हवामान खात्याचा अंदाज ?
राम राम मंडळी. मंडळी, जगभरातल्या हवामान खात्याच्या तज्ञांनी या वर्षी भारतात भरपूर पाऊस पडेल असं म्हटलं होतं. आणि त्यांचा संदर्भ घेऊन आणि थोडाफार अभ्यास करुन आमच्या भारतीय तज्ञांनीही विविध तक्ते आणि अनुषांगिक अभ्यासाच्या संदर्भ देत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असं म्हटलं होतं. सात जून पर्यंत मान्सुन महाराष्ट्रात प्रवेश करेल असे अनुमान संबंधितांनी काढले होते. केरळात मान्सुन बरसला की तो पुढे महाराष्ट्रात चारपाच दिवसांनी पोहचतो असा अभ्यास जवळ जवळ सर्व महाराष्ट्रीयन माणसांचा वेधशाळेच्या माहितीकडे दुर्लक्ष करुन झाला आहे. कालांतराने दहा तारखेपर्यंत पाऊस पडेल असं म्हटल्या गेलं. पुढे बातम्या आल्या की मान्सुनचे आगमन लांबले आहे. आपल्या अभ्यास आणि संशोधनाच्याद्वारे भारतीय वेधशाळांनी या वर्षी मे महिन्याच्या सुरुवातीपासून भारतात सर्वत्र सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असे अंदाज वर्तवले होते. विविध आलेख आणि तक्त्यांच्या आधारे पाऊस किती असेल त्याची मांडणी केलेली होती. जून महिन्यात अमुक अमुक, जुलै महिन्यात धमुक धमुक पाऊस पडेल, अगदी ऑक्टोंबर, नोहेंबर पर्यंत धो धो पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने सांगितला होता. पुढील महिन्यात किती पाऊस पडेल ते माहिती नाही, पण आज जून मध्य ओलांडून पुढे जात आहे तरी पावसाचा पत्ता नाही. काही ठिकाणी पडला आहे, पण सर्वत्र पाऊस नाही असे दिसत आहे. लहानपणापासून रेडीयो केंद्रावर विविध कार्यक्रमाच्या ब्रेकमधे मी ऐकायचे की आज दिवसभर हवामान ढगाळ राहील, आकाश निरभ्र राहील, वारे वाहतील, पण या विभागाचा पावसाचा अंदाज हमखास चुकतो असे वाटले आहे. हवामान खात्याच्या विभागावर नेहमीच मी व्यंगचित्र पाहिली आहेत. मला हे हवामान खात्याचे तज्ञ आणि ज्योतिषी सारखेच वाटतात, लागला अंदाजे टोला तर लागला नाय तर कोणते तरी ग्रह आडवे आले होते म्हणून हे पळ काढतात. आमचा एक मित्र म्हणत होता की मटका खेळणार्यांना तरी हा विभाग चालवायला द्यावा. दहा आकड्यापैकी एखादा तरी आकडा बरोबर लागेल. मंडळी, तसा हा विभाग खूपच विनोदी झाला आहे. माझ्या काथ्याकुटातील विनोदाचा भाग सोडून द्या. पण मला खरच काही प्रश्नांची माहिती हवी आहे.
१) भारतात हवामान अगदी खात्रीपूर्वक सांगू शकतील अशा वेधशाळा नाहीत का ?
२) हवामान खात्याचे अंदाज का चुकतात ?
३) भारतात वेधशाळा किती आणि त्यातील तज्ञ व्यक्ती कोणत्या ?
४) भारतात वेधशाळेतील अभ्यासकांची संख्या किती ?
५) भारतात सरासरी दर महिन्याला या तज्ञांवर किती खर्च होतो ?
६) वेधशाळांचा जर काही फायदाच होत नसेल तर या वेधशाळा बंद का केल्या जात नाहीत ?
७) इतकी मोठमोठी उपग्रह आपण आकाशात सोडतो त्यातील एकाही ग्रहाला पावसाचा पत्ता लागत नाही का ?
विनंती : हवामान खात्याच्या अंदाजाविषयी हा धागा आहे, उगं त्याला सरकारी विभाग, त्यांचे कार्य आणि तत्सम विषयांकडे वेधशाळेला घेऊन जाऊ नये, ही नम्र विनंती.
पहिले म्हणजे आपण भारतीय हवामान खाते कोणत्या प्रकारचे हवामान वर्तवीतअसते ते पाहुया :-
भारतीय हवामान खाते हे ३ प्रकारचे हवामान अंदाज व्यक्त करीत असते.१) Now Casting Forecast - २४ तासांसाठी.२) Short Range Forecast - ७२ तासांसाठी.३) Mid Range Forecast - ४ ते १० दिवसांसाठी.४) Long Range Forecast - ३० दिवस ते पूर्ण हंगामासाठी.मान्सून कसा बनतो?
मार्च, एप्रिल व मी महिन्यामध्ये उत्तरायण अगदी जोरात चालू असते तेव्हा उत्तर अटलांटिक सागर, हिंदी महासागर आणि मध्य पसिफिक महासागर या समुद्रांवर खूप गरम उन पडत असते त्यामुळे तिथली हवा खूप बाष्पमय झालेली असते. यालाच इंग्रजीत (Thermal Equator) असे म्हणतात. आणि अगदी याच वेळेस दक्षिण हिंदी महासागर आणि दक्षिण अरबी समुद्र यात कमी दाबाचे पट्टे साधारण मे महिन्याच्या मध्यावर तयार होऊ लागतात. हे कमी दाबाचे पट्टे हि बाष्पमय हवा स्वतःकडे खेचून घेतात. आणि त्यामुळे गरम हवा आणि थंड हवा याची सरमिसळ होऊन हा पट्टा अरबी समुद्रातून केरळ कडे सरकू लागतो आणि जोरदार वार्यांसह दक्षिण भारतात खूप पाउस पडतो. यालाच मान्सून असे म्हणतात.भारतीय हवामान खाते नेहेमी अंदाज वर्तविण्यात अपयशी का ठरते याची कारणे
१) मान्सून चे अचूक वर्तमान करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर डेटा ची गरज असते. यामध्ये, उत्तर अटलांटिक सागर, हिंदी महासागर आणि मध्य पसिफिक महासागर यांच्या पाण्याचे तापमान, युरोप आणि आफ्रिकेचे जमिनीवरील तापमान, पसिफिक महासागराच्या उबदार प्रवाहांची घनता, आणि अटलांटिक आणि हिंदी महासागराच्या जवळ असलेला समुद्रावरील हवेचा दाब या आणि अशाच प्रकारच्या आणखी डेटा ची गरज असते. भारताकडे असलेली कमी उपग्रहांची संख्या आणि कमी प्रमाणात उपलब्ध असलेली उपकरणे यामुळे एवढा खोलात जाउन प्रत्येक वेळी त्यांना डेटा मिळत नाही.२) दुसरे कारण म्हणजे हा डेटा प्रोसेस करण्याची अत्युच्च क्षमता भारतीय कॉम्पुटर सिस्टीम मध्ये नाही. कारण Accuweather , skymet , आणि बाकी देश हा डेटा सांख्यिकीय दृष्टीने प्रोसेस करण्यासाठी उच्च प्रकारचे सुपरकॉम्पुटर्स आणि आधुनिक अल्गोरिदम्स वापरतात याउलट भारतात अजूनही २००० च्या काळातले जुनाट अल्गोरिदम्स वापरात आहेत, यामुळे आपल्याला काही मर्यादा आहेत.३) तिसरे कारण म्हणजे भारतातील बर्याच वेधशाळांमधली खूप महत्वाची पदे रिक्त आहेत. अर्थात आता याला बरीच कारणे असू शकतात जसे कि, हवामान खात्याला सरकार दरबारी योग्य ते महत्व नसणे. किवा शासकीय निधीची कमतरता असणे.४) चौथे महत्वाचे कारण म्हणजे भारताची भौगोलिक संरचना व याचे भौगोलिक स्थान - भारत हा उष्ण आणि बाष्पीय कटीबंधातला देश आहे कारण विषुव वृत्तीय रेषा भारताच्या ठीक मध्यातून जाते. असे असूनसुद्धा भारताच्या उत्तरेला हिमालयामुळे शीत वातावरण, वायव्य दिशेला राजस्थानच्या वाळवंटमुळे कोरडे वातावरण, पश्चिमेला सह्याद्री आणि समुद्राच्या सान्निध्यामुळे दमट वातावरण, ईशान्येला आल्हाददायक वातावरण असे आहे. त्यामुळे वेधशाळा त्यांच्या कुवतीनुसार जो डेटा गोळा करीत असतात त्यात अचूकपणाची कमी असते.त्यामुळे सध्या तरी उपग्रहांची संख्या वाढवणे, उच्च दर्जाची उपकरणे वापरणे, सुपर कॉम्पुटर्स वापरणे, वेधशाळांचे मनुष्यबळ वाढवणे, आणि सगळ्यात महत्वाचे शासकीय अनास्था दूर करून या सगळ्या गोष्टींसाठी योग्य तो निधी उपलब्ध करून देणे हेच उपाय होणे आवश्यक आहेत.