Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

महाराष्ट्राचे माहेरघर.....

ह
हृषिकेश पांडकर
Mon, 05/23/2016 - 07:15
💬 35
निसर्गाच्या झोळीतून पुण्याने गोष्टी ओरबाडून घेतल्या आहेत.पाटीवर दोन थेंब टाकून पाटी तिरकी केल्यावर जसे थेंब ओघळतात त्याप्रमाणे संपूर्ण शहरभर वाहणाऱ्या मुळा-मुठा,पेन्शनर पुणेकरांच्या तब्ब्येतीची काळजी घेणाऱ्या टेकड्या,तक्क्याला टेकून बसावे तसे डाव्या बाजूला पसरलेला सह्याद्री,हवामानाच्या जमून आलेल्या भट्टीमुळे दिसत असलेली हिरवळ आणि मोजून मापून असलेल्या पुणेकरांना पचेल आणि रुचेल असे मोजून मापून उन,वारा,पाऊस देखील. 'पुणे तिथे काय उणे' या प्रश्नार्थी उक्तीच्या उत्तरांची संख्या काळानुरूप कमीजास्त होत असली तरी समुद्र किनारा आणि सचिन तेंडुलकर या दोन गोष्टींची सल कधीच भरून निघणार नाही. पु.ल. म्हणतात त्याप्रमाणे मुंबईकरांना मुंबईकर असल्याचा अभिमान असण्याची गरज नसते. पण दादर किव्वा जुहु चौपाटीला समुद्र किनारा म्हणण्यात कितपत तथ्य आहे ? आणि म्हणूनच कदाचित समुद्र पहायचा म्हणून मुंबईची निवड कधीच केली जात नाही,किव्वा मी तरी नक्कीच करत नाही.कदाचित मुंबईकरांचे सुद्धा हेच म्हणणे असू शकेल. याच वस्तुस्थितीच्या पार्श्वभूमीवर मागे वळून पहिले कि असे लक्षात येते कि समुद्र म्हणजे काय हे कळायला लागल्या पासून ते अगदी कालपर्यंत तो पाहण्याचा विचार मनात आला कि जायच्या ठिकाणात दुमत नसते.कौटुंबिक सहलीची सुरुवात पण तिथूनच झाली.नंतर शाळेतील मित्र,कॉलेजचे मित्र अशा वेगवेगळ्या लोकांबरोबर समुद्र बघितला. सोबत बदलली पण जागेच्या निवडीत वैविध्य आले नाही. सातशे किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला असला तरी अलिबाग,मुरुड पासून सुरु झालेला आणि मालवण,सिंधुदुर्गापर्यंत पसरलेला हा प्रदेश संपूर्ण महाराष्ट्राचे आकर्षण राहिले आहे.आणि हाच तो चिंचोळा भाग ज्याला 'कोकण' या नावाने संबोधले जाते आणि हा लहानपणापासून माझ्याही आकर्षणाचा विषय राहिला आहे.या विधानाला कदाचित कोणीच असहमत नसेल. सह्याद्रीच्या खांद्यावरून पलीकडे उतरलेल्या तीन वेली प्रत्येक वेळी मला या स्वर्गात नेवून ठेवतात.कुम्भार्लीची शिस्तबद्ध चढण,किव्वा वरंध्याची लांबलचक वळणे आणि या गोष्टी कमीच आहेत म्हणून संपूर्ण सह्याद्री दर्शन करविणारा अभेद्य ताम्हिणी… शेवटी सगळेच रस्ते स्वर्गात उतरतात.घाट उतरून पुढे आलो आणि मुंबई-गोवा महामार्ग ओलांडला कि सुरु होते या नंदनवनाची सीमा. Kokan कोकणातले कुठले गाव आहे याचा फारसा फरक पडत नाही.इथली जीवनशैली एकजात सारखी.सह्याद्री उतरून एकदा पलीकडे गेलो कि कोकण सुरु झाल्याची ग्वाही देतात ते अरुंद आणि वळणदार रस्ते.झाडांच्या छायेखाली पहुडलेली कौलारू घरे आणि ऊन जमिनीपर्यंत पोहोचणार नाही याची खबरदारी घेणारी घनदाट झाडी.रात्रीच्या प्रवासात गावाचा अंदाज येत नाही कदाचित.पण कोकणातील दुपारचा प्रवास असंख्य गोष्टी निदर्शनास आणतो.समोरून येणाऱ्या एस.टी. मुळे बाजूला घेऊन निमूटपणे मार्गस्थ होणारी आपली गाडी.कडक उन्हात देखील सुसह्य सावलीतून लाकडाची मोळी घेवून रस्त्यालगतच्या निमुळत्या जागेतून कसबीने चालणाऱ्या बायका,पार जुने झालेले मैलाचे दगड आणि सगळीच अंतरे जवळ असल्याने एखाद्या चौक सदृश्य रस्त्यात तीन चार ठिकाणांचे दिशेसहित असणारे अंतराचे बोर्ड.हे दृश्य कोकणात नवीन नाही. छोटाश्या टेकड्या पार करण्यासाठी असलेला नागमोडी रस्ता आणि एखाद्या विशिष्ट वळणावरून दिसणारा अथांग सागर. पुन्हा वळून पुढे गेल्यावर येणारी दाट झाडी आणि पुढच्या वळणावर पुन्हा डोकावणारा सिंधू सागर.कितीही वेळा कोकणात गाडी नेली तरी पहिल्या वळणावर दिसणारी अरबी समुद्राची नवलाई अजिबात कमी होत नाही. खाऱ्या पाण्याचा वास प्रत्येक वेळी आपलासा वाटतो.इथल्या दमट हवेत देखील ओलावा असतो.बैठ्या घरांच्या उतरत्या कौलांवर वाळत टाकलेले सुपारीचे ढीग किव्वा वाडीच्या शेजारी असलेल्या गोठ्यांच्या कमानीवर वळत टाकलेले कपडे,कोकणातल्या प्रवेशाची साक्ष देतात.भाला घेवून उभे राहिलेल्या पहारेकर्यासारखे प्रत्येक घराच्या वाडी मध्ये असलेली उंच नारळाची झाडे आणि या संपूर्ण वाडीची काळजी घेणारी घरामागची दगडी विहीर. गावात शिरल्यावर रस्त्याच्या कडेला तुरळक पडलेली समुद्राची रेती.घराबाहेर लटकवलेले मासेमारीचे जाळे आणि सायकलला अडकवून ठेवलेला नारळ तोडायचा कोयता गावात पोहोचलो असे सांगत असतात.अरुंद गल्ल्या,दुतर्फा ऐसपैस टुमदार घरं आणि घरांच्या मागच्या बाजूला थेट समुद्रापर्यंत पोहोचलेली आंबा फणसाची वाडी साधन आणि समृद्ध कोकणाचे दर्शन घडवत असतात.नारळ पोफळीच्या बागा,जायफळाचे लटकलेले घड किव्वा आंब्यांच्या रचलेल्या राशी या केवळ पाहणे देखील एक सुखद अनुभव असतो. K2 कोकणी माणसाकडे राहणे यासारखे सुख नाही.शेणानी सारवलेले घर,घरासमोरील पडवीत असलेला दणकट झोपाळा.कोकणस्थी अगत्य आणि पुरून उरेल एवढा टापटीपपणा.गावातील प्रत्येकाला प्रत्येक व्यक्तीची नावासहित असलेली ओळख आपल्यासारख्या शहरी आणि मागास माणसाला आश्चर्यचकित करते. पहाटे लवकर उजाडलेले कोकण रात्री लवकर निजते.जवळपास दर मोठ्या घरात पर्यटकांची राहायची सोय केलेली असते.त्यामुळे संध्याकाळी पर्यटक समुद्रावरून येताना दिसतात.दुपारी चार नंतर समुद्रकिनार्यावर येणारा पर्यटक आपापल्या आनंदात मग्न असतो.अथांग सागराचा किनारा देखील अथांगच.किनार्याला येवून धडकणार्या लाटा आणि लाटांबरोबर येणारे असंख्य जीव,कोरड्या रेतीत आपली बिळे बनवून लपाछपी खेळणारे खेकडे आणि शिंपल्यातून डोकावून बाहेरचे जग न्याहाळणारे शिंपल्यातील कीडे.काही नावाड्यांच्या बोटी लांबवर तरंगताना दिसतात तर काही कडेला तश्याच हेलकावे खात पडलेल्या असतात. संध्याकाळची किनारपट्टी आणि सकाळची यात नैसर्गिक फरक तर असतोच पण सौंदर्यात देखील फरक आढळतो.भरती ओहोटी यातर त्याहून भिन्न गोष्टी.अस्ताला जाणारा सुर्य आणि उदयाला येणारा याचे प्रात्यक्षिक डोळ्याचे पारणे फेडते.तिथल्या लोकांना हा देखावा रोजचाच असला तरी आपल्यासारख्यांसाठी ती पर्वणीच ठरते.सूर्यास्ताच्या तिरप्या किरणांनी क्षितिजाकडे नजर वर करून बघता येत नाही.पण तोच सुर्य क्षणात खाली उतरला कि इतका वेळ तापलेले क्षितिज सोनेरी आणि शांत होवून जाते.आणि याच सोनेरी लाटांच्या गादीवर तो लाल गोळा आपली पाठ टेकवतो. सूर्यास्तानंतर आपल्या राहण्याच्या ठिकाणी परतताना कोकणच्या गंभीरतेची जाणीव होते.चिंचोळ्या गल्ल्यांमधील अंधार,वाडी मधील गर्द झाडी,त्यातून येणारा रातकिड्यांचा समांतर आणि लयबद्ध आवाज आणि पार्श्वभूमीवर अविरत चालू असलेली सागराची गंभीर गाज.प्रत्येक वेळी परतताना वाटणारी भीती मी कुतूहल म्हणून जपून ठेवतो. सकाळी उठल्यानंतर दिसणारी कोकणी लगबग अवर्णनीय असते.वाडीच्या विहिरीतून काढले जाणारे पाणी,किव्वा वाळत घातलेले नारळाचे शेंडे गोळा करण्याची गडबड,पाणी गरम करण्यासाठी लावलेल्या बम्बातील धुराचा वरपर्यंत गेलेला लोट या गोष्टी खूप वेगळ्या नाहीत.पण त्या लाल मातीत त्या नेहमीच विशेष वाटतात. पहाटे त्याच लाल मातीत उमटलेली गुरांची पाऊले,वाडीतून फिरताना वाळून खाली पडलेली शहाळी किव्वा अगदी छोटे नारळ सुद्धा. जिथे पर्यटन हा व्यवसाय म्हणून पाहिला जातो तिथे आधुनिकीकरणापेक्षा संस्कृती जतन करण्याची जबाबदारी आज मोठी आहे आणि याचे तंतोतंत आचरण होताना दिसते.पर्यटक येतात किव्वा यावेत यासाठी आपल्यात बदल करावा.पर्यटकांच्या सोयोसाठी आपल्या गावाची किव्वा घराची रचना बदलावी यासारखे विचार कोकणापर्यंत पोहोचले नाहीयेत हे आपले भाग्य.आणि म्हणूनच कोकणातील कुठल्याही गावात आपल्याला या वेगळ्या जीवनशैलीचे दर्शन घडते. कोकणाने जसे सांस्कृतिक वेगळेपण जपले आहे तसेच किंबहुन त्यापेक्षा जास्त आपले खाद्यसंस्कृतीचे प्रेम जतन केले आहे.बारा महिने मिळणारे उकडीचे मोदक किव्वा कुठलाही कोकणी जेवणाचा प्रकार कोकणाला एका वेगळ्याच उंचीवर नेवून ठेवतो.पदार्थाच्या नावांचा उल्लेख करण्याचे मी प्रकर्षाने टाळतो.कारण इथली खाद्यसंस्कृती माशांखेरीज पूर्ण होवूच शकत नाही.आणि माशांच्या बाबतीत माझे ज्ञान अगदीच तोकडे.त्यामुळे खाण्याबाबतीत काही उल्लेख कमी पडला तर ते कोकणाला पटायचे नाही.इथले लोक कसे आहेत याबद्दल जाणून घेण्याइतपत माझे वास्तव्य नाही.पण पु.ल.नि रेखाटलेल्या अंतूशेटांसारखी इथली माणसे असतात असे मानून जर कोकणात प्रवेश केला तर त्याची प्रचीती यायला फार वेळ लागत नाही.हि लोकं फणसासारखी वरून काटेरी आणि आतून गोड असतात या पुलं च्या निरीक्षण शक्तीला माझी केव्हाच दाद गेलीये. कड्यावरचा गणपती,सोन्याचा गणपती,जलदुर्ग यासारख्या गोष्टींमुळे जरी कोकण सर्वश्रुत असले तरी कोकणाची एक वेगळीच ओळख आहे.या ठिकाणांमुळे आपल्याला तिथे जाण्याचे कारण मिळते पण तिथे राहण्याचे आणि त्या गोष्टी आवडण्याचे कारण मात्र तिथेच शोधले पाहिजे. इथली श्रीमंती दाखवावी लागत नाही आणि गरिबी झाकावी देखील लागत नाही.आपण फक्त असलेल्या गोष्टींचा आस्वाद घ्यायचा असतो.कोणाची श्रीमंती आणि कोणाची गरिबी कशात आहे हे पाहणार्याचा दृष्टीकोन ठरवतो. कोकणातील सहल म्हणजे लहानपणी फक्त समुद्रात डुंबणे आणि तोंडात खारे पाणी गेले म्हणून शंभर वेळा थुंकणे होते.फोल्ड केलेल्या आणि तरी भिजलेल्या जीन्स मध्ये मुठभर माती सोबत आणणे होते.राहण्याच्या ठिकाणी अंघोळीच्या वेळी कानात अडकलेली रेती काढणे इतकेच होते.वयाप्रमाणे किव्वा आवडीनुरूप या गोष्टी आहे तश्या जपल्या पण कोकणाने अजून खूप गोष्टी शिकवल्या.नवीन पहायची संधी प्रत्येक वेळी दिली आणि दर वेळी स्वतःबद्दलचे आकर्षण वाढवून ठेवले. एका बाजूला विशाल सिंधुसागर आणि दुसर्या बाजूला अभेद्य सह्याद्री यांच्या कुशीत पसरलेला चिंचोळा भाग आपल्या जीवनाचा इतका अविभाज्य घटक बनू शकतो यावर विश्वास बसत नाही. कोकण म्हणजे गोवा नाही कोकण म्हणजे केरळ पण नाही.कोकण हे कोकणच आहे.या कोकणाचा कॅलिफोर्निया करण्याची स्वप्न सुद्धा पाहणे मला पटत नाही.चार पैसे टाकून कॅलिफोर्निया होईल सुद्धा पण त्याला या कोकणाची सर कधी यायची ? K3 किनार्यावरील वाळूत रेखाटलेली अक्षर पुढच्या क्षणाला एका लाटेने नाहीशी होतात पण कोकणाने दिलेल्या आठवणींना पुसून टाकणारी लाट येणे शक्यच नाही.. हृषिकेश पांडकर सर्व छायाचित्रे - EOS Canon 7D

प्रतिक्रिया द्या
9365 वाचन

💬 प्रतिसाद (35)
र
राहुल मराठे Mon, 05/23/2016 - 10:54 नवीन
छान लिहिलय!
  • Log in or register to post comments
ह
हृषिकेश पांडकर Mon, 05/23/2016 - 12:27 नवीन
धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राहुल मराठे
र
राजेंद्र मेहेंदळे Mon, 05/23/2016 - 11:48 नवीन
मस्त विचारप्रकटन!! प्रवासवर्णन असे म्हणत नाही पण भावना पोचल्या. फोटो अजुन टाकले असते तर जास्त मजा आली असती.
  • Log in or register to post comments
ह
हृषिकेश पांडकर Mon, 05/23/2016 - 12:28 नवीन
धन्यवाद राजेंद्रजी ...खरय अगदी प्रवासवर्णन नाही म्हणता येणार; पण कोकणाबद्दल लिहिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे
क
कंजूस Mon, 05/23/2016 - 12:08 नवीन
हे फक्त कोकणालाच का लागू आहे?कर्नाटकचाही किनारा चांगला आहे.
  • Log in or register to post comments
ह
हृषिकेश पांडकर Mon, 05/23/2016 - 12:29 नवीन
फक्त कोकणाला लागू नक्कीच नाहीये...कर्नाटकाचा किनारा सुंदर आहेच प्रश्नच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
ए
एस Mon, 05/23/2016 - 12:14 नवीन
फालतू लेख. उगाच स्वतः शब्दप्रभू असल्याच्या थाटात पुण्यावर काहीबाही शिंतोडे उडवायचे म्हणजे आपल्या लेखाला भरभरून ट्यार्पी मिळेल असा लेखकाचा गोड गैरसमज झालेला दिसतो.
  • Log in or register to post comments
ह
हृषिकेश पांडकर Mon, 05/23/2016 - 12:33 नवीन
फालतू लेख असू शकतो ...पण तुमच्या वाचण्यात काहीतरी चूक झालीये...इथे पुण्यावर टीका करण्याचा कुठलाच हेतू किव्वा संदर्भ दिसत नाहीये... असो.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
क
कंजूस Tue, 05/24/2016 - 02:28 नवीन
लहानपण जिथे घालवलंय त्या जागेबद्दल प्रत्येकास जिव्हाळा असतो. अशा अर्थाने लेखन आवडलं.दुसरी शहरं / जिल्हे माहेरघर नाहीत असं नसतं. परंतू पुणे विद्येचं , कोकण निसर्ग सौंदर्याचं ,नागपूर वनांचं माहेरघर अशी जी ओळख आपल्या डोक्यात बसली आहे ती हळहळू पुसली जातेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हृषिकेश पांडकर
च
चांदणे संदीप Mon, 05/23/2016 - 12:47 नवीन
एका आड एका लेखात पुण्याचा उल्लेख केल्याशिवाय, त्यातही काहीतरी उणेपणच दाखवायचे हेच जिकडेतिकडे दिसते. अहो नसला सचिन आणि समुद्रकिनारा म्हणुन काय झाल?? तेवढच सोडून मलाही बाकीचा लेख आवडला! Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
न
नाखु Tue, 05/24/2016 - 05:09 नवीन
संदीपा एखादा आय्टम डान्स गाजविल्याखेरीज हिंदी सिनेमा चालत नाही तस पुण्यावर (निष्कारणच) पिंका टाकल्याखेरीज लेख दखलपात्र कसा होईल्?कसे लोक गोळा होतील? असे हे काल गुरुजी भावजींना सांगत होते.

मिपा सार्वकालीन माई

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
र
रवीराज Mon, 05/30/2016 - 18:04 नवीन
प्रत्येक बिचवर दारुची दुकाने भरपुर दिसतात. कौलारुची जागा पक्की बांधकामे घेत आहेत. कित्येकदा आमच्या गणेश पेठेत मासे स्वस्त असायचे किनारपट्टीपेक्षा. कोकण आहे सुंदर यात वादच नाही पण म्हणुण पुणे अगदिच नावे ठेवण्यासारखे नाही .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
अ
अभ्या.. Mon, 05/23/2016 - 14:08 नवीन
कोकण महाराष्ट्राचे माहेर घर कसे काय ब्वा? सध्या काय महाराश्ट्र सासुरवास भोगतोय काय?
  • Log in or register to post comments
न
नया है वह Mon, 05/23/2016 - 14:14 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ह
हृषिकेश पांडकर Mon, 05/23/2016 - 14:23 नवीन
हा हा हा .. गुड वन :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
म
मुक्त विहारि Mon, 05/23/2016 - 15:13 नवीन
ह्याला अनुमोदन... कोथरूडला असलेल्या आमराईच्या जागी सिमेंटचे जंगल आणि स्वारगेटला असणार्‍या घोड्यांच्या पागेच्या जागी, एस.टी. स्टँड....ही पण त्याचीच उदाहरणे. अगदी वास्तव लेख.... पुणे म्हटले की आम्ही पण एक-दोन प्रतिसाद ठोकून देणारच.
  • Log in or register to post comments
र
रातराणी Mon, 05/23/2016 - 19:31 नवीन
सुरेख लेख आणि फोटो!
  • Log in or register to post comments
ह
हकु Mon, 05/23/2016 - 23:08 नवीन
वर्णनातून भावना पोहोचल्या; मात्र शीर्षकाचा, प्रस्तावना आणि मुख्य लेखाशी संबंध पटकन कळून येत नाही. विचार केल्यास अजून चांगले शीर्षक सुचू शकते. तसेच प्रस्तावनाही थोडी कमी करण्यास हरकत नाही असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
ह
हृषिकेश पांडकर Tue, 05/24/2016 - 07:03 नवीन
नक्की :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हकु
ख
खटपट्या Tue, 05/24/2016 - 00:46 नवीन
आवडला लेख..मिपावर स्वागत पुणेकरांना नाही आवडला... तरीही फालतू नाहीच...
  • Log in or register to post comments
स
सुयोग पुणे Tue, 05/24/2016 - 04:20 नवीन
अप्रतिम लिहिलय..खरंच खूप छान..मी मुळचा पुणेकर नाही.. पण पंधरा वर्ष पुण्यात राहतोय..उगीच पुण्याला नावं ठेवण्याच्या वृत्तीचं वाईट वाटतं..
  • Log in or register to post comments
अ
असंका Tue, 05/24/2016 - 04:47 नवीन
पुण्याचा उल्लेख का ते अजिबात कळलं नाही. कोकण हे माहेरघर कसं तेही कळलं नाही. बाकीचा लेख मात्र बर्‍यापैकी जमला आहे. खरं म्हणजे चांगलं वाटत होतं वाचताना. फक्त सुरुवातीला आपण काहीतरी वेगळंच वाचत होतो ही भावना सतत होती मनात.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Tue, 05/24/2016 - 05:01 नवीन
पुण्याची अनावश्यक निंदा-नालस्ती आणि कोकणाचे अतिशयोक्त वर्णन.
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 05/24/2016 - 05:12 नवीन
स्थानीक आहेर (उघड्या पाकीटातला) !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ह
हृषिकेश पांडकर Tue, 05/24/2016 - 07:08 नवीन
वाचण्यात गल्लत केलीत काका :)...निंदा नालस्ती कुठेच नाहीये...कदाचित कोकणचे वर्णन हे अतिशयोक्ती वाटू शकते..उलट पुण्याला नैसर्गिक वरदहस्त आहे असे लिहायचा प्रयत्न आहे .. असो..कीप रीडिंग !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Tue, 05/24/2016 - 07:58 नवीन
पुण्याबद्दल तुमच्या लेखनातून जाणवलं तसं. :) मी आयुष्याची पहीली तेवीस वर्ष कोकणात काढली आहेत. गाव अगदी समुद्र किनारी नसला तरी दुचाकीवरुन समुद्र किनारी तासाभरात पोहचता येते. त्यामुळे माझ्या अनुभवांचा विचार करता हे खरंच अतिशयोक्त आहे. रच्याकने, तुम्ही मला काका म्हनन्याच्या वयाचा मी नक्कीच नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हृषिकेश पांडकर
ह
हृषिकेश पांडकर Tue, 05/24/2016 - 08:03 नवीन
अच्छा ..पण पुण्याला नवे ठेवणे अथवा टीका करण्याचा उद्देश अजिबात नाहीये आणि आणि नव्हता..:) आणि जन्मतः पुण्याचाच असल्यामुळे माझ्या डोक्यात कोकणाची प्रतिमा अशी होती आणि राहील ..कदाचित मूळचे कोकणातले या नात्याने तुमचे मत बदलणे नक्कीच अपेक्षित आहे ...'काका' बद्दल दिलीगिरी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ह
हृषिकेश पांडकर Tue, 05/24/2016 - 07:00 नवीन
सर्व टीका आणि कौतुक मान्य :) वाचनाबद्दल धन्यवाद ...नक्की सुधारणा करण्याचा प्रयत्न राहील..!
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Tue, 05/24/2016 - 08:14 नवीन
चांगला प्रयत्न.
  • Log in or register to post comments
R
Rahul Sable Fri, 05/27/2016 - 07:08 नवीन
कोकण म्हणजे गोवा नाही कोकण म्हणजे केरळ पण नाही.कोकण हे कोकणच आहे.या कोकणाचा कॅलिफोर्निया करण्याची स्वप्न सुद्धा पाहणे मला पटत नाही.चार पैसे टाकून कॅलिफोर्निया होईल सुद्धा पण त्याला या कोकणाची सर कधी यायची ?
  • Log in or register to post comments
र
रायनची आई Mon, 05/30/2016 - 13:26 नवीन
सगळे फोटो आमच्या गावची आठवण करून देतात..आम्ही अलिबागकर : )
  • Log in or register to post comments
आ
आदिजोशी Fri, 06/03/2016 - 12:53 नवीन
पुण्याला नावे ठेवायची गरज नव्हती. मरेले को क्या मारना? मुंबईनंतर दुसरा कुठला प्रदेश वास्तव्यासाठी आवडला असेल तर तो कोंकण. ह्याची मजा दुसरीकडे कुठेही नाही.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Fri, 06/03/2016 - 13:14 नवीन
मरेले को क्या मारना?
या वाक्याला फिस्सकन हसलो. पुण्याला टोमणे हाणायची संधी सोडायचा नाहीस तू कधी. =)) बाकी लेखापेक्षा फोटो फार आवडले, विशेषतः पहिला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
आ
आदिजोशी Mon, 06/06/2016 - 09:05 नवीन
मिपावरील शेकडो घाग्यांतल्या हजारो प्रतिसादांतल्या लाखो शब्दांमधून नेमके हे शब्द शोधून काढल्याबद्दल मंडळ आभारी आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
प
पैसा Fri, 06/03/2016 - 13:28 नवीन
तिथे कायम राहिले की सगळे बरे वाईट कळते. बाहेरून चार दिवस येणार्‍यासाठी सगळेच छान. पुण्याचे नाव काढल्यामुळे तुम्हाला ट्यार्पी मिळाला हे अंतिम सत्य आहे. -एक कोकणी.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा