवाळ कार्टा Mon, 03/21/2016 - 18:08 नवीन
हा शुध्ध हलकटपणा आहे माने =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने
झ
झेन Tue, 03/22/2016 - 10:52 नवीन
पोट कमी करण्याचा उपाय ? सोप्पा आहे तीच वजन कमी करण्याची गोळी १ १/२ पट घेणे :). यावर "सर्वांसाठी एकच" उपाय निघाला तर तूमचे माहीत नाही,पण वेगवेगळ्या वेटलॉस दूकानदार, दहा दीवस रोज फक्त ३ मिनीट वापरून अँब्ज बनवणारे मशीन विकणारे सगळयांचे पोट पातळ होईल ह.घ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने
अ
अनुप७१८१ Tue, 03/22/2016 - 07:10 नवीन
अतिशय उत्तम माहिति... धन्यवाद
  • Log in or register to post comments
स
संदीप ताम्हनकर Fri, 04/01/2016 - 10:28 नवीन
दोन सुप्रसिद्ध म्हणी आठवल्या. There is no sincerer love than the love of Food - George Bernard Shaw. अर्थात - अन्ना वरील प्रेमाइतके दुसरे सच्चे प्रेम नाही. A Man digs his grave with his Teeth - Carlyle. अर्थात - माणूस स्वतःची कबर दाताने खोदतो.
  • Log in or register to post comments
अ
असंका Sat, 04/02/2016 - 13:20 नवीन
ज्या भाषेत तुम्ही सांगत आहात त्याने या सगळ्या माहितीला नजरेआड करून एक घास सुद्धा खाणे अवघड होणार आहे... धन्यवाद!
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 04/02/2016 - 14:53 नवीन
साहेब एक घास का चार घास खा कि. पण ते दोनच पेग म्हणून अर्धी बाटली संपवण्यासारखे होते. एकदा सुग्रास अन्न समोर आले कि डाएटिंग वार्यावर सोडून लोक खाऊन घेतात उद्यापासून नक्की म्हणून आणी तो उद्या येता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
स
स्थितप्रज्ञ Fri, 05/20/2016 - 14:47 नवीन
लेखाबरोबर प्रतिसादही खूप माहितीपूर्ण आहेत. चालू राहू द्या discussion.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा