कवी हूँ मैं
"कवींनी धुमाकूळ घातलाय
निव्वळ उच्छाद जिकडेतिकडे
ब्लॉगचा कट्टा ,फेसबुकची भिंत
ते ट्विटरची टाइमलाईन
कवीच कवी सापडतात
इकडेतिकडे चोहीकडे
एक जागा मोकळी सोडली नाही..
गझला काय, चारोळ्या काय
अरे दीर्घकाव्य लिहून
उप्पर से हायकू कायकू लिखनेका बाबा?
'कवी इलो' ची हाकाटी ऐकू आली की
पळत सुटतात सगळे सैरावैरा
कवींना दिलंय आपण मोकळे रान
आपले व्हाट्सऍप खुले सोडले
दिली आपली व्यासपीठं आंदण..
व्यासा, तू पण कवीच होतास ना रे?
आता यावर एकच उपाय उरलाय......"
वरच्यासारखं कुणी परत लिहताना दिसलं
तर त्याला पार उद्ध्वस्त करायचे..
शीघ्रकवितांचे धरण फोडून
मुक्तछंदांचा महापूर आणून
घरात त्याच्या सोडायचे
शेरोशायरींचे झुरळ....
त्याची पार शेळी करायची
शार्दूलविक्रीडीताच्या हल्ल्याने...
पाताळात दाबायचे
पृथ्वीच्या ओझ्याखाली....
तेजोभंग करायचा त्याचा
अभंगांच्या हत्याराने..
इंद्रवज्राच्या एका तडाख्याने
कोळसा करावा त्याचा!
ना ना मुझे छूना ना दूर ही रहना....
कवी हूँ मैं.... कवी हूँ मैं...
- स्वामी संकेतानंद
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bass Rani - Mumbai Dance feat. Julius Sylvest :- Nucleya