Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

"जेनेरिक" औषध एक कूट प्रश्न

च
चौकटराजा
Sun, 04/17/2016 - 07:30
🗣 77 प्रतिसाद
अधुनिक युगात अनेक बाबतीत संशोधन झाल्याने माणसाचे आयुष्य एका बाजूने सुखावह आणि तरीही त्याच बरोबर दीर्घकाळ टिकणार्‍या विकारांनी ग्रस्त झालेले दिसते. मधुमेह,रक्तदाब, संधिवात, थायऱोईडविकार ई नी मुळे आयुष्यभर औषधे घ्यावी लागत आहेत. त्यासाठी जवळ जवळ एका व्यक्तीला दर महिन्यास १२०० ते २००० रूपये इतका खर्च येतो. इतका खर्च माणूस जेवणावरही करीत नाही. सबब आता जेनेरिक औषधे लोकानी घ्यावी अशी जागृती काही संस्था करीत आहेत. जेनेरिक औषध म्हणजे बायो इक्वीव्हलंट औषध( घ्यायची पद्धत, डोस, मुख्य पदार्थ तोच व उद्देश ही तोच हा निकष )- ज्यात मूळ संशीधकाचे घ्यावयाच्या ऱोयल्टीचे हक्काची मुदत संपल्याने इतर उत्पादक त्याची कॉपी कायदेशीर रित्या करू शकतात.साहजिकच ही औषधे स्वस्त असतात. शिवलेली कोरी करकरीत पॅन्ट जर फूटपाथवर १२० रूपयाना मिळाली तर आपल्याला तीत काहीतरी " न्युन" आहे असे वाटू लागते. तोच नियम जेनेरिक ना लागू आहे. ही औषधे विश्वास बसू नये इतक्या कमी किमतीला मिळत असल्याने त्याच्या उपयुक्तेते बद्द्ल संभम निर्माण झालेला दिसतो. त्यात ब्रॅन्डेड औषधांचे निर्माते व वैद्यकीय व्यावसायिक यांचे साटेलोटे असल्याने ते खुशीने जेनेरिक औषधांचे नाव पर्याय म्हणून लिहून देत नाहीत. व असे नाव प्रिस्क्रिप्शन मधे नसल्याने जेनेरिक औषधांचे व्यापारी ते विकत देत नाहीत असे समजते. आत सामान्य लोकानी करावे काय? रस्त्यावरची १२० रूपयाची पॅन्ट घेण्यात एक तर धोका काही नाही व त्यास काही कायदेशीर बंधने ही नाहीत. सबब तिथे सब ठीक असते पण जेनेरिक चा विषय तसा नाही. एकूण या विषयावर आपला वैद्यकीय व्यावसायिक म्हणून काय अनुभव आहे ? तसेच एक रोगी म्हणून कोणी याची काही चाचणी घेऊन अनुभव ग्रथित केला आहे काय ? मिपकारानी या विषयावर प्रकाश टाकावा. आता महाराष्ट्रात जेनेरिक औषध विक्रीचे जाळे निर्माण होणार आहे म्हणे .
वर्गीकरण
अर्थकारण

प्रतिक्रिया द्या
22309 वाचन

💬 प्रतिसाद (77)
आ
आनंदी गोपाळ Mon, 04/18/2016 - 20:02 नवीन
किंवा बालगंधर्व जसे प्रेक्षकांना मायबाप म्हणत तसे, माझ्या रुग्णांनाच "मायबापहो" म्हणत, नम्रपणे सांगू इच्छितो, की या सगळ्या (व याही पुढच्यामागच्या, सोशल फोरमवर लिहिता न येण्या जोग्या) बाबी ठाऊक असल्याने, प्लीज लक्षात घ्या, की तुमचे डॉक्टर तुम्हाला मुद्दाम महाग औषध लिहून देत नाहीत. जे औषध महाग असूनही, लिहिले जाते, त्यापाठी माझा अनुभव असतो, व तुमच्या तब्येतीचा माझा अभ्यास. याशिवाय एक "लॉकेट अन पॉकेट" थ्येरी आहे. आमचे जोग मास्तर, स्त्री रुग्णाचे "लॉकेट" अर्थात मंगळसूत्र व पुरुषाचे पॉ़केट उर्फ खिसा जोखून पहा, व नंतर त्याला.तिला प्रवडेल असे औषध लिहा, असे साम्गत असत. हे मी आजही विसरलो नाही, अन माझे विद्यार्थीही हे विसरणार नाहीत याची खात्री मला आहे... बाकी आपण सूज्ञ आहातच.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 04/19/2016 - 03:58 नवीन
धागा जेनेरिक वि ब्रान्डेड औषधे आहे.थोडे वाचन करणारे आमच्यासारखे कीस पाडतात परंतू प्रत्यक्ष व्यवहारात घराघरात हा प्रश्न उपस्थित होतच नाही कारण रुग्ण आणि त्याची जबाबदारी ज्यावर पडली आहे तो नातेवाईक निर्णय घेतो .तो फारतर डॅाक्टर बदलेल एखादे वेळेस परंतू तो उपाय सारखासारखा करणे परवडणारे नसते.शिवाय डॅाक्टरला अमुक औषधेच दे हे सांगणे म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे.एकतर त्याने दिलेली औषधे घेणे अथवा डॅाक्टर बदलणे दोनच पर्याय असतात.
  • Log in or register to post comments
न
नमकिन Tue, 04/19/2016 - 05:06 नवीन
अन्न व औषध प्रशासन ही सरकारी संस्था औषध निर्माण कारखाने यांची सुविधा, सामग्री इ वेळोवेळी तपासणी करुन परवाने देते. त्यामुळे फक्त नामचीन तेवढेच श्रेष्ठ व दर्जा असे नसते. हा बोगस औषधि विषय वेगळा. बरं ब्रँडेड चा दर्जा पण हेच FDA वाले प्रमाणित करतात. एखादा जाहिरातीत कमी पडतो/करतो याचा दर्जाशी संबंध लावणे अन्यायपूर्ण ठरेल. खरंतर केमिस्ट वा त्याची शिखर संस्था बोगस औषधि लोकांपर्यंत येण्यापासुन रोखू शकतील. अवांतर- दूधाशी तुलना विसंगत.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 04/19/2016 - 06:40 नवीन
Regulatory issues The regulatory agency, Office of Drug Controller General of India, admits it is ill-equipped to handle the extent of vigilance required to comb a vast country with just 35 drug inspectors at the central level and 1,100 in the states. The All India Drugs Control Officers’ Confederation (AIDCOC), a representative body of drug inspectors, estimates that India needs at least 4,500 additional drug inspectors to monitor 15,000 drug manufacturing units and more than half a million retail outlets. The drug control regime is “crippled,” says Ravi Uday Bhaskar, AIDCOC secretary general. “There is inadequate manpower, infrastructure and auxiliary staff. This issue of upgradation has been in a limbo for 25 years now,” he says, but bristles at the notion that drug inspectors, sometimes suspected of being part of the problem, are also to blame for the spread of counterfeit drugs. http://www.livemint.com/Companies/DKFwlkzPv02MPyiZxUGqDN/Fake-drug-indus... नम्कीन साहेब वर लिहिलेले आणी त्याचा दुवा एकदा वाचून घ्या. आपल्याकडे आर टी ओ आणी वाहतूक पोलीस जितक्या कडकपणे कायद्याची अंमलबजावणी करतात तितक्याच "कडकपणे" आपले औषध निरीक्षक कामे करतात. तेंव्हा त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल गैरसमज नको. दुर्दैवाने जेनेरिक औषधे कुठे आणी कशी उत्पादित केली जातात याची डॉक्टरना माहिती मिळणे फार कठीण आहे. उत्तराखंड मध्ये PAONTA साहेब किंवा मध्य प्रदेशात रतलाम/ पिथमपूर येथे जाऊन प्रत्यक्ष पाहणे कसे शक्य आहे? त्यामुळे ती उत्तम असली तरी त्याबद्दल सर्वसामान्य डॉक्टर कशी खात्री देणार? वर लिहल्याप्रमाणे २५ % औषधे बनवत असतील तर डॉक्टर आपल्या रुग्णाला काय आणी कशी खात्री देणार?
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ Tue, 04/19/2016 - 07:21 नवीन
औषधांचा दर्जा चांगला आहे की नाही हे ठरवण्यासाठी , कंपन्या औषधे अमेरीकेला निर्यात करतात हा पॅरॅमिटर वापरला तर चालेल का? कारण अमेरीकी एफडीए च्या नोटीसा चांगल्या नावाजलेल्या कंपन्यांना आलेल्या वाचनात येते. म्हणजे भारत सरकार नाही तरी अमेरीकी एफडीए प्लँट, मशिनरी, स्वच्छता या कडे लक्ष ठेवून असते असे म्हणायला हरकत नाही. पण शंका अशी रहाते की, ह्याच कंपन्या अमेरीकेत निर्यात करणारी औषधे आणि देशात विकाय ची औषधे एकाच प्लँट मधे तयार करतात का?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 04/19/2016 - 08:17 नवीन
अमेरिकन एफ डी ए हे कारखाने अत्यंत काटेकोरपणे तपासते आणी त्यात जराही तृटी आढळली तर त्याची नोटीस कंपनीला मिळते. म्हणजे केवळ छप्पर एका कोपर्यात गळत होते म्हणून का प्रथितयश कंपनीला एका कारखान्यातील औषधे छप्पर गळती थांबून एफ डी ए चे निरीक्षक परत सर्व ठीक आहे याचे प्रमाणपत्र देईपर्यंत अमेरिकेत पाठवण्याची बंदी घातली. आणी एफ डी ए चे निरीक्षक अजिबात पैसे घेत नाहीत. कारण तसे जर तिथल्या माणसांच्या ध्यानात आले तर त्यांच्या( निरीक्षक) विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा खटला भरला जाईल. अमेरिकेचे ACRREDITATION होताना त्यांची ZERO TOLERANCE वृत्ती पाहिली आहे. तीच मी माझ्या दवाखान्यात लागू करण्याचे ध्येय ठेवले आहे. परंतु आपल्या कंपन्या असे कारखाने फक्त "निर्यातीसाठी" तयार केलेल्या औषधांसाठी वापरतात आणी भारतात अशा गळक्या छपराचे कारखाने "चालून" जातात. सब चलता है! एडजष्ट कर लो भाई!
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 04/19/2016 - 08:20 नवीन
बरेच दिवस अगोदर राजस्थान मधल्या चित्तौड़गढ़ जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी अन शिक्षणाने डॉक्टर असलेल्या डॉ.समित शर्मा, आय.ए.एस ह्यांनी चित्तौड़गढ़ जिल्ह्यात "स्वस्त धान्य दुकान" प्रमाणे "स्वस्त औषधे दुकान" हा प्रायोगिक प्रकल्प सार्वजानिक वितरण प्रणाली वापरून केल्याचे वाचले होते, ह्या योजने अंतर्गत सरकारी स्वस्त औषध दुकान स्थापित करुन त्या अंतर्गत जनतेला जेनेरिक औषधे अतिशय स्वल्प दरात उपलब्ध करुन दिली गेली होती, माझ्या माहीती नुसार आता ही योजना राजस्थानच्या १० जिल्ह्यात कार्यान्वित असुन राजस्थान मेडिकल सर्विसेज थ्रू त्यांचे वितरण होते असे ऐकले आहे, डॉक्टर समित शर्मा, आय.ए.एस हे आता ह्या उपक्रमाचे मेडिकल डायरेक्टर असल्याचे समजते आहे. ह्यावर कोणी अधिक प्रकाश टाकू शकेल काय? म्हणजे जेनेरिक औषधांची उपयुक्तता किंवा त्यांचे सरकारी चॅनल मधुन वितरण वगैरे वर?? *माहीती वाचीव आहे
  • Log in or register to post comments
न
नितीनचंद्र Tue, 04/19/2016 - 08:51 नवीन
डॉक्टर साहेब, आपली माफी मागुन पण आपली लॉकेट आणि पॉकेट ही मनोवृत्ती म्हणजे ज्याचे पॉकेट मोठे दिसेल त्याचे ऑपरेशन करा. जरा लहान असेल तर औषधाने बरे होईल असा सल्ल देऊन औषध द्या तर पेशंट खाका बगला वर करणारा असेल तर माफ करा मी जरा बिझी आहे असे म्हणुन पळ काढण्यासारखे आहे. मग ती रुग्ण सेवा याची शपथ आणि मनोवृत्ती याचा ताळमेळ लागत नाही. एखाद्याने कष्टाने पैसे कमवले असतील आणि पाकीट मोठे आहे म्हणुन विनाकारण महागडी औषधे द्यायची का ?
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Tue, 04/19/2016 - 09:26 नवीन
मला वाटते तुम्ही चुकीचा अर्थ काढलात. त्यांचे म्हणणे थोडे वेगळे दिसते. त्यांच्या प्रतिसादावरुन असे म्हणायचे असावे की जर एखादा खर्च करु शकत असेल तर त्याला थोडी जास्त महागडी औषधे लिहुन देता येतील (जी अजुन जास्त परिणामकारक असु शकतील) पण एखादा जर गरीब माणूस असेल तर त्याला या महागड्या औषधां ऐवजी थोडी कमी परिणामकारक पण स्वत्स्त औषधे लिहुन देता येतील. समजा आहाराबद्द्ल उदाहरण द्यायचे झाल्यास श्रीमंतांना व्हिटामिन बी १२ साठी मटण, मासे खायला सांगता एइल तर गरिबांना रोज रात्री ग्लासभर दूध प्या / दही खा असे कमी खर्चिक उपाय सांगता येतील असे त्यांचे म्हणणे असावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितीनचंद्र
अ
असंका Tue, 04/19/2016 - 11:30 नवीन
+१ डॉक्टरांच्या म्हणण्याचा असा अर्थ मुळीच नाही. रुग्णाची आर्थिक बाजू लक्षात घेऊन थोडं तारतम्य बाळगून औषध योजना करावी एवढाच विचार होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
स
सुबोध खरे Tue, 04/19/2016 - 16:36 नवीन
नितीन साहेब आपण काळा चष्मा लावला कि जग काळं दिसतं. आनंदी गोपाळ साहेब यांनी लिहिले ले शब्द असे आहेत :"जे औषध महाग असूनही, लिहिले जाते, त्यापाठी "माझा अनुभव" असतो, व तुमच्या तब्येतीचा माझा अभ्यास. याशिवाय एक "लॉकेट अन पॉकेट" थ्येरी आहे. आमचे जोग मास्तर, स्त्री रुग्णाचे "लॉकेट" अर्थात मंगळसूत्र व पुरुषाचे पॉ़केट उर्फ खिसा जोखून पहा, व नंतर त्याला/तिला परवडेल असे औषध लिहा" एखाद्या गरीब रुग्णाला तुम्ही आवश्यक म्हणून एखादे महाग औषध लिहून दिले तरी त्याला ते परवडत नसेल तर तो ते औषध पूर्ण दिवस घेत नाही. यामुळे आजार पूर्ण बरा होत नाही. उदा. भारतात क्षय रोगाची नवी औषधे( रिफ़म्पिसिन) सुरुवातीला अतिशय महाग होती १९८४ साली मी एम बी बी एस करीत असताना रोजच्या औषधांचा खर्च ५० रुपये होता.जो बहुसंख्य निम्न मध्यम वर्ग आणि निम्न वर्गाच्या आवाक्याच्या बाहेर होता. हि औषध योजना ६ महिने चालत असे. या उलट जुनी औषध योजना स्ट्रेप्तोमायसीन इंजेक्शन तीन महिने( किंमत अडीच रुपये) आणि आयसोनियाझाइड आणि थायासिटाझोन पुढे १६ महिने किमत ४० पैसे रोज. म्हणजे पहिले तीन महिने ३ रुपये रोज आणि नंतर १६ महिने ४० पैसे रोज असा खर्च होता. तेंव्हा कोणत्या रुग्णाला रिफ़म्पिसिनचा कोर्स द्यायचा आणि कोणाला जुना हे रुग्णाच्या खिशाकडे पाहून ठरत असे. तुम्ही एखाद्या मजुराला (ज्याची मजुरी १६ रुपये रोज आहे) रिफ़म्पिसिनचा कोर्स लिहून दिला कि तो केमिस्ट कडे जात असे दहा दिवसाची औषधे घेण्यासाठी पैसेच नात मग तो चिठी टाकून देत असे आणि झाडपाल्याची औषधे करीत असे. आजही स्तनाचा कर्करोग झालेल्या स्त्रीला नॉर्मल केमो थेरेपी द्यायची किंमत १०-१२ हजार रुपये येते पण ज्यांचा कर्करोग HER + आहे त्याना अजून चांगला गुण येण्यासाठी हरसेपटीन ची ८ इंजेक्शने( रुपये ५०-६०००० एका इंजेक्षनचे -- २०१४ मधील स्थिती) द्यायची तर ४-५ लाखाच्या वर खर्च येतो. त्यांचा रोग पूर्ण बरा होण्याची शक्यता या इंजेक्शन मुळे ९५ टक्क्याच्या वर जाते. मग अशा वेळेस डॉक्टर काय करेल? खिसा पाहूनच उपचार लिहील कि सब घोडे बारा टक्के? रुग्णाने परवडत नाही म्हणून दोन इंजेक्शन देऊन औषध बंद केले तर कर्करोग बरा तर होत नाहीच पण त्या औषधाला RESISTANT होतो. आज परिस्थिती अशी आहे कि सर्वाना सर्व औषधांचा खर्च परवडत नाही. नवीन येणारी औषधे आयात केलेली असल्याने भयंकर महाग असतात. मग प्राप्त परिस्थितीत असलेल्यापैकी सर्वोत्तम औषध रुग्णाच्या खिशाला परवडणारी द्यावी लागते. महाग दिली तर डॉक्टरला त्यातून "कट" मिळतो आणी स्वस्त दिली तर उपचार "व्यवस्थित" केला नाही असा प्रवाद कानावर येतो. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितीनचंद्र
स
स्वीट टॉकर Tue, 04/19/2016 - 12:19 नवीन
अतिशय महत्वाच्या विषयाबद्दलचा धागा, त्यावर आपल्यातल्या जाणकार मंडळींनी दिलेली प्रामाणिक स्पष्टीकरणे, आणि कुठल्याही प्रकारची टिंगल, राग वगैरे नसलेली चर्चा. वा. धागा असावा तर असा! आम्हाला खूपच उपयुक्त माहिती मिळत आहे. चालू द्या!
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Tue, 04/19/2016 - 12:40 नवीन
डॉ म्हात्रे, आनंदी गोपाळ, अजया, सुबोध खरे साहेब ई चे आभार. मला यात सर्वात महत्वाचा मुद्दा अस वाटला की रासायनिक नाव जरी एक असले तरी, दोन्ही कम्पन्या जैन किम्वा वर्धमान फार्मसी नसल्या तरीही काही आणखी लाभदायक गोष्टी देणारी गोळी महाग असू शकते. उदा. डायरेक्ट आतड्यात विरघळणारी गोळी.हा लाभ जर आपणास नको असेल तर आपणच पर्यायी गोळ्यांचा अभ्यास करून स्वस्त गोळी ( अर्थात जैन व वर्धमानची नसलेली) डॉ कडे मागणे हितावह आहे. त्यासाठी रूग्णाने काही वाचन करणे अपेक्शित आहे. एवढे करून जर महिन्याला साठ वा शंभर रूपयेच जर वाचणार असतील. तर फार विचार करणे युक्त नाही. तरीही जर जेनेरिक गोळी घेऊन पाहून उदा. मेटफोर्मिन साखर नियंत्रित झाल्याचे दिसत असेल तर वेगळा विचार करणे गरजेचे ठरेल.आजचा वैद्यकीय व्यवसाय हा विश्व्बास गमावत चाललेला आहे हे मात्र नक्की.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 04/19/2016 - 14:43 नवीन
चौरा साहेब "काही आणखी लाभदायक गोष्टी देणारी गोळी महाग असू शकते. उदा. डायरेक्ट आतड्यात विरघळणारी गोळी.हा लाभ जर आपणास नको असेल तर आपणच पर्यायी गोळ्यांचा अभ्यास करून स्वस्त गोळी ( अर्थात जैन व वर्धमानची नसलेली) डॉ कडे मागणे हितावह आहे." आपले हे गृहीतक चुकीचे आहे. आतड्यात विरघळणारी गोळी हा लाभ नसून ती आवश्यकता आहे. ऊदा. अमिबिक डीसेंट्री साठी दिली जाणारी टीनिडाझोल औषध असलेली गोळी. टिनीडाझोल हे औषध जठरातील आम्लामध्ये विघटन पावते त्यामुळे ते आतड्यात पोहोचे पर्यंत त्यातील बहुतेक द्रव्य नष्ट होते. यासाठी ती गोळी एण्टेरिक कोटेड म्हणजे आम्लात न विरघळणारया पदार्थाचे आवरण चढवलेली असते. तेंव्हा ती स्वस्त किंवा महाग हा विचार तेथे येत नाही. याचा दुसरा भाग असा आहे कि आयब्यूप्रोफेन किंवा तत्सम गोळ्या जठराच्या अंतर्भागाला दाह करू शकतात. म्हणजे या गोळ्या तील द्रव्य जरी आम्लामुले नष्ट होत नसले तरी असा जठराचा दाह होऊ नये म्हणून त्या एण्टेरिक कोटेड केलेल्या असतात. या वेळेस त्या गोळ्या महाग असु शकतात. ज्या रुग्णाला आम्लपित्त आहे अशा रुग्णाला देताना डॉक्टर महाग असेल तरीही अशी गोळी देतात. या ऐवजी तेच द्रव्य असलेली स्वस्त गोळी आपण घेतली तर आपल्याला जठराचा दाह होऊ शकतो. दारू पिऊन हान्गओव्हर मुले होणार्या डोकेदुखी साठी अशी एण्टेरिक कोटेड नसलेली गोळी घेतली तर आपल्याला डोकेदुखी पासून मुक्तता मिळते पण पोटात जळजळ उलटी असा त्रास होऊ शकतो. आपल्याकडे दुर्दैवाने मित्राने जालीम उपाय म्हणून सुचवल्याने अशी औषधे घेणारे शेकड्यांनी मिळतील. तेंव्हा केवळ APPवर तेच द्रव्य असलेली गोळी घेणे इतके साधें नि सरळ नाही. एवढे करून जर महिन्याला साठ वा शंभर रूपयेच जर वाचणार असतील. तर फार विचार करणे युक्त नाही. तरीही जर जेनेरिक गोळी घेऊन पाहून उदा. मेटफोर्मिन साखर नियंत्रित झाल्याचे दिसत असेल तर वेगळा विचार करणे गरजेचे ठरेल दुर्दैवाने माणसाला स्वतःच्या शरीराची किंमत फुकट मिळत असल्याने फारशी नाही हि बाब मला इथे अधोरेखित करावीशी वाटते. जी मोटार गाडी ३ ते ३.५ लाखाला आपण विकत घेता आणी ती दर सहा ते आठ वर्षांनी बदलली जाते. तिचा विमा दर वर्षी १२०००/- असतो. म्हणजे महिन्याला १०००/- रुपये. तेथे माणूस पैसे भरायला पुढे मागे पाहत नाही परंतु स्वतःचे शरीर जे तुम्हाला "आयुष्यभर" बदलता येणार नाही त्याच्यासाठी मात्र महिना हजार रुपये खर्च करायची "एकाही" माणसाची तयारी मला आजपर्यंतच्या अनुभवात दिसली नाही. ज्यांना बायपास सारखी मोठी शस्त्रक्रिया करावी लागली किंवा ज्यांनी मृत्यू समोर उभा ठाकलेला प्रत्यक्ष पहिला असेच लोक फक्त औषधावरील खर्च बाबत तक्रार करताना कमी आढळतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
च
चौकटराजा Tue, 04/19/2016 - 15:55 नवीन
जी आय टी मधील गोळीचे गन्तव्य स्थान व फक्त तेथीलच रासायनिक प्रक्रियेला आयसोलेट करणे हा भाग कधी वाचनात आला नव्हता ." सुबोध" केल्याबाद्द्ल सॉल्ल्लिट धन्यवाद ! बाकी पैशापेक्षा एक्दाच मिळाणारे शरीर महत्वाचे. हा धागा अशासाठीच काढला की पर्याय सर्वार्थाने खरेच पर्याय आहे किवा कसे ? .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
च
चौकटराजा Tue, 04/19/2016 - 16:12 नवीन
गोळ्या व कॅप्शूल असा प्रकार ठरवताना काही वरील प्रमाणे गोळीच्या गमन मार्गाचा काही विचार असतो का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
स
सुबोध खरे Tue, 04/19/2016 - 16:41 नवीन
नक्कीच असतो. जी द्रव्ये वातावरणाच्या / हवेच्या/ आर्द्रतेच्या किंवा प्रकाशाच्या संपर्कात येऊन विघटन पावतात. ती सध्या गोळीच्या स्वरूपात( क्रोसिन अनासीन सारखी पांढरी) देता येत नाहीत. शिवाय "अत्यंत कडू" असलेली औषधे सुद्धा गोळीच्या स्वरुपात देत नाहीत. मग एकतर फिल्म कोटेड स्वरुपात किंवा कॅपसूलमध्ये घालून दिली जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
च
चौकटराजा Tue, 04/19/2016 - 16:49 नवीन
इ सी म्हण्जे एन्टेरिक कोटेड पहिल्यांदा १८८४ मधे जन्माला आले. पण जठरापुढे टिकले नाही. मग शेलॅक वापरण्यात आले. ते बरेच काळ चालू होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मी-सौरभ Tue, 04/19/2016 - 15:02 नवीन
खुप दिवस झाले अशी निर्भेळ चर्चा वाचुन. माझी शंका, जेव्हा आपण एखाद्या डॉक्टरकडे बारीक सारीक तक्रारी घेऊन जातो आणि ते ४-५ गोळ्या ५ दिवस घेऊन परत दाखवायला सांगतात आणि आपण नेहेमीप्रमाने बरे वाटु लागले की औषधे आणि डॉक्टर दोन्हीला रजा देऊन कामाला लागतो. बर्‍याच वेळेला अश्या केसेस मधे तो आजार परत ऊद्भवत नाही. तर हे करणे किती बरोबर आहे.
  • Log in or register to post comments
स
साधा मुलगा Tue, 04/19/2016 - 16:04 नवीन
असे करणे योग्य नाही. डॉक्टरांनी सांगितलेला course हा पूर्णपणे follow करा. उगाच मध्ये सोडू नका, अन्यथा जर का डॉक्टरांनी तश्या सूचना दिल्या असतील तरच. कारण यात जर का antibiotics असतील तर मग bacteria मध्ये resistance तयार होतो. मग काही दिवसांनी त्या औषधाचा effect होत नाही. Antibiotics च्या अश्या अनिर्बंध वापरामुळे बरीच antibiotics इतिहासजमा झाली आहेत आणि काही होण्याच्या मार्गावर आहेत. काही वेळा दिलेला course अर्धवट सोडल्याने relapse अथवा आजार उलटतो. हे TB सारख्या रोगामध्ये ठळकपणे जाणवते. बर्याच रुग्णांनी अशी अर्धवट औषध घेतल्याने MDR (Multi drug resistance) TB म्हणजे दोन किंवा अधिक औषधानाही दाद न देणारा TB निर्माण झाला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ
अ
अजया Wed, 04/20/2016 - 15:58 नवीन
हा आमच्या डेंटिस्ट्रीमधला नेहमीचा तापदायक अनुभव आहे.लोक दुखणे थांबले की गोळ्या बंद करतात. Antibiotics दिली असताना ती पेशंटचा इंफेक्शनचा प्रकार, त्याच्या इंफेक्शनची तीव्रता, त्याचे वजन,वय यानुसार त्याला त्यातला किती डोस उपलब्ध होईल त्याप्रमाणे गोळ्या लिहुन दिलेल्या असतात.दोन गोळ्यांनी इंफेक्शन सूज कमी झाली की लोक त्या बंद करुन पुढच्या वापरासाठी ठेवतात! असे सांगतातही! तुमच्या मागच्या दोन गोळ्यात 'बरा' झालो त्यातल्या उरलेल्या आहेत.याचा अर्थ तुम्ही प्रमाणात औषधाचा डोस घेतलेला नाहीये.परत इंफेक्शन होईल तेव्हा चतुर बॅक्टेरियाची पुढची पिढी त्या गोळ्यांना दाद देणार नाही.म्हणजेच रेझिस्टन्स येणार! पुढच्या वेळी आपण त्या गोळीने बरे होणार नाही आहात! म्हणूनच प्रमाणित डोसचे महत्त्व असते.त्याप्रमाणे घ्यावेच. याच विषयाशी समांतर गोष्ट जाणवते.ती म्हणजे साध्या साध्या इंफेक्शनला मोठी प्रतिजैविके वापरणे.यात आमचे व्यवसाय बांधवही मागे नाहीत ही शरमेची गोष्ट आहे.जे साध्या माॅक्सच्या गोळीने काम होणार त्यासाठी पुढच्या पायरीचे प्रतिजैविक निष्कारण वापरल्याने अॅटिबायाॅटिक रेझिस्टंट आजाराला आमचा हातभार लागू शकतो.यावर अनेकदा व्याख्याने घेऊन तज्ञ कळवळून धोका सांगत आहेत.पण उगाचच ofloxacine इ antibiotics जी ड्रग रेझिस्टंट टिबीच्या ट्रीटमेंट ला उपयोगी पडू शकतील ती देऊन रेझिस्टंसला खतपाणी घातले जाते आहे :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साधा मुलगा
च
चौकटराजा Wed, 04/20/2016 - 10:51 नवीन
माझे तरी असे निरिक्षण आहे की बरेचसे डॉ पायरी पायरीनेच अ‍ॅन्टी बायोटिक देतात. आता बर्याच लोकाना "कोर्स" पूर्ण करायला घरातील इतर नातेवाईक लक्ष ठेवून भाग पाडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 04/20/2016 - 11:32 नवीन
तुम्ही नशीबवान आहात... कारण तुम्ही स्वतः चौकस आहात आणि तुमच्या वरच्या विधानावरून तुमचे डॉक्टर्सही शास्त्रिय विचाराने वागणारे आहेत असे दिसते. मात्र, वाढत्या जाणकारीमुळे, अँटिबायोटिक्स गरजेपेक्षा कमी प्रमाणात आणि / किंवा कमी दिवसांसाठी घेण्याचे प्रमाण घटत असले तरीही अजूनही त्याचे जगभरातले प्रमाण ल़क्षणियरित्या जास्त आहे. याची मुख्य कारणे अशी... अ) रुग्णांमधले आणि नॉन-मॉडर्न वैद्यकीय व्यावसायीकांमधले अश्या अँटिबायोटिक्सच्या गैरव्यवहाराने होणार्‍या दुष्परिणामांबद्दलचे (रेझिस्टंट बॅक्टेरिया तयार होणे, इ) अज्ञान आ) "काहीही करून झटकन उतार पडला पाहिजे, तरच डॉक्टर चांगला", अशी रुग्णांमधे असलेली अज्ञानमूलक समज आणि तिला बळी पडून सुरुवातीपासूनच उच्च दर्जाची अँटिबायोटिक्स (जी केवळ जुनाट / रेझिस्टंट / प्रखर इन्फेक्शन्ससाठी राखीव ठेवावी अशी पद्धत आहे) वापरणारे डॉक्टर्स, इ) औषधांवर होणारा खर्च परवडत नाही म्हणून रुग्णाने औषधे कमी प्रमाणात घेणे अथवा पूर्णपणे बंद करणे, हे केवळ विकसनशील देशांतच नव्हे तर युएसए सारख्या अग्रगण्य समजल्या जाणार्‍या देशांमधीलही एक मोठी समस्या आहे. जर या समस्येमधे खोलवर अंतर्ज्ञान (इन्साईट) हवे असेल तर एका मनस्वी व्यावसायीकाने चालवलेल्या डोळे उघडणार्‍या प्रकल्पावर सर्वसामान्यांना समजेल अश्या भाषेत आलेला खालील दुव्यावरचा लेख वाचावा... http://www.newyorker.com/magazine/2011/01/24/the-hot-spotters महत्वाचे मुद्दे : १. सद्या अशी अवस्था आली आहे की नवीन अँटिबायोटिक्सच्या शोधांचा वेग, नवीन रेझिस्टंट बॅक्टेरिया तयार होण्याच्या वेगापेक्षा धोकादायकरित्या कमी आहे. हे असेच चालू राहीले तर "या इन्फेक्शनला उपयोगी अँटिबायोटिक आस्तित्वात नाही, केवळ देवाची प्रार्थना करा" असा सल्ला देण्याची वेळ दशक-दीडदशकात येऊ शकेल ! २. प्रमाणापेक्षा कमी वेळ / मात्रेने औषध घेण्याने, वाचलेल्या खर्चापेक्षा कित्त्येक पट्टींनी अधिक खर्च भविष्यात होतो... आणि न भरून येणारी शारिरीक हानी होऊ शकते तेही अलाहिदा. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
म
मी-सौरभ Wed, 04/20/2016 - 11:39 नवीन
मनःपुर्वक धन्यवाद..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
M
mugdhagode गुरुवार, 04/21/2016 - 03:15 नवीन
नवीन अँटीबायोटिक तयार होत नाहीत कारण त्यात फार्मा कंपन्याना रस राहिलेला नाही... एका पेशंटला किती दिवस अँटिबायोटिक देणार ? आअठ - पंधरा दिवस. त्यापेक्षा बीपी , डायबेटिस , ओबेसिटी , इ वर औshhadh दिले की जन्मभर गिर्‍हाइक ते घेणारच. त्यामुळे सगळे रिसर्च अशा आजारांवरच सुरु आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
उ
उल्का Tue, 04/19/2016 - 18:21 नवीन
मिपा डॉक्टर्सचे माहितीबद्द्ल मनापासून आभार.
  • Log in or register to post comments
प
प्रियाजी Wed, 04/20/2016 - 11:56 नवीन
अतिशय उत्तम धागा. वा. खू. साठविली आहे. मिपावरील सर्व वैद्यकांचे मनापासून आभार. मनातील अनेक शंकांचे आपोआप निरसन होत आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा