प्रो कबड्डी - सिझन ४
प्रो कबड्डीचा ४ था मोसम आज २५ जुन २०१६ रोजी सुरु झाला. अती क्रिकेटचा कंटाळा आल्या नंतर मी दुसर्या खेळांचा दर्शक होण्याचा प्रयत्न करत होतो. फुटबॉल कडे मन आकर्षित होत होते आणि अचानक प्रो कबड्डीची सुरुवात झाली. साधारण दुसर्या सिझनपासून खेळातला रस वाढत गेला. मुंबईकर असल्यामुळे घरची टीम म्हणून 'यु मुंबा' चा नैसर्गीक समर्थक आणि नंतर चाहता बनलो. 'यु मुंबा' ने दुसर्या सिझनचे विजेतेपद पटकावल्यानंतर त्यांचा वाट्याला आलेले प्रेम वेगवेगळ्या ठिकाणी दिसून आले. ३ र्या सिझनच्या अंतिम फेरीतील निसटता पराभव मनाला काही काळापुरता टोचत राहिला.
या सगळ्या पार्शभुमीवर ४ था सिझन फार लवकर घोषीत झाला तेव्हा कबड्डीचे ही क्रिकेट होणार काय ही शंका मनाला चाटून गेली. काय होते ते पुढे कळेलच मात्र प्रो. कबड्डीमुळे कबड्डीला वलय लाभतेय व मातीतल्या रांगड्या खेळाडूंना चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत हे पाहून मनास आनंद देखील होत आहेत.
अनुप कुमार, राकेश कुमार, रिशांक देवाडिगा, मनजित चिल्लर, नरवाल आडनावबंधु, निलेश शिंदे, फजल अत्रांचली (इराण), जां कुं ली (कोरिया) (नाव लिहिण्यात चुकले असल्यास दुरुस्ती सुचवावी) आणि इतर खेळाडुंनी प्रेक्षकांना भरभरुन आनंद दिलाय.
या सिझनमधे यु मुंबाचे बरेच तगडे खेळाडू इतर संघांनी खरेदी केले आहेत. जवळपास ५०% संघ नवीन आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरु नये. या खेळात मिनिटामिनिटाला रंग बदलत असल्यामुळे शेवटपर्यंत रंगतदार लढती होत आहेत. त्यामुळे यावेळचे विजेते कोण असतील याचा अंदाज लावणे सद्यातरी अवघड आहे. यंदा पहिल्यांदाच महिला संघ देखील खेळत आहेत. माझ्या माहितीप्रमाणे केवळ दोनच संघ असून एकच सामना होईल. अधिक माहितीसाठी प्रो कबड्डीची अधिकृत वेबसाईट बघता येईल.
प्रो कबड्डी सिझन्सचे आत्तापर्यंतचे विजेते याप्रमाणे.
सिझन १ : जयपुर पिंक पँथर्स
सिझन २ : यु मुंबा
सिझन ३ : पटना पायरेटस
===================================================
प्रो कबड्डी सिझन ४ चे संघ खालीलप्रमाणे (कंसात माझ्या आवडत्या खेळाडूंची नावे)
१. बंगाल वॉरीयर्स (निलेश शिंदे /जां कुं ली / सुरजित नरवाल / विशाल माने / महेंद राजपूत)
२. बंगळूरु बुल्स ( मोहित चिल्लर / सुरिंदर नाडा)
३. दबंग दिल्ली ( काशिलींग आडके)
४. जयपुर पिंक पँथर्स ( शब्बीर बाप्पू / राजेश नरवाल / रण सिंग)
५. पटना पायरेटस ( फजल अत्रांचली / बाजीराव होडगे / प्रदिप नरवाल)
६. पुणेरी पलटण ( मनजित चिल्लर / अजय ठाकूर / दिपक निवास हुड्डा)
७. तेलुगु टायटन्स (संदिप नरवाल / राहुल Chaudhari)
७. यु मुंबा (अनुप कुमार / राकेश कुमार / रिशांक देवाडीगा / जीवा कुमार)
यंदा एकूण संघांमधला मराठी टक्का देखील लक्षणीय रित्या वाढलेला आहे.
सात संघ आणि जवळ जवळ ३५ दिवस हे सामने रंगणार आहेत.
तर चला, आपल्या मातीत जन्मलेल्या या खेळाचा आनंद घेऊ या आणि चर्चा करत राहूया.
==================================================
💬 प्रतिसाद
(147)
ध
धर्मराजमुटके
Sun, 07/24/2016 - 21:30
नवीन
दिवस २९ वा : सामना क्र. ५० : दबंग दिल्ली वि. बंगाल वॉरीयर्स
आजपासून ४ दिवस कबड्डीचे सामने दिल्लीमधे सुरु आहेत. आजचा हा ५० वा सामना तळाशी असलेल्या दोन संघांमधे होता. बंगाल अगोदरच स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे ते कसे खेळतील ? मुंबईला धुळ चारणारा हा संघ परत एकदा चमत्कार करेल का ? असे अनेक प्रश्न मनात ठेऊन सामना पाहायला सुरुवात केली. मात्र मुंबईला पराभूत करणारा बंगाल आज चक्क "तो मी नव्हेच" असे म्हणत एकदम ढिसाळ खेळला. दिल्लीने सुरुवातीपासूनच तगडी सुरुवात करत आपण अजुनही उपांत्य फेरीच्या स्पर्धेमधे आहोत हे दाखवून दिले.
बंगालचा कर्णधार निलेश शिंदे आजही मैदानावर उपस्थित नव्हता. मात्र त्याच्या अनुपस्थितीत बंगालची खेळी अतिशय पुचाट म्हणावी अशी झाली. चढाईपटू मोनु गोयत ने आज उत्तम खेळाचे प्रदर्शन केले. यांग कुन ली ने आज बर्यापैकी खेळ केला मात्र त्यांना पकडफळीतून म्हणावी अशी साथ मिळाली नाही. पकडफळीने आज एकदम खराब खेळ केला.
गुणफलक : चढाई - मोनु गोयत (चढाईत ८ गुण तर पकडींमधे ३ असे एकूण ११ गुण) यांग कुन ली (५ गुण), नितिन मदने - कर्णधार (१ गुण), बदली खेळाडू रवि दलाल (१ गुण).
पकडफळीत गिरिष एर्नाक ला फक्त १ गुण. यावरुन बंगालच्या पकडफळीची कामगिरी लक्षात यावी.
दिल्लीच्या काशिलिंग आडके ने आज घरचे मैदान गाजविले. त्याने चढाईत तब्बल १३ गुणांची कमाई केली. तर सेल्वामणी ने ७ गुण घेत त्याला तितकीच तोलामोलाची साथ दिली. मिराज शे़ख - २ गुण
पकडफळीमधे डी. सुरेश कुमार, सचिन शिंगाडे, प्रशांत चव्हाण यांनी प्रत्येकी ३ गुण तर अनिल कुमारने २ गुणांची कमाई केली.
बंगाल वॉरीयर्स आज चक्क ३ वेळा सर्वबाद झाली. मला वाटते या मोसमात ३ वेळा सर्वबाद होणारी बंगाल बहुधा पहिलाच संघ असावा.
प्रेक्षकांनी आज काशिला जणू डोक्यावर घेतले होते असा माहोल होता.
दबंग दिल्ली (४१ गुण) वि. बंगाल वॉरीयर्स (२० गुण) - दबंग दिल्ली तब्बल २१ गुणांनी विजयी.
आजचा बंगालचा खेळ बघून मी मनातल्या मनात एकच प्रश्न विचारला, "बाबांनो आज जर असेच खेळायचे होते तर मुंबईच्या वाटेत काटे का बरे पेरुन ठेवले ?"
============================================================
दिवस २९ वा : सामना क्र. ५१ : तेलुगु टायटन्स वि. जयपुर पिंक पँथर्स
अगोदरच उपांत्य फेरीत पोहोचलयामुळे जयपुर आजचा सामना जास्त मेहनत घेऊन खेळणार नव्हता हे उघड सत्य होते. पण मन म्हणत होते की त्यांनी तेलुगु टायटन्सला हरवावे म्हणजे मुंबईचा उपांत्य फेरीचा प्रवास थोडा तरी सुखकर होईल मात्र तसे घडले नाही.
प्रमु़ख खेळाडू जसविर सिंह व शब्बीर बापू आज आराम फर्मावत असतांना इतर खेळाडूंनी सुरुवातीला चांगली सुरुवात केली मात्र नंतर टायटन्सने त्यांचा बचाव भेदत सुंदर खेळ केला.
जयपुर तर्फे खेळतांना तुषार पाटीलने आज सर्वाधिक ७ गुण घेतले. त्यापाठोपाठ रण सिंह व महिपत नरवाल प्रत्येकी ३ गुण, राजेश नरवाल व अमित हुडा प्रत्येकी २ गुण अशी संघाची कामगिरी होती. बदली खेळाडू प्रदिप नरवाल व अमित नागर प्रत्येकी १ गुण, तर श्रीकांत तेवठिया यांनी २ गुण कमावले.
जयपुर आज चक्क २ वेळा सर्वबाद झाले. आज त्यांच्यात जिंकायचा जुनुन दिसतच नव्हता. मात्र तो दाखवयची त्यांना आवश्यकताही नव्हती हे ही तितकेच खरे !
टायटन्सकडून त्यांचा स्टार चढाईपटू राहूल चौधरी ने चढाईत ११ गुण, निलेश साळुंके ५ गुण तर पकडींमधे विनोद ३ गुण, जसमेर सिंह गुलीया २ गुण, संदिप धुल २ गुण तर सागर क्रिष्णा आणि संदिप नरवाल ने प्रत्येकी १ गुणांची कमाई केली.
एकंदरीत आजचे दोन्ही सामने जवळपास एकतर्फीच झाले असे म्हटले तरी चालेल.
तेलुगु टायटन्स (३५ गुण) वि. जयपुर पिंक पँथर्स (२३ गुण) - तेलुगु टायटन्स १२ गुणांनी विजयी.
उपांत्य फेरीत पोहोचणारा तेलुगु टायटन्स हा ३ रा संघ आहे.
============================================================
विजेत्यांचे अभिनंदन ! प्रतिसादकांचे आणि वाचकांचे आभार आणि शुभरात्री ! परत भेटूया !
- Log in or register to post comments
न
नया है वह
Mon, 07/25/2016 - 11:47
नवीन
पुणेरी पलटणला जास्त संधी
- Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके
Mon, 07/25/2016 - 19:08
नवीन
दिवस ३० वा : सामना क्र. ५२ : दबंग दिल्ली वि. पटणा पायरेटस
मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही या म्हणीचा प्रत्यय सध्या कबड्डीमधे बाहेर पडणारे संघ देत आहेत. आज अगदी असाच प्रत्यय पुन्हा एकदा आला. दबंग दिल्ली ने आज शेवटपर्यंत किल्ला लढविला मात्र शेवटच्या चढाईत पटणा ने काशिची धरपकड करत १ गुणांनी निसटता विजय मिळविला. मात्र पटणा सारख्या संघाला दिल्लीने विजयासाठी शेवटच्या क्षणापर्यंत झुंजविले ते जबरदस्तच होते. याच मोसमात पटणाला दिल्ली ने सर्वप्रथम पराभूत केले होते.
आज काशिलींग आडके आणि मिराज शेखने प्रत्येकी ११ गुण कमावले तर सेल्वामणी ने ३ गुण घेतले. पकडीमधे अनिल (३गुण), सचिन शिंगाडे (२ गुण), तर डी. सुरेश कुमार ला १ गुण मिळाला. प्रशांत चव्हाण ची पाटी आज कोरीच राहिली आणि तो जवळ ३ -४ वेळा प्रदिप नरवालकडून बाद झाला.
दुसर्या सत्राच्या सुरुवातीला दिल्ली सर्वबादवर आली होती मात्र एकटया मिराज शेख ने बाजीप्रभू च्या आवेशात जवळ जवळ ८-१० मिनिटे खिंड लढविली. खरोखरीच त्याचा आजच्या कर्तुत्वाला तोड नाही. यापुर्वी देखील जेव्हा जेव्हा दिल्ली सर्वबाद होण्याच्या जवळ पोहोचली आणि तेव्हा तेव्हा मिराज शेख ने एकहाती किल्ला लढविला आहे. हॅटस ऑफ टु मिराज शेख !!
पटण्याचा सुपर हिरो प्रदिप नरवाल ने आज चढाईत ९ गुण, राजेश मोंडल ७ गुण (६ चढाई + १ पकड) , अबुफजल १ गुण, कुलदीप १ गुण तर पकडींमधे फजल अत्राचली ४ गुण, अनिल कुमार २ गुण, विजिन थंगादुराई १ गुण तर बदली खेळाडू हादी १ गुण असा गुणफलक बघायला मिळाला.
पटणाच्या प्रदिप ला आज दिल्लीने बरेचदा बाहेर धाडले मात्र त्याच्या अनुपस्थितीत राजेश मोंडल ने किल्ला लढवत प्रतिस्पर्ध्यांना बाद करत प्रदिप ला पुन्हा पुन्हा जीवदान दिले. पटणा संघाच्या प्रदिप व राजेश या दोन्ही खेळाडूंनी या मोसमात सातत्य दाखविले आहे. या दोन्ही पैकी कोणी ना कोणी संघासाठी प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी करतच असतो. त्यामुळे या संघाला यंदाच्या मोसमात अंतीम विजयाच्या संधी जास्त आहेत असे मला वाटते.
आज पकडी व चढाई दोहोंमधे दिल्ली अव्व्ल राहिले मात्र एकदा सर्वबाद आणि बोनस गुणांच्या जोरावर पटणाने बाजी मारली आणि गुणतालीकेतील प्रथम स्थान पक्के केले.
या सामन्याची क्षणचित्र नक्कीच बघा असे सुचवेन.
दबंग दिल्ली (३१ गुण) वि. पटणा पायरेटस (३२ गुण) - पटणा पायरेटस १ गुणांनी विजयी.
=====================================================
महिला कबड्डी सामना : उपांत्य फेरी - फायर वर्डस वि. आईस दिवाज
आज उपांत्य फेरीची लढत फायर बर्डस वि. आईस दिवाज यांच्यात झाली. हा सामना संपुर्ण पाहू शकलो नाही. मात्र शेवटचे काही क्षण पाहता आले. अगोदरच्या सामन्यांप्रमाणे हा ही सामना जवळपास एकतर्फी होऊन फायर बर्डस जिंकले.
आईस दिवाज ची कप्तान अभिलाषा म्हात्रे ला आज आपले खाते उघडता आले नाही. सोनाली शिंगटेला चढाईत ३ गुण तर बदली खेळाडू सुमित्रा शर्माला सुपर रेड मधे एकदाच ३ गुण मिळाले.
पकडफळीत ललीताचा करिश्मा चालला नाही. खुशबू नरवालला ३ गुण तर मोनू २ आणि रक्षा नारकरला १ गुण मिळविता आला.
आईस दिवाज आज एक वेळा सर्वबाद झाले.
फायर बर्डस कडून चढाईत बदली खेळाडू के. रिंजू ( ४गुण), मारिया (२गुण) तर कप्तान ममता पुजारी ला १ गुण प्राप्त झाला.
पकड फळीत बदली खेळाडू गायत्री हिला ४ गुण तर पायल चौधरी ३ गुण ( पकड -२ गुण, चढाई १ गुण), सुवर्णा बारटक्के (२ गुण), रितु नेगी, मोनिका देवी व किशोरी शिंदे यांना प्रत्येकी १ गुण मिळविला.
एकंदरीत आजचा सामना बदली खेळाडूंनीच गाजवला.
आईस दिवाज ( १३ गुण ) वि. फायर बर्डस (२२ गुण) - फायर बर्डस ९ गुणांनी विजयी.
=============================================
महिला कबड्डीचा अंतिम सामना रविवार दि, ३१ जुलै २०१६ रोजी हैदराबाद येथे फायर बर्डस आणि स्टॉर्म क्वीन्स यांच्यात होईल.
उद्या परत भेटूया तोपर्यंत शुभरात्री !
विजेत्यांचे अभिनंदन !!
- Log in or register to post comments
र
रघुनाथ.केरकर
Tue, 07/26/2016 - 07:59
नवीन
एकंदरच ही लिग सगळ्या खेळाडुंसाठी चांगली संधी ठरली आहे, जागतीक पातळीवर स्पर्धांमध्ये इराण हा आपल्या संघाचा कडवा प्रतीस्पर्धीं. विश्वचषकात २वेळा अन्तीम लढत भारत वी. ईराण सामने झाले आणी दोन्ही वेळा भारत वीजयी झाला, २००४ चा वडाळ्याला झालेल्या सामन्याला मी हजर होतो. पंचवीसेक गुणानी भारताने इराण ला हरवलं होतं.
सध्याचा इराण्च्या खेळाडुंचा खेळ बघता भवीष्यात इराण आपल्याला भारी पडु शकतो.
- Log in or register to post comments
प
पी. के.
Tue, 07/26/2016 - 11:20
नवीन
सहमत
- Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके
Tue, 07/26/2016 - 20:28
नवीन
तुमच्या मताशी सहमत. फजल अत्राचली, अबोफजल आणि विशेषकरुन मिराज शेख चा यंदाच्या मोसमातला खेळ पाहून मला इराणी खेळाडूंचे फारच कौतुक वाटत आहे. तसेच कौतुक यान कुंग ली चे देखील ! परक्या भुमीतला खेळ यांनी केवळ आत्मसातच केला नाहि तर त्यात विशेष प्राविण्य देखील मिळविले आहे.
मी जर यु मुंबाचा मालक असतो तर मिराज ला हवे त्या बोलीवर संघात घेतले असते :)
तुमचे प्रतिसाद वाचून मला भारत वि. इराण कबड्डी सामन्यांची रेकॉर्डींग बघाविशी वाटू लागले आहे. बघायला पाहिजे कोठे मिळतात काय ते.
- Log in or register to post comments
र
राहुल मराठे
Mon, 08/01/2016 - 15:54
नवीन
https://www.youtube.com/watch?v=pRonUjqvShA
- Log in or register to post comments
प
पी. के.
Tue, 07/26/2016 - 11:26
नवीन
धर्मराज साहेब तुमचे बरं हाय तुम्हाला सर्व सामने पाहता येतात.
आम्हाला नऊ नंतर काहे दिया परदेस आणि चाल हवा येऊ ध्य बगाव लागत.
- Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके
Tue, 07/26/2016 - 20:23
नवीन
होय ! या बाबतीत मी खरोखरीच सुदैवी आहे. मंडळी दुसर्या दिवशी ह्या मालिका युट्यूबवर बघतात आणि कधीही रिमोट हातात न देणारा मुलगा अगदी कार्टून्स सोडून देखील माझ्या हातात रिमोट देतो. अशा क्षणी तरी मी स्वत:ला नक्कीच भाग्यवान समजतो.
तसे आमच्या घरात सर्वच कबड्डीचे चाहते आहेत त्यामुळे जास्त प्रश्न निर्माण होत नाहित :)
- Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके
Tue, 07/26/2016 - 20:20
नवीन
दिवस ३१ वा : सामना क्र. ५३ : पटणा पायरेटस वि. तेलुगु टायटन्स
आजचा हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय कमी महत्त्वाचा होता. त्यामुळे मैदानात राखीव / बदली खेळाडूच उतरणार याचा अंदाज होताच. पटणाने एखाद दुसरा खेळाडू वगळता जवळपास सर्वच राखीव खेळाडू उतरविले होते. मात्र तेलुगु टायटन्सने हा ही सामना गंभीरपणे घेत संघात फार थोडे बदल केले.
अखेर अनुभवी संघ नवोदितांना भारी पडला आणि तेलुगु टायटन्सने २१ गुणांच्या प्रचंड फरकाने जिंकला.
पटणातर्फे आज प्रदिप नरवाल, सुनील कुमार आणि महेश गौड आज बदली खेळाडू म्हणून खेळले. त्यांनी अनुक्रमे २, १ आणि ३ गुणांची कमाई केली.
पटणाचा इराणी खेळाडू अबोफजल ने आज स्वतःला सिद्ध करत चढाईत ९ गुणांची कमाई केली. तर आजच्या संघाचा कप्तान हादी याने १ गुण घेतला.
पकडफळीमधे केवळ इराणच्या फजल अत्राचलीने ८ गुण मिळविले. इतरांच्या नावासमोर एकही गुण लागला नाही.
टायटन्सतर्फे स्टार खेळाडू राहुल चौधरी ने चढाईत ११ आणि पकडींत २ अशा १३ गुणांची मिळकत केली. तर बदली खेळाडू अतुल ने ७ गुण, सुकेश हेगडे ३ गुण आणि प्रपंचन ने १ गुण घेतला.
पकडफळीत संदिप नरवाल ने ६ गुण, विशाल भारद्वाज ने चढाईत १ आणि पकडींमधे ४ गुण, रुपेश तोमर ने ३ गुण असा धावफलक होता.
पटणा पायरेटस (२५ गुण) वि. तेलुगु टायटन्स (४६ गुण) - टायटन्स २१ गुणांनी विजयी.
पटणाचा आजचा धावफलक हा या मोसमातला सर्वोच्च धावफलक होता.
====================================================================
दिवस ३१ वा : सामना क्र. ५४ : दबंग दिल्ली वि. पुणेरी पलटण
आजही दिल्लीने पुण्याला शेवटपर्यंत कडवी लढत दिली. मात्र शेवटी पुण्याने हा सामना जिंकला.
मनजित चिल्लर आज फक्त मैदानात होता व त्याने फक्त १ च चढाई केली. मात्र त्याची उपस्थिती संघाचे मनोबळ वाढविते याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला.
पुण्याच्या दिपक निवास हुड्डा ने आज चढाईत चक्क १७ गुणांची कमाई केली तर नितिन तोमर ने ६ गुण कमाविले. अजय ठाकूर ला आज केवळ १ गुणावर समाधान मानावे लागले.
पकडफळीत रवींदर पहल ३ गुण तर मनजित चिल्लर आणि जोगींदर नरवाल प्रत्येकी १ गुण.
दिल्लीकडून काशिलिंग आडके ने चढाईत ८ आणि पकडींमधे २ असे १० गुण घेतले तर मिराज शेखला ४ गुणांची कमाई झाली. बदली खेळाडू प्रशांत कुमार राय आणि उमेश म्हात्रे अनुक्रमे ४ आणि २ गुण. सेल्वामणी केवळ १ गुण.
पकडफळीत अनिल कुमार ४, प्रशांत चव्हाण आणि डि. सुरेश प्रत्येकी १ गुण. सचिन शिंगाडे ला आज खाते उघडता आले नाही.
एकंदरीत दिल्लीचा बचाव आज दिपक हुड्डासमोर कोसळून पडला. मात्र सर्वबादच्या स्थितीत आले असतांनाही एकट्या मिराज शेखने जवळपास ५-७ मिनिटे किल्ला लढवत ऑल आऊट रोखून धरला. मिराज खरोखरीच एक जबरदस्त खेळाडू आहे. संकटकाळात तो नेहमीच खंबीरपणे उभा राहिला आहे.
आजच्या पराभवामुळे दिल्ली स्पर्धेतून बाहेर फेकली गेली तर पुण्याचे आव्हान अजुन टिकून आहे. मात्र हरणारी दिल्ली उद्या मुंबईचे आव्हान कायम राहू देते किंवा कसे ते उद्याच कळेल. मात्र दिल्लीने गेल्या तीन दिवसांत जो खेळ दाखविला तो अगोदरपासूनच दाखविला असता तर कदाचित वेगळे निकाल पाहायला मिळाले असते.
मात्र हे बोलणे म्हणजे आत्याबाईला मिशा असत्या तर ह्या प्रकारातलेच आहे त्यामुळे असो !
दबंग दिल्ली (३४ गुण) वि. पुणेरी पलटण (३९ गुण) - पुणे ५ गुणांनी विजयी.
======================================================
विजेत्यांचे अभिनंदन !!
उद्या पुन्हा भेटूया. शुभरात्री !
- Log in or register to post comments
र
रघुनाथ.केरकर
Wed, 07/27/2016 - 08:23
नवीन
कालच्या दिल्ली वी पुणे च्या सामन्यात लक्षात रहाण्या सारख्या दोन गोष्टी होत्या
१. कसं खे़ळु नये याचं छान उदाहरण काशी ने दीलं. (डु ऑर डाय चढाई वर बोनस कन्फर्म न करता पट्ठ्या लगेच
माघारी परतायचा. ३ च्या कवर मध्ये पण भाई सपोर्ट ला आला नाही.)
२. दुसरी म्हणजे दुसर्या हाफ च्या १० व्या मिनीटाला मिराज ने मारलेली रेड, अप्रतीम, पुण्याची ७ ची कवर उभी होती, राइट कॉर्नर ला जोगींदर नर्वाल तर लेफ्ट कॉर्नर ला रवींदर पहल, दोन्हि खतरनाक, मीराज ने राईट ला एक अटेंपट करुन लेफ्ट कॉर्नर च्या हाता खालच्या नितिन तोमर ला धावता हात मारायल जात होता, तेवढयात पहल बाहेर आला आणी त्याने वाकुन मिराज चे पाय ब्लॉक करायचा प्रयत्न केला, इथवर बघ्णार्याला वाटलं होतं की मीराज ब्लोक झाला, पण सेकंदाच्या १०० व्या हिस्स्याला मीराज ने हनुमान उडी घेत रवींदर पहल ला ओलंडले आणी लॉबीत पोहोचला आणी मध्य रेषा ट्च केली. ज्या पदधतीने मिराज खेळ्तोय ते बघुन वाटत की तो खुप पुढे जाइल.
- Log in or register to post comments
स
साधा मुलगा
Wed, 07/27/2016 - 18:24
नवीन
कालचा सामना बघायला मिळाला. काशी आणि दिल्लीच्या संघाचे वाईट वाटले.
@ धर्मराजमुटके साहेब रोज न चुकता तुम्ही update देत असता. कमाल आहे तुमची ! जियो !
- Log in or register to post comments
ए
एस
Wed, 07/27/2016 - 19:01
नवीन
पुणेरी पलटण उपांत्य फेरीत पोहोचली. थँक्स टू यू मुम्बा.
- Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके
Wed, 07/27/2016 - 21:02
नवीन
दिवस ३१ वा : सामना क्र. ५५ : बंगळुरु बुल्स वि. पुणेरी पलटण
आजचा हा सामना पुण्यासाठी अतिशय महत्त्वाचा होता. आजच्या सामन्यातील हार-जीतच पुण्याचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित करणार होती. अखेर मनजित चिल्लर च्या संघाने जिगरबाज खेळी करत सामना जिंकला आणी उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला.
पुण्याच्या दिपक निवास हुड्डाने पहिली यशस्वी चढाई करुन लढाईस तोंड फोडले. त्याच्या पहिल्याच चढाईत बुल्सचा महत्त्वाचा मोहरा मोहित चिल्लर गारद झाला. मात्र लगेच दुसर्याच चढाईत बुल्सच्या रोहित कुमार ने पुण्याचा खेळाडू बाद करत मोहित ला मैदानात आत आणले. नंतर बंगळुरु ने सलग चांगला खेळ करत पुण्यावर आघाडी घेतली. पहिल्या सत्राअखेरीस पुण्याचे १२ गुण होते तर बंगळुरु बुल्सचे २१. बुल्स ९ गुणांनी आघाडीवर होती.
मात्र दुसर्या सत्राच्या सुरुवातीपासूनच मनजित चिल्लर ने डावा कोपरा पकडत जबरदस्त पकडी करत बंगळुरुची आघाडी नष्ट करत स्वतः आघाडी घेतली. सामन्याच्या शेवटच्या ४ मिनिटांपर्यंत दोन्ही संघांनी समसमान खेळ केला. मात्र शेवटच्या चार मिनिटात पुण्याने आपला अनुभव पणाला लावत सामना जिंकला.
बंगळुरुच्या रोहित कुमारने आज चढाईत ९ गुण घेतले मात्र त्याच्या खेळात नेहमीचा जोश, तडफ आढळून आली नाही. एकतर तो फार दमलेला असावा किंवा उपांत्य फेरीत पोहोचू न शकल्यामुळे मनोधैर्य खच्ची झाले म्हणा, पण आजचा रोहित निस्तेज दिसत होता.
बदली खेळाडू योगेश हुड्डा ने आज देखील तडफदार खेळ करत ३ गुण घेतले. तर बदली खेळाडू सुमित सिंह ने अगदी मोक्याच्या क्षणांमधे चांगली कामगिरी करीत चढाई व पकडींमधे प्रत्येकी दोन असे एकूण ४ गुण कमाविले. आशिष कुमार सांगवान चढाई व पकडी यांमधे प्रत्येकी १ असे एकूण २ गुण.
पकडींमधे मोहित चिल्लर ६ गुण व चढाईत २ गुण असे एकूण ८ गुण, सुरींदर नाडा ४ गुण,
पुणेरी पलटनचा दिपक हुड्डा नेहमीप्रमाणे यशस्वी ठरला. त्याने चढाईत ९ गुण घेतले तर नितिन तोमरने ५ आणि अजय ठाकूरने ३ गुणांची कमाई केली.
पकडफळीत आज मनजित चिललर ने जबरदस्त कामगिरी करत चक्क ११ गुणांची लयलुट केली. मला वाटते की पकडफळीत एवढे जास्त गुण घेण्याचा विक्रम बहुधा त्याचा नावे असावा. जोगींदर नरवाल १ गुण. केवळ मनजितच्या उपस्थितीने पुण्याची मानसिक अवस्था जेत्याची बनून जाते हे आज पुन्हा एकदा पाहावयास मिळाले.
बंगळुरु बुल्स (३३ गुण) वि. पुणेरी पलटण (३६ गुण) - पुणेरी पलटण ३ गुणांनी विजयी
======================================================
दिवस ३१ वा : सामना क्र. ५६ : यु मुंबा वि. दबंग दिल्ली
पुणे जिंकले तेव्हाच मुंबई बाहेर पडणार हे नक्की झाले होते. आज चक्क मुंबई उपांत्य फेरीत जाणार की नाही हे पुण्याच्या हारण्या जिंकण्यावर अवलंबून होते. मात्र "जो दुसर्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला" या उक्तीचा प्रत्यय मुंबईला आला.
सामन्याच्या सुरुवातच काशीने चढाईत मुंबईचा गडी बाद करुन केली. सुरुवातीच्या सत्रात ११ व्या मिनिटालाच दिल्लीने मुंबईला सर्वबाद करत त्यांच्यावर आणि मुंबईच्या पाठीराख्यांवर जबरदस्त दडपण आणले. तेव्हा मुंबई होती ६ गुणांवर आणि दिल्लीचे गुण होते १२. चक्क ६ गुणांची आघाडी. दुसर्या सत्रात मात्र मुंबईच्या खेळाडूंनी जोरदार पुनरागमन करत दिल्लीवर आघाडी घेतली आणि त्यांना २ वेळेस सर्वबाद केले. मिराज शेख पहिल्या सत्रात बाहेरच होता मात्र दुसर्या सत्रात तो मैदानावर बदली म्हणून आला मात्र आज त्याला करीश्मा दाखविता आला नाही.
दिल्लीच्या काशिलिंग आडके ने आज चढाईत ७ गुण (चढाईत ६ तर पकडीत १ गुण) घेतले तर प्रशांत कुमार राय ने १० गुणांची कमाई केली. दिपक नरवाल ला २ गुण आणि उमेश म्हात्रे ला ३ गुण (चढाईत १ तर पकडीत २ गुण) मिळाले.
पकडफळीत डी. सुरेश कुमार ३ गुण, सचिन शिंगाडे २ गुण.
मुंबईच्या वतीने रिशांक देवाडिगा ने चढाईत १० गुण, अनुप कुमार ८ गुण (चढाईत ६ तर पकडीत २ गुण), राकेश कुमार ५ गुण (चढाईत ४ गुण तर पकडीत १ गुण)
पकडफळीत जीवा कुमार ३ गुण, सुरजित २ गुण, सुरींदर सिंह १ गुण, तर बदली खेळाडू सुरेशु कुमार ३ गुण (१ चढाई गुण + २ पकडफळीतील गुण).
एकंदरीत दुसर्या सत्रात मुंबाचा सर्वांगसुंदर खेळ बघायला मिळाला. रिशांक जाता जाता फॉर्मात आला तर !
यु मुंबा (३८ गुण) वि. दबंग दिल्ली (३४ गुण) - यु मुंबा ४ गुणांनी विजयी.
========================================================
या मोसमातल्या साखळीतील हा शेवटचा सामना. आता केवळ २ उपांत्य आणि शेवटी अंतिम सामना असे ३ सामने व्हायचे बाकी आहेत. ३१ जुलै २०१६ रोजी अंतीम सामना होऊन चौथ्या मोसमातील प्रो कबड्डी स्पर्धेचे सुप वाजेल.
मुंबई ४ गुणांनी जिंकली मात्र हे गुण त्यांना उपांत्यफेरीत पोहोचवू शकले नाहीत.
गुणतालीकेत पुणे व मुंबई दोन्हींचे अंतिम विजयी गुण ४२ होते मात्र एकंदरीत सर्व सामन्यातील एकूण गुणांतील फरकाच्या जोरावर पुण्याने आपला प्रवेश निश्चित केला.
सामन्यांच्या शेवटी झालेल्या मुलाखतीत मनजित चिल्लर ने मुंबईच्या उपांत्य फेरीत नसल्याचे दु:ख व्यक्त केले तर अनुप कुमार ने अंतिम फेरी पुणेरी पलटण वि. तेलुगु टायटन्स मधे होईल असा अंदाज वर्तविला.
उपांत्य फेरीचे सामने याप्रमाणे
सामना क्र. १ - पटणा पायरेटस वि. पुणेरी पलटण - दि. २९ जुलै २०१६, रात्री ८.०० वा. हैदराबाद येथे.
सामना क्र. २ - जयपुर पिंक पँथर्स वि. तेलुगु टायटन्स - दि. २९ जुलै २०१६, रात्री ९.०० वा. हैदराबाद येथे.
अंतिम फेरीची लढत रविवार दि. ३१ जुलै २०१६, रात्री ७.०० वाजता हैदराबाद येथे.
महिला कबड्डी अंतिम फेरीची लढत - ३१ जुलै २०१६, रात्री ८.०० वाजता हैदराबाद येथे.- स्टॉर्म क्वीन्स वि. फायर बर्डस.
===============================================================
मुंबई बाहेर गेलयामुळे आता पाठींबा पुण्याला. जिंकणारा संघ महाराष्ट्राचा असावा असा उदार ( कि उधार ? ) विचार !!
मात्र माझ्या अंदाजाप्रमाणे अंतिम लढत जयपुर वि. पटणा मधे होऊ शकते.
बघू या काय होते ते.
ज्यांना पुर्ण महिनाभर सामने बघता आले नाही त्यांना विनंती की शेवटचे दोन दिवस तरी वेळात वेळ काढून सामने बघा. तुम्ही नक्कीच कबड्डीच्या प्रेमात पडाल !
विजेत्यांचे अभिनंदन !
उद्या लेखणीला आराम ! परत भेटूया २९ जुलै २०१६ ला.
शुभरात्री !!
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 07/28/2016 - 07:48
नवीन
पुणे जिंकले आणि आमचा मूड गलपटला. तरीही आमच्या मुंबाचा सामना पाहिला. जिंकूनही बी हरलो. मूड गेला माझा.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
क
कबीरा
गुरुवार, 07/28/2016 - 04:51
नवीन
मनजीत चिल्लर नि कमाल केली. अगदी मोक्याचा क्षणी खेळ उंचावला. मागच्या वर्षी सारखेच ह्या वर्षी पण नेमके पाटणा पायरेट्स पुण्याचा समोर उभे राहणार उपांत्य सामन्यात. बघूया काय होत ते. पण ह्या वर्षी माझ्या मते खरी मजा आणली ती मिराज शेख नी. वाघासारखा लढला गडी.
- Log in or register to post comments
स
साहेब..
गुरुवार, 07/28/2016 - 13:28
नवीन
सगळे सामने पहिले. मज्जा आली.
पुणेरी पलटण सगळ्या हरलेल्या सामन्यात एक एक गुण मिळवत गेले ज्याचा त्यांना शेवटी फायदा झाला.
यु मुंबा एक सामना जास्त जिंकूनही गुणतालिकेत 5व्या स्थानावर राहिले.
माझा पाठींबा पुण्यालाच होता पहिल्यापासून आणि पुणे जिंकावं अशी इच्छा आहे.
यु मुंबाकडे सरप्राईझ एलिमेंट नव्हता. एकही नवीन प्लेअर नव्हता. त्याचा त्यानां फटका बसला.
तेलगू टायटनसकडून निलेश साळुंखे, संदीप धूल, जयपूरकडून अमित हुडा, दबंग दिल्लीकडून मिराझ शेख, उमेश म्हात्रे, पाटणा पायरेट्सचा पूर्ण संघ, पुणेरी पलटणकडून दीपक हुडा, यु मुंबाकडून सुरजीत सिंग, बेंगळुरू बुल्सकडून रोहित कुमार, बंगाल वॉरियर्सकडून जान कुंग ली यांचा खेळ पाहण्यासारखा होता.
- Log in or register to post comments
म
मी-सौरभ
Fri, 07/29/2016 - 07:03
नवीन
जे लोक हे सामने नियमित बघतात त्यांना या सीझन चा सर्वोत्तम ७ चा संघ निवडुन टाकायला संगुया का??
मजा येइल
- Log in or register to post comments
न
नया है वह
Fri, 07/29/2016 - 07:52
नवीन
मनजित चिललर (कप्तान)
प्रदिप नरवाल (रेडर)
रोहित कुमार (रेडर)
राकेश कुमार (अष्ट्पैलु)
मिराझ शेख (अष्ट्पैलु)
अमित हुडा (बचावपटु)
फजल अत्रांचली (बचावपटु)
बदली खेळाडु
काशिलींग आडके (रेडर)
राजेश मंडल (रेडर)
संदीप नरवाल (बचावपटु)
दीपक हुडा (बचावपटु)
- Log in or register to post comments
र
रघुनाथ.केरकर
Fri, 07/29/2016 - 08:35
नवीन
अख्खी च्य अख्खी तेलुगु टाईटन्स ची टीम
- Log in or register to post comments
म
मी-सौरभ
Mon, 08/01/2016 - 13:04
नवीन
अनुप कुमार (रेडर-कप्तान)
प्रदिप नरवाल (रेडर)
रोहित कुमार (रेडर)
मनजित चिललर (अष्ट्पैलु)
मिराझ शेख (अष्ट्पैलु)
संदीप नरवाल (बचावपटु)
फजल अत्रांचली (बचावपटु)
बदली खेळाडु
काशिलींग आडके (रेडर)
अमित हुडा (बचावपटु)
राजेश मंडल (रेडर)
दीपक हुडा (अष्ट्पैलु)
धर्मराज उर्फ अन्ना (बचावपटु)
- Log in or register to post comments
क
कबीरा
Fri, 07/29/2016 - 08:16
नवीन
अनूप कुमार (कप्तान)
रोहित कुमार (रेडर)
राहुल चौधरी (रेडर)
संदीप नरवाल (बचावपटू)
मिराज शेख (अष्टपैलू)
रविंदर पहल (बचावपटू)
बाजीराव होडगे (बचावपटू)
बदली खेळाडू
दीपक निवास हुडा
जसवीर सिंग
फजल अत्रांचली
राकेश कुमार
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 07/29/2016 - 11:06
नवीन
रविंदर पहल (बचावपटू) भंगार आहे त्यपेक्षा मोहित चिल्लर किंवा निलेश शिण्दे चांगले आहेत
- Log in or register to post comments
न
नाखु
Fri, 07/29/2016 - 12:34
नवीन
तोही जबरा आहे
- Log in or register to post comments
र
रघुनाथ.केरकर
Fri, 07/29/2016 - 13:13
नवीन
ह गडी यु मुंबा मध्ये असताना जीवा कुमार च्या साथीने जबराट टर्न लावायचा, या जोडिच्या जिवावर यु मुम्बा ने कैक सामने जींकले. आता जीवा - शिवाची जोडी फुटली. आता ना जीवा चा टर्न लागतो ना विशाल चा लागतो.
भारतमाता थेटराच्या मागे रामदुत चाळीत रहाणारा हा मध्यमवर्गातला मुलगा, खेळाच्या कौशल्यावर आधी मुंबै च्या कबड्डी संघात मग BPCL मध्ये दाखल झाला.
असे अनेक गुणी खेळाडु मुंबई ठाण्यात आहे, जे आता प्रो कबड्डी लिग मुळे लोकांच्या नजरेत येतात.
- Log in or register to post comments
र
रघुनाथ.केरकर
Fri, 07/29/2016 - 13:16
नवीन
असं नका म्हणु साहेब, ह्या सिजन ला त्याचा कॉर्नर लागला नाही, नाही तर पठ्ठ्या हुकमी चवडा काढतो.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 07/29/2016 - 13:21
नवीन
मागच्या सिझनला दिल्ली कडून खेळताना सुद्धा प्रॉब्लेम होता .
असो ! नव्या दमाच्या खेळांडूसमोर जुने कमी पडत आहेत असा दिसत आहे उदा: वजीर सिंग , रविंदर , राकेश कुमार यांच्व्ह्या पेक्षा रोहित कुमार , दीपक हुडा यांचा खेळ प्रभावी आणि वेगवान वाटत आहे
- Log in or register to post comments
र
रघुनाथ.केरकर
Fri, 07/29/2016 - 13:44
नवीन
मागच्या सिजन ला पहल ने चांगली काम्गीरी केली होती, त्याला इतर खेळाडुंची हवी तशी साथ लाभली नाही.
- Log in or register to post comments
श
शि बि आय
Fri, 07/29/2016 - 14:27
नवीन
प्रत्यक्षात सामने बघता नाही आले तरी इथे हजेरी लावल्यावर सगळ्या घडामोडी समजतात.
- Log in or register to post comments
श
शिद
Fri, 07/29/2016 - 17:42
नवीन
पुणेरी पलटन (३३) ला नमवून पटणा पायरेट (३७) फायनल मध्ये.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 07/29/2016 - 17:49
नवीन
मनजीतची टीम शेवटच्या पाच मिनिटात बाहेर झाली. पुनेरी पलटनच्या शेवटच्या रेड भारी झाल्या. चांगला म्याच बघायला मिळाला.
आता तेलगू आणि जयपुरचा सामना आहे, मला तेलगू जिंकतील असं वाटतं... बघूया थोड्या वेळात निकाल आहेच.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 07/29/2016 - 18:55
नवीन
अंतिम सामना बघू रविवारी. माझी टीम आता पटना :)
शूरा.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
श
शिद
Fri, 07/29/2016 - 19:30
नवीन
जयपुर पिंक पँथर्सने (३४) तेलगू टायटन्सला (२४) चांगलाच धोबीपछाड देवून फायनलमध्ये प्रवेश केला.
मुटकेसाहेबांच्या विश्लेषणाच्या प्रतिक्षेत. :)
- Log in or register to post comments
म
मोग्याम्बो
Fri, 07/29/2016 - 19:07
नवीन
पुण्याची नेहमीची बोंब, ऑल आऊट करता येत नाही. आजही तीच गत झाली. पटना चे 3 गडी असताना सगळी टीम परत आणून दिली.
- Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके
Fri, 07/29/2016 - 20:43
नवीन
दिवस ३२ वा : उपांत्य फेरी सामना क्र. १ : पुणेरी पलटण वि. पटणा पायरेटस
सलग ३१ दिवस चाललेल्या कबड्डी पारायणात कालचा दिवस आराम केला.
मुंबई अगोदरच बाहेर गेल्यामुळे आज मोकळ्या आणि तणाव विरहीत मनाने दोन्ही सामने बघता येणार होते. आजच्या पहिल्या उपांत्य सामन्याची उत्कंठा सकाळपासूनच लागली होती. त्यासाठी आजची संध्याकाळ मोकळीच ठेवली होती. मी घरात पाऊल ठेवायच्या अगोदरच चिरंजीवांनी टिव्ही सुरु करुन परवाच्या सामन्याच्या क्षणचित्रांचे आवर्तन चालू करुन माहौल तयार करुनच ठेवला होता.
पुण्याच्या नितिन तोमरने पहिल्याच 'जिंका किंवा मरा' चढाईत ( डु ऑर डाय रेड) बोनस गुण मिळवून पुण्याचे खाते उघडले. मात्र त्यानंर लगेचच पटण्याच्या राजेश मोंडल ने देखील पटणाचा गुणतक्ता हलविण्यास सुरुवात केली. नंतरच्या काही अयशस्वी चढायांनंतर दिपक निवास हुड्डा ने पटण्याच्या प्रदिप नरवाल ला बाहेर पाठवले. पहिल्या सत्राच्या सुरुवातीला सरस असणारी पुणेरी पलटण पहिल्या सत्राच्या अखेर ३ गुणांनी मागे पडली. दुसर्या सत्राच्या प्रारंभाला पुण्याने आपली पिछाडी हळुहळू भरत काढून दोन्ही संघ बरोबरीत आले.
दोन्ही संघ एक एक वेळेस सर्वबाद झाले. मात्र शेवटच्या ५ मिनिटांत बाजी पलटली व पटण्याच्या राजेश मोंडल, प्रदिप नरवाल ने सुरेख खेळ करत आपले अंतिम सामन्यातील स्थान निश्चीत केले.
पुण्याचा दिपक निवास हुड्डा ने आज देखील नेहमीप्रमाणे चांगली कामगिरी करत चढाईत ९ गुण घेतले. नितिन तोमर आणि प्रमोद नरवाल प्रत्येकी ३ गुण. आज अजय ठाकूर चालला नाही. बदली खेळाडू सोनू नरवाल ने २ गुणांची कमाई केली.
कप्तान मनजित चिल्लर ने पकडींमधे ७ गुण घेतले तर सोमविर शेखर आणि जोगिंदर नरवाल ने अनुक्रमे ३ आणि २ गुणांची कमाई केली. मात्र मनजितची आणि दिपक ची मेहनत पुण्याला तारु शकली नाही. मनजित यावेळी दुखापतग्रस्त असल्यामुळे चढाया करु शकला नाही. कदाचित त्याने चढाया देखील केल्या असत्या तर चित्र पालटले असते.
पटणाचा स्टार प्रदिप नरवालला आज पहिल्या सत्रात पुण्याने शत्रुघ्न सिन्हाचा 'खामोश" डायलॉग ऐकून गप्प बसविले होते मात्र दुसर्या सत्रात प्रदिप ने शॉटगन शत्रुघ्न बनत सव्याज परतफेड केली. संपुर्ण सामन्यादरम्यान राजेश मोंडल ने संयमी व सातत्यपुर्ण खेळ केला. संपुर्ण मोसमात प्रदिप चमचमता तारा बनून वावरला मात्र राजेशचा खेळ म्हणजे चंद्राची शीतलता होती. प्रदिप ने ससा बनून भराभर आणि भाराभर गुण कमावले पण राजेश ने कासवाच्या गतीने का होईना पण शेवटपर्यंत जिद्दीने खेळ केला. यावेळेस ससा आणि कासव दोघे एकाच संघात होते एवढाच काय तो फरक !
पटणाचा वतीने प्रदिप नरवाल चढाईत ८ आणि पकडींमधे २ असे एकूण १० गुण, राजेश मोंडल ६ गुण, सुरजित सिंह ५ गुण तर बदली खेळाडू अबोफजल १ गुण.
पकडींमधे कुलदीप ५ गुण, फजल अत्राचली ३ गुण, तर बदली खेळाडू हादीने ४ गुण घेतले. सामन्याच्या पहिल्या सत्रात हादीने नेत्रदिपक पकडी केल्या.
पुणेरी पलटण ३३ गुण वि. पटणा पायरेटस ३७ गुण - पटणा पायरेटस ४ गुणांनी विजयी.
==================================================================
दिवस ३२ वा : उपांत्य फेरी सामना क्र. २ : तेलुगु टायटन्स वि. जयपुर पिंक पँथर्स
पहिल्या सामन्याचा प्रभाव मनावर पडतो न पडतो, त्या खेळातील डावपेचांवर मनातल्या मनात रवंथ करतो न करतो तोच दुसरा सामना सुरु झाला. सुरुवातीची काही मिनिटे बरोबरीत, जिंकू किंवा मरु डावांवर चालणारा सामना साधारण १० व्या मिनिटानंतर रंगतदार बनत गेला व त्यानंतर तो इतका रंगला कि पहिल्या सामन्याच्या स्मृती लगेचच धुसर झाल्या. मला पहिल्या सामन्याचे वार्तांकन लिहिणे आज फारच अवघड गेले इतकी मोहिनी दुसर्या सामन्याने घातली. बरं मी काही आकडेपटू नाही की केवळ आकड्यांकडेच लक्ष देऊ शकेन. सामन्यांतला थरार अनुभवणे सगळ्यात महत्वाचे. असो.
आज सुरुवातीच्या काही खेळीनंतर तेलुगु टायटन्स ३-४ च्या फरकाने पुढे होते. आज पहिल्या सत्रात जयपुरचा राजेश नरवालला चढायांमधे अजिबात सफलता मिळाली नाही. तसेच त्याने पकडी करतांना देखील ३-४ वेळा घाईगडबड करत प्रतिस्पर्ध्यांना गुण बहाल केले. मात्र जयपुरचा कप्तान जसवीर आज सुरुवातीपासूनच पुर्ण जोषात आणि होश मधे राहून खेळत होता. आज त्याने उत्तम नियोजन करत स्वतः चढाईत ७ व पकडींत २ असे एकूण ९ गुण घेतले. त्याखालोखाल आज अजय कुमार ने ६ गुण घेतले. विशेष म्हणजे आज अजय बर्याच डु ऑर डाय वर खेळला. त्यामुळेच जसवीर जास्त वेळ मैदानावर राहू शकला. शब्बीर बापू ला आज यशाने हुलकावणी दिली. असाही त्याच्या ह्या मोसमातला खेळ त्याच्या किर्तीला साजेसा झाला नाही. राजेश नरवालने दुसर्या सत्रात एक सुपर रेड, एक उत्तम पकड करत बॅकलॉग भरुन काढत ४ गुणांची कमाई केली.
पकडफळीत आज दोन्ही बाजूच्या पकडपटूंनी कमाल केली. रण सिंह व अमित हुड्डा ने जबरदस्त पकडी करत ४-४ गुण घेतले.
तेलुगु टायटन्सला पाठींबा देतांना आज त्यांच्या घरच्या मैदानावर अनेक फिल्मी तारे आवर्जून उपस्थित होते. राणा दगुबत्ती, व्यंकटेश तर जयपुर संघाचे मालक अभिषेक बच्चन देखील त्यांच्या संघाचा खेळ पाहण्यासाठी आणि त्यांना अधूनमधून उत्साहित करण्यासाठी झटत होते.
तेलुगुचा स्टार चढाईपटू रोहित चौधरी ने आज चढाईत ९ गुण, तर निलेश साळुंके ने ६ गुण घेतले. संदिप नरवाल, सुकेश हेगडे, अतुल प्रत्येकी १ गुण.
पकडफळीमधे संदिप धुल ३ गुण, सागर क्रिष्णा १ गुण. आज तेलुगु ची बचाव फळी / पकड फळी निष्प्रभ ठरली. टायटन्सने चढाईत जास्त गुण मिळविले तर जयपुर ने पकडींमधे जास्त गुण कमाविले. टायटन्स आज चक्क दोनदा सर्वबाद झाली. दुसर्या सत्रात आघाडीवर गेलेल्या पिंक पँथर्सला रोखणे टायटन्सच्या पकडफळीला शक्य झाले नाही व दोघांच्या गुणांमधला फरक ७-९-१२-१३ असा वाढत वाढतच गेला.
शेवटी निर्णायक आघाडी मिळविलेल्या जयपुर ने खेळ संथ करीत नेला आणि आघाडी राखत टायटन्सचे अंतिम फेरीत जाण्याचे स्वप्न धुळीस मिळविले. जयपुर प्रचंड फरकाने विजयी !
तेलुगु टायटन्स(२४ गुण) वि. जयपुर पिंक पँथर्स (३४ गुण) - जयपुर पिंक पँथर्स १० गुणांनी विजयी.
===============================================================
माझ्या मागच्या प्रतिसादात वर्तविलेला अंतिम फेरीतील संघांविषयीचा अंदाज खरा ठरला. आता अंतिम विजय कोणाचा ?
सध्याची स्थिती पाहता ताकदीचा संघ पटणा पायरेटस वाटतोय.
बुद्धीचा कौल पटणा पायरेटसच्या बाजूने तर मनाचा कौल जयपुरच्या बाजुने.
तरी पण मला असे वाटते की जयपुर पिंक पँथर्स जिंकेल मात्र हा केवळ अंदाजच आहे. अर्थात माझ्या मताशी सहमत असणार्यांची संख्या देखील कमीच असेल हे मात्र नक्की !
बघुया ! ३१ तारखेला कळेलच काय ते !
===============================================================
विजेत्यांचे अभिनंदन !
आज प्रतिसादकर्त्यांनी धाग्यावर जास्त प्रमाणात उपस्थिती दर्शविली त्याबद्द्ल त्यांचे विशेष आभार !
परत भेटू या ३१ जुलै २०१६ ला. तोपर्यंत शुभरात्री !
- Log in or register to post comments
श
श्री
Sun, 07/31/2016 - 16:20
नवीन
महिला कबड्डी अंतिम फेरी, शेवटची दिड मिनिटे... बाप रे
- Log in or register to post comments
श
श्री
Sun, 07/31/2016 - 16:21
नवीन
महिला कबड्डी अंतिम फेरी, शेवटची दिड मिनिटे... बाप रे
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 07/31/2016 - 19:06
नवीन
आमची पटना जिंकली.धन्यवाद.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके
Sun, 07/31/2016 - 20:29
नवीन
दिवस ३३ वा : ३ र्या क्रमांकासाठीची लढत : पुणेरी पलटण वि. तेलुगु टायटन्स
३ र्या क्रमांकासाठीची लढत अगदी चुरशीची झाली. पुण्याचा मनजित चिल्लर आज मैदानात नव्हता त्यामुळे पुण्याच्या विजयाच्या आशा धुसर दिसत होत्या. मात्र पुण्याच्या इतर खेळाडूंनी विशेषतः दिपक निवास हुड्डा आणि जोगिंदर नरवाल ने कमालीचा सुंदर खेळ करत पुण्याला विजय मिळवून दिला.
पुण्याच्या बाजूने चढाईत दिपक निवास हुड्डा १६ गुण + पकडीत १ गुण असे एकुण १७ गुण, नितिन तोमर २ गुण अजय ठाकूर ३ गुण.
पकडींमधे जोगींदर नरवाल ६ गुण, सोमवीर शेखर ३ गुण तर प्रमोद नरवाल १ गुण आणि बदली खेळाडू प्रितम चिल्लर १ गुण.
तेलुगु टायटन्सच्या बाजुने आज राहुल चौधरी ने अप्रतिम खेळ करत तब्बल १८ गुण कमाविले तर निलेश साळूंकेला आज फक्त ३ गुणांवर समाधान मानावे लागले. संदिप नरवाल आज पकडींमधे चालू शकला नाही मात्र त्याला चढाईत एकमेव गुण मिळाला.
पकडफळीत महालिंगम ३ गुण, विशाल भारद्वाज २ गुण, तर सागर क्रिष्णा १ गुण.
टायटन्सची बचाव फळी आज एकदम कमजोर ठरली त्यामुळे राहुल च्या मेहनतीवर पाणी पडले. अखेरपर्यंत रंगतदार झालेल्या या सामन्यात दिपक हुड्डा ने शेवटच्या काहि मिनिटांत टायटन्सला सर्वबाद केले व तिथुनच सामना पुण्याच्या बाजुने फिरला.
दोन्ही संघ आज दोन वेळा सर्वबाद झाले.
पुणेरी पलटण (४० गुण ) - तेलुगु टायटन्स (३५ गुण) - पुणेरी पलटण ५ गुणांनी विजयी.
================================================================
महिला कबड्डी अंतिम फेरी सामना : फायर बर्डस वि. स्टॉर्म क्वीन्स
हा देखील सामना चांगलाच रंगला. सुरुवातीला काही काळ फायर बर्डस पुढे होते नंतर स्टॉर्म क्वीन्सच्या बाजुला झुकलेला सामना परत एकदा फायर बर्डसच्या बाजुने झुकला. शेवटच्या काही क्षणाला अशी परिस्थिती होती की स्टॉर्म क्वीन्स सामना गमावतील असे वाटत असतांना शेवटच्या काही क्षणांत सामना असा फिरला की सामना पुन्हा स्टॉर्म क्वीन्स पुढे गेले आणि अगदी १ गुणांच्या फरकाने जिंकले.
शेवटच्या चढाईत स्टॉर्म क्वीन्स १ गुणाने पिछाडीवर होते मात्र तेजस्विनी बाईने शेवटच्या चढाईत २ गुण घेऊन सामना १ गुणाने जिंकला.
फायर बर्डस कडून चढाईत मारिया मोनिका २ गुण, ममता पुजारी (कप्तान) चढाई व पकड मधे प्रत्येकी १ असे २ गुण, तर केरळाची बदली खेळाडू रिंजू के ने ७ गुणांची कमाई केली. रिंजुच्या खेळानेच काहि वेळेसाठी सामना फायर बर्डसच्या बाजुने झुकविला.
पकडफळीत किशोरी शिंदे ४ गुण, रितु नेगी २ गुण, पायल चौधरी व मोनिका देवी प्रत्येकी १ गुण तर बदली खेळाडू गायत्रीचे चढाई व पकडीमधे प्रत्येकी १ असे एकूण २ गुण.
स्टॉर्म क्वीन्सच्या वतीने चढाईत साक्षीकुमारीने चढाईत ६ आणि पकडीत २ असे सर्वाधिक ८ गुण मिळविले तर तेजस्विनी बाई चढाईत २ आणी पकडफळीत १ असे एकूण ३ गुण. बदली खेळाडू भावना यादव २ गुण तर रश्मिता साहू १ गुण.
पकडफळीत सोनाली इंगळेने जबरदस्त पकडी करत ४ गुण, दिपीका जोसेफ २ गुण तर ज्योती ने १ गुण घेतला.
फायर बर्डस (२३ गुण) वि. स्टॉर्म क्वीन्स (२४ गुण) - स्टॉर्म क्वीन्स १ गुणाने विजयी
================================================================
अंतिम सामना : जयपुर पिंक पँथर्स वि. पटणा पायरेटस
मागच्या प्रतिसादात वर्णन केल्याप्रमाणे बुद्धीचा कौल पटणा ला होता मात्र मनाचा कौल जयपुर कडे होता. शेवटी मनावर बुद्धीचा विजय झाला आणि पटणा प्रो कबड्डीच्या इतिहासात दुसर्यांदा जेते बनले.
सुरुवातीपासून जयपुर ने पकड मिळविलेला हा सामना पहिल्या सत्राच्या अखेरीस पटण्याचा बाजुला झुकला आणि मग पटणाने सामन्याची पकड शेवटपर्यंत ढिली हिऊ दिली नाही. मात्र त्यामुळे दुसर्या सत्रात हा सामना एकतर्फी व पर्यायाने मिळमिळीत झाला.
पटण्याच्या सुपरस्टार प्रदिप नरवाल ने अपेक्षेप्रमाणे उत्तम कामगिरी करत चढाईत १६ गुण तर सुरजित सिंह आणि राजेश मोंडल ने प्रत्येकी २ गुण घेतले. प्रदिप नरवाल ने आज जवळपास २५-२६ चढाया केल्या. आजचा त्याचा स्टॅमिना आणि खेळ दोन्ही वाखाणण्यासारखे होते.
पकडफफळीमधे इराणी हादी ने ५ गुण, बदली खेळाडू धर्मराज ने ३ गुण, कुलदीप सिंह ३ गुण तर फजल अत्राचली १ गुण. आज बाजीराव होडगे चा खेळ होत होत नव्हता त्यामुळे त्याला संघाने बाहेर पाठवून धर्मराज ला त्याच्या जागेवर खेळविले.
जयपुर कडून जसवीर सिंह ने नेहमीप्रमाणे उत्तम खेळ करत १३ गुण, राजेश नरवाल ७ गुण, तर अजय कुमार ने १ गुण असे चढाईत गुण घेतले.
पकडफळी मात्र आज अपेक्षेप्रमाणे खेळू न शकल्यामुळे जयपुरला हार स्वीकारावी लागली. उताविळपणामुळे बरेच गुण घालवावे लागले. तसेही प्रदिप नरवाल को पकडना नामुंकीन नही लेकीन मुश्कील जरुर है !
पकडफळीत अमित हुड्डा ३ गुण,तर रोहित राणा १ गुण. रण सिंहची पाटी कोरी, शब्बीर बापूची घागर रिकामी. तर बदली खेळाडू महिपत नरवालच्या हाताला देखील काहिच लागले नाही. केवळ २-४ खेळाडू खेळले आणि बाकीच्यांनी त्याच्या पुण्याईवर जगायचे ठरले तर मग हार ही ठरलेलीच ! मात्र जसवीर सिंह चे विशेष कौतुक. या वयातही त्याचा खेळ तरुणांना लाजविणारा आहे.
पटणा पायरेटस (३७ गुण) वि. जयपुर पिंक पँथर्स (२९ गुण ) - पटणा पायरेटस ८ गुणांनी विजयी.
==================================================================
अशाप्रकारे जवळ जवळ ३३ दिवस चाललेला प्रो कबड्डीचा हा ४ था मोसम आज समाप्त झाला. त्याचबरोबर आज कबड्डी पारायणाची सांगता देखील झाली आहे असे जाहिर करतो.
महिनाभर विविध खेळाडूंनी मनास आनंद दिला तर रसिकांनी खेळाडूंना मनात स्थान दिले. कबड्डीचा प्रसार वेगाने होण्यासाठी प्रो कबड्डीचे व्यासपीठ निश्चितच उपयुक्त ठरत आहे याबद्दल देखील आनंद वाटतो.
मिपाचे चालक मालक श्री . निलकांत आणि इतर व्यवस्थापक मंडळींनी मिपासारखे लोकप्रिय संकेतस्थळ माझ्यासारख्या सामान्य माणसा साठी उपलब्ध करुन दिले. ज्यामुळे मी सतत ३३ दिवस येथे लिखाण करु शकलो त्याबद्द्ल मी त्यांचा ऋणी आहे.
मिपावरील सर्व वाचक, प्रतिसादक यांनी जे प्रेम, प्रतिसाद दिला त्याचे आभार माणने शब्दात शक्य नाही.
खरेतर आनंद मोजण्याचे एककच उपलब्ध नाही आणि तो मोजणे देखील योग्य नाही. तो केवळ अनुभवावा या मताचा मी आहे.
यावेळी काही वार्तांकनात काही तांत्रिक / तपशीलातील चुका झाल्या असण्याची शक्यता आहे त्या पुढील वेळेस सुधारण्याच्या प्रयत्न करीन.
पुन्हा एकदा विजेत्यांचे अभिनंदन ! सर्वांचे आभार !
परत परत भेटत राहूया ! शुभरात्री !!
- Log in or register to post comments
र
रघुनाथ.केरकर
Mon, 08/01/2016 - 08:11
नवीन
३३ दीवस सतत लिहिल्याबद्दल आपले धन्यवाद, ऑक्टोबर ला भेटु...................विश्वचषकाला.
- Log in or register to post comments
न
नया है वह
Mon, 08/01/2016 - 08:28
नवीन
धन्यवाद! भेटु...................विश्वचषकाला
- Log in or register to post comments
प
पक्षी
Mon, 08/01/2016 - 10:23
नवीन
कब्बडी हा खेळ ऑलिम्पिक मध्ये आला तर आपलं एक पदक नक्की होईल. पण ऑलिम्पिक मध्ये हा खेळ येण्याचे श्यक्यता आहे का? आणि काय निकष असतात एखादा खेळ ऑलिम्पिक मध्ये सामील करण्यासाठी. एंटरटेनमेंट दर्जा आणि खेळातली चुरस ह्या बाबतीत तरी हा खेळ सरस आहे, भारतात कब्बडीची लोकप्रियता पण वाढतआहे.
हल्लीच वाचलेल्या बातमीनुसार गोल्फ आणि कुठलातरी(नाव विसरलो) खेळ ऑलिम्पिक मध्ये सामील करण्यात आले आहेत.
- Log in or register to post comments
र
रघुनाथ.केरकर
Tue, 08/02/2016 - 09:50
नवीन
कबड्डी तसा बराच लोकप्रिय खेळ आहे, राज्यस्तरीय सोडाच पण साध्या चौरंगी सामन्याला पण पब्लीक तोबा गर्दी करतं फ़ायनल ला तर तुफ़ान गर्दी असते. पावसाचे चार महिने सामने नसतात.
ह्या चार महिन्यात असोसिएशन्सनी इन्डोर सामने भरवले पाहीजेत. जेणेकरुन मुलांचा म्याट वर पण सराव होईल. सध्या सगळीकडे सराव हा मातीवरच होतोय.
- Log in or register to post comments
प
पक्षी
Fri, 08/05/2016 - 08:13
नवीन
अतिशय छान माहिती, पण कबड्डीचं ऑलिम्पिक मध्ये समावेश होण्याच्या शक्यतेचं काय
- Log in or register to post comments
न
नया है वह
Wed, 08/03/2016 - 11:28
नवीन
कबड्डीवर एखादा सविस्तर लेख येउ द्या तुम्ही या लेखात बरिच माहिती दिली आहे.
कबड्डी आणि खेळाडुंची आणखी माहिती जाणुन घेण्यास खुप ऊत्सुक आहे.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Fri, 08/05/2016 - 08:57
नवीन
मस्त धागा, मस्त वार्तांकन.
खूप धन्यवाद धर्मराज. किपीटप.
- Log in or register to post comments
श
शलभ
Fri, 08/05/2016 - 21:59
नवीन
+१२३४५६
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3