आयेश्वराच्या अंगणी
तशी बहुत वरुषांची गोष्ट. ८००/ १००० वर्षांपूर्वीची. तेव्हा इये देशी देवगिरीच्या यादवांची सत्ता होती. सेऊणदेशचे यादव. देवगिरी ही राजधानी म्हणून स्थापित व्हायची होती. यादव तेव्हा इथे राज्य करत होते ते राष्ट्रकूटांचे मांडलिक म्हणूनच. यादवांचीच एक शाखा अंजनेरीला होती. सेऊणचंद्र तिसरा ह्याचा शिलालेखच अंजनेरीच्या एका जैन मंदिरात आहे. अंजनेरीचे यादव हे बहुधा जैन धर्मीय होते. यादवांची दुसरी शाखा होती सिंदिनेरात, सिंदीनेर अथवा सिंदनगर म्हणजेच आजचं सिन्नर, नाशिकजवळचं.
ह्या सिन्नरातच यादवकालीन स्थापत्यशैलीचे काही अवशेष आहेत. त्यातलं प्रमुख म्हणजे गोंदेश्वर अथवा गोविंंदेश्वर मंदिर. हे मंदिर यादवराजा गोविंद ह्याने बांधले असावे असे मानले जाते. भूमिज शैलीतले हे महाराष्ट्रातले तुलनेने उशिरा निर्माण झालेले मंदिर. १३ व्या शतकातले. हे मंदिर बांधले गेले तेव्हा देवगिरी ही राजधानी होती. मात्र त्याहीआधीचे म्हणजे यादव हे मांडलिक असतानाचे आणि देवगिरी हे यादवांची राजधानी नसतानाहीच्या कालखंडात एक मंदिर सिन्नरात बांधले गेले होते. ते दुर्लक्षित मंदिर म्हणजे ऐश्वर्येश्वराचे. ह्यालाच आयेश्वर मंदिर असेही म्हणतात. यादव आईरमदेव ह्याने हे बांधले असावे असे मानले जाते. हा आईरमदेव म्हणजे सेऊणचंद्र द्वितिय ह्याच्या नंतरचा. आईरमदेवाचा कालखंड फारसा ज्ञात नाही. बहुधा हेमाद्रीच्या राजप्रशस्तीत ह्याचा उल्लेख आहे.
तर हे आयेश्वराचं मंदिर दिसायला अगदी लहानसं. अगदीच १०/१५ मिनिटात पाहून होईल असं. किंचित वेगळ्या शैलीच. द्रविड आणि वेस्सर अशा मिश्र शैलीचं. मूळचं शिखर आज गायब आहे त्यामुळे शैली नीटशी ओळखता येत नाही. ऩक्षीदार स्तंभांवर तोललेला सभामंडप, पुढे अंतराळ आणि मग गर्भगृह अशी त्याची रचना.
आयेश्वराचं प्रथम दर्शन
सभामंडपातले स्तंभ बहुत नक्षीदार. मधूनच सुरसुंदरींची शिल्पे स्तंभांवर कोरलेली दिसतात.
ही शालभंजिका
मी चुकत नसेन तर ही गंगाच आहे.
ही कर्पुरसुंदरी का कोण
हा देव नक्की कोणता ते ओळखता आलं नाही
हा मात्र विष्णूच
सर्वच स्तंभ फार नजाकतीने कोरलेले आहेत.
स्तंभावर मंदिराचा डोलारा आपल्या हातांनी पेलणारे भारवाहक यक्ष आहेत. ह्यांनाच किचक असेही म्हणतात. यक्षांची संकल्पना पश्चिमेकडून आली, म्हणजे ग्रीकांकडून.
-
गर्भगृहाच्या द्वारावर जे एक शिल्प आहे ते इथलं खरं वैभव. नटराज शिव. सिंपली फॅण्टास्टिक
मकरांच्या मुखातून निघालेली अर्धगोलाकार नक्षीदार शिल्पपट्टिका. दोन्ही बाजूंना शिवाचा एकेक अनुयायी मकरांचे सारथ्य करतोय. शिल्पपट्टीकेवर वादक वाद्य वाजवताहेत, भारवाहक यक्ष पट्टीका तोलत आहेत, मधेच शरभादिल प्राणी आहेत तर त्याच्या वरच्या पट्टीकेवरील मोरांची रांगच आहे. तर संपूर्ण पटाच्या मध्यभागी शिव तांडवनृत्य करतोय. त्याच्या एका बाजूला पार्वती आहे तर दोन्ही बाजूला अनुयायी आहेत. पखवाजसदृश वाद्य वाजवताना एकजण तर अगदी स्पष्ट दिसतोय.
ह्याच्यापुढे अंतराळ आणि त्यापलीकडे गर्भगृह आहे. अंतराळावरही कहई शिल्पे कोरलेली आहेत पण अंधारामुळे छायाचित्रे घेता आली नाहीत.
तसाच मंदिराच्या बाहेर येऊन फेरी मारायला बाहेर पडलो
मंदिराच्या बाह्यभिंतीच्या चौथर्यावर बाणासारखे सरळ वर जाणारे स्तंभ अशी बाह्यभागाची रचना. मधेमध्ये काही देखणी शिल्पेही कोरलेली आहेत.
मंदिराचा बाह्यभाग
मंदिराचा पार्श्वभाग
अर्धस्तंभाचे नक्षीदार शिखर
स्तंभांवरही भारोत्तोलन करता करता शरभ आदि प्राण्यांवर स्वार होणारे यक्ष आहेतच.
हा यक्ष मला फार आवडला. एका हाताने तो भिंत तोलून धरतोय त्याचे वेळी तो आपल्या वाहनावर चाबूकही उगारतोय.
तर हे यक्ष चक्क कसरती करताहेत
मधूनच काही भग्न शिल्पं आहेत. बरीचशी अनाकलनीय आहेत. एकंदरीत इथे संशोधनाला बराच वाव आहे.
हे राम, लक्ष्मण, सीता का कृष्ण बलभद्र सुभद्रा काहीच कळत नाही.
हे माझ्या अंदाजाप्रमाणे इंद्रजिताचे लक्ष्मणासोबतचे द्वंद्व असावे. अगदी अशाच प्रकारचा रामायणातील पट जवळच्याच गोंदेश्वर मंदिरात आहे.
सुरसुंदरींच्या विविध प्रकारांची शिल्पे मात्र येथे फार आढळत नाहीत. जितकी आहेत ती सभामंडपाच्या स्तंभांवरच.
इतके सारे अवघे बघून होता होईता संध्याकाळ दाटून आलेली असते. मन मात्र अजूनही आयेश्वरातच गुंतलेले असते. असं वाटतं की येथेच काही काळ तसंच बसून राहावं अशाच काही आठवणी काढत.
💬 प्रतिसाद
(84)
इ
इशा१२३
गुरुवार, 05/19/2016 - 06:32
नवीन
फोटो आणि माहिती नेहमीप्रमाणे छानच !या मंदिराची नेमकी शैली मात्र कळत नाहिये.नेमक शिखरच गायब.
- Log in or register to post comments
इ
इशा१२३
गुरुवार, 05/19/2016 - 06:34
नवीन
फोटो आणि माहिती नेहमीप्रमाणे छानच !या मंदिराची नेमकी शैली मात्र कळत नाहिये.नेमक शिखरच गायब.
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
गुरुवार, 05/19/2016 - 06:40
नवीन
तुमचे सर्व लेख एकत्र करुन ठेवायला हवेत,,,
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
गुरुवार, 05/19/2016 - 06:53
नवीन
मस्तं!
- Log in or register to post comments
ग
गणामास्तर
गुरुवार, 05/19/2016 - 07:10
नवीन
बऱ्याचदा गेलोय सिन्नर ला, पण हे नव्हते पाहिले कधी. गोंदेश्वर पाहिलंय खुपदा.
अर्थात आमचे पाहणे आणि तुमचे पाहणे यांत जमीन अस्मानाचा फरक आहे म्हणा.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 05/19/2016 - 07:19
नवीन
:)
आयेश्वर खूपच दुर्लक्षित आहे रे. खूप कमी जण जातात.
गोंदेश्वरावर लिहिन कधीतरी. महाराष्ट्रातील घटत्या भूमिज शैलीचा ते शेवटचा अविष्कार मानलं जातं.
- Log in or register to post comments
न
नाईकांचा बहिर्जी
गुरुवार, 05/19/2016 - 08:21
नवीन
आपल्या इतिहास अभ्यासाला नमन सर! _/\_
मंदिरे ही "वाचायची चीज़" असतात हे आपल्या लेखनातून अन एकंदरित व्यासंगावरुन कळते असे म्हणतो मी
एक प्रश्न
यक्षांची संकल्पना पश्चिमेकडून आली, म्हणजे ग्रीकांकडून.
गॉथिक वास्तुशैलीमधे छपरावरचे पाणी निघुन जायला अतिशय भीतिदायक असे गोरगॉयल (gorgoyle) असतात त्याचे काही नमुने बहुदा आपल्याला CST स्टेशन किंवा BMC बिल्डिंग मधे दिसावेत, भारवाहक यक्ष अन हे गोरगॉयल एकाच (हेलेनिस्टिक) प्रभावाचे द्योतक असावेत काय??
उत्तर दिल्यास आभारी राहीन
बहिर्जी
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 05/19/2016 - 08:33
नवीन
तसे मला वाटत नाही, गोरगॉयल तसे खूप उशिरा प्रचलित झाले. तर यक्ष हे अतीप्राचीन आहेत. २०० बीसीच्याही आधीपासून. गॉथिक शैलीतल्या गोरगॉयल्सवर कशाचा प्रभाव पडला ते सांगू शकत नाही.
गोरगॉयलसदृश हत्ती घोडे अगदी आपल्या पुण्यातल्या त्रिशुंड मंदिरात देखील आहेत.

- Log in or register to post comments
न
नाईकांचा बहिर्जी
गुरुवार, 05/19/2016 - 09:13
नवीन
त्यांची (ह्या हत्तीशिल्पांची) यूटिलिटी सुद्धा पाणी निचरा करणे आहे का फ़क्त एस्थेटिक वैल्यू एडिशन आहे हे एकंदरित कलेत?
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 05/19/2016 - 09:27
नवीन
वैल्यू एडीशनशिवाय इतर काही नसावे. पाणी निचरा तर अजिबातच नाही.
- Log in or register to post comments
स
सस्नेह
गुरुवार, 05/19/2016 - 08:58
नवीन
रोचक माहिती आणि फोटो.
कुठेशी आहे हे आयरेश्वर ? संभाजीनगराजवळ का ?
शिल्पे खूपच झिजलेली आहेत. यादव काळातील शिल्पे इतकी झिजलेली ?
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 05/19/2016 - 09:29
नवीन
आयेश्वर किंवा ऐश्वर्येश्वर. सिन्नरमधे आहे हो.
८०० वर्ष उन्हपावसाचा मारा झेलत आली आहेत. झिजणारच थोडीफार.
- Log in or register to post comments
स
सस्नेह
गुरुवार, 05/19/2016 - 10:45
नवीन
हीपण तितकीच, किंबहुना त्याहून जुनी आहे. बाराव्या शतकातली. पण इतकी झिजलेली नाही.
बेलुरची दर्पणसुंदरी.

- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 05/19/2016 - 11:54
नवीन
बेलूरची आयेश्वरानंतरची.
पण ग्रेनाईट आहे तो. अगदी लोण्यासारखा कातरता येतो. दगा देत नाही. इकडे बसाल्ट. कोरण्यास कठीण शिवाय सच्छिद्र असल्याने हवापाण्याचा परिणाम होतो.
- Log in or register to post comments
स
सस्नेह
गुरुवार, 05/19/2016 - 11:58
नवीन
लोण्यासारखा कातरता येतो ?
आमच्या अभियांत्रिकी ज्ञानानुसार ग्रॅनाईट सर्वात कठीण खडक. कदाचित म्हणूनच अजून झिजला नाही.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 05/19/2016 - 12:05
नवीन
म्हणजे मऊ अशा अर्थी नाही.
जिथे छिन्नी माराल तितकाच भाग कापला जाईल. आजूबाजूच्या भागाचा टवकाही उडणार नाही अशा अर्थाने :)
- Log in or register to post comments
प
पद्मावति
गुरुवार, 05/19/2016 - 10:27
नवीन
अप्रतिम लेख आणि फोटो.
- Log in or register to post comments
स
सुधांशुनूलकर
गुरुवार, 05/19/2016 - 12:31
नवीन
लेख आणि फोटो खूप आवडले.
वल्लीप्रचेतस यांना एक नम्र विनंती - प्रत्येक महिन्याला एक याप्रमाणे सोईस्कर शनिवार-रविवारी लेणी-मंदिर कट्टा आयोजित करावा. मुंबईहून सुधांशुनूलकर (स.कु.स.प.), डॉ.सु.ख. (स.कु.स.प.), बोका, मुवि (स.कु.स.प.), कंजूस (डोंबोलीला मुंबईतच गणल्याबद्दल क्षमा मागून), किस्ना, स्पा, वेल्ला, अजया, पुण्याहून बॅट्या, सगाधन्या, डॉ.एक्काकाका, नाखुकाका, कॅजॅस्पॅ, इतर, सोलापूरहून अभ्या.., औ.हून प्रा.डॉ. असे अखिलमिपावल्लीप्रचेतसफॅनक्लबपर्मनंटमेंबर कट्ट्याला नक्की हजेरी लावतील. या मालिकेतला पहिला कट्टा जून महिन्यात अंबरनाथ मंदिरात आयोजित करता येईल.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
गुरुवार, 05/19/2016 - 14:02
नवीन
अंबरनाथ कट्टयाचे जान्हवीच्या डिलिव्हरी सारखे झाले आहे. गेली दोन वर्ष पाहत आहोत. अजून झाली नाही. ;)
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
गुरुवार, 05/19/2016 - 14:03
नवीन
धीरापोटी, फळे रसाळ गोमटी.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 05/19/2016 - 14:09
नवीन
अगदी अगदी.
जायचे आहे पण अजून तसा योगच आलेला नाही. बहुधा तीव्र ओढ अशी वाटली नसावी.
- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
गुरुवार, 05/19/2016 - 14:54
नवीन
धन्या, त्यासाठी तुम्हाला सहा महिने आधी रल्वेचे रिझर्वेशन करावे लागेल हो. ;)
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
गुरुवार, 05/19/2016 - 13:33
नवीन
किती तो प्रचंड अभ्यास आणि निरीक्षण, एवढे सगळे तपशील लक्षात येणे, ठेवणे अवघड काम आहे.
बाकी तुम्ही बेलूर, हळेबीडू, अयहोळ, पट्टडकल, हंपी, बदामी इ.ठिकाणे पाहिली नसतील तर नक्की पहावीत.
हंपीमधून परत शहरी जंगलात यायला अगदीच जीवावर येते, काश्मीरनंतर पृथ्वीवरील दुसरा स्वर्ग तिथे आहे.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 05/19/2016 - 14:12
नवीन
:)
गेल्याच महिन्यात जाणार होतो पण उन्हामुळे टाळलं.
आजच किसनदेवांबरोबर झालेल्या चर्चेत पुढील काही महिन्यांत तेथे जाणेचे ठरलेय. बेलुरु, हळेबीडू नाही होणार. पण हंपी बदामी होईल.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 05/19/2016 - 15:35
नवीन
मी येऊ का ?
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 05/19/2016 - 17:01
नवीन
आम्ही आलं चालणाराय का?
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 05/19/2016 - 19:16
नवीन
या की, सर्वच या.
- Log in or register to post comments
न
नाखु
Fri, 05/20/2016 - 05:48
नवीन
पत्रिका आणि नाव नोंदणी कुठे आहे?
शंका बालक नाखु
- Log in or register to post comments
क
कंजूस
गुरुवार, 05/19/2016 - 13:46
नवीन
विटा येथे एक रेणुकाचे मंदिर वेस्सर पद्धतीचे दगडी पट्ट्यांचे शिखरवाले पाहिल्याचे ( ६६ साली ) अंधुक आठवत आहे.
- Log in or register to post comments
न
निशाचर
गुरुवार, 05/19/2016 - 14:18
नवीन
छान लेखन आणि फोटो. शिल्पपट्टिका व अर्धस्तंभ विशेष आवडले.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 05/19/2016 - 15:35
नवीन
ऐसे प्रचेतस सिंदिनेराचिया गावा गेले: तेथ आयेश्वराच्या कथा पुसेति:
आणि तिआं लिहिती: प्रचेतस प्रदक्षेणा करुनि आवारासि बीजें करीति:
वल्लीसेठ, फोटो आणि लेखन दोन्हीही आवडले. लिहित राहा.
आणि सर्व लेखांचे एक पुस्तक करा ही माझी जुनी मागणी.
आपण ती पूर्ण कराल असे वाटते.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 05/19/2016 - 15:49
नवीन
सिंदिनेरी सिवाचे अवस्थान, सिंदिनेरि पूर्वामुख सिवाचे देऊळ, तेथ अवस्थान दिस, एकुदिसी बिरुटे मास्तरे प्रचेतसे म्हणीतले, आयेश्वरासि नेणो, जी जी म्हणोनी प्रचेतस निगाले. मास्तरे आयेश्वरे नेतो ऐशे म्हणोनी गोंदेश्वरे नेले, थोर फ़सवणुक जाहली, मास्तरे खट्टू होवुनिया दु:ख करी, प्रचेतस बोलिले, चिंता का करिशी, आयेश्वर जवळी तेथेही जावो. तूर्तास मास्तरे गोंदेश्वरे पाहिले. इशचरणा लागिले, मग निगाले.
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 05/19/2016 - 16:51
नवीन
सुंदर लिहिलंय. सिन्नर हे खूप जुने गाव. कर्नाटकात सिंद राजघराणे होते त्यांचा या गावाशी कधी काही संबंध होता का नकळे.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 05/20/2016 - 05:52
नवीन
वाहव्वा!
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2