Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पाण्याची धुळवड आणि काही आकडे

स
साहना
Mon, 03/21/2016 - 21:01
🗣 61 प्रतिसाद
भारतांतच नाही तर जगांत सगळीकडे प्राणीप्रेमी, निसर्गप्रेमी इत्यादी चे कातडे पांघरून राजकारण करणे सर्रास चालते. अश्या संघटनांना किंवा लोकांना मदत करताना आपली विवेकबुद्धी वापरूनच मदत करावी. दर वर्षी होळीच्या उत्सव जवळ आला कि "पाणी वाचवा होळी खेळू नका" असे आवाहन केले जाते. आणखी कुठे दुष्काळ आहे, कुठे शेतकरी संकटात आहे असे भासवून मुंबई पुण्यात होळी खेळू नये असे सर्व राजकारणी NGO वगैरे लोक सांगत फिरतात. होळीमध्ये नक्की किती पाण्याची नासाडी होते ह्याचे आकडे कधी कुणे पुढे ठेवल्याचे आठवत नाही. काही लोक चक्क संडास फ्लश करू नका किंवा दाढी करताना नळ चालू ठेवू नका इत्यादी प्रचार करत असतात. ह्या प्रचाराला शास्त्रीय आधार फार कमी आहे. पाणी किंवा इतर कुठल्याही संसाधनाचा वापर जितका शक्य आहे तितका कमी करावा पण होळी खेळू नये इत्यादी प्रचार अतिशयोक्ती आहे. भारतातील एकूण पाण्याच्या वापरापैकी ९१% पाणी शेती साठी वापरले जाते, ७% पाणी शहरातील मानवी वापरा साठी जाते तर ५% पाणी विविध उद्योग धंदे वापरतात. [१] ७% मानवी वापरातील पाण्यापैकी सुमारे ५०% पाणी स्नान, कपडे धुणे आणि प्रसाधनग्रहांत जाते. [२] पिण्यासाठी फक्त ४% (७ टक्क्याचे ४%) पाणी वापरले जाते. वर्षांतील एक दिवस आपण पाण्याने मनसोक्त होळी खेळली तरी पाण्याच्या एकूण साठ्यावर काहीही परिणाम होत नाही त्याशिवाय न खेळली तर जे पाणी वाचते त्यामुळे कुणालाही फायदा विशेष होत नाही. अर्थांत कुणाला प्रतीकात्मक दृष्ट्या होळी न खेळता पाणी वाचण्याचा प्रयत्न करायचा असेल तर जरूर करावा पण त्याने शेतकर्यांना फायदा होतो हा निव्वळ गैरसमज आहे. सामाजिक प्रथा आणि इतर काही तरी विषय ह्यांत False Dichotomy [३] दाखवून सामाजिक प्रथा बंद करव्यात असा प्रचार जे लोक करतात त्यांच्या विषयी मला नेहमीच संशय वाटतो. उदा शिवलिंगावर दुध व्हावू नका भुकेल्याला द्या इत्यादी. आम्ही आमच्या मुलांना सुद्धा सांगू शकतो, उगाचं शिवरायांचे गड पाहायला जावून वेळ दवडू नका त्या एवजी गणित शिका. म्हातार्या आजीचा हात हातांत घेवून तिच्या बरोबर ५ मिनिटे बोलून वेळ दवडू नका विज्ञानाचे पुस्तक वाचा अभ्यासांत फायदा होयील. Alzimers झालेल्या आजोबा बरोबर बोलणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे कारण त्यांना नंतर त्याचा विसर पडेल त्या ऐवजी एखादे पुस्तक वाचा. ह्या गोष्टी काही प्रमाणात तार्किक वाटल्या तरी प्रत्यक्षांत तार्किक दृष्ट्या चुकीच्या आहेत. कारण इथे दोन पर्याय Mutually Exclusive नसून दोन्ही गोष्टी साध्य केल्या जावू शकतात. ज्यांना पाण्या विषयी खरोखर कळकळ आहे ते अनेक गोष्टी करू शकतात. उदा एक दिवस तांदूळ जेवणात न वापरता गहू वापरा. साखरेचा वापर कमी करा इत्यादी. ९१% पाणी जे शेत साठी वापरले. पाणी वेस्ट करण्यात भारतीय शेतकऱ्याचा पहिला नंबर लागतो. चीन किंवा अमेरिच्या तुलनेत एक टन गहू उगवायला भारतीय शेतकरी सुमारे दुप्पट पाणी वापरतो. एकूण शेतीच्या पाण्यापैकी सुमारे ४०% पाणी फक्त तांदूळ आणि उस हि पिके घेतात. भारतीय लोक आपल्या आहारांत तांदूळ फार प्रमाणात ठेवत असल्याने त्याचे आश्चर्य वाटत नाही पण उस ह्या पिकाचे मात्र आश्चर्य वाटते. महाराष्ट्रातील सुमारे ३% शेतजमीन उसाच्या लागवडी खाली आहे पण महाराष्ट्रातील ६०% पाणी मात्र फक्त उस घेतो. [६] पाणी हे शेतकर्यांना फुकट मिळत असल्याने शेतकऱ्याला फरक पडत नाही पण पिकाच्या किमतीत "पाण्याचा वापर" हा घटक ह्यामुळे लक्षांत येत नाही. ह्यामुळे साखरेची किमत कमी राहते. पाण्याचा वापर लक्षांत घेतल्यास साखरेची किंमत किमान १००% वाढायला पाहिजे. ब्राझील सर्वाधिक साखरेची निर्मिती करतो. सदर साखर भारतांत कमी दरांत विकली जावू शकते म्हणून भारतीय सरकारने ४०% आयात कर लावून ह्या साखरेला भारतांत बंद केले आहे. साखर माफियाना करदात्याचा पैसा देवून सरकार साखर निर्यात करण्यास सरकार मदत करते. साखरेची निर्यात करण्यास हरकत नाही पण ती साखर तयार करायला जे पाणी खर्च झाले आहे त्याचा खर्च त्याच्या दरातून वसूल नाही झाला तर अर्थ असा होतो कि भारतीय सरकार भारताचे पाणी भेट म्हणून इतर देशांना दिते. वरून करदात्यांचा पैसा साखर कारखान्यांना देणे म्हणजे पाण्याशिवाय गरीब भारतीयांचा पैसा सुद्धा विदेशी लोकांना भेट म्हणून देणे. ऊस पिकवून शेतकरी गब्बर झाले आहेत असे सुद्धा वाटत नाही. उस पिकवणारे शेतकरी इतर शेतकर्या पेक्षा चांगल्या परिस्थतीत आहेत असे नाही उलट साखर कारखान्यांनी त्यांचे पैसे थकवून ठेवले आहेत. भात किंवा गहूची बाजारपेठ फार मोठी असते. उस फक्त साखर कारखानेच घेवू शकतात ह्यामुळे सरकारचे शेती धोरण "साखर माफिया" सोडून इतर कुणाला फायदेशीर आहे असे वाटत नाही. ह्यांत मी सरकारचा सुद्धा दोष करू शकत नाही कारण उसाची शेती कमी करण्यासाठी सरकारने काही हालचाल केलीच तर "शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या" अशी आवई विरोधक आणि मिडिया वाले चालवतील. पाणी वाचवायचे असेल तर. भात आणि साखर आपल्या आहारातून कमी करा. एक किलो साखर वाचवली सुमारे १००० लिटर पाणी वाचवले जावू शकते. [१] http://www.fao.org/nr/water/aquastat/countries_regions/ind/index.stm [२] http://indiaenvironmentportal.org.in/files/Water%20consumption%20patterns.pdf [३] https://en.wikipedia.org/wiki/False_dilemma [४] http://www.lenntech.com/water-food-agriculture.htm [5] http://www.indiaenvironmentportal.org.in/files/file/agricultural%20water%20use%20India.pdf [6] http://www.muthstruths.com/indias-sugar-export-policy-is-almost-criminal/
वर्गीकरण
शेतकरी

प्रतिक्रिया द्या
10316 वाचन

💬 प्रतिसाद (61)
त
तर्राट जोकर Wed, 03/23/2016 - 08:50 नवीन
सहमत. एक बादली तर आहे च्या नावाखाली हजारो लिटर पाणी वाया जाते आणि ते कळत नाही. एक बादलीला ओके म्हटले की पुढे रेनडान्सही कबूल करावा लागतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
स
साधा मुलगा Wed, 03/23/2016 - 10:00 नवीन
आपल्याला मुद्दा कळला मी काय म्हणतो ते , उगाच साधनसंपत्तीची वाया घालवू नये मग ते पाणी असो व वीज. प्रतिसादाशी सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 03/24/2016 - 08:07 नवीन
हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार होतो आहे आमच्या शे पाचशे च्या चिरीमिरी ने काय होणार आहे मला लहानपणी वाचलेली 'खुलभर दुधाची' कहाणी आठवली. देवाचा गाभारा दुधाने भरून वाहील असा संकल्प राजाने केला व सक्तिने सर्व नागरिकांना स्वतःला थेंबही न घेता सगळे दूध देवळात आणुन घालायचा हुकुम सोडला. सार्‍या गावाने सगळे दूध ओतले तरी गाभारा भरेना. अखेर एक म्हातारी आली. तिने राजाचा हुकुम बाजुला सारून आपल्या घरच्या वासराना, लेकराना दूध पिऊ दिले आणि उरलेले खुलभर दूध ती देवळात घेऊन आली. तिने आपला गडु देवावर ओतताच गाभारा ओसंडुन वाहु लागला. आता मला मोठेपणी ऐकलेली 'खुलभर पाण्याची' कहाणी आठवली. देवाचा गाभारा दुधाने भरून वाहील असा संकल्प लोकशाही राजाने केला व अनासक्तिने सर्व नागरिकांना स्वतःला थेंबही न घेता सगळे दूध देवळात आणुन घालायचे आवाहन केले. कोणी विचार करु लागला कि इतर लोक दुध टाकणार आहेत च आपली एखादा तांब्या पाण्याने काय होणार आहे? चला आपण पाणीच टाकू कोणी विचार करु लागला कि इतर लोक साले चोर आहेत पाणी टाकतील मग आपण दुध टाकले तरी त्याचा काय उपयोग? चला आपण पाणीच टाकू. अशा रितिने सर्व गाभारा पाण्याने ओसंडून वाहू लागला.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 03/24/2016 - 10:10 नवीन
आवडला आणि पटलाही. धन्यवाद. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ग
गरिब चिमणा गुरुवार, 03/24/2016 - 10:45 नवीन
मी स्वतः एक शेतकरी आहे,ऊसाच्या पिकाला पाणि जास्त लागते हे खरे असले तरी ३% ऊस ६०% पाणि पितो या आकडेवारीविषयी मी साशंक आहे.उस भिजवणेसाठी पाणि भरपुर सोडावे लागते,ऊस गरगरीत भिजवायला लागतो .एकदा उस भिजवला की जवळपास् सत्तर टक्के पाणि हे पर्कोलेशनने जमिनीतीत जाते व भुजल पातळी पुनर्भरण होते.शेजारच्याचा उस भिजला की विहीरी व बोअरवेलचे पाणी वाढते हा नेहमीचा अनुभव आहे.फाट्याच्या पाण्यावर रानं भिजली की आसपासच्या सगळ्या विहीरी भरतात व ते पाणि इतर पिकाला उपलब्ध होते. ऊस पाच महीन्याचा झाला की दाट होत जातो त्यामुळे बाष्पीभवनाने जाणारे पाणी वाचते.उसाची पक्की बांधणी झाल्यानंतर फक्त पाणी द्यायचे असते ,तेही तीन आठवड्यात एकदा .त्यामुळे ऊस शेती करणारे शेतकरी ईतर कामे करु शकतात.बरेच ऊस शेतकरी गवंडी काम, ट्रॅक्टर चालक,नोकरी ,दुग्धव्यवसाय करतात .त्यामुळे या कामांसाठी मनुष्यबळ उपलब्ध होते.उस तुटल्यानंतरच वाढं म्हणजेच वरचा भाग गुरांसाठी उत्तम चारा म्हणुन आठ महिणे उपलब्ध असतो.उसाच्या शेतीने जे पुरक उद्योग विकसीत झाले आहेत व मिळणार्या उसंतीने जे मनुष्यबळ तयार झाले आहे त्यांमुळे शेती विकासात भरच पडली आहे.ईतर पिके हंगामी वेळखाउ व नगदी नसल्याने त्यांच्यापासून फारसा फायदा नाही, ऊसशेतीला बदनाम करणे त्यामुळे योग्य नाही.फक्त तुषार सिंचन ,ड्रीप इरीगेशन याला चालना दिल्याने अतिरीक्त पाण्याची बचतही होईल. ( सदरची माहीती माझ्या तूटपुंज्या शेतीच्या अनुभवावर आधारीत आहे ,पण मला वाटतं कोणा दिल्लीत बसणार्या जलतज्ञाच्या काही आकडेवारीपेक्षा शेतकर्यांने अनुभव जास्त महत्वाचे आहेत.)
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ Fri, 03/25/2016 - 08:05 नवीन
ही माहीती नविन आहे आणि उपयोगी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गरिब चिमणा
न
नाखु Tue, 03/29/2016 - 07:25 नवीन
ही माहीती खरी आणी थेट शेतकर्याकडून असेल तर अगदी तपशीलवार वेगळ्या स्वतंत्र लेखात आली तर सोन्याहून पिवळे.बरेच गैरर्समज्/एकांगी लेख वाचून झालेले प्रतिकूल मत बदलण्यास मदत होईल. तेव्हा चिमणा भाऊंनी लिहावेच. नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
स
सुबोध खरे Tue, 03/29/2016 - 08:29 नवीन
http://scroll.in/article/759038/in-parched-marathwada-farmers-are-finally-turning-away-from-water-intensive-sugarcane
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गरिब चिमणा
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 03/24/2016 - 12:16 नवीन
छान लेख! असा तथ्याधारित लेख विरळाच! नाही तर जनरली लोकांना 'कस्स्सं कस्सं बॉ मला(च) शेत्कर्‍याची कल्जी' हे दाखवायचा इतका सोस असतो :प! ;)
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 03/25/2016 - 06:45 नवीन
लेख आवडला. दर होळी अन उन्हाळ्या पुर्वी पाणी वाचवाचे हाकारे सुरु होतात. टिव्हीचॅनेल वाले एनजीओ अन तत्सम मंडळी या विषयाच्या बोम्बा मारायला चालु करतात. स्वत: किती पाणी वाचवतात कोण जाणे ! सिनेमा, फालतू टिव्ही सिरियल्स, बिना कामाचे प्रचारकी कार्यक्रम,मिरवणुका, हे असले नॉन व्हॅल्यु वाल्या टुकार अक्टिव्हिटी तीन चार महिने बंद ठेवुन खुप पाणी वाचवता येइल ना !
  • Log in or register to post comments
स
सतीश कुडतरकर Tue, 03/29/2016 - 09:07 नवीन
साहना आपण तांदुळाचा विषय काढलात. तांदुळाची शेती ही बागायती शेती आहे कि पावसाळी? जो काही पाउस थेट खाचरात पडतो त्यातूनच तांदुळाची शेती होते धरणातून कालवे काढून पाणी पुरवले जात नाही.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा