Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रो कबड्डी - सिझन ४

ध
धर्मराजमुटके
Sat, 06/25/2016 - 20:07
🗣 147 प्रतिसाद
प्रो कबड्डीचा ४ था मोसम आज २५ जुन २०१६ रोजी सुरु झाला. अती क्रिकेटचा कंटाळा आल्या नंतर मी दुसर्‍या खेळांचा दर्शक होण्याचा प्रयत्न करत होतो. फुटबॉल कडे मन आकर्षित होत होते आणि अचानक प्रो कबड्डीची सुरुवात झाली. साधारण दुसर्‍या सिझनपासून खेळातला रस वाढत गेला. मुंबईकर असल्यामुळे घरची टीम म्हणून 'यु मुंबा' चा नैसर्गीक समर्थक आणि नंतर चाहता बनलो. 'यु मुंबा' ने दुसर्‍या सिझनचे विजेतेपद पटकावल्यानंतर त्यांचा वाट्याला आलेले प्रेम वेगवेगळ्या ठिकाणी दिसून आले. ३ र्‍या सिझनच्या अंतिम फेरीतील निसटता पराभव मनाला काही काळापुरता टोचत राहिला. या सगळ्या पार्शभुमीवर ४ था सिझन फार लवकर घोषीत झाला तेव्हा कबड्डीचे ही क्रिकेट होणार काय ही शंका मनाला चाटून गेली. काय होते ते पुढे कळेलच मात्र प्रो. कबड्डीमुळे कबड्डीला वलय लाभतेय व मातीतल्या रांगड्या खेळाडूंना चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत हे पाहून मनास आनंद देखील होत आहेत. अनुप कुमार, राकेश कुमार, रिशांक देवाडिगा, मनजित चिल्लर, नरवाल आडनावबंधु, निलेश शिंदे, फजल अत्रांचली (इराण), जां कुं ली (कोरिया) (नाव लिहिण्यात चुकले असल्यास दुरुस्ती सुचवावी) आणि इतर खेळाडुंनी प्रेक्षकांना भरभरुन आनंद दिलाय. या सिझनमधे यु मुंबाचे बरेच तगडे खेळाडू इतर संघांनी खरेदी केले आहेत. जवळपास ५०% संघ नवीन आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरु नये. या खेळात मिनिटामिनिटाला रंग बदलत असल्यामुळे शेवटपर्यंत रंगतदार लढती होत आहेत. त्यामुळे यावेळचे विजेते कोण असतील याचा अंदाज लावणे सद्यातरी अवघड आहे. यंदा पहिल्यांदाच महिला संघ देखील खेळत आहेत. माझ्या माहितीप्रमाणे केवळ दोनच संघ असून एकच सामना होईल. अधिक माहितीसाठी प्रो कबड्डीची अधिकृत वेबसाईट बघता येईल. प्रो कबड्डी सिझन्सचे आत्तापर्यंतचे विजेते याप्रमाणे. सिझन १ : जयपुर पिंक पँथर्स सिझन २ : यु मुंबा सिझन ३ : पटना पायरेटस =================================================== प्रो कबड्डी सिझन ४ चे संघ खालीलप्रमाणे (कंसात माझ्या आवडत्या खेळाडूंची नावे) १. बंगाल वॉरीयर्स (निलेश शिंदे /जां कुं ली / सुरजित नरवाल / विशाल माने / महेंद राजपूत) २. बंगळूरु बुल्स ( मोहित चिल्लर / सुरिंदर नाडा) ३. दबंग दिल्ली ( काशिलींग आडके) ४. जयपुर पिंक पँथर्स ( शब्बीर बाप्पू / राजेश नरवाल / रण सिंग) ५. पटना पायरेटस ( फजल अत्रांचली / बाजीराव होडगे / प्रदिप नरवाल) ६. पुणेरी पलटण ( मनजित चिल्लर / अजय ठाकूर / दिपक निवास हुड्डा) ७. तेलुगु टायटन्स (संदिप नरवाल / राहुल Chaudhari) ७. यु मुंबा (अनुप कुमार / राकेश कुमार / रिशांक देवाडीगा / जीवा कुमार) यंदा एकूण संघांमधला मराठी टक्का देखील लक्षणीय रित्या वाढलेला आहे. सात संघ आणि जवळ जवळ ३५ दिवस हे सामने रंगणार आहेत. तर चला, आपल्या मातीत जन्मलेल्या या खेळाचा आनंद घेऊ या आणि चर्चा करत राहूया. ==================================================
वर्गीकरण
खेळ

प्रतिक्रिया द्या
35801 वाचन

💬 प्रतिसाद (147)
ध
धर्मराजमुटके Sat, 06/25/2016 - 20:23 नवीन
दिवस १ ला - सामना क्र. १ पुणेरी पलटण वि. तेलुगु टायटन्स घरी वेळेवर पोहोचू न शकल्याने ह्या सामन्याचे काही अंतिम क्षणच वाट्याला आले. मात्र शेवटच्या काही अटीतटीच्या मिनीटांत पुणेरी पलटणने रोमांचक खेळ करत ४ गुणांनी हा सामना जिंकला. मागील मोसमात देखील मनजित चिल्लर ने पुण्यास कित्येक एकहाती विजय मिळवून दिले होते. त्याचीच पुनरावृत्ती त्याने आज केली. हा अतिशय तडफेचा खेळाडू आहे पण स्वभावाने अतिशय तापट त्यामुळे खेळादरम्यान चर्चेत असतो. दिवस १ ला - सामना क्र. २ यु मुंबा वि. जयपुर पिंक पँथर्स मुंबईच्या घरच्या मैदानावर जयपुर ने मुंबईला एकदा धुळ चारली होती मात्र आज यु मुंबाने आज त्याची पुर्ण भरपाई केली. कॅप्टन कुल अनुप कुमार आणी चढाईतील हिरो रिशांक देवाडीगा आज हवे तेवढे चमकले नाही मात्र राकेश कुमार ने चढाई व पकड या दोन्ही विभागांत उत्तम कामगीरी केली. मागील मोसमांत मुंबई संघाचा भाग असलेल्या पण यावेळी जयपुरकडून खेळणार्‍या शब्बीर बाप्पू ने यु मुंबाच्या तोंडाला शेवटपर्यंत फेस आणला होता. मात्र शेवटच्या काही मिनिटांत सामना फिरला आणी यु मुंबा विजयी झाली. मुंबईचे पकड करणारे खेळाडू (फजल अत्रांचली आणी मोहित चिल्लर ) इतर संघांत गेल्यामुळे पकड करणारी फळी आज कमकुवत वाटली. विजयी संघांचे अभिनंदन !
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Sun, 06/26/2016 - 03:24 नवीन
अहाहा प्रो कबड्डी सुरु!!!, काही कारणांनी बघू शकत नाहीये, तरी तुमच्याकडून चालू घडामोडी घ्यायला आवडतील पीकेएल संदर्भात. कोरियाचा जंग कुन ली आवडला होता आपल्याला मागल्या मोसमात, इराणी पोरे पण भारी दिसायला गोरीगोमटी पण खेळायला वट्ट एकदम, फझल अत्रंचली, हादी ओहस्रोक, मुहम्मद माकसुदुलु मस्त लोक्स आहेत. अवांतर - मागच्या गुरुवारी नॅशनल जियोग्राफीक चॅनलवर 'कबड्डी- द स्पोर्ट ऑफ इंडिया' ही डॉक्युमेंटरी दाखवली होती, कबड्डीला इतक्या आकर्षक वेष्टणात कसे गुंडाळले गेले, प्लेयर्स कसे मॅनेज होतात वगैरे रंजक कार्यक्रम होता एक तासभर. बऱ्याच गमती जमती होत्या त्यात, उदाहरणार्थ, पोषणमूल्ये समजवून डाएट शिकवायला आलेल्या nutritionist ला खेळाडूंनी घालवून दिले होते कारण तो तूप खाऊ देत नसे वगैरे किस्से होते.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Sun, 06/26/2016 - 04:42 नवीन
खूप छान धागा मित्रा
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sun, 06/26/2016 - 19:16 नवीन
सोन्याबापू, खटपट्या, प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! मी देखील त्या डॉक्युमेंटरीचे शेवटचे काही क्षण पाहिले होते. दिवस २ रा : सामना क्र. ३ : बंगळुरु बुल्स वि. बंगाल वॉरीयर्स शेवटच्या सत्रात हाती असलेली ६ गुणांची बढत बंगाल वॉरीयर्स वाल्यांनी अतीघाई करुन घालविली व त्याची परिणीती शेवटी हरण्यात झाली. केवळ १ गुणांची आघाडी घेऊन बंगळुरु बुल्स ही लढत जिंकली. मात्र जां कुं ली ने या मोसमातील पहिली सुपर रेड करुन आपले नाणे खणखणीत आहे हे पुन्हा एकदा दाखवून दिले. बंगाल वाल्यांनी पकड करुन जास्तीत जास्त गुण कमवून पुढे जाव हेच चांगले आहे. (बं.बु. २४ विरुद्ध बं.वॉ. २३) दिवस २ रा : सामना क्र. ४ : पुणेरी पलटण वि. यु मुंबा गेल्या ३ मोसमात पुणेरी पलटण एकदाही यु मुंबाला हरवु शकली नव्हती मात्र ती कमाल आजच्या सामन्यात पाहायला मिळाली. पुण्याने सुरुवातीपासूनच दमदार खेळ करत प्रचंड आघाडी घेतली. अजय ठाकूर ने सुपर रेड मधे जबरदस्त कमाल केली. त्याला मनजित चिल्लर ने देखील तशीच साथ दिली. पुण्याचा संघ जो चांगल्या पकडीसाठी ओळखला जात होता त्यांनी चढाई देखील जबरदस्त केली व तब्बल २२ गुणांनी यु मुंबईला धोबीपछाड दिला. अनुप कुमारने शेवटपर्यंत राकेश कुमार जास्त वेळा खेळविले नाही याचे मला राहून राहून आश्चर्य वाटत आहे. एकंदरीत ही फारच अपमानास्पद हार होती. एकंदरीत मुंबईची पकड फळी या वेळेस खुपच कमकुवत असल्यामुळे ते ह्या वेळी सेमी फायनल पर्यंत तरी पोहोचतील की नाही याची शंकाच आहे. (पु.प. ४१ विरुद्ध यु.मुंबा. १९)
  • Log in or register to post comments
द
दिग्विजय भोसले Sun, 06/26/2016 - 19:59 नवीन
मजा येते बघायला, आपला कासेगावचा(सांगली) काशी कॅप्टन आहे दिल्ली संघाचा.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sun, 06/26/2016 - 20:19 नवीन
ओढ रं मर्दां. लावलास झेंडा दिल्लीवर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिग्विजय भोसले
क
कैलासवासी सोन्याबापु Mon, 06/27/2016 - 01:53 नवीन
काशिलिंग अडके!! जबऱ्या रेडर आहे गडी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिग्विजय भोसले
ध
धर्मराजमुटके Mon, 06/27/2016 - 05:58 नवीन
येस. पण चांगला माणूस चुकीच्या संघात आहे. गेल्या तीन मोसमात दिल्लीचा संघ काही प्रभाव दाखवू शकलेला नाहिये. मात्र यावेळी यु मुंबा सोडता बाकीचे संघ चांगलेच संतुलित दिसतायेत. दिल्ली ने गेल्या तीन मोसमात एकदाही पहिला सामना जिंकलेला नाहिये. बघुया आज काय होतेये ते ! आजचा सामना बंगाल वॉरीयर्स वि. दबंग दिल्ली रात्री ८.०० वाजता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
उ
उल्का Mon, 06/27/2016 - 02:28 नवीन
गेल्या सिझनचे 80% सामने पूर्ण बघितले. ह्या सिझनचे पहिले दोन दिवस चुकले. वाईट वाटत होतं. पण हे वाचल्यावर आनंद झाला. आजपासून न चुकता (जमेल तसं) नक्की बघणार आहे. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
ग
गौतमी Mon, 06/27/2016 - 08:57 नवीन
कालचा सामना एकदम बेक्कार होता यु मुंबाचा... आधीच सगळे चांगले प्लेयर्स दुसर्या संघात गेलेत त्यामुळे खुप वाईट वाटतय...
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Mon, 06/27/2016 - 18:46 नवीन
दिवस ३ रा : सामना क्र. ५ : दबंग दिल्ली वि. बंगाल वॉरीयर्स दिल्ली वि. बंगाल चा सामना चांगलाच रंगला. काशीने दिल्ली ला चांगली सुरुवात करुन दिली. इराणी मिराज शेख ने दिल्ली ला ३ वेळा ऑल ऑऊट होण्यापासून वाचविले मात्र त्याची प्रयत्नांची शर्थ कामी आली नाही. बंगाल ने कालच्या चुका जाणीवपुर्वक टाळल्या. त्यांनी आपल्या उत्तम बचाव / पकड फळीच्या जोरावर हा सामना जिंकला. दिल्लीला पहिल्या सामन्यात हरण्याचा आपल्या भाळी लागलेला डाग पुसता आला नाही. निलेश शिंदेने आज आपला सर्वोत्तम खेळ केला. बंगालतर्फे बदली आलेला खेळाडू रवि दलाल यानेही संघाला एक सुपर रेड मिळवून दिली. सामना बंगाल ने जिंकला असला तरी मिराज ने आज प्रेक्षकांची मने जिंकली. बंगाल वॉरीयर्स (३१) - दबंग दिल्ली (२३) - बंगाल ने हा सामना ८ गुणांनी जिंकला. -------------------------------------------------------------------------------------------------- दिवस ३ रा : सामना क्र. ६ : पुणेरी पलटण वि. पटना पायरेटस पुणेरी पलटण आजपर्यंत पटना पायरेटला हरवू शकली नाही. तोच परिपाठ आज पुढे चालू राहिला. पटणाने उत्तम प्रदर्शन करीत सामना ६ गुणांनी जिंकला. पटना पायरेटस (३० गुण) - पुणेरी पलटण (२४)
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Tue, 06/28/2016 - 19:27 नवीन
दिवस ४ था : सामना क्र. ७ - पुणेरी पलटण वि. दबंग दिल्ली यु मुंबाला हरवून फॉर्मात असलेल्या पुणेरी पलटण चा अश्वमेध काल पाटण्याने रोखला तर आज दिल्ली सारख्या तुलनेने कनिष्ठ संघाबरोबर सामना बरोबरीत सोडवावा लागला. मात्र मनजित चिल्लरच्या व्यवस्थापन चातुर्याला दाद द्यावीच लागेल. जो सामना जिंकू शकत नाही तो निदान बरोबरीत तरी सोडवावा यासाठी तो आपले सर्वस्व पणाला लावतो. लेकाला उद्या शाळेत बॅट हवी असल्याकारणाने आणी प्रथमच होणारी अनाहिता कबड्डी सामन्याची मजा घ्यायची असल्यामुळे त्याला पहिला सामना नाही बघीतला तरी चालणार होता. त्यामुळे पहिल्या सामन्याची पुर्ण वेळ मजा घेऊ शकलो नाही. पुणेरी पलटण (२७) वि. दबंग दिल्ली (२७) =========================================== दिवस ४ था : महिला कबड्डी सामना क्र. १ - फायर बर्डस वि. आईस दिवाज अनाहितांचा प्रत्येक क्षेत्रातला यशस्वी वावर ध्यानात घेऊन या मोसमात पहिल्यांदाच महिला संघांचे वेगळे सामने खेळविले जात आहेत. आजच्या सामन्यादरम्यान खास पाहुणी म्हणून भारतीय महिला क्रिकेट संघाची कप्तान मिताली राज उपस्थित होती. या सामन्याचे वेगळेपण म्हणजे पुरुषांचा खेळ ४० मिनिटांचा तर महिला संघांचा खेळ ३० मिनिटांचा होता. महिलांचे खेळाचे मैदान देखील आकाराने छोटे असते असे वार्तांकनात सांगण्यात आले मात्र प्रो कबड्डीमधे वेगळ्या मैदानाची व्यवस्था नसल्यामुळे काही खेळाडूंची दमछाक झालेली दिसत होती. एकंदरीत सामना उत्कंठापुर्ण झाला व महिला संघ देखील उत्तमपणे खेळले. फायरबर्ड संघाची कप्तान ममता पुजारी ने व्यक्तीगत खेळ व संघव्यवस्थापन या दोन्ही कसोट्यांवर उत्तम काम केले. फायर बर्डस (२५) ने आईस दिवाज (१२) या संघाला १३ गुणांनी पराभुत केले. स्टॉर्म क्वीन नावाचा अजुन एक महिला संघ स्पर्धेत आहे. एकंदरीत ८ सामने आपल्याला बघायला मिळणार आहेत. अवांतर : महिला कबड्डीचे संघ, त्यांच्या केशभुषा बघून मला 'चक दे इंडीया' चित्रपटाची आठवण झाली तर मैदानाचा छोटा आकार, कमी वेळाचा खेळ या चर्चा बघतांना मिपावरील "महिला वायुदल पायलटस" या धाग्यावरील प्रतिसादांची आठवण आली. एकंदरीत आजचा दिवस सार्थकी लागला. विजेत्यांचे अभिनंदन !
  • Log in or register to post comments
न
नया है वह Wed, 06/29/2016 - 14:20 नवीन
+१
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Wed, 06/29/2016 - 19:17 नवीन
दिवस ५ था : सामना क्र. ८ - जयपुर पिंक पँथर्स वि. तेलुगु टायटन्स जयपुर (२८ गुण) वि. तेलुगु टायटन्स (२४ गुण) ============================================= दिवस ५ था : सामना क्र. ९ - पटना पायरेट्स वि. वि. यु मुंबा पटणा पायरेटस (३६ गुण) वि. यु मुंबा (३४ गुण) आज पुन्हा मनात निराशा दाटून आली. आता झोप येण्यासाठी काहीतरी उपाय करावा लागणार. देवा वाचव रे बाबा यु मुंबाला ! आणि हो ! विजेत्यांचे जड मनाने अभिनंदन !!
  • Log in or register to post comments
व
विअर्ड विक्स गुरुवार, 06/30/2016 - 06:11 नवीन
तरी सामना चुरशीचा झाला म्हणायचा. कारण दुसऱ्या ऑल आऊट नंतर मी टीव्ही निराशेने बंद केला. यंदा यू मुंबा साखळीतच गारद व्हायची चिन्हे आहेत. बचाव पूर्णतः कमकुवत. आक्रमण फळीत विविधता नाही. राकेश कुमार हा मागच्या season ला सुध्दा timepass raid नि बचावासाठी घेतला होता. त्याला आक्रमणाला पाठवले तर बचाव अजून दुबळा पडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 06/30/2016 - 19:51 नवीन
प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद ! तुमचे म्हणणे बरोबर आहे पण जेव्हा एखाद्या खेळाडूचा खेळ होत नसेल तेव्हा वेगळा पर्याय निवडणे कधीही श्रेयस्कर आहे. एकंदरीत कोणताही सामना पाहिला तरी प्रत्येक दिवसाच्या सामन्याच्या सामन्याचा एक हिरो नक्की असतो. आणि तो हिरो तुम्हाला पहिल्या काही चढायांमधेच माहिती पडतो. काल अनुपच्या हालचालीत अजिबातच चपळता नव्हती. ४० मिनिटांच्या खेळात तुम्ही निर्णय किती लवकर घेता याला फारच महत्त्व असते. बघुया उद्याच्या दिल्लीविरुद्धच्या सामन्यात काय होतेय ते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विअर्ड विक्स
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 06/30/2016 - 20:19 नवीन
दिवस ६ वा : सामना क्र. १० : जयपुर पिंक पँथर्स वि. बंगळुरु बुल्स बंगळुरु बुल्स ने आजपर्यंतच्या ३ सीझन्समधे जयपुर ला त्यांच्या घरच्या मैदानावर एकदाही हरविलेले नव्हते. तो इतिहास आज बदलणार काय यावर कबड्डीप्रेमींची नजर होती. हा सामना अपेक्षेनुसार अटीतटीचा झाला. जयपुर संघाचे मालक श्री. अभिषेकराव बच्चन यांच्या चेहर्‍यावर संपुर्ण सामना संपेपर्यंत "आता वाजले की बारा" छाप भाव होते. मात्र जेव्हा शेवटच्या मिनिटाला सामना बरोबरीत सुटला तेव्हा त्यांनी आनंद व्यक्त केला. अशाच प्रकारचे भाव श्रीमती जया बच्चन यांच्या चेहर्‍यावर जयपुर वि. मुंबईच्या सामन्यात बघायला मिळाले होते. चेहरा कोरा ठेवण्याच्या बाबतीत त्यांनी घरातच शिकवणी लावायला हवी होती. असो. हे जास्तच वैयक्तीक होतयं बहुतेक ! दुसर्‍या सत्रात जयपुर टीम पिछाडीवर पडली होती व आज इतिहास बदलणार असे वाटत होते. मात्र जयपुरचा संघनायक जसबीर सिंगने आज उत्तम चढाया, उत्तम पकडी करत आपल्या नेतृत्त्वगुणाची छाप सोडली. शेवटच्या मिनिटांमध्ये जबरदस्त खेळ करुन हरु पाहणारा सामना अगदी शेवटच्या चढाईमधे बरोबरीत सोडवला. आज जसबीरने चढाईत ५ तर पकडींमधे ४ अशी एकूण ९ गुणांची कमाई केली आणी सन्मान मिळविला. बंगळुरु च्या संघात माझे आवडते मोहित चिल्लर आणि सुरींदर नाडा यांनीही चांगला खेळ केला. रोहित कुमार या खेळाडूनेही चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. जयपुर पिंक पँथर्स २८ वि. बंगळुरु बुल्स २८ ( सामना बरोबरीत सुटला) ==================================================== दिवस ६ वा : महिला कबड्डी सामना क्र. २ : आईस दिवाज वि. स्टॉर्म क्वीन आईस दिवाज (२८ गुण) वि. स्टॉर्म क्वीन (१५ गुण). आईस दिवाज १३ गुणांनी विजयी तुर्तास विजेत्यांचे अभिनंदन ! आणि उद्या यु मुंबा काय करते ह्याकडे लक्ष. उद्या परत भेटूया ! शुभरात्री !
  • Log in or register to post comments
व
विअर्ड विक्स Fri, 07/01/2016 - 09:08 नवीन
अभिलाषा , ललिताचा खेळ उत्तम होता काल... जसवीर नी मनजीत चिल्लर दोघेही कठीण परिस्थितीत सामना फिरवतात संघासाठी. अश्या एखाद्या खेळाडूची मुंबाला गरज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
A
avinash kulkarni Fri, 07/01/2016 - 05:26 नवीन
महिला कब्बडीपटू अंतिम रेषेजवळ ज्या पकडी करत होत्या त्या केवळ लाजबाब .
  • Log in or register to post comments
प
पाटील हो Fri, 07/01/2016 - 06:38 नवीन
आजचा सामना कोण जिंकणार .. १ ) यु मुंबा X दबंग दिल्ली = ??? २) जयपुर पिंक पँथर्स X बंगाल वॉरीयर्स = ??? धर्मराजमुटके तुमाला काय वाटतय ?
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 07/01/2016 - 08:15 नवीन
मुंबई जिंकणार पहिल्या सामन्यात अन दुसऱ्या सामन्यात बंगाल!.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटील हो
प
पी. के. Fri, 07/01/2016 - 08:53 नवीन
सचिन रिटायर झाल्या पासून क्रिकेट बगायचा इच्छा कमी झालाय तशीच अवस्था चिल्लर, नाडा, आणि विशाल माने गेल्या पासून यु मुंबा च्या बद्दल झालाय.. यु मुंबा च्या शरीरातला प्राणच गेलाय राव...
  • Log in or register to post comments
व
विअर्ड विक्स Fri, 07/01/2016 - 09:06 नवीन
आहे जीवा तरी खातायत शिव्या अशी मुम्बाच्या बचावाची अवस्था आहे. एकही कॉर्नर खेळाडू चांगला नाहीये सध्या. मोहित , फझल नि सुरेंदर नसल्यामुळे मुंबा दात पडका साप झालाय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पी. के.
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 07/01/2016 - 11:03 नवीन
पाहतोय कबड्डी. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Fri, 07/01/2016 - 19:47 नवीन
दिवस ७ वा : सामना क्र. ११ : यु मुंबा वि. दबंग दिल्ली आज मुंबईने लाज राखली. शेवटपर्यंत रोमहर्षक झालेल्या ह्या सामन्यामध्ये मुंबईने दिल्ली ला २ गुणांनी मात दिली. मात्र दिल्लीचा खेळ मागील ३ सीझनपेक्षा कितीतरी पटीने उत्तम होत आहे हे मान्य करावेच लागेल. दिल्लीकडून सचिन शिंगाडे ने उत्तम पकडी करत ५ गुण मिळविले तर सेल्वामनी आणि काशिलींग अडकेने चांगल्या चढाया केल्या. मात्र आज मुंबईचे नशीब जोरावर असल्यामुळे रिशांक देवाडीगाने १३ गुणांची कमाई केली तर आणी त्याला अनुप व राकेश कुमार ने चांगली साथ दिली. रिशांक ने आज एक सुपर रेड देखील केली. यु मुंबा २७ गुण वि. दबंग दिल्ली २५ गुण (मुंबई २ गुणांनी विजयी) ===================================================== दिवस ७ वा : सामना क्र. १२ : जयपुर पिंक पँथर्स वि. बंगाल वॉरीयर्स जयपुरच्या घरच्या मैदानावर जसबीर सिंगने आज परत आपले नेतॄत्त्वगुण सिद्ध करत बंगाल वॉरीयर्स हा ३ गुणांनी हरवून सोन्याबापूंच्या प्रतिसादात व्यक्त केलेल्या अंदाजाला धक्का दिला. हा सामना देखील शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार झाला. जसजसे सामने होत जातील तसतश्या लढती रंगत जातील हे निश्चित ! जयपुर ने आज जास्तीत जास्त वेळ निलेश शिंदेपासून दुर राहणे पसंत केले. आज जसबीर सिंग आणि शब्बीर बाप्पू ने दमदार खेळ करीत डोळ्यांचे पारणे फेडले. जेव्हा जेव्हा मुंबईचे माजी खेळाडू उत्तम खेळ करतात तेव्हा ते जर आज मुंबई संघात असते तर किती बहार आली असती असे स्मरणरंजन करावे लागते. जयपुर पिंक पँथर्स ३६ गुण वि. बंगाल वॉरीयर्स ३३ गुण ( जयपुर ३ गुणांनी विजयी) विजेत्यांचे अभिनंदन आणि प्रतिसादकांचे आभार ! उद्या पुन्हा भेटूया, शुभरात्री !
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Fri, 07/01/2016 - 20:38 नवीन
या वेळेस पूर्ण फिट आहे, त्याने मॅच काढली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
ध
धर्मराजमुटके Sat, 07/02/2016 - 20:56 नवीन
दिवस ८ वा : सामना क्र. १३ : दबंग दिल्ली वि. बंगळुरु बुल्स जयपुरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर आज झालेल्या दबंग दिल्ली वि. बंगळुरु बुल्स या सामन्यात अखेर दिल्लीने या मोसमातील पहिल्यावहिल्या विजयाची नोंद केली. आज चढाईपटूंपेक्षा पकडी करणार्‍यांनीच सामना चांगला रंगविला. दिल्लीच्या सचिन शिंगाडे ने आज पकडीत तब्बल ७ गुणांची कमाई केली तर इराणी मिराज शेखने चढाईमधे ७ गुण मिळविले. सेल्वामनी व काशिलिंग ने देखील त्यांना चांगली साथ दिली. दबंग दिल्ली ३२ गुण वि. बंगळुरु बुल्स २४ गुण ( दिल्ली ८ गुणांनी विजयी) ================================================ दिवस ८ वा : सामना क्र. १४ : जयपुर पिंक पँथर्स वि. पुणेरी पलटण या सामन्यात पुण्याचे पारडे अगोदरपासूनच जड वाटत होते. मुंबईवर मिळवलेल्या विजयानंतर नंतरच्या दोन सामन्यात पुण्याला विजयाने हुलकावणी दिली होती. मात्र आज जयपुरला हरवून त्यांनी जोरदार पुनरागमन केले. आजच्या सामन्यात दिपक निवास हुड्डा हा हिरो ठरला. काही कामानिमित्त हा सामना पुर्ण बघता आला नाही. आणि इकडे तिकडे वाचून लिहिणे मनाला पटत नाही त्यामुळे आजचा वॄत्तांत थोडक्यात आटोपता घेतो. उद्यापासून पुढील काही सामने हैदराबादमधे होतील. जयपुर पिंक पँथर्स २८ गुण वि. पुणेरी पलटण ३३ गुण ( पुणेरी पलटण ५ गुणांनी विजयी) विजेत्यांचे अभिनंदन आणी प्रतिसादकांचे, वाचकांचे आभार ! उद्या परत भेटूया, शुभरात्री !
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Sun, 07/03/2016 - 04:10 नवीन
मुटके साहेब, प्रो कबड्डीच्या समग्र घडामोडी आम्हा मेंबरांपुढे मांडायची आपली सदिच्छा, प्रत्येक सामन्याचा वृत्तांत मांडायची चिकाटी अन तत्परतेने ते लिहून पोस्ट करायची शिस्त ह्याची मी दाद देतो अन आपले मनःपूर्वक आभार मानतो. आपल्या ह्या स्तुत्य प्रयत्नामुळे आपण प्रो कबड्डीचा हा मोसम पाहू शकत नसल्याचे जाणवतच नाही. आपले पुनश्च आभार -बाप्या
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sun, 07/03/2016 - 19:05 नवीन
प्रतिसादाबद्द्ल आभार बापु ! हा प्रयत्न शेवटपर्यंत तडीस न्यायचा मानस आहे. बघु या कितपत जमते ते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
व
विअर्ड विक्स Sun, 07/03/2016 - 19:24 नवीन
यु मुंबा सावरली ...... आजच्या विजयात मागील ३ सिझन ची झळक दिसली.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sun, 07/03/2016 - 19:38 नवीन
यस्सार ! सेम फिलींग हिअर ! आज कोणत्याही खेळाडूने वैयक्तीकरित्या जास्त गुण कमाविले नाही तरी देखील संघभावनेने खेळलेला सामना त्यांच्या पदरात विजयाचे दान टाकून गेला. मात्र त्याचबरोबर असा खेळ पुणेरी पलटन, पटना पायरेटस किंवा जयपुर समोर फार काळ टिकू शकला नसता हेही तितकेच खरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विअर्ड विक्स
ध
धर्मराजमुटके Sun, 07/03/2016 - 19:36 नवीन
दिवस ९ वा : सामना क्र. १५ : पटना पायरेटस वि. तेलुगु टायटन्स हैदराबाद या तेलुगु टायटन्सच्या घरच्या मैदानावर झालेला आजचा सामना अत्यंत चुरशीचा झाला. मागच्या सीजनमधे एकाच संघाकडून खेळणारे प्रदिप नरवाल व संदिप नरवाल आज एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनून उभे होते. संदिप नरवालमधे तोच जोश, तीच तडफ दिसून आली मात्र प्रदिप नरवालने जोश आणि होश दोन्हीं गुणांचा वापर करुन आज पटना पायरेटला विजय मिळवून दिला. सामना अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत एका बाजूकडून दुसर्‍या बाजूस फिरत होता. पटना पायरेटसच्या एकूण ३५ गुणांपैकी ११ गुण एकट्या प्रदिप ने कमावले. तेलगु टायटन्सच्या बाजूने राहूल चोधरी ने देखील ११ गुणांची कमाई केली मात्र त्याची तपश्चर्या आज फळास आली नाही. संदिप नरवाल ने जोशपुर्ण खेळ केला पण शेवटच्या काही मिनिटांत त्याने आतताईपणा आणि अतीआत्मविश्वास दाखविला आणि तो त्यांना भोवला. ज्या कोणी हा सामना बघीतला नसेल त्यांना ह्या सामन्याची क्षणचित्रे बघण्याची मी शिफारस करतो. या मोसमात पटना आतापर्यंत ३ सामने खेळले आहेत आणि ३ ही वेळा जिंकले आहेत. तर तेलुगु टायटन्स ३ सामने खेळले आहेत आणि ३ ही वेळा पराभूत झाले आहेत. पटना पायरेटस (३५ गुण) वि. तेलुगु टायटन्स (३३ गुण) - पटना पायरेटस २ गुणांनी विजयी ================================================================= दिवस ९ वा : सामना क्र. १६ : यु मुंबा वि. बंगाल वॉरीयर्स पहिल्या सामन्याच्या तुलनेत हा दुसरा सामना जवळपास एकतर्फी व बराचसा संथ झाला. मात्र अपेक्षेनुसार यु मुंबाने त्यांच्या तुलनेत कमजोर असलेल्या बंगाल वॉरीयर्सवर ८ गुणांनी विजय मिळविला. सुरुवातीपासूनच चांगला खेळ खेळत यु मुंबाने बंगालवर चांगली बढत घेतली व ती शेवटपर्यंत टिकवत नेली. आज रिशांक देवाडीगाने चांगल्या पकडी करत ५ गुणांची कमाई केली तर त्याला सुरजित व बदली खेळाडू सुरेशु ने देखील चांगली साथ दिली. आज बंगालची बचाव / पकडफळी अजिबातच प्रभाव टाकू शकली नाही. मात्र मुंबईच्या चढाई आणि बचाव / पकडफळीने अतिशय अचूक खेळ केला. एखाद दुसरी खेळी सोडता त्यांनी मागील सर्व चुका टाळल्या. राकेशकुमार ने देखील आज उत्तम पकडी करत ४ गुण मिळविले. राकेशकुमार आज पुर्ण ४० मिनिटे मैदानावर पाय रोवून उभा होता. जीवाकुमार ला आज जास्त वाव मिळाला नाही. मात्र त्याची जागा आज सुरजित ने घेतली. चढाई आणि पकड या दोन्ही आघाड्यांवर त्याने उत्तम कामगिरी केली. अनुप आज वैयक्तीकरित्या उत्तम खेळ करु शकला नाही मात्र एकंदरीत सांघिक कामगिरी उत्तम झाली. आजच्या लढतीत बंगाल ८ गुणांनी हारल्यामुळे त्यांना एकही नवीन गुण प्राप्त झाला नाही. तसेच आजपर्यंत झालेल्या एकाही सामन्यामधे यु मुंबाला ते हरवू शकले नाहीत. हा विक्रमदेखील आजपर्यंत कायम राहिला. यु मुंबा (२६ गुण) वि. बंगाल वॉरीयर्स (१८ गुण) - यु मुंबा ८ गुणांनी विजयी.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Mon, 07/04/2016 - 19:25 नवीन
दिवस १० वा : सामना क्र. १७ : पुणेरी पलटण वि. बंगळुरु बुल्स आजचा हा सामना देखील कालच्या पटणा वि. तेलुगु टायटन्सच्या सामन्या प्रमाणेच अतिशय रोमहर्षक झाला. आज बंगळुरु च्या रोहित कुमार ने चढाईत ८ गुण तर मोहित चिल्लर ने पकडी करतांना ६ गुण मिळविले. सामना शेवटच्या क्षणापर्यंत पुण्याचा पदरात पडेल असे वाटत होते मात्र शेवटच्या काही मिनिटांत बंगळुरु ने उत्तम खेळ करत पुण्याला २ गुणांनी मात दिली. पुण्याच्या दिपक निवास हुड्डा ने सामन्याच्या ३ र्‍या मिनिटालाच सुपर रेड करीत करुन पुण्याला आघाडी मिळवून दिली. महत्त्वाचे म्हणजे पुण्याचा सुपरस्टार मनजित चिल्लर चे नाणे आज वाजलेच नाही. बुल्सने आज त्याला बराच वेळ मैदानाबाहेर बसविले. पुणेरी पलटण (२६ गुण) वि. बंगळुरु बुल्स (२८ गुण) - बंगळुरु बुल्स २ गुणांनी विजयी. ================================================================ दिवस १० वा : सामना क्र. १८ : तेलुगु टायटन्स वि. बंगाल वॉरीयर्स कालचा आणि आजचा दिवस बंगाल वॉरीयर्स साठी जवळपास सारखाच होता. तेलुगु टायटन्सने कालच्या हरण्यापासून बोध घेत चुका टाळल्या मात्र बंगालने कालच्या पराभवाने खचून जाऊन की काय पण कालच्या पेक्षा जास्त अपमानास्पद हार आज स्वीकारली. आज शेवटच्या मिनिटाची चढाई करण्यासाठी बंगालचा कर्णधार निलेश शिंदे केवळ एकटा मैदानावर उभा होता. आजच्या लढतीचे हिरो होते राहुल चौधरी आणि संदिप धुल. संदिप धुल ने तर आज बंगालच्या सगळ्याच चढाईपटूंना धुळ चारली असे म्हटल्यास वावगे ठरु नये. राहुल चौधरी आजचा सुपर टेन ठरला तर संदिप धुल ने पकडी करत ८ गुणांची कमाई केली. बंगाल ने आज उल्लेख करावा अशी कोणतीही कामगिरी केली नाही. काल यु मुंबाने ८ गुणांनी हरविले तर आज तेलुगु टायटन्सने १७ गुणांनी अपमानास्पद पराभव केला. आजचा सामना बघून मला यु मुंबा वि. पुणेरी पलटणचा सामना आठवला. बंगाल वॉरीयर्स (१८ गुण) वि. तेलुगु टायटन्स (३५ गुण ) - तेलुगु टायटन्स १७ गुणांनी विजयी. विजेत्यांचे अभिनंदन !
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 07/05/2016 - 03:24 नवीन
धुल कायम आवडत आलाय, चणीने बारीक तरीही विलक्षण जास्त तंत्रशुद्ध खेळ असलेला खेळाडू आहे असे वाटते, शांतीत क्रांती प्रकार एकंदरीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
ध
धर्मराजमुटके Wed, 07/06/2016 - 09:21 नवीन
काल रात्रीपासुन मिपा बंद असल्यामुळे अपडेटस टाकत आले नाही. दिवस ११ वा दिवस ११ वा : सामना क्र. १९ : तेलुगु टायटन्स वि. बंगळुरु बुल्स उर्वरीत भारतासाठी अण्णा वि. अण्णा हा सामना अत्यंत चुरशीचा झाला. राहुल चोधरी आणि रोहित कुमार या दोघांवर आज प्रेक्षकांच्या नजरा खिळल्या होत्या. मात्र आज रोहित कुमारची सरशी झाली. रोहित कुमार आज ११ गुणांची कमाई केली तर त्याला विनोद कुमार ने चांगली साथ दिली. तेलुगु टायटन्सने आज पकडी करतांना बर्‍याच चुका केल्या. शेवटपर्यंत रंगलेल्या या सामन्यात शेवटी बंगळुरु ने तेलुगु टायटन्सला २ गुणांनी मात दिली. तेलुगु टायटन्स (२८ गुण) वि. बंगळुरु बुल्स (३० गुण) - बंगळुरु बुल्स २ गुणांनी विजयी. ================================================ ======= दिवस ११ वा : महिला कबड्डी सामना क्र. ३ : फायर बर्डस वि. स्टॉर्म क्वीन्स आतापर्यंत महिला कबड्डी सामन्यात १) फायर बर्ड्स वि. आईस दिवाज २) आईस दिवाज वि. स्टॉर्म क्वीन्स आणि ३) स्टॉर्म क्वीन्स वि. फायर बर्डस असे एकूण ३ सामने झाले आहेत. पहिला सामना फायर बर्ड्स ने जिंकला तर दुसरा सामना आईस दिवाज जिंकला. आजचा ३ रा सामना दोन्ही संघांना १४-१४ गुण मिळाल्यामुळे अनिर्णीत राहिला. एकूणातच तिन्ही संघांनी प्रत्येक सामन्यात प्रगतीच केलेली आढळली. फायर बर्ड्सची कप्तान ममता पुजारीने ६ गुण मिळविले मात्र स्टॉर्म क्वीन्सच्या तेजस्विनी बाई ला फक्त एकच गुणाची कमाई करता आली. तिने आतापर्यंत दोन सामने खेळलेले आहेत मात्र अजून तरी ती तेजाने तळपलेली नाहिये. ============================================================ काही कारणास्तव दोन्ही सामने नीट लक्ष देऊन पाहता आले नाही त्यामुळे आजचा वॄत्तांत संक्षीप्त स्वरुपाचा आहे. आजचा तेलुगु टायटन्स वि. यु मुंबाचा सामना रक्तदाब वाढविणारा असेल हे निश्चित ! तेलुगु टायटन्स आजच्या पराभवाने पेटून उठतात की दबावाखाली येतात ते कळेल. तोपर्यंत फक्त अंदाज बांधणेच हाती आहे. बघु या काय होते ते ! विजेत्या संघांचे अभिनंदन !
  • Log in or register to post comments
र
रघुनाथ.केरकर Wed, 07/06/2016 - 10:08 नवीन
यंदाच्या मोसमात आमच्या ठाण्याच्या खेळाडुंचा सहभाग बर्यापैकी आहे. नीलेश साळुन्खे- तेलुगु - जय शंकर कल्याण प्रशांत चव्हाण - पुणेरी - ओम कबड्डी कल्याण गिरीश एर्नाक - बेंगाल - ओम कबड्डी कल्याण उमेश म्हात्रे - बेंगाल - समर्थ काल्वार भिवंडी सुशिल भोसले - बेंगाल - ओम कबड्डी कल्याण मागल्या सिजन चा जितेश जोशी पुणेरी छत्रपती डोंबीवली शिवतरकर बेंगाल - ओम कबड्डी कल्याण कल्याण डोंबीवली ठाणे भिवंडी कडे अजुन किती तरी गुणी खेळाडु आहेत.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Wed, 07/06/2016 - 10:57 नवीन
होय ! तसे म्हटले तर बंगालचा संघ हाच खर्‍या अर्थाने महाराष्ट्राचा संघ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रघुनाथ.केरकर
र
रघुनाथ.केरकर Wed, 07/06/2016 - 13:15 नवीन
निलेश शिन्दे - मुम्बई शहर- बिपिसिएल विशाल माने -मुम्बई शहर- बिपिसिएल नितिन मदने -सान्ग्ली-बिपिसिएल क्रुश्ना मदने -सान्ग्ली पुर्वीचा बाजीराव होडगे- मुम्बै पोलीस सुशील भोसले - कल्याण- बैन्क ओफ इन्डीया अजुन एक नमुद करावस वाटत. सचीन खाम्बे ने ३ सीजन जसा लेफ्ट कोर्नर लावला होता, तसा एर्नाक ला नाही जमत. अजुन तरी तस दीसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
र
रघुनाथ.केरकर Wed, 07/06/2016 - 10:16 नवीन
प्रो कबड्डी च्या काही गोष्टींंचे मात्र कौतुक वाटते, जसे की बिपिसिएल चे बहुतेक खेळाडु प्रो कबड्डीत असताना, बिपिसिएल चेच सुहस म्हात्रे (क्याप्ट्न - रायगड), शैलेश सावंत (क्याप्ट्न रत्नागिरी) तसेच महिंद्रा चे पण कोणी दिसत नाही.
  • Log in or register to post comments
र
रघुनाथ.केरकर Wed, 07/06/2016 - 10:24 नवीन
निलेश साळुंखे - व्यवसाइक संघ - महींद्रा
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Wed, 07/06/2016 - 13:43 नवीन
केरकरांशी सहमत!, तसंही समालोचनात (हिंदी किंवा इंग्लिश) कायम सांगतात "महाराष्ट्र कबड्डीका गढ है, यहां के लोग यहां का बच्चा बच्चा कबड्डी समजता है और पसंद भी करता है"
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Wed, 07/06/2016 - 20:18 नवीन
हा तर समालोचकांच्या मनाचा मोठेपणा आहे. मात्र आजही मराठी माणूस वर्तमानकाळापेक्षा भुतकाळातच रमतो. यात आमच्या सारख्या सर्वसामान्यांपासून ते उधोजीराजे यापैकी कुणाकुणाचाच अपवाद करता येणार नाही. आजचा कबड्डीचा खरा गढ असेल तर तो हरियाणा च आहे. आणि जाट हाच खरा कबड्डीसम्राट आहे. अवांतर : 'सामना' तील क्रीडा वार्तांकन पाहिले पाहिजे बुवा एकदा. त्यातील शीर्षके नक्कीच अशी असतील. १. राजपुतांनी दिल्लीच्या शहेनशहाचा कोथळा बाहेर काढला. २. मरहट्टे लडे तो रजपुत पडे ३. कन्नडीगांनी झाडली लुंगी तर मद्राशांची वाजली पुंगी ४. पुण्याने मारला बाण आणि आडवा झाला बंगाली वाघ कल्पनाशक्तीला जास्त ताण देववत नाहिये आज फार. थांबतो. महत्त्वाची टीप : उपरोक्त प्रतिसादात आलेले जातीय / प्रांतिय उल्लेख कोणाला उच्च नीच लेखण्यासाठी नाहित तर केवळ एक विनोद म्हणून आहेत याची कृपया नोंद घ्यावी. माझ्या मनात सगळ्या जाती / प्रांतांबद्दल आदर आहेच. तरीही कोणाच्या भावना दुखविल्या जात असतील तर अ‍ॅडव्हान्समधे माफी मागतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
J
John McClain Wed, 07/06/2016 - 17:37 नवीन
दबंग दिल्ली ने निराशा केली... खूपच एकतर्फी सामना झाला (अल्मोस्ट) - fan of काशी
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Wed, 07/06/2016 - 20:04 नवीन
दिवस १२ वा : सामना क्र. २० : दबंग दिल्ली वि. जयपुर पिंक पँथर्स शाळेत असतांना दिल्ली पडली किंवा दिल्लीचे तख्त फोडले असे उल्लेख इतिहासाच्या पुस्तकात वारंवार येत असत. त्याचा शब्दशः अनुभव म्हणजे आजचा दिल्ली वि. जयपुरचा सामना. दबंग दिल्ली चे नाव डरपोक बिल्ली ठेवले तरी काही फरक पडू नये असा अपमानास्पद पराभव आज दिल्लीने पाहिला. तब्बल २५ गुणांनी पराभुत होणारा हा चारही मोसमातला कदाचित पहिलाच संघ असेल. पहिला सामना हरणे, जास्तीत जास्त गुणांनी सामना हरणे, अमक्या तमक्या संघाविरुद्ध सामना कधीच न जि़ंकू शकणे असे सगळे नकारात्मक विक्रम बहुधा दिल्लीच्याच नावे असावेत. काशिलींग आडके व मिराज शेख आज वैयक्तीकरित्या चांगले खेळले मात्र सांघिक खेळाच्या गुणवत्तेत आज ते फारच कमी पडले. सचिन शिंगाडे ने तर आज फारच चुका करुन प्रतिस्पर्ध्यांना काही मोफत गुण मिळवून दिले. आज जयपुरच्या राजेश नरवाल आणि कप्तान जसवीर सिंग ने उत्तम खेळी केलया. बाकी संघाने देखील त्यांना चांगली साथ दिली. आज अभिषेक बच्चन मैदानावर हजर असता तर त्याचा सलमान खान नक्कीच झाला असता. जयपुर पिंक पँथर्स (५१ गुण) वि. दबंग दिल्ली (२६ गुण) - जयपुर २५ गुणांनी विजयी. ================================================================== दिवस १२ वा : सामना क्र. २१ : तेलुगु टायटन्स वि. यु मुंबा कालच लिहिल्याप्रमाणे यु मुंबा ने सामन्याच्या शेवटपर्यंत रक्तदाब वाढवत वाढवत नेला आणि ५ गुणांनी पराभव स्वीकारला. तेलुगु टायटन्सचा राहुल चौधरी ने आणि बदली खेळाडू विक्रम साळुंखे ने उत्तम खेळी करत यु मुंबाला २ वेळा सर्व बाद केले. मुंबईचा बचाव आज अस्तित्त्वातच नव्हता असे म्हटले तरी चालेल. मात्र आज या मोसमात प्रथमच राकेश कुमार ने पुर्ण वेळ चढाया करुन १० गुणांची कमाई केली मात्र त्याची ही पुण्याई मुंबईची नौका तारु शकली नाही. रिशांक देवाडिगा, अनुप कुमार, सुरींदर भोला ने आज फारशी चमक दाखविली नाही. मात्र सुरेशु ने "करा किंवा मरा" चढायांमधे खरोखरीच कमाल केली. त्याच्या पहिल्या चढाईत जवळपास ४ खेळाडू बाद होते मात्र चुकीचा निर्णय दिला गेला आणि त्याला आव्हानही दिले गेले नाही. अनुपने शेवटच्या दोन चढाया लाजवाब केल्या मात्र "देर आये इसलिये दुरुस्ती नही हो पाई भाई" ! महत्त्वाची गोष्ट म्हणजे सामन्या दरम्यान एकंदरीत ५ वेळा बदली खेळाडू बोलाविले जाऊ शकतात. शेवटच्या वेळी चुकुन राहूल ला बाहेर पाठविले गेले तेव्हा तो अगदीच नाराज झाला होता. मात्र त्यामुळेच मुंबई अपमानास्पद पराभवापासून वाचली. मी अगोदरच्या प्रतिसादांमधे म्हटल्याप्रमाणे राकेश कुमार ला सुरुवातीपासूनच चढाई मोहिमेवर पाठवायला पाहिजे होते. त्याने आज आपली लायकी सिद्ध केली आहे. आणि तो लक बाय चान्स खेळणारा खेळाडू नव्हे तर खरोखरीच अष्टपैलू खेळाडू आहे. असो. यु मुंबा हारणार च होती हे माहित होते मात्र शेवटी जाता जाता दोन्ही संघांच्या गुणांमधली प्रचंड तफावत भरुन काढली हे ही नसे थोडके ! सामना हरणारा संघ आणि जिंकणारा संघ यांच्या गुणांमधे ७ किंवा कमी गुणांचा फरक असला तर हारणार्‍या संघास देखील १ गुण मिळतो. तेलुगु टायटन्स (३५ गुण )वि. (यु मुंबा ३० गुण) - तेलुगु टायटन्स ५ गुणांनी विजयी. विजेत्यांचे अभिनंदन ! भाकीत : यु मुंबा आणी दबंग दिल्ली पुढील होणारा अजून एक एक सामना पराभूत होतील असा अंदाज वाटतो. खोटा ठरला तर आनंदच होईल. लेटस वेट अँड वॉच ! शुभरात्री !
  • Log in or register to post comments
र
रघुनाथ.केरकर गुरुवार, 07/07/2016 - 07:15 नवीन
"बदली खेळाडू विक्रम साळुंखे ने उत्तम खेळी करत यु मुंबाला २ वेळा सर्व बाद केले" दुरुस्ती नीलेश साळुन्खे. एक गोष्ट नमुद करावीशी वाटते, पहीला सिजन बरेच सामने एकतर्फी झाले, अचानक दुसरा आणी पुढचे सगळे सीजन शेवटच्या मीनीटा पर्यन्त उत्कन्ठा वाढवणार्या ठरल्या. कालचाच प्रसन्ग हैदराबाद मुम्बई शिर्काण करत असताना अचानक राहुल चौधरी "चुकुन" राखीव होतो काय आणी मुम्बई ७ गुणान पेकशा कमी ने हरते काय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 07/07/2016 - 08:43 नवीन
सहमत ! नावातील दुरुस्तीबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रघुनाथ.केरकर
प
पी. के. गुरुवार, 07/07/2016 - 07:36 नवीन
यु मुंबा चा बचाव इतका खराब खळतोय की मी जरी चढाई केली तरी एखादा गुण किंवा कमीतकमी बोनस पॉईंट घेऊ शकतो इतका आत्मविश्वास आलाय मला.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 07/07/2016 - 18:51 नवीन
दिवस १३ वा : सामना क्र. २२ : पटणा पायरेटस वि. बंगळुरु बुल्स आजपासून पुढील काही सामने पटणा येथे खेळविण्यात येत आहेत. आजच्या सामन्यात पटणा पायरेटस अजिंक्य राहिले. बंगळुरु बुल्सच्या बचावफळी ने आज अक्षम्य चुका केल्या त्याचे फळ म्हणजे आजची हार. दुसर्‍या सत्रापर्यंत सामना दोन्ही बाजूस झुकत होता. मात्र आज पटणा पायरेटसच्या चढाईपटू आणी बचाव / पकडफळी ने उत्तम कामगिरी केली. पाटण्याच्या प्रदिप नरवाल ने सुंदर कामगिरी करत ८ गुणांची कमाई केली तर राजेश मोंडल ने ही त्याला उत्तम साथ दिली. कुलदीप ने नेत्रदिपक पकडी करत ७ गुणांची कमाई केली. आजचा सामना खर्‍या अर्थाने पकड फळीने गाजविला. दुसर्‍या सत्रात पायरेटसने उत्तम सुपर टॅकल्स केल्या. बंगळुरु बुल्सच्या रोहित कुमार ने त्याच्या दर्जाला साजेसा खेळ केला मात्र संघातील इतर खेळाडूंकडून म्हणावी अशी साथ मिळाली नाही. अपवाद फक्त पवन कुमारचा. त्यानेही आज चांगला खेळ केला. कबड्डीच्या प्रत्येक दिवशी एक नायक घडत असतो मात्र जो संघ एकजुटीने खेळतो तोच शेवटी विजयी ठरतो. पटणा पायरेटस (३१ गुण) वि. बंगळुरु बुल्स (२५ गुण) - पटणा पायरेटस ६ गुणांनी विजयी.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 07/08/2016 - 17:45 नवीन
मुंबई टीम जिंकली ब्वा. अनूपकुमारच्या राइड्स भारी झाल्या.आता पटना आणि बंगाल वारीयर्सचा सामना पाहतोय. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Fri, 07/08/2016 - 19:45 नवीन
अभिनंदन ! आज विजय साजरा करण्याची संधी अखेर तुम्हाला मिळाली तर :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा