Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सार्थक जन्म-समर्पण अर्थात नर्मदाख्यान लोककथा.

ख — खुशि, Mon, 06/13/2016 - 20:39
असूर संहारा नंतर थकून बैसले त्रिपुरारी। निढळावरचा घर्मबिंदू एक टपकला भूमिवरी॥ त्या बिंदूतुन प्रगटली एक कन्या सुंदरी। कोण असशी गे मुली तू सुख देती हासरी॥ मी तर असे आपुलीच तनुजा बोले नमस्कारुनी। घर्मबिंदूमधुन आपुल्या जन्म माझा पावनी॥ दोन पुत्र असती आमुचे पण एक उणीव होती उरी। तुझ्या जन्माने सुरसे आज तीही झाली पुरी॥ आपुलीच गे पुत्री अपर्णे येई तू स्वीकार करी। येई गे मुली बैस अंकी हसून बोले शर्वरी॥ दोन बंधू एक भगिनी मोदे खेळती अंगणी। सुखी गृहस्थी पाहून डोलती उमा आणि मदनारी॥ स्कंद गजानन लपून बैसती शोधतसे मंदाकिनी। कोठे लपले बंधू दोघे खूणे दाखविती त्रिपुरारी॥ विसरूनि सारी भवचिंता निश्चिंत बैसले सदाशिव। नर्मम ददाति तू नर्मदे सदासर्वदा सुखी भव॥ आशिर्वचन दिलेत देवा हसून बोले शर्वरी। नंदिकेश्वर म्हणे देवा चला आता कैलासपुरी॥ उष्णप्रदेशी जन्मलेली ही मम कन्या कैसी ते हिम सहन करी। कुणा हाती सोपवू मी कोमलांगी ही माझी कुमारी॥ मेकलराज उभा रहिला हात जोडोनी सामोरी। संधी द्यावी मला दयाळा मनिषा आपुली करीन पुरी॥ संतोषले परमेश्वर या आश्वासनांतरी। सोपवुनी आपुली कन्या मेकलराजाचे करी॥ निर्धास्त झाले शिवपार्वती निघाले माघारी। देवाधिदेव संतोषले उजळली कैलासपुरी॥ मेकलसुता आता जाहली शिवक्न्या सुंदरी। विंध्य सातपुडा दोन बंधू सुखावले बहु अंतरी॥ चुलबुली आणि अवखळ होती म्हणून रेवा म्हणती सारी। बाललिला पाहत तियेच्या आनंदीत सारी मेकल नगरी॥ दिवस चालले आनंदाने मोठी झाली स्वरुपसुंदरी। विवाह आता हिचा करावा मेकलराज मनी विचार करी॥ योग्य वराचा शोध घेतसे भारतवर्षा माझारी। राजबिंडा शोण नृप तो राज्य करीतसे शेजारी॥ सर्वार्थाने योग्य असे हा विचार आला नृपांतरी। प्रस्ताव पाठवी मेकलराज शोणनृपाच्या दरबारी॥ निर्मल सुंदर मम कन्येचा स्वीकार करावा राजेश्वरी। किर्ति ऐकूनि नर्मदेची शोण तिचा स्वीकार करी॥ कैसा असेल राजपुत्र कोण सांगेल कोण योग्य वर्णन करी। जुहिला प्रिय सखे पाहुन येई कैसा असे मम सख्या हरी॥ सजली धजली जुहिला नर्मदेसम पोषाख करी। पायीची नुपुरे झंकारीत ठुमकत जातसे बाहेरी॥ पुर्वदिशेला वसली होती निसर्गरम्य शोणपुरी। वर्तमान जाणून घेण्या शोणनृपाचे आली जुहिला सेवेकरी॥ नटली सजली जुहिला देखून स्तब्द जाहला शोणसखा। स्वर्गीची वाटे अप्सरा मोहितसे मम चित्ता॥ राजबिंड्या शोणास पाहुनि जुहिला मनी हरखली। मदनबाणे विद्ध होऊनि कर्तव्य आपुले विसरली॥ येई गे सुंदरी मम चित्तचकोरी शोणराजा हर्षला। मी नसे आपुली वधू असे न बोले ती जुहिला॥ गैरसमजुतिने पार पडला भव्य लग्न सोहळा। विसरुनि कर्तव्य आपुले रमली राणी ती जुहिला॥ बहुत दिन जाहले काहीच न कळे वार्ता। चिंतीत होऊनि स्वतः निघाली मग ती शिवसुता॥ दुरुनच दिसला दिपोत्सव आसमंत सजला धजला। स्वागतास आपुल्या नगरी सजली मनी हरखली शिवबाला॥ समीप जाता तिने देखिला दरबार तो भरलेला। सिंहासनी बैसले होते शोणनृप अन राणी जुहिला॥ ह्रुदयभेदक दृश्य पाहुनि क्रोधित झाली नर्मदा। नर्मम ददाति ब्रीद आपुले विसरुनि होई ती कृता॥ अगे पापिणी मम दासी तू काय म्हणू मी तुला। कृतघ्न कामिनी आज शापिते बघ मी तुला॥ जलरुप व्हा याच क्षणी दोघे लागा पतीत प्रवाहाला। थांब जुहिले!दुर्गंधीत होईल पाणी कुणी न स्पर्शी तव जला॥ मी ही होते जलरुप अन जाते स्वदेश काजा। संतापाने गर्कन फिरली रेवा निघाली अस्ताचला॥ सुन्न होऊनि दुःखीत मने शोणप्रवाह पडला । उंचावरुनि उडी घेऊनि पुर्वेकडे निघाला॥ जुहिलेचा प्रवाह राहिला त्याच ठिकाणी स्तब्दसा। मेकलतली आजही आहे वाहता तो कसानुस॥ नर्मदा मग जलरुप जाहली ज्या स्थला। माईकी बगिया म्हणती आज त्या वनस्थला॥ दुःखीत रेवा विव्हल होऊनि गुप्त होतसे भूमित। मेकलराजाही झाला किंकर्तव्यमूढ अन दुःखीत॥ भूमिगत राहुनि नर्मदा करीतसे तपस्या। दिन महिने साल बारा पुरी झाली तपस्या॥ प्रसन्न झाले महादेव सांग म्हणाले मनी आहे काय तुझ्या। आपुली मी तनया पण काय नशिबी हे माझ्या॥ जनहितार्थ जन्म तुझा सुरसे शीघ्रही कार्यारंभ करी। महानद असशी तू जल आता प्रवाहीत करी॥ आज्ञा प्रमाण पिताश्री धेय्य माझे मज कळले। कैक जन्मांचे पुण्य माझे या जन्मी फळले ॥ अमरकंटक राजधानी पर्वतमाथ्यावर वसली। रम्य वने-उपवने असे बहु ही सजली॥ मेकलराजा करी तयारी नर्मदावतरणाची। सुंदर कुण्ड बांधविले शोभा तिथे गोमुखाची॥ शिवस्मरण करुनि रेवा गोमुखाने कुण्डांतरी प्रवेशली। सुंदर स्वच्छ नीलजल रुपे प्रवाहीत ती झाली॥ निघाली ती सुरसरिता लोककाजा कारणे। खळ्खळ अवखळ नाचत निघाली पश्चिमेकडे॥ सुंदर घनदाट उपवनी बसले होते कपीलमुनि। तृषा त्यांची शांतविण्या वेगे तिने घेतली उडी॥ कपीलमुनि नम्रतेने करीते झाले अभिवादना। स्विकारुनि ते नम्रपणे पुढे निघाली पावना॥ घोर तपस्या त्या अरण्यी करीत होते दुर्वासमुनि। पुढे निघाली जलदुग्ध द्वारे क्षुधा त्यांची शांतवुनि॥ घोर काननी प्रवेशली मग आनंदे तमसा। लोकक्ल्याणास्तव प्रवास करीतसे विपाशा॥ मार्गी मग तिला मिळाल्या कपिला अन करगंगा। करंज वृक्षराजी मधूनि गळा पडतसे कोमल कण्वा॥ तुडारमैय्या सवे घेऊनि चालली अमलडेह मागे टाकुनी। रुषाही पडले मागे गोरखपुरास मिळे सिवनी॥ अगणित गांवे अगणित नगरे पर्वत अन घनदाट जंगले। फुलती उपवने फळती झाडे सुंदर पक्षीगण गात गान मंगले॥ सुभिक्षीत करत चालली आनंदीत ती धरणी।पतीतपावन जिची जलधरा तीच असे तीर्थजननी॥ मार्कंडेय भृगु वशिष्ठ कर्दम शौनकादि। नारद पिप्पलाद सनतकुमार नाचिकेत सनकादि॥ सर्वदेव मुनि मनुज वंद्या ही मानिनी। हर्म्यदा ही शर्मदा ही दिव्य वरदायिनी॥ जलचर नभचर अगणित ते सुंदर पक्षीगण। सुखे राहती मत्स्य कच्छ तसेच अगणित मीन॥ भारहारिणी सुखदायिनी माता तीर्थशिरोमणी। भववारिधी भयहारिणी माता पतीतपावनी॥ सत्य त्रेता द्वापार युगी होता मोठा सन्मान। नतद्रष्ट या कलियुगी मात्र सदा होतो अपमान॥ तरिही तुझे प्रेम माते लाभते सर्वा समान। नमस्ते नमस्ते मैय्या तव चरणी सदा प्रणाम॥ अमरकंटक नेमावर शूल्पाणि। बांदराभान गोराग्राम जमदग्नि॥ इंद्रवरण तपोवन अन बुधनी। भाखा कवांट तसेच कडीपाणी॥ असा चालला प्रवास शिवकन्येचा। पुर्वपश्चिम प्रवाहीत दक्षिणोत्तर तीरांचा॥ समय आला आता जीवन सांगतेचा। समोर होता रत्नसागर सुंदर तो साचा॥ दर्शनांतरी मैय्या स्तब्द झाली क्षणभरी। नतमस्तक होऊनि उभी राहिली विमलेश्वरी॥ विनम्र अभिवादन करुनि म्हणे पित्याला। सफल झाले मम जीवन आज्ञा द्यावी आता मला।\ नर्मदे तू महाभागा सर्वपापहरी भव। तव जलांतरीच्या शिला सर्व होतील शिव॥ वंदन करुन पित्याला रेवा पुढे सरकली। रत्नसागरामध्ये मग ती सामावली॥ नर्मदे हर!नर्मदे हर हर!! नर्मदे हर हर हर!!!

प्रतिक्रिया द्या
4951 वाचन

💬 प्रतिसाद (34)
क
कवितानागेश Mon, 06/13/2016 - 21:04 नवीन
सुंदर लिहिलंय. फार दिवसांनी दिसलात खुशीताई. :)
  • Log in or register to post comments
ख
खुशि Tue, 06/14/2016 - 09:15 नवीन
नर्मदे हर!तिसरी पायी नर्मदा परिक्रमा मैय्या कृपेने पुर्ण झाली.त्यामुळे नव्हते इतके दिवस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
अ
अर्धवटराव Mon, 06/13/2016 - 22:43 नवीन
छान.
  • Log in or register to post comments
ख
खुशि Tue, 06/14/2016 - 09:16 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
क
कंजूस Tue, 06/14/2016 - 05:12 नवीन
नर्मदाप्रेमाचा परिपाक कविता रूपाने अवतरला. मागचे ४५ भाग वाचले आहेत.सर्वच छान. आतापर्यंत वाचलेल्या नर्मदापरिसर वर्णनांत उत्कृष्ट.
  • Log in or register to post comments
ख
खुशि Tue, 06/14/2016 - 09:17 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
स
सस्नेह Tue, 06/14/2016 - 08:57 नवीन
नर्मदाख्यान सुंदर ! हे आख्यान तुम्ही रचले आहे काय, खुशिताई ?
  • Log in or register to post comments
ख
खुशि Tue, 06/14/2016 - 09:20 नवीन
नर्मदे हर!तिसरी परिक्रमा करताना चालत असताना सुचत गेले तसे लिहीत गेले.ही लोककथा आहे प्रचलीत मध्यप्रदेशात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
य
यशोधरा Tue, 06/14/2016 - 09:02 नवीन
सुरेख! तुम्ही लिहिलेय हे खुशीताई? फार आवडले :)
  • Log in or register to post comments
ख
खुशि Tue, 06/14/2016 - 09:23 नवीन
नर्मदे हर! हो मीच लिहिले आहे,तिसरी पायी परिक्रमा करत असताना सुचत गेले तसे लिहीत गेले.ही लोककथा प्रचलीत आहे मध्यप्रदेशात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Tue, 06/14/2016 - 14:49 नवीन
नर्मदे हर, खुशीताई, खूप सुंदर लिहिलेत. नर्मदामाईचा प्रसादच झाला की तुमच्यासाठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खुशि
ख
खुशि Wed, 06/15/2016 - 08:37 नवीन
नर्मदे हर यशोधरा,खरच प्रसाद मिळाला आहे मला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
प
पद्मावति Tue, 06/14/2016 - 09:30 नवीन
आहा!!! खूप सुरेख. प्रसन्न वाटलं वाचून.
  • Log in or register to post comments
ख
खुशि Wed, 06/15/2016 - 08:39 नवीन
नर्मदे हर पद्मावती,धन्यावाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति
ब
बोका-ए-आझम Tue, 06/14/2016 - 13:46 नवीन
तुमच्या विनोबा एक्सप्रेस असं तुम्हीच नाव दिलेल्या पहिल्या परिक्रमेबद्दल इथे मिपावरच वाचलंय. त्यानंतर काही कामानिमित्त भरुचला नर्मदेच्या तीरावरच राहायचा योग आला आणि नर्मदेची ओढ जाणवली. आता आयुष्यात कधीतरी नर्मदा परिक्रमा करायचीच हे ठरवलेलं आहे. नर्मदे हर!
  • Log in or register to post comments
ख
खुशि Wed, 06/15/2016 - 08:34 नवीन
नर्मदे हर. विचार केला आहेत परिक्रमा करण्याचा याचा अर्थ मैय्याने बोलावले आहे आपल्याला लवकरच योग येणार परिक्रमेसाठी प्रस्थान करण्याचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ज
जेपी Tue, 06/14/2016 - 14:31 नवीन
पुर्वी तुमचे लेख वाचले होते.. आयुष्यात कधी जमले तर परिक्रमा करायचा मानस आहे.. लेख आवडला..
  • Log in or register to post comments
ख
खुशि Wed, 06/15/2016 - 08:29 नवीन
नर्मदे हर. धन्यवाद टोनी.मनात विचार आला परिक्रमा करण्याचा मग समजा आपल्याला बोलावले आहे मैय्याने.नक्की लवकरच योग येईल परिक्रमा करण्याचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
व
विवेकपटाईत Wed, 06/15/2016 - 04:57 नवीन
कथा ऐकली होती, काव्य रूपाने वाचताना अजूनही आवडली. वाचता वाचता दांडेकरांची नर्मदा परिक्रमा आठवली.
  • Log in or register to post comments
ख
खुशि Wed, 06/15/2016 - 08:26 नवीन
नर्मदे हर धन्यवाद विवेक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
प
परिंदा Wed, 06/15/2016 - 08:35 नवीन
खुशिताई, तुमच्या पहिल्या परिक्रमेवरचे लेख वाचले होते. त्यावर तुम्ही दोन परिक्रमा केल्यात हे माहितीच नव्हते. तुम्ही खरंच ग्रेट आहात!__/\__ तुमच्या तिन्ही परिक्रमातल्या खास अनुभवांविषयी पुन्हा एकदा लिहावेत, अशी विनंती करतो
  • Log in or register to post comments
ख
खुशि गुरुवार, 06/16/2016 - 14:45 नवीन
लिहायचा विचार करते आहे.काही लिहिले आहे पण ते हिंदीत आहे लिहू?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिंदा
स
स्पा Wed, 06/15/2016 - 08:54 नवीन
तुम्ही परत एकदा लेखमाला लिहा कि
  • Log in or register to post comments
ख
खुशि गुरुवार, 06/16/2016 - 14:46 नवीन
हिंदीत लिहू?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
ज
जव्हेरगंज गुरुवार, 06/16/2016 - 08:25 नवीन
नर्मदे हर! _/\_
  • Log in or register to post comments
ख
खुशि गुरुवार, 06/16/2016 - 14:47 नवीन
नर्मदे हर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
म
मूकवाचक Fri, 06/17/2016 - 13:38 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 06/17/2016 - 14:37 नवीन
खूपच सुरेख! मनापासून लिहिलेले अगदी नर्मदेच्या प्रवाहासारखे ओघवते काव्य!
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Wed, 06/22/2016 - 12:05 नवीन
फार फार सुंदर लिहिलंय हो..
  • Log in or register to post comments
ग
गणामास्तर Wed, 06/22/2016 - 12:16 नवीन
नर्मदे हर!
  • Log in or register to post comments
म
मितभाषी Wed, 06/22/2016 - 13:29 नवीन
!! नर्मदे हर !! छानच. आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर
च
चंपाबाई Wed, 06/22/2016 - 16:59 नवीन
( शंका .. नर्मदेचे लग्न जर अखेर समुद्राबरोबर होणार होते , तर मैत्रिणीचे लग्न शोणाबरोबर झाल्यावर ती का चिडली ?)
  • Log in or register to post comments
ख
खुशि Fri, 07/01/2016 - 11:00 नवीन
लग्न मोडले तेव्हा ती तशी लहान होती जग पाहिले नव्हते तिने.
  • Log in or register to post comments
च
चंपाबाई Fri, 07/01/2016 - 11:41 नवीन
स्वतःचा नव्रा पहायलाही मैत्रिणीला पाठवायचं ? या अध्यात्मिकलोकांच्चं काय समजतच नाही. स्वतःही संसार करत नाहीत , इतरानाही करु देत नाहीत. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खुशि
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा