Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सांगली धागा निमित्ताने : सांगलीची खाद्यभ्रमंती

स
सुज्ञ
Sat, 07/09/2016 - 00:26
💬 62
प्रत्येक गावाला स्वतःचा एक स्वभाव असतो . तेथील माणसे , समाजजीवन , निसर्ग , लोकांचे दैनंदिन आयुष्य , राजकारण , गावात घडलेले बदल अशा अनेक गोष्टींमुळे त्या गावाचा एक स्वभाव तयार होत जातो. अनेक शहरांच्या अनेक तर्हा. थोडीशी खवचट आणि आता 'लोक दमड्या मोजायला तयार आहेत तर थोडी लुटालूट केली तर काय हरकत आहे .. नाहीतरी आपले गत आयुष्य गरिबीतच गेले ' असा स्वभाव बनलेली कोकणातील गावे, राजकारणी आणि दारूची दुकाने यावर नितांत प्रेम करणारी विदर्भ मराठवाड्यातील गावे , जुन्या परंपरा, देवळातील श्रीविष्णू आणि सिनेमातील नट यावर ठाम विश्वास असणारी गावे अथवा पैसा कमाओ और उडाओ इतकेच माहीत असलेली गावे . अनेक गावांचे अनेक स्वभाव तेथील समाजवैशिष्ट्यांमुळे बघायला मिळतात. आताशा प्रत्येक गाव ही फक्त एक बाजारपेठ आहे एवढेच धोरण होत असल्याने हळूहळू गावेही आता जिवंतपणे बोलत नाहीत पण त्याला इलाज नाही. सर्व जगात एकच चव देऊ शकणारे टेकअवे एकदा गावात उघडले की सर्व जगात दुसरीकडे कुठेच मिळणार नाहीत असे पदार्थ मिळणाऱ्या हॉटेलची प्रसिद्धी कमी होऊ लागते आणि अशा शहरीकरणास माझ्यामते चूक किंवा वाईट ठरवता येणार नाही कारण प्रत्येक गोष्टीचे तोट्यांबरोबर फायदेही असतातच. पण अजूनही अनेक गावे आपले स्वतःचे अस्तित्व टिकवून आहेत. सांगली हे त्यापैकीच एक. सांगली हे शहर असले तरी गावाचे 'तितके शहरीकरण' झालेले अजूनतरी बघायला मिळत नाही. छोटेसे व आटोपशीर गाव. नाट्यपंढरी , हळद, गणपतीचे देऊळ , वेशीवरून वाहणारी कृष्णा नदी , हरिपूर संगम इत्यादी अनेक गोष्टी सांगलीचे वैशिष्ट्य अथवा भेट देण्यासारखी ठिकाणे म्हणून विचारात घेत असताच या शहरात एक खाद्यसंस्कृती तयार आहे अथवा अगदी साध्या भाषेत अनेक उत्तमोत्तम व खाण्याची ठिकाणे उपलब्ध आहेत याचा अचानक विचार आला. हॉटेल चालवून आपण लोकांची मोठी सेवा करत आहोत अथवा हाटेलाबाहेर तिष्ठत बसलेले गिर्हाईक हेच आमचे समाधान किंवा खाण्यालायक काहीही आणि कसलेही द्या खपेल असे प्रकार येथे तसे कमीच दिसतात हेदेखील इथल्या संस्कृती का काय म्हणतात त्याचे वैशिष्ट्य मानावे लागेल असे जाता जाता नमूद करतो. असो. तर खाण्याच्या ठिकाणांची यादी करताना पदार्थवार यादी केली आहे . खालील ठिकाणे व तेथे मिळणारे पदार्थ हे स्वतः व अनेक लोकांकडून टेष्ट ( दोन्ही स्पेलिंग !) झाले असल्यामुळे बऱ्यापैकी खात्री बाळगण्यास हरकत नाही. नमूद केलेली ठिकाणे ही सकाळच्या नाष्ट्यापासून दुपारचे जेवण ते संध्याकाळच्या वेळी खाण्याच्या पदार्थांपासून ते 'दस्त ए साकी में आफताब' येईपर्यंतची यादी आहे. पोहे : १. मंजू चे पोहे : वालचंद कॉलेज पाठीमागे / विलिंग्डन कॉलेज समोर गाड्यावर . पोहे व भाजी उत्तम मिळतात. . समांतर : सांगलीत पोह्यांवर सांबार घेण्याची पद्धत आहे. येथे सांबार म्हणजे इडली बरोबर देतात ते नसून मिसळीचा रस्सा (समजण्यासाठी :शॅम्पल) असतो. कुठल्याही तिखट पदार्थात ( उदा तांबडा रस्सा , मटन वगैरे ) तिखटाची भुकटी वापरात नाहीत . त्यामुळे खान्देशी वगैरे तिखट खाऊन जी जळजळ आणि आग होते तसे न होता तिखटाचीही चव घेता येते. २. गणेश नाष्टा सेंटर. विश्रामबाग. ( येथील जवळपास सर्वच पदार्थ चांगले असतात . मात्र पोहे , उप्पीट , पायनॅपल शिरा, वडा सांबार उत्तम ) ३. हळद भवन. ( ब्रेड उसळ /चिवडा , पोहे , वडा सांबार इत्यादी ) ४. पहाटे ४ वाजता स्टेन्ड समोर गाड्यावरील पोहे. ५. हॉटेल पैप्रकाश: राममंदीर चौक ( मसाला टोस्ट खाऊन पहाच .) ६. प्रभू प्रसाद : बापट बाल शाळेसमोर ( वडा सांबार . यांच्याकडे थोडेसे रस्सम सारखे सांबार /सॅम्पल मिळते. ) ७. के टी नाश्ता सेंटर : एसटी स्टॅन्ड जवळ ( वडा सांबार , पोहे ). मिसळ या पदार्थास दुर्दैवाने सांगलीत तितका न्याय मिळाला नाही मात्र वडा सांबार मिळणाऱ्या जवळपास सर्वच ठिकाणी मिसळ चांगली मिळेल . ८ . थोडे लांबी जायची तयारी असल्यास अंकली फाट्यावर जैन वडा व अरिहंत वडा येथे वडा सांबर नक्की खाऊन पहा. ९. एन डिज : होंडा शो रूम शेजारी व काळ्या खणी शेजारी ( दूध कोल्ड्रिंक . कॉफी बियर. माझ्या माहितीत कॉफी बियर सांगली सोडून कुठे मिळत नाही) उसाचा रस वगैरे प्यायचा झाल्यास सगळीकडेच उत्तम मिळतो . कुठेही प्या . दुधाचे सर्वच पदार्थ हे येतील खास वैशिष्ट्य . सांगलीचेच असलेले चितळे बंधू यांच्या पदार्थाना येथे खूपच कमी मागणी आहे व खूप मोजक्याच दुकानांत त्याचे पदार्थ मिळतात. का ? सुज्ञास सांगणे नलगे . १. रामविश्वास दुग्धालय :वसंतदादा समाधीमागे ( सर्वच पदार्थ अतिउत्तम . त्यातही बासुंदी व आम्रखंड हे अप्रतीम. सांगलीबाहेरही प्रचंड मागणी .). २. मंगल मिठाई : मारुती चौक ( पेढे व कलाकंद अप्रतिम ) ३. बसाप्पा : मारुती चौक ( गुलाबजाम , अंगूर मलई व अनेक पदार्थ. ) ४. सीरवी बंधू : राममंदिर चौक ( ढोकळा , जिलबी कचोरी वगैरे पदार्थ चांगले मिळतात ). ५. सांगलीजवळ कुरुंदवाड व नरसोबावाडी येथेही बासुंदी उत्तम मिळते . दाट व सायीसकट मिळणारी बासुंदी . संध्याकाळनंतर भेळेचे अनेक गाडे सुरू होतात. तसेच चायनीज ( भारतीय चायनीज) ची छोटी मोठी हॉटेल्स ही चालू होतात. सांगलीत ज्या दर्जाचे चायनीज मिळते तसे मी अन्य कुठल्याही शहरात खाल्याचे आठवत नाही. तरीही कोणत्या चायनीज हॉटेल मध्ये काय खावे हे नमूनेदाखल देत आहे . १. संभा भेळ : वखारभाग. २. स्टार भेळ : पंचमुखी मारुती रोड सुरुवात ३. प्रतापसींह उद्यानासमोरील भेळेचे गाडे. ४. क्रांती भेळ : विश्रामबाग ( चायना हट शेजारी ) ( भेळ ,थालीपीठ, शेवपुरी ,पावभाजी वगैरे छान मिळते .) ५. चिकन ६५ चे अनेक गाडे आता चालू झाले आहेत तरीही एस्टी स्टेन्ड येथील कैफ चिकन व पुष्कराज चौक येथील श्रावणी चिकन या गाड्यांवर मस्त चिकन ६५ व सीजन मध्ये एकदम ताजे सुरमई /बोंबील मिळतात. ६. चाइना हट : विश्रामबाग ( क्रांती भेळ शेजारी ) ( सर्वच चायनीज पदार्थ जबरदस्त. येथील चायनीज चे अक्षरशः व्यसन लागते ) ७. कॉलेज कॉर्नर ला चायनीज चा एक गाडा असतो तेथे फक्त 'चायनीज भेळ' हा पदार्थ खावा . ८. हॉटेल बावर्ची. प्रताप टॉकीज मागे ९ आनंदराव यांचा गाडा : १०० फुटी सुरुवात ( अंडा पेटीस , भुर्जी . एकदा गाड्यासमोरून निघाला की दरवळनाऱ्या वासामुळे काहीतरी खाऊन जाणारच.) १० . हॉटेल हनुमान ( विश्रामबाग) : डोश्यांसाठी उत्तम ठिकाण . ११. पैप्रकाश राममंदीर चौक ( सीझलर्स चांगल्या मिळतात. अजूनही वाजवी किंमत ). १२. एन डिज होंडा शो रूम शेजारी : ( येथे चायनीज गाड्यावर व्हेज मंचुरियन खावे) तिथेच टोस्ट चा गाडा देखील आहे त्याच्याकडील टोस्ट खाणे . १३. शिवाजी पुतळा जवळ मिरज येथे गाड्यावर भजी. अशा अनेक ठिकाणी खाऊन झाल्यावर रात्रीसाठी मस्त गरम गरम चिकन / मटण तांबडा पांढरा रस्सा हवाच. . कोल्हापुरात जशा छोट्या खाणावळीं मधून अतिउत्तम घरगुती चिकन मिळते तसेच इथेही मिळते. यादी बरीच आहे पण चांगली ठिकाणी काही .. १. हॉटेल अनुराधा : सिव्हिल हॉस्पिटल रोड ( जुने) (पांढरा रस्सा ). २. गिरीजा : खिलारे मंगल कार्यालयाजवळ ( एक्दम ताजे घरगुती गरम चुलीवरील मटन / भाकरी ) ३. हॉटेल सौरभ आणि हॉटेल नंदनवन : कोल्हापूर रोड. ( चिकन मॅग्नेट हा पदार्थ इथे घेतलाच पाहिजे . ) ४. रहेमतुल्ला : मिरज ( खास इस्लामी चिकन ) ५. सांगलीजवळ इचलकरंजी येथे बुगड खानावळ ६. शेतकरी : १०० फुटी रोड ७. क्रांती मेस विजयनगर. ८. पूर्वा गार्डन : विजयनगर ९ आर्य ( आर्या ) : तर अशी ही थोडक्यात केलेली सांगलीची खाद्यभ्रमंती. ही सर्व ठिकाणे सोडून नेहेमीची पंजाबी भाज्या / दाल फ्राय जिरा राईस देणारी अनेक हॉटेल सांगलीत उपलब्ध आहेत. उदा हॉटेल नटराज :राममंदिर चौक अथवा हॉटेल पर्ल : विजयनगर . डॉमिनोज आणि तत्सम चेनही उघड्या आहेत (!) पण वर नमूद केलेले पदार्थ /ठिकाणे नक्की अनुभवा. असो . लिहून कितीही भ्रमंती घडवली तरी स्वतः टेस्ट केल्याशिवाय खाद्यभ्रमंती पूर्ण होत नाही हेच खरे.

प्रतिक्रिया द्या
25780 वाचन

💬 प्रतिसाद (62)
उ
उमेश नेने Sun, 07/10/2016 - 06:18 नवीन
पै प्रकाश मध्ये ' खिमा पुरी ' (शाकाहारी ) खूप मस्त असते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नमकिन
अ
अभ्या.. Sun, 07/10/2016 - 06:35 नवीन
बहुतेक त्याला कुर्मा पुरी म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उमेश नेने
स
सामान्य वाचक Sun, 07/10/2016 - 08:01 नवीन
कूर्म पुरी जबर्या तशी कूर्मापुरी पुण्यात नाही हो मिळत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
क
कैलासवासी सोन्याबापु Sun, 07/10/2016 - 08:29 नवीन
आमचे मामेकुळ सांगलीकडले आहे तिकडेच एकदा एका मुंजीत मी आमच्या मामाला वाढप्यावर 'बारक्या कुर्मा आण पटकन' असं ओरडताना पाहिलं अन नखशिखांत दचकलो होतो, कारण आमच्या (अन एकंदरीत उत्तरभारतीय) खाद्यसंस्कृतीत, कुर्मा हा फक्त बकरा चापचा असतो हेच आमच्या डोक्यात असे कायम, मात्र थोड्यावेळात कुर्मा म्हणजे कोबीची (फ्लॉवर) भाजी आहे , हे कळल्यावर निवायला झाले होते, अश्या रीतीने एक आठवण आहे बघा आमची 'कुर्मा पुरीची'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
म
मृत्युन्जय Mon, 07/11/2016 - 08:30 नवीन
बरे झाले सांगुन ठेवलेत. माझ्या डोक्यात कुर्मा म्हणजे फ्लॉवर बटाटा मटारचा तिखट रस्सा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
ग
गवि Mon, 07/11/2016 - 08:37 नवीन
बायदवे पै प्रकाशचा विषय आहेच तर: शुद्ध शाकाहारी खिमा टोस्ट (कुर्मा नव्हे), ग्रीनपीस ऑम्लेट (ग्रीन पीज नव्हे), आणि कानपुरी मिसळ (हे कुठून उत्पन्न झालं आणि पैप्रकाशमधे कसं पोहोचलं हा विषय गहन आहे) ..हे पदार्थ विसरणं म्हणजे प्रचंड गुन्हा. अर्थात आचारी बदलतात, टेस्ट बदलतात.. पण पदार्थ है सदा के लिए..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
S
Sanjay Uwach Sat, 07/09/2016 - 19:32 नवीन
नृसिहवाडीतून कोल्हापूर कडे जाणाऱ्या रस्त्यावर शिरोळचा दत्त साखर कारखाना लागतो .तिथे पूर्वी पासून दोन रुपयात झुणका भाकरी मिळते . पण घरातील पत्नीने केलेला झुणका भाकरी व इथल्या गरमा गरम झुणका भाकरीची चव कांही औरच असते . कडकडीत भाकरी व त्यावर लाल झणझणीत कांद्याचा झुणका .फारच मजा येते .अर्थात करणारे हात बदलले की चव पण बदलते . खूप गर्दी असते. भाकरी साठी पाळीत उभारणे थोडे विचित्र वाटते . पण प्रवासात दमून आल्यावर ह्या गावरान खाण्याचा आस्वाद फारच छान .बरोबर कधी कधी कांदा पण देतात .आम्ही खरे कोल्हापुरी बुक्की मारून कांदा फोडतो व खातो .( गावाची ओळख ). अलीकडे त्यांनी दर देखील वाढवले आहेत असे वाटते .
  • Log in or register to post comments
च
चावटमेला Mon, 07/11/2016 - 00:21 नवीन
कुर्मा पुरी हा खास सांगलीकडचा पदार्थ. नवरत्न मध्ये कुर्मा पुरी छान मिळायची. आताशाचे माहीत नाही. ८९-९० च्या सुमारास आमचे वडील मला आणि भावाला राजवाडा चौकातील सांगली बँकेमागे एका लहानश्या टपरीतील लस्सी प्यायला घेवून जायचे. ५० पैसे हाफ आणि १ रू. मध्ये फुल्ल. मला नाव आठवत नाही, पण तशी लस्सी मी जन्मात प्यायलो नाही. आता ते दुकान सुरू आहे की नाही हे सुद्धा माहीत नाही. दूध कोल्ड्रिंक ही सुद्धा खास सांगलीकर डेलिकसी, कोल्हापुरात सुद्धा छान मिळते. पुष्पराज चौकातील दूध कोल्ड्रिंक ला मात्र तोड नाही. बाकी मला विचाराल तर मेन कोर्स पेक्शा सांगली हे स्नॅक्स चे गाव आहे. उप्पीट हे सांगलीचे सिग्नेचर स्नॅक म्हणायला हरकत नाही. बृयाच टपर्‍यांवर, उडप्यांच्या हॉटेलात भरपूर डालडा/तेल, उडीद डाळ आणि कडी पत्ता घालून केलेल्या उप्पीटाची गोल वाफळाती मूद आणि तो कडी पत्त्या मुळे येणारा विशिष्ट कर्नाटकी पद्धतीचा वास डोळे, नाक, जीभ तिन्ही इंद्रिये तृप्त करून जातो. बापट बाल जवळ प्रसाद नाष्ता सेंटर आणि विश्रामबाग मध्ये गणेश, दोन्ही ठिकाणचे उप्पीट मस्त. सांगलीच्या भेळेचा युएसपी म्हणजे सांगली चे चुरमुरे. थोडे से बुटके आणि जाड असे चुरमुरे नुसते सुध्दा खमंग लागतात. चुरमुरे जाड असल्यामुळे, गोड आणि तिखट पाणी अगदी खूप टाकून पण मऊ पडत नाहीत. मुंबई प्रमाणेच सांगलीत सुद्धा सिझन मध्ये भेळेत कैरीच्या फोडी टाकतात. पुणे, कोल्हापूर सारखी छान चटकदार मिसळ मात्र सांगलीत कुठे खाल्ल्याची लक्षात नाही (मिळत ही असेल, पण मला माहीत नाही). मिसळी पेक्षा इथे वडा साम्बार, कट वडा जास्त फेमस आहेत. सांगली-मिरज रोडवर गेस्ट हाऊस ला पंडित पेट्रोल पंप शेजार च्या गाड्यावर मस्त कट वडा मिळायचा. पोह्यांचं विचाराल तर वर बर्‍याच जणांनी सांगितल्या प्रमाणे मंजुचे पोहे दी ब्येष्ट. असो, आज इतकेच (णॉष्टॅल्जिक) चावटमेला
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Tue, 07/12/2016 - 12:10 नवीन
सांगलीबद्दल बरीच माहिती मिळाली . एकेकाळी सांगलीतील असंख्य निष्पाप नागरिकांना घाबरवुन सोडणारी तडकडताई आठवली .
  • Log in or register to post comments
V
vikrammadhav गुरुवार, 07/14/2016 - 12:10 नवीन
अजुनहि असते तडकडताई !!! याच दिवसात !!!!
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री कुलकर्णी गुरुवार, 07/14/2016 - 18:10 नवीन
हे तडकताई काय प्रकरण आहे जरा विस्कटुन सांगा की राव.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 07/16/2016 - 10:38 नवीन
तडकडताई प्रथा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री कुलकर्णी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा