आषाणे कोषाणे धबधबा - भिवपुरी
या वर्षी जावु नाहीतर पुढल्या वर्षी नक्कीच जावु करत करत १५ वर्ष अशीच गेली. कुठल्याही पावसाळ्यात या ना त्या कारणाने पावसाळ्याची भटकंती लांबणीवर पडत होती. पण यंदा तो योग जुळुन आला आणि सहकुटुंब भिवपुरी येथील आषाणे कोषाणे धबधब्यावर जाणे झाले. आधी खरंतर पळसदरी मनात होते. पण लोकमतमध्ये पावसाळी भटकंती वर एका दिवसात करता येण्याजोगे ट्रेक विषयी एक सदर आले होते. त्यामध्ये या भिवपुरीच्या धबधब्याची माहिती आली होती. तिथे रॅपलिंग सुध्दा करता येते असे लेखात म्हंटले होते. म्हणुन तिथेच जायचे नक्की केले. मग काय कालच्या रविवारी बॅग भरुन तडक ठाणे स्टेशन गाठले.
स. ९.०० ची कर्जत लोकल मुंबईहुन येतानाच खचाखच भरुन आली होती जी काही २/४ माणसे उतरली त्यांच्या जागेवर पण दरवाजातच आम्हाला कसंबसं उभं राहाण्यापुरती जागा मिळाली. सर्वजण कुठे ना कुठे तरी भटकंतीलाच जात होते. डब्यात तर नुसता हलकल्लोळ माजला होता. गणपती बाप्पा..., शिवाजी महाराज... शिट्या ,आरोळ्या वगैरेंनी गाडी दणानुन सोडली होती. १०.३० ला भिवपुरीला पोहचली तर फलाटावर पाय ठेवायलाही जागा नाही इतकी गर्दी होती. सर्वजण २ क्रमांकाच्या फलाटावरुन उतरुन कर्जतच्या दिशेने चालु लागताच आपणही आपसुक त्या गर्दीबरोबर उत्साहाने चालु लागतो. साधारणपणे २ मिनिटात तुम्ही कर्जत मुरबाड रस्त्याला लागता. या रस्त्यावर डावीकडे वळुन पुन्हा कर्जतच्या दिशेने जात राहिलात की १ कि.मी अंतरावर उजवीकडे गोरीवली की कायसं गाव लागते. त्या ठिकाणी मग डोंगराकडे जाण्यासाठी रस्ता आहे.
मग आपण सर्वजण दुतर्फा घरे , शेती यातुन वाट काढत डोंगर चढु लागतो. साधारण पणे १५ मि. पहिला गुढघ्याएवढ्या पाण्याचा ओढा लागतो की गाव संपुन माळरान चालु झाल्याची खुण पटते.
गावातुन जाताना तुम्हाला गावाकर्यांच्या दारासमोर घरगुती जेवणाचे फलक लागलेले दिसतील. तिथे धबधब्यावर जाण्याआधी तुम्ही त्यांच्याकडे आगावु जेवणाची सोय करु शकता. तेव्हा खायची , प्यायची काळजी न करता बिनधास्त या सहलीचा आनंद लुटा.
या रस्त्याला डोंगराकडे जाण्यासाठी भरपुर वाटा आहेत. इतर वेळेचं माहित नाही पण कालच्या रविवारी इथे किमान २० हजाराच्या आसपास जनसागर होता. तुम्हाला जास्त चढण चढावी लागत नाही. पहिल्या ५ मिनिटाच्या आत धबधब्याचे दर्शन होते. तीन टप्प्यामध्ये पाणी खाली कोसळत येते. आता हे खालचे फोटोच सांगतील की काय अफाट गर्दी होती.
गाव चालु झाले आणि झुलणारी शेते दिसु लागली.
काही ठिकाणी नुकतीच नांगरणी झाली होती.
पाऊले चालती धबधब्याची वाट, डोंगरावरुन दिसणारे भिवपुरी स्टेशन परिसर.
हे बघा धबधब्याचे पहिले दर्शन
हा काय आलोच की आपण धबधब्याजवळ.
काही ठिकाणी भाताच्या खाचरात पाणी साठले मग काय तिथेच फुटबॉल खेळणे, डुंबणे चालु होते.
ही बघा रंगीबेरंगी जत्रा , अवखळ धबधब्याला भेटली तेव्हढीच अवखळ तरुणाई !
मध्येच पावसाने थोडी उसंत घेतली.
ते वरचे तिघे दिसताहेत तो पहिला टप्पा.
और ये मोती बिखर गये.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-ये जवानी हद कर दे, बूढ़े जवां को मस्त कर दे, कोई न जाने कल क्या हो, आने वाला पल क्या हो, ले मज़ा ले ज़िंदगी का ज़िंदगी का ज़िंदगी का... ;) :- Sarfarosh